चला, शिकू या ओरिगामी – भाग ५ (अंतिम) – अॅक्शन ओरिगामी, प्रदर्शनाचं निमंत्रण

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in मिपा कलादालन
24 Dec 2016 - 3:20 pm

|| श्री गुरवे नम: ||

चला, शिकू या ओरिगामी – भाग ५ (अंतिम) – अॅक्शन ओरिगामी, प्रदर्शनाचं निमंत्रण
व्हिडिओ लेखमाला

चला, शिकू या ओरिगामी भाग १ - कागदपुराण, भाग २ - डोंगर-दरी, मूलभूत आकार, भाग ३ - कप, ट्रे, पेंग्विन, भाग ४ – तिळगुळाची वाटी, फुलं इ.

लहानांना आणि मोठ्यांनासुद्धा – मलासुद्धा - अतिशय आवडणारा ओरिगामीचा प्रकार म्हणजे अॅक्शन ओरिगामी. बनवायला अगदी सोप्या आणि अतिशय मनोरंजक अशा, ओरिगामीतल्या हलत्या-बोलत्या काही प्राणी-पक्षी कलाकृती पुढच्या (आणि शेवटच्या) भागात तुम्हाला ओरिगामी प्रदर्शनाचं निमंत्रण देणार आहेत.

(ह लेख पुन्हा टाकत आहे.)

डिस्क्लेमर : या आणि यापुढील सर्व भागांमधल्या व्हिडिओंमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्व ओरि-कलाकृती अनेक शतकांपासून प्रचलित असलेल्या पारंपरिक (Traditional) कलाकृती असून त्यांचे अभिकल्पक (Designers) अज्ञात आहेत. या सर्व ओरि-कलाकृतींचे अभिकल्प (Design), त्या तयार करण्याचं आरेखन (Line Diagramming) आणि ते बनवण्याचे व्हिडिओ बनवून ते कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करणं संपूर्ण जगभर पूर्णत: स्वामित्व हक्कविहीन (प्रताधिकारमुक्त) आहेत. ज्या कलाकृती तयार करण्याचे व्हिडिओ बनवून ते मिपावर वा महाजालावर वा अन्यत्र प्रकाशित केल्यामुळे कोणाचेही कसल्याही प्रकारचे स्वामित्व हक्क भंग होणार नाहीत, अशाच कलाकृती व्हिडिओ बनवण्यासाठी निवडल्या आहेत. अर्थातच, या लेखमालेसाठी मी बनवलेले सर्व व्हिडिओसुद्धा प्रताधिकारमुक्त आहेत. (माझेच व्हिडिओ अन्यत्र वापरून माझ्यावरच वाङमयचौर्याचा आरोप होऊ शकतो, म्हणून माझ्या बाजूने हे स्पष्टीकरण.)

लहान मुलांशी जवळीक साधायला अॅक्शन ओरिगामीसारखं दुसरं साधन नाही. प्रदर्शनात सर्वात जास्त गर्दी खेचून घेणारया कलाकृती म्हणजे अॅक्शन ओरिगामी. यातल्या दोन सोप्या कलाकृती तयार करू या.

टंबलिंग टॉय (जपानी नाव – कोटोंगा काँग)
बुक फोल्डपासून सुरुवात करून हाउस फोल्ड करून नंतर कबर्ड फोल्ड केला की तयार झालं हे कोलांटी मारणारं खेळणं. बनवायला अतिशय सोपं. जडत्व (inertia) आणि गुरुत्वमध्य (centre of gravity) या भौतिकशास्त्रातल्या दोन संकल्पना समजवायला हे अतिशय उपयुक्त आहे. चला तर, तयार करू या टंबलिंग टॉय.

https://youtu.be/3z0Uiy74tDM

सुतारपक्षी
फक्त दोन-तीन घड्या घालून काइट बेसपासून हा सुतारपक्षी तयार होतो. जरा कडक, जाड कागद घेतला तरी चालेल. हा सुतारपक्षी समोरच्या झाडावर चोच आपटताना खरोखर आवाज येतो. करूनच पाहू या.

https://youtu.be/SccPAOjUmdg

आता अशाच अॅक्शन ओरिगामी कलाकृती तुम्हाला ओरिगामी प्रदर्शनाचं आमंत्रण देत आहेत -

बोलणारा कुत्रा
सुतारपक्षी
बोलणारा हत्ती
बोलणारा बेडूक
बोलणारा पक्षी
धडकणारं हृदय
उडणारा पक्षी
फायरवर्क्स
टंबलिंग टॉय (जपानी नाव – कोटोंगा काँग)
पाणी पिणारा पक्षी
कान हलवणारा हत्ती
ओठ

https://youtu.be/6oc4ddHoJeY

तेव्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. पत्रिकाही सोबत देत आहे.

Wonderfold2016

(समाप्त)

उपोद्घात

प्रदर्शन खूप छान झालं. त्या दिवसांत लग्नाचे मुहूर्त असूनही हजारो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. अनेकांनी कार्यशाळांमध्ये ओरिगामी शिकून घेतली, सरावासाठी कागद घेतले.

या वेळी प्रथमच वृत्तवाहिन्यांनी प्रदर्शनाचं वृत्तांकन केलं. आयबीएन लोकमतने तब्बल सव्वाअकरा मिनिटांचं वृत्त तीन दिवसांत बऱ्याच वेळा दाखवलं. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरही ते अपलोड केलंय.

https://youtu.be/I6lkCKqaElY

प्रतिक्रिया

ओरिगामीचे पाचही भाग छान झाले. बेसिक ओरिगामी शिकताना मजा आली. तुम्ही व्हिडीओज वगैरे तयार करून, ओरिगामी शिकायला मदत केली त्याबद्द्ल तुमचे धन्यवाद. ओरिगामी प्रदर्शन छान झालं असं त्या बातमीतून दिसतंच आहे. ओरिगामीचं प्रदर्शन पुण्यात कधी भरवणार? नोव्हेंबर २०१५ मधे पुण्यात टिळक स्मारक मंदिरात एक प्रदर्शन भरलं होतं. तिथे घुबड, मोर, फुलं आणि इतर कलाकृती पाहून भारावून गेले होते. एक घुबड तर इतका आवडला की तसा घुबड करायला शिकायला हवा म्हणून मी ओरिगामी शिकायला लागले. गेल्या वर्षात काही बरेच सोपे आकार करून बघितले. सगळ्यात पहिले तर वटवाघूळ केला. :) (हाही माझा आवडता) नंतर मग फुलपाखरू, हत्ती, क्यूब रोज, डायनासोर असे सोप्पे आकार करून बघितले. पण बेसिक्स कडे कधी वळले नव्हते, ते तुमच्यामुळे शिकले.
ओरिगामी बद्द्ल माझे काही प्रश्न : तुम्ही कितीवर्षांपासून ओरिगामी करत आहात? ओरिगामीच्या इतक्या अवघड घड्या कश्या लक्षात ठेवता कि कायम बघूनच करता? (मलातरी इतक्या complex घड्या लक्षात ठेवणं अवघड वाटतं, किंबहूना ओरिगामीचे एक दोन आकार सोडले तर न बघता माझी मला एकही कलाकृती करता येणार नाही.)
हाच तो प्रदर्शनातला घुबड, जिसपे मेरा दिल आ गया :D
.

सुधांशुनूलकर's picture

26 Dec 2016 - 2:35 pm | सुधांशुनूलकर

प्रतिसादासाठी धन्यवाद, आभार.
तुम्ही किती वर्षांपासून ओरिगामी करत आहात? - मी खूप लहानपणापासून थोडी ओरिगामी करत होतो, पण २००८मध्ये ओरिगामी मित्रचा सदस्य झालो, तेव्हापासून खर्‍या अर्थाने ओरिगामीच्या विविध प्रकारांची ओळख झाली आणि खर्‍या अर्थाने माझी ओरिगामी बहरली. त्याकाळी आतासारखं आंतरजाल 'आपल्या हातात' नव्हतं. त्यामुळे इतर सदस्यांच्या देवाणघेवाणीतून खूप नव्या गोष्टी (उदा. टॅसलेशन, वेट फोल्डिंग इ.) करायला शिकलो.
ओरिगामीच्या इतक्या अवघड घड्या कश्या लक्षात ठेवता कि कायम बघूनच करता?
- या मालिकेत दाखवलेल्या सर्व कलाकृती सोप्या आहेत, त्या सहज लक्षात राहतात. सरावाने थोड्या कठीण कलाकृतीही लक्षात राहतात. मात्र इतर अनेक कलाकृती पुस्तकात किंवा आंतरजालावर पाहूनच कराव्या लागतात.
ओरिगामीचं प्रदर्शन पुण्यात कधी भरवणार?
- पुढच्या वर्षी - २०१७मध्ये दिवाळीनंतरच्या आठवड्यात टिळक स्मारकमध्ये (हे 'बाय डिफॉल्ट' असतं.). पुणेकर मिपाकरांना प्रदर्शन दाखवायला गेल्या वर्षी २०१५मध्ये मी स्वतः पुण्याला आलो होतो, एक मस्त कट्टाही झाला होता.

ओरिगामी या विषयावर आंतरजालावर लाखो संस्थळं आहेत, व्हिडिओ ट्युटोरिअल्सचीही अनेक संस्थळं आहेत. त्यापैकी माझं सर्वात आवडतं - सारा अ‍ॅडॅम्सचं http://www.happyfolding.com सुचवतो. जरूर भेट द्या.

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2016 - 11:33 am | पिलीयन रायडर

फार सुंदर मालिका झाली. पण लवकर संपली. अजुन भाग यायला हवेत.

समारोप करण्याची काहीच गरज नाही काका. तुम्हाला जमेल तसे भाग टाकत रहा.

चला शिकुया ओरिगामीची संपुर्ण प्लेलिस्ट मिपा युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.