अंत:स्थ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
5 Jan 2010 - 8:14 pm

एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे. प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथील महाविद्यालयातील मराठी विषय शिकवणारा तरुण प्राध्यापक.

'अंत:स्थ’ हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला. या कवितासंग्रहात एकूण पन्नासहून अधिक कविता आहेत. कवितांची विभागणी करायची ठरली तर, पहिल्या काही कविता शेतीशी संबंधीत तर बाकीच्या कविता या सामाजिक विषयांवरच्या आहेत. मराठी ग्रामीण कवितेच्या भाषेवर बराच काथ्याकूट मराठी साहित्यात झालेला आहे. पुर्वी ज्याला जानपद काव्य असे म्हटल्या जायचे. त्या काव्याची भाषा कोणती असावी, भाषेचे स्वरुप कोणते असावे, वगैरे. या कवितासंग्रहात कवीने शेतीशी संबंधीत कवितेसाठी खेडवळाची भुमिका पार पाडली आहे. आणि त्यातूनच तो आपला विचार मांडतो. ’तुव्ह सपन लुटलं’ कविता पाहा-

आरं शेतकरी दादा तुही अजब कहाणी
भूक बांधुनी पोटाले पितो घोटभर पाणी.
...............
अरं शेतकरी दादा धान नेल रं आडती
घेऊन रं मातीमोल तुल्हे मातीत गाडता
अरं शेतकरी दादा तुव्ह आयुष्य घटलं
सुखी पाहता सपन सारं रघट आटलं
अरं शेतकरी दादा तुव्ह नशीब फुटलं
हातपदरीचा घास तुव्ह सपन लुटलं (पृ.क्र.१५)

शेतक-याचं सनातन स्वप्न की, शेतीतून येणा-या उत्पन्नाने भविष्यकाळ सुखाचा होईल. पण मोंढ्यावर धान्य नेल्यानंतर तेथील दलाल धान्यांना मातीमोल भाव मागतात. रक्त आटवून सुखी स्वप्न पाहिलं जातं ते स्वप्न दलालाकडून लुटल्या जाते. या व्यवस्थेकडे कवी निर्देश करतो. एकूण सर्वच शेतकरी हे जमीनीशी निगडित आहे. ती जमीन पावसावर अवलंबुन आहे. पाऊस हेच शेतक-याचं जीवन आहे. सतत आभाळाकडे पाहणारा शेतकरी हे तर वर्तमानपत्राचं आवडतं चित्र आहे. अशाच आभाळाकडे डोळे लावणा-या ’परंपरा’ नावाच्या कवित अशीच आहे. आभाळातील चांदण्याकडं पाहत शेतकरी स्वप्न पाहू लागतो. या वेळेस चांगला पाऊस होईल. पीकपाणी चांगले येईल. मी मुलाला शिक्षणासाठी शहरात पाठवीन. मुलगा साहेब होईल.मी गावभर फिरुन सांगेन 'मह्या पो-या सायेब झालाय’. पण दोन-चार सरी पडतात आणि शेतक-याचं स्वप्न ढेकळात विरघळून जातं. पाहता पाहता शेतक-याचं पोरगंही शेतकरीच होतो. आता बापाची जागा तो घेतो. पुन्हा सुखी जीवनाचं स्वप्न पाहतो. त्याचंही स्वप्न विरघळून जातं, अशी ती 'परंपरा' पुढेच चालूच राहते. ’मातीशी नातं’ ’कष्टाचं वान’ ’आस’ ’शाप’ ’रान मातीची कहाणी’ ’आसवांचा महापूर’ या अशा कवीतेतून शेती आणि शेतक-याच्या प्रश्नाभोवती त्यांची कविता फिरतांना दिसते. असे असले तरी, शिवारातील शेतकर्‍याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहावं अशी कविताही या काव्यसंग्रहात आहे. उदा. हिरवा शालू-

राज्या-परधान्या
जुंपली तिफन
दुबार पेरणं-माळरानी
फुटले अंकुर
शेवाळलं रान
पावसाचं गाण-शिवारात
...............
…...........
हिरवा शालू
शेती अंथरला
शब्द मंतरला-तिन्हीसांजा
शालू हिरवा नटली धरती
मनाला भरती-कुणब्याच्या. [पृ.क्र.१८]

शेतीभातीच्या कवीतेनंतर कवीचं मन समाजातील व्यवस्थेकडे वळतांना दिसते.’पुरे झाले आता’ कवीतेत धर्म, संस्कृती, देव, धर्मसुत्र या सर्व गोष्टींनी मानवतेचे लचके तोडले जाते असे कवीला वाटते. दगडाच्या देवाला किती मानपान आहेत. पण माणसाला काय ते दारिद्र्य. नैवेद्य,नवस, पुर्ण करण्यासाठी किती ही माणसांची धावपळ. धर्म, वेद, यांनी माणूस संमोहित झाला आहे. आणि या अस्त्राद्वारे सामान्यांना लुटण्याचे एक कुरण प्रस्थापितांकडे आहे. कवी म्हणतो-

पुरे झाले आता
देव्हारे माजविणे
पाषाण पूजविणे-मंदिरात
माणूस माझा देव
मानवता तो धर्म
माणुसकी ते कर्म-माणसाचे. [पृ.क्र.२८]

हिंदू धर्मातील काही चालीरिती, परंपरा, याची चिकित्सा कवी करु पाहतो. सामाजिक परिवर्तन कवीला अपेक्षीत आहे. माणूसकी धर्म श्रेष्ठ आहे, या वर कवीचा भर आहे. धर्म-कर्माच्या व्यवस्थेमुळेच इथे विषमता निर्माण झाली असे कविला वाटते. इथे कवीची भुमिका ही सुधारकाची दिसते. 'ठेवीले अनंते तैसेचि राहावे' या मानसिकतेला बदलण्याचा विचार कवी व्यक्त करतो. त्यांची ’ 'सत्यधर्म’ नावाची कविता बोलकी आहे. शतकानुशतके खुळचट धर्माच्या कल्पना लादून समाजमनाला पंगु बनवल्या गेलं. दगडांना शेंदूर फासवून त्यांनी भोगस्थाने निर्माण केलीत. आता ही शेंदरी दैवते लाथाडली पाहिजेत. भ्रामक धर्मशाही उलथवली पाहिजेत. आणि तुका, फुल्यांनी, सांगितलेला 'सत्यधर्म' जाणुन घेतला पाहिजे. अशाच पुरोगामी विचाराने भारल्या गेलेल्या कविता या संग्रहात वाचायला मिळतात. 'तुकोबा तुझेही हात सनातनी असायला हवेत’ ' सनातनी पहाटेचं सावट' 'दिवसही वै-याचा आहे’ या कवितांमधून कवी आधुनिक विचारांशी नातं सांगतो. काही कविता राजकारणावरही आहेत.’बाबा हो लोकशाही’ कवीतेत कवी म्हणतो-

सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
.................
…...........
पाच वर्षानंतर फेरी येते,
ज्या हातानं, आमची मुस्काट दाबली,
भाकरी हिसकावली
तीच हातं
आमच्यासमोर जोडली जातात
झोळी पसरुण भीक मागतात अन
कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य
दिसून येतं
पुन्हा एकदा जैसे थे
लोकशाही बाबा लोकशाही.[पृ.क्र.५०]

’अदिमाचा हुंकार-शब्द’ ही कविता अधिक सुंदर आहे. शव्द उठवतात रान, शब्द पेटवतात रान, शब्द जीवनगाण कधी, शब्द वरवरचा उमाळा कधी. ही दीर्घ कविता या काव्यसंग्रहाची सर्वांगसुंदर कविता ठरावी. 'लोकशाहीचं गाणं’ 'गुलामीचं हस्तांतर' 'हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतोय' या आणि अशा अनेक कविता व्यवस्थेबरोबर स्वार्थी राजकारणावर भाष्य करतांना दिसतात. तसेच ढोंगी परिवर्तनवाद्यावरही ते आसुड ओढतात. परिवर्तनाच्या नावाखाली परिवर्तनवादी शोषण करीत आहेत. दांभिक लोक, लोकशाहीच्या नावाखाली लोकांची लूट करत आहेत. त्यावरही कवी प्रहार करतो. कवी म्हटला की, आईवर कविता ही आलीच पाहिजे. 'माय माऊली' 'मायमही' 'सकळांची आई' अशा कविताही वाचनीय आहेत. एकूण काय तर वर्तमानाचं भाष्य कवितेत आहे. स्वातंत्र्य आणि त्याच्या सुखाच्या कल्पनांना तडा गेल्यानंतरची वेदना कवितेत आहे तसा विद्रोहही आहे. सामान्य माणसाच्या सुखाचा शोध कवीला घ्यायचा आहे. भावना भडकविणारी वृत्तपत्र, स्त्री देहाचे नागडे दर्शन घडविणारे प्रसारमाध्यमं भारताची प्रतिमा होत आहेत. सामान्य माणसाच्या स्वप्नभंगाची भावना कवितेतून वाचायला मिळते. असे असले तरी काही दोष ज्याकडे लक्ष वेधले पाहिजे असे वाट्ते की, धनदांडगे शेतकरी सोयी-सवलती घेतात त्यावर भाष्य दिसत नाही. मोजक्याच शेतक-यांचं चित्र, तेच-तेच दयनीय अवस्थेतील शेतक-याचं वर्णन असा विचार कविता वाचतांना डोकावतो. तसेच परिवर्तनाची आस आक्रस्ताळपणे येते, असे काही कविता वाचतांना जाणवते. अशी कविता म्हणून मी ’हा देश टाळ्या वाजविणायांचा निपजतो’ ’आव्हान’ ’परिवर्तनवादी’ अशा काही कवितांचा नामोल्लेख करेन. बहुतांश कविता मुक्तछंद आणि अभंगाच्या आकृतीबंध असलेल्या आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची कवीतेवर भाष्य करणारी प्रस्तावना आहे. कवितेचा संदेश 'माणूसकी' आणि संघर्ष’ आहे. आणि याच भावना अधिक संवेदनशीलतेने, पुढील काव्यसंग्रहात अधिक जबाबदारीने याव्यात या करिता मी कवी मित्राला शुभेच्छा देईन.

अंतस्थ
'अंत:स्थ'
डॉ.सर्जेराव जिगे
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
किंमत ८०/- रु.

कविताविचारआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

5 Jan 2010 - 8:29 pm | अमृतांजन

अवश्य वाचेन. परिचय करुन दिल्याबद्द्ल आभारी.

सहज's picture

5 Jan 2010 - 8:44 pm | सहज

कर्णालाही लाजवेल असे आमुचं औदार्य

खल्लास!

बाकी अश्या कविता त्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत असतील का हो? आजच मी शेतीचा धंदा मस्त असे काहीतरी ऐकत होतो काही लोकांकडून.

सुंदर ओळख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2010 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी अश्या कविता त्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत असतील का हो?
संघर्ष आणि कष्टमय जीवन जे जगतात त्यांना अशा कवितांचे काय आश्चर्य वाटणार ?

शाळेत जाण्यासाठी पाचेक आणि येण्यासाठी तितकेच किमी अंतर कापणा-या आणि डांबरी रोडचे पायाला चटके बसू नये म्हणून तळपायाला पळसाची पाने बांधून धावत चालणार्‍या पोरा-पोरींची कथा वाचून खूप आश्चर्य वाटायचे, पण प्रत्यक्ष आम्ही ते जगलोय त्यात काय विशेष, असे म्हणनारे मला माहित आहे.

अवांतर
आजच मी शेतीचा धंदा मस्त असे काहीतरी ऐकत होतो काही लोकांकडून.
:) प्रतिसाद हलकेच घ्याल म्हणून लिहितो, आमच्याकडे काही प्राध्यापक मित्र गमतीने म्हणतात. एखाद्याला मानसिक त्रास द्यायचा असेल तर त्याला तीन गोष्टींचा सल्ला दिला पाहिजे. १) वापरलेल्या गाड्या घ्यायचा २) शेती करण्याचा [बटाईने] ३) आणि प्राचार्य होण्याचा.

वापरलेल्या गाडीचे सतत काही ना काही काम निघत असते, माणूस वैतागुन जातो. शेती बटाईने करावी की स्वत:करावी, पीक कोणते घ्यावे वगैरे,शेतीतील नफा दिसतो, मानसिक त्रास दिसत नाही. आणि प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, प्रशासकीय कामे, संस्थाचालक....यात प्राचार्य नावाचा माणूस पार वेडा होऊन जातो. :)

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

5 Jan 2010 - 8:56 pm | चित्रा

वाचनीय संग्रह दिसतो आहे. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

5 Jan 2010 - 9:12 pm | स्वाती दिनेश

चित्रासारखेच म्हणते,
धन्यवाद ओळख करुन दिल्याबद्दल..
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jan 2010 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत.

बिपिन कार्यकर्ते

टोळभैरव's picture

5 Jan 2010 - 10:38 pm | टोळभैरव

सहमत.

मी टोळ. :)
(मला खरडण्याचा अधिकार नाही त्यासाठी काय करावे लागते ? )

कवितासंग्रह निश्चित वाचनीय दिसतोय.

चतुरंग

प्राजु's picture

8 Jan 2010 - 9:08 am | प्राजु

ओळख आवडली.
कविता संग्रह नक्कीच वचनीय असणार.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

संजय अभ्यंकर's picture

5 Jan 2010 - 9:00 pm | संजय अभ्यंकर

डॉ. साहेब, उत्तम पुस्तक परीचय!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
बळीराजा की बळी(गेलेला)राजा ?

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमृतांजन's picture

5 Jan 2010 - 9:39 pm | अमृतांजन

चित्रमय प्रतिसादांमुळे तुम्ही प्रतिसाद ह्या विषयाला एका नव्या उंचीवर नेले आहे.

विकास's picture

5 Jan 2010 - 9:14 pm | विकास

एकदम वाचनीय काव्यसंग्रह दिसतोय. चांगल्या पुस्तकाच्या ओळखीनिमित्त धन्यवाद. पुढ्चया खेपेत नक्कीच घेईन. :-)

सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..

यावरून "मुहं मे राम बगल मे सुरी (छुरी?) " तसेच "ज्या गांधीटोपीने स्वातंत्र्यासाठी आवाज उठवायला शिकवले त्याच गांधी टोपीने आज (तोंडात कोंबून) आवाज बंद केला" या अर्थाचे पुरूष नाटकातील वाक्य आठवले...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनिल पाटकर's picture

5 Jan 2010 - 9:35 pm | सुनिल पाटकर

सभेमधून बोलतात
गांधीजींचे अनुयायी
खिशात रिव्हॉल्व्हर लपवून..
एकदम सही
चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

प्रमोद देव's picture

5 Jan 2010 - 10:29 pm | प्रमोद देव

पुस्तक वाचावंसं वाटतंय....हेच आपल्या लेखनाचे यश आहे.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jan 2010 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचय आवडला असे प्रतिसादात लिहिणारे, अमृतांजन, सहज, चित्रा, स्वातीदिनेश, बिका,टोळभैरव,चतुरंग,संजय अभ्यंकर,जयपाल (चित्र भारी रे), विकास,सुनील पाटकर, देव साहेब आणि वाचक मित्र हो, आपले प्रतिसाद आणि प्रोत्साहान अधिक चांगले लिहिण्यासाठी बळ देतात. आपले मन:पुर्वक आभार........!!!

-दिलीप बिरुटे

टुकुल's picture

7 Jan 2010 - 5:49 am | टुकुल

सुंदर परिचय, एकदम पुस्तकाच्या प्रस्तावनेसारखा !!
अजुन काही वाचत असाल तर येवु द्या अजुन परिचय

--टुकुल