माझा विज्ञानदिन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
3 Mar 2009 - 3:51 pm

बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं. एक माझ्या हापिसात आले, "माझा असा विचार आहे, की एकदा ही प्रपोजल डेडलाईन झाली की मग तुम्ही सगळे पोस्ट-डॉक्स आणि मी, आपण विज्ञान दिनाची तयारी करू या." "हरकत नाही, एकदा हे प्रपोजल होऊ देत, मग आपण सहाजण बसू या सोमवारी." मग प्रपोजल लिहिताना एकदा विज्ञान दिन कधी आहे याचीही माहिती काढली, गुगलबाबा जिंदाबाद! २८ फेब्रुवारीला आपल्याकडे विज्ञान दिवस असतो. तीच तारीख का, तर त्याच दिवशी सर चंद्रशेखर व्यंकटरामण यांनी भौतिकशास्त्रातल्या 'रामन परीणामा'चा शोध लावला. त्याच शोधामुळे भारताला प्रथमच विज्ञानक्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. ही माहिती काढली तेव्हा क्यांपुटर तारीख दाखवत होता, १२ जानेवारी. काहीच हरकत नाही, एक महिन्यातसुद्धा काम पूर्ण होऊ शकतो. पाच पोस्टडॉक्स, म्हणजे प्रत्येकी दहा पोस्टर्स बनवली तरीही चिक्कार झालं असं गणित डोक्यात झालं.

मधल्या काळात मुळा-मुठेतून बरंच (प्रदूषित) पाणी वाहून गेलं. टाईम्स ऑफ इंडिया नामक प्रथितयश वर्तमानपत्रात जी.एम.आर.टी. 'आयुका'च्या प्रयत्नातून बनली असं छापून आलं. अर्थातच एन.सी.आर.ए.मधे याची तिखट प्रतिक्रिया आलीच. जी.एम.आर.टी.(ग्रम्ट) हे प्रा. गोविंदस्वरूप यांच्या प्रयत्नांमधूनच तयार झाली आहे आणि यात कोणत्याही खगोलाभ्यासकाचं दुमत नाही. तरीही आयुकामधून यावर काही पत्रं नाही म्हणूनही एन.सी.आर.ए.मधे लोकं जरा एकत्र झाली. आपणही काही चांगलं काम करून प्रसिद्ध झालं पाहिजे असं मानणार गट पुन्हा सक्रिय झाला, 'विज्ञान दिवसाला अनेक वृत्तपत्रांमधून आपले लेख छापून आले पाहिजेत' असंही कानावर आलं, पण पुन्हा डोळ्यात काहीच येत नव्हतं. अर्थात हे सगळं गॉसिप समजतं आपण वेळेवर चहा, जेवणाला गेलं तर; वाट्टेल त्या वेळेला मिपा-मिपा खेळत बसलं तर काहीही नाहीच. त्यामुळे अर्थातच मी या सगळ्या गोष्टी काम आणि मिपाखेळात विसरूनही गेले.

आता आला २५ फेब्रूवारी. स्थळ माझंच ऑफिस, तोच बॉस नं एक पुन्हा माझ्या हापिसात! समोरचा म्याप कसा चांगला बनवता येईल याच्या गहन विचारात मी पेंग आलेल्या स्थितीमधे; "पोस्टरचं कुठवर आलं?" माझी पहिली प्रतिक्रिया, "ऍऽऽऽ????" वाटलेलं आश्चर्य चेहेर्‍यावरून ओसंडून वहात होतं. "पोस्टर्स गं! आपलं ठरलं होतं ना पोस्टर्स बनवायची पोस्टडॉक्सनी?" "हो, पण तुम्ही आम्हाला सगळं काम वाटून देणार होतात ना?" मी अजूनही गोंधळलेलीच. बॉसच्या चेहेर्‍यावरचा गोंधळ एक्स्पोनेंशली वाढत होता, "म्हणजे?"... गोंधळ झाला आहे, आता पुरेसा वेळ नाही, आता आहेत त्या पोस्टर्सवरच चालवून घ्यावं लागणार हे लक्षात आलं. थोड्या वेळातच एका आणखी मोठ्या बॉसचं बोलावणं आलं, "चला म्याडम, आज काम होणार दिसत नाही. आलिया भोगासी ..." मी निघाले. नेहेमीप्रमाणे प्रसन्नमुखाने स्वागत करून त्यांनी माझ्या कामाबद्दल चौकशी केली. आणि मग काम सांगितलं, "'ग्रम्ट'ला 'आय.बी.एन. लोकमत'वाले शनिवारी, विज्ञान दिवसाला येणार आहेत. त्यांना मराठी बोलणारा/री खगोलाभ्यासक हवा/वी आहे..." "वाह, हे तर उत्तमच. आपली फुकटची जाहिरातपण होईल." "मग तुला चालेल ना आदल्या दिवशी तिथे जाऊन च्यानेलवाल्यांना मुलाखत द्यायला?" त्यांनी विचारलं. "हो, हो, अर्थातच! आपली जाहीरात होत आहे तर मला आनंदच आहे."

शुक्रवारी दिवसभर काम करून मी गेले 'ग्रम्ट'ला! तिकडे गेल्यावर कळलं आणखी एकाने च्यानेलवाल्यांना 'येऊ नका' असं सांगितलं आहे, आणि एकाच बिल्डींगमधे काम करणारी मी मात्र संपूर्ण अनभिज्ञ! झाला ना मुलाखतीचा मारूती कांबळे ... आणखी एक राजकीय बळी! Welcome to India!! आजपर्यंत ऐकलं होतं, आता पहिला अनुभवपण होता. विज्ञान दिनाच्याच अनुषंगाने एवढं Communication breakdown तर आधीच बघून झालेलं होतं ... प्रचंड वैतागले. सगळा राग काढला, नेहेमीप्रमाणे भरपूर शिव्या घालून घेतल्या, फोनाफोनी केली, आणि गपगुमान जाऊन झोपले. झोपताना ठरवलं, बस्सं हे शेवटचं, यापुढे विज्ञान दिवस असेल नाहीतर आणखी काही, मी हे ह.प.चे.ध (हजामपट्टीचे धंदे) करणार नाही. सकाळी उठले, चहासाठी बाहेर पडले आणि मग मात्र मूड बदललेला होता. मस्त हवा होती, सुंदर सूर्योदय दिसला आणि थोड्या वेळात एन.सी.आर.ए.मधून सगळे मित्र-मैत्रीणीही आले. मग सुरू झाला आमचा विज्ञान दिवस. (फोटो मात्र फारसे काढता आले नाहीत कारण तिथे फार धूळ होती, तिथे कॅमेरा काढायचं जीवावर येत होतं.)

सकाळी सकाळी पोरांना पोस्टर्स दाखवून, उन्हात फिरून, सवय नसल्यामुळे माझं उसाचं चिपाड झालं होतं. एक मित्र आणि मी जेवण घेऊन बसलो तेवढ्यात बॉस नं. एक आला आणि जेवण घेऊन शेजारीच बसला. "मी विचार करत होतो, आपल्याकडे हे जे आता शाळेतल्या मुलांचं विज्ञान प्रदर्शन भरलं आहे, त्याची परीक्षक म्हणून काम करशील का? जेवण होऊ देत, थोडा आराम कर मग सुरूवात करता येईल. तुला परीक्षणाचं काम सांगायला काहीच हरकत नाही आणि तुला मराठीही येतं." "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..." नाही म्हणता आलं नाही, मराठीचा मुद्दा आला की नाही म्हणता येतच नाही. इथे दोनच मराठी खगोलाभ्यासक त्यातला एक व्याख्यान देत होता, राहता राहिले मीच! म्हटलं हो, खोडद नावाच्या खेड्याजवळच्या (पुण्यापासून ९० किमी, नाशिकच्या दिशेने) शाळांमधल्या मुलांची काय ती प्रोजेक्ट्स असणार? आणि तोच माझा गैरसमज होता. तेवढ्यात पुन्हा बॉस नं. एक आला, "हा रमेश भट, तुझी याच्याशी ओळख आहेच ना? आणि हा विलम, त्याचा स्विनबर्नमधला कलीग. ही पोस्टडॉक आहे एन.सी.आर.ए.मधे. तुम्ही तिघंजण परिक्षक आहात, आणि ही तुम्हाला भाषांतरात मदतही करेल. पाच मिनीटात तो आपला हा तुम्हाला मुलांची आणि प्रोजेक्ट्सच्या माहितीचे प्रिंट्स देतील." ही माहिती मिळेपर्यंत आम्ही गप्पा मारायला लागलो. आमचे अनेक कॉमन मित्र आहेत त्यांच्याबद्दल बोलून झालं, विलमला थोडं मराठी शिकवलं, त्या दोघांची औरंगाबाद-अजिंठा-वेरूळची सहल प्लॅन करून दिली तेव्हा कुठे "आमची पाच मिनिटं झाली", आणि मुलं आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सची यादी आणून दिली. आता आम्ही निघालो परीक्षणाला!

आम्ही तिघांनी शाळेतल्या (तिसरी ते नववी) मुलांची प्रोजेक्ट्सची पहाणी करायची ठरवली. मुलांमधे प्रचंड आत्मविश्वास होता. इंग्लिश माध्यमात शिकणार्‍या मुलांचीही इंग्लिश भाषेची अडचण होती पण मराठीमात्र अगदी व्यवस्थित बोलत होती. रमेश आणि विलमसाठी भाषांतर करायला मी होतेच. पण मुलं एवढं व्यवस्थित समजावून सांगत होती की खूप जास्त भाषांतर करायला लागतच नव्हतं. त्यातली काही मला मनापासून आवडलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगते. एका मुलीने स्वस्तातल्या डासांच्या वड्या बनवल्या होत्या. साधा वहीचा पुठ्ठा डासांच्या वड्यांच्या आकारात कापायचा, कडूलिंबाच्या तेलात बुडवायचा की एक दिवसासाठी डास घराबाहेर. हे अस्त्रं 'चांगल्या सरदारा'पेक्षाही भारी असतं आणि गेला महिनाभर आम्ही हेच वापरत आहोत, डासांचा त्रास अगदीच नगण्य होत आहे असा अनुभवही तिने सांगितलं. एका दिवसाचा एक पैसा!
सायकलला डायनामो लावून बॅटरीज चार्ज करायच्या आणि ती वीज रात्री दिवे गेले की ही बॅटरी वापरायची. सायकलच्या डायनामोवर तिथल्यातिथे दिवा लावायची कल्पना जुनीच आहे, पण पाचवीतला मुलगा जेव्हा रात्री सहा-सात तास वीज नसते सांगत होता तेव्हा खरंच वाईट वाटलं. तिथली बरीच प्रोजेक्ट्स डायनामो किंवा सोलर पावरवर होती. ग्रामीण भागात विजेचा प्रश्न किती गहन झाला आहे याचा त्यावरून चांगलाच अंदाज येत होता.

आणखी एक प्रोजेक्ट खरोखर उल्लेख करण्यासारखं होतं, त्याला विज्ञान म्हणून मी फार गुण दिले नाहीत पण मला आवडलं. त्याने तीन छोट्या बाटल्या ब्युरेट्सना जोडल्या होत्या. एक बाटली एकाच ब्युरेटला, दुसरीला दोन ब्युरेट्स आणि तिसरीला तीन. तीनही बाटल्यांमध्ये समान प्रमाणात द्रवपदार्थ होता. बाटल्यांची उंची वाढवल्यावर ते द्रव ब्युरेट्समधे गेलं. जिथे एकच ब्युरेट होती तिथे द्रवाची उंची सगळ्यात जास्त होती आणि तीन ब्युरेट्स होत्या तिथे सगळ्यात कमी. मुलगा सांगत होता, "जास्त मुलं असतील तर त्या घरातल्या मुलांच्या प्राथमिक गरजाही पूर्न होनार नाहीत. कमी उत्पन्न असताना पाल्कांना मुलांना जास्त सोयी देता येतात, जास्त लक्ष देता येतं..."

एका मुलाने कागद रिसायकल करण्याचं प्रोजेक्ट केलं होतं. वापरलेला कागद पाण्यात टाकून त्याचा लगदा बनवायचा, त्याचं ब्लिचींग करायचं, कचरा काढून टाकायला चाळणीतून काढायचं आणि मग लगदा वाळवायचा. उत्तम टीपकागद तयार झाला होता.
आणखी एका मुलीने फ्रिजला पर्याय शोधला होता. मडक्याच्या तळाला मीठ किंवा रेती घालायची, वर आणि मडक्याच्या बाजूला नारळाचा काथ्या लावायचा. आत भाजी ठेवायची आणि वरून ओलं फडकं लावायचं. फडकं ओलं ठेवून दिलं तर आठवडाभर भाज्या वापरण्यायोग्य रहातात.

या मुलांची प्रोजेक्ट्स पाहून आपण किती वेगळ्या जगात रहातो ते लक्षात आलं. ज्यांना फ्रिज परवडत नाही ... फ्रिज परवडत ना ही ?? दिवसात बारा-चौदा तास वीज नसते?? त्यातून तो डायनामो परिणाम सांगताना ती मुलं मला विद्युतघट, विद्युत्प्रवाह वगैरेंबद्दल सांगत होती. "इलेक्ट्रीकल सर्किट पूर्ण होतं" हे वाक्य मला नाही पूर्ण मराठीत बोलता येत! आठवीच्या पुढे मी सायन्स आणि मॅथ्स शिकले, ही मुलं मात्र विज्ञान आणि गणित शिकतात. इतकी मस्त आत्मविश्वासाने ती बोलत होती. विलमतर ऑस्ट्रेलियन, त्याला हिंदीसुद्धा येत नाही, पण अनेक प्रोजेक्ट्स समजावताना त्याला मराठीतून इंग्लिश भाषांतराचीही गरज पडली नाही.

तीन वाजता सुरू केलेलं परीक्षण संध्याकाळी सव्वापाचच्या पुढे संपलं. आम्ही संपूर्ण दमलो होतो, प्रचंड तहान लागली होती. एवढा वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे (पुढे दोन दिवस) पाय दुखत होते. परत येताना माझ्या डोक्यात मात्र काही प्रश्न होते, दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो, आणि ही मुलं बिन्धास्त विलमशी मराठीत बोलत होती, अर्थात तिथे 'गोर्‍या कातडीचं आकर्षण'ही होतंच. रात्री दमून भागून जेवताना पुढच्या वर्षी एवढे कष्ट करून तिकडे जायचं का नाही हा प्रश्न नव्हताच; प्रश्न एवढाच आहे मी एका वर्षात किती पोस्टर्स मराठीत बनवू शकते!

लेखिका नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजिक्समधे कंत्राटी नोकरीवर आहे.

विज्ञानशिक्षणलेख

प्रतिक्रिया

महेश हतोळकर's picture

3 Mar 2009 - 4:04 pm | महेश हतोळकर

मुलांचा आत्मविश्वास आणि समाजाभिमुखता वाखाणण्याजोगी आहे. प्रयोगांबद्दल आजून विस्ताराने लिहा.

अमोल खरे's picture

3 Mar 2009 - 4:06 pm | अमोल खरे

परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात.

अवांतर- हा लेख वाचुन आठवण झाली. माझी चुलत बहिण तासगाव ( सांगली ) येथे असते. तिच्या चौथीत शिकणा-या मुलीला गणित ऑलिम्पियाड साठी निवडलाय......पूर्ण महाराष्ट्रातून काही हजार मुले बसली होती त्या परिक्षेसाठी. गुणवत्ता असेल तर बहुतेक वेळा त्याचे चिज होतेच.

असेच लेख लिहित रहा.

अमृतांजन's picture

4 Mar 2009 - 8:32 am | अमृतांजन

"परत हे दिसले कि टॅलेंट असले कि गाव-शहर हा फरक राहात नाही. गावातील मुले देखील तितकीच पुढे येउ शकतात."
अशा स्वरुपाच्या प्रतिक्य्रिया अधुन मधुन वाचयला मिळतात. पण माझा समज असा आहे की, गावातील हुषार मुलांना पुढे यण्यासाठी जास्त कष्ट (शहरी हुषार मुलांच्या तुलनेने) करावे लागतात. ह्याबाबत मत्भेद होऊ शकतो.

तुमच्या भाचीचे उदाहरण तुम्ही दिले आहे. तिच्या बाबतीत वरील समज कसा लागू होतो?

सुप्रिया's picture

3 Mar 2009 - 4:06 pm | सुप्रिया

लेख आवडला. ह्रदयाला भिडला. मुलांचं कौतुकतर वाटलंच आणि

(परत येताना माझ्या डोक्यात मात्र काही प्रश्न होते, दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो, आणि ही मुलं बिन्धास्त विलमशी मराठीत बोलत होती)

हे विचार करायला लावणारं आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2009 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त माहितीपुर्णलेख आवडला. आणी स्वतःच्या कामाचे यांव आन ढ्यांव पोवाडे न गाता आजुबाजुच्या घटनांचे, मुलांच्या प्रयोगाचे केलेल वर्णन एकदम बहारदार.
मागे सांगितलेच होते की असेच एक प्रदर्शन काहि वर्षापुर्वी रमणबागेत बघायचा योग आल होता तेंव्हा त्या लहानग्यांची समज व ज्ञान बघुन खरच आश्चर्यचकीत झालो होतो.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

दशानन's picture

3 Mar 2009 - 4:09 pm | दशानन

मस्त माहितीपुर्णलेख आवडला. आणी स्वतःच्या कामाचे यांव आन ढ्यांव पोवाडे न गाता आजुबाजुच्या घटनांचे, मुलांच्या प्रयोगाचे केलेल वर्णन एकदम बहारदार.

१००% सहमत.

छान !

ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

गणपा's picture

3 Mar 2009 - 4:56 pm | गणपा

असच म्हणतो.
१०१% सगमत.

-गणपा

सुनील's picture

3 Mar 2009 - 4:20 pm | सुनील

लेख खूपच आवडला.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ढ's picture

3 Mar 2009 - 4:21 pm |

"जास्त मुलं असतील तर त्या घरातल्या मुलांच्या प्राथमिक गरजाही पूर्न होनार नाहीत. कमी उत्पन्न असताना पाल्कांना मुलांना जास्त सोयी देता येतात, जास्त लक्ष देता येतं..."

इयत्ता ३ री ते ९ वी या वयोगटातील मुलं असा विचार सुद्धा करतात हे उल्लेखनीय आहे.

कवटी's picture

3 Mar 2009 - 4:24 pm | कवटी

वा सुंदर लिहिलयस... आवडल.

दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो
हे खासच.

मुलांशी साधलेल्या संवादावर वेगळा धागा काढून त्यांच्या प्रोजेक्ट्स विषयी अजून सविस्तर माहिती देता येते का बघावे ही विनंती.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2009 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनातला सहजपणा आवडला आणि मुलांच्या प्रयोगाचं केलेलं कौतुकही.
माठाच्या फ्रीजचे प्रयोग बर्‍याच शाळेत होतात असे वाटायला लागलं आहे !
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल अजून डिटेल येऊ द्या..कोणाचा लंबर काढला तेही सांगा !

>>लेखिका नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजिक्समधे कंत्राटी नोकरीवर आहे.
कायमस्वरुपी नौकरी होण्यासाठी शुभेच्छा ! :)

सुंदर लिहिले आहेस गं आदिती...

यानिमित्ताने मुलांची प्रतिभा आणि काहितरी करुन दाखवण्याची जिद्द अगदी जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचते...
मुख्य म्हणजे, मुलांनी किती उत्साहाने हे सगळे केले आणि भाषेच्या अडचणीशिवाय अगदी सहजपणे विशद करुन सांगितले याचे नवल वाटते...

अनेक प्रयोगदेखील अचंबित करुन गेले.. डासांच्या वड्या, डायनामो..., ओलं फडकं,... छानच.... :) आपणही करुन पहायला पाहिजे

पण सगळ्यात हृदयाला किनार लावून गेले ते हे वाक्य " पण पाचवीतला मुलगा जेव्हा रात्री सहा-सात तास वीज नसते सांगत होता तेव्हा खरंच वाईट वाटलं "
खरे तर आपल्या देशाची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते फक्त वचनांवर वचने देत राहतात पण भारताचा बहुसंख्य ग्रामीण भाग अंधारातून प्रकाशात काही येत नाही.

असेच छान छान लिहित रहा..
(विज्ञानप्रेमी) सागर

छोटा डॉन's picture

3 Mar 2009 - 4:57 pm | छोटा डॉन

साध्या सोप्या आणि सरळ भाषेत मांडलेला ग्रासरुट लेव्हलवरचा "विज्ञान दिन" आवडला ...
पहिल्या भागात "कम्युनिकेशन गॅप आणि सरकारी यंत्रणा" ह्याचे मस्त वर्णन केले आहेस ...

खरी मज्जा आहे ती दुसर्‍या भागात, ग्रामीण अथवा निम्नशहरी भागातील लहान मुले आपल्या आसपासच्या परिस्थीतीशी सांगड घालुन विज्ञानाच्या मदतीने आपल्या समस्या आपणच कशा सोडवायच्या ह्याचे प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी विज्ञान दिन अथवा प्रदर्शन वगैरे एक चांगला मंच आहे. इथे त्यांना प्रोत्साहन मिलायलाच हवे ...
त्यांनी चंद्रावर स्वारी करण्यापेक्षा आधी निम्नशहरी भागातले लोडशेडिंग ६ तासावरुन २ तासावर कसे येईल ह्याचा विचार करणे योग्य आणि तेच स्वागतार्ह्य ...
उत्तम ओळख करुन दिलीस ह्या प्रयत्नांची ...

अगदी रहावलं नाही म्हणुन सांगतो की शक्य तितके अशा प्रदर्शनांना व स्पर्धेला हजरी लाऊन त्यांचे कौतुक करणे महत्वाचे. कारण आजच्या मोठ्ठ्यामोठ्ठ्या "संशोधन आणि विकास" मधल्या जिनीयसना सुचणार नाही अशा आयडीया काही वेळा ह्या ग्रासरुटमधुन येतात असा अनुभव आहे. त्यांना प्रोत्साहन हे हवेच अन्यथा ह्या भावना कोमेजुन जातील ...

मस्त लेख, अभिनंदन ...!!!

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सहज's picture

3 Mar 2009 - 5:00 pm | सहज

लेख अतिशय आवडला. एकदम मनमोकळ्या गप्पा गुंफल्या आहेत.

बाईंचा आजवरचा सर्वात उत्तम लेख.

एन.सी.आर.ए. नेहमीचे काम, २८ फेब्रु विज्ञान दिन का म्हणतात, होय होय म्हणता म्हणता नाय नाय चालणारी देशी इश्टाईलचा कारभार. लहान मुलांनी केलेले विज्ञान प्रकल्प, वीजेच्या अभावातील जग,... क्या बात है. केवढी माहीती!

लेख अतिशय आवडला.

अवलिया's picture

3 Mar 2009 - 5:08 pm | अवलिया

अतिशय सुंदर लेख आणि अनुभव चित्रण.

आधी आलेल्या कडवट अनुभवांचा कोणताही खेद न मानता, लहान मुलांमधे मिसळुन त्यांनी काय केले आहे हे पहाण्याची उत्सुकता निश्वितच अनुकरणीय आहे. त्याचबरोबर, ज्ञान हे भाषेमधे बंदिस्त नसते, भाषेचा त्याला अडसर नसतो हा संदेश अतिशय प्रगल्भतेने त्याचबरोबर योग्य जागी पोहोचेल अशा शब्दांत मांडलेले आहे.

आपल्याकडुन खरे तर खगोलशास्त्रासंबंधी अधिक लेखांची आम्हाला अपेक्षा आहे. अर्थातच, आपले कामाचे स्वरुप, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, यासर्वांची सांगड घालतांना अशा पद्धतीच्या लेखांसाठी आवश्यक असणारा निवांतपणा मिळणे कठीण असले, तरी महिन्याला एक लेख अशी क्षुल्लक मागणी फार होणार नाही असे वाटते.

पुनश्च एकवार अभिनंदन!!

--अवलिया

आनंद घारे's picture

3 Mar 2009 - 5:09 pm | आनंद घारे

आधी शहरातील संस्थांमध्ये विज्ञानदिनाच्या कार्यक्रमाचा आलेला अनुभव आणि त्या पार्श्वभूमीवर खेड्यातल्या शाळेतल्या मुलांनी दाखवलेला उत्साह यांचे सुंदर चित्रण केले आहे. कागदाचा लगदा किंवा माठाचा सदुपयोग वगैरे प्रयोग पन्नास वर्षापूर्वी आमच्या लहानपणी करून लोकांना दाखवले जात होते . त्या काळातसुद्धा गामीण भागात वीजटंचाई होती. घरोघरी रॉकेलचे कंदील असायचेच . त्यामुळे सायकलच्या डायनॅमोच्या उपयोगापेक्षा कंदीलाचा वापर करणे अधिक सोपे वाटले असते.

आपल्यावर आलेल्या अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करावा असे लहान मुलांना वाटणे हे प्रयोगातल्या तपशीलापेक्षा सर्वात जास्त महत्वाचे आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

विकास's picture

3 Mar 2009 - 5:17 pm | विकास

अदिती,

हा लेख आणि त्यातील अनुभव खरेच मस्त आहे. असे काही तरी सकारात्मक ऐकायला/वाचायला/अनुभवायला मिळाले तर चांगलेच वाटते, तसे आत्ता झाले.

विंजिनेर's picture

3 Mar 2009 - 5:21 pm | विंजिनेर

विज्ञानदिनी खेड्यातील विद्यार्थ्यांचे प्रयोग आणि त्याचं वर्णन वाचून पाबळच्या विज्ञानाश्रमाची आठवण झाली.
तिथे असे सगळे प्रयोग आहेतच पण त्यांचा उपयोग रोजच्या जिवनातसुद्धा पाबळच्या आणि आसपासच्या खेड्यांतील मुलंमुली इतक्या सहजपणे करतात की बघून थक्क व्हायला होतं.
उगीच आपण शाळा-कालेजात जाऊन डिग्र्या मिळवतो असं वाटतं.

नीधप's picture

3 Mar 2009 - 5:35 pm | नीधप

वा छान.. आता रेग्युलर लिहायला लागा बाई.
बादली ब्युरेटचा प्रयोग म्हणजे त्याच्यामागचा विचार आणि त्याची हाताळणी खूप आवडली...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

3 Mar 2009 - 5:36 pm | विनायक प्रभू

का बरे? हे काही कळले नाही.
लेख छानच

चित्रा's picture

3 Mar 2009 - 5:38 pm | चित्रा

खरेच खूप छान अनुभव. लहान मुलांमध्ये काम करण्याचा अनुभव बरेच शिकवून जात असतो.

उत्तम लेखाबद्दल अभिनंदन!

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 5:59 pm | मेघना भुस्कुटे

खतरनाक लेख आहे आदिती.
फार शब्द न वापरता किंवा फुकाचे निष्कर्ष न काढता तू जे काही झणझणीत अंजन डोळ्यांत घातलं आहेस, त्याला तोड नाही. तुमच्या ऑफिसात कितीतरी लहान मुलं सहलीकरता म्हणूनही येत असतील ना? अशा पाहुण्यांच्या भेटी, काही अंतर्गत राजकारणं, काही सर्जनशीलतेनं आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीत विलक्षण काम करणारी माणसं या सगळ्यांबद्दल लिही ना. आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल.

भडकमकर मास्तर's picture

3 Mar 2009 - 6:11 pm | भडकमकर मास्तर

आपल्या प्रगत आणि आधुनिक वैज्ञानिक भारतातल्या अशा संस्थांमधे काय काय चालतं, ते तरी आम्हांला कळेल.

त्यांना सुखानं नोकरी करूद्यात की... :)

अवांतर : लेख खूप छान झाला आहे...
अभिनिवेशाचा अभाव भावला. हुश्श
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

3 Mar 2009 - 6:20 pm | मेघना भुस्कुटे

अभिनिवेशाचा अभाव भावला.

मास्तर, क्या लिख्या.... ज-ह-ब-ह-रा-हा-ट-ह.

दत्ता काळे's picture

3 Mar 2009 - 6:17 pm | दत्ता काळे

विंजीनेर म्हणतात,
विज्ञानदिनी खेड्यातील विद्यार्थ्यांचे प्रयोग आणि त्याचं वर्णन वाचून पाबळच्या विज्ञानाश्रमाची आठवण झाली.

- त्याप्रमाणे १००% सहमत

रेवती's picture

3 Mar 2009 - 7:29 pm | रेवती

अगदी छान लेख!
लहान वयात या मुलांना किती समजतय!
कुठलाही प्रयोग सादर करताना आपण तोच प्रयोग का करतोय या मागचं भान असलेलं
दिसतं (प्रयोग समजावून सांगताना लगेच कळतं समोरच्याला).
हे सगळ्यात आवडलं. ते योग्य भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार!

रेवती

सखी's picture

3 Mar 2009 - 8:00 pm | सखी

अजुन अनुभव वाचायला आवडेल.

प्राजु's picture

3 Mar 2009 - 9:55 pm | प्राजु

एकूणच छान जमला आहे लेख. मस्तच.
अजूनही लिही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लिखाळ's picture

3 Mar 2009 - 8:49 pm | लिखाळ

लेख आवडला .. कानात-डोळ्यात शिरले नाही हा शब्दछल मस्त :)

मुलांचे कौतूक .. आणि पुढल्या वर्षी साध्या सोप्या मराठीत चांगले तक्ते बनवण्यासाठी शुभेच्छा !
-- लिखाळ.

प्रमोद देव's picture

3 Mar 2009 - 9:55 pm | प्रमोद देव

लेख आवडला.
लहानग्यांची कल्पनाशक्ती भन्नाट असते. फक्त त्यांना योग्य संधी आणि उत्तेजन देणे महत्वाचे असते.
ह्या बाल वैज्ञानिकांमधूनच उद्याचा एखादा नोबेल पारितिषिक विजेता उदयाला येईल.
अजून असेच लेखन येऊ दे.

मिहिर's picture

3 Mar 2009 - 10:45 pm | मिहिर

खरोखर अप्रतिम लेख आहे.

चतुरंग's picture

3 Mar 2009 - 11:04 pm | चतुरंग

पाणीटंचाई, वीजटंचाई आणि गरिबीच्या भीषण दुष्काळाशी सामना करुनही विज्ञानाची आच जितीजागती ठेवणार्‍या संशोधक मुलामुलींची कहाणी आमच्यासमोर मांडणार्‍या तुझ्यातल्या कट्टर संशोधिकेला सलाम!!
समाजाच्या विषण्ण करणार्‍या अनास्थेने किती बुद्धिमान कळ्या उमलतानाच खुडल्या जात असतील ह्याची गणतीच नाही!! फार वाईट वाटतं असं काही वाचून.
माझ्यासमोरचे प्रश्न हे प्रश्नच नव्हेत असं आता मला वाटायला लागलंय! :(

चतुरंग

विसोबा खेचर's picture

4 Mar 2009 - 12:10 am | विसोबा खेचर

पाणीटंचाई, वीजटंचाई आणि गरिबीच्या भीषण दुष्काळाशी सामना करुनही विज्ञानाची आच जितीजागती ठेवणार्‍या संशोधक मुलामुलींची कहाणी आमच्यासमोर मांडणार्‍या तुझ्यातल्या कट्टर संशोधिकेला सलाम!!

हेच बोलतो..!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2009 - 2:33 am | मुक्तसुनीत

चतुरंग यांनी अगदी नेमक्या शब्दात माझ्याच भावना व्यक्त केल्या आहेत. मला हेच म्हणायचे होते.

तू जे काम केलेस त्या अनुभवाचा , त्या भागातल्या मुलांकरता थोडा अधिक उपयोग कसा करून घेता येईल ? शाळेतल्या या मुलांकरता इतर काही योजना तुझ्याकडे आहेत का ? तशा प्रकारची योजना इथे मांडता येईल का ?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Mar 2009 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम लेख. सुंदर मांडणी. तुझ्या नेहमीच्या शैलीत आहे.

या मुलांची प्रोजेक्ट्स पाहून आपण किती वेगळ्या जगात रहातो ते लक्षात आलं.

भेदक सत्य / वास्तव. आणि दुर्दैव म्हणजे, आपल्यापैकी प्रत्येक जण याचा विचार न करता आपली चौकट दुसर्‍याला लावून मत प्रदर्शन करतो.

तू जास्त लिहित नाहीस हे आमचे दुर्दैव, अजून काय....

बिपिन कार्यकर्ते

धनंजय's picture

4 Mar 2009 - 12:38 am | धनंजय

आणि त्याचे वर्णन, (नेहमीसारखी) मनमोकळी शैली आवडली.

घाटावरचे भट's picture

4 Mar 2009 - 12:47 am | घाटावरचे भट

उत्तम!!

भाग्यश्री's picture

4 Mar 2009 - 1:09 am | भाग्यश्री

अप्रतिम!! वरच्या सर्वांशी सहमत..
लै भारी झालाय लेख!!

http://bhagyashreee.blogspot.com/

अनुजा's picture

4 Mar 2009 - 1:48 am | अनुजा

फारच छान लिहिलय.. अनुभवही खूपच छान आहे.. अजून ह्या मुलांच्या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल.

टिउ's picture

4 Mar 2009 - 8:37 am | टिउ

खुप छान लेख आहे अदिती...असाच अनुभव मी मागे एकदा मलकापुरला गेलेलो असतांना आला. म्हणजे मी परिक्षक नव्हतो, पण अमेरिकेहुन (!) आलेलो असल्यामुळे 'ऑलमोस्ट' परिक्षक होतो. B) तेव्हाही त्या मुलांनी केलेले प्रयोग, 'टाकाऊतुन टिकाऊ', ते समजावतांना त्यांचा असलेला आत्मविश्वास बघुन थक्क व्हायला झालं होतं!

अमृतांजन's picture

4 Mar 2009 - 8:39 am | अमृतांजन

वृत्तांत आवडला.

गावातील सामान्य गरजा व अडचणी काय असतात व अशा प्रयोगातून त्या कशा सोडवता येतात हे मुलांना कळणे फार महत्वाचे आहे.

एक प्रश्न- अशा विज्ञान प्रयोगाचे विषय कोण ठरवतं?

चिन्या१९८५'s picture

9 Mar 2009 - 10:28 pm | चिन्या१९८५

छान लेख!!!!

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

मृदुला's picture

10 Mar 2009 - 4:21 am | मृदुला

लेख आवडला.

तरी गावाकडचे विज्ञान कडुनिंब, माठाचा फ्रिज, सायकलची बॅटरी इथेच थांबले आहे हे पाहून वाईटही वाटले. वीसेक वर्षांपूर्वी मी शाळेत असताना विज्ञान आणि गणित शिकले तेव्हाचे प्रयोग असेच होते.

नंदन's picture

10 Mar 2009 - 5:27 am | नंदन

लेख, अतिशय आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी