द गेम ऑफ द सेंचुरी!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
11 Jul 2010 - 2:02 am

१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता.
लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!
तो मुलगा होता बॉबी फिशर - होय तोच फिशर ज्यानं पुढल्या काळात बुद्धीबळ खेळाच्या सगळ्या व्याख्याच बदलून टाकल्या!!

ह्या डावाचं आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे आपण जो विंडमिल प्रकार मागल्या लेखात बघितला त्याचाही वापर ह्या डावात झालाय. चला तर मग बघूयात डाव.

डावाची सुरुवात पुस्तकी चालींपेक्षा थोडी वेगळी झाली तरी काही चालींची उलटापालट होऊन पाचव्या खेळीअखेरग्रुनफेल्ड डिफेन्स ह्या प्रकारात डाव स्थिर झाला.
1. Nf3 Nf6 2. c4 g6 3. Nc3 Bg7 4. d4 O-O 5. Bf4 d5

6. Qb3 बायरनने वजीराची बढत केली dxc4 बायरनचे प्यादे मारुन फिशर पटाच्या मध्याचा ताबा काही प्रमाणात सोडतोय आणि त्याचवेळी पांढर्‍याच्या वजिराला प्यादे मारण्याच्या मिषाने डावाच्या आणखीन मध्यात आणतो.
7. Qxc4 c6

8. e4 Nbd7 घोडा वजिरावरच्या हल्ल्याची तयारी करतो!
9. Rd1 बायरनचं सगळं लक्ष पटाच्या मध्यावर मोक्याच्या जागा धरुन बसलेल्या मोहर्‍यांना पुढे कसं रेटता येईल ह्याकडे आहे. Nb6 वजिरावर हल्ला झाला.
10. Qc5 वजीर मागे नेण्यापेक्षा पाचव्या पट्टीत बसवायची संधी कोण सोडेल? पण हे करताना वजीर अशा घरात गेलाय की Na4/Ne4 ह्या दोनपैकी एका खेळीने वजिरावर हल्ला होऊ शकतो. परंतु बायरनचा c3 वरचा घोडा ही दोन्ही ठाणी सांभाळायला समर्थ आहे असं त्याला वाटतंय!
Bg4 - फिशर त्याचा उंट पुढे आणतो. त्याचा राजा आधीच किल्लेकोटात आहे आणि बायरनचा नाहीये. (डावाचे काही मूलभूत नियम असतात त्यानुसार तुमच्याकडे सक्षम खेळ्या असतील तर राजा किल्लेकोटात लगेच नाही नेला तरी चालतो अन्यथा किल्लेकोट टाळू नये - लवकरात लवकर करावा.)

11. Bg5? बायरनची ही खेळी चुकली, सपशेल चुकली!! (ह्या ऐवजी 11. Be2 आणि त्यानंतर 12 O-O राजाला किल्लेकोटात नेणे आवश्यक होते). मोहोर्‍यांच्या प्रगतीत फिशरने घेतलेली आघाडी ही तात्पुरती आहे असा सोयिस्कर समज बायरनने करुन घेतला असावा.

11... Na4!! अफलातून खेळी! वजिरावर हल्ला आणि घोड्याचे बलिदान द्यायची तयारी.

New Bitmap Image (2)

(बायरनने जर 12. Nxa4 करुन घोडा मारला तर फिशर ...Nxe4 खेळून त्याला अडचणीत आणतो. कसा ते पहा. पुढच्या चार शक्यतांचे विश्लेषण स्वतः फिशरनेच दिले होते! -
13. Qxe7 Qa5+ 14. b4 Qxa4 15. Qxe4 Rfe8 16. Be7 Bxf3 17. gxf3 Bf8 .
13. Bxe7 Nxc5 14. Bxd8 Nxa4 15. Bg5 Bxf3 16. gxf3 Nxb2 ह्याने फिशरला एक प्यादे जास्त मिळतेच आणि बायरनची प्याद्यांची मांडणी विस्कळित होते ती वेगळीच
13. Qc1 Qa5+ 14. Nc3 Bxf3 15.gxf3 Nxg5 इथे बलिदान केलेले मोहरे परत मिळते आणि शिवाय पोझीशनल अ‍ॅडवांटेजही.
13. Qb4 Nxg5 14.Nxg5 Bxd1 15.Kxd1 Bxd4 16.Qd2 Bxf2 इथे मोहर्‍यांचे नुकसान पदरी येते.)
लक्षात घ्या हे सर्व विश्लेषण करणारा फिशर १३ वर्षाचा होता!!

12. Qa3 . 12... Nxc3 सकृतदर्शनी ही खेळी पांढर्‍याला पटाच्या मध्यावर मजबूत पकड घ्यायला मदत करते आहे की काय असे वाटते परंतु फिशरचा प्लॅन ह्याच्या बरोबर उलटा आहे. c3 घरातला घोडा खाऊन Nxe4 करुन आपल्या घोड्याचे बलिदान द्यायचे आणि पांढर्‍याचे मध्यावरचे नियंत्रण घालवायचे, मध्यात अडकलेला पांढरा राजा ही मोठी अडचण ठरणार आहे बायरनला.

14. Bxe7 वजीर आणि हत्तीपैकी एक मिळेल ह्या आशेने बायरन वजिराच्या जोरात उंटाने प्यादे मारतो Qb6 वजीर शांतपणे बाजूला घेतो फिशर.
15. Bc4 बायरन शहाणा आहे. हत्ती घेणे परवडणारे नाही हे त्याच्या लक्षात आले कारण 15. Bxf8, Bxf8 16.Qb3 Nxc3! 17.Qxb6 (इथे जर चुकून हे खेळला 17.Qxc3?? Bb4!! पांढरा वजीर पडतो! ) axb6 18.Ra1 Re8+ 19.Kd2 Ne4+ 20.Kc2 Nxf2 21.Rg1 Bf5+ हे काळ्यासाठी वरचढ ठरते!

Nxc3! फिशर त्याची पाठ सोडत नाही. धोड्याने प्यादे खातोच. आता जर वजिराने घोडा खाल्ला Qxc3 तर काळा हत्ती उंटाला राजाबरोबर पिन करतो Rfe8. (गेलेले मोहरे प्याद्याच्या आघाडीसह परत मिळते सव्याज!)

16. Bc5 बायरनचा उंट फिशरच्या वजिरावर आला, आतातरी मागे जातोस की नाही?
छे छे, फिशर काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता! त्याने शह दिला Rfe8 +.

17. Kf1 राजा बाजूला घेऊन आता बायरन वाट बघतोय की आता तरी वजीर मागे जाईल.

Be6 !! फिशरची आश्चर्यकारक खेळी. वजिराचे बलिदान करायची तयारी!!
काय समज आहे डावाची, काय अंदाज आहे मोहर्‍यांच्या शक्तीचा आणि त्यांच्या स्थानमहात्म्याचा, काय आत्मविश्वास आहे स्वतःच्या डावपेचांवर!! वा!!! हे काव्य आहे खेळ नव्हे, हा गाण्यातला अंतरा आहे खेळी नव्हे!!
इतक्या लहान वयात एवढी खेळाची समज बघून थक्क होतो आपण. (वयाच्या १६ व्या वर्षी पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसमोर उभा राहणारा तेंडल्याच आठवतो अशा वेळी!!)

स्वतःच्या सामान्य मोहर्‍यांच्या मदतीने फिशर अतिशय घणाघाती हल्ला चढवायची धमकी देतोय. वजिराची ही ऑफर नाकारणे फारच कठिण आहे.
शिवाय तो बी६ वरचा उंट खाताही येत नाही कारण मग घुसमटून मात आहे (ज्याला स्मॉदर्ड मेट असं म्हटलं जातं: 18. Bxe6 Qb5+ 19. Kg1 Ne2+ 20. Kf1 Ng3+ 21. Kg1 Qf1+ 22. Rxf1 Ne2#)
(बाकी दुसर्‍या मार्गांनीही अडचणीच आहेत जसे 18. Qxc3 Qxc5 आता प्याद्याने काळा वजीर खाल्ला तर उंटाने पांढरा वजीर पडतो.)

18. Bxb6?? बायरन वजीर घेतो. अजूनही आपण ह्या नवख्या पोरावर मात देऊ असे त्याला वाटत होते बहुदा. त्यातल्यात्यात बरी खेळी होती Bd3.

आता सुरु झाली आपली प्रसिद्ध विंडमिल! (मागल्या लेखात कार्लोने ती लास्करविरुद्ध वापरली होती इथे फिशर बायरनला पिसणार आहे!)
Bxc4+ शह 19. Kg1 राजा जी १ मधे हालला
Ne2 शह 20. Kf1 राजा पुन्हा एफ १ मधे
Nxd4 घोड्याने प्यादे खाउन उंटाचा काटशह
21. Kg1 पुन्हा राजा जैसे थे Ne2 घोड्याने शह
22. Kf1 अरेरे पुन्हा हेलपाटा Nc3 काटशह
23. Kg1 पुन्हा एकदा जी१ (बायरनचे काय हाल होत असतील, एक तेरा वर्षाचा पोरगा आपल्याला खेळवतो आहे आणि जनता बघते आहे! छे छे! अवघड आहे.)
axb6 उंट मारुन हत्तीने वजिरावर चढाई 24. Qb4 चला राजाची जरा तरी सुटका झाली आणि बायरनने वजीर उंटावर घातला.
Ra4 फिशर आता आपली पकड आवळायला सुरुवात करतो. घोड्याच्या जोरात हत्ती वजिरावर आला आणि त्याने उंटाला अप्रत्यक्ष मदतही केली.
25. Qxb6 वजिराने प्यादे मारुन आपली सुटका करुन घेतली Nxd1 हत्ती मारला अखेर फिशरने. आता राजा पूर्णपणे उघडा पडलाय आणि वजीर एका बाजूला गेलाय. दुसरा हत्ती कोपर्‍यात आहे.
26. h3 राजाला सुटकेचा एक मार्ग मोकळा करुन ठेवलान बायरनने. Rxa2 हत्तीने प्यादे मारले. एकेक करुन विरोध जिरवणे सुरु आहे वाटेतला पण बायरन समोर आता फक्त बघत बसण्याशिवाय फारसे काही शिल्लक नाही.
27. Kh2 राजा दुसर्‍या पट्टीत नेला Nxf2 अजून एक प्यादे पडले.
28. Re1 हत्तीची मारामारी करायची आहे बायरनला Rxe1 हत्ती मारला.
29. Qd8+ शह Bf8उंटाने शह काढला
30. Nxe1 आता हत्ती मारला बायरनने Bd5
31. Nf3 Ne4 फिशरने घोडा मधे आणला कारण आता राजाला मैदानात खेचायची वेळ झाली आहे.
32. Qb8 शेवटचा एक दुबळा प्रयत्न प्यादं मारण्याचा. b5 काळ्याचे प्रत्येक प्यादे आणि सर्व मोहोरी जोरात आहेत. दुबळे कोणी नाही. पांढर्‍याच्या वजिराला फारसे काम नाहीये आता!
33. h4 h5 एच प्याद्याची आगेकूच थांबवली फिशरने.
34. Ne5 Kg7 पिन झालेला उंट मोकळा करुन घेतला.
35. Kg1 राजाच्या मृत्युघंटा वाजायला लागलेल्या आहेत. Bc5+ शह.
आता फिशर डाव कसा संपवत नेतो बघा. एक कलाकारी आहे त्यात. उगीच कुठेतरी मोहोर्‍यांच्या अतिरिक्त हालचाली करुन डावाचा विचका केलेला नाही. शांतपणे एकेक खेळी करुन राजाभोवती तो फास आवळत नेतो.
36. Kf1 Ng3 + शह. राजाचे मागे जायचे घर बंद झाले आता फक्त पुढेच जायचे!
37. Ke1 Bb4 + शह. हत्तीने दुसरी पट्टी धरली आहे आणि दोन उंट राजाला आळीपाळीने रेटत नेताहेत क्या बात है!!
38. Kd1 Bb3 + शह.
39. Kc1 Ne2 + शह. उंटांची कामगिरी संपल्यावर घोडा मैदानात उतरला. काय कॅलक्यूलेटेड हालचाली आहेत बघा. एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने फिशर सुरी फिरवतोय, बिनतोड, लाजवाब!
40. Kb1 Nc3 + शह
41. Kc1 Rc2# मात! खेळ खलास!!
काय डाव आहे!! बायरननेसुद्धा मनात म्हटलं असेल क्या बात है!! अरे, अशाप्रकारे हरायला सुद्धा भाग्य लागतं!!
--------------------------------------------------
हा संपूर्ण डाव इथे खेळून बघता येईल.
फिशरचा हा डाव माझा फार आवडता डाव आहे. वयाच्या मानाने त्याने ज्या कौशल्याचा खेळ दाखवलाय त्यात मिखाईल तालची झाक दिसते. भलेभले खेळाडू वजीर वाचवत डावभर फिरतात तिथे हा पोरगा बेधडक वजीर उंटासमोर टाकतो. असामान्य बुद्धीबळ प्रतिभा लाभलेला हा एक कलावंत होता पण पुन्हा शापितच..असो. फिशरबद्दल पुन्हा कधीतरी.

चतुरंग

-----------------------------------------------
ता.क.
बुद्धीबळप्रेमी आणि जावा, ड्रुपल, एच्टीएमेल च्याजाणकारांना एक विनंती आहे की मिसळपावावर बुद्धीबळाच्या पटाचे चित्र कसे टाकता येईल ह्यासंबंधी काही मार्गदर्शन हवे आहे. तशी सोय खेळ विभागात एखाद्या मेन्यूत करुन देता आली तर फारच उत्तम. कारण डाव समजावून सांगताना त्या त्या वेळची स्थिती जर दाखवता आली तर डाव 'विज्युअलाईज' करण्याचे कष्ट वाचतात आणि डावाचा आनंद जास्त लोकांना घेता येईल.मी ऑनलाईन काही प्रोग्रॅम्स उतरवून त्यातून बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही.

धन्यवाद!

-रंगा

क्रीडालेखआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

11 Jul 2010 - 9:45 am | सहज

लेख माझ्यासाठी खूपच तांत्रीक आहे पण ते कळणार्‍या लोकांकरता मेजवानी असणार.

तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे.

शानबा५१२'s picture

11 Jul 2010 - 10:32 am | शानबा५१२

लेख माझ्यासाठी खूपच तांत्रीक आहे पण ते कळणार्‍या लोकांकरता मेजवानी असणार.

तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे.

नक्कीच,मला असच लिहायच होत.
आपल्या प्रतिक्रीया सहसा अगदी योग्य मांडलेल्या असतात.
खरच धन्यवाद.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

विनायक पाचलग's picture

11 Jul 2010 - 10:25 am | विनायक पाचलग

जबर्‍या............
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

आनंद's picture

11 Jul 2010 - 11:10 am | आनंद

काय डाव आहे!
धन्यवाद चतुरंगजी

राजेश घासकडवी's picture

11 Jul 2010 - 12:33 pm | राजेश घासकडवी

अरे तुझी शिकार करण्यासाठी माझा वाघ असण्याची गरज नाही, माझे शिकारी कुत्रेच तुला फाडून खातील असं फिशर म्हणतो...आणि पद्धतशीरपणे हाल हाल करून शिकार करतो.

आधी घोडा घे, मग वजीर घे असं म्हणणार्‍या चिमुरड्या पोराबरोबर खेळताना बायरनचा चांगलाच घामट्या निघाला असेल!

अद्भूत डाव!

केशवसुमार's picture

11 Jul 2010 - 4:18 pm | केशवसुमार

काय डाव आहे हे !!! :O .. कातील.... >:D<
११ची चाल Na4 तर कामालच.. माझ्या मते तिथेच बायरन सापळ्यात अडकत गेला.. ~X( फिशरची १८ वी खेळीतर कहर आहे Bxc4.. त्यानंतरचा घोड्याचा अडीच घरातला नाच.. (सभ्य भाषा वापरता येत नाही आहे :D .. पण भा पो असतील ;;) :$ ) जबर्‍या..
२८व्या चालीत हत्ती ने हत्ती मारला अस दाखवत फिशरने खर तर बायरन चा वजीर पुढचा संपूर्ण डाव c6आणि b5 ह्या दोन प्याद्यांच्या नजर कैदेत बंद केला Qb8.. वजीर असून नसल्या सारखा.. =D> केवळ अप्रतिम.. नंतर दोन्ही बाजूनी फिशरच खेळत होता अस वाटते.. बायनर ला डोके चालवून दुसरी चाल करायला जागाच ठेवली नाही.. जस्ट फॉलो दी फिशर'स इन्ट्रकशनस..
रंगा शेठ ह्या डावाची पुन्हा आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद..
(माजी खेळाडू)केशवसुमार
खेळाचे वर्णन आणि चालींचे विश्लेषण तर अप्रतिम ..
(आस्वादक)केशवसुमार

बहुगुणी's picture

11 Jul 2010 - 5:08 pm | बहुगुणी

खेळ आणि खेळाडूंचं अगदी वास्तविक वाटावं असं शाब्दिक चित्रीकरण आहे; लेखात समोर खेळाचा पट असता तर दुधात साखर, पण बिन साखरेचं दूधही गोडच आहे :) इतकं तुमचं भाषाप्रभुत्व अफलातून आहे!

वाचक's picture

11 Jul 2010 - 7:00 pm | वाचक

घेउन त्या (थोड्याश्या) एडिट करुन टाकता येतील का चतुरंग ?
अजून एक (तुम्हाला थोडा अधिक कष्ट्प्रद) उपाय म्हणजे, असे एकापेक्षा अधिक चित्रे घेउन 'अ‍ॅनिमेटेड जीआयएफ' बनविणे. ह्याकरता सुद्धा मोफत अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

तो बिटमॅप फॉरमॅट करुन त्याचे चित्र केले आणि फ्लिकरवर चढवून ते इथे टाकले आहे.
ह्याने सध्या तरी काम भागेल पण हे जिकिरीचे आणि वेळखाऊ आहे.
ह्या ऐवजी सोपी सुटसुटीत पद्धत असणार अशी खात्री आहे!
तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद वाचक! :)

चतुरंग

सागर's picture

12 Jul 2010 - 12:41 pm | सागर

चतुरंगजी, काय सुंदर लिहिले आहे हे वर्णन तुम्ही.
केवळ अप्रतिम
अगदी डोळ्यांसमोर हे युद्ध घडते आहे असे वाटले...
मनापासून धन्यवाद.
मी कधीतरी बुद्धीबळ खेळणारा आहे. मला यातले डाव, त्यांची नावे हे परिचित नाहिये तरीही तुम्ही ज्या ताकदीने या डावाचे चित्र डोळ्यांसमोर उभे केले आहे त्याला तोड नाही. हॅट्स ऑफ टू यू
मलाही आता उत्सुकता निर्माण झाली आहे की कोणकोणते डावपेच असतात बुद्धीबळात.
हा डाव मी स्वतः नक्की खेळून पाहीन एकदा...

मनापासून धन्यवाद :)

चतुरंग's picture

12 Jul 2010 - 4:10 pm | चतुरंग

तुला आणखीन डाव बघायची उत्सुकता निर्माण झाली यातच ह्या डावाचे यश आहे!
हा डावच इतका सुंदर खेळला आहे की वर्णन करायला शब्द आपसूकच सामोरे येतात, विनायास, त्यात माझे कौशल्य अत्यंत मर्यादित आहे.

(फिशरचा चाहता)चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jul 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम आवडेश. लेखन आणि डाव दोन्ही :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

या दुव्यावर हा संपूर्ण सामना पाहता येईन
जावा प्लग-इन इन्स्टॉल करणे आवश्यक

आताच पाहिला. काय भन्नाट सामना होता. खरेच गेम ऑफ द सेंच्युरी.
पांढरा वजीर फक्त टकामका बघत बसला होता.
या संपूर्ण सामन्यात केव्हाही असे वाटले नाही की बॉबी फिशर अडचणीत होता. या १३ वर्षांच्या कोवळ्या पोराने बायरनला पद्धतशीरपणे व्यूहरचना करत चेक मेट केला.
मान गये बॉबी फिशर को...

सहज's picture

12 Jul 2010 - 2:10 pm | सहज

सामना पाहील्यावर मजा आली.

धन्यु सागर!

गणपा's picture

12 Jul 2010 - 2:03 pm | गणपा

ग्रेट चित्रामुळे समजायला मद्त झाली.
आणी आता तर काय सगरभौंनी चित्रफितच दिली आहे.
दोघांना धन्यवाद.

सागर's picture

12 Jul 2010 - 4:25 pm | सागर

सहजराव आणि गणपा,

माझ्यामते चतुरंगरावांनी त्यांच्या लेखातच एक दुवा दिला आहे
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1008361

माझ्या ऑफिसात हा दुवा ब्लॉक केला असल्यामुळे
मी गुगलून दुसरा दुवा शोधून काढला एवढेच ;)

रंगोजी's picture

12 Jul 2010 - 4:34 pm | रंगोजी

खरोखरच 'द गेम ऑफ द सेंचुरी'..
आणि वर्णनसुद्धा अप्रतिम.. चेसगेम्स च्या लिंकवर गेम खेळून बघता-बघता तुमची
कॉमेंटरी वाचताना मजा आली.

-(आगामी भागांची आतुरतेने वाट पाहणारा) रंगोजी

बोका's picture

12 Jul 2010 - 9:01 pm | बोका

बायरनने डाव सोडला का नाही हा प्रश्न पडला होता .
पण expert-chess-strategies.com येथे उत्तर मिळाले !

Byrne didn't want to spoil the beauty of the game by resigning so he let Fischer mate him. Just great!

बायरन ला धन्यवाद !

चतुरंगांचे ही आभार !!

विसोबा खेचर's picture

12 Jul 2010 - 10:21 pm | विसोबा खेचर

रंगा,

नीलकांताला मिपावर स्वतंत्र बुद्धीबळ विभाग सुरू करायला सांगतो.. तू त्या विभागाचा प्रमूख हो आणि या अजब भारतीय खेळाचा प्रचार आणि प्रसार कर..:)

तात्या.
प्रसारक आणि प्रचारक,
हिंदुस्थानी अभिजात संगीत.

धनंजय's picture

12 Jul 2010 - 11:03 pm | धनंजय

खेळाची मस्त ओळख! रसग्रहण अव्वल.

(ता. क. - डोनाल्डबुवाचे आडनाव उच्चाराने "बर्न" असावे. नावाचे स्पेलिंग प्रादेशिक वैशिष्ट्य दाखवण्यासाठी बी-वाय-आर-एन-ई असे वेगळेच का असेना...)