"आई, काय गं झालं? ही का रडतीये?" हा प्रश्न माझ्या आईनं तिच्या आईला केला होता. सुट्टीत मामा मामींकडे गेलं की आजीच्या तक्रारी सुरु होत असत. तिचं आपलं ठरलेलं वाक्य,"आमच्या वेळी नव्हती बाई असली थेरं!" प्रसंग म्हटला तर साधासाच होता. दर रविवारी मला आणि मामेबहिणींना न्हाऊ माखू घालण्याचा तिचा हट्ट असे. भल्या सकाळी आमच्या सुपीक डोक्यांना कोमट तेल लावून ठेवायची, मग तिच्याकडे असलेल्या पितळ्याच्या तपेलीत घरी तयार केलेली शिकेकाई भिजवून उकळून त्याचं चोथा पाणी वेगळं करायची. शिकेकाईही साधीसुधी नसायची. त्यात संत्र्याच्या वाळवलेल्या साली, रिठे आणि काय काय बरेच जिन्नस असायचे. ते सांगताना तिला अभिमान वाटत असावा. तासाभराने बंबात गरम केलेले पाणी घंगाळात काढून स्वत:च्या हाताने नातींना न्हाऊ घालणे हे आजीला कर्तव्य वाटत असे.आधी थोडं शिकेकाईचे पाणी मग तो खरखरीत चोथा घेउन खसाखसा घासायची. असं केल्याने डोकं हलकं होतं आणि केस छान वाढतात म्हणायची. बहुधा मामेबहिणींना सवय झाली असावी. मला मात्र सगळ्या गोष्टी नाजुकपणे केलेल्या हव्या असायच्या.तिला ते मान्य नसायचं. मग दर रविवारी रडारडीचा कार्यक्रम ठरलेला! "अगं, इतकी नाजुक राहून संसार कसा करशील?" असं म्हणत म्हणत तिला हवं तस्संच करायची. आई मध्ये पडली तर तीला रागावून,"तुम्हा आजकालच्या आयांना मुली कश्या वाढवाव्या ते समजत नाही, आणि येता मागाहून तक्रारी घेउन!" असं दटावत असे.मुली वाढवताना अतोनात काळजी घ्यावी लागते आणि काळजी करावी लागते. मुले कशीही वाढतात या मतावर ठाम असायची. केसांची स्वच्छता राखायला सोपं पडावं म्हणून बारीक कापलेले माझे केस आजीला पसंत नसत. दर रविवारी केस अश्याप्रकारे धुवावे लागत असतील आणि डोळे चुरचुरत असतील तर 'नक्को ते केस वाढवणं!' असं वाटायचं. माझी मोठ्ठा गजरा घालण्याची हौस मात्र बरेच दिवस टिकून होती.
तिचे स्वत:चे केस मात्र वयाच्या पंचाहत्तरीतही छान काळे कुळकुळीत होते. सगळ्यांची काळजी करून आता ते कमी झालेत असंही म्हणत असे. छान तेल लावून चापून चोपून दोन वेण्या घातल्या कि जगातल्या सगळ्या बायका सुंदर दिसतात असं म्हणताना तिचे डोळे चमकायचे. नुसते खोबरेल तेल आणून लावणे हा आळशीपणा झाला. ते तेल जास्वंदीची फुलं, मेथ्या आणि अजून बरेच प्रकार घालून उकळून सिद्ध करणं हे तिच्या मते हौसेनं संसार करणार्या स्त्रीचं लक्षण होतं.
मुलीच्या जातीला हे यायला हवं नि ते यायला हवं म्हणून आमच्याकडून रांगोळ्या काढून घेणं, पंगतीत पदार्थ वाढायला सांगणं असं करीत असे.कोणता पदार्थ पानात कुठं वाढावा याबद्दल एकदा सांगितल्यावर पुन्हा विचारायला जाण्याची हिम्मत माझ्यात तरी नव्हती.पहिल्या पंगतीला जेवायला बसणं आणि जोरात हसणं म्हणजे तर बाईच्या जातीला अशोभनीय 'कृत्य' असे.आजी लहान असताना हे अलाऊड नव्हतं म्हणे! जेवणखाण मात्र बाईच्या जातीने पौष्टीकच घ्याव या तिच्या विचारानं कितीतरी प्रकारची सार, खिरी आणि काढे आमच्या पोटात गेले असतील त्याची मोजदाद करू नये हेच उत्तम! "कश्याला हवा डक्तर? मी देते कि उलिशी हळद मधातून!" "आमच्यावेळेस नव्हते हो असले काही नखरे!"
मी दहावीत असताना एकदा तिनं आईकडे माझ्या लग्नाबद्दल चौकशी केली होती. सगळ्यांची हसून पुरेवाट झाली होती. मला हसताना बघून तर तिचा रागाचा पारा जास्तच चढला. आरती ओवाळल्यासारखं करून म्हणाली "अगं पंधरा वर्षाची घोडी झालीस तरी अशी खिदळतेस काय? या वयात माझ्या पदरात एक मूल
होतं हो!" मग आईकडे बघून निदान हुंडा आणि रुखवताची भांडी तरी जमवलीत काय अशी चौकशी करत होती. नंतर वर्षभरात आजी गेली. शेवटपर्यंत काम करत होती तशीच शेवटपर्यंत सगळ्यांची काळजीही करत होती. दारापुढे काढायच्या आणि पंगतीतल्या रंगोळ्या अजून लक्षात आहेत पण आता काढायची वेळ येत नाही. पानात ओघळ येउ न देता जागच्याजागी पदार्थ वाढले तरी त्याचं कौतुक कोणाला नसतं.शिकेकाईचं आणि माझं मात्र अजूनपर्यंत जमलेलं नाही. शांपू लावून कोरडे आणि पांढरे झालेले केस बघायला आजी नाही ते एका परिनं बरच वाटतं!
प्रतिक्रिया
26 Jul 2010 - 9:25 pm | यशोधरा
छान लिहिलंस गं.. :) आज्जीच्या आठवणी...
>नंतर वर्षभरात आजी गेली. शेवटपर्यंत काम करत होती तशीच शेवटपर्यंत सगळ्यांची काळजीही करत होती. >> माझ्या आज्जीची आठवण झाली एकदम..
26 Jul 2010 - 9:36 pm | अरुंधती
तुझ्या आजीच्या ह्या आठवणी, वाक्ये वाचून मला माझ्या आजीची आठवण झाली. आता पुढे-मागे कधीतरी देईन तुला झब्बू! ;-) त्या वयात आजी आजोबांचे संस्कार म्हणजे 'कसला ताप' वाटतो, पण नंतर त्यांची वाक्ये, तत्त्वे, शिस्त, जीवनशैली आणि आठवणी सारं आयुष्य आपली सोबत करतात! :-)
26 Jul 2010 - 10:23 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय ...माझ्या आजीची आठवण आली हे वाचताना...ती पण वर्ष दीड वर्षापूर्वीच गेली.
आजीसारख प्रेम कोणालाच करता येत नाही..
26 Jul 2010 - 10:30 pm | मराठमोळा
रेवती ताई,
छान लेख.
लेख आणी लिखाण दोन्ही आवडले.... :)
26 Jul 2010 - 10:37 pm | शुचि
सु-रे-ख व्यक्तीचित्ररेखाटन.
26 Jul 2010 - 10:59 pm | शाल्मली
छान लेख..
आजी-अजोबांचं नातवंडांवरचं प्रेम बघून 'नातवंडं म्हणजे दुधावरची साय' हे वाक्य वारंवार पटतं.
माझी आजी आत्ताच आठ महिन्यांपूर्वी गेली.. पण आजीची आठवण आली नाही असा एकही दिवस जात नाही..
अजून अश्या काही आठवणी वाचायला आवडतील..
--शाल्मली.
27 Jul 2010 - 12:47 am | Nile
हुश्श!! मला वाटलं रंगाकाकांची तिकडं प्रार्थनेच्या नावाखाली चाललेली थेरं पाहुन इकडे पण विडंबन आलं की काय, म्हणून धावतच आलो. ;)
आता वाचतो लेख.
27 Jul 2010 - 12:55 am | केशवसुमार
शिर्षकात 'असली थेरं' वाचल आणि वाटल डांबिसाने कलगी तुरा लावून दिला.. पण तस काही नाही बघून ह्श्श झालं..
सुंदर लेख.. जुन्या आठवणींना उजाळा देणारा..
(वाचक)केशवसुमार
27 Jul 2010 - 2:03 am | मीनल
माझ्या आजीची आठवण झाली.
ती आमच्या कडे आली की मला न्हाऊ घालयची. फार दमायची तेव्हा ती. पण तिचीच हौस असायची. मी काय? फारसे कळायचे ही नाही. पण अंग रगडून घ्यायला बरे वाटायचे तेवढे आठवतंय.
27 Jul 2010 - 5:12 am | असुर
तुमची आणि माझी आजी एकच आहे की काय अशी शंका यावी इतकं सहीसही वर्णन केलंय तुम्ही.
"आम्ही असू लाडके" म्हणायची हक्काची जागा म्हणजे आजी!
आजीची आठवण करून दिलीत रेवतीतै. आवडती माणसं खूप खूप दूर गेली आता..
-- असुर
27 Jul 2010 - 7:26 am | स्पंदना
सुरेख लेखन रेवती..आज्जी डोळ्यासमोर आली.
12 Apr 2013 - 12:51 pm | अक्षया
+ १
27 Jul 2010 - 9:15 am | llपुण्याचे पेशवेll
छानच लेख.
27 Jul 2010 - 9:28 am | पाषाणभेद
सुरेख व्यक्तिचित्रण आहे आजीचे.
27 Jul 2010 - 9:30 am | ऋषिकेश
मस्त लेख.. .. आजी-आजोबा ही माझी खास आवडती माणसं :)
हे लै भारी! ;)
27 Jul 2010 - 10:07 am | स्व
आपल्या आजीची फारच आठवण येतीये बुवा वाचुन....
27 Jul 2010 - 12:50 pm | क्रान्ति
पिढीतल्या सगळ्या आज्या अशाच असाव्यात, असं वाटतंय. थोड्याफार फरकानं आज्यांचं वागणं-बोलणं-करणं असंच असायचं. माझ्या आजीचा आणखी एक लाडका टोमणा म्हणजे "जावयाची पोर हरामखोर!" अर्थात त्या सगळ्यामागं असणारं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हीच मोठी ठेव होती, जी आज आठवणींच्या रूपानं जपलीय. रेवती, तुझ्या या लेखानं अगदी लहानपणीच्या काळात नेलं आजीच्या गावात. खूप आवडला लेख.
27 Jul 2010 - 1:01 pm | स्वाती दिनेश
रेवती,
आजीच्या आठवणी छान लिहिल्या आहेस,अनेकांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्यास.
स्वाती
27 Jul 2010 - 1:35 pm | गणपा
आज्जी नातीच्या आठवणी छान.
27 Jul 2010 - 6:51 pm | प्रभो
असेच म्हणतो. :)
12 Apr 2013 - 7:05 am | शुचि
अफाट सुरेख आहे परत वाचला. वर आणतेय.
12 Apr 2013 - 7:10 am | आतिवास
सुरेख लिहिले आहे; आवडले.
12 Apr 2013 - 8:09 am | श्रीरंग_जोशी
खूप छान वाटलं हे वाचून.
12 Apr 2013 - 12:55 pm | यशोधरा
पुन्हा एकदा वाचलं. परत तितकंच आवडलं.
12 Apr 2013 - 12:58 pm | सस्नेह
अचूक अन लडिवाळ व्यक्तिचित्रण. आवडले.
12 Apr 2013 - 1:11 pm | सानिकास्वप्निल
सुरेख लिहिले आहेस
खूप आवडले
आजीची आठवण आली :)
12 Apr 2013 - 4:02 pm | आशु जोग
मला वाटतं रेवतीताईने कमीच लिहिलय...
12 Apr 2013 - 4:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
वाचतांना अगदी आमच्या सासूबाईंच वर्णन वाचतोय असच वाटत होतं.
:)
मस्त लिखाण आवडले.