बम बम.......

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
15 May 2010 - 2:15 am

स्पॉयलर अ‍ॅलर्टः ज्यांना बम बम भोले नावाचे प्रकरण पाहायचे आहे त्यांनी ही पोस्ट वाचू नये.

लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणा सांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ. जिथे गेले, त्या थेटरातला प्रोजेक्टर रूममधला माणूस पण अंमळ गंडला होता.. आयत्यावेळी त्याने अ‍ॅडमिशन ओपन चालू केला!!! भ्वॉ... हे काय? माझ्या प्लॅनचा पोपट?? स्क्रीन चुकली की क्काय?? तिकिटं बुक केली, तेव्हा तर आख्खं थेटरच रिकामं होतं.. शेवटी दोन शाळकरी पोरं आली होती... त्यांच्याकडे पाहून ती पण बम बम लाच आली असावीत असे वाटत होतं... तोवर त्या माणसाच्या लक्षात चूक आली असावी नि एकदाचे ते प्रकरण चालू झालं.... आता नीट शिनिमा पाहता यावा की नाही? पाट्या संपायचा अवकाश, की आलाच बिकांचा फोन!!!!

तर हे पहा.. सस्पेन्स बिस्पेन्स काय नाय.. ज्यांना माहित नाही, त्यांच्या माहिती साठी: बमबम भोले हा प्रियदर्शनचा चिल्ड्रेन ऑफ हेवनचा अतिशय व्यवस्थित रित्या केलेला हिंदी अनुवादात्मक चित्रपट आहे... पण म्हणून प्रियदर्शन नि चिल्ड्रेन ऑफ हेवन ही दोन नांवे आहेत म्हणून लगेच पोरासोरांना दाखवायला घेऊन जाऊ नका.. का? याची कारणे पुढे येतीलच..!!!

पहिला शीन... मस्त टवटवीत भाज्या.. बाजारातील एक प्रसन्न सकाळ.. एक पोर्‍या रंगीबेरंगी फुगे विकत आहे. त्याला एक माणूस जवळ बोलावतो, त्याला एक टिफिन देतो, शंभराच्या नोटेचा एक तुकडा देतो.. नि राहिलेला तुकडा काम झाल्यावर देईन असे खुणावतो.. तो मुलगा एका गाडीत पोलिस अधिकारी बसलेला असतो, त्याच्याजवळ जातो, तोच डबा देणारा माणूस रिमोट्चे बट्न दाबतो.... बाँबस्फोट होतो.. फुगे उडून जातात्(स्फोटात वाचतात ब्वॉ.. आमच्या इथे विस्तव/आगीची नुसती धग लागली तरी फुगे फटकन फुटतात.. हे पेश्शल फुगे असावेत) नि पुढच्याच क्षणी रक्तमांसाचा चिखल पडतो..

असो.. तर मूळ चित्रपटात कथेचे नायक्-नायिका सतत स्वेटर घालतात नि ती मुलगी डोक्याला स्कार्फ बांधून असते.. म्हणून आपल्याकडे डिट्टो तसले कपडे घालायलाच हवेत म्हणून कथा थंड हवेच्या प्रदेशात-आसामातसदृश्य भागात घडते.. बाकी ती अगदी इथे धारावी/माहिमच्या झोपडपट्टीत घडली असती तरी चालली असती. मुलगा-पिनाकी नि त्याची बहिण-रिमझिम , त्यांचे बाबा अतुल कुलकर्णी, आई- एक कुणीतरी फुटकळ रोल करणारी बंगाली बाई असते ती आहे.. ते दोघे चहाच्या मळ्यात काम करतात.. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. चहाच्या मळ्यात मुकादमाने आईशी अतिप्रसंग (आजकाल लहान मुलांना पण प्रतिकात्मक दाखवलेल्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांच्या साठीच्या चित्रपटात इतके obvious करण्याची गरज नाही हे मझे मत.)केल्याने बाबा त्या माणसाला मारतात नि ओघानेच दोघांचीही नोकरी जाते. मुलांची आत्या तुलनेने सधन आहे.. पण तिच्या नवर्‍याचा मार्ग सचोटीचा नसावा म्हणून त्याच्याकडून मिळालेली नोकरी बाबा लाथाडतात.. तिथे झालेल्या संवादात पोलिसांवर ते बाहेरचे आहेत म्हणून आपल्याला समजून घेत नाही, सगळे बाहेरचे लुच्चे आहेत असा आरोप हा आसामात राहणारा बंगाली करतो.. असो.. चित्रपटात चुकुन कुठेतरी मूळ चित्रपटापेक्षा वेगळेपणा आहे.. त्यातल्याच या वरच्या घटना..

मग , भावाचे बाजारात जाणे, किराणामालाच्या दुकानात भाजीच्या शेजारी ठेवलेल्या बहिणीच्या चपला कचरेवाल्याने नेणे, त्या शोधताना मुलाकडून भाज्या सांडणे.. सगळं कसं अग्गदी तस्संच. कुठ्ठे म्हणून नांव ठेवायला जागा नाही.. अगदी तिकडे मौलवी मशिदीत वाटण्यासाठी खडीसाखर फोडायला देतात ना?? तर इथेही अगदी तसेच.. पुजारीही खडीसाखरच फोडायला देतात.. (तात्पर्य काय? धर्म बदलला, म्हणून प्रसाद बदलत नाही...=)) ) नि मग एवढं अगदी खडीसाखरेपर्यंत जमवून आणल्यावर मग बाबांनी चहात घालायला साखर मागणे नि ही देवाची साखर खाऊ नये म्हणून मुलीला उपदेश करायचे नाही असं कसं चालेल??? :D

मग त्याचे बहिणीला आईबाबांना सांगू नको म्हणून समजावणे, दोघांचा वह्यांवरचा संवाद्(तो पण शब्दशः स्वैर अनुवाद), तिने शाळेला त्याचे बूट घालून जाणं मान्य करणे, त्याबदल्यात त्याने तिला पेन्सिल देणे हे आहेच.. झालेच तर एकाची शाळा सकाळी नि दुसर्‍याची दुपारी हे नसेल तर पुढे चित्रपट घडणार कसा? म्हणून हे ही ठेवून दिले. मग त्या पोरीला ते शूज मोठे होणे, तिला ते घालून नीट चालता न येणे, त्यांच्या शाळेत मुलींना उड्या मारायला लागणे, शूज न घातलेल्या मुलींना नेट उड्या मारता न येणॅ नि नंतर बहिणीने शूज घाण आहेत मला घालायला लाज वाटते असे म्हणे पर्यंत पर्यंत श्टोरी येते..

आणि हो.. एक राह्यलंच.. तिकडल्याप्रमाणे यांच्याही अंगणात पाण्याचा गोल (हो, गोलच) हौद आहे. फरक इतकाच, की तिथले पाणी स्वच्छ दिसते, नि त्यातले मासे पटावे इतके छोटे आहेत नि इथले पाणी अतिशय घाण नि मासे एखाद्या मत्स्यसंग्रहालयातून दहा दिवसाच्या बोलीवर आणलेल्या कळपासारखे मोठे नि संख्यने कैच्या कैच आहेत.. तर मग ते दोघे ते बूट त्या हौदाशी बसून धुतात.. (तेव्हा बुटांच्या वरचा आदिदास चा लोगो अगदी स्वच्छ दिसतो. पण याबद्दल कुणी काही बोलायचे नाही हां!!!) तेव्हा साबणाच्या फुग्यांचा डिट्टो कॉपी पेस्टेड प्रसंग पाहून तर या लोकांची कीव आली.. उठून जावे असे मनात आले.. पण त्याचाही कंटाळा आल्याने पुढे काय वाढून ठेवलंय पाहावं लागलं..

आता उगाच कुणी किती रे कॉपी माराल असे म्हणेल म्हणून दोघांच्याही शाळा मिशनर्‍यांनी चालवलेल्या दाखवल्या आहेत. मुलाला शिकवायला नन्स आहेत. त्याच्या शाळेत एक मुलगा रोज उशीरा येतो नि कारण विचारले तर रोज बाबा काहीतरी वेगळे(नि विनोदी) काम सांगतात म्हणून त्याला उशीर होतो. आणि मध्येच कधीतरी प्रियदर्शनला आठवते की सुरूवातीला आपण बॉंबस्फोट केला होता की राव.. म्हणून मग दर्शीलच्या बाबांचे ज्याच्याशी भांडण झालेले असते त्याचा कुणीतरी गोळ्या झाडून खून करतो नि बालंट बाबांवर येतं. मग यांची परिस्थिती आणखीच वाईट बनते.

मग पुन्हा बदल दाखवून दिग्दर्शक कंटाळतो नि मूळ प्रेरणे कडे येतो. मग तो एकदा तिचा बूट गटारीत पाडतात. पुढे काय होते हे माहित आहे म्हणून सांगत नाही. मग थोड्या वेळाने त्या बहिणीला तिचे हरवलेले सँडल्स एका मुलीच्या पायात दिसतात, ती तिच्या घरापर्यंत जाते, नंतर भावाला त्यांचे घर दाखवते. काय? पुढचे माहित आहे की त्या मुलीचे बाबा अंध असतात नि हातगाडीवर वस्तू विकत असतात??? बर्रं मग राह्यलं.. हे माहित आहे तर पुढे त्या मुलीला तिचे बाबा नवीन शूज आणतात नि ती जुन्या चपला फेकून देते, नि ते ऐकून नायिकेला खूप दु:ख होते हे पण सांगत नाय... [( मग कुणीतरी बाबांना माळीकाम करायला सुचवतं.(जरी सेम शेम असले तरी मी आता हे सांगणार हां.) तर इथे पण ते मोठ्मोठ्या बंगल्यातून माळीकाम करायला जातात. मग बेल दाबल्यावरचे मालकांचे नि यांचे संवादही तेचतेच. फरक इतकाच की, तिथे एक कंटाळलेला मुलगा नि त्याचे आजोबा असतात, तर इथे एक मुलगी आणि तिची आजी आहे. आजी म्हणून सुलभा देशपांडेना पाहून खुदुखुदु हसायलाच आलं होतं. मग पैसे मिळतात पण सायकलला अपघात होऊन त्याचेही होत्याचे नव्हते होऊन जाते.

पुन्हा एकदा काहीतरी वेगळेपण दाखवायची प्रियदर्शनला खुमखुमी येते. आता त्यांची आत्या घरी येऊन सांगते की तिच्या घरी किती सुबत्ता आहे, तिचा नवरा बाहेरच्या लोकांना काम मिळवून देतो, एवढाली मुले सुद्धा आठवड्याचे दोन्-तीनशे मिळवतात. मग हा मुलगा आतोबांकडे जाऊन म्हणतो की बाबा तुमचे काम करत नाहीत, मी करतो, मला पैसे द्या. हा माणूस नायकाला नोटेचा अर्धा तुकडा देऊन एक काम सांगतो, ते उल्फा अतिरेक्यांचे काहीतरी काम असते नि अशी दोनतीन कामे केल्यावर नोटेचा राहिलेला अर्धा भाग मिळेल म्हणून सांगतो. [म्हणे ,"रईस देशके गरीब इलाके में ऐसी फटी हुई नोटे चलती हय" =)) पुढच्या वेळेस सगळ्या नोटा नीट तपासून घेईन हो मी.. एखादी तिकडून आलेली असायची..] हा काम करतो नि येऊन पाहतो तर आतोंबाच्या घरी आतोबा विरूद्ध पोलिस असा गोळीबार सामना रंगलेला असतो. त्यात एकटा असल्याने आतोबा मरतो. पण त्याचे शव जरा अतिच जवळून नि अंगावरची पांदरी चादर अतिच लाललाल दाखवलेय.

बाकी मग स्पर्धा/प्रसंग वगैरे सगळे शेम शेम.. क्काही फरक नाही.. पण त्यात दर्शीलभौ काही पळताहेत असे काही वाटत नाही.. आता मूळ पिक्चरमध्ये दाखवलेय म्हणून त्याला इकडेपण वर्गात पहिला नंबर दिलाय. पण बर्‍याच ठिकाणी तो चेहर्‍यावरून निर्बुद्ध ठोकळा वाटतो. उगाच मिचेमिचे डोळे करतो नाहीतर मोठेमोठे डोळे करून बघत असतो.. असो. तर इथे ती स्पर्धा आदिदासने आयोजित केली आहे त्यामुळे आदिदास आणि हॉर्लिक्सची बक्कळ जाहिरात करून झाल्यावर शर्यत संपते. तिसरा येण्याऐवजी पहिला येण्यामध्ये जी हार आहे, ती मूळ 'अली' ने फक्त डोळ्यांतून दाखवलीय. दर्शीलने मान खाली घालण्यावाचून दुसरे काहीच केलं नाहीय.. तो घरी येतो. बहिणीला त्याने शूज आणाले नाहीत हे कळतं, ती आत जाते. हा आपले फाटके शूज काढतो नि त्या गोल हौदात पाय सोडतो. पायावरच्या जखमा अंमळ जास्तच मोठ्या नि माशांबद्दल तर काय बोलायलाच नको. तोवर बाबांना एक चांगली (पक्षी: रू ३००० दरमहा) ची नोकरी मिळते. त्याचा अ‍ॅडव्हान्स ही मिळतो. नि दोन किलो तांदूळ घेण्याची ऐपत नसणारे बाबा दोन्ही मुलांसाठी 'आदिदास' चे शूज घेतात!!! (इथे मी अंमळ कप्पाळ बडवून घेतलं)

खरंतर, अलीच्या ठिकाणी दर्शील ही निवडच मुळी चुकीची आहे. पण त्या बापड्याला काय बोल लावणार? इथे दिग्दर्शकालाच क्लिअर नाही, की तो एरिया कुठला दाखवतोय. आसाम, उटी की आणखी काही??? संवाद बहुतेक मराठी माणसाने लिहिले आहेत. बर्‍याचदा मराठी शब्द आले आहेत. तिसर्‍या क्रमांकाचे तुला मिळणारे बूट तुझ्या मापाचे असतील यावर "मैं तुम्हारे माप के माँग लूंगा" अशा छापाचे संवाद आहेत.. अतुल कुलकर्णी तर सरळ मराठी बाणा दाखवत मराठीतून हिंदी बोलतो. त्याच्या इतर चित्रपटात हे मला कधीच जाणवलं नाही. इथे त्याचा पहिलाच डॉयलॉग-"कल्याणी"- यातच ते जाणवते.

या सगळ्यात सुसह्य गोष्ट ती एकच- बहिणीची भूमिका करणारी जिया. गोड दिसते, गोड हसते. तिच्या डोळ्यांतून छान भावना व्यक्त करते. छान छान लुटुलुटु पळते. तिथे अलीपुढे सगळे दुय्यम ठरतात, अगदी सारासुद्धा. इथे हीच जो काही थोडाफार आहे तो चित्रपट खाऊन टाकते.

थोडक्यात काय, पाहायचाच असेल, तर चिल्ड्रेन ऑफ हेवनची अगदी पारायणे करा.. पण....... :)

कलाविनोदमौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

15 May 2010 - 3:33 am | शिल्पा ब

आताच ओरिजिनल पिक्चर नेटफ्लिक्स वर टाकला....आपल्याकडे रीमेक फारच बकवास बनवतात...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

नंदन's picture

15 May 2010 - 5:38 am | नंदन

भन्नाट परीक्षण

सगळं कसं अग्गदी तस्संच. कुठ्ठे म्हणून नांव ठेवायला जागा नाही.. अगदी तिकडे मौलवी मशिदीत वाटण्यासाठी खडीसाखर फोडायला देतात ना?? तर इथेही अगदी तसेच.. पुजारीही खडीसाखरच फोडायला देतात.. (तात्पर्य काय? धर्म बदलला, म्हणून प्रसाद बदलत नाही... )

=)) =))

पण बर्‍याच ठिकाणी तो चेहर्‍यावरून निर्बुद्ध ठोकळा वाटतो. उगाच मिचेमिचे डोळे करतो नाहीतर मोठेमोठे डोळे करून बघत असतो.. असो.

--- चला, शाहिद कपूर आणि कुणाल खेमूनंतर कोण?, हा प्रश्न (कुणाला पडलाच असेल तर) सुटला म्हणायचा ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

टारझन's picture

15 May 2010 - 9:50 am | टारझन

मके .. मके ... तोडफोड .. .चेंदामेंद ... =)) झकास :)

-- बुड्तं खातेंदर

>>चला, शाहिद कपूर आणि कुणाल खेमूनंतर कोण?, हा प्रश्न (कुणाला पडलाच असेल तर) सुटला म्हणायचा
आमच्या लाडक्या आफताब शिवदासानी ला विसरल्याबद्दल णंदण चा णिषेध !!

ह्या चित्रपटाच्या शिर्षकावरुन लहाणपणी ऐकलेला एक जोग आठवतो ...

एकदा रावण सकाळीसकाळी सितेला पळवुन नेत असतो .... तो आकाशातुन जात असतांना खाली परसात बसलेला हनुमान त्यांना पहातो ...
आणि म्हणतो ... "बम् बम् भोले ... "
तेंव्हा रावण काय म्हणतो ... ते जाणुन घ्यायला व्यनि करा =))

- आंदण

सुबक ठेंगणी's picture

15 May 2010 - 7:56 am | सुबक ठेंगणी

सगळं कसं अग्गदी तस्संच. कुठ्ठे म्हणून नांव ठेवायला जागा नाही.. अगदी तिकडे मौलवी मशिदीत वाटण्यासाठी खडीसाखर फोडायला देतात ना?? तर इथेही अगदी तसेच.. पुजारीही खडीसाखरच फोडायला देतात.. (तात्पर्य काय? धर्म बदलला, म्हणून प्रसाद बदलत नाही... )

हे जब्बर्दस्त! =)) =))

थोडक्यात काय प्रियदर्शनने "टू हेल विथ चिल्डन ऑफ हेवन' असं काहिससं म्हटलं असावं पिक्चर बनवताना...किंवा मग एका हातात जाडा चिरूट घेऊन "बम बोले"!

भाग्यश्री's picture

15 May 2010 - 7:48 am | भाग्यश्री

अरे देवा! हाही पिक्चर नाही सोडला ? अलीच्या जागी दर्शिलला बघणं नाही सहन होणार! चिल्ड्रेन ऑफ हेवनच बघीन मी परत.. !

ऋषिकेश's picture

15 May 2010 - 9:34 am | ऋषिकेश

चित्रपटाची जाहिरात बघुनच वाटलं होतं की फोटोकॉपी असेल. फक्त फोटोकॉपीचा दर्जा कसा असेल ही उत्सुकता होती. ही "रॉकेल" कॉपी असल्याचं दिसतंय..
परिक्षण छान आहे.. हसु आलं.. पण आपल्या तथाकथित यशस्वी प्रोडक्शन हाऊसेसना स्वतःची अशी संकल्पनाही मिळू नये याचं राहून राहून वाईट वाट्टंय

मागे एकदा त्या गुरविंदर चढ्ढा नामक अतिविशाल महिलेने प्राईड अँड प्रेज्युडिसची वाट लावली होती... आता हे.. चांगल्या चित्रपटांच्या चिंध्या करायच्या असल्या की आपल्या दिग्दर्शकांकडे द्याव्या का यावर कौल टाकावा म्हणतो...

जाऊदे त्रागा करण्यापेक्षा घरी डाऊनलोड केलेला चिल्ड्रेन ऑफ हेवन बघतो झालं

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

राधा१'s picture

15 May 2010 - 11:14 am | राधा१

आजच सकाली येता येता दिपक टॉकीजला याचा बोर्ड बघितला होता..विचार होता जाण्याचा..पण तै..बर झाल ते आज परिक्षण टाकलत ते नाहीतर, फुकट गेले असते पैसे.. असो..चिरफाड झक्कास झाली आहे...एकदम जोरात हसत होते की बाजुचा अकबर जरा माझ्यकडे चमत्करिक नजरेनेच बघयाला लागला आहे..असो..

परिकथेतील राजकुमार's picture

15 May 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

मके मके मके धन्य आहेस बै __/\__

मी ट्रेलर बघुन भोवळ येऊन पडलो होतो. तु अख्खा शिनिमा कसा काय पाहिलास बॉ ?

आता विषय काढलाचा आहेस तर मी लिहिलेल्या चिल्ड्रन ऑफ हेवन च्या परिक्षणाची जाहिरात करुन घेतो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

15 May 2010 - 6:21 pm | ऋषिकेश

पर्‍या, तुझ्या परिक्षणानंतरच मी हा चित्रपट पाहिला होता. तुला पुन्यांदा आभार :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2010 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

मके... एकदम खणखणीत .... प्रियदर्शन जीवच देईल बघ...

पाट्या संपायचा अवकाश, की आलाच बिकांचा फोन!!!!

मोक्याची वेळ साधून फोन करण्यात माझी बरोबरी नाहीच करू शकत कोणी. अधिक माहितीसाठॉ भेटा अथवा लिहा : श्री. _ _ _ _.

बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर's picture

21 May 2010 - 10:36 pm | भडकमकर मास्तर

बर्‍याचदा मराठी शब्द आले आहेत. तिसर्‍या क्रमांकाचे तुला मिळणारे बूट तुझ्या मापाचे असतील यावर "मैं तुम्हारे माप के माँग लूंगा" अशा छापाचे संवाद आहेत..

संवादलेखिका मला वाटतं मनिषा कोरडे आहेत...
माप के जूते.. हेही भारी

पंगा's picture

21 May 2010 - 10:57 pm | पंगा

... प्रभावशाली रीतीने घेण्याच्या मराठी माणसाच्या सार्वजनिक प्रयत्नांची ही नांदी आहे.

मराठी माणसाने एकजुटीने असे प्रयत्न जोरात चालू ठेवले पाहिजेत. मराठी माणसाने मोठ्या संख्येने भय्याच्या मुलुखात स्थायिक होऊन, तेथे हिंदीत आणि केवळ हिंदीतच बोलण्याचा अट्टाहास बाळगला पाहिजे. आपल्याच मुलुखात घाऊक प्रमाणात मराठी माणसाचे हिंदी ऐकून भय्या पुन्हा महाराष्ट्रात पाऊल ठेवणार तर नाहीच, पण बहुधा देश सोडून पळून जाईल असा विश्वास वाटतो.

काही कारणाने हे शक्य नसल्यास, हिंदी चित्रपटसृष्टीत अशीच मोठ्या प्रमाणावर मराठीभाषक संवादलेखकलेखिकांची भरती केली तरीसुद्धा काम चालून जायला हरकत नसावी.

- पंडित गागाभट्ट

प्रभो's picture

15 May 2010 - 12:13 pm | प्रभो

छप्परफाड!!

सहज's picture

15 May 2010 - 12:21 pm | सहज

चाहा तो बहोत ना चाहे तुझे..... असे करत तुम्ही लोक हिंदी सिनेमे बघायला जाताच..

प्रियदर्शन नाव वाचुनच तु १००वेळा खात्री करुन घ्यायची होतीस..

दिपक's picture

15 May 2010 - 12:28 pm | दिपक

=))
चित्रपटाचा ट्रेलर पाहुन शंका आली होतीच. ऍनीमेशन ने बुट पळतो वगैरे..
थोडक्यात ‘चिल्ड्रेन ऑफ हेवन’च्या प्रेमाखातर हा चित्रपट पाहण्याचे टाळलेलेच बरे.

मेघवेडा's picture

15 May 2010 - 12:43 pm | मेघवेडा

=)) =)) जबर्‍या!!

आईशप्पथ तू पाहिलास हा संपूर्ण?? धन्य आहेस!!

आणि परीक्षणाबद्दल तर काय लिहावे! अहाहा!! सकाळी सकाळी वाचलं, आता दिवस टकाटक जाणार!! जबरदस्त!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

छोटा डॉन's picture

15 May 2010 - 11:59 pm | छोटा डॉन

एकेक वाक्ये कडक आहेत, पार चेंदामेंदा केला आहे.
( च्यायला असेच "झेंडा" चे परिक्षण लिहले असते तर ?
असो. )

बाकी हा पिक्चर कधी आला आणि कधी गेला ते समजलेच नाही.
मी तर अजुन त्याचा ट्रेलरही पाहिला नाही ( अर्थात अजुन लॅपटॉपवर सिन्मा ट्रेलर दिसत नाही, त्यासाठी कधीतरी फुटबॉल सोडुन इतर चॅनेल्स पहावी लागतील हे आहेच म्हणा. असो. )

७०० एब्मी डाऊनलोड वाचले रे बाबा !!!

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मागे एकदा पेपर मध्ये वाचले कि दर्शील सव्वा करोड घेतो म्हणे सिनेमाचे......थोडाफार अभिनय पण शिकायला हवा पोराने.
पण खरच त्याच्या चेहेर्यावरची माशी पण उडत नाही . सिनेमा नेट वर सापडला म्हणून मुलाला लावून दिला तर काय, भली मोठी आदिदास शूज ची न संपणारी जाहिरात...!
मधून मधून पहिले तरी तेच सुरु ....सध्या सिनेमावाल्यांची गाडी बुटांवर घसरलेली दिसते....!
जमेची बाजू म्हणजे अलीची बहिण जिया मात्र फारच गोडुली बाहुली आहे.तिचे काम पाहायला मजा येते.
सो स्वीट जिया!

मीली

निखिल देशपांडे's picture

17 May 2010 - 11:12 am | निखिल देशपांडे

उत्तम चिरफाड ह्या नंतर पिक्चर बद्दल काही लिहायला उरलेच नाही.
ह्या पेक्षा चिल्ड्रन ऑफ हेवन १०-१५ वेळा पाहिलेला बरा

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

नीधप's picture

17 May 2010 - 12:58 pm | नीधप

परिक्षण फर्मास...
प्रोमो बघून आणि त्या दर्शील सफारीचा मुलाखतींच्यातला आगाऊपणा बघून चित्रपट बघायची गरज नाही हे लक्षात आलंच होतं.
आता नक्कीच बघणार नाही. चिल्ड्रन ऑफ हेवन इतका आवडता सिनेमा आहे की त्याची अशी वाट लागलेली बघवणार नाही...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Pain's picture

17 May 2010 - 1:09 pm | Pain

हेहे...मस्त आहे....लेखिकेशी सहमत !
चित्रपटग्रुहात तर जाउच दे, एकुणच* हिंदी चित्रपट पाहणे सोडून दिले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 May 2010 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक लंबर चिरफाड ... बाकी बिपिनचं फोन करायचं टायमिंग आणि तुझा फडतूस पिक्चर्स पहाण्याचा पेशन्स यांच्याबद्दल काय बोलणार?

अदिती

नील_गंधार's picture

17 May 2010 - 3:52 pm | नील_गंधार

आइच्यान लै भारी परिक्षण.
धन्य तो बाप ज्याने आपल्या पोरांना "अदिदास"चे बुट आणले.
मी दहावीला असताना घरी न सांगता आईकडून पैसे घेतले व मित्रांच्या नादाने अ‍ॅक्शनचे बुट आणले होते. तेंव्हा आमची एवढि ऐपत नव्हती. बापाला कळल्यावर त्याने त्या बुटानेच मला फोडले होते.
:)

मुळ चित्रपट ह्या पेक्षा कितीतरी सरस आहे.

नील.

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 May 2010 - 6:19 pm | अक्षय पुर्णपात्रे

चित्रपट पहाण्याची सूतराम शक्यता नाही. परीक्षणाचा आनंद घेतला. मजेदार परीक्षण.

शुचि's picture

21 May 2010 - 3:51 am | शुचि

>> संवाद बहुतेक मराठी माणसाने लिहिले आहेत. बर्‍याचदा मराठी शब्द आले आहेत. तिसर्‍या क्रमांकाचे तुला मिळणारे बूट तुझ्या मापाचे असतील यावर "मैं तुम्हारे माप के माँग लूंगा" अशा छापाचे संवाद आहेत.. अतुल कुलकर्णी तर सरळ मराठी बाणा दाखवत मराठीतून हिंदी बोलतो. >>
=)) =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

स्वाती दिनेश's picture

21 May 2010 - 6:16 pm | स्वाती दिनेश

भारी परिक्षण,
उतारा म्हणून मूळ शिनूमा परत एकदा बघितलास की नाही?
स्वाती

श्रावण मोडक's picture

21 May 2010 - 10:00 pm | श्रावण मोडक

असले (आता या शब्दाचा अर्थ वेगळ्या संदर्भात मागू नका) चित्रपट मस्त कलंदरच्या नशिबी नेहमी येवोत असे ('दुष्ट'पणे) म्हणावेसे वाटावे असे लेखन. :)

मनिष's picture

22 May 2010 - 1:57 am | मनिष

__/\__

धन्य आहात मक तुम्ही! वाट लावतात राव हे लोकं चांगल्या सिनेमांची! :(
असो! त्या बाँबचे काय होते पुढे?

(अवांतर : तसाच संतोष शिवन चा "तहान" हा सिनेमा खूपच चांगला आहे. माजिदीच्या तोडीचा नसला तरी आवडण्या इतका चांगला नक्कीच आहे )

मनिष's picture

22 May 2010 - 1:57 am | मनिष

__/\__

धन्य आहात मक तुम्ही! वाट लावतात राव हे लोकं चांगल्या सिनेमांची! :(
असो! त्या बाँबचे काय होते पुढे?

(अवांतर : तसाच संतोष शिवन चा "तहान" हा सिनेमा खूपच चांगला आहे. माजिदीच्या तोडीचा नसला तरी आवडण्या इतका चांगला नक्कीच आहे )