"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
3 Sep 2010 - 11:50 pm

GPSachin1

आज (शुक्रवार) सायं.५.०० वाजता नवी दिल्ली येथे भारतीय विमान दलाने आयोजित केलेल्या एका खास, अनोख्या आणि समस्त भारतीयांना आनंद वाटावी असा एक कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा "एअर फोर्सचे ऑनररी ग्रुप कॅप्टन" या मानाच्या पदाने गौरविण्यात आले. ते प्रसंग फोटोरुपाने येथे देत आहे.

GPSachin2

या प्रसंगी सचिन म्हणाला, "मी अगदी लहान असल्यापासून फायटर प्लेनबद्दल फार आकर्षण बाळगून होतो. मात्र अशा फायटर प्लेनमध्ये बसण्याची संधी मिळाली ती १९९६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यात. तसेच वैमानिक घालतात त्या खास गॉगल्सचीदेखील मला आवड निर्माण झाली, ती टॉम क्रूझला "टॉप गन" मध्ये पाहिल्यापासून."

GPSachin3

एअर फोर्सने सचिनला 'ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर'चाही दर्जा दिला आहे.

ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

समाजशुभेच्छा

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

4 Sep 2010 - 12:01 am | वाटाड्या...

सचिनबद्दल काही म्हणणं नाही पण अश्या गोष्टींनी साध्य काय होतं ते कळ्ळ तर बरं वाटेल. अश्याने काही व्यावसायिक वैमानिक नसलेली मंडळी युद्धात फायटर विमान घेऊन भारतीय सीमेचं रक्षण करायला जाऊ शकत नाहीत. मग हा उपद्व्याप कशासाठी ते कळल नाही...

- (फायटर) वाटाड्या...

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 1:21 am | इन्द्र्राज पवार

"पण अश्या गोष्टींनी साध्य काय होतं ते कळ्ळ तर बरं वाटेल."

ही शंका रास्तच आहे असे मी मानतो, आणि त्याचा खुलासा असा की, एअर फोर्सने या मानद पदवीबद्दल त्यास जो ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडरचा दर्जा दिला आहे त्यातून सचिन तरुण-तरुणीना 'भारतीय विमान दला'त प्रवेश घेण्यास उद्युक्त करणार आहे. सचिनसारखा "आयडॉल" असे काही आवाहन करीत असेल तर किमान काही तरूणांना त्यातून स्फूर्ती मिळेल अशी आशा आहे.

शिवाय तीन दल सोडून देशासाठी समाजात विविध स्थळी या (सचिनच्या) किंवा याहून आगळ्यावेगळ्या दर्जाचे कार्य करणार्‍या "सिव्हीलियन्स" ना यापूर्वी एअर फोर्सने अशी मानद पदे देऊन सार्थ गौरविले आहे. उदा. जे.आर.डी.टाटा, विजयपथ सिंघानिया, आदी.

क्रिडाक्षेत्राला हा मान प्रथमच देण्यात आला आहे, आणि तो आपल्या सचिनला मिळाला याचा आनंद जास्तच आहे.

इन्द्र

Pain's picture

4 Sep 2010 - 2:00 am | Pain

तुमचा हा खुलासा वाचला आणि असे आधी झाल्याचे कळले पण तरिही हे पटले नाही. प्रभावशाली व्यक्तींना विद्यापीठाची मानद पदवी देणे ठीक आहे पण सैन्यातील अधिकाराचे पद ? थोडे जास्त होते आहे असे वाटले.
हा प्रकार येथेच थांबवावा, पदकांपर्यंत नेण्यात येउ नये.

भारी समर्थ's picture

4 Sep 2010 - 5:02 am | भारी समर्थ

समाज कार्यामधे कार्यरत असणार्‍या एखाद्या संस्थेचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर होऊन जनतेला त्या कार्यासाठी उद्युक्त करणं वेगळं आणि एयर फोर्सचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर बनणं सर्वस्वी वेगळं नाही का?
देशप्रेमामूळे नाही तर, सचिन किंवा दुसरा एखादा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर असल्यामूळे सैन्यदलात भरती होणार्‍या सैनिकांपासून काय अपेक्षा ठेवाव्यात?
शिवाय, जेव्हा एखादी अशी व्यक्ती असल्या भानगडीत पडते तेव्हा त्याच्या इतर वैयक्तिक गोष्टीही त्याबरोबर जोडल्या जात नाहीत का? उदा. सचिनने कालसर्प का काय ते करून व स्वतःच्या अंधश्रद्धेबद्दल (कोणता पाय आधी मैदानात टाकायचा की असच काही, त्याच्या परम भक्तांनी आमच्या ज्ञानात भर घालावी) जाहीर वाच्यता केली आहे. अशावेळी त्याच्यामूळे हवाई दलात भरती होणार्‍याने आपली श्रद्धा देवापाशी ठेवावी की देशापाशी?

उत्तराच्या अपेक्षेत!

(मज पामरासी काय थोरपण?)

भारी समर्थ

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 10:30 pm | इन्द्र्राज पवार

"सचिनने कालसर्प का काय ते करून व स्वतःच्या अंधश्रद्धेबद्दल (कोणता पाय आधी मैदानात टाकायचा की असच काही, त्याच्या परम भक्तांनी आमच्या ज्ञानात भर घालावी)"

~~ श्री.समर्थ यांचा हा प्रतिसाद माझ्या नजरेतून सुटला होता, त्यामुळे वेळीच त्याला प्रतिसाद देवू शकलो नाही.... पण आता तो देणे गरजेचे आहे (वरील मुद्द्याबाबत...)

प्रतिसादात उल्लेख केलेल्या या बाबीचा (सचिनच्या अंधश्रद्धेचा...) मी त्याचा चाहता असूनही त्यावेळी निषेध केला आहे. इथे आणि अन्य सम संस्थळावर (सचिनने कालसर्पाची पूजा करणे आणि अमिताभ बच्चनने त्याच सुमारास जया भादुरी बरोबर बालाजी मंदिरात जावून होणार्‍या सूनबाईंचा "मंगळ" हटविण्यासाठी गाजावाजा करून घातलेली ५५ लाख रुपये देणगीची पूजा....अधिक ऐश्वर्याचा झाडाबरोबर अगोदर विवाह लावणे...इ.इ. चीड आणणार्‍या बाबी....या दोन्ही घटनांचा त्या त्या वेळी विविध जालावर बरीच गरमागरम चर्चा झाली होती....आणि या बाबींचा विरोध करणार्‍या गटात मीदेखील होतोच).... पण श्री.समर्थ यांना मी इथे विचारतो की, असा विरोध करण्यापलिकडे सचिनचा एक सच्चा हितचिंतक वा चाहता या पलिकडे जावून आणखीन काय करणार?

तो आवडतो म्हणून करीत असलेल्य सर्वच कृत्यांचा पाठपुरावा करीत नाही. नीरक्षीरविवेक सूत्र अंगीकारले आहे, इतपतच मी इथे म्हणू शकतो.

इन्द्रा

पैसा's picture

5 Sep 2010 - 10:53 am | पैसा

आपल्याला त्याच्या खेळाशी मतलब आहे

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2010 - 1:17 pm | प्रकाश घाटपांडे

सचिन वा अमिताभ बच्चन ही त्यांच्या क्षेत्रात ग्रेट असली तरी इतर बाबतीत सर्वसामान्य माणसेच आहेत. त्यामुळे डोक्यातील किडा हटवण्यासाठी कालसर्प वा अन्य पुजा त्यांनी घातल्या तर नवल नाही. ते काही अश्रद्ध विवेकी विद्वान नाहीत. उद्या नरेंद्र दाभोलकरांनी नारायण नागबळी ची पूजा घातली तर त्याची बातमी होउ शकेल.
मी काही सचिन वा अमिताभचा फॅन नाही . पण त्यांच्या पंखे लोकांनी त्यांच्या या वर्तना बद्दल अवघड वाटुन घेण्याचे काही कारण नाही इतकेच मला म्हणायचे आहे.

इन्द्र्राज पवार's picture

6 Sep 2010 - 2:09 pm | इन्द्र्राज पवार

"सचिन वा अमिताभ बच्चन ही त्यांच्या क्षेत्रात ग्रेट असली तरी इतर बाबतीत सर्वसामान्य माणसेच आहेत."
+ सहमत.

"उद्या नरेंद्र दाभोलकरांनी नारायण नागबळी ची पूजा घातली तर त्याची बातमी होउ शकेल."
याच्याशी तर वरील विधानापेक्षा जास्त सहमत.

वास्तविक आपणाला लताच्या आवाजाने आणि सचिनच्या खेळामुळे निखळ आनंद मिळत असेल तर त्यांच्या खाजगी आयुष्याकडे पाहुन आपले मत वेगळे का तयार करायचे, हाही मुद्दा आहेच.

एकदा श्री.शिरीष कणेकर यांच्याशी घरगुती गप्पा मारताना/बोलताना लतादिदी त्यांना म्हणाल्या, "अहो कणेकर, बाजारात जायची काय सोय राहिलेली नाही, किती महागाई वाढली आहे !!" ~ श्री.कणेकरांना साहजिकच थोडे आश्चर्य वाटले.... पण आमच्याशी बोलताना ही बाब जेव्हा त्यांनी सांगितली त्यावेळी मला लतादिदी भलत्याच भावल्या, इतक्या की त्या आता या क्षणी जवळपास कुठेतरी आहेत आणि त्यांच्या आणि आमच्या सुखाच्या कल्पनांत कसलाही फरक नाही. (कोल्हापूरातील सुप्रसिद्ध 'चन्द्ररूप साडी सेंटर' मधून त्या स्वतःला आणि कुटुंबियांसाठी, तसेच मैत्रीणीसाठी साड्या खरेदी करीत असतात. श्री.कणेकरांच्या किश्श्यामुळे खात्री पटली की त्या साड्या खरेदी करतेवेळीही किंमतीबाबत घासाघास करीत असणारच. का करू नये?)

इथे "लता मंगेशकर यांची आर्थिक स्थिती किती चांगली आहे, आणि तरीही त्या कशाकाय बाजारात जातात, अन् त्यांना महागाईचे काय हो?" असले प्रश्न उद्बवू नयेत. त्या तुमच्याआमच्यासारख्याच एक सर्वसामान्य नागरीक आहेत हे मानले तर कुठलाही वाद होण्याचे कारण नाही...तशीच सचिनची 'ती' श्रद्धा.

इन्द्रा

अनुराग's picture

4 Sep 2010 - 11:21 am | अनुराग

आवडले

कुंदन's picture

4 Sep 2010 - 12:04 am | कुंदन

सचिन चे अभिनंदन.....
'ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर' सचिनला "फ्लाईंग कोफिन" ( उडती शवपेटी) - मिग २९ याबद्दलही वायुसेनेने कल्पना दिलीच असेल.

सुनील's picture

4 Sep 2010 - 1:30 am | सुनील

हे थोडे काही विद्यापीठे नामवंतांना मानद डॉक्टरेट देतात तसे वाटते.

अर्थात, असे मानद डॉक्टर आपल्या नावानंतर D. Litt. असे लावू शकत असले तरी त्यांना नावापूर्वी डॉ. अशी पदवी लावता येत नाही. सैन्य दलाच्या मानद पदव्यांबबत काय नियम आहेत?

सचिनचे अभिनंदन!

पैसा's picture

5 Sep 2010 - 10:51 am | पैसा

तर मग जयाललिता अम्मा आपल्या नावामागे डॉ. कसं काय लावतात? त्यानी अशी कुठची पी.एच.डी. केली आहे?

सचिनला एअरफोर्स ब्रँड अँबॅसिडर बनवण्याची कल्पना चांगलीच आहे, वायुदलाचे ह्या कल्पनेबद्दल अभिनंदन!
(बा़की सचिन त्या वायुदलाच्या गणवेशातसुद्धा एकदम स्मार्ट दिसतोय.)

रंगा

बातमी डकवणारे पुष्कळ आहेत. शिवाय ही गोष्ट प्रसिद्ध झालाशिवाय राहूच शकत नाही अशी आहे.

तुम्ही भरपूर फिरता, अनेक लोक आणि प्रसंगांचे साक्षीदार आहात, सखोल ऐतिहासिक, वर्तमानाचे ज्ञान आणि इतके दिवस मिपावर गैरहजर होता (भरपूर वेळ). अनेक धाग्यांवर तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले आहेत आणि या पार्श्वभूमीवर तुमचा असा हा पहिलाच धागा.
इतक्या अपेक्षा असताना मात्र या धाग्याने निराशा केली.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 10:27 am | इन्द्र्राज पवार

श्री.पेन.... तुमच्या प्रतिसादातील माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची मी दखल घेतोय आणि त्या लिखित स्वरूपात इथे प्रकट केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

एक गोष्ट मला इथे सांगणे फार गरजेचे आहे, अन् ती म्हणजे 'लता मंगेशकर', 'सचिन तेंडुलकर' या दोन नावांने मी चटकन फार भावूक होऊन जातो. (माझ्यासारखे असे करोडो असतील यात शंकाच नाही.) सचिनबद्दल कुठेही काहीही छापून आले की मी ते लागलीच इतरांसमवेत कधी एकदाचे "शेअर" करू असे होऊन जाते. आता या प्रेमाच्या भावनेला म्हटले तर वेडेपणादेखील म्हणू शकता, पण त्याच्याबाबतीत मी फार हळवा आहे हे मान्य करतो. हा धागा देण्याच्या प्रसंगी 'ती' बातमी तासनतास सर्व न्यूज चॅनेल्सवरून दिमाखाने झळकत होती, त्यामुळे देशालाच काय पण जिथे जिथे भारतीय आहे त्या त्या परदेशातदेखील ती पोचली होतीच. तरीही इथे धाग्याच्या रुपाने आणण्याचा उद्देश म्हणजे 'चला त्या निमित्ताने आपल्या लाडक्या सचिनला मिळालेल्या मानाबद्दल इथल्या सदस्यांना काय वाटले हेही जाणून घेऊ या..." ही भावना मनी आली होती. (त्यावेळीही दोन्ही प्रकारची मते येणार याची बालंबाल खात्री होती.)

मिपावर मी बराच काळ गैरहजर होतो, ही बाब मान्य.... पण त्यामागील कारण "कौटुंबिक" असल्याने इथे त्याची चर्चा नको.

इन्द्रा

पवार साहेब, उगाच कुणाला खुलासे देत जाउ नका हो, च्यायला इथे एखादा हजर राहिल किंवा गैरहजर, कुणी विचारायचे काय काम? मी तर चार शिव्या देईन मला कुणी असे गैरहजर राहण्याबद्दल विचारले तर. (एक धागा टाकुन प्रतिसाद न देता पळुन जाणे वेगळे अन गैरहजर राहणे वेगळे)

बाकी सच्या मस्त दिसुन राह्यला. नक्की उद्देश माहित नाही, पण सचिनच्या उपस्थितीने जवान नक्कीच खुश झाले असतील.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 3:04 pm | इन्द्र्राज पवार

"बाकी सच्या मस्त दिसुन राह्यला."

व्वा....किती छान वाटते कुणीतरी सचिनला ज्यावेळी "सच्या" असे म्हणते त्यावेळी. हीच आपुलकी त्याच्या पाठीशी सदैव राहिली आहे आणि तो तसे वेळोवेळी जाहीरपणे कृतज्ञतेने बोलूनही दाखवितो.

हवाई दलाच्या त्या कार्यक्रमाला हजर असणार्‍या जवानांना त्या प्रसंगी किती आनंद झाला होता त्याचे फोटो तुम्ही पाहिले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. खराखुरा "आयडॉल" आहे आपल्या सच्च्च्च्या !!

जपानचा आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का? नक्कीच नाही, पण 'कॅनन' कंपनीने सचिनला आशिया खंडासाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर नियुक्त केले होते. दिल्लीतील नीरज द्विवेदी नावाच्या माझ्या एका मित्राने त्या वर्षी झोनमध्ये सर्वाधिक विक्री करून "बेस्ट एक्झेक्युटीव्ह ऑफ द इयर" चा बहुमान मिळविला. दिल्लीच्या मेरिडियन हॉटेलमध्ये एका खास कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्याचा ती ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला (त्याचे फोटो त्याने मला पाठविले आहेत). सत्कार आणि तोही आपल्या "आयडॉल"च्या हस्ते या कल्पनेने तो इतका हरखून गेला होता की ती संध्याकाळ येईपर्यन्त त्याचे चित्त थार्‍यावर नव्ह्ते. पत्रावर पत्रे पाठवून त्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आणि सचिनविषयी तो जी भाषा वापरित होता ते वाचून आम्हाला तर त्यावेळी तो केजीचा विद्यार्थी भासू लागला होता. नीरजने हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे, पण त्याच्या मनात "या दहावी नापास विद्यार्थ्याकडून ट्रॉफी कशी स्वीकारायची" असला खत्रूड विचार आला असेल का?

हीच आमच्यातुमच्या सच्याची महती.

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 3:20 pm | परिकथेतील राजकुमार

मालक हि एक जाहिरातच सगळे काही बोलुन जाते :) शेवटच्या भागात सचीनला बघुन त्या लहान मुलाच्या चेहर्‍यावरजे अवर्णनीय भाव येतात ते क्लासच.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 6:01 pm | इन्द्र्राज पवार

फार सुंदर आहे ही "मास्टरकार्डस्" ची केनया सफारी जाहिरात...आणि विशेषतः तुम्ही म्हणता तसे 'लाडक्या सचिन' ला पाहुन त्या लहान मुलाच्या चेहर्‍यावर येणारे हर्षाचे भाव !

जाहिरातीतील 'There are some things money can’t buy' ~ हे वाक्य सचिनमुळे होणार्‍या आनंदाला पुरेपूर लागू होते.

इन्द्रा

सहज's picture

4 Sep 2010 - 6:06 pm | सहज

शेवटी ही जाहीरात आहे, ते काही उत्स्फूर्त भाव नाही. न जाणो कित्येक रिटेक्स झाले असतील. पैसे देउन करवुन घेतलेले भाव म्हणजे सच्चे असतीलच असे नाही हो.

भक्तीभाव पहायचे तर मुंबईच्या मार्गारीटाचे पहा हो!

इन्द्र्राज पवार's picture

5 Sep 2010 - 10:36 am | इन्द्र्राज पवार

"पैसे देउन करवुन घेतलेले भाव म्हणजे सच्चे असतीलच असे नाही हो."

~~ हे मान्यच. पण तरीही एखादी जाहिरात पाहताना त्यातील संबंधित पात्रे जर त्या भूमीतीलच (उदा.केनयातील तो छोकरा....) असतील तर नाही म्हटले तरी त्याला 'सचिन' ला पाहुन व त्याच्याबरोबर कामानिमित्ताने काही काळ व्यतीत करण्यामुळे झालेला आनंद यांचे कुठेतरी प्रतिबिंब जाहिरातीत येतेच येते, तोच आपलाही आनंद.

घरातील ज्येष्ठ लोक काहीवेळा (आताचे चित्रपट व त्यातील नायिकांचा अवतार पाहून) असे म्हणतात, "काय सांगू तुला आमच्यावेळी मीनाकुमारी, मधुबाला, वहिदा काय काम करायच्या !! मीनाचा 'दिल एक मंदिर' पाहून आमच्या डोळ्यात पाणी तरळायचे." ~~ आता इथे त्या पिढीच्या लोकाना 'अहो मामा/काका, शेवटी तो अभिनय आहे, मीना असो वा वहिदा त्यांनी त्यासाठी पैसे घेतलेले असतात." असे म्हणून त्यांच्यावर काय परिणाम होणार?

शेवटी त्या क्षणापुरता होणारीआनंदाचे बिंदू महत्वाचे...इतकेच !

इन्द्रा

सहज's picture

5 Sep 2010 - 11:05 am | सहज

खरे व खोटे यातला फरक समजुनही वर काहीही कारणे देउन, फरक न समजल्यासारखा केला तर इतिहासाचे पुर्नलेखन होते.

ज्या स्क्रिनमधे त्या मसई पोराचा चेहरा हसला, तो कदाचित त्याने ग्रीनस्क्रीनवर दिला असणार. समोर सचिन नसेलही अशी शंका असण्यास प्रचंड वाव आहे. पुन्हा तो शॉट फ्रीज करुन बघणे. पहा ३९ ते ४१ सेकंद. आजकाल बर्‍याच जाहीराती ग्रीन स्क्रीन समोर होतात.

संतोषीमाता, राम-सीता, कृष्णाचे काम करणारी कलाकार मंडळी जिथे जातात तिथे दर्शनास लोक लोटतात. असेच सश्रद्ध व अश्रद्ध लोकांच्यातले मतभेद वाढत जातात. मुद्दा हा की खरे व खोटे यातला फरक समजणे महत्वाचे व जिथे शंकेला वाव आहे तिथे शंका घेणार्‍यांना जरुर शंका घेउ दिली पाहीजे.

जे काय म्हणायचे आहे ते समजुन घ्या. इतकेच :-)

भारी समर्थ's picture

4 Sep 2010 - 6:47 pm | भारी समर्थ

जपानचा आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का? नक्कीच नाही, पण 'कॅनन' कंपनीने सचिनला आशिया खंडासाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर नियुक्त केले होते.

दुसर्‍या वाक्यातच पहिल्यातील प्रश्नाचे उत्तर, तसेच सदर कंपनीच्या व्यावहारिक चातुर्याचे दर्शन घडते. असो. तुमच्या मित्राचे हार्दिक अभिनंदन!

इथे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. सचिनचे क्रिकेटमधील सर्वोच्च स्थान वादातीतच आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जीवनातील साधेपणाही बरंच काही शिकवून जाणारा आहे. प्रतिभावंत क्रिकेटपटूंची या देशात वानवा नाही. पण सचिनचा वागण्या-बोलण्यातील संयतपणा व जगण्यातील आदर्शवाद त्याला इतरांपासून खूप उंच नेतो हे इथल्या प्रत्येकाचेच मत असावे यात काही शंका नाही.

चर्चेचा मुद्दा हा आहे की, सचिनच काय पण कोणत्याही क्रिडापटूला अशा प्रकारची पदं देणं योग्य आहे की नाही. काहींना वाटतं आहे तर काहींना नाही वाटत तसं. पण म्हणून आपल्या मताविरूद्ध लिहीणारे म्हणजे विचारजंत, मळमळ काय....उगाच सूतावरून स्वर्ग गाठतात राव काही मंडळी.

पवारांचे (पवार साहेबांचे लिहीणार होतो, पण उगाच चर्चेला राजकीय रंग चढवला वगैरे म्हणायचे लोक..) लेख फारच अभ्यासपूर्ण असतात....येत राहू द्या.

परवा पार्कात मित्रांबरोबर सचिनची बाजू घेऊन बोलणारा जर कोणी तुम्हाला आढळला असेल, तर तो मीच बरं!

भारी समर्थ

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2010 - 4:59 am | राजेश घासकडवी

मी मानद पदव्यांबाबतीत थोडा उदासीन असतो. बहुतेक वेळा वसंतराव देशपांड्यांना डी. लिट्. देणे वगैरे चांगल्या गोष्टी होतात. पण काही वेळा त्याचा इतका थिल्लर उपयोग होतो की शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी एच डी वगैरे मिळते तेव्हा अंगाचा तीळपापड होतो.

सचिनसारख्याला, ज्याने कुठच्याही पीएचडीपेक्षा अनेकपट अभ्यास केलेला आहे, अशाला जरूर मान मिळावेत. सैन्यात मानद पद दिलं म्हणजे काही त्याला युद्धात लढायला बोलावणार नाहीत अशी आशा आहे.

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 10:35 am | मृत्युन्जय

शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी एच डी वगैरे मिळते तेव्हा अंगाचा तीळपापड होतो.

तिला योगाचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे हा बहुमान दिला गेला असावा कदाचित ;)

तसेच वंशविद्वेषा विरुद्ध दुर्धर लढा देउन यशस्वी झाल्याबद्दल अजुन एक पी एच डी दिली तरी हरकत नाही :D

प्रशान्त पुरकर's picture

4 Sep 2010 - 12:50 pm | प्रशान्त पुरकर

तसेच वंशविद्वेषा विरुद्ध दुर्धर लढा देउन यशस्वी झाल्याबद्दल अजुन एक पी एच डी दिली तरी हरकत नाही .......... :) :) :)

मिसळभोक्ता's picture

4 Sep 2010 - 8:17 pm | मिसळभोक्ता

बहुतेक वेळा वसंतराव देशपांड्यांना डी. लिट्. देणे वगैरे चांगल्या गोष्टी होतात.

वसंतरावांना पुणे विद्यापीठाची रीतसर पी एच डी आहे, संगीत विषयात. (मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हा त्यांच्या थीसिसचा विषय होता. त्या थीसिसचा आनंद त्या दोन कॅसेट मध्ये मिळतो. बाकी सगळे थीसिस त्यापुढे झूट !)

खरे म्हणाल, तर माझा डीलिट वगैरे वर विश्वास नाही.

पण एखाद्या १२ वी पास बिल गेट्स ला तशी पदवी हार्वर्डने दिली, तर त्या पदवीचा सन्मान असे मी म्हणतो.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 10:13 pm | इन्द्र्राज पवार

"पण एखाद्या १२ वी पास बिल गेट्स ला तशी पदवी हार्वर्डने दिली, तर त्या पदवीचा सन्मान असे मी म्हणतो."

~~ होय. आणि खुद्द हार्वर्डची रितसर पदवी घेणारा युवकवर्गही मॅनेजमेन्टच्या त्या निर्णयाचे स्वागत करेल. आज दहावी पास नसलेल्या सचिनचा 'धडा' त्याच दहावीच्या वर्गासाठी क्रमिक पुस्तकात आहे. हा देखील एक सन्मानच आहे.

~~ वसंतराव, पु.ल., कुसुमाग्रज, पं.भीमसेन जोशी, लतादिदी असो वा सुनील, सचिन असो....या व्यक्तींच्या त्या त्या क्षेत्रातील कर्तबगारीमुळे उलट डी.लिट.सारख्या पदव्यांचीच महती वाढते असे समजले जाते.

इन्द्रा

वेताळ's picture

4 Sep 2010 - 10:18 pm | वेताळ

मला वाटते त्याला १२वी पास करता आली नाही.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 10:47 pm | इन्द्र्राज पवार

नाही. दहावीच.
शारदाश्रम विद्यामंदिर हीच त्याची पहिली आणि शेवटची शाळा. वयाच्या १५ वर्षी विनोद कांबळीसमवेत हॅरिस ढाल स्पर्धेतील ती "६६४ ची रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशीप" झाल्याझाल्या त्याची शाळा संपलीच कारण तात्काळ दिलीप वेंगसरकरने त्याला गुजरात विरूध्द्च्या रणजी सामन्यासाठी मुंबई संघात घेतले. तेथील पराक्रमानंतर लागलीच वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने पाकिस्तान विरूध्द आपली 'पहिली कसोटी' खेळली. मगतर मैदान हेच त्याची शाळा, ज्युनिअर, सीनिअर कॉलेज आणि विद्यापीठ बनले.

त्यामुळे बारावीकडे येण्याचा प्रश्न आलाच नाही.

इन्द्रा

१० वी नन्तर त्याने मुम्बैचे किर्ती कालेज जोइन केले व १२ ची परी़क्शा पण दिली व अर्थ शास्त्रात दाण्डी उडाली
.TRUTH MUST AND DOES ULTIMATELY ALWAYS PREVAIL
डा.सन्जय

मृत्युन्जय's picture

6 Sep 2010 - 8:35 pm | मृत्युन्जय

काय फरक पडतो अर्थशास्त्रात दांडी उडुन सुद्धा? अर्थार्जनात त्याने पी एच डी केली आहे. :)

इन्द्र्राज पवार's picture

6 Sep 2010 - 11:43 pm | इन्द्र्राज पवार

"अर्थार्जनात त्याने पी एच डी केली आहे."

~ १००%.
पण तरीही तो लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासारखा एम.ए. होऊ शकला असता, थोडेफार कॉलेजकडेही लक्ष दिले असते तर...दॅट इज ! मला वाटते त्याचे (सचिनचे) वडील कै.रमेश तेंडुलकर हे स्वत: किर्ती कॉलेजमध्येच अध्यापन करीत होते.

(थोडेसे अवांतर : खुद्द सुनील गावस्कर यांनीसुध्दा सचिनला एक वैयक्तीक पत्र पाठवून कॉलेज शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको असा सल्ला दिला होता....पण तोपर्यंत 'क्रिकेटचे मैदान' हेच त्याचे विद्यापीठ बनले..!)

इन्द्रा

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2010 - 10:46 pm | राजेश घासकडवी

मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हा त्यांच्या थीसिसचा विषय होता. त्या थीसिसचा आनंद त्या दोन कॅसेट मध्ये मिळतो. बाकी सगळे थीसिस त्यापुढे झूट !

१०० टक्के सहमत. त्या कार्यक्रमाबद्दल

'तारिफ करने कू, अकल नही है ये बंदे कू'

इतकंच म्हणता येतं.

हुप्प्या's picture

4 Sep 2010 - 6:28 am | हुप्प्या

सचिनला हवाई दलाचा अ‍ॅंबेसेडर केला आहे त्यामुळे अनेक गुणी मुले आणि मुली हवाई दलाकडे आकर्षित होतील असा विचार मांडला आहे.

एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का? सचिनला हा सन्मान देण्यामुळे हवाई दलात खरोखर काही बदल झाला आहे का? नव्याने भरती झालेल्या उमेदवाराला जास्त चांगले काहीतरी करायला, शिकायला मिळेल असे नक्की कशामुळे वाटते?

एखाद्या तार्‍याने वा तारकेने अमकी टूथपेस्ट वापरा, अमका साबण वापरा, अमके फसफसणारे पेय प्या असा संदेश देणे आणि हे कितीतरी वेगळे आहे. टूथपेस्ट वगैरे तो तारा खरोखरच वापरत असे अशी शंका तरी घेता येईल.
मात्र सचिनने "हवाई दलात भरती व्हा ते एक उत्तम करियर आहे. मीही भरती झालो आहे बघा." असे म्हटले तर त्यावर किती लोक विश्वास ठेवतील आणि जे ठेवतील त्यांची बुद्धीमत्ता काय दर्जाची असेल असे वाटते?

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2010 - 6:48 am | राजेश घासकडवी

एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का?

पण कदाचित हवाई दलाला तितके बुद्धीमान लोक नको असतील तर? समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर? बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात, कोणाला तरी नेता मानून त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याऐवजी स्वतःचे विचार खरे करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी एका सैनिकासाठी नेहेमीच चांगल्या असतील असं नाही. सेनाधिकाऱ्यांना स्वतंत्र विचार करावे लागतात हे खरं, पण त्यासाठी हजारांतून एक शोधता येतो.

ही गोष्ट तर बहुतांश ठिकाणी लागू होते. सांगेल ते ऐकणारे लोक निवडायचे असताना प्रत्येक नोकरीच्या जागेसाठी (सैन्यातसुद्धा) नेतृत्वगुण का तपासले जातात ?

बुद्धीमान आणि नेत्तृत्त्वगुण एकच आहेत का?

Pain's picture

5 Sep 2010 - 8:40 am | Pain

बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात, कोणाला तरी नेता मानून त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याऐवजी स्वतःचे विचार खरे करण्याचा प्रयत्न करतात.

या प्रतिसादकर्त्याला विचारा. हा मुद्दा मी मांडलेला नाही.

अप्पा जोगळेकर's picture

4 Sep 2010 - 9:11 am | अप्पा जोगळेकर

बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात
+१. सदर धागा हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. एक सरळसोट घटना पण ती एवढी चिवडण्यात काही हंशील आहे असे वाटत नाही. सचिनचे अभिनंदन इतकेच म्हणेन..

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 10:50 am | मृत्युन्जय

समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर?गुर्जी तुमचा युक्तिवाद नेहेमीच बिनतोड असतो पण यावेळेस काही पटला नाही. विषय वायुदलाचा आहे. तिथे भरती होणार्‍यांनी देशासाठी काहीतरी करुन दाखवायची उर्मी आहे म्हणुन किंवा देशावर अतोनात प्रेम आहे म्हणुन भरती व्हायला पाहिजे. एखाद्या पूजनीय व्यक्तीसाठी वायुदलात लोकांना भरती करुन घेण्यात काय हशील आहे. तुम्ही म्हणतात तसे एखादा माणुस केवळ सचिनला कॅप्टनचा दर्जा मिळाला म्हणुन वायुदलात भरती झाला (असे कोणी करेल असे कल्पनेतही वाटत नाही तरी...) तरी त्याला आयुष्यात पुढे कधी सचिनचे नख तरी दिसेल की नाही ही शंका आहे. असा माणुस जर वायुदलाच्या किंवा देशाच्या प्रेमापोटी भरती झाला नसेल तर समरप्रसंगी एकुण आनंद असेल.

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2010 - 11:39 am | राजेश घासकडवी

समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर?

हे थोडं उपरोधाने म्हटलं होतं, पण फार नाही. आता ब्रॅंड अॅंबॅसेडर कोण आहे यावरून पूर्णपणे एखादा निर्णय घेण्याइतका कोणीच बुद्धीहीन नसतो. पण सबकॉन्शसली या गोष्टींची थोडी थोडी भर पडते. सचिन अर्थातच हवाई दलाच्या जाहिरातींमध्ये येईल. या जाहिरातींवरून देखील कोणी निर्णय पूर्णपणे घेत नाही. पण त्यांचा उपयोग त्या निर्णयासाठी मुळात विचार करावा हा असतो.

हवाई दलाला सचिन इतका चांगला ब्रॅंड अॅंबेसेडर कुठे मिळणार? त्याचा चेहेरा सगळ्यांना ठाऊक आहे. भारत देशावर असावी तशीच लोकांची सचिनवर भक्ती आहे. तितका अभिमान जागवणारं दुसरं कोण आहे? मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे जे येतील ते बुद्धी वापरून निर्णय घेणाऱ्यांपेक्षा कुठच्यातरी आदर्शापायी हेलावू जाऊ शकणारे असतील ना... (पुन्हा - हा व्यक्तीगत युक्तीवाद नसून सांख्यिकी युक्तीवाद आहे.)

मृत्युन्जय's picture

4 Sep 2010 - 12:00 pm | मृत्युन्जय

मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे जे येतील ते बुद्धी वापरून निर्णय घेणाऱ्यांपेक्षा कुठच्यातरी आदर्शापायी हेलावू जाऊ शकणारे असतील ना...

मला नेमके हेच मत पटत नाही आहे. बाकी सगळे पटले (पटण्यासारखेच लिहिता नेहेमी तुम्ही). प्रश्न हवाइदलाचा आहे. तिथे आदर्शाने हेलावुन जाणारे लोक हवेत हे पुर्ण मान्य. पण हे आदर्श देशासाठी देह अर्पण करणारे महान सैनिकच असावेत. त्यांच्या त्यागाने आणि शौर्याने जर तुमचा स्फुल्लिंग पेटुन निघणार असेल तर त्याला अर्थ आहे. सचिनच्या आकर्षणापायी तसा विचार करणारे सीमेवर लढताना उपयोगी नाहीत. स्वतः सचिनही एकुण टॉप गनमधल्या टॉम क्रुझ मुळे प्रभावित् झालेला वाटतो. असे कुठल्यातरी हीरोमुळे प्रभावित होउन सैन्यदलात प्रवेश घेणारे लोक परिस्थितेचे आणी सैन्यातल्या कडक शिस्तीचे चटके बसल्यावर फटकन विरघळुन नाही गेले तरच नवल.

पण तुमचा मुद्दा मला मान्य आहे की सचिन जाहिरात योग्य प्रकारे करु शकेल.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 11:24 am | इन्द्र्राज पवार

"सचिनला हवाई दलाचा अ‍ॅंबेसेडर केला आहे त्यामुळे अनेक गुणी मुले आणि मुली हवाई दलाकडे आकर्षित होतील असा विचार मांडला आहे."

नाही, असा विचार मी तरी मांडलेला नाही. "तरूणाई ज्या ठिकाणी आहे अशा शैक्षणिक संकुलात सचिन वेळोवेळी अनेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहील, तर त्यांने आपल्या भाषणात तिन्ही दलात भरतीच्या संधीकडे पाहावे" असे आवाहन करावे ही अपेक्षा असते. तिकडे जावे कि ना जावे अर्थात ही बाब त्या त्या तरूणाची आणि त्याच्या पालकांची वैयक्तिक बाब आहे.

"एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का?"

या वाक्यातील "थिल्लर सन्मान" शब्दप्रयोजन वाचून फार वाईट वाटले. म्हणू नका असे प्लीज.

'ग्रुप कॅप्टन' ही रॅन्क सैन्यदलातील 'कर्नल' शी समकक्ष आहे. सचिनला हा सन्मान मिळाल्यावर तो कार्यक्रम संपला असे नाही. उद्या तो काही निमित्ताने पुण्यातील खडकी कॅन्टोनमेन्टमध्ये गेला तर तेथील ले.कर्नल, मेजर, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट या पदाच्या अधिकार्‍यांनी खाडकन उभे राहुन त्याला "मानाचा सल्युट" देणे आवश्यक ठरते. शिवाय नॉन-कमिशन्ड ऑफीसर्स (उदा.सुभेदार, नायब सुभेदार) यानी तो जितका वेळ त्या एरियामध्ये फिरेल तो पर्यन्त त्याच्या मागे रक्षकासारखे राहणे अटळ असते.

कोणत्याही टेरिटोरियल आर्मी बेस आणि पोलिस हेड्क्वार्टर्समध्ये २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी "झेंडा" त्याच्या हस्ते फडकविण्याचा आता त्याला (घटनेनुसार) सन्मान प्राप्त झाला आहे. अशा कार्यक्रमाचे जर त्याने निमंत्रण स्वीकारले तर त्याला त्याच्या घरातून आणण्यासाठी 'मेजर' दर्जाचा ऑफीसर आणि चार सशस्त्र जवान तैनात केले जातील. इतकेच नव्हे तर सचिन (ग्रुप कॅप्टनच्या गणवेषात) घरातून बाहेर येऊन त्या मिलिटरी जीपमध्ये स्थानापन्न होईतोपर्यन्त ते अधिकारी रस्त्यावर बाजुला अदबीने उभे राहतील, आणि तो बसल्यानंतर त्याच्या शेजारी फक्त मेजरच बसतील. हा सारा त्या सन्मानातील "प्रोटोकॉल" चा भाग आहे, जो कटाक्षाने आणि मिलिटरी शिस्तीने पाळला जातो.

नवी दिल्ली येथे प्रतिवर्षी होत असलेल्या "प्रजासत्ताक दिन परेड" च्या सन्माननीय निमंत्रितांच्या रांकेत "ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर" यांच्यासाठी खास खुर्ची राखीव ठेवणात येईल. सचिन आपल्या पत्नी आणि अपत्यासमवेत या प्रसंगी दिल्लीत हजर राहिलाच तर त्याना त्या रात्री राष्ट्रपती भवनावर होणार्‍या (परदेशातून आलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्यासमवेत) भोजनाचे आमंत्रण असते व त्याची त्या पाहुण्यांना ओळख करून देणात येते.

या आणि तत्सम घडामोडीचा मान "थिल्लर" कॅटेगरीत येतो का?

इन्द्रा

हुप्प्या's picture

4 Sep 2010 - 5:53 pm | हुप्प्या

सचिन हा क्रिकेटचा बादशाह आहे पण हवाई दलाकरता काही केलेले नसताना इतके राजेशाही सन्मान त्याला देणे गैरलागू वाटते. हवाई दलाला टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, ब्रेकफास्ट सिरियल, साबण, दुधात घालायची कुठलीशी पावडर ह्यांच्या पंक्तीत बसव्ल्यासारखे वाटते आणि हे अत्यंत उथळ वाटते.
केवळ अमक्या क्षेत्राकडे लोकांनी यावे म्हणून कुठल्याशा सेलेब्रिटीला उच्चपदस्थ सदस्य बनवणे ज्याचा त्या क्षेत्राशी काही संबंध नाही हे अगदीच सवंग आहे.
हा सन्मान समजा दिला नसता आणि हवाई दलाने त्याला कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असते आणि तिथे त्याने एक पाहुणा म्हणून हवाई दलाची महती सांगितली तर फार वेगळे काय झाले असते?

काही वर्षापूर्वी गोविंदाला मराठी नाट्य संमेलनात कुठल्याशा सन्माननीय पदावर नेमले होते त्याची आठवण झाली. केवळ गर्दी वाढवण्याकरता.

असो. आंधळ्या भक्तीपुढे तर्क, वाद फारसा उपयोगी नसतो.

.

वेताळ's picture

4 Sep 2010 - 6:05 pm | वेताळ

गोविंदा आणि सचीन ची तुलना तुम्ही करता,अश्या थिल्लर विचारसरणीच्या लोकांशी कसा वाद घालायचा?

हुप्प्या's picture

4 Sep 2010 - 6:35 pm | हुप्प्या

अहो ही दोन घटनांची तुलना आहे. गोविंदा आणि सचिनची तुलना नाही आणि मराठी नाट्यसंमेलन आणि हवाई दलाचीही नाही.
एका संस्थेने आपल्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या वलयांकित व्यक्तीला केवळ गर्दी खेचण्याकरता, ग्लॅमरकरता सन्माननीय पद देणे हे ह्या दोन घटनांमधले साम्य.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll

ग्रुप कॅप्टन सचिन तेंदुलकर बरं . कमीतकमी वायुसेनेला ड अक्षराचं वाकडं असावं.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 10:13 am | इन्द्र्राज पवार

वरील सर्व प्रतिसादांना (दोन्ही प्रकारचे ~ मान दिल्याबद्दल खुषीचे वा नाखुषीचे) एकत्रीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न :

"देशाची सेवा" या सदराखाली येणारी जी व्याख्या आहे तिचे स्वरूप केवळ "सैनिक" या संज्ञेशी मर्यादित नसून देशाच्या जडणघडणीत, नावलौकिकात भर घालणार्‍या, विविध क्षेत्रात जगाच्या नजरेत भरणारी कामगिरी करणार्‍या सामान्य 'नागरिक' ला देखील तीत स्थान देणारी आहे. विद्यापीठ ज्यावेळी डी.लिट.चा मान एखाद्या कर्तबगार व्यक्तीला प्रदान करते त्यावेळी ती व्यक्ती 'शिक्षणक्षेत्रा'शीच निगडित असली पाहिजे असा दंडक अजिबात असत नाही (उदा.लता मंगेशकर). डी.लिट. ही जशी शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातील सेवेची/कार्याची/कर्तबगारीची पावती आहे, तद्वतच त्यातून समाजातील त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेले योगदान (इथे पैशाचा प्रश्न नाही, म्हणजे 'त्याने/तिने त्या क्षेत्रातून काय कमी पैसा मिळविला आहे काय? तो पैसा गरीबांत वाटला आहे काय?" असले सदासर्वकाळ उपस्थित होणारे प्रश्न साहजिकच विचारत घेता येत नाहीत.) किती महत्वाचे आहे हीच गोष्ट सन्मानाच्या कारणाची यथार्थता अधोरेखीत करीत असते. सचिन तेंडुलकर याच्या (त्याच्या क्षेत्रातील) कर्तबगारीबद्दल काही न लिहिलेलेच बरे, कारण वयगट १० ते १०० यात येणार्‍या प्रत्येक क्रिडाप्रेमींना ते माहित आहे. त्या कर्तबगारीला भारतीय हवाई दलाने दिलेली एक सलामी इतपतच त्या "ऑनररी ग्रुप कॅप्टन" पदाचे महत्व.

असे असले तरी 'सचिन' ही एकमेव व्यक्ती अशा 'मानद' सन्मानाला पात्र ठरली असे नाही. आज २०१० साली हा मान एकाला मिळाला पण सन १९४४ साली जोहारचे राजे यशवंत राव याना त्यावेळेच्या एअर फोर्सने 'फ्लाईट लेफ्टनंट' ही मानद पदवी दिली होती आणि ते राजे असा मान मिळविणारे पहिले "सिव्हिलियन" ठरले होते. त्यानंतर तब्बल १९७४ मध्ये जेआरडी टाटा. (आतापर्यंत असे एकूण २० 'मानद' झाले आणि सचिन २१ वा.).

डी.लिट.सम पद्धतीची तरतूद खुद्द आपल्या घटनेत केली असून त्या अनुषंगाने ही तिन्ही दले हा निर्णय घेतात. सचिनला दिलेल्या मानपत्रातील खालील वाक्यरचना पाहातील~~

"Under the provision of grant of honorary rank by Armed Forces to eminent personalities acknowledging their contribution towards the nation, the President and the Supreme Commander of the Armed Forces of India is pleased to confer Sachin Ramesh Tendulkar the honorary rank of Group Captain of the Indian Air Force,”

(या रचनेतील 'eminent personalities' हा उल्लेख फार महत्वाचा आहे, जो केवळ क्रिडा नव्हे तर अन्य क्षेत्रालाही समानार्थाने लागू होतो.)

म्हणजेच हा निर्णय एकट्या एअर फोर्सचा नसून घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती आणि तिन्ही दलाचे सुप्रीम कमांडर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या अगोदर सेनादलानेदेखील कपिल देव यांना 'लेफ्ट्नंट कर्नल' हे मानद पद दिले आहे.

आता या सन्मानामुळे वा सचिनमुळे महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने हवाई दलात भरती होतील का? देशाची सेवा करण्याची त्यांच्यात उर्मी जागृत होईल का? आदी रास्त प्रश्न जरी कुणाच्या मनात उभे राहत असले तरी त्या प्रश्नांचे उत्तर शोधत असताना, त्यामुळे सचिनला असे सन्मान मिळू नयेतच असेतरी कृपया म्हणू नये.

कितीही झाले तरी तो आणि लतादिदी 'आपले' आहेत.

इन्द्रा

इंद्रा माझ्या आवडत्या खेळाडुबद्दल लिहल्याबद्दल पण मी आभारी आहे.सचिनला ही जी पदवी दिली आहे त्यामुळे सचीनची लोकप्रियता वाढली असे म्हणणे चुकीचे आहे. सचीन कडे एक लक्ष्य आहे,एक जिद्द आहे व ती पुरी करण्यासाठी घ्यायला लागणार्‍या प्रचंड मेहनतीस हो सदैव तयार असतो.सचीन कडुन खुपश्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याचा आदर्श घेवुन कोणी पायलट झाले तर त्या व्यक्तीचे कर्तुत्व कमी होईल असे मला तरी वाटत नाही.
परत एकदा सचीनचे हार्दिक अभिनंदन.....

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

मस्त !

आपल्याला तर आवडली बॉ बातमी. सचिनचा आपल्याल्या प्रचंड अभिमान आहे :)

आता त्याला हा सन्मान द्यायला हवा होता का ? ते योग्य आहे का ? अशा फालतु + वांझोट्या + आम्ही कसा सारासार विचार करणारे आहोत हे दाखवणार्‍या क्षिण प्रयत्नांच्या चर्चेत आपल्याला तर काडीमात्र रस नाही.

एखाद्या व्यक्तीला काही सन्मान प्राप्त झाला, त्याचे कुठे कौतुक झाले रे झाले की बर्‍याच विचारजंताना बौद्धीक मळमळ चालु होते. स्वतः कुठलाही आनंद निर्भेळपणे लुटायचा नाही आणि दुसर्‍यांना लुटु द्यायचा नाही. आणि हवाईदलाने काय करावे आणि काय करु नये हे सुचवणार कोण तर ज्यांना घरी बायको साधी साडी कुठल्या रंगाची घ्यायची हे पण विचारत नाही ते

च्यायला आवरा ह्यांना !

अनिल २७'s picture

4 Sep 2010 - 12:17 pm | अनिल २७

सहमत! सचिनच्या कर्तुत्त्वाला हवाईदलाने सन्मानित केले आहे.. बाकी या विषयावर ईतका खल गरजेचा नव्हताच.. याने काय होणार, कोण आकर्षीत होईल/नाय होणार हे विषय तद्दन फालतू आहेत.. सचिन सन्मानित झाला ईतकेच हा विषय आहे व त्याचा अभिमान आहे..

प्रशान्त पुरकर's picture

4 Sep 2010 - 12:55 pm | प्रशान्त पुरकर

फुल्टु पटेश...................

अवलिया's picture

4 Sep 2010 - 2:00 pm | अवलिया

हवाईदलाने काय करावे आणि काय करु नये हे सुचवणार कोण तर ज्यांना घरी बायको साधी साडी कुठल्या रंगाची घ्यायची हे पण विचारत नाही ते

साडीच कशावरुन ? पंजाबी ड्रेस, जीन्सटीशर्ट, फ्रॉक अशा प्रकारची वेशभुषा नाही हे कशावरुन? साडीच आणि तीही साधी असा पुरावा आहे का आपल्याकडे ? की उगाच लिहायचे म्हणुन लिहिले.. हल्ली तुम्हाला इतिहासात स्वारस्य आहे म्हणुन विचारले !

मेघवेडा's picture

4 Sep 2010 - 3:25 pm | मेघवेडा

एकदम सहमत!

साला त्या 'शाहीन' धाग्यावर चर्चा कसली तर "तिला एसी होंडा सिटी परवडते म्हणजे तिच्याकडे बक्कळ पैसा आहे. मग तिने तो धंदा सोडून एखादा व्यवसाय सुरू करावा." तात्या यांच्या वांझोट्या चर्चा तोंडी लावायला घेत असणार मस्त! तिच्यायला विषय काय चर्चा कसल्या? खरंच आवरा रे ह्यांना!

आणि सच्चूबद्दल बोलता येत नाही आम्हाला. त्याची उभी कारकीर्द याचि देही याचि डोळा पाहायला मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आणि त्याचा हा जो सन्मान झालेला आहे तो कुणा पतली गलीच्या बादशाने केलेला नाही. देशाच्या सेनादलातील उच्च अधिकार्‍यांकडे कुणाला सन्मान द्यावा वा देऊ नये हे समजण्याइतपत अक्कल नक्कीच असावी.

बाकी आमच्या सच्च्याचं मनापासून अभिनंदन! आणि हो इन्द्रराज, तुम्ही हा धागा काढल्याने तुमची प्रतिमा काही मलीन वगैरे झालेली नाही उलट आदर दुणावला! :)

उपेन्द्र's picture

4 Sep 2010 - 11:43 pm | उपेन्द्र

एखाद्या व्यक्तीला काही सन्मान प्राप्त झाला, त्याचे कुठे कौतुक झाले रे झाले की बर्‍याच विचारजंताना बौद्धीक मळमळ चालु होते. स्वतः कुठलाही आनंद निर्भेळपणे लुटायचा नाही आणि दुसर्‍यांना लुटु द्यायचा नाही. आणि हवाईदलाने काय करावे आणि काय करु नये हे सुचवणार कोण तर ज्यांना घरी बायको साधी साडी कुठल्या रंगाची घ्यायची हे पण विचारत नाही ते

हसून हसून मेलो.....

sandeepn's picture

6 Sep 2010 - 3:39 pm | sandeepn

सहमत.

सैन्य दलाशी जवळून संबध आल्यामुळे वरिल चर्चा वाचून काही प्रश्न पडले

वायुद्लात फक्त वैमनिक असतात का?
युध्द झाल्यावर सगळे कर्मचारी लगेच युध्दावर जातात का?
प्रत्येक दलाचा एक public relation विभाग असतो असे ऐकले होते आणि तो विभाग युध्दा व्यतिरीक्त वेगगेगळे उपक्रम चालवतो.
सेनादलाचे काही खेळाडू ऑलिंपीक मधे देशासाठी खेळल्याचे स्मरते . नशीब सैन्याचे अन्न खाउन ऑलिंपीक वार्‍या केल्या अशी टीका कोणी करत नाही.

राजकुमारांचा प्रतिसाद आवडला.

इन्द्र्राज पवार's picture

4 Sep 2010 - 2:43 pm | इन्द्र्राज पवार

"युध्द झाल्यावर सगळे कर्मचारी लगेच युध्दावर जातात का?"

योग्य शंका/प्रश्न..... आणि यावर सविस्तर वाचायला/चर्चा करायला आवडेल. मला जी थोडीफार माहिती आहे, ती "ऑनररी रॅन्क होल्डर्स" च्या संदर्भात आहे जिचा उल्लेख वर एका प्रतिसादात केला आहे.

राजकुमारांचा प्रतिसाद आवडला.

~~ + सहमत (त्यातील "त्या" सिक्सरसह...)

इन्द्रा

सहज's picture

4 Sep 2010 - 3:30 pm | सहज

एक नंबर परफॉर्मन्स आहे सरकार! साश्रू जाहले नयन पाहुनि सचिनाचे हे कवन!

सच्याच्या कारकीर्दीतले उप्स अ‍ॅण्ड डाऊन्स आणि २००९-२०१० मधला टर्निंग प्वाईंट अतिशय सुंदररित्या कॅप्चर केला आहे!

मान गये उस्ताद!

मला क्रिकेट आवडत नाहि (फूटबॉल आवडतो) पण सचिनचा मला प्रचंड अभिमान आहे !त्यातुन तो तेंदुलकर कारण मि पण तेंदुलकर ! त्त्यामुळॅ ( तेडंल्या )ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

सच्च्याला कुठलाही सन्मान मिळण हे कौतुकास्पद आहेच आणि त्याहीपेक्षा ते प्रत्येक मराठी माणसाच्या घरचे कार्य असायला हवे असे असताना उगीच कशाला वाद घालायचा काही कळत नाही.......?
उद्या गान्धी घराण्याच्या युवराजाला (लायकी नसताना) हा सन्मान मिळाला तर त्यावर काथ्याकुट करणे हे समजण्यासारखे आहे ......
आपल्या सच्च्याला मिळाला यातच आनन्द माना की राव्?कशाला उगाच फाटे फोडायचे?

आशिष सुर्वे's picture

4 Sep 2010 - 9:41 pm | आशिष सुर्वे

सचिन, तू माझ्यासाठी नेहमीच आदराचे स्थान राहिला आहेस आणि यापुढेही राहशील..
वरील प्रतिसादांबद्द्ल काही बोलत नाही.. पण खालची चित्रफित तुझा एक वेगळा चेहरा नक्कीच दाखवून जाईल..

http://www.youtube.com/watch?v=MB30sLwwYZY&feature=related

सचिनचा गौरव व ग्रुप कॅप्टनची मानद पदवी.
काल सचिनचा पदवी दान समारंभ पाहिला व आठवले...
खुप वर्षांपुर्वी १९९६साली मी हवाईदलातर्फे चेन्नईच्या चिपॉक मैदानावर कसोटी सामन्याच्यावेळी सेक्युरिटीच्या कामाचा प्रमुख म्हणून मैदानावर हजर असे. तेंव्हा अनेक खेळाडूंशी दोस्ती झाली. सिद्धू-पा जी व सचिनशी नाडी ग्रंथांवर विशेष बोललो. त्याला व अजित वाडेकरांना नाडी ग्रंथांवरील एक मराठी पुस्तक सप्रेम भेट दिले. त्याने अतुल बेदाडे, व जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसादना त्यात रस असल्याचे सांगून मला त्यांच्याशी गाठ घालून दिली. एक अत्यंत लाघवी, विनम्र व मनमोकळ्या व्यक्तिमत्वाची छाप पडली.

सचीन कडे एक लक्ष्य आहे,एक जिद्द आहे व ती पुरी करण्यासाठी घ्यायला लागणार्‍या प्रचंड मेहनतीस हो सदैव तयार असतो.सचीन कडुन खुपश्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याचा आदर्श घेवुन कोणी पायलट झाले तर त्या व्यक्तीचे कर्तुत्व कमी होईल असे मला तरी वाटत नाही.

वरील विचार मला मान्य होतात.

इन्द्र्राज पवार's picture

6 Sep 2010 - 4:52 pm | इन्द्र्राज पवार

"एक अत्यंत लाघवी, विनम्र व मनमोकळ्या व्यक्तिमत्वाची छाप पडली."

~~ यातील "विनम्र" हे स्वभावविशेषण फार आवडले...त्याचा चेहरा, त्याचे सौम्य हसणे, आणि ज्येष्ठांसमवेत वावरताना हे विशेष जाणवते.

श्री.ओक यांनी ही सुंदर आठवण सांगितली आहे इथे.

इन्द्रा

हुप्प्या's picture

7 Sep 2010 - 1:19 am | हुप्प्या

पीएमपीएमएल उर्फ पीएमटी ह्या एका मोठ्या शहरातील नामवंत सार्वजनिक वाहतूक संस्थेने सर्वश्रेष्ट क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांस सन्माननीय बस कंडक्टर बनवायचे ठरवले आहे. दसर्‍याच्या शुभ मुहुर्तावर त्यांना कंडक्टरचा पोषाख, टोपी, एक तिकिटाची पेटी, पैसे ठेवायची चामड्याची पेटी आणि तिकिटाला भोक पाडायचा टिकटिक वाजणारा पंच असा ऐवज एका मोठ्या समारंभात देण्यात येणार आहे. त्यानंतर ४ नंबरच्या बसने तेंडूलकर स्वारगेटहून नजीकच्या बसस्टॉपपर्यंत प्रवास करून आपली सद्भावना यात्रा संपवतील.
तसेच जरी हे खेळाडू बापजन्मात बसमधे बसण्याची शक्यता नसली तरी त्यांना कुठेही हात दाखवून बस थांबवायचा आणि विनातिकिट प्रवास करायचा आजन्म अधिकार देण्यात आला आहे.

ह्या संस्थेचा आणि तेंडूलकरांचा काडीचाही संबंध नसला तरी तेंडूलकरांना लहानपणापासूनच बसचे आकर्षण होते. त्यांचे वडील त्यांना अनेकदा कडेवर घेऊन (बी ई एस टी च्या) बसस्टॉपवर न्यायचे आणि तिथे तेंडूलकर तासन तास बस न्याहाळत असे. त्यांचे "लाल लाल बस" वगैरे बोबडे बोल तिथेच ऐकू आले. बोलता यायला लागल्यावर "मी मोठ्ठा झाल्यावर बसचा ड्रायव्हर बनणार" असे चिमखडे बोल आजही त्यांच्या नातलगांना आठवतात. बसशी एवढा संबंध पुरेसा आहे असे पीएम्पीएमएलच्या व्यवस्थापनाचे मत पडले.

क्रिकेटमधले असले उत्तुंग व्यक्तीमत्व ह्या निमित्ताने पीएमपीएमएलचे अ‍ॅम्बेसिडर बनले आहेत. त्यामुळे ह्या थोर समाजोपयोगी संस्थेचे नाव सर्वतोमुखी होईल, अनेक गुणी तरूण तरूणी आता कंडक्टर बनण्याची स्वप्ने बघतील आणि प्रवासीही ह्या संस्थेकडे आदराने बघतील असा विश्वास महाव्यवस्थापक श्री सवंग ह्यांनी व्यक्त केला. उपमहाव्यवस्थापक श्री. सं. धी. साधू ह्यांनी त्यांना दुजोरा दिला.

धन्य तो महान क्रिकेटपटू आणि धन्य ती पीएमपीएमएल!