माझा विज्ञानदिन
लेखनप्रकार
बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं. एक माझ्या हापिसात आले, "माझा असा विचार आहे, की एकदा ही प्रपोजल डेडलाईन झाली की मग तुम्ही सगळे पोस्ट-डॉक्स आणि मी, आपण विज्ञान दिनाची तयारी करू या." "हरकत नाही, एकदा हे प्रपोजल होऊ देत, मग आपण सहाजण बसू या सोमवारी." मग प्रपोजल लिहिताना एकदा विज्ञान दिन कधी आहे याचीही माहिती काढली, गुगलबाबा जिंदाबाद! २८ फेब्रुवारीला आपल्याकडे विज्ञान दिवस असतो. तीच तारीख का, तर त्याच दिवशी सर चंद्रशेखर व्यंकटरामण यांनी भौतिकशास्त्रातल्या 'रामन परीणामा'चा शोध लावला. त्याच शोधामुळे भारताला प्रथमच विज्ञानक्षेत्रातला नोबेल पुरस्कार मिळाला. ही माहिती काढली तेव्हा क्यांपुटर तारीख दाखवत होता, १२ जानेवारी. काहीच हरकत नाही, एक महिन्यातसुद्धा काम पूर्ण होऊ शकतो. पाच पोस्टडॉक्स, म्हणजे प्रत्येकी दहा पोस्टर्स बनवली तरीही चिक्कार झालं असं गणित डोक्यात झालं.
मधल्या काळात मुळा-मुठेतून बरंच (प्रदूषित) पाणी वाहून गेलं. टाईम्स ऑफ इंडिया नामक प्रथितयश वर्तमानपत्रात जी.एम.आर.टी. 'आयुका'च्या प्रयत्नातून बनली असं छापून आलं. अर्थातच एन.सी.आर.ए.मधे याची तिखट प्रतिक्रिया आलीच. जी.एम.आर.टी.(ग्रम्ट) हे प्रा. गोविंदस्वरूप यांच्या प्रयत्नांमधूनच तयार झाली आहे आणि यात कोणत्याही खगोलाभ्यासकाचं दुमत नाही. तरीही आयुकामधून यावर काही पत्रं नाही म्हणूनही एन.सी.आर.ए.मधे लोकं जरा एकत्र झाली. आपणही काही चांगलं काम करून प्रसिद्ध झालं पाहिजे असं मानणार गट पुन्हा सक्रिय झाला, 'विज्ञान दिवसाला अनेक वृत्तपत्रांमधून आपले लेख छापून आले पाहिजेत' असंही कानावर आलं, पण पुन्हा डोळ्यात काहीच येत नव्हतं. अर्थात हे सगळं गॉसिप समजतं आपण वेळेवर चहा, जेवणाला गेलं तर; वाट्टेल त्या वेळेला मिपा-मिपा खेळत बसलं तर काहीही नाहीच. त्यामुळे अर्थातच मी या सगळ्या गोष्टी काम आणि मिपाखेळात विसरूनही गेले.
आता आला २५ फेब्रूवारी. स्थळ माझंच ऑफिस, तोच बॉस नं एक पुन्हा माझ्या हापिसात! समोरचा म्याप कसा चांगला बनवता येईल याच्या गहन विचारात मी पेंग आलेल्या स्थितीमधे; "पोस्टरचं कुठवर आलं?" माझी पहिली प्रतिक्रिया, "ऍऽऽऽ????" वाटलेलं आश्चर्य चेहेर्यावरून ओसंडून वहात होतं. "पोस्टर्स गं! आपलं ठरलं होतं ना पोस्टर्स बनवायची पोस्टडॉक्सनी?" "हो, पण तुम्ही आम्हाला सगळं काम वाटून देणार होतात ना?" मी अजूनही गोंधळलेलीच. बॉसच्या चेहेर्यावरचा गोंधळ एक्स्पोनेंशली वाढत होता, "म्हणजे?"... गोंधळ झाला आहे, आता पुरेसा वेळ नाही, आता आहेत त्या पोस्टर्सवरच चालवून घ्यावं लागणार हे लक्षात आलं. थोड्या वेळातच एका आणखी मोठ्या बॉसचं बोलावणं आलं, "चला म्याडम, आज काम होणार दिसत नाही. आलिया भोगासी ..." मी निघाले. नेहेमीप्रमाणे प्रसन्नमुखाने स्वागत करून त्यांनी माझ्या कामाबद्दल चौकशी केली. आणि मग काम सांगितलं, "'ग्रम्ट'ला 'आय.बी.एन. लोकमत'वाले शनिवारी, विज्ञान दिवसाला येणार आहेत. त्यांना मराठी बोलणारा/री खगोलाभ्यासक हवा/वी आहे..." "वाह, हे तर उत्तमच. आपली फुकटची जाहिरातपण होईल." "मग तुला चालेल ना आदल्या दिवशी तिथे जाऊन च्यानेलवाल्यांना मुलाखत द्यायला?" त्यांनी विचारलं. "हो, हो, अर्थातच! आपली जाहीरात होत आहे तर मला आनंदच आहे."
शुक्रवारी दिवसभर काम करून मी गेले 'ग्रम्ट'ला! तिकडे गेल्यावर कळलं आणखी एकाने च्यानेलवाल्यांना 'येऊ नका' असं सांगितलं आहे, आणि एकाच बिल्डींगमधे काम करणारी मी मात्र संपूर्ण अनभिज्ञ! झाला ना मुलाखतीचा मारूती कांबळे ... आणखी एक राजकीय बळी! Welcome to India!! आजपर्यंत ऐकलं होतं, आता पहिला अनुभवपण होता. विज्ञान दिनाच्याच अनुषंगाने एवढं Communication breakdown तर आधीच बघून झालेलं होतं ... प्रचंड वैतागले. सगळा राग काढला, नेहेमीप्रमाणे भरपूर शिव्या घालून घेतल्या, फोनाफोनी केली, आणि गपगुमान जाऊन झोपले. झोपताना ठरवलं, बस्सं हे शेवटचं, यापुढे विज्ञान दिवस असेल नाहीतर आणखी काही, मी हे ह.प.चे.ध (हजामपट्टीचे धंदे) करणार नाही. सकाळी उठले, चहासाठी बाहेर पडले आणि मग मात्र मूड बदललेला होता. मस्त हवा होती, सुंदर सूर्योदय दिसला आणि थोड्या वेळात एन.सी.आर.ए.मधून सगळे मित्र-मैत्रीणीही आले. मग सुरू झाला आमचा विज्ञान दिवस. (फोटो मात्र फारसे काढता आले नाहीत कारण तिथे फार धूळ होती, तिथे कॅमेरा काढायचं जीवावर येत होतं.)
सकाळी सकाळी पोरांना पोस्टर्स दाखवून, उन्हात फिरून, सवय नसल्यामुळे माझं उसाचं चिपाड झालं होतं. एक मित्र आणि मी जेवण घेऊन बसलो तेवढ्यात बॉस नं. एक आला आणि जेवण घेऊन शेजारीच बसला. "मी विचार करत होतो, आपल्याकडे हे जे आता शाळेतल्या मुलांचं विज्ञान प्रदर्शन भरलं आहे, त्याची परीक्षक म्हणून काम करशील का? जेवण होऊ देत, थोडा आराम कर मग सुरूवात करता येईल. तुला परीक्षणाचं काम सांगायला काहीच हरकत नाही आणि तुला मराठीही येतं." "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..." नाही म्हणता आलं नाही, मराठीचा मुद्दा आला की नाही म्हणता येतच नाही. इथे दोनच मराठी खगोलाभ्यासक त्यातला एक व्याख्यान देत होता, राहता राहिले मीच! म्हटलं हो, खोडद नावाच्या खेड्याजवळच्या (पुण्यापासून ९० किमी, नाशिकच्या दिशेने) शाळांमधल्या मुलांची काय ती प्रोजेक्ट्स असणार? आणि तोच माझा गैरसमज होता. तेवढ्यात पुन्हा बॉस नं. एक आला, "हा रमेश भट, तुझी याच्याशी ओळख आहेच ना? आणि हा विलम, त्याचा स्विनबर्नमधला कलीग. ही पोस्टडॉक आहे एन.सी.आर.ए.मधे. तुम्ही तिघंजण परिक्षक आहात, आणि ही तुम्हाला भाषांतरात मदतही करेल. पाच मिनीटात तो आपला हा तुम्हाला मुलांची आणि प्रोजेक्ट्सच्या माहितीचे प्रिंट्स देतील." ही माहिती मिळेपर्यंत आम्ही गप्पा मारायला लागलो. आमचे अनेक कॉमन मित्र आहेत त्यांच्याबद्दल बोलून झालं, विलमला थोडं मराठी शिकवलं, त्या दोघांची औरंगाबाद-अजिंठा-वेरूळची सहल प्लॅन करून दिली तेव्हा कुठे "आमची पाच मिनिटं झाली", आणि मुलं आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सची यादी आणून दिली. आता आम्ही निघालो परीक्षणाला!
आम्ही तिघांनी शाळेतल्या (तिसरी ते नववी) मुलांची प्रोजेक्ट्सची पहाणी करायची ठरवली. मुलांमधे प्रचंड आत्मविश्वास होता. इंग्लिश माध्यमात शिकणार्या मुलांचीही इंग्लिश भाषेची अडचण होती पण मराठीमात्र अगदी व्यवस्थित बोलत होती. रमेश आणि विलमसाठी भाषांतर करायला मी होतेच. पण मुलं एवढं व्यवस्थित समजावून सांगत होती की खूप जास्त भाषांतर करायला लागतच नव्हतं. त्यातली काही मला मनापासून आवडलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगते. एका मुलीने स्वस्तातल्या डासांच्या वड्या बनवल्या होत्या. साधा वहीचा पुठ्ठा डासांच्या वड्यांच्या आकारात कापायचा, कडूलिंबाच्या तेलात बुडवायचा की एक दिवसासाठी डास घराबाहेर. हे अस्त्रं 'चांगल्या सरदारा'पेक्षाही भारी असतं आणि गेला महिनाभर आम्ही हेच वापरत आहोत, डासांचा त्रास अगदीच नगण्य होत आहे असा अनुभवही तिने सांगितलं. एका दिवसाचा एक पैसा!
सायकलला डायनामो लावून बॅटरीज चार्ज करायच्या आणि ती वीज रात्री दिवे गेले की ही बॅटरी वापरायची. सायकलच्या डायनामोवर तिथल्यातिथे दिवा लावायची कल्पना जुनीच आहे, पण पाचवीतला मुलगा जेव्हा रात्री सहा-सात तास वीज नसते सांगत होता तेव्हा खरंच वाईट वाटलं. तिथली बरीच प्रोजेक्ट्स डायनामो किंवा सोलर पावरवर होती. ग्रामीण भागात विजेचा प्रश्न किती गहन झाला आहे याचा त्यावरून चांगलाच अंदाज येत होता.
आणखी एक प्रोजेक्ट खरोखर उल्लेख करण्यासारखं होतं, त्याला विज्ञान म्हणून मी फार गुण दिले नाहीत पण मला आवडलं. त्याने तीन छोट्या बाटल्या ब्युरेट्सना जोडल्या होत्या. एक बाटली एकाच ब्युरेटला, दुसरीला दोन ब्युरेट्स आणि तिसरीला तीन. तीनही बाटल्यांमध्ये समान प्रमाणात द्रवपदार्थ होता. बाटल्यांची उंची वाढवल्यावर ते द्रव ब्युरेट्समधे गेलं. जिथे एकच ब्युरेट होती तिथे द्रवाची उंची सगळ्यात जास्त होती आणि तीन ब्युरेट्स होत्या तिथे सगळ्यात कमी. मुलगा सांगत होता, "जास्त मुलं असतील तर त्या घरातल्या मुलांच्या प्राथमिक गरजाही पूर्न होनार नाहीत. कमी उत्पन्न असताना पाल्कांना मुलांना जास्त सोयी देता येतात, जास्त लक्ष देता येतं..."
एका मुलाने कागद रिसायकल करण्याचं प्रोजेक्ट केलं होतं. वापरलेला कागद पाण्यात टाकून त्याचा लगदा बनवायचा, त्याचं ब्लिचींग करायचं, कचरा काढून टाकायला चाळणीतून काढायचं आणि मग लगदा वाळवायचा. उत्तम टीपकागद तयार झाला होता.
आणखी एका मुलीने फ्रिजला पर्याय शोधला होता. मडक्याच्या तळाला मीठ किंवा रेती घालायची, वर आणि मडक्याच्या बाजूला नारळाचा काथ्या लावायचा. आत भाजी ठेवायची आणि वरून ओलं फडकं लावायचं. फडकं ओलं ठेवून दिलं तर आठवडाभर भाज्या वापरण्यायोग्य रहातात.
या मुलांची प्रोजेक्ट्स पाहून आपण किती वेगळ्या जगात रहातो ते लक्षात आलं. ज्यांना फ्रिज परवडत नाही ... फ्रिज परवडत ना ही ?? दिवसात बारा-चौदा तास वीज नसते?? त्यातून तो डायनामो परिणाम सांगताना ती मुलं मला विद्युतघट, विद्युत्प्रवाह वगैरेंबद्दल सांगत होती. "इलेक्ट्रीकल सर्किट पूर्ण होतं" हे वाक्य मला नाही पूर्ण मराठीत बोलता येत! आठवीच्या पुढे मी सायन्स आणि मॅथ्स शिकले, ही मुलं मात्र विज्ञान आणि गणित शिकतात. इतकी मस्त आत्मविश्वासाने ती बोलत होती. विलमतर ऑस्ट्रेलियन, त्याला हिंदीसुद्धा येत नाही, पण अनेक प्रोजेक्ट्स समजावताना त्याला मराठीतून इंग्लिश भाषांतराचीही गरज पडली नाही.
तीन वाजता सुरू केलेलं परीक्षण संध्याकाळी सव्वापाचच्या पुढे संपलं. आम्ही संपूर्ण दमलो होतो, प्रचंड तहान लागली होती. एवढा वेळ उन्हात उभं राहिल्यामुळे (पुढे दोन दिवस) पाय दुखत होते. परत येताना माझ्या डोक्यात मात्र काही प्रश्न होते, दहावीतही ही मुलं नाहीत आणि यांना वीजटंचाईचा विचार करायला लागतो. फारसे काही रीसोर्स नसताना ही मुलं एवढा विचार करतात. आपण इथे मराठी-अमराठी म्हणून वाद घालत बसतो, मराठी लोकांना मराठीची लाज वाटते का म्हणत बसतो, आणि ही मुलं बिन्धास्त विलमशी मराठीत बोलत होती, अर्थात तिथे 'गोर्या कातडीचं आकर्षण'ही होतंच. रात्री दमून भागून जेवताना पुढच्या वर्षी एवढे कष्ट करून तिकडे जायचं का नाही हा प्रश्न नव्हताच; प्रश्न एवढाच आहे मी एका वर्षात किती पोस्टर्स मराठीत बनवू शकते!
लेखिका नॅशनल सेंटर फॉर रेडीओ ऍस्ट्रोफिजिक्समधे कंत्राटी नोकरीवर आहे.
वाचने
9342
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
फार छान!
मस्त आहे लेख.
In reply to मस्त आहे लेख. by अमोल खरे
"परत हे
लेख आवडला.
मस्त
In reply to मस्त by परिकथेतील राजकुमार
मस्त
In reply to मस्त by दशानन
असच म्हणतो.
छान लेख.
छान लेख.
वा सुंदर
छान !
खूपच सुंदर... साक्षात समोर घडल्यासारखा वाटला..
सुंदर लेख ...
सुंदर
सुरेख !!!!!
सुंदर लेख
आवडला
छान लेख
वा छान.. आता
कंत्राटी
अदिती,
खतरनाक लेख
In reply to खतरनाक लेख by मेघना भुस्कुटे
आपल्या
In reply to आपल्या by भडकमकर मास्तर
अभिनिवेशा
लेख चांगला झाला आहे
अगदी छान
In reply to अगदी छान by रेवती
असेच म्हणते
In reply to असेच म्हणते by सखी
हेच म्हणते..
लेख आवडला ..
मस्त!
मस्त
जबरदस्त लेख अदिती!!
In reply to जबरदस्त लेख अदिती!! by चतुरंग
पाणीटंचाई,
In reply to जबरदस्त लेख अदिती!! by चतुरंग
+१
उत्तम लेख.
मुलांचे कल्पक प्रकल्प
उत्तम!!
अप्रतिम!!
फारच छान
उत्तम...
वृत्तांत
छान
लेख
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी