आय.आय.एम. अहमदाबादमधून

क्लिंटन's picture
क्लिंटन in जनातलं, मनातलं
15 Nov 2009 - 9:44 am

नमस्कार मंडळी,

गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे.

भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रद्न्य विक्रम साराभाई आणि उद्योजक लालजीभाई नानभाई यांनी पुढाकार घेऊन गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये तसेच आय.आय.एम सुरू करावे यासाठी पंडित नेहरू आणि गुजरात राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आणि १९६१ मध्ये संस्थेची स्थापना झाली.त्यासाठी सुध्दा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले.पहिले वर्षभर संस्थेचा कारभार फारच थोडका होता.संस्थेकडे स्वत:च्या इमारती,ग्रंथालय,कर्मचारी वगैरे काहीही नव्हते.तेव्हा साराभाईंच्या बंगल्यातच संस्थेचा कारभार चालू झाला.गुजरात सरकारने अहमदाबाद शहरातील वस्त्रापूर येथे गुजरात विद्यापीठाजवळ संस्थेसाठी जागा दिली. फ्रेंच वास्तुतद्न्य लुई कॅन यांनी संस्थेच्या इमारतींचे डिझाईन केले.इमारतींसाठी लाल रंगाच्या वालुकाश्म दगडाचा वापर केला गेला.यथावकाश संस्थेचे काम नव्या ठिकाणाहून सुरू झाले. नंतरच्या काळात बंगलोर (१९७९) आणि लखनौ येथे नवीन आय.आय.एम ची स्थापना करण्यात आली. तसेच १९९६ मध्ये इंदौर आणि कोझिकोडे येथे आणि २००८ मध्ये शिलाँग येथे आणखी तीन आय.आय.एम चालू झाली.तसेच २०१० पासून जयपूर आणि इतर काही ठिकाणी नव्या आय.आय.एमची स्थापना करायचा सरकारचा मानस आहे.


आय.आय.एम अहमदाबादचे प्रवेशद्वार


संस्थेच्या आवारातील सर्वात सुप्रसिध्द असे ’लुई कॅन प्लाझा’ हे ठिकाण

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत चार (अहमदाबाद,कलकत्ता,बंगलोर आणि लखनौ) या प्रत्येक आय.आय.एम साठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होती.पण त्यानंतर या चार संस्थांची मिळून एकच (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट-- कॅट) सुरू करण्यात आली.प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा कॅट ही परीक्षा असते.या परीक्षेत पूर्वी गणित, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि रिडिंग कॉम्र्पिहेन्शन असे चार विभाग असत. १९९५-९६ नंतरच्या काळात इंग्लिश आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन या दोन स्वतंत्र विभाग एकत्र करून परीक्षेत एकूण ३ विभाग ठेवण्यात आले. प्रत्येक प्रश्न बहुपर्यायी असतो आणि एकच बरोबर उत्तर असते.तसेच चुकीच्या उत्तरासाठी ऋण मूल्यांकन असते. प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यासाठी निवड होण्यासाठी परीक्षेच्या तीनही विभागांमध्ये आणि एकूण कमीतकमी मार्क मिळवणे गरजेचे असते.म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे गणित चांगले असेल तरीही प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यासाठी निवड होण्यासाठी इतर दोन विभागातही कमीतकमी गरजेचे असलेले मार्क मिळवणे गरजेचे असते. सर्व आय.आय.एम कॅट परीक्षा जरी एकत्र घेत असल्या तरी त्यापुढील प्रक्रिया प्रत्येक संस्थेची स्वतंत्र असते.२००७ च्या कॅट पर्यंत अहमदाबादच्या आय.आय.एम च्या प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी निवड होण्यासाठी परीक्षेच्या प्रत्येक विभागात कमीतकमी ९५.३ पर्सेंटाईल (परीक्षा देत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ४.७% मध्ये) आणि तीनही विभाग मिळून एकूण मार्कांमध्ये ९९.२ पर्सेंटाईल (पहिल्या ०.८% मध्ये) असणे गरजेचे होते. २००७ मध्ये एकूण २ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याची पुढील टप्प्यासाठी निवड होण्यासाठी तो विद्यार्थी परीक्षेच्या तीनही विभागांमध्ये स्वतंत्रपणे पहिल्या ९४०० विद्यार्थ्यांपैकी आणि एकूण मार्कांमध्ये पहिल्या १६०० विद्यार्थ्यांपैकी असणे गरजेचे होते.२००८ च्या परीक्षेत अहमदाबादच्या संस्थेने पुढच्या टप्प्यासाठी निवड करण्यासाठी १० वी आणि १२वी च्या मार्कांनाही महत्व दिले.त्याप्रमाणेच इतर संस्थांचे प्रवेशप्रक्रियेच्या पुढील टप्प्याला निवड करण्यासाठी स्वत:चे नियम (कॅटबरोबरच १०-१२वी, पदवी परीक्षेचे मार्क वगैरे) असतात. परीक्षा देण्यासाठी कमीतकमी पदवीधारक असणे आणि शेवटच्या वर्षाला कमीतकमी ५०% मार्क मिळवणे गरजेचे असते.शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण परीक्षेला बसू शकतात.

प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात २००६ सालापर्यंत ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत यांचा वापर करण्यात येत असे.पण ग्रुप डिस्कशनमध्ये मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा होतो आणि त्याचा निवडप्रक्रियेसाठी फारसा उपयोग होत नाही असे अहमदाबादच्या संस्थेतील प्राध्यापकांच्या लक्षात आले.म्हणून त्यांनी २००७ पासून पुढच्या टप्प्यासाठी निबंध लेखन आणि वैयक्तिक मुलाखत असे स्वरूप वापरायला सुरवात केली.इतर आय.आय.एम मध्ये अजूनही ग्रुप डिस्कशन वापरले जाते.

यावर्षी अहमदाबाद मध्ये ३१५ आणि कलकत्त्याला ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.सर्व आय.आय.एम मिळून सुमारे १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला.पुढील ३ वर्षे राखीव कोट्यातील अर्जुन सिंह फॉर्म्युला वापरण्यासाठी सर्व आय.आय.एम मध्ये दरवर्षी २०-२५ जागा वाढविण्यात येणार आहेत.

अभ्यासक्रम दोन वर्षांचा असे समजले जात असले तरी तो प्रत्यक्षात २० महिन्यांचाच असतो. माझा अभ्यासक्रम जून २००९ मध्ये सुरू झाला आणि फेब्रुवारी २०११ मध्ये संपेल.प्रत्येक वर्षात तीन टर्म असतात आणि प्रत्येक टर्म दोन ’स्लॉट’ मध्ये विभागलेली असते.म्हणजे प्रत्येक वर्षात एकूण ६ स्लॉट असतात.पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समान असतो.त्यात अर्थशास्त्र, फायनान्स, अकाऊंटिंग,मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स आणि ऑपरेशन्स या महत्वाच्या विषयांची तोंडओळख करून देण्यात येते.पुढच्या वर्षी विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे स्वत:चे विषय निवडतात. एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा विषय (समजा फायनान्स) खूप आवडला तर पुढच्या वर्षी सर्व विषय फायनान्सशी संबंधित घेता येतात.नाहीतर दोन किंवा तीन विषयांचे (उदाहरणार्थ फायनान्सचे काही आणि मार्केटिंगचे काही) असे काही विषय काही अटी पूर्ण करून विषय घेता येतात.

आमच्या पीजीपी (एम.बी.ए ला समकक्ष) अभ्यासक्रमाचे ३१५, पीजीपी-एबीएम (ऍग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेन्ट) चे ३५ आणि प्रथम वर्ष फेलो प्रोग्रॅम मॅनेजमेन्ट चे २० असे मिळून ३७० विद्यार्थी पहिल्या वर्षात एकच अभ्यासक्रम शिकतात. अर्थातच ३७० विद्यार्थी एका वर्गात एकत्र शिकणे शक्य नसते.त्यामुळे हे विद्यार्थी ए,बी,सी आणि डी या चार सेक्शनमध्ये असतात.प्रत्येक सेक्शनमध्ये ९२ किंवा ९३ विद्यार्थी असतात.

आय.आय.एम अहमदाबादमध्ये समूह शिक्षणाला खूप महत्व असते.अभ्यासासाठी प्रत्यक्ष बिझनेसमध्ये आलेल्या केसेस केस स्टडी म्हणून असतात.त्या केसचा सर्व अंगांनी विचार करून विद्यार्थ्यांनी वर्गात जाणे अपेक्षित असते.कोणत्या दिवशी कोणती केस वर्गात घेणार याचे टाईमटेबल आधीच देण्यात येते.या केसेस बहुतांश वेळा हार्वर्ड किंवा त्या दर्जाच्या विद्यापीठात वापरण्यात येत असलेल्या असतात.प्राध्यापक वर्गात केस ’डिस्कस’ करतात आणि विद्यार्थ्यांनी पण त्यांची मते मांडणे गरजेचे असते.प्रत्येक विध्यार्थी वर्गात किती प्रमाणात आणि कोणत्या दर्जाचा सहभाग घेतो याला मार्क असतात.प्रत्येक विद्यार्थी काय बोलत आहे आणि ते वर्गाच्या सामुहिक शिक्षणासाठी किती महत्वाचे आहे याची नोंद प्राध्यापकांचे मदतनीस (टिचिंग असिस्टंट) ठेवत असतात.वर्गातील ९२-९३ विद्यार्थ्यांपैकी सर्वांची ओळख मदतनीसांना असणे शक्य नसते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्गात बसायच्या जागा ठरलेल्या असतात आणि कोणत्या जागेवर कोण बसले आहे याची यादी आणि प्रत्येक विद्यार्थ्याची छायाचित्रे मदतनीसांकडे असतात. त्यावरून मदतनीस वर्गातील सहभागाबद्दल मार्क देतात. मी आय.आय.एम चे फोटो काढले तेव्हा वर्ग बंद होत तेव्हा वर्गाचे फोटो आतून काढता आले नाहीत.फोटो काढता आले असते तर ते अधिक चांगले झाले असते.

आय.आय.एम अहमदाबादमधील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेन्ट हा निवासी अभ्यासक्रम आहे.सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वसतीगृहामध्येच राहणे सक्तीचे असते.एखादा विद्यार्थी मूळचा अगदी अहमदाबादमधील असला तरी त्याला वसतीगृहावर राहणे सक्तीचे असते. वसतीगृहाच्या अशा २४ इमारती संस्थेच्या आवारात आहेत. २००३-०४ मध्ये संस्थेचा पसारा वाढला आणि विद्यार्थीसंख्या वाढली म्हणून संस्थेचा ’नवा कॅम्पस’ बांधण्यात आला. २४ पैकी १८ इमारती जुन्या कॅम्पसमध्ये तर उरलेल्या ६ नव्या कॅम्पसमध्ये आहेत.जुन्या कॅम्पसमध्ये सर्वत्र लाल रंगाचे साम्राज्य आहे तर नव्या कॅम्पसमध्ये नव्या पध्दतीची इमारत बांधणी आहे. वसतीगृहाच्या एका इमारतीत साधारणपणे २० ते ४० खोल्या असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र खोली असते.’रूम मेट’ ही भानगड आय.आय.एम मध्ये नाही.प्रत्येक वसतीगृहात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असते तसेच सौर पॅनेलद्वारे गरम पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. प्रत्येक खोलीमध्ये फोनचे कनेक्शनही असते.त्यासाठी संस्थेने टाटा इंडिकॉमबरोबर करार केला आहे.कॅम्पसमध्ये सर्वत्र फोन विनाशुल्क उपलब्ध असतात. लाल रंगाच्या इमारती बाहेरून चांगल्या दिसत असल्या तरी राहण्यासाठी त्या तितक्याशा सोयीस्कर नाहीत.


जुन्या कॅम्पसमधील वसतीगृहाच्या लाल रंगाच्या इमारती

सर्व विद्यार्थ्यांच्या जेवायची सोय मेसमध्ये केली आहे.दिवसातून चार वेळा-- सकाळी नाश्ता,दुपारी आणि रात्री जेवण आणि संध्याकाळी चहा-कॉफी आणि स्नॅक्स असा बेत असतो. तसेच संस्थेचे कॅन्टिनपण आहे.ते सकाळी ८ ते रात्री ४ असे २० तास चालू असते. फोनवरून ऑर्डर दिल्यास विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये खाद्यपदार्थ आणून दिले जातात.


कॅन्टिन

आय.आय.एम अहमदाबादमधील कोर्स हा अत्यंत आव्हानात्मक असतो.प्रत्येक क्लासची तयारी आधी करून जाणे अपेक्षित असल्यामुळे वेळेची मॅनेजमेन्ट हा मोठा जिकरीचा भाग असतो.आय.आय.एम मध्ये गेल्यापासून रात्री २ च्या आत झोपल्याचे मला आठवतच नाही. इथे विद्यार्थी म्हणून आल्यानंतर सगळेजण आपोआपच निशाचर बनतात. नुसता अभ्यासक्रम बघितला तर आय.आय.एम अहमदाबादमध्ये खूपकाही वेगळे शिकवतात असे नाही.इतर कोणत्याही बी-स्कूल मध्ये जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम इथेही असतो.मग आय.आय.एम चेच नाव जास्त का? त्याचे कारण म्हणजे इथे येण्यासाठी असली जबरदस्त स्पर्धा आणि त्यामुळे इथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कॅलिबर उच्च दर्जाचे असते.२००९-११ च्या बॅचसाठी दर १०,००० अर्जांमधील १४ विद्यार्थ्यांची निवड संस्थेने केली आणि उरलेल्या ९९८६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.साहजिकच हे १४ विद्यार्थी उच्च दर्जाचे असतात हे सांगायलाच नको.आमच्या बॅचमधील ३१५ पैकी कमितकमी १५० विद्यार्थी मूळचे आय.आय.टी मधील आहेत.एक विद्यार्थी आय.आय.टी साठीच्या जे.ई.ई या प्रवेशपरीक्षेत भारतात १२ व्या क्रमांकावर होता आणि आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.दुसरा विद्यार्थी जे.ई.ई मध्ये १० व्या क्रमांकावर होता आणि आय.आय.टी दिल्ली मध्ये चारही वर्षे टॉपर होता.त्यानंतर लेहमन ब्रदर्समध्ये आणि लेहमन कोसळल्यानंतर नोमूरामध्ये तो नोकरीस होता.फायनान्समधील नावाजलेल्या ’सी.एफ.ए’ या परीक्षेच्या तीनही लेव्हल त्याने आय.आय.एम मध्ये यायच्या आधीच पूर्ण केल्या आहेत. अशा कॅलिबरच्या विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळते.आय.आय.एम मध्ये जाण्यापूर्वी माझे ’प्रोफाईल’ खूप चांगले आहे असा माझा (गैर)समज होता तो अशा विद्यार्थ्यांना बघून दूर झाला इतकेच नव्हे तर माझे ’प्रोफाईल’ अशा विद्यार्थ्यांपुढे साध्या शब्दात सांगायचे झाले तर ’कचरा’ आहे हे माझ्या लक्षात आले. अर्थात त्यामुळे अजूनही खूपकाही करण्यासारखे आहे हे लक्षात येऊन अधिकाधिक कष्ट घ्यायची प्रेरणा पण मिळते.

आय.आय.एम मध्ये प्राध्यापक प्रत्येक विषयाचे ’गॉड’ असतात.प्रत्येक विषयासाठी मार्क कसे द्यायचे हे प्राध्यापकांच्याच हातात असते. प्रत्येक प्राध्यापकाला ते ठरवायचे स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ ३०% वेटेज मध्यावधी परीक्षेला, ३५% वेटेज अंतिम परीक्षेला, १५% वेटेज क्लास पार्टिसिपेशनला आणि २०% वेटेज प्रोजेक्टला अशा प्रकारे प्राध्यापक ठरवू शकतात.आणि सर्व निकषांवर विद्यार्थ्यांचे सातत्य बघून अंतिम ग्रेड दिली जाते. कधीकधी ’क्विझ’ हा पण एक निकष असतो.क्विझ म्हणजे छोटेखानी परीक्षाच.बहुतांश वेळी ही परीक्षा अर्ध्या तासाहून जास्त काळ चालत नाही. ही परीक्षा ’सरप्राईज’ परीक्षा असते. आमची सकाळी ८.४५ ते दुपारी १.१० या काळात तीन लेक्चर्स असतात. त्यानंतर सर्व विद्यार्थी जेवायला मेसमध्ये जातात.मेसबाहेर एक ’क्विझ नोटिस बोर्ड’ आहे. त्यावर दुपारी १.३० पर्यंत नोटिस लावून दुपारी २.३० वाजता कोणत्या विषयाचे क्विझ आहे हे सांगितले जाते.जर १.३० पर्यंत नोटिस लागली नाही तर आज क्विझ नाही असे समजून विद्यार्थी आपल्या खोलीत जाऊन पाहिजे ते करायला (बहुतांश वेळी झोपायला) मोकळा असतो.


क्विझ नोटिस बोर्ड

आय.आय.एम मध्ये वेळ आणि डेडलाईन अत्यंत कसोशीने पाळल्या जातात.सकाळी ८.४५ ला लेक्चर सुरू होणार म्हणजे सकाळी ८.४४.५९ पर्यंत वर्गात पोहोचणे अपेक्षित असते.सर्व लेक्चर्सना उपस्थित असणे अत्यंत गरजेचे असते आणि काही कारणाने अनुपस्थित राहायचे असेल तर प्राध्यापकांची परवानगी घ्यावी लागते.अनेकदा प्रोजेक्ट किंवा इतर असाईनमेन्ट ई-मेलवर किंवा आंतरजालावर अपलोड करायच्या असतात.अपलोड करायची ’डेडलाईन’ बहुतेक वेळा रात्री ११.५९.५९ किंवा मध्यरात्रीनंतर १.५९.५९ अशी असते. एक सेकंदाचा उशीरही चालत नाही कारण ते सॉफ्टवेअर ठरलेल्या डेडलाईननंतर एक सेकंदही उशीरा असाईनमेन्ट स्विकारत नाही. असा उशीर झाल्यास त्या असाईनमेन्टचे मार्क गमावावे लागतात.

असो.आय.आय.एम मधील विद्यार्थीजीवनाची मराठीत ओळख करून देणारे फारसे लेख उपलब्ध नाहीत म्हणून हा लेखप्रपंच. मधल्या काळात आम्हाला १० दिवसांची सुटी होती त्या काळात हा लेख लिहून पूर्ण केला आहे. कॉलेज चालू असताना इतका वेळ लेखासाठी देता येणे केवळ अशक्यच.

मी माझ्या सदस्यपानावर माझा ई-मेल पत्ता लिहित आहे.जर कोणाही मिपाकराला किंवा परिचयातील कोणाही विद्यार्थ्याला आय.आय.एम अहमदाबादकडून प्रवेशप्रक्रियेसाठी मुलाखतीचे निमंत्रण आले असेल तर माझ्याशी ई-मेलवर जरूर संपर्क साधावा. माझाकडून होईल तितकी मदत मी नक्कीच करेन. तसेच सोमवार १६ नोव्हेंबर पासून पूर्णवेळ कॉलेज सुरू झाल्यावर मिपावर इतके मोठे प्रतिसाद द्यायला मला वेळ मिळेल असे नाही त्यामुळे उत्तर लिहायला २-३ दिवसांचा अवधी जाऊ शकेल.तेव्हा सहकार्य करावे ही विनंती.

तसेच या लेखातील फोटो लहान दिसत आहेत. बरेच प्रयत्न करूनही ते मोठे करता आले नाहीत. त्याबद्दलही सहकार्य करावे ही विनंती.

*********************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान, अहमदाबाद
गुजरात- ३८००१५
*********************************************

समाजजीवनमानप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

टारझन's picture

15 Nov 2009 - 10:26 am | टारझन

ईंजिनियरींग झाल्यावर "आय.आय.एम." ला नंबर लागणे हे माझे स्वप्न होते :)

लेख जबरा आहे क्लिंटन साहेब !! ज्या गोष्टींच कुतुहल होतं त्यांच निरसन झाल :)
धन्यवात

- तिन्टन

वेताळ's picture

15 Nov 2009 - 10:29 am | वेताळ

आय आय एम बद्दल इतकी माहिती पुर्वी कधी मिळाली नाही.खुप काही नवीन माहिती व भारतात देखिल अतिउच्च दर्जाच्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत हि माहिती मिळाली.अजुन कधी परत वेळ मिळाला तर ज्यादा माहिती देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती.
वेताळ

ज्ञानेश...'s picture

15 Nov 2009 - 10:29 am | ज्ञानेश...

गरजूंना मदत व्हावी.

"Great Power Comes With Great Responsibilities"

वेताळ's picture

15 Nov 2009 - 10:31 am | वेताळ

आय.आय.एम मध्ये जाण्यापूर्वी माझे ’प्रोफाईल’ खूप चांगले आहे असा माझा (गैर)समज होता तो अशा विद्यार्थ्यांना बघून दूर झाला इतकेच नव्हे तर माझे ’प्रोफाईल’ अशा विद्यार्थ्यांपुढे साध्या शब्दात सांगायचे झाले तर ’कचरा’ आहे हे माझ्या लक्षात आले


मग आता आमच्या प्रोफाईल बद्दल न बोलनच उत्तम =))
वेताळ

चिरोटा's picture

15 Nov 2009 - 10:32 am | चिरोटा

चांगली माहिती.लेख नेहमीप्रमाणे मुद्देसूद.

आय.आय.एम मध्ये प्राध्यापक प्रत्येक विषयाचे ’गॉड’ असतात

राष्ट्रीय पातळीवर की आंतरराष्ट्रीय पातळीवर?आंतरराष्ट्रीय दर्जाची जी मॅनेजमेंटची नियतकालिके आहेत त्यात आय्.आय्.एम्.च्या प्राध्यापकांचे योगदान असते का? प्रा.अनिल गुप्ता,प्रा.गौतम दत्ता अशा काही प्राध्यापकांच्या विशेष कार्याची माहिती आहेच.
भेंडी
P = NP

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Nov 2009 - 10:38 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लिंटन, माहितीपूर्ण लेख आवडला. आय.आय.एम.चं कँपसही आवडलं.

माझंही 'प्रोफाईल' चांगलं असल्याचा गैरसमज एकदा पीएच.डी. करायला लागल्यावर गळून पडला! मोठ्या तरीही साध्या लोकांमधे रहाण्याचा सगळ्यात मोठ्ठा फायदा, पाय जमिनीवरच रहातात.

फोटो मोठा टाकण्याचा एक प्रयत्नः

सफल झालेला दिसत आहे म्हणून इन्स्ट्रक्शन्सः
पिकासावर फोटो चढवला की जो फोटो चढवायचा आहे तो उघड. त्यावर राईट क्लिक करून 'व्ह्यू इमेज'वर लेफ्ट क्लिक कर. संपूर्ण पानावर फक्त फोटोच दिसेल. ती लिंक इथे मिपाच्या बटनाच्या सहाय्याने चढव.

अदिती

मिसळभोक्ता's picture

15 Nov 2009 - 10:45 am | मिसळभोक्ता

आयायेम अहमदाबादच्या अनेक आठवणींमधली एक आठवणः

२२ वर्षांपूर्वी उन्हाळ्यात तिथल्या एका होस्टेलात रहात होतो. स्पेस आप्लिकेशन सेंटरमध्ये पाट्या टाकत होतो, आणि आयायेम मेस मध्ये खात होतो. माझ्या बरोबर "प्रशांत कृष्ण गुप्ता" नावाचा एक माणूस होता. दररोज मेस मध्ये गेल्यावर, त्या मेसचा म्यानेजर तुम्हाला नाव विचारायचा, आणि हातातल्या कागदावर नावापुढे टिक मार्क करायचा.

भारतातल्या प्रथेप्रमाणे, आडनाव आधी, मग प्रथम नाम, आणि मग बापाचे नाव, असे तुमचे आफिशियल नाव होते.

दर वेळी हा सांगायचा : "प्रशांत कृष्ण गुप्ता". आणि दर वेळी तो गुज्जु म्यानेजर कन्फ्यूज व्हायचा.

मग हा सांगायचा, "गुप्ता, पीके". तो गुज्जु म्यानेजर टिक मार्क करायचा, आणि दर वेळी एकच विनोद करायचा "बिना पीके नही आ सकते क्या?"

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

15 Nov 2009 - 11:14 am | विकास

लेख आवडलाच पण (असली माहीती मराठीत कमी हे डोक्यात ठेवून) जाणिवेने लिहील्याबद्दल धन्यवाद आणि उर्वरीत शिक्षणासाठी शुभेच्छा!

नंदन's picture

15 Nov 2009 - 1:24 pm | नंदन

सहमत आहे, लेख आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

28 Nov 2009 - 7:17 pm | धनंजय

अनुभवलेखन आणि माहिती आवडली.

चित्रा's picture

15 Nov 2009 - 11:40 am | चित्रा

ही माहिती ओळखीतल्या कॉलेजमधल्या पोरांना पाठवते.

मदनबाण's picture

15 Nov 2009 - 1:35 pm | मदनबाण

छान माहिती.

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

स्वाती२'s picture

15 Nov 2009 - 6:09 pm | स्वाती२

लेख आवडला.

क्लिंटन's picture

15 Nov 2009 - 6:40 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम माझा लेख आवडला आणि ते आवर्जून नमूद केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.मिपाकरांकडून मिळालेले प्रोत्साहनात्मक प्रतिसाद हुरूप वाढवणारे असतात.

आय.आय.एम मध्ये प्रवेश मिळण्यासाठी परिश्रमाबरोबरच नशीबाचीही साथ असावी लागते.कॅटच्या परिक्षेत गडबडीत एखादे उत्तर चुकले तरी ते चुकलेले उत्तर आय.आय.एम. मधील प्रवेश मिळणे आणि न मिळणे यातील फरक असू शकते. अनेकदा आय.आय.एम मध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी प्रवेश मिळालेल्या अनेकांपेक्षा अधिक योग्यतेचे असतात.इथे नशीबाचा भाग असतो.काहीही असले तरी गेल्या ५० वर्षांत या संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांची संख्या १० हजारांपेक्षा कमीच आहे.त्यामुळे या संस्थेविषयी पाहिजे ती माहिती सर्वांना मिळत नाही आणि ही संस्था नक्की आहे कशी आणि तिथले विद्यार्थी नक्की काय करतात याविषयी अनेकांना कुतूहल असते.एका लेखातून इथल्या सर्व गोष्टींवर लिहिता येणे शक्य नाही तरी या लेखामुळे मिपाकरांना उपयुक्त माहिती मिळाली याचे समाधान आहे.

अशा संस्थांमध्ये शिकायला मिळायचा एक चांगला परिणाम म्हणजे आपले पाय जमिनीवरच राहतात.कारण आपल्यापेक्षा अधिक योग्यतेचे आणि चांगल्या प्रोफाईलचे अनेक विद्यार्थी अशा संस्थेत असतात.तेव्हा बाहेर आपली कॉलर कितीही ताठ केली तरी ’समर इंटर्नशीप’ साठी गोल्डमन सॅक्स, मॅकिन्झी सारख्या नावाजलेल्या कंपन्या मुलाखतीला बोलवतही नाहीत तेव्हा आपल्या ’ताठ कॉलर’ ला फारसा अर्थ नाही हे लगेचच लक्षात येते.

आता वळू या भेंडी बाजार यांच्या प्रश्नाकडे.आय.आय.एम चे प्राध्यापक राष्ट्रीय पातळीवर तर नक्कीच ’डॉन’ आहेत. प्रा.समर दत्ता हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक भारताने जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यू.टी.ओ) सरकारने काय भूमिका घ्यावी यासाठी सरकारने नेमलेल्या समितीवर आहेत.कमल नाथ आणि आता आनंद शर्मा यांच्याकडून त्यांना सल्लामसलतीसाठी निमंत्रण असते. अर्थशास्त्राचे दुसरे प्राध्यापक रविंद्र ढोलकिया भारत सरकारच्या वेतन आयोगावर होते. अकाऊंटिंग आणि फायनान्सचे प्राध्यापक (राजेन्द्र पटेल, अजय पांडे) अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार आहेत. शिकागो येथील केलॉग स्कूल ऑफ बिझनेस मधील मार्केटिंगचे अग्रगण्य प्राध्यापक फिलीप कोटलर यांच्याबरोबर आय.आय.एम अहमदाबादमधील मार्केटिंगचे प्राध्यापक ऍब्रॅहॅम कोशी यांनी कोटलर यांच्या मार्केटिंग मॅनेजमेन्ट या मार्केटिंगमधील बायबलची दक्षिण आशियासाठी विशेष आवृत्ती लिहिली आहे. आता या सर्व प्राध्यापकांनी नियतकालिकांमध्ये किती लेखन केले आहे याची कल्पना नाही.खरे सांगायचे तर पहिल्या वर्षी ठरलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त फारसे काही वाचायला वेळ होतच नाही.

असो. अदितीने सांगितल्याप्रमाणे फोटो मोठे करता येतात का ते बघतो. तसेच मिसळभोक्ता यांनी आमच्या मेसमधील खाण्याचा आस्वाद पूर्वीच घेतला आहे हे वाचून आनंद वाटला. बाकी टारझन, वेताळ, ज्ञानेश,विकास, चित्रा,नंदन,स्वाती आणि मदनबाण यांच्यासारख्या ज्येष्ठ मिपाकरांच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------

निमीत्त मात्र's picture

17 Nov 2009 - 12:14 am | निमीत्त मात्र

आयआयएमचे एक गारुड सर्वांवरच असते. तुम्ही आत जाऊन माहिती देत आहात ते चांगलेच आहे. असाच अनुभव शेअर करत राहा.

समर इंटर्नशीप’ साठी गोल्डमन सॅक्स, मॅकिन्झी सारख्या नावाजलेल्या कंपन्या मुलाखतीला बोलवतही नाहीत

ह्याचे काहीही दु:ख वाटून घेऊ नका. ह्या नावाजलेल्या कंपन्या म्हणजे देवळात जाऊन घाण करणारे नावाजलेले गुरव आहेत. हेन्री पॉल्सन सारख्या राजकारण्यांना विकत घेऊन गोल्डमन सॅक्सने सामान्य लोकांच्या पैशावर मारलेला डल्ला विसरू नका.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2009 - 6:59 pm | बिपिन कार्यकर्ते

...आणि छान मांडली आहे.

(छायाचित्रे नीट केली आहेत.)

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

15 Nov 2009 - 7:01 pm | सुनील

लेख आवडला. छायाचित्रेही उत्तम.

पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

15 Nov 2009 - 7:36 pm | ऋषिकेश

तुमचे मिपावर पुन्हा लेखन वाचून आनंद झाला. आता तिथे सेटल झालेले दिसता.. तेव्हा आता याविषयावर आणि तुमच्या आवडत्या विषयावरही (राजकारण/निवडणूका) अभ्यासपूर्ण लेख येऊदेत

ह्या संस्थेबद्दल कुतुहल होतेच. त्यावर इतका नेटका लेख लिहिल्याबद्दल आभार

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

विमुक्त's picture

15 Nov 2009 - 8:03 pm | विमुक्त

लेख आवडला...

पण 'प्रोफाईल' वगेरे खरच महत्वाचं असतं का?... आणि कोणतही 'प्रोफाईल' कचरा वगेरे कसं असेल?...

आय.आय.एम. अहमदाबाद किंवा अजून कुठलं आय.आय.एम. महान आहेत ह्याबद्दल काहीच शंका नाही...

मला स्वताला तरी आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. ह्या मोठ्ठ्या नावां बद्दल कधीच फारंस attraction नव्हतं... आवड आणि वेड असेल तर कुठेही राहून हवं ते करता येऊ शकेल असं मला वाटतं... पण आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. मधे असाल तर आवडीचं काम करणं सोप होतं ह्यात काही शंका नाही...

अमोल खरे's picture

15 Nov 2009 - 8:42 pm | अमोल खरे

बरीच नवीन माहिती मिळाली. कठीण जीवन आहे यार तुमचं. हॅट्स ऑफ तुम्हाला. किती अभ्यास करता रे तुम्ही. ग्रेट आहात. आय आय एम इतकं कठीण आहे ही कल्पना नव्हती. नाही म्हणायला चेतन भगतच्या पुस्तकांमधुन आय आय टी आणि आय आय एम ची थोडी तोंडओळख झाली होती पण तुझी माहिती फर्स्ट हॅन्ड असल्याने खुप आवडली.

एका सुंदर लेखाबद्दल अभिनंदन आणि तुझ्या पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा.

साधामाणूस's picture

15 Nov 2009 - 9:25 pm | साधामाणूस

सर्वात प्रथम आपले हार्दिक अभिनन्दन्! आय आय एम, आय आय टी सारख्या प्रतिष्ठित सन्स्थान्मध्ये मराठी आकडा तसा कमीच दिसतो.आय ए एस सारख्या परिक्षान्ची पण बहुधा तशीच अवस्था आहे. आपण वर उल्लेखिल्याप्रमाणे अत्यन्त कठीण स्पर्धेतून तावून सुलाखून तिथपर्यन्त पोहोचलात,यात (आपण कितीही विनम्र बनून नशिबाला श्रेय दिलेत तरी) आपल्या कर्तबगारीची भरारी दिसतेच! त्यामुळेच अभिनन्दन! देशातल्या अशा श्रेष्ठ क्षेत्रात मराठी जनान्च्या कर्त् त्वाची यशोपताका अशीच फडकत राहो! आपणापासून इतर अनेक मराठी तरूणाना प्रेरणा मिळो अशी आशा!
आपल्या व्यस्त्ततेतून वेळ काढून आपण आय आय एम बद्द्ल छायाचित्रान्सहीत बहुमोल माहिती उपलब्ध केल्याबद्द्लही आभार!

अवान्तर : अनुस्वार कसा द्यावा यावर कुणी मार्गदर्शन करेल?

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Nov 2009 - 9:47 pm | बिपिन कार्यकर्ते

अवांतर = a vaa M ta r

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

15 Nov 2009 - 9:49 pm | प्रभो
वर्षा's picture

16 Nov 2009 - 11:43 pm | वर्षा

हेच म्हणते. असे लेख मराठी वृत्तपत्रातूनही छापून यायला हवेत अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला.

प्रभो's picture

15 Nov 2009 - 9:48 pm | प्रभो

छान माहिती.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

टुकुल's picture

16 Nov 2009 - 12:03 am | टुकुल

मस्त माहीती, वेळ मिळाल्यास अजुन लिहा.

--टुकुल

शाहरुख's picture

16 Nov 2009 - 8:04 am | शाहरुख

मस्त माहिती..अशा मोठ्या शैक्षणिक संस्थांची माहिती वाचायला एकदम भारी वाटते.

विद्यार्थ्याच्या वर्गातील सहभागाला वेटेज दिलेले सगळ्यात आवडले..सगळीकडेच तसे झाले पाहिजे.

- ढ शाहरुख

संदीप चित्रे's picture

16 Nov 2009 - 9:24 am | संदीप चित्रे

खूप दिवसांनी तुझा लेख पाहून आनंद झाला.
मार्कांच्या जोरावर आय. आय. एम. आतील बाजूने बघणे मला ह्या जन्मी तरी शक्य नव्हतेच ! माहितीपूर्ण लेख आणि फोटोंबद्दल धन्स !!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Nov 2009 - 1:57 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लेख आवडला .बरीच माहिती मिळाली .असेच माहितीपर लेख वाचायला आवडतील.

सुमीत भातखंडे's picture

16 Nov 2009 - 2:38 pm | सुमीत भातखंडे

IIM ची ओळख मस्तच.
धन्यवाद.

फारच छान लेख, क्लिंटन.

मी २-३ आठवड्यांचे MDP courses कलकत्ता आणि अहमदाबाद दोन्ही ठीकाणी केले आहेत. अहमदाबादची faculty खरच भारी वाटली.
आपला लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद!

मोहन

अमोल नागपूरकर's picture

16 Nov 2009 - 4:35 pm | अमोल नागपूरकर

बी ई ला असताना आपल्याला वाटते की आपल्याला सारे काही कळते.
पण एम टेक ला असताना आपल्याला वाटते की आपल्याला काहीच कळत नाही.
आणि doctorate करताना हे समजते की इथे कोणालाच काही कळत नाही. सो , चलने दो !!!!!!!!!!!!!!!

गोगोल's picture

16 Nov 2009 - 4:38 pm | गोगोल

असे लेख मिपाच्या ऑल टाईम फेवरीट लेखामध्ये ठेवायला पाहिजेत.
माननीय मालक महोदय, मिपावर आता असे बरेच क्लासिक लेख जमा झालेले आहेत. एक टॉप १०० लेखांची सूची बनवायला पाहिजे :)

चतुरंग's picture

17 Nov 2009 - 12:29 am | चतुरंग

आयायएमची आवर्जून ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. लेख अतिशय माहितीपूर्ण झालाय.
एकूण आयायएम हा चांगलाच टफ प्रकार आहे हे माहीत होतेच आता अगदी ठळकपणाने अधोरेखित झाले.
तुमच्या केसस्टडीजचे, प्रोजेक्टवर्क असेल तर त्याचे कामकाज कसे चालते? तिथले वाचनालय कसे आहे? अशी काही खास माहिती असलेले लेखनही सवडीने येऊदे.
अभ्यासासाठी शुभेच्छा!

चतुरंग

एकलव्य's picture

17 Nov 2009 - 8:55 am | एकलव्य

क्लिंटन - आय आय एम मध्ये प्रवेश घ्यायचे आमचे स्वप्न या ना त्या कारणाने स्वप्नच राहिले. आपण तेथे रमला आहात हे पाहून खूप आनंद झाला.

बिझिनेसच्या जगात आपले स्वागत आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा!

दिपक's picture

17 Nov 2009 - 9:22 am | दिपक

माहितीपुर्ण ले़ख आवडला. उर्वरीत शिक्षणासाठी शुभेच्छा.

क्लिंटन's picture

28 Nov 2009 - 6:55 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथम उत्तर द्यायला होत असलेल्या उशीराबद्दल दिलगिरी व्यक्त करूनच सुरवात करतो. आय.आय.एम मधील विद्यार्थीजीवन हे खरोखरच खूपच ’हेक्टिक’ असते आणि त्यामुळे आज लिहू उदा लिहू असे करत एवढा उशीर झाला.असो.

आय.आय.एम मधील विद्यार्थीजीवनावरील माझा लेख मिपाकरांना एवढा आवडला याबद्दल आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.आपल्यापैकी काहींना तो ’ऑल टाईम’ चांगला लेख वाटणे हे मिपाकरांकडून माझ्या लेखनाला मिळालेले प्रशस्तीपत्रच समजतो.

आता राहिलेल्या मुद्द्यांवर माझे मत मांडतो.

>>पण 'प्रोफाईल' वगेरे खरच महत्वाचं असतं का?... आणि कोणतही 'प्रोफाईल' कचरा वगेरे कसं असेल?...
हो प्रोफाईल खूपच महत्वाचे असते.कारण मूळ लेखात लिहिल्याप्रमाणे आय.आय.एम अहमदाबादने कॅटला बसलेल्या दर १० हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ १४ विद्यार्थ्यांची निवड केली.आता त्या १४ मध्ये आपला नंबर लागण्यासाठी काहीतरी विशेष आपल्या प्रोफाईलमध्ये असणे गरजेचे असते. आय.आय.टी मधील विद्यार्थ्यांना ते बरेच सोपे जाते कारण त्यांनी आय.आय.टी मध्ये प्रवेश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केलेलीच असते.त्यातही आय.आय.टी मध्ये पहिल्या १०% मध्ये नंबर असेल तर त्यांचा मार्ग खूपच सोपा होतो.पण तसे नसेल तर इतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निबंधलेखन आणि मुलाखतीत खूपच चांगली कामगिरी करावी लागते. अर्थातच नशीबाचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही.

आता एखादे ’प्रोफाईल’ कचरा म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती जरूर आहे पण सांगायचा मुद्दा म्हणजे अत्यंत उच्च दर्जाचे प्रोफाईल असलेले विद्यार्थी आय.आय.एम मध्ये येतात आणि त्यापुढे आपले प्रोफाईल काहीच नाही याची जाणीव होते.

अवांतर: भारतातील आणि इतर देशांमधील बी-स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रियेत मूलभूत फरक आहे. भारतात कॅट परीक्षेला अतोनात महत्व आहे. एखादा विद्यार्थ्याचे प्रोफाईल कितीही चांगले असेल तरी परीक्षेत अपेक्षित मार्क न मिळाल्यास त्याला प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बोलावले जात नाही. पण हावर्ड,केलॉग,लंडन बिझनेस स्कूल यासारख्या जगातील आघाडीच्या बी-स्कूल मध्ये प्रवेशपरीक्षेला (जीमॅट) तितक्या प्रमाणावर महत्व नसते. परीक्षेत ८०० पैकी ७२० (सुमारे ९५ पर्सेंटाईल) मिळाले तरी चालू शकते. पण मुलाखतीसाठी निमंत्रण मिळवायला प्रोफाईल खूपच जास्त महत्वाचे असते.

>>आय.आय.एम. किंवा आय.आय.टी. मधे असाल तर आवडीचं काम करणं सोप होतं ह्यात काही शंका नाही
अगदी १००% मान्य.अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पहिल्या नोकरीत पहिला प्रोजेक्ट कुठला मिळतो यावर बरेच काही अवलंबून असते. या संस्थांच्या नावामुळे या विद्यार्थ्यांना बहुतांश वेळा तो पहिला प्रोजेक्ट आव्हानात्मक आणि चांगला मिळतो आणि त्यावर पुढील करियरची दिशा ठरून जाते.

>>आय आय एम, आय आय टी सारख्या प्रतिष्ठित सन्स्थान्मध्ये मराठी आकडा तसा कमीच दिसतो
आय.आय.टी चे माहित नाही तसेच इतर आय.आय.एमचे पण माहित नाही. पण अहमदाबादला दोन्ही वर्षे मिळून सुमारे ५० (साधारणत: ८%) विद्यार्थी मराठी आहेत.

>>तुमच्या केसस्टडीजचे, प्रोजेक्टवर्क असेल तर त्याचे कामकाज कसे चालते?
प्रत्येक प्राध्यापक आपल्या विषयात विद्यार्थ्यांना ग्रेड देताना कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे ठरवायला स्वतंत्र असतो.उदाहरणार्थ मध्यावधी परीक्षेला ३०%, अंतिम परीक्षेला ४०%, क्लास पार्टिसिपेशनला १०% आणि प्रोजेक्टला २०% असे विभाजन असू शकते.केस स्टडीज विद्यार्थ्यांना विषय समजावून द्यायला असतात आणि बहुतेक वेळा क्लास पार्टिसिपेशनसाठी केस वरील चर्चेत विद्यार्थ्याचा सहभाग किती आणि कसा हे ध्यानात घेतले जाते.प्रोजेक्ट साठी एखादी स्वतंत्र केस दिली जाते.विद्यार्थ्याने स्वतंत्रपणे किंवा ५-६ विद्यार्थ्यांच्या गटाने इतर कोणाच्या मदतीशिवाय ती सोडवायची असते.आणि त्यावर मार्क अवलंबून असतात.

इथले ग्रंथालय ’विक्रम साराभाई ग्रंथालय’ म्हणून ओळखले जाते.मॅनेजमेन्टसंबंधी अनेक विविध विषयांवर पुस्तके,जर्नल तिथे आहेत. खरे सांगायचे तर पहिल्या वर्षी ठरवून दिलेली पुस्तके सोडून इतर काही वाचायला फारसा वेळ होत नाही.त्यामुळे ग्रंथालयाविषयी मला फारसे लिहिता येणार नाही. दुसऱ्या वर्षी मात्र अभ्यास जरा कमी असतो तेव्हा अधिक वाचन करायला नक्कीच वेळ होईल.

>>हेन्री पॉल्सन सारख्या राजकारण्यांना विकत घेऊन गोल्डमन सॅक्सने सामान्य लोकांच्या पैशावर मारलेला डल्ला विसरू नका.
दुर्दैवाने बिझनेसच्या जगात लांड्यालबाड्या मोठ्या प्रमाणावर चालतात. तरीही गोल्डमन सॅक्समध्ये आपल्याला नोकरी करता यावी ही माझी खूप इच्छा होती.आजच्या घटकेला गोल्डमन सॅक्स ही इन्वेस्टमेन्ट बॅंकिंगच्या जगतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे.फायनान्सची आवड असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गोल्डमन सॅक्स मध्ये नोकरी मिळावी असे स्वप्न असते तसेच माझेही होते. गोल्डमन सॅक्समध्ये नोकरीचे जाऊ द्या पण गोल्डमन बरोबरच मॉर्गन स्टॅन्ले,मेरिल लिंच,नोमूरा यापैकी कोणत्याच कंपनीने मला मुलाखतीसाठीपण बोलावले नाही आणि इतर ज्या मोठ्या तीन कंपन्यांनी मुलाखतीला बोलावले तिथे मला समर इन्टर्नशीप मिळाली नाही याची रूखरूख मात्र जरूर लागली आहे. असो. अजूनही आय.आय.एम मधून बाहेर पडल्यावर ’Sky is the limit’.
वेळ मिळेल त्याप्रमाणे मिपावर अधिकाधिक लिखाण करायचा प्रयत्न असेल. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंधन संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------

स्वाती२'s picture

28 Nov 2009 - 8:00 pm | स्वाती२

मनात आलेल्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

मीनल's picture

28 Nov 2009 - 8:36 pm | मीनल

आता वाचला लेख.आवडला
माझ्या यजमानानी बँगलोर मधे आय आय एम केले.
खूप अभ्यास असायचा. नंतर परिक्षा.
मी ,माझा मुलगा तिथे जाऊन आलो. तिथे ही असाच परिसर होता. मेस ही अशीच होती.
तेव्हाची आठवण झाली.
या शिक्षणाचा फायदा होतो हे सांगयलाच नको. पुढिल करिअर साठी शुभेच्छा.

मीनल.

अजय भागवत's picture

29 Nov 2009 - 9:00 am | अजय भागवत

तुमच्यामुळे आय-आय-एम मधून घरबसल्या चक्कर मारता आली व 'आतली खबर' वाचायला मिळाली.
तेथे एक चहाचा ठेला पण खूप सुप्रसिद्ध आहे असे ऐकले होते. कंपाउंडच्या भिंतीला जेमतेम फुटभराच्या खिडकीतून हा चहा टपरीवाला तेथील विद्यार्थ्यांना बाहेरील फुटपाथ वरुन चहा व नास्ता/ष्टा देतो. विद्यार्थ्यांनी त्या चहावाल्याच्या मुलांना शिकवण्याचा खर्च उअचलायचे ठरवले आहे असेही ऐकले ते खरे आहे का?

क्लिंटन's picture

29 Nov 2009 - 11:13 am | क्लिंटन

तुमच्यामुळे आय-आय-एम मधून घरबसल्या चक्कर मारता आली व 'आतली खबर' वाचायला मिळाली.

लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

तेथे एक चहाचा ठेला पण खूप सुप्रसिद्ध आहे असे ऐकले होते.

हो तो चहावाला 'रामभाई चहावाला' म्हणून ओळखला जातो. पहिल्या फोटोमध्ये आय.आय.एम च्या मुख्य प्रवेशद्वार दाखविले आहे.त्यापासून रामभाई जवळच आहे.माझे वसतीगृह क्रमांक १९ नव्या कॅम्पसमध्ये आहे आणि तिथून रामभाई दूर असल्यामुळे माझे तिथे विशेष जाणे नसते. त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च 'Alumni association' करणार आहे असे ऐकले आहे हे खरेच.

---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------

अजय भागवत's picture

29 Nov 2009 - 9:09 am | अजय भागवत

IIM च्या कॅट परिक्षेला झालेला गोंधळ काल वाचनात आला. भारतात हे असे ऑनलाईन एक्झामचे प्रयत्न खूप वाखाणण्याजोगे आहेत व ते सर्वत्र अनुकरणीय आहेत.

दुर्दैवाने, अनेक कार्पोरेटमधे जे घडते तेच येथेही काल पहायला मिळाले व तो सर्व्हर क्रॅश झाला. परफॉर्मन्स टेस्टींग केले असावे असे वाटते पण ते घाईघाईत उरकले असावे किंवा योग्य तो अंदाज लावून टेस्ट केसेस लिहिल्या नसाव्यात असे वरवर पाहता वाटते.

(हे माझे मत आहे) वरील प्रसंगाची केस स्टडी घेऊन ती अधिक संशोधित केली गेली तर अनेकांना त्याचा फायदा होईल. - विषेशतः सरकारी यंत्रणांना. (कारण अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी मुंबई विभागाने ऑनलाईन प्रक्रिया केली होती, तिचाही असाच बोजवारा ऊडाला होता).

क्लिंटन's picture

29 Nov 2009 - 11:28 am | क्लिंटन

२००३ मध्ये सुमारे १ लाख विद्यार्थ्यांनी कॅटची परीक्षा दिली.तर २००८ मध्ये हाच आकडा २.४१ लाख होता.एकूण २.७१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते पण काही कारणाने सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही.तरीही आय.आय.एम ना एकूण २.७१ लाख विद्यार्थी परीक्षा देतील याची तयारी ठेऊनच सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागली. गेल्या पाच वर्षांत हा आकडा वाढायचा सरासरी वेग २०% हूनही जास्त होता.पुढील पाच वर्षे दरवर्षी २०% नाही तरी दरवर्षी १०% वाढीचा वेग असला तरी हा आकडा ४ लाखांहूनही जास्त होईल आणि सर्व गोष्टींचे आयोजन करणे खूपच कठिण होईल हे ध्यानात घेऊन आय.आय.एम ने कॉम्युटरवर परीक्षा घ्यायचे ठरवले.तरीही व्हायचा तो गोंधळ झालाच. काही वर्षांपूर्वी जमशेदपूरमधील ’झेव्हियर लेबर रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एक्स.एल.आर.आय) ने त्यांची प्रवेश परीक्षा अशी संगणकीकृत केली होती पण बोलीभाषेत सांगायचे तर त्यात त्यांचा पचका झाल्यामुळे त्यांनी परीक्षा परत पूर्वीच्या स्वरूपात आणली.आय.आय.एम वर तीच वेळ येऊ नको दे हीच इच्छा.

या प्रकाराची केस स्टडी आली तरी आमच्या बॅचला ती येणार नाही आणि आमची बॅच या गोंधळातून सुटली यामुळे बरेच आहे.

---------
विल्यम जेफरसन क्लिंटन
वसतीगृह क्रमांक १९ खोली क्रमांक ८
भारतीय प्रबंध संस्थान
वस्त्रापूर
अहमदाबाद-३८००१५
गुजरात
---------

टुकुल's picture

29 Nov 2009 - 12:53 pm | टुकुल

क्लिंटन भाउ, वाईट मानु नका पण तुम्ही अभ्यासात लक्ष द्या, आ़म्ही काय पडीक परत वाचु तुम्ही काय लिहिले ते, तुम्ही आपल चालु द्या !!

--टुकुल

आकाशातुन दिसणारे आय.आय.एम. अहमदाबाद

http://www.wikimapia.org/#lat=23.0340501&lon=72.5336373&z=18&l=0&m=b