मी गेल्यावर वि़झुनी जातील
रत्नदीप आकाशी
मी गेल्यावर थांबून राहील
वीज तशी मेघाशी
मी गेल्यावर पोर्णिमेसही
चंद्र यायचा नाही
मी गेल्यावर रवी तळपूनी
तेज द्यायचा नाही
मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ
शूरवीर बलशाली राजे
किती जाहले येथे
स्मरण तयांचे या जगताला
कुठे आज रे होते
नररत्नांची ही पहा अवस्था
काय आपुले आहे
आपुल्यानंतर कशास वेड्या
नाव आपुले राहे
चैनीमध्ये दिवस संपला
धुंदीमध्ये राती
भोगून भोगून क्षीण जाहली
आयुष्याची ज्योती
तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
गेल्यानंतर दोन अश्रुही
कोण तुला देणार
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 6:27 pm | सालोमालो
पुष्कराज, मित्रा जिंकलस!
चैनीमध्ये दिवस संपला
धुंदीमध्ये राती
भोगून भोगून क्षीण जाहली
आयुष्याची ज्योती
फार सुंदर!
अजुन येउ दे.
सालो
19 Feb 2009 - 6:30 pm | लिखाळ
फार छान.. एकदम आवडली कविता..
आशय आणि रचना दोन्ही मस्त !
-- लिखाळ.
19 Feb 2009 - 6:46 pm | मनीषा
मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ ..... सुंदर
सुरेख कविता !!!
19 Feb 2009 - 7:45 pm | संदीप चित्रे
>> चैनीमध्ये दिवस संपला
धुंदीमध्ये राती
भोगून भोगून क्षीण जाहली
आयुष्याची ज्योती
या ओळी विशेष आवडल्या.
भा. रा. तांबेंची 'जन पळभर म्हणतील हाय हाय' आठवली.
तसेच सुधीर मोघेंच्या 'दयाघना...'मधील या ओळी आठवल्या --
बालपण उतू गेले
तारुण्य नासले
वार्धक्य साचले
20 Feb 2009 - 6:51 am | प्राजु
खूपच सुंदर आहे कविता. आशय अतिशय सुंदर आणि गंभिर आहे.
आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Feb 2009 - 8:26 am | राघव
सुंदर कविता. :)
तुमच्या आधीच्या कविता अन् ही कविता - एकदम वेगळी प्रकृती/मांडणी/शब्दयोजना.
सुंदर. येऊ द्यात अजून :)
मुमुक्षु
20 Feb 2009 - 8:29 am | उपटसुंभ
वाहवा..! सुंदर..!
एकदम आवडेश..! :)
20 Feb 2009 - 5:52 pm | दत्ता काळे
कविता फार सुंदर आहे.
20 Feb 2009 - 6:44 pm | शितल
कविता आवडली. :)
20 Feb 2009 - 6:44 pm | शितल
कविता आवडली. :)
21 Feb 2009 - 1:15 am | बेसनलाडू
आशयगर्भ, लयबद्ध कविता आवडली.
(मर्त्य)बेसनलाडू
21 Feb 2009 - 2:19 am | llपुण्याचे पेशवेll
वाहवा सुंदर कविता. :)
आवडलीच.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984