इस रंग बदलती दुनिया में !

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जनातलं, मनातलं
24 May 2018 - 12:21 am

नुकतीच एका अध्यात्म वगैरेंच्या धाग्यावर इथे एक अवांतर चर्चा सुरु झाली (म्हणजे मीच सुरु केली म्हणा!) त्याला माझं छिद्रान्वेषण कारणीभूत आहे असे काही लोकांचं मत झालं. पण तरीही त्या चर्चेतला मुख्य मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. खूप साधा सरळ मुद्दा...

एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी त्याला फक्त "काळ्या" म्हणणे पुरेसे आहे?

आपण बरेच "कॉमेडी" शो पाहतो. त्यातले निम्मे अर्धे विनोद हे शारीरिक व्यंग किंवा रंग (म्हणजेच तो किती काळा आहे त्यानुसार) यावर असतात.
काही लोक यावर खळखळून असतात तर काही यांना कमी प्रतीचे विनोद समजतात. पण हे विनोद समाजावर किंवा तसे व्यंग किंवा रंग असलेल्या व्यक्तींवर काय प्रभाव पडत असतील याचा विचार केला जातो का? त्याची कोणाला गरज वाटते का?

आपल्या बालपणातील काही प्रसंग आपल्या मनावर कायमस्वरूपी कोरले जातात काही चांगले म्हणून काही वाईट म्हणून! पण काही प्रसंग असे असतात जे की आपण मोठे झाल्यानंतर कधीतरी आठवतात आणि मग त्या घटनांचं गांभीर्य लक्षात येत, जे मग कायम लक्षात राहत...तसाच एक प्रसंग...

पाचवीला असताना हिंदीचा वर्ग सुरु होता. सगळ्यांना शिकवता शिकवता काहीतरी विनोद सांगून हसवणारे सर तास घेत होते. तास हिंदीचा असल्यामुळे सर बऱ्याच वेळा हिंदी सिनेमामधले डायलॉग म्हणून दाखवत असत आणि मुलं टाळ्या वाजवत असत.
"हिंदी सिनेमातले मुलींचे बाप कसे असतात, बिचार्या पोराकडून काही झालं की लगेच डायलॉग मारतात 'ये शादी नही हो सकती!' बिचार्या पोरांनी काय करायचं?" सर एकदम रंगात येऊन हावभाव करून सांगत होते. सगळा वर्ग ते बघून हसत होता.
माझ्या शेजारी स्वप्नील बसला होता, तो पण जोरजोरात हसला. सरांचं लक्ष त्याच्याकडे गेल्यावर ते त्याला म्हणाले,"तू काय हसतोय इतका, काळ्याला तर मुळीच मुलगी देणार नाही तो!" या डायलॉग नंतर संपूर्ण वर्ग जोरजोरात हसू लागला. तो देखील कसनुसा हसला. मी देखील, तो हसतोय हे पाहून हसतच होतो.
काय वाटलं असेल त्याला तेव्हा? जी गोष्ट त्याच्या हातातच नव्हती त्यासाठी त्याच्यावर विनोद केला गेला तोही सगळ्या वर्गासमोर! त्याचसोबत काळा असणे ही काहीतरी हसण्यासारखी गोष्ट आहे असेच बाकीच्यांना त्यानंतर वाटले असले तर त्यात नवल ते काय.

काहीच दिवसांपूर्वी, दत्तक घेतलेल्या मुलाचा रंग काळा आहे म्हणून त्याला गोरा करायला दगडाने घासणाऱ्या आईची बातमी बऱ्याच लोकांनी वाचली असेलच. "मुलगी काळी असेल तर हुंडा जरा जास्त देऊन करून टाका लग्न" असे सल्ले देणारे लोक देखील सापडतील.
मध्यन्तरी अशाच एका घटनेच्या अनुषंगाने शतशब्दकथा लिहिली होती पण लोकांचे आपल्याकडे इतकी पण वाईट परिस्थिती नाही असे म्हणणे पडले.
इथे ते पाहता येईल.
आपल्या इथे गोरा करणाऱ्या क्रिमचे विक्रीचे आकडे पहिले तरी लक्षात येत की आपण किती आहारी गेलोय गोरेपणाच्या किंवा असे म्हणता येईल की किती घाबरतो काळे असण्याला!

"ए गोऱ्या", "अरे गोरू" हे खिल्ली उडवायला वापरता येत नाही कारण त्यात अपमान करतोय का स्तुती हेच आपल्या लोकांना समजत नाही. त्यामुळे माणूस गोरा असेल तर निदान आपल्याइथे तो रंगभेदातून तरी मुक्त असतो.(हे माझे मत, कोणाला वेगळी परिस्थिती माहिती असेल तर सांगू शकता) पण मग शारीरिक व्यंग हा डोमेन उघडा असतोच!

निदान एखाद्या आंधळ्या माणसाला "ए आंधळ्या" म्हणून खिल्ली उडवू नये असे बऱ्याच(काही नमुने असतातच) लोकांना कळते. पण हे बाकीच्या व्यंगांबद्दल म्हणता येत नाही. बुटका असणे, तिरळा असणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जाड असणे ही हक्काने खिल्ली उडवण्याची व्यंग झालेली आहेत.
जाड लोकं ही आळशीच असतात म्हणून ती जाड होतात हा समज जवळपास फिट्ट झालेला आहे त्यामुळे ते व्यंग नाहीये आणि म्हणून त्यांच्यावर विनोद करण्यात काहीच गैर नाही असे बऱ्याच लोकांना वाटते. पण खरंच सगळ्याच लोकांचा लठ्ठपणा व्यायामाने नियंत्रित होतो का हे डॉक्टरच स्पष्ट करू शकतील.

"आता मग आम्ही कोणावरच विनोद करायचे नाहीत का?", "ही असली लोकं विनोद पण समजू शकत नाहीत!" असे प्रतिसाद देखील येतील पण विनोदनिर्मितीसाठी एखाद्याचा रंग/व्यंग हे आवश्यकच असते का? सकस विनोद याशिवाय होऊच शकत नाही का? हे प्रश्न देखील येतात.

या बाबतीत समाज हळूहळू बदलेलंच पण त्यासाठी जिथे अशा गोष्टी दिसतील तिथे लोकांनी व्यक्त होण्याची गरज मला तरी वाटते.
जोपर्यंत आपण मुद्दामून अथवा अनावधाने जी गोष्ट बोलत/लिहीत आहोत ते चुकीचे आहे हे करणाऱ्याला जाणवत नाही तोपर्यंत बदलाला वाव नाही!
आपल्याला काय वाटत?

img
(चित्र आं.जा.वरून साभार)

समाजविचार

प्रतिक्रिया

शारीरिक व्यंगावर विनोद करने हे हीन वृत्तीचे लक्षण आहे. आणि सुदैवाने आजकाल याचे भान बऱ्याच जनांना आलेले आहे असे वाटते, जाणवते. चला हवा येऊद्या सारखे आपवाद आहेतच.

शाम भागवत's picture

24 May 2018 - 2:36 pm | शाम भागवत

स्वत:च्या व्यंगावर जरुर करावेत. मात्र ते व्यंग आपण स्विकारले असले तरच ते जमते.

सुमीत's picture

24 May 2018 - 11:17 am | सुमीत

चला हवा येऊद्या बद्दल न बोललेच बरे

कुमार१'s picture

24 May 2018 - 12:05 pm | कुमार१

.

परवाच माबोवर याबद्दल प्रतिसाद आलेले ->
https://www.maayboli.com/node/66059

===
"ए गोऱ्या", "अरे गोरू" हे खिल्ली उडवायला वापरता येत नाही कारण त्यात अपमान करतोय का स्तुती हेच आपल्या लोकांना समजत नाही. त्यामुळे माणूस गोरा असेल तर निदान आपल्याइथे तो रंगभेदातून तरी मुक्त असतो.(हे माझे मत, कोणाला वेगळी परिस्थिती माहिती असेल तर सांगू शकता) >> पांढरी पाल???

===
रंगावरून चिडवण्यास अल्पसंख्य वि. बहुसंख्य असं काही नसतं का? दक्षिण भारतातले बरेचजण brown रंगाच्या वेगवेगळ्या छटा असणारे असूनही काळ्या रंगावरून चिडवणे कसे काय जास्त कॉमन असेल?

बोलणे व्यर्थ होय, अतिशय दांभिक जनता. ह्यांच्या सिनेमातल्या बहुसंख्य हिरविनी उत्तरेतून आयातीत असतात राव

जेम्स वांड's picture

24 May 2018 - 1:44 pm | जेम्स वांड

तुमची कळकळ पोचली. अन हा खरच खूप कठीण प्रॉब्लेम आहे. काय बोलावे सुचतही नाही राव

पद्मावति's picture

24 May 2018 - 2:01 pm | पद्मावति

लेख छान आहे. मनापासून पटला. फेअर अँड लवली सारख्या जाहिराती किती डिस्क्रिमिनिटरी आहेत हे लक्षात येत नाही का ऍड मेकर्सच्या? अतिशय इंसेंसेटिव्ह पणा. आपल्याकडे गोरेपण आणि सुंदरता हे दोन शब्द समानार्थी शब्द असल्यासारखे लोक वापरतात :(

माहितगार's picture

24 May 2018 - 2:23 pm | माहितगार

असे भेदभाव करू नयेत हे तत्त्वता: मान्य आहेच. भारतातील रंग भेद या विषयावर चर्चा करताना काही मुद्दे / बारकावे लक्षात घ्यावे लागतात .

भारतीयांच्या रंगभेदाचे स्वरूप सहसा अस्पष्ट, सूक्ष्म किंवा त्या धाग्या प्रमाणे बऱ्याचदा काठावरचे असते. काठावरचे म्हणजे काय याकडे नंतर येतो.(काही वेळा सूक्ष्मपणे पाहिल्यास ते तीक्ष्णपणे जाणवते ) इतर वैशिष्ट्ये पाहिली तर भारतात रंगभेद सहसा आर्थिक अथवा सामाजिक स्तरीकरणासाठी वापरला जात नाही. देव-देवता ते एकाच समूह वर्गीकरणात (जसे जात./ पंथ धर्म प्रांत इत्यादी ) अथवा कुटुंबात त्वचा रंगाच्या विविध छटा सहसा सामावलेल्या असतात . भारतातील त्वचा रंगाच्या च्या एकत्रित सहवासास एकमेकांना सामावून घेण्यास काही हजार वर्षांची परंपरा सहज असावी.

भारतात या विषयाकडे अजिबातच संस्कृतिकीकरणातून पाहिले जात नाही असे नाही , काळ्या रंगाचा अनमान टाळण्यासाठी सावळा , श्याम , निळा अशा वर्णने वापरण्यावरही भर दिसतोच . सात्विकते कडे प्रवास करणाऱ्यास सर्व भेदांच्या पलीकडे जाणे अभिप्रेत असते .

पण सर्वसाधारण सामाजिक व्यवहारात अपशब्दांच्या वापराची परंपराही मोठी आहे , काही वेळा ती इतपत आहे कि अनमान केला जातोय का जिव्हाळा जोपासला जातोय असा संभ्रम निर्माण होतो. - अगदी स्वतः: आईवडील भावंडं मित्र आपापसात जिव्हाळा व्यक्त करावा एवढ्या प्रमाणात रंग आणि इतर भेदांचा उल्लेख उठता बसता करताना दिसत, आणि यातील असंख्य प्रसंगी रंगाने काळी असलेली व्यक्ती दुसऱ्या काळ्या व्यक्तीचा अरे/ग काळ्या/ळी करताना दिसते - हल्ली हे बर्यापैकी कमी होता चाललंय , या सर्वास राग व्यक्त करावा पण प्रेम शब्दात व्यक्त करणे टाळण्याची मोठी पार्श्वभूमी हि दिसून येते आणि ज्या संस्कृतीत सगळ्यांचाच सारखा अनमान करण्याची परंपरा असते तिथे अनमान हा अनमान वाटेनासा होतो का हे समजणे अवघड जाते .

सकस विनोद याशिवाय होऊच शकत नाही का? ........अशा गोष्टी दिसतील तिथे लोकांनी व्यक्त होण्याची गरज मला तरी वाटते...... जोपर्यंत आपण मुद्दामून अथवा अनावधाने जी गोष्ट बोलत/लिहीत आहोत ते चुकीचे आहे हे करणाऱ्याला जाणवत नाही तोपर्यंत बदलाला वाव नाही!

किमान सार्वजनिक जीवनातून उरलेला रंगभेद स्वीकारला जाणे आणि हद्दपार करणे निशचित गरजेचे आहे . महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत पोस्ट ऑफिसला स्ववर्णीयांसाठी वेगळा दरावाज मागण्यांसाठी आंदोलन वर्णभेदाच्या काठावरचे होते , जसे जॉर्ज वॉशिंग्टन चा सर्वोच्च प्रतिकाचा रंगभेद अमेरिकेने स्वीकारला तसे वर्ण भेद कमी करण्यास त्यांना मदत झाली तसे महात्मा गांधींची चूक स्वीकारली जाणे महत्वाचे असावे . दिल्ली गोल्फ क्लब सारख्या उच्च्भ्रू ठिकाणी नेपाळी किंवा पूर्वोत्तर भारतीय दिसण्यावरून अथवा आफ्रिकन लोकांवर होणाऱ्या रंगभेदी टिपण्या मनातही येणार नाहीत इतपत वर्तनात बदलाची गरज असावी . आणि जी गोष्ट आपण सार्वजनिकपणे इतरांनाही बोलत नाही ती आपल्याच लोकांना करणे कितपत श्रेयस्कर आहे याचाही विचार केला जावा .

विनोदाचा उद्देश्य आणि त्या प्रसंगीचे वातावरणाची पार्श्वभूमी बरीच महत्वाची भूमिका बजावत असावी. बऱ्याचदा जिव्हाळ्याच्या व्यक्तीने केलेले नर्म विनोद ज्याच्यावर विनोद होतोय त्याला स्वतः:ला आणि इतरांनी त्यास स्वीकारण्यास मदतही करू शकतात . त्यांचा उद्देश्य चांगला असला तरी ज्यांना हे नीटसे जमत नाही ते त्याची चुकीच्या पद्धतीने कॉपी करू शकतात आणि अशा चुकीचंही किंमत एखाद्या वक्तीच्या न्यूनगंडात परिवर्तित होऊन अथवा अपमान कायमचा मनात राहून मोठी होऊ शकते म्हणून असे विनोद अगदी प्रेम असले तरी टाळावेत या व्यक्तिगत मताचा मी आहे.

"ए गोऱ्या", "अरे गोरू" हे खिल्ली उडवायला वापरता येत नाही कारण त्यात अपमान करतोय का स्तुती हेच आपल्या लोकांना समजत नाही. त्यामुळे माणूस गोरा असेल तर निदान आपल्याइथे तो रंगभेदातून तरी मुक्त असतो.(हे माझे मत, कोणाला वेगळी परिस्थिती माहिती असेल तर सांगू शकता)

अगदी असेच नाहीए , पांढरी पाल पांढऱ्या पायाची अश्या शेलक्या विशेषणांना भारतीय उजळ व्यक्तींनाही सामोरे जावे लागते. आणि रंगावरून सुटले तरी वेगळ्या शारीरिक वैशिष्ट्यावरून विनोदास अथवा अनमान न्यूनगंडांना गोऱ्या लोकांनाही तेवढेच सामोरे जावे लागते .

पाश्चात्य गोऱ्याना ‘ भारतीयांकडून ' लाल माकड' अशा शब्दांना सामोरे जावे लागते . भारतीय काळेही आफ्रिकन काळ्यांना वर्णभेदी वागणूक देताना दिसतात , तर आफ्रिकन लोक आणि चिनी आणि भारतीयांना येलो मॅन म्हणण्याचे प्रकार करतात ते स्पृहणीय नसावेत , शिवाय आफ्रीकन . लोकांना भारतात आफ्रीकेपेक्षा अधिक काळे आहेत आणि त्यांना रंगावरून सामाजिक स्तरीकरणास सामोरे जावे लागत नाही याची नीटशी कल्पना नसतेच पण त्या शिवाय तेही भारतीय काळ्यांना येलो मॅन म्हणून वर्णभेदी वागणूक देताना दिसतातच . (स्वानुभवावरुन)

शब्द आणि वाक्प्रचार म्हणींचा अभ्यास त्यातील दर्शक शब्द प्रयोग टाळण्याच्या दिशेने प्रगती व्हावयास हवी. इंग्रजी भाषेने ब्लॅक लिस्ट हा शब्द प्रयोग अद्याप पूर्णतः: का त्यागाला नाही हे समजत नाही . मराठी भाषेतही अनेक शब्द आहेत , उच्चभ्रूममध्ये वापरात असलेला धेडगुजरी हा शब्द प्रयोगही असाच चुकीच्या उद्देश्यासाठी वापरला जाताना दिसतो , या विषयावरही अधिक तर्कपूर्ण अभ्यास आणि सजगतेच्या आवश्यकता असाव्यात . असो.

माहितगार's picture

24 May 2018 - 2:27 pm | माहितगार

२० व्या शतकापासून साहित्य, चित्रपट आणि जाहिरातीतून गोऱ्या रंगाला - व्यक्तिगत आणि सामाजिक व्यवहार बदलेल इतपत - अधिक तौलनिक महत्व देण्याचा प्रयत्न झाला असावा असे बर्याचदा जाणवते .

मराठी कथालेखक's picture

24 May 2018 - 7:44 pm | मराठी कथालेखक

समोरच्याला चालत असेल तर वर्ण वा व्यंग याबद्दल मैत्रीपुर्ण चिडवणं, विनोद करणं चालू शकेल, काही लोक स्वतःच स्वतःच्या स्थूल वा अतिबारीक असण्यावरुन विनोद करतात. बाकी फेअर अँड लवली वा तत्सम उत्पादनांच्या जाहिराती वा खप यात काही खटकण्यासारखं वाटत नाही. जर सावळ्या रंगामुळे एखाद्या मुलीच्या लग्नाला अडचण येत असेल तर ते ही समजू शकतं. कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

माहितगार's picture

24 May 2018 - 8:18 pm | माहितगार

कुणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

मान्य

जर सावळ्या रंगामुळे एखाद्या मुलीच्या लग्नाला अडचण येत असेल ....

सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे.

...तत्सम उत्पादनांच्या ...खप यात काही खटकण्यासारखं

निश्चितपणे साईड इफेक्ट नसतील तर वस्तु वापरली जाण्यात हरकत नाही , पण जाहीरातीतून उजळ रंग म्हणजेच चांगला ही भावना निर्माण करणे स्पृहनिय नसावे.

मराठी कथालेखक's picture

25 May 2018 - 3:46 pm | मराठी कथालेखक

सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे.

ते कसे ? समाजातील अनेकांना उजळ वा गोरा रंग किंवा गहूवर्ण हे सौंदर्याचे निकष वाटत असतील तर त्यात सामाजिक अधोगती ती काय ?
उजळ /गोरी , बांधेसूद , दाट केस ही जर पुरुषांची सुंदर स्त्रीची कल्पना असेल तर त्यांनी ती जबरदस्तीने बदलावी का ? की सुंदर /आकर्षक न वाटणार्‍या मुलीशी लग्न करावे म्हणजे तो पुरुष प्रगत ठरेल. लग्नात स्त्री पुरुष आकर्षण महत्वाचे असू नये का ?

माहितगार's picture

25 May 2018 - 5:11 pm | माहितगार

ईतरांचे खास करुन धागा लेखकाचे या विषयावर काय मत आहे ?

माहितगार's picture

28 May 2018 - 12:18 pm | माहितगार

धागा लेखक कुठे आहेत ? या विषयावर एकही मत आलेले दिसत नाही

शब्दबम्बाळ's picture

28 May 2018 - 1:51 pm | शब्दबम्बाळ

"बाकी फेअर अँड लवली वा तत्सम उत्पादनांच्या जाहिराती वा खप यात काही खटकण्यासारखं वाटत नाही"

या गोष्टीच खरंच खूप आश्चर्य वाटलं! आपण या जाहिराती पहिल्या असतील अशी आशा आहे. केवळ सावळा/काळा रंग आहे म्हणून मुलींना नोकरी मिळत नाही हे दाखवणे, सगळे जण तिला झिडकारतात हे दाखवणे हे चुकीचे तर आहेच त्याशिवाय तशा रंगाच्या मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण करणारे आहे.
एका बाजूला मेहनत आणि कर्तृत्वाच्या गप्पा मारायच्या पण गोरा रंग नसेल तर हे सगळे व्यर्थ आहे असे बिंबवायचे हे निषेधार्ह आहे! (मुलींना न्यूनगंड देऊन झाल्यावर "फेअर अँड हँडसम" हे मुलांना न्यूनगंड द्यायला तयार केलं!)
या जाहिरातींचा मोटो एकच असतो कि रंगानी काळी/सावळी व्यक्ती हि खूप बिचारी वगैरे असते आणि त्यांचे आयुष्य एक्दम वाया वगैरे गेल्यासारखं आहे.
आक्षेपांचा मुख्य मुद्दा हा आहे! तुम्हाला काय विकायचं ते विका पण ते विकण्यासाठी एखाद्याला कमी दाखवायची परवानगी याना कोणी दिली?
link

"समाजातील अनेकांना उजळ वा गोरा रंग किंवा गहूवर्ण हे सौंदर्याचे निकष वाटत असतील तर त्यात सामाजिक अधोगती ती काय ?
उजळ /गोरी , बांधेसूद , दाट केस ही जर पुरुषांची सुंदर स्त्रीची कल्पना असेल तर त्यांनी ती जबरदस्तीने बदलावी का ? की सुंदर /आकर्षक न वाटणार्‍या मुलीशी लग्न करावे म्हणजे तो पुरुष प्रगत ठरेल. लग्नात स्त्री पुरुष आकर्षण महत्वाचे असू नये का ?"

हे निकष तयार होण्यासाठी काही घटक जबाबदार असू शकतात का?(जर हेच निकष आहेत असे मानलेच तर) म्हणजे ज्या देशात बहुतांश लोक ब्राउन च्या विविध छटांमध्ये आहेत तिथे "गोरेपान" असणे हा निकष कसा तयार झाला असेल?
आणि तुमच्या मतानुसार पाहिलं तर मग सावळ्या मुली या पुरुषांच्या सुंदरतेच्या कल्पनेत बसतच नाहीत, मग अशा मुलींची लग्न (झालेली/होत असलेली) यात आकर्षण नसतेच असे आपणास वाटते का? तसे म्हणणे नक्कीच धाडसी ठरेल.
माझ्यामते प्रत्येकाच्या सौंदर्याच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात पण समाज त्या सगळ्यांना एकाच पारड्यात तोलू पाहतो.

एक उदाहरण म्हणून सांगतो माझ्या मित्राचा प्रेमविवाह झाला. तो रंगाने गोरा आणि मुलगी सावळी. दोघे एकमेकांना आवडले(म्हणजे अर्थातच रंगाशिवायही बऱ्याच गोष्टी एखाद्यावर भाळण्यासाठी पुरेशा असतात असे मानूया) पण लग्नानंतर पाहुणे मंडळी भेटल्यावर हमखास "तुला गोरी मुलगी मिळाली असती कि रे" हि टिप्पणी मारत असत. तोच वैतागला होता ऐकून हे! :)
म्हणजे व्यक्तिगत मते हि भिन्नभिन्न नक्कीच असू शकतात पण समाज मात्र त्या आवडीनिवडीना त्याच्या आवडीनुसार पाहणार!
पण लग्न हि खाजगी गोष्ट आहे कोणी कोणाशी करावं आणि त्याचे निकष काय असावेत हे संपूर्णपणे त्या त्या व्यक्तीवर आहे. पण त्या निकषांवर सामाजिक दडपण येत नाही असेही म्हणता येणार नाही.

मराठी कथालेखक's picture

28 May 2018 - 4:19 pm | मराठी कथालेखक

मी काही फेअर & लवली च्यासगळ्या जाहिराती पाहिल्या नाहीत. पण त्यांच्या क्रीमने सावळी मुलगी गोरी बनू शकते असं ते जाहिरातीत दाखवत असतील तर त्यात काही अयोग्य वाटत नाही. पण तुम्ही म्हणता तसे जर ते सावळ्या रंगाची च्यक्ती गरीब बिचारी आणि अगदी नोकरीही नाकारली जाणारी असं काही ते दाखवत असतील तर ते अयोग्य ठरेल.

आणि तुमच्या मतानुसार पाहिलं तर मग सावळ्या मुली या पुरुषांच्या सुंदरतेच्या कल्पनेत बसतच नाहीत, मग अशा मुलींची लग्न (झालेली/होत असलेली) यात आकर्षण नसतेच असे आपणास वाटते का?

नाही. माझ्या म्हणण्याचा नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचला नाही असे वाटतेय. मला इतकेच म्हणायचेय ज्याची त्याची सौंदर्याची व्याख्या वेगळी असू शकते. पण जर बहूसंख्य मुलांच्या सौंदर्याच्या निकषांत मुलीच्या गोरी असण्याला महत्व असेल तर त्याने तो मुलगा अप्रगत ठरणार आहे का? किंवा अप्रगत ठरण्याच्या भितीने केवळ त्याने ते निकष बदलावे का इतकाच माझा प्रश्न आहे. गोरेपणाला महत्व न देणारे पुरुष आपल्या समाजात अस्तित्वातच नाहीत असं मला म्हणायचं नाहीये. त्यामुळे सावळ्या मुली या पुरुषांच्या सुंदरतेच्या कल्पनेत बसत नाहीत असे काही माझे म्हणणे नाही. त्या ज्या पुरुषांच्या सुंदरतेच्या कल्पनेत बसत असतील त्यांपैकी कुणाशी अशा मुलींचे लग्न झालेले असल्यास उत्तमच.
हो पण तुमच्या प्रतिसादातला पुढचा मुद्दा पटला. ते म्हणजे जर एखाद्या पुरुषाला एखादी सावळी /काळी मुलगी आवडली असेल तर इतरांनी नाकं मुरडून त्याचा हिरमोड करायचे काही कारण नाही. पत्नीबद्दल पतीला शारिरीक आकर्षण वाटणे महत्वाचे आहे पुर्ण कुटूंबाला नव्हे

अनिंद्य's picture

25 May 2018 - 11:41 am | अनिंद्य

@ शब्दबम्बाळ,

लेखाच्या गाभ्याशी सहमत. We are indeed a society full of prejudice and bias !

'जाडी बाई धपकन पडली' असे नुसते ऐकूनही खदखदून हसू येणारे बघितले आहेत. काळ्या रंगावरून, बऱ्या-वाईट दिसण्यावरून, बारीक-जाड शरीरावरुन शेरेबाजी इतकी कॉमन आहे की त्यात काही चुकीचे आहे असे पण अनेकांना वाटत नाही. दुसऱ्याच्या व्यंगावर हसू नये हे फक्त पुस्तकात :-)

टोकाचे शारीर विनोद आणि पुरुषांनी ओंगळ स्त्री वेष घेतल्याशिवाय 'विनोदी' काही घडू शकत नसल्याचा ठाम विश्वास नाटक-सिनेमा-मालिकांमध्ये बळावला आहे. तेच समाजात दिसले तर आश्चर्य कसले?

नाखु's picture

28 May 2018 - 9:04 am | नाखु

चपखल प्रतिसाद!!!
टोकाचे शारीर विनोद आणि पुरुषांनी ओंगळ स्त्री वेष घेतल्याशिवाय 'विनोदी' काही घडू शकत नसल्याचा ठाम विश्वास नाटक-सिनेमा-मालिकांमध्ये बळावला आहे. तेच समाजात दिसले तर आश्चर्य कसले?

अशीही बनवाबनवी मध्ये किंवा चाची ४२० मध्ये पुरूषांचे स्त्री. रुप ओंगळ आणि बटबटीत होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता एक वस्तुपाठ ठरावा इतकी मर्यादा संभाळून आहे

हवा येऊ द्या मधील कमी उंचीची पात्रं फक्त शारीर आणि किळसवाणा विनोदासाठी चार आहेत

दूरून दर्शन वाला नाखु पांढरपेशा