तपोवन / झुरळे / प्रभु धावुनी आले

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 12:06 am

माझी संभाजीनगर {औरंगाबाद} - जालना दौरा काही कारणामुळे बदलुन नव्या दिवशी ठरवावा लागला होता. माझ्या तिर्थरुपांनीच सर्व आरक्षण केले होते, व परत नविन तारखे नुसार येण्या-जाण्याचे आरक्षण त्यांनीच केले. आत्ताच घरी परतलो आहे आणि आज मला अनुभवता आलेला आणि तो कायअप्पावर मिपाकर मंडळी बरोबर लाईव्ह शेअर केला त्या बद्धल हा धागा आहे.
प्रवास सुरु झाला तसे मी कायअप्पावर जसे जमेल तसे त्या त्या वेळीचे अपडेट्स टाकत होतो, आज {२५-०२-२०१६} परतीच्या प्रवासात तसे करण्याचा काही विचार नव्हता. जालना स्टेशनवर तपोवन मधे सहकुटुंब चढलो ते मुंबइच्या परतीच्या प्रवासासाठी,आरक्षित केलेल्या जागी काही मंडळी आधीच ठाण मांडुन बसली होती ! त्यांना उठवण्याचे अवघड सोपस्कार सुरु करावे लागले,आमची आसन व्यवस्था दरवाजाला लागुन असलेल्या बर्थपासुनच होती, त्यामुळे आमच्या मागुन चढणार्‍यांचा देखील खोलंबा होत चालला होता. एक बाई मोबल्यावर बोलत होती,आम्ही तिला ही आमची आरक्षित जागा आहे ते वारंवार सांगुन देखील ती बाई फोनवर बिजी होती, शेवटी एकदाची ती तोंड वाकडं करुन हलली. पण त्या नंतर जो प्रकार पाहिला आणि अनुभवला तो किळसवाणा आणि घाण वाटणारा होता. आमच्या सिटवर आणि आजुबाजुच्या सीटवर मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी झुरळे फिरुन होती ! एखाध्या मुंगांच्या वारुळात काडी फिरवुन ते विस्कटावे व त्यानंतर चवताळलेल्या मुंग्या जश्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात त्याच प्रमाणे अनेक झुरळे तिथे फिरत होती,फक्त ती आरामात फिरत होती हाच काय तो फरक असावा !
आमच्या आधी आमच्या आरक्षित बर्थवर लोक या अवस्थेत कसे काय बसुन होते ? याचे मला नवल वाटले आणि किळस सुद्धा....
मग मी, माझे तिर्थरुप कसे बसे आधीच्या लोकांना उठवुन सामान ठेवुन तिथे बसावे कसे या विवंचनेत पडलो... सामान लावे पर्यंत मी हातात चप्पल घालुन किमान १०-१२ झुरळे तरी मारली असावीत. मी, माझे तिर्थरुप, माझी बायडी मिळुन बर्थवर बसता यावे म्हणुन झुरळे मारत होतो आणि बोगीतली माणंस हा चाललेला तमाशा आवडीने पाहत होती. क्षणभर असे वाटले की झालं आता एक पण झुरळ यायचे नाही म्हणुन बर्थवर बसलो... काही क्षणातच माझी नजर माझ्या पिल्लाकडे गेली, तर तिच्या कानात झुरळ जाईल इतपत ते तिच्या अंगावर चढले,तर तेव्हढ्यात माझ्या मातोश्रींच्या साडीवर ही एक मिशीदार प्राणी वळवळ करताना दिसला आणि माझा संताप ! संताप ! झाला... आता पुढचा प्रवास कसा करावा ? काय करावे ? स्वतःच्याच आरक्षित बर्थ असुन त्यावर बुड टेकवण्याचे सुद्धा वांदे झाले होते !
तेव्हढ्यात माझ्या तिर्थरुपांना आधी प्रवास केलेल्या ट्रेन मधली कुठलीशी जाहिरात आठवली, जिच्यावर कुठलासा नंबर लिहिला होता...इथे ट्रेन धावर होती पण आम्हाला आमच्याच सीटवर बसता येइना, वडिलांना तो त्यांनी पाहिलेला नंबर आठवेना ! शेवटी मी मोबल्यावरुन माहिती शोधण्याचा आणि तक्रार नोंदवण्याचा निर्धार केला.
http://www.coms.indianrailways.gov.in/criscm/common/complaint_registrati...
ही लिंक सापडली आणि त्यावर विचारलेली माहिती दिली आणि फॉर्म सेव्ह केला.अजुन काय करता येइल ? असे विचार करुन चालत्या ट्रेन मधे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा सुद्धा भरवसा नव्हता, तिथे अजुन हाती काही लागते का ? याचा शोध सुरु ठेवला... आणि 8121281212 हा नंबर जालावर सापडला , मग मी माझ्या मोबाईलवरुन आणि तिर्थरुपांच्या मोबाईल वरुन या नंबरवर मेसेज केला. एका ओळीत कसा बसा त्या गर्दीत उभे राहुन मेसेज केला आणि हा घटनाक्रम कायअप्पावर ग्रुप मध्ये कळवला, मला काही घडेल याची काडीमात्र अपेक्षा नव्हती. माज्या मेसेजचा रिप्लाय म्हणुन इन इनव्हिस्टीगेशन असा रिप्लाय आला जो बउधा ऑटोमेटेड असावा. पण काही वेळातच माझ्या मोबाईलवर कॉल आला आणि तो रेल्वेकडुनच होता. नक्की काय झाल असा दाक्षिणात्य टोन मधुन हिंदीतुन विचारणा केली गेली, मी जमेल तसे सांगितले...माझ्या पिल्लाच्या कानात जाईल इतपर झुरळे आहेत असे सांगितल्यावर अय्ययो असा काळजी युक्त स्वर ऐकायला मला मिळाला. { या बाईचे नाव मी विचारले होते, पण आता विसरलो आहे.} माझे नाव इतर माहिती आणि पुढे औरंगाबाद { संभाजीनगर } येणार आहे असे तिला कळवले. ठीक आहे माणसे येतील असे तिने मला कळवले आणि कोण आले नाही तर याच नंबरवर कॉल करा { ज्या नंबर वरुन मला फोन आला होता त्या} असे त्या महिलेने सांगितले. काही काळाने औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन आले,आणि गाणी थांबताच आमच्या खिडकी समोर माणुस उभा ठाकला !
P1
चौकशी केली नक्की काय झाले ते विचारले
P2
विचार करु लागला...
मग...
P3
स्प्रे मारला तर चालेला का ? वास येइल आणि थोडा त्रास देखील होउ शकेल असे म्हणाला... मी त्याला आधी गाडीत चढुन काय स्थिती आहे ते पहा असे सागितले... ती परिस्थीती त्यानी पाहिली आणि कार्यास लागला.
p4
P5
P6
स्प्रे मारुन झाल्यावरच आमची ट्रेन तिथुन हलली... दरवाज्याच्या जवळ आमची जागा असल्याने तो स्प्रेचा गंध पटकन निघुन गेला आणि झुरळांचा त्रास आणि त्यांचा वावर अंदाजे ४५ मिनीटांनी जवळपास पूर्णपणे थांबला ! आम्ही सीटवर निदान बसु शकु अशी स्थिती झाली एकदाची... हा सगळा प्रकार बोगीतले लोक, स्त्रिया पाहत होत्या आणि माझ्या सकट सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण जालना ते औरंगाबाद { संभाजीनगर} स्टेशन यात अंदाजे रेल्वेने १ तासाचे अंतर असावे या वेळेत रेल्वेची यंत्रणा हालुन चक्क मदत मिळाली होती ! { हे सर्व्ह मी लाईव्ह पोस्ट केले आहे त्यामुळे कायअप्पा ग्रुप मधली मंडळी अचूक वेळ सांगु शकतील.} प्रभु कॄपेने रेल्वेतल्या बाळाला ट्वीट करताच दुध मिळाले आणि अश्या प्रकारच्या बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या पण मी आज प्रत्यक्ष अनुभव घेतला. काही काळाने माझ्या तिर्थरुपांच्या मोबाईलवर रेल्वेकडुन फोन आला, जो मीच उचलला आणि झुरळांचा उपद्रव कमी झाला आहे, परंतु माझी तक्रार अटेंड केल्या बद्धल मी त्यांचे आभार मानले !
-
-
-
-
-
-
काही वेळाने मी हात धुण्यासाठी उठलो...पण लोक बसुन असल्याने मला तिथे जाताच येइना,ही लोकं पुढच्या डब्यात का जात नाही असा विचार मनात आला आणि मी पुढच्या डब्यात डोकावले तेव्हा कळले की तो पॅंट्रीचा डब्बा आहे. मी या आधी कधीही तो डब्बा कसा असतो ? ते पाहिलेही नव्हते आणि त्या डब्ब्यात शिरलो देखील नव्हतो. सहज म्हणुन मी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जे पाहिले ते मोबल्याच्या कॅमॅर्‍याने कैद केले !
P7
P8
P9
P10
P11
P12
हा सगळा अस्वच्छपणा पाहिल्यावर आणि फोटो काढल्यावर अचानक कोणाला तरी तिकडे कुणकुण लागली आणि त्या पॅट्री व्हॅनचा मॅनजर तिकडे हजर झाला ! तो मला म्हणाला काढलेले फोटो डिलीट कर...तू कोण आहेस ? तुला कोणी परवानगी दिली ? तू इनस्पेक्षन करणारा आहेस का ? नंतर मला टिसीकडे चल म्हणाला, मी त्याच्या बरोबर गेलो, तर तो तिकडेच होता, आणि त्याने मला ओळखले कारण तो आमच्या बोगीत टिकीट चेक करुन गेला होता. शेवटी त्या पॅन्ट्री मॅनेजरचे काही चालले नाही आणि मी माझ्या जागेवर येउन बसलो....
रेल्वे प्रभुजींच्या कारभाराखाली बदलते आहे याचा अनुभव मी घेतला, पण जी माणसे त्यांना नेमुन दिलेली कामे योग्य पद्धतीने करत नाहीत त्यांच्यावर रेल्वेने देखील दयामाया दाखवता कामा नये अशी एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन आणि रेल्वेचा प्रवासी म्हणुन सांगावे वाटते...

संदर्भ धागे :-
सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस
माझी रेल्वे यात्रा

प्रवासप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

रातराणी's picture

26 Feb 2016 - 12:14 am | रातराणी

अरे वा! छान वाटलं!

श्रीरंग_जोशी's picture

26 Feb 2016 - 12:14 am | श्रीरंग_जोशी

नव्या जमान्याच्या भारतीय रेल्वेच्या उत्तम दर्जाच्या ग्राहक सेवेचा अनुभव मिळाल्याबद्दल अभिनंदन. हे सर्व इथे लिहिल्याबद्दल आभार.

रेल्वेच्या खानपान सेवेतही आमुलाग्र बदल (सुधारणा या अर्थाने) होत / होणार आहेत असे बातम्यांत वाचले होते.
सध्या होत असणारे सकारात्मक बदल पाहता हे बदलही होतील असा विश्वास वाटतो.

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 12:39 am | तर्राट जोकर

खूप चांगले वाटले. योग्य माणसे योग्य ठिकाणी असली की कामे होतातच. सफरपे जाओ, प्रभुगुण गाओ!

अभ्या..'s picture

26 Feb 2016 - 12:44 am | अभ्या..

परवा अमच्या सोलापुरच्या सिध्देश्वर एक्स्प्रेसला आरक्षित डब्यात मवाल्यानी केलेला गोंधळ प्रभूकृपेने १० मिनिटात निस्तरला गेला. ट्वीटर हॅण्डेलवर एका प्रवाशाने ट्वीट केलेले.

बाकी पॅन्ट्री व्हॅन अपेक्षेपेक्षा बरीच साफ दिसतेय ;)

तर्राट जोकर's picture

26 Feb 2016 - 12:57 am | तर्राट जोकर

पॅन्ट्री>> तेच म्हणणार होतो. वाटलं मदनबाणसाहेब स्वच्छतेबद्दल सांगतायत का.

तुषार काळभोर's picture

26 Feb 2016 - 2:08 pm | तुषार काळभोर

मलाही तेच वाटलं फोटो बघून.
हे 'स्वच्छ' पॅण्ट्री व्हॅनचे फोटो आहेत.
(मी २००८ मध्ये पुणे-चेन्नई प्रवासात पॅण्ट्री कार पाहिली होती. आता मी स्वच्छ पॅण्ट्री कारमधलेही काही खाऊ शकत नाही)

असंका's picture

28 Feb 2016 - 1:16 pm | असंका

+१..

नक्की काय खटकलं तेही सांगा...

रेवती's picture

26 Feb 2016 - 1:32 am | रेवती

वाचून बरं वाटायला लागलं म्हणतानाच पॅन्ट्रीचा फोटू पाहिला. तरी, जे चाललय ते ठीकच म्हणते.

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2016 - 9:03 am | प्रसाद१९७१

फारच उत्तम अनुभव. अश्या पॉझीटीव्ह न्युज वाचल्या की बरे वाटते.

पँट्री खरचं बरी होती. कुठल्याही हॉटेल मधे ह्या पेक्षा स्वच्छ नसेल.

मोदक's picture

26 Feb 2016 - 9:31 am | मोदक

अरे व्वा. झक्कास धागा..

हा आमचा कायप्पा वृत्तांत.

गेले कांही दिवस बाणरावांच्या दौर्‍याचे फोटो आणि अपडेट्स आम्हाला लाईव्ह मिळत होते. त्यावरून त्यांची खेचणेही सुरू होतेच.

अचानक बाणरावांनी बाँब टाकला

**दुपारी २ वाजून ३० मिनीटे**
"आत्ता तपोवन एक्प्रेसनी मुंबईला परत येतोय, गाडीत प्रचंड झुरळे आहेत, मी आत्तापर्यंत १० झुरळे मारली, बसणे कठीण आहे :("

यावर उत्तर म्हणून एक नतद्रष्ट "हिहिहिहि" असा हसला.

पण लगेचच सर्वजण सक्रिय झाले आणि सूचनांचा पाऊस पडला.

- रेल्वे मिनीस्टरला ट्वीट करा, लगेच हिट घेवून येतील.

- फोटो पण टाका

बाणरावांनी लगेच सांगीतले.

**दुपारी २ वाजून ३१ मिनीटे**
"मेसेज केला, पोर्टलवर तक्रार केली"

**दुपारी २ वाजून ३८ मिनीटे**
मी विचारले - रेल्वे हेल्पलाईनकडून कॉल आला का?

बाणराव
**दुपारी २ वाजून ४० मिनीटे**
"कॉल नाही, फक्त मेसेज आला, जाँच सुरू आहे म्हणे" आणि त्यांनी रेल्वेचा मेसेजही चिकटवला
Indian Railways-CD: Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation.

-"नीट कार्यवाही झाली तर मिपावर धागा टाकायला विसरू नका" असे सांगून मी एका धाग्याची सोय करून घेतली :D

बाणराव - अर्थातच.. पण शक्यता कमी वाटते. असा सावध पवित्रा घेतला.

नंतर अवांतर चर्चा सुरू झाली.

थोड्याच वेळात बाणरावांचा अपडेट आला
**दुपारी २ वाजून ५३ मिनीटे**
"आत्ताच रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले".

एवढ्यावरच कपिलमुनींनी टाळ्या पिटून जल्लोश सुरू केला.

मुनींच्या उत्साहावर बाणरावांनी "कोणी येऊन तर दे आधी" असे लिहून पाणी ओतले.

-आत्ता 100 झुरळे आहेत, हिट मारलं तर लपलेली 1000 बाहेर पडतील. असाही एक सल्ला आला.

**दुपारी २ वाजून ५७ मिनीटे**
"रेल्वेचा माणूस आला".

अशी घोषणा बाणरावांनी केली. आणि पुराव्यादाखल त्याचे सात आठ फोटो टाकले.

बाणरावांच्या समस्येचे इतक्या लगेच निराकरण झाले हे बघून सर्वांनाच आनंद झाला.

- नमो प्रभुजी

- माझा स्वतःच विश्वास बसत नाही. (हे खुद्द बाणराव)

- टाळ्या टाळ्या टाळ्या

- आयला भारी आहे खरच आपण भारतात राहतो ?

- नक्की Indian Railway??

- अच्छे दिन कुठेतरी येतायत रे

- जबरदस्त, याला म्हणतात अच्छे दिन

- बाणराव मान गएं..!

- It's impressive, Too Good
(हे लिहिणार्‍याने "टू गुड" लिहून त्या खाली एका नटीचा (सभ्य) फोटो टाकल्याने "टू गुड" नक्की कशासाठी लिहिले आहे यावर एक छोटासा उद्बोधक परिसंवाद घडला. ;)

..आणि आम्ही सर्वांनी ही घटना आणि फोटो बाकीच्या ग्रूप्सवरती चिकटवायला सुरूवात केली.

माझ्या एका काकाने अरे ते डासांचे हिट आहे अशी शंका काढली, मी ती शंका पुन्हा मिपा ग्रूपवर विचारताच

Mosquito hit also works on cockroaches.It contains d allethrin.

असा खुद्द डॉक्टर खरेंचा रिप्लाय आला. ऑथॉरिटी कडून सर्टिफिकेट मिळाल्याने शंकानिरसन झाले.

एका उत्साही मिपाकराने लगेच खालचा मेसेज लिहून व्हायरल केला.

**********************

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.

हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.

मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31

Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40

रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53

रेल्वेचा माणूस आला: 14:57

थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल ;)

**********************

नाखु's picture

26 Feb 2016 - 10:02 am | नाखु

किती धोतरे/पँटी फेडशील रे जरा वाच आजची मुक्ताफळे नाही नारोबा नाही जरा शिकलेला माणुस काय म्हणतो ते !

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प होता की घोषणापत्र, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना करण्याऐवजी शब्दांचा खेळ करून जुन्याच योजना नव्या रूपात मांडण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या शिवसेनेच्या सुरेश प्रभूंना भाजपच्या कोट्यातून रेल्वे मंत्री केल्याने त्यांच्याकडून काही तरी चांगली कामगिरी होईल, अशी जनतेची अपेक्षा होती.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

रेल्वे अर्थसंकल्प हा करेंगे, देखेंगे, सोचेंगे प्रकारचा पूर्णपणे दिशाहीन असून, सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री नसून ‘हाउस किपिंग मंत्री’ आहेत. रेल्वेमंत्र्यांनी भाडेवाढ केलेली नसली, तरी अर्थसंकल्पाशिवाय वर्षभर कोणत्या न कोणत्या छुप्या मार्गाने भाडेवाढ करण्याची भाजप सरकारला सवय आहे.
- नवाब मलिक, प्रवक्‍ता, राष्ट्रवादी काँग्रेस
वस्तुस्थीती

मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला ४७६८ कोटी रुपयांचा निधी आला आहे. गेल्या अनेक वर्षांत राज्याला रेल्वे अर्थसंकल्पात मिळालेला हा सर्वाधिक निधी आहे. त्यामुळे राज्यावर प्रभू कृपा झाली असल्याचे म्हणता येईल. राज्यात सात नवीन सर्वेक्षणे, अकरा नवीन मार्गांचे काम व सहा विद्युतीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय राज्यात एकतीस रोड ओव्हर ब्रीज व पस्तीस रोड अंडर ब्रीज बांधण्यात येणार आहेत.

कपिलमुनी's picture

26 Feb 2016 - 10:24 am | कपिलमुनी

आधीचा मिपा असता कर आधी फोटो मागितला असता .
बाकी काही तथाकथित नमोविरोधक पण खुश होते असा ऐकण्यात आले

बाळ सप्रे's picture

26 Feb 2016 - 3:13 pm | बाळ सप्रे

समस्येचे एवढ्या लवकर निराकरण झालेले ऐकुन खूपच छान वाटले .. इथे प्रभूंचे कौतुक करायला हवेच!!

मोदक's picture

26 Feb 2016 - 9:39 am | मोदक

अभिनंदन बाणराव..

दररोज सुमारे दोन कोटी तीस लाख प्रवासी भारतभर रेल्वेतून प्रवास करत असताना तुमच्या शंकेचे केवळ २७ मिनीटात निराकरण झाले हे बघून खरंच आनंद वाटला. (अगदी ०.०१% लोक्स तक्रारी करतात असे गृहीत धरले तरी दिवसाच्या २३००० तक्रारी झाल्या!!)

या आधी सुषमा स्वराज, सुरेश प्रभु यांची ट्विटरची कामगिरी वाचली होती मात्र असे काहीतरी "लाईव्ह" पाहण्याची पहिलीच वेळ.

खूप खूप भारी वाटले.

मोदकराव सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद ! :)
प्रभुजींचा रेल्वे बजेट सादर करण्याचा दिवस आणि मला रेल्वेच्या रॅपिड अ‍ॅक्शनचा अनुभव त्याच दिवशी यावा हा मोठा योगा-योगच म्हणावा लागेल ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2016 - 10:10 am | प्रसाद१९७१

प्रभुजींचा रेल्वे बजेट सादर करण्याचा दिवस आणि मला रेल्वेच्या रॅपिड अ‍ॅक्शनचा अनुभव त्याच दिवशी यावा हा मोठा योगा-योगच म्हणावा लागेल ! :)

बजेट च्या धामधुमीत ही रेल्वे चे अधिकारी त्यांच्या कामावर लक्ष ठेऊन होते हे महत्वाचे.

यशोधरा's picture

26 Feb 2016 - 9:55 am | यशोधरा

बाणा, हे पँट्रीचे फोटोही पाठवून दे.

जेपी's picture

26 Feb 2016 - 10:26 am | जेपी

लेख आवडला.

अनुप ढेरे's picture

26 Feb 2016 - 10:31 am | अनुप ढेरे

रोचक. पेप्रात रेग्य्लरली बातम्या वाचतो. ते खरच घडतं हे पाहून आनंद वाटला. धाग्या टाकल्याबद्दल धन्यवाद. फॉरवर्ड करत आहे लिंक.

राही's picture

26 Feb 2016 - 10:57 am | राही

श्री. सुरेश प्रभु हे सध्याच्या मंत्रीमंडळातील सर्वांत कार्यक्षम आणि सर्वांत लोकाभिमुख मंत्री आहेत. त्यांना कार्यक्षमतेत प्रथम क्रमांक दिल्यास प्रथम आणि द्वितीय क्रमांकांत फार मोठे अंतर असेल, इतके ते कार्यक्षमतेत पुढे आहेत. आणि ही त्यांची कार्यक्षमता आजची नाही. म्हणून त्यांच्याकडे निवेदने पाठवावीशी वाटतात.
(गुरुदास कामतांचाही चांगला अनुभव आला होता.)

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2016 - 12:25 pm | प्रसाद१९७१

(गुरुदास कामतांचाही चांगला अनुभव आला होता.)

तुमच्या तेलाच्या विहीरी असतील म्हणुन तुम्हाला चांगला अनुभव आला असेल, किंवा तुम्ही काकांच्या नातेवाईक असाल.

रॉजरमूर's picture

6 Mar 2016 - 11:47 am | रॉजरमूर

कार्यक्षम मंत्री .

छान वाटले .

हेच नितीन गडकरी यांच्याविषयीही ऐकून आहे .
त्यांच्याही कामाचा उरक प्रचंड आहे.

रस्तेबांधणीचा कि.मी./दिवस वेग विलक्षण वाढला आहे.

नाव आडनाव's picture

26 Feb 2016 - 10:58 am | नाव आडनाव

क्या बात! भारी.

बातमी वाचून आनंद वाटला.गेले तीन दिवस अच्छे दिन आल्यासारखे वाटते आहे.अनुराग ठाकूर,इराणी बाईंचे भाषण,रेल्वे अर्थसंकल्प आणि तुमची आजची खबर!
यापूर्वी असे वाचून मला खोटा प्रचार वाटत असे.आता एका मिपाकराने अनुभवले आहे म्हंटल्यावर खात्री पटली!

यापूर्वी असे वाचून मला खोटा प्रचार वाटत असे.आता एका मिपाकराने अनुभवले आहे म्हंटल्यावर खात्री पटली!
मलाही अगदी असेच वाटायचे.

प्रमोद देर्देकर's picture

26 Feb 2016 - 11:16 am | प्रमोद देर्देकर

बाणा लय भारी काम केलेस गड्या.

ये हितस , ये मोगा येऽ रे ये. बघ हे नमो नमः काम बघ.

मार्मिक गोडसे's picture

26 Feb 2016 - 11:22 am | मार्मिक गोडसे

असे अनुभव वाचले की बरे वाटते. प्रत्येक मिपाकरानी वाचावा व प्रतिसाद द्यावी असा हा धागा आहे.

स्प्रेपूर्वी व स्प्रेनंतरचे झुरळांचे फोटो द्यायला हवे होते.

एक शंका

बहुतेक ही झुरळे तुमची जागा अडवून बसलेल्या लोकांच्या सामानातून आली असतील. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात झुरळे डब्यात एकाच ठिकाणी मर्यादीत राहू शकत नाही, सपुर्ण डबा झुरळांनी 'आरक्षीत' केला असता.

कपिलमुनी's picture

26 Feb 2016 - 12:41 pm | कपिलमुनी

झुरळांच्या हत्येवर रागां यांनी निषेध व्यक्त केला असून हे सरकार पिछडे हुये झुरळोंके विरोधात असल्याची टीका केली आहे.
डाव्या पक्षांनी या विरोधात हीट चे डबे( रिकामे) पेटवून मोर्चा काढला.
बाकी बातम्या लौकरच...

मन१'s picture

26 Feb 2016 - 12:47 pm | मन१

बरं वाटलं ऐकून.
खानपान सेवाही जरा सुधारेल , स्वच्छ होइल लहोइल; अशी आशा करतो.
.
.
बादवे, महिन्या दीड महिन्याखाली प्रधानमंत्री सडक योजना की काहीतरी तिची सकाळमध्ये जाहिरात होती.
रस्त्यात खड्डे असतील; तर फोटो काढा आणि पुढील यु आर एल वर अपलोड करा म्हणून.
ती जाहिरात सापडत नाहिये.
कुणाला आठवते आहे का ?

सुबोध खरे's picture

26 Feb 2016 - 12:48 pm | सुबोध खरे

तपोवन एक्स्प्रेस हि दिवसभर चालणारी फक्त बसायची सोय असलेली गाडी आहे आणी त्यात आरक्षित प्रवाशांच्या तिप्पट माणसे नेहेमीच प्रवास करताना आढळतात. या गाडीचे डबे जुने आहेत आणी रचना जुन्या पद्धतीची आहे ज्यात हार्डनर शीट बाजूला प्यानेल म्हणून लावलेली आहेत. या शीटच्या मध्ये मोठ्या भेगा आहेत त्यात झुरळे जाऊन बसतात. आपल्या जनतेच्या स्वच्छतेबद्दल न बोलणेच श्रेयस्कर आहे. हि गाडी आपण मुंबई सी एस ती ला किंवा नांदेडला पहिलीत तर स्वच्छ असते पण पुढच्या दोन तासात म्हणजे कसाऱ्याच्या पुढे किंवा परत येताना परभणीच्या पुढे अतिशय अस्वच्छ् आढळते. खावे तेथे हगावे या वृत्तीचे आपण लोक आहोत.खालील दुवा आपण मुद्दाम उघडून पाहावा.
http://www.scoopwhoop.com/Mahanama-Express-Dirty/
त्यामुळे शेंगांची साले, वड्याचे /पावाचे तुकडे, बिस्किटाचे तुकडे इतस्ततः पसरलेले आढळतात. याच्यावर हि झुरळे पोसली जातात. पान खाऊन न रंगलेला कोपरा तर शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. रेल्वेत कचरा केला तर तत्काळ शंभर रुपये दंड अन्यथा सात दिवस तुरुंगवास अशी शिक्षा कठोरपणे एक वर्ष राबविली तरच रेल्वे स्वच्छ राहील अशी परिस्थिती आहे.
शहाण्या माणसाने तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करू नये अशी परिस्थिती आहे. आपल्याला आरक्षित जागेवर बसू देतात हेच उपकार आहेत अशी परिस्थिती आहे. जन्शताब्दीची परिस्थिती बरी आहे.

रंगासेठ's picture

26 Feb 2016 - 1:25 pm | रंगासेठ

सहमत. पब्लिकला फुकट सोयी हव्यात पण स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे.
कारवाई होतेय असं लक्षात आल्यावरच अशा गोष्टींना काही प्रमाणात आळा बसेल.

बॅटमॅन's picture

26 Feb 2016 - 12:51 pm | बॅटमॅन

लै भारी वाटलं राव ऐकून. असे काही पाहिल्यावरती अच्छे दिन म्हणजे फक्त फेकूगिरी नव्हे असे वाटते.

सुबोध खरे's picture

26 Feb 2016 - 12:52 pm | सुबोध खरे

संताप याचा वाटतो कि जे करायचे ते सरकारनेच हि वृत्ती आहे.मी घाण केली तर काय जाते?
माझ्या सारखा एखादा माणूस कोणाला कचरा करतो म्हणून बोलला तर तुमच्या बापाची गाडी आहे का? असे उत्तर मिळते. लष्करात असताना आणी तरुण होतो तेंव्हा भांडण करत असे.
शेवटी माणसांची वृत्ती बदलत नसल्याने आता तोंडची वाफ दवडणे आता सोडून दिले आहे. जिथे तिथे घाण करायलाच आपल्याला लोकशाही हवी आहे असे वाटते.

नाखु's picture

26 Feb 2016 - 1:13 pm | नाखु

पूणे बससेवेत असे सांगीतल्यावर इतर प्रवाश्यांनी साथ द्यायय्ची सोडून जाऊद्या (येडाच) दिसतोय असा अविर्भाव अनुभव्लाय.

आणि त्यानंतर पानवाल्याने जोमाने सीट्खालची जागा रंगकाम चालू ठेवले..

घरचे सोबत असले की (माझ्यामुळे) त्यांची कुचंबणा होते असे वारंवार झालेला नाखु.

इथे अवांतर वाटेल असा किस्सा.

सुमारे १ १/२ वर्षांपुर्वी पुण्यात सायन्स एक्स्प्रेस आली होती.केंद्रीय मंत्री श्रीमान जावडेकर आले होते (खडकी रेल्वे स्टेशन वर)
एक चांगल्या (उच्च शिक्षीत) घरातील तरूण दोन तीन लहान मुलांसोबत्,व तीन ललनांना थोडे दूर उभे करून (नंतर बोलावणार्च होता) रांगेत घुसू पहात होता. सुमारे ८०० पेक्षा जास्त लोकांची रांग (आणी सतत वाढतच होती कारण तो शेवटचा दिवस होता प्रदरशन यात्रेचा) माझ्या पुढे किमान ३००-४०० जण . हा इसम इकडे तिकडे मुलांना चित्र दाखवतो असे भासवून माझ्या पुढे येऊन उभा राहिला . माझ्या मुलाने व मुलीने (वय ८) लगेच मला तो घुसल्याचे दाखवले. (तो पर्यंत सोबतच्या ललनांना तुम्ही समांतर चालत रहा मी कोपर्यावर युम्हाला रांगेत घेतो अश्या खाणाखुणा चालूच होत्या) मी जोरदार आक्षेप घेतला. माझ्या मुलानेही तुम्ही रांगेत नव्हता आत्ता घुसला असे मोठ्याने सांगीतले. रेल्वे सुऱ़क्शा रक्षक येताना पाहुन तो म्हणाला तुम्च्या मागे थांबतो तुम्ही पुढे व्हा मग तर झाले. (पण ललनांना इंग्र्जी मध्ये तारे तोडताना काही तरी बुल शीट असे आमच्या कडे बोट दाखवून म्हणाल्याचे मीच ऐकले)

मग मी माझ्या मागच्यांनाही विचारले (मारवाडी १५-२० कुटुंब काबीला मुलांसमवेत होता) तुमच्या पुढे हे घुसून आलेले आहेत थांबले तर चालेल का असे मागच्या किमान १०-१२ लोकांना विचारले. सगळ्यांनी जोरदार हरकत घेतली आणि एका सरदारजीने उद्धार केल्यावर तो ललनांसमवेत गायब झाला. मुलगा म्हणाला बाबा आपण जाताना तो आपल्याशी नक्की भांडेल (कारण ललनांबरोबर दोन तीन कॉलेज युवकही होते वाटते) पण मी म्हटले अत्ता प्रदर्शन पाहू पुढचे पुढे.

प्रदशन पाहून आलो तर रांगेच्या शेवटी (मुलांच्या अट्टाहासाने उभा राहिलेला दिसला , आधिच थांबला असता रांगेत तर किमान २०० एक नी नंबर पुढे मिळाला असता ( रांग वेगाने पुढे सरकत होती)

मुलाच्या धारिष्ट्याचे मला कौतुक वाटले.

(त्याने थेट जावडेकरांशी हस्तांदोलन केले मी फोटोही घेऊ शकलो नाही)

सतिश पाटील's picture

26 Feb 2016 - 1:16 pm | सतिश पाटील

चांगला बदल होतोय...
आधी मला वाटले कि तुम्ही त्या प्यानट्रीच्या स्वच्छतेबद्दल बोलाल. तुम्ही पहिली ती प्यानट्री बऱ्यापैकी साफ स्वच आहे.

वेल्लाभट's picture

26 Feb 2016 - 1:20 pm | वेल्लाभट

जिथे तिथे पसरवा हा चांगला-वाईट अनुभव. प्रभूंचं हँडल ट्वीटला आवर्जून प्रतिसाद देतं. तेंव्हा ट्वीट करा. चेपुवर टाका. आणि इथे सादर केल्याबद्दल आभार. मी पसरवू का? काही लिंक वगैरे असल्यास द्या नाहीतर मिपा धाग्याची लिंकच पसरवतो.

पैसा's picture

26 Feb 2016 - 1:24 pm | पैसा

असे अनुभव सगळीकडेच अपवाद न रहाता नियम व्हावेत ही इच्छा आहे! पँट्रीच्या लोकांची स्वच्छता आणि डॉ खरे यांनी लिहिलेले लोकांच्या स्वच्छतेच्या सेन्सबद्दल अगदी १००% पटणारे. प्लॅस्टिक कचरा टाकायला लांब अंतराच्या गाड्यांत कचराकुंडी सदृश काहीतरी बेसिनच्या खाली असते. असा सगळा कचरा निदान एखाद्या कागदी/प्लॅस्टिक पिशवीत जमा करून त्याची नीट विल्हेवाट लावता येईल. पण रेल्वेत, प्लॅटफॉर्मवर घाण टाकणे हे अगदी कॉमन आहे. दूधसागरच्या जंगलात रूळाच्या दोन्ही बाजूंना प्लॅस्टिक कचर्‍याचा खच आणि त्यात अन्न शोधणारी माकडे बघून कसनुसे झाले होते.

एक किस्सा सकाळी खफवर टाकला होता.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Feb 2016 - 1:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

तुर्तास मिपावर फ़क्त वचनमात्र आहे तरीही हा धागा पाहून राहावले नाही म्हणून कॉमेंट प्रपंच, बिहार मधे आमचे एडम (प्रशासकीय) ऑफिस आहे तिकडे बरेच वेळा काही कागदपत्रे पूर्तता करायला जाणे असते किंवा निवडणुकीच्या वेळी लागलेली ड्यूटी निमित्त सुद्धा बिहार जवळून पाहता आला दोन हजार अकरा पासुन सतत पाहतो आहेच बिहार तसा रेलवे स्टेशन पाहता, हा पुर्ण भाग ईस्ट सेंट्रल रेलवे उर्फ़ ईसीआर मधे पडतो एक अतिशय अंडरपरफ़ॉर्मर रेलवे डिवीज़न आहे हा,पण प्रभु आल्या पासुन (अन रेलवे राज्य मंत्री मनोज सिन्हा इकडील असल्यामुळे) विलक्षण फरक पडला आहे सकाळी आठ वाजता रेलवे प्लॅटफॉर्म धुवून लख्ख केलेले मी पाहिले आहेत हल्लीच बरं ते फ़क्त पटना नाही तर इतरही स्टेशन्सवर दिसते, एकदा समस्तीपुर स्टेशनवर एका सफाई कामगाराला पाहिले तो सकाळी सहा ला ट्रॅक धुवत होता एकदम तल्लीन होऊन त्याला बोलवले त्याच्याशी गप्पा केल्या कौतुक केले तर एकदम खुश झाला म्हणाला "सर अब और जोर से काम करेंगे हम सुबह सुबह तारीफ अच्छा लगता है" नुसते प्लॅटफॉर्म नाही तर ट्रॅक सुद्धा धुवून स्वच्छ केलेल्या असतात हल्ली

हा पटना जंक्शन चा फोटो पाहून कल्पना यावी ह्या स्वच्छतेची स्वच्छ भारत + प्रभुंची कार्यकुशलता marvellous आहे अगदी

.

प्रसाद१९७१'s picture

26 Feb 2016 - 1:59 pm | प्रसाद१९७१

क्या बात है सोन्याबापु. अजुन एक चांगली बातमी दिलीत.

आयला बिहारात हे असे तर खरेच सुधारणेची लै आशा आहे मग.

नाखु's picture

26 Feb 2016 - 3:44 pm | नाखु

म्हणजे जिथे राज्य सरकार भाजपेयींचे नाही तिथे केंद्र सरकार काहीच काम करीत नाही हा आरोप बुद्ध्याच बोगस आणि बिनबुडाचा आहे तर !!!!

प्रभु की लीला अपरंपार

सेनेला अजूनही प्रभु आपले वाटत नाहीत (उद्धवा अजब तुझे सरकार)

मोदक's picture

26 Feb 2016 - 3:48 pm | मोदक

नाखुकाका...

रेल्वे केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने रेल्वे स्टेशन हा छोटासा केंद्रशासीत प्रदेश असल्यासारखा प्रकार असावा त्यामुळे येथे राज्यसरकार, केंद्रसरकार मुद्दा लागू नसावा - चुकीचे असल्यास तज्ञांनी दुरूस्त करावे.

नाखु's picture

26 Feb 2016 - 3:55 pm | नाखु

नांदेडकर आज सकाळीच ओरडत होते म्हणून म्हटले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Feb 2016 - 4:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाय नाय मोदक शेठ एकदम बरोबर आहे हे! ह्याच केंद्रसरकारच्या मालकीच्या असलेल्या जागेच्या रक्षणार्थ आरपीएफ उर्फ़ रेलवे प्रोटेक्शन फोर्स हे डेडिकेटेड बल सुद्धा आहे एक

.

(हा त्यांचा फ्लॅग)

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 Feb 2016 - 4:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

बॅटमॅन भाई,

नुसते इतकेच नाही तर अगदी बिहार च्या बिहारात धावणाऱ्या इंटरसिटी ने ३ तासाचा प्रवास केला तरी बरोबर प्रवास संपत आला की रेलवे कस्टमर केअरचा (१३९) चा कॉल येतो अन व्यवस्थित एक व्यक्ति (IVRS नाही) फीडबॅक घेतो/ते त्यात प्रवासाचा एकंदरित दर्जा , स्वच्छता, केटरिंग, एसी किंवा आसनव्यवस्था ह्यांच्याबद्दल फीडबॅक घेतला जातो अन त्याचा एक रेफेरेंस नंबर दिला जातो, एकदा सहज रेलवे मधे आलेल्या विक्रेत्याने कुरकुरे चे पॅकेट थोड़े महाग दिले म्हणून फीडबॅक दिला होता (२०१४ नोवेंबर) ते परतीच्या प्रवासात तोच गड़ी बाकायदा खाकी डगला घालुन (विक्रेत्यांचा) एमआरपी वर सामान देत होता. सहज चौकशी करता टीटीई म्हणाला की मागच्या वेळी कोण्या पॅसेंजर न कंप्लेंट केली (बहुतेक मीच) तर त्याला घालवुन दिला होता पण नंतर त्यांना अगदी नाममात्र रॉयल्टी अन लाइसेंस फी वर परवाने दिले आहेत आम्ही, म्हणजे त्यांच्या पोटावर लाथ ही नाही अन रेलवे ला सुद्धा इनकम एक खारीचा वाटा. अन हे सगळे मी सांगितल्या प्रमाणे ईस्ट सेंट्रल रेलवे मधे, बिहार मधे आधी वैक्युम करणे किंवा चेनपुलिंग भरपुर होत असे आता आरपीएफ वाल्यांना फाइबर ची दांडकी दिली आहेत वट्ट हाणतात एक एक नग धरुन

मलाही बिहारचा चांगला अनुभव आहे.

कलकत्त्याला जाताना खालच्या बर्थवरचा माणूस एकसुरात आणि लै मोठ्या आवाजात घोरत होता. ती रात्र जागून काढली. दुसर्‍या रात्रीच्या प्रवासात त्रास होवू नये म्हणून एका बिहारच्या स्टेशनवर उतरलो. गार्डाच्या डब्यात जावून त्या बाबाला म्हणालो "कापूस आहे का?"

गार्ड : "हमारे पास नहीं है. पिलाटफॉर्म से लेके आईये"

मी : टाईम लगेला. रहने दो. (..आणि मी निघायच्या तयारीत.)

गार्ड : सुनीये.. आप लेके आईये, मै ट्रेन रूकवाता हूं. आणि मला त्याने "पटरीसे जाओ.. मै देख रहा हूं" असाही सल्ला दिला.

अक्षरशः पाचव्या मिनीटाला मी माझ्यासाठी आणि सहप्रवाशांसाठी कापसाचे बंडल घेवून जागेवर बसलो होतो. ट्रेन खरोखरीच थांबवली की मी वेळेत परत आलो माहिती नाही पण त्याने आश्वस्त केले आणि खरोखरी थांबला होता.

(हा प्रकार UPA 2 च्या काळात झालेला आहे)

बॅटमॅन's picture

28 Feb 2016 - 3:25 pm | बॅटमॅन

क्या बात है बापूसाहेब! बिहारमध्ये काही चांगलेही होऊ शकते तर. मस्तच!

सस्नेह's picture

26 Feb 2016 - 3:00 pm | सस्नेह

तुमच्या एकाच सीटमधे झुरळे होती आणि अलिकडे पलिकडे नाही हे कसे ?

ते असते ना.. गल्लीतल्या एकाच बाजूची लाईट जाते कधी कधी.. आणि दुसरी बाजू फुल्ल लाईटमध्ये दिवाळी साजरी करत असते.. तसे काहीसे असेल.

लै शंका राव तुम्हाला. ;)

सस्नेह's picture

26 Feb 2016 - 4:21 pm | सस्नेह

रेल्वेवाले तिकीट काढल्याशिवाय गाडीत चढू देत नाहीत.
गल्लीनं दोन महिने बिलं भरली नसतील ना =))

मदनबाण's picture

26 Feb 2016 - 4:28 pm | मदनबाण

@ मार्मिक गोडसे आणि स्नेहांकिता
डॉकनी अत्यंत योग्य शब्दात या गाडीचे वर्णन केले आहे, माझ्या नजेरत आलेल्या नुसार ३ बर्थवर हा उपद्रव होता. बहुतेक पँट्री या बोगीला लागुन असल्यानेच तसे जास्त झाले असण्याची शक्यता वाटते. पँट्री स्वच्छ दिसत आहे ती तितकी नाही.पँट्री चे पहिले २ फोटो पाहिल्यावर तुमच्या लक्षात येइल की कढई त्याच्या खाली गॅस आहे आणि गॅसच्या खालीच जमिनीवर स्लाईस्ड ब्रेडचा खच पडलेला दिसेल.सर्व बनवणारे जाणारे खाध्य पदार्थ कुठेही कसेही उघडे ठेवलेले दिसतील. असो यात देखील सुधारणा होइल अशी आपण अपेक्षा ठेवुया.
शहाण्या माणसाने तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करू नये अशी परिस्थिती आहे.
डॉकच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे, काही कारणामुळे मूळ दौर्‍याच्या वेळापत्रकात बदल करावा लागल्याने जी गाडी मिळेल त्यात आरक्षण करणे हाच पर्यात त्यावेळी तिर्थरुपांकडे होता त्यामुळेच तोपोवनाचा "ताप" घडला.
@वेल्लाभट
जे आपण करु इच्छिता त्याला पूर्णपणे माझे अनुमोदन आहे,सरकारच्या सकारात्मक बाजुची देखील दखल घेतली पाहिजे आणि त्याची प्रसिद्धी सुद्धा. :)
@सोन्याबापू
आपणही यात भर घातली याचा आनंद वाटला.
@ सर्व प्रतिसादकांना धन्स.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना

तिमा's picture

26 Feb 2016 - 4:36 pm | तिमा

हाच धागा विचारवंतांच्या संस्थळावर टाकला (आहे) तर एवढे प्रतिसाद येणार नाहीत आणि आले तरी त्यांत कुत्सितपणा ठासून भरला असेल.
चांगल्या कामाला चांगले म्हणायलाही मोठे मन लागते.

मदनबाण's picture

26 Feb 2016 - 5:38 pm | मदनबाण

आज रेल्वेकडुन फिडबॅक घेण्यासाठी एसएमएस आला, ज्यात फिडबॅक देण्यासाठीची लिंक होती. मी Excellent या पर्यायावर क्लिक करुन माझा प्रतिसाद नोंदवला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना

सुबोध खरे's picture

26 Feb 2016 - 5:53 pm | सुबोध खरे

बाण राव
त्या प्यांट्री बद्दल हि लिहायला हवे. म्हणजे त्या लोकांना आपण काय करतो आहोत ते हि समजेल. तुम्ही नुसती हूल दिलीत पण नक्की काय करायला हवे आहे हे त्यांना कदाचित समजले नसेल.
उदा. एच आय व्ही च्या प्रादुर्भावाचे वेळेस सर्व सलून मालक आणि नोकर यांना वस्तरे डेटॉलने धुवून घ्या आणि प्रत्येक ग्राहकासाठी नवी ब्लेड का वापरा हे NACO( NATIONAL AIDS CONTROL ORGANISATION)द्वारा समजावून सांगितले गेले यामुळे त्यांना कळले कि त्याच ब्लेड मुळे विषाणू संसर्ग का आणि कसा होतो. बहुतेक वेळेस अज्ञानामुळे या लोकांना स्वच्छता म्हणजे काय आणि कशी ठेवायची ते समजत नाही. ते अस्वच्छ मुद्दाम राहतात असेच नाही. मग ते सलून आले असोत किंवा आचारी वाढपी.
नौदलात आम्ही( डॉक्टर) त्या लोकांना महिन्यात एकदा व्याख्यान देऊन या गोष्टी शिकवत असू.

बाण राव त्या प्यांट्री बद्दल हि लिहायला हवे.
डॉक, फिडबॅकच्या दुव्यावर लिखाणासाठी काही जागा नव्हती. फक्त क्लिक करण्याचाच पर्याय होता.

@ मोदकराव
हा नक्की सत्कारच आहे ना ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना

अर्धशतकाबद्दल झुरळ निर्दालक बाणरावांचा हिट चे सगळे प्रकार देवून सत्कार करण्यात येत आहे.

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2016 - 7:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपोवन घाणेरडी गाडी आहे आणि त्यात घाण करणारे अजुन घाणेरडे. बाकी, बाणा आपल्या कामाचं आणि तत्पर सेवा देना-यांचही कौतुक वाटलं. अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स.

-दिलीप बिरुटे

खटपट्या's picture

28 Feb 2016 - 5:05 am | खटपट्या

खूप चांगला अनुभव बाणराव !! लेखही खूप चांगला आहे.

सुहास झेले's picture

28 Feb 2016 - 10:20 am | सुहास झेले

सर्विस इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याने, काम तत्परतेने झाल्यावर त्यातून मिळणारा आनंद निव्वळ अवर्णनीय ;-)

प्यांट्रीचे फोटो सुरेश प्रभूंना tweet कर. सुरेश प्रभूंच्या रेल्वे प्रशासनाने चांगले काम करण्याचा निश्चय केलेला दिसतो. मुंबई लोकल स्टेशन्सचा अभूतपूर्व कायापालट गेल्या ४-५ महिन्यात होतोय.

अनुप ढेरे's picture

28 Feb 2016 - 10:49 am | अनुप ढेरे

बोरिवली स्टेशनबद्दल विशेष कौतुक ऐकलं आहे.

सुहास झेले's picture

28 Feb 2016 - 1:10 pm | सुहास झेले

हो.. आमचे होम ग्राउंड ;-)

काही फोटो.. गुगलकडून साभार

.

.

---

.

---

.

प्रसाद१९७१'s picture

29 Feb 2016 - 3:26 pm | प्रसाद१९७१

काय मस्त दिसतय. मजा आली.

अनुप ढेरे's picture

29 Feb 2016 - 4:25 pm | अनुप ढेरे

पुणे स्टेशनवरपण असच केलय.
a

b

c

हे करणा-या संघटनेशी मी संपर्क साधला आहे. पुढील प्रकल्पात सहभागी होण्याची, योगदान देण्याची माझी तयारी असल्याचे कळवले आहे.

सर्वसाक्षी's picture

28 Feb 2016 - 12:21 pm | सर्वसाक्षी

बाणा,

अभिनंदन आणि कौतुक. पाठपुरावा केलास तर परि़णाम होतो हे समजले. दिवसाला कोट्यावधी प्रवासी वाहणार्‍या रेल्वेकडुन असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष कारवाई हा निश्चित आश्वासक असा सुखद अनुभव आहे

मी १ जानेवारीला पारपत्र नूतनीकरणासाठी ठरल्या वेळेस पारपत्र कचेरीत गेलो, अर्ज 'तात्काळ' सदरात केला होता. सुमारे एका तासात काम संपवून साडे अकराच्या सुमारास बाहेर पडलो. दोन जानेवारीला दुपारी १ वाजता जलद ट्पालाने नवे पारपत्र घरपोच आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Feb 2016 - 4:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मदनबाणराव, अभिनंदन तुमचे आणि रेल्वे प्रशासनाचे !

तुम्ही "होता है, चलता है" असे म्हणत केवळ सरकारला दुषणे देत न बसता तक्रार केलीत म्हणून ! आणि तिच्या निवारणाबाबतची बातमी इथे टाकलीत त्याबद्दलही ! कारण तक्रारी करायला सगळेच पुढे असतात, पण चांगली गोष्ट लिहायला बर्‍याचदा हात आखडता घेतला जातो !

रेल्वे प्रशासनाने त्या तक्रारीची त्वरीत दखल घेऊन तुमच्या त्याच प्रवासातच शक्य ती कारवाई केली म्हणून रेल्वे प्रशानचेही कौतूक करायला हवे... त्यांनी ते काम केले म्हणून नाही (ते काम करणे तर त्यांचे कर्तव्यच आहे), पण इतक्या वर्षांच्या अंगवळणी पडलेल्या सवयीनंतर/अनुभवानंतर त्यांनी काही सकारात्मक सुरुवात केली आहे, त्याचा आनंद आहे म्हणून !

या अनुभवातून एक महत्वाची गोष्ट अधोरेखीत झाली आहे...

प्रशासनाने उत्तम काम करावे हे नि:संशय. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात प्रशासनाला सामान्य जनतेच्या हातभाराची नक्कीच गरज असते. इतर काही केले नाही तरी कामातल्या/सेवेतल्या तृटी कळवण्याइतकी मदत तरी सर्व जनता करू शकते, करावी.

सहभागी लोकशाही (पार्टिसिपेटरी डेमॉक्रसी) हा जरी फार मोठा शब्द व संकल्पना वाटत असली तरी, "सेवेच्या तक्रारी/सूचना करण्याची सोय प्रशासनाने करावी आणि त्या सोईचा फायदा घेऊन त्याद्वारे प्रशासनाला कर्मचार्‍यांवर नजर ठेवायला मदत करून जनतेने सेवेची प्रत वाढवून घ्यावी", इतका सोपा मूलभूत अर्थ त्यामागे आहे.

असे छोटे छोटे प्रकल्पच जनतेच्या रोजच्या जीवनातील सोयीसुविधांची प्रत वाढवतात. याबाबत प्रभूंनी उचलेल्या पावलांबद्दल ऐकून होतो. पण तुमच्या लेखामुळे खुद्द मिपाकराच्या मुखाने आणि कॅमेर्‍याने त्याबद्दल वाचायला/पहायला मिळाले.

आशा आहे की अश्या अनेक तक्रारी आल्या की त्या निवारत बसण्यापेक्षा अगोदरच "कीटकनाश" करणे जास्त बरे पडते अशी सुबुद्धी स्थानिक रेल्वे प्रशासनाला सुचेल. जनतेच्या कृपेने (सामानातून) रेल्वेत प्रवेश करणारे कीटक बंद व्हायला जरा जास्त काळ लागेल म्हणा :(

पण एक मात्र खरे की, अश्या तक्रारी करून शासनाला सेवा सुधारायला मदत करणे व चांगल्या अनुभवांना प्रसिद्धी देऊन सरकारी कर्मचार्‍यांचे कौतूक करून त्यांच्यात सकारात्मक बदल घडविणे, यात सर्वात नागरिकांचा सहभाग स्वागतार्ह आणि आवश्यक आहे.

======

या निमित्ताने, काही प्रतिसादांत रेल्वेचे इतर ठिकाणचे चांगले कामही समोर आले आहे... मुंबईच्या स्थानकांची चित्रे कायप्पावर पाहिली होती, पण सोन्याबापूंनी टाकलेला पटना जंक्शनचा फोटो डोळ्यांवर विश्वास बसू नये असाच आहे !

माध्यमांना अश्या बर्‍याचश्या सकारात्मक बातम्यात (टीआरपीमूल्य नसल्याने) रस नसतो. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामन्य जनतेनेच याची जाहिरात करणे जरूर आहे... कारण लोकशाहीत जनतेला त्यांच्या लायकीचे सरकार मिळते असेच नाही तर सरकारी सेवा व त्यांची प्रतही लोकांच्या आग्रहाच्या प्रमाणातच मिळतात.

माध्यमांना अश्या बर्‍याचश्या सकारात्मक बातम्यात (टीआरपीमूल्य नसल्याने) रस नसतो. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामन्य जनतेनेच याची जाहिरात करणे जरूर आहे..
एक्का साहेब
सोळा आणे सही

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Feb 2016 - 8:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी

नक्कीच छान अनुभव.शेअर करावा वाटतोय

आतिवास's picture

28 Feb 2016 - 9:23 pm | आतिवास

वाचून छान वाटलं.

उगा काहितरीच's picture

28 Feb 2016 - 10:10 pm | उगा काहितरीच

छान वाटलं वाचून . धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल .

पद्मावति's picture

29 Feb 2016 - 3:17 pm | पद्मावति

छान अनुभव. शेअर केल्याबदद्ल धन्यवाद.

हा अनुभव आम्ही चेपूवर शेयर करू शकतो का?

पिशी अबोली's picture

29 Feb 2016 - 4:46 pm | पिशी अबोली

छान अनुभव.
मागच्या आठवड्यात पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसने प्रवास करताना स्वच्छता अतिशय चांगली होती. या ट्रेनमधे ती सुरू झाल्यापासून खूप उंदिर असायचे. पण यावेळी उंदिर नव्हते.

एस's picture

29 Feb 2016 - 6:15 pm | एस

फारच छान.

मधुरा देशपांडे's picture

29 Feb 2016 - 6:18 pm | मधुरा देशपांडे

लेख आणि प्रतिसाद बघून मस्त वाटलं. पूर्वी अशा पोस्टवर विश्वास नव्हता, आता खात्री पटली.

मदनबाण's picture

29 Feb 2016 - 6:52 pm | मदनबाण

@ असंका
वरती एका प्रतिसादात याचे उत्तर मी दिले आहे.
@ भिंगरी
हो, नक्की शेअर करा. हा अनुभव ज्यांना ज्यांना जिथे कुठे शेअर करावयाचा असेल त्यांनी तो जरुर करावा. :)

सर्व प्रतिसाद देण्यार्‍या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पास वो आने लगे जरा जरा... :- Main Khiladi Tu Anari

जगप्रवासी's picture

29 Feb 2016 - 7:18 pm | जगप्रवासी

कसाऱ्या वरून मुंबईला येताना लोकल ट्रेन मध्ये भेळ खाल्ल्यावर कागद माझा कागद मी माझ्या खिशात ठेवला. समोर तीन चार मुल होती, भेळ खाऊन झाल्यावर ते कागद बाहेर फेकण्याच्या तयारीत होते तेव्हढ्यात मी त्यांच्याकडून ते कागद मागून माझ्या खिशात ठेवले. त्यामुळे त्यांना जरा लाज वाटली असावी, त्यांनी ते कागद माझ्याकडे परत मागितले आणि स्वतःच्या खिशात ठेवले. या छोट्याशा गोष्टीने त्यांच्याशी गट्टी जमली आणि मुंबई पर्यंतचा प्रवास एकदम मजेत आणि साफ सुथरा गेला. आणि हो त्यांचं आणि माझ वागण बघून बऱ्याच जणांनी कचरा बाहेर न फेकता स्वतःच्या खिशात, हातात ठेवला.

तर्राट जोकर's picture

29 Feb 2016 - 9:24 pm | तर्राट जोकर

बेहद्द आवडलं. __/\__ अपुनबी ऐसेच करेगा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Feb 2016 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय काम !

नमकिन's picture

1 Mar 2016 - 6:32 pm | नमकिन

रोजचा प्रवास रेलवे सरासरी ३००km (मागील १२-१५ वर्ष) असल्याने रेलवे व बस (सरकारी उपक्रम) बाबत एक आत्मीयता सतत मनात असते. दिवस रात्र आम्हा रेलवे चा प्रसंग, कामानिमित्त बहुतांश भारत भ्रमण झाले.
इतक्या वर्षांत भारतवर्षातील रेलवे स्थानक, आरक्षण प्रक्रिया, वेळापत्रक, गाड्यांचा वेग, डब्यांची परिस्थिती, कर्मचारी वर्गाचा उत्साह कर्तव्य भावना व सरतेशेवटी प्रवाशांची मानसिकता यांचा रोचक अनुभव नक्कीच प्रगतिशील स्थित्यंतर दर्शवतो.
मुद्दा स्वच्छता असल्याने दृष्टी आड सृष्टी असते हा भाग समजून घेतल्यास रेलवे चे (इतर कुठल्याही उपक्रमाचे) अभियान हे नक्कीच अभिमान वाटावे असेच आहे. सर्वात स्वस्त वाहतुकीचा पर्याय आजच्या घडीला तरी हाच एकमेव असा आहे. डॅा. भावेंचे निरीक्षण ही सद्य परिस्थिती दर्विते की रेलवे अस्वच्छ करणारे हे भारतीय जनताच आहे त्यांना "भारतीय रेल आपकी संपत्ति हैं...." हे समजते पण तिचा सर्वाना समान अधिकार आहे हे मात्र उमजत नाहीं. यासाठी नाखुभाऊंनी म्हटल्या प्रमाणे आपल्या सर्वांना अशांना वैयक्तिक मार्गदर्शन करावे लागते, त्यात अ/सुशिक्षित असे सर्व सापडतात, सामान्य डब्यांत खिडक्यांतून बहुतांश कचरा डब्याबाहेर जात असतोच अन् तरीही अस्वच्छता दिसतेच परंतु वातानुकूलित डब्यांत बहुतेक उच्च स्तर प्रवासी (यात रेलवे चे जावई पण आले) जागेवर चिकटून बसतात की सर्व बसल्या जागीच हवे असते व खाणे/पिणे संपल्यावर देखील सर्व छान रचुन (बाटली अडकविण्याच्या जाळीत) ठेवतात, प्रवास संपवताना तसेच टाकून जातात. या सर्व उष्ट्या खरकट्यांमुळे संपूर्ण डब्यात विचित्र गंध शिरताच जाणवतो. बरं सांगून सुद्धा बरेच मख्खपणे पहात बसतात. त्याहून हद्द म्हणजे जे डस्टबीन भरतात ते चालत्या गाडीतूनच पटरी वर रिते केले जातात, ते पाहून वाटते याचसाठी का केला होता सारा अट्टहास?
एरवी मूळ कारण कच-याची उत्पत्ती जर कमी केली तरच हा भस्मासुर आटोक्यात येईल अन्यथा कचरा बेवारस असतोच.