निघाला (गजल)

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
26 Mar 2017 - 10:40 pm

ज्याला हवे कळाया, तो भाबडा निघाला
नको नेमका तो, मनकवडा निघाला

त्याची अदा निराळी, मी लुब्ध आज झाले
अंदाज हा चुकीचा, तो दारुडा निघाला

नीती नियम सारे, त्याला जरी पढवले
माणूस पाहण्याला, तो नागडा निघाला

घेऊन कर्ज माथी, ते शेतात पेरले
म्हशीला टोणगा, ढग कोरडा निघाला

नागास पाहता मी, वार इतके केले
घाव ज्यावरी झाला, तो केवडा निघाला

शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला

देवास नवसून, ज्यास हुलकावले
‘तो’ पाहतो म्हणणारा शेंबडा निघाला

(दोस्त हो, इथे नुकतेच पदार्पण केले. आणि इतरांच्या अतिशय सुंदर गजल वाचून प्रभावित झालो. ही माझी पहिलीच गजल आहे. नियमांचा फारसा अभ्यास न करता लिहिली आहे. चुकत माकत शिकायलाच आवडते. बरोबर उतरली आहे की नाही हे कळल्यास आनंद वाटेल.)

कवितागझल

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

27 Mar 2017 - 1:19 am | पद्मावति

गजल आवडली . नियम मलाही काही माहीत नाही पण ही रचना मनाला भावली. सुरेख लयबद्ध आहे.
फक्त शेवट मात्र कळला नाही. शक्य झाल्यास समजावुन सान्गा प्लीज.

संदीप-लेले's picture

27 Mar 2017 - 6:19 pm | संदीप-लेले

देवाला नवस करून, (देवळातून बाहेर पडले, तर समोर याचक होता - हा गर्भित अर्थ आहे), त्याला टाळले / हुलकावले.

म्हणजे आत स्वतः:साठी बरेच काही मागितले आणि बाहेर दुसऱ्याला थोडेही द्यायची तयारी नाही !
तेंव्हा तो याचक म्हणतो तुमचं हे वागणं 'तो' (देव) पाहतो आहे. शेम्बडा हा शब्द याचक कोवळ्या वयाचा आहे असं दर्शवण्यासाठी आहे. म्हणजे लहान मुलाला जे कळते ते मोठ्यांना वळत नाही असे दाखवायचे आहे.

वेल्लाभट's picture

27 Mar 2017 - 8:09 am | वेल्लाभट

वा उत्तम भाव. एक दोन शेर तर सुरेखच.

समाधान राऊत's picture

27 Mar 2017 - 2:46 pm | समाधान राऊत

शत्रूस पाजून पाणी, सैनिक तहानलेले
नदीच्या पात्राचा रंग तांबडा निघाला

संदीप-लेले's picture

27 Mar 2017 - 6:20 pm | संदीप-लेले

वेल्लाभट आणि समाधान राऊत, मनापासून आभार :)

खग्या's picture

27 Mar 2017 - 9:21 pm | खग्या

सुन्दर

शार्दुल_हातोळकर's picture

28 Mar 2017 - 11:32 pm | शार्दुल_हातोळकर

वाह !! प्रयत्न नक्कीच चांगला आहे.

संदीप-लेले's picture

29 Mar 2017 - 7:45 pm | संदीप-लेले

:)

चौकटराजा's picture

29 Mar 2017 - 11:15 am | चौकटराजा

काही ठिकाणी लय गंडलेली आहे.

संदीप-लेले's picture

29 Mar 2017 - 7:45 pm | संदीप-लेले

म्हणजे नक्की काय? आणि कुठे?

हे केवळ एक उदाहरण पाहा....

साऱ्या नीतीकथा मी अध्यापिल्या जयास
माणूस मानण्याला तो नागडा निघाला

संदीप-लेले's picture

30 Mar 2017 - 6:42 pm | संदीप-लेले

" सर्वप्रथम शेरांमधे लय आणि सहजता पाहिजे असे वाटते "
बरोबर.

मात्रावृत्त / अक्षरगणवृत्त ई. गजलेच्या व्याकरणाची माहिती करायची आहे. ती झाल्यावर लयीचा अंदाज येईल असे वाटते.

शार्दुल_हातोळकर's picture

30 Mar 2017 - 11:13 pm | शार्दुल_हातोळकर

मराठी गझलमधे लय, सुबोधता, सहजता आणि खोल अर्थ इत्यादी गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या. त्या साध्य झाल्यावर वृत्त, मात्रा, व्याकरण यामधे उन्नीस-बीस झाले तरी फारसा फरक पडत नाही.

बाकी गझल सर्वसामान्य रसिक वाचकाच्या ह्रदयापर्यंत पोचणे महत्त्वाचे आणि गझलेचा अर्थ रसिकांना समजुन सांगण्याची वेळ गझलकारावर अजिबात येता कामा नये.

आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याला सुचलेली कल्पना/विचार वगैरे कोणत्या वृत्तात म्हणजे थोडक्यात सांगायचे तर किती मात्रा/अक्षरांच्या ओळीमधे व्यवस्थित बसेल हे प्रथम ठरविणे उत्तम. म्हणजे नंतर एखादा चांगला आशय शेरामधे ओढुन ताणुन बसविण्याची वेळ येत नाही.

विशाल कुलकर्णी's picture

30 Mar 2017 - 11:32 pm | विशाल कुलकर्णी

वृत्ते व्यवस्थीत अभ्यासली की मग आपोआप वृत्तबद्ध आणि लयबद्ध लिहीणे सुरू होते. सरावाने सहज जमेल तुम्हाला.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा 'वृत्तबद्ध' कविता आणि गझल यात फरक आहे.

विशाल कुलकर्णी's picture

30 Mar 2017 - 11:34 pm | विशाल कुलकर्णी

बाकी तुमच्याशी बोलल्याप्रमाणे हि रचना 'गझल' या प्रकारात मोडत नाही. आपल्यातल्या चर्चेनुसार काही बदल करता येताहेत का ते पाहा. जमतील तुम्हाला सहज. शुभेच्छा !

संदीप-लेले's picture

8 Apr 2017 - 1:47 am | संदीप-लेले

शार्दुल आणि विशाल,

स्वत:च्या लिखाणा विषयी नवीन msg आल्याचे इथे सूचित होत नाही असे दिसते. त्यामुळे तुमचे नवीन msg मी आत्ता पाहिले.
सूचनांचे स्वागत.
आधी गजलेचे व्याकरण थोडे समजून घेतो - मग दुरुस्ती चे पाहतो.
धन्यवाद !