शिक्षकांची परवड

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
5 Sep 2010 - 3:46 pm

'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात.
पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली. तरी नवीन येणाऱ्‍या गुरुजींचे स्टार्स काही बदलणार नाहीतसे दिसते.
नाहीतरी आमच्या बालपणी अशीच परिस्थिती होती. मधला काही सुवर्णकाळ सोडला तर आजचा शिक्षकही तितकाच पिचलेला आढळेल. पूर्वी आम्हांला शिकवणारा एकुलता एक शिक्षक इतका दीन होता की आपलाही दिन साजरा करण्याइतकी त्याची दिन दिन दिवाळी होत नसायची. तो दिवाळखोरीतच मातीचे खोरे ओढतांना दिसायचा. शिडशिडीत अंगाच्या त्या मास्तराला महिना सरून गेल्यावर कडकडीत पगार भेटायचा, अन् तो उधारीची बिले चुकती करण्यातच संपायचा. त्यामुळे कायम खिशात कडकी.
त्यानंतर मास्तरलोक लोकसंख्येच्या प्रमाणात वाढले. त्यांची कॉलेजेस ठिकठिकाणी उगवू लागली. त्यांच्याही जोरदार संघटना जमल्या. तुटपुंज्या वेतनाचा जगजाहीर निषेध झाल्यावर राज्यकर्त्यांना गुरुवर्यांच्या शक्तिची कल्पना येऊन सूत्रे फिरली. राजकारण मास्तरांनाही कळले अन् त्यांचे नशीबसुद्धा फळफळले. इतके की मास्तरकी सारखा दुसरा समृद्ध जोडधंदा त्याकाळी उरलेला नव्हता, एवढी पगारवाढ प्रत्येक वेतन आयोगाने देऊन टाकली. तो आतबट्याचा व्यवहार आजही राज्याच्या तिजोरीवर एवढा परिणाम करतो की गेली आठ वर्षे शासनाने अनेक रिक्त जागा तोट्याच्या भयास्तव भरल्याच नाहीत. तरीही गुरुजी तयार करणारी टाकसाळ दरवर्षी कित्येक गुरुजींना जन्माला घालतेच आहे...
जागा कमी उमेद्वार जास्त. असं व्यस्त प्रमाण झाल्यावर शासनाने पुन्हा तोकड्या पगाराच्या कुबड्या मास्तरांहाती दिल्यात. त्यांना शिक्षणाचा 'सेवक' म्हणून गौरविले. चपराशा इतकी आमदनी त्यांना देऊ केली. फक्त दीड ते तीन हजारांत ह्या नव्या सरांनी भागवायचं कसं?
या शिक्षक दिनानिमित्त हा कळीचा प्रश्न चर्चिला जावा.
एवढी फाटकी जिंदगी सोसूनही हे गुरुवर्य प्रत्येक पोराची जिंदगी शिवून देण्याचं कार्य इमाने इतबारे करताहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
म्हणूनच सर्व शिक्षक बंधूभगिनींना शिक्षकदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!

जीवनमानशिक्षणसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Sep 2010 - 3:48 pm | विसोबा खेचर

एवढी फाटकी जिंदगी सोसूनही हे गुरुवर्य प्रत्येक पोराची जिंदगी शिवून देण्याचं कार्य इमाने इतबारे करताहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

सहमत आहे..

म्हणूनच सर्व शिक्षक बंधूभगिनींना शिक्षकदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!

माझ्याही शुभेच्छा..

तात्या.

एवढी फाटकी जिंदगी सोसूनही हे गुरुवर्य प्रत्येक पोराची जिंदगी शिवून देण्याचं कार्य इमाने इतबारे करताहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

अगदी...सहमत आहे.

>>>म्हणूनच सर्व शिक्षक बंधूभगिनींना शिक्षकदिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
माझ्याही मन:पूर्वक शुभेच्छा.......!

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 4:28 pm | मस्त कलंदर

लेख वाचला. काही गोष्टींशी असहमत. तुम्हांला वाटतंय तितकं केविलवाणं जीवन नाही राहिलंय शिक्षकांचं. माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे. सहाव्या वेतन आयोगानंतर आर्थिक दृष्ट्या एकंदर प्राथमिक शिक्षकांचीही स्थिती खूपच बरी आहे. हं, त्यांच्या मागची वाढीव कामे (जणगणना, असंख्य सर्वेक्षणं )ही काही सुटत नाही हे आहे खरं. त्यांना पुष्कळ सुट्या असतात हे जरी असले तरी अप्रगत लोकांसाठी शिक्षण आणि शिष्यवृत्ती परिक्षांसाठीचे जादा तास यासाठी त्यांना रोज सकाळी ९लाच शाळेत जावे लागते आणि एक-आड-एक रविवारही त्यांचा शाळेतच जातो.
जर हे शिक्षण सेवकांच्या बाबतीत म्हणायचे तर मात्र त्यांचे खरेच अवघड आहे. तीन-चार हजार पगार.. त्यात महिना कसाही निघणं अशक्य आहे. त्यात परत तीन वर्षांनंतर जिथे सेवक म्हणून काम केले, त्या मुख्याध्यापकाने शिफारस केली तर पुढचे ठीक, नाहीतर त्यातही जर कुणी राजकारण केलं, तर मग सगळंच संपतं.

(शिक्षक) मस्त कलंदर

आणि महाविद्यालयीन शिक्षकांबद्दल तर 'फाटके, दीनवाणे' इ. इ. छापाचे शब्द न बोललेलेच बरे. सहाव्या आयोगात त्यांचेही पगार पुष्कळ सुधारलेत. (उदाहरण द्यायचेच झाले तर सह्प्राध्यापकाचा पगार पंचेचाळीस हजारावरून थेट एक्यान्नवावर गेलाय, अर्थात याला मुंबईच्या राहणीमानाचे भत्तेही कारणीभूत आहेत) त्यातच जर त्यांचा क्लासेसचा जोडधंदा असेल तर काही बोलायलाच नको.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मकीशी सहमत आहे. स्वतः या क्षेत्रात असणारीकडून रिअलिस्टीक प्रतिसाद असतील अशी अपेक्षा होतीच. भारतातल्या बर्‍याचशा भागांमधे (आयटी शहरं वगळल्यास) चाळीस हजाराच्या वर पगार चांगला म्हणायला हरकत नसावी.
शिक्षकांना भलभलत्या कामांना जोडून दिलं जातं ते पटत नाही.
पुस्तकात वर्णन केलेली सेवाभावी वृत्ती मात्र किती शिक्षकांमधे दिसते हा ही संशोधनाचा मुद्दा असावा.

माझ्या आत्तापर्यंतच्या शैक्षणिक आयुष्यात बरेचसे शिक्षक शिक्षक आणि विद्यार्थी म्हणूनही मेडीओकर वाटले; काही शिक्षक मात्र खरोखर सेवाभावी होतेच आणि त्याच्याच जोडीला चांगले विद्यार्थी आणि शिक्षकही आहेत,होते. त्याच काही शिक्षकांची कृपा म्हणून आजही अभ्यास करताना आळस झटकताना त्रास होत नाही.

इंटरनेटस्नेही's picture

5 Sep 2010 - 7:18 pm | इंटरनेटस्नेही

.

पैसा's picture

6 Sep 2010 - 9:59 pm | पैसा

सहाव्या आयोगात त्यांचेही पगार पुष्कळ सुधारलेत. (उदाहरण द्यायचेच झाले तर सह्प्राध्यापकाचा पगार पंचेचाळीस हजारावरून थेट एक्यान्नवावर गेलाय,

तुलनेसाठी सांगते, आमच्या बँकेत रीजनल मॅनेजर, जो एका राज्यातील सर्व शाखांचं काम चालवतो, त्याला ५०००० पगार असतो!
माझे आई वडील माध्यमिक शाळेत शिक्षक होते. आणि आम्ही तसे मजेत रहात होतो! अगदी ८० च्या दशकात सुद्धा!

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 10:37 pm | शिल्पा ब

असले दीनवाणे वगैरे शिक्षक असतात हि माहिती नवीन...यांना पगार भरपुर असतो..
मी अगदी ३ री त असताना एकदा गावातल्या शाळेत मस्तपैकी झोपले होते तर बाईंनी वर्गात आल्यावर फारतर मला रागवायचे ते सोडून सरळ माझ्या दोन्ही पायांवर पाय ठेऊन उभ्या राहिल्या..

गिरगावातल्या डीजीटी हायस्कूल मध्ये असताना एक वर्तक नावाची भयानक बाई गणित शिकवायला होती..पाचवीत..इतकी खत्रूड, भयानक बाई परत शिक्षक म्हणून पहिली नाही..

सायनमधल्या S I E S मध्ये शाह नावाची अजून एक अकौंट शिकवायला बाई होती...तिची कसलेतरी कॉम्पुटरची एजन्सी होती..बाई खूप श्रीमंत.. मुले अगदी डॉन बोस्को मध्ये वगैरे...तर हि बाई एकतर कालेजात यायचीच नाही...आली तरी महिन्यातून एखादा आठवडा धरा..पगार मात्र सगळा घ्यायची...वर्गात आली तरी शिकवायची बोंब..अन वर कसली तरी मिजास.

आता हि एक एक उदा. दिली...असे अनेक " शिक्षक" असतील...आपापले अनुभव तपासावेत...विद्यार्थ्यांनी अशांना फाट्यावर मारले तर रडायचे काय कारण? माझ्या मनात या लोकांबद्दल जराही आदर नाही...

नाही म्हणायला शाळेत असताना गाडगीळ, नेमाडे , अजून एक सर जे vice princi होते ते, कालेजातले गुजर सर, तांबे सर आणि princi तांबे गेल्यावर जे आले ते princi (नाव विसरले ) ते, सरस्वती म्याडम असे काही काही चांगले अनुभव आहेत...आणि हे केवळ माझेच नाही तरी या शिक्षकांविषयी त्यांच्या कोणत्याही विद्यार्थ्याला विचार चांगलेच मत असेल...व्यवस्थित शिकवणार, शंकांना उत्तरे देणार, कधी टाईमपास करणे नाही, मुलांना प्रेमाने वागवणार मग मुले का नाही त्यांना आदर देणार?

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 11:39 pm | मस्त कलंदर

यांना पगार भरपुर असतो..

तो आता असतो. आधी नसायचा.
आता याच व्यवसायात आहे म्हणून एक निरिक्षण: बहुतांशी शिक्षक या बायका असतात. आणि बर्‍याचजणींचे नवरे चांगल्या पगारावर असतात. ज्यांना आपले काम न करता शाळा-कॉलेजात फक्त वेळ घालवण्यासाठी यायचे असते त्या आपल्या नवर्‍यांच्या पैशावर माज दाखवत असतात. अर्थात २० टक्के बायका तरी अशा असतातच. माझ्या अशाच एका रोज वेगवेगळे मोठमोठाले हिरे घालून आणि स्वतःच्या गाडीतून येणार्‍या बाईंचा आवाज पहिल्या बाकापर्यंतही जात नव्हता. त्यांच्या शिकवण्याबद्दल तर मी बोलतच नाही. पण त्यांच्याबद्दल एक विद्यार्थ्यांचं मत काय, तर "शी एज फ्रॉम वेल टू डू फॅमिली ना??" म्हणजे शिक्षकांनी चांगलं शिकवणं अपेक्षित होतं की श्रीमंतीचं प्रदर्शन करणं काही कळत नाही. कुठल्या पुरूष शिक्षकाकडे पाहून त्याला खूप जास्त पगार आहे असे वाटले होते का तुला?

तुला आले असतील वाईट अनुभव, पण त्याचबरोबर चांगलेही आलेच असतील. काहींकडे पैशांची श्रीमंती असेल आणि काहींकडे ज्ञानाची इतकंच.

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 11:44 pm | शिल्पा ब

काही शिक्षक या व्याख्येत बसणारे शिक्षक होते त्यांच्याबद्दल शेवटच्या para मध्ये लिहिलंय..तुझं म्हणणं बरोबर आहे...पुरुष शिक्षक (थोडेफार अपवाद आहेत पाहण्यात) खूप पैसेवाले नव्हते वाटत..बऱ्याच बायका मात्र गाडीवाल्या वगैरे तू म्हणते तशा होत्याच...बहुतेकदा त्या आम्हाला वर्गात आल्या आल्या बाहेर काढायच्या त्यामुळे काय अन कसं शिकवतात याची फारशी माहिती नाही. :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Sep 2010 - 11:58 am | ज्ञानोबाचे पैजार


http://epaper.dnaindia.com/epapermain.aspx?queryed=20&eddate=9/5/2010
Happy Teachers day या मथळ्या खालील फोटो पहा.
मला लिंक नीट देता आली नाही म्हणुन असा पर्याय शोधला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2010 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही लिंक का?
http://epaper.dnaindia.com/bigwin.aspx?url=EpaperImages\05092010\dododkdik-large.jpg&eddate=9/5/2010&pageno=1&edition=20&prntid=124191&bxid=910&pgno=1

शिल्पा ब's picture

6 Sep 2010 - 9:44 pm | शिल्पा ब

नाचले तर नाचू द्या कि...का शिक्षक आहेत म्हणून सतत बध्दकोष्ठ झाल्याप्रमाणेच राहावं काय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Sep 2010 - 12:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद अदिती ताई