गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-१

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in जनातलं, मनातलं
20 Dec 2008 - 2:38 am

गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...(१८४९-१९२६) मंडळी, आज मी तुम्हाला अश्या एका संघर्षरत, दिव्य व अस्सल 'खरा सोना' ज्याला म्हणतात अश्या थोर आचार्यांची ओळख करुन देत आहे. मंडळी, माझी फक्त एकच विनंती की या महात्म्याला लाख लाख दुवे व नमस्कार मनातून तरी करा ज्यानं आपल्या मराठी लोकांना एक शान दिली. तर सुरु करु या...

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरअमरावतीजवळ चंदूर गाव आहे. तेथील रामभट व त्यांची पत्नी यांचा मुलगा बाळकृष्ण. स्वतः रामभट हे गवई व भिक्षूक होते. त्यांनी स्वतः सातार्‍याच्या बाळाजीबूवांकडे तालीम घेतली होती. त्यामुळे त्यांना असं वाटे की बाळकृष्णबुवांनी गवई व्हावं. पण आईला वाटे की बाळकृष्णबुवांनी भिक्षूकी करावी. पण स्वतः बाळकृष्णबुवांना लहानपणापासुन वडिलांच गाणं खुप आवडे व वाटे की आपणही गवई व्हावं. शेवटी बुवा घरातुन पळाले. ते पळाले ते सरळ म्हैसाळच्या हरीदास म्हणजे विष्णुबुवा जोगळेकरांपाशी आले. विष्णुबुवांनी त्यांना आश्रय दिला. विष्णुबुवांनी बाळकृष्णबुवांच्याकडुन किर्तनात पदं म्हणता येतील इतकी तयारी करुन घेतली व परत जत संस्थानात वडिलांकडे आणुन सोडलं. त्यानंतर बुवांना स्वत: वडिलांनी गाणं शिकवायला सुरुवात केली. पण बुवांच्या वडिलांच अचानक निधन झालं. परत बुवांच्या संगीत आराधनेत खंड पडला. मग जतच्या अधिपतींनी खुद्द अलिदातखाँना बुवांना गाणं शिकवायला सांगितलं व पोटगीही दिली. पण अलिदातखाँनी त्यांना एक अवाक्षरही शिकवलं नाही. मग बुवा भाऊबुवा कागडकरांकडे गेले. थोडे दिवस गुरुसेवा केली पण कागडकरबुवांना चिलीम पिण्याची सवय व ते बाळकृष्णबुवांच्या खांद्यावर दिलेलं. एक दिवस चिलीम भरुन द्यायला उशिर झाला म्हणुन कागडकरबुवांनी "ह्याला गाणं येण्यासारखं नाही, म्हणुन मी गाणं शिकवणार नाही" अशी बुवांची बोळवण केली. तेव्हा बाळकृष्णबुवांनी झालेल्या अपमानाच्या रागाच्या भरात सांगितलं "गाणं येईल त्याच दिवशी तोंड दाखवीन". असाच पण जरा जास्तच भयानक अनुभव बुवांना आला. त्याकाळी रावजीबुवा गोगटे म्हणुन अजुन एक गवई फार प्रसिद्ध होते. बुवांना त्यांच घर म्हणजे संगीताची पंढरी वाटे. बरीच मुलं त्यांच्याकडे शिकत. त्यांच्याकडे बाबुराव सनई चौघडा वाजवत तर नारायणबुवा हे थोर किर्तनकार येत. शिवाय केशवबुवा व बच्चाका हेही होते. या सगळ्या मुलांच्या बरोबर बुवाही गाणं शिकायचे. पण रावजीबुवांना बहुतेक ते पसंत पडलं नसावं. एकदा रावजीबुवांनी बुवांचा उपहास केला, म्हणाले "श्राद्धान्न झोडणार्‍या भटांची पोरे जर गवई होऊ लागली तर गाढवांनाही गंधर्व समजुन मान्यवरांच्या पंगतीत बसवावे लागेल". झालं, बुवांना हे फार लागले आणि संगीत अध्ययन थांबले. नंतर धारच्या देवजीबुवांकडे अध्ययन चालु होतं. पण गुरुपत्नीला ते आवडत नसे. एकदा गुरुमाता अंगावर पेटता काकडा धावली व घराबाहेर काढलं आणि बुवांच संगीत अध्ययन थांबले.

शेवटी बुवा फिरत फिरत मोंगीर गावापाशी असलेल्या विक्रमचंडी देवळात आले. इथे देवळात बुवांनी तपाला सुरुवात केली. बुवा चार आठवडे फक्त बेलाची फळे व पाने खाऊन राहिले. ह्या उद्देशाने की आता देवालाच दया येईल व मला तोच मार्ग दाखवील. शेवटी देवीला दया आलीच. फिरत फिरत बुवा ग्वाल्हेरला आले आणि बुवांची भेट प्रसिद्ध गवई वासुदेवबुवांशी झाली. वासुदेवबुवा हे खुद्द हद्दु - हस्सु खाँ चे शिष्य. वासुदेवबुवांनी आपल्या बुवांना विचारलं की आधी कुठं गाणं शिकलायस का? तेव्हा देवजीबुवांच नाव ऐकुन म्हणाले, "तु देवजीबुवांचा शिष्य ना, मग मी नाही शिकवणार". तेव्हा का कोण जाणे बुवांना अंतप्रेरणा झाली आणि त्यांनी वासुदेवबुवांना म्हटले "बुवा तुम्हीच मला शिकवाल" !!!

बुवाचे शब्द अक्षरक्षः खरे ठरले. ग्वाल्हेरहुन निघुन बुवा फिरत फिरत काशीला आले. तेथे परत बुवांची भेट वासुदेवबुवांशी पडली. ही भेट म्हणजे बाळकृष्णबुवांचा सोनेरी क्षण होता. ह्या वेळेला वासुदेवबुवा म्हणाले, "मागं झालं ते झालं. आता मी तुला गाणं शिकवणार". बाळकृष्णबुवांनी गुरुसेवाला लगेच प्रारंभ म्हणुन तानपुरा जुळवला आणि "श्रीरामा लवकर तारी" या पदानं गुरुसमोर मागणं मागितलं. वासुदेवबुवा आपल्या शिष्यावर खुष झाले. सतत वीस दिवस बाळकृष्णबुवांनी वासुदेवबुवांची मनोभावे सेवा करुन गुरुला बेहद्द खुष केलेच पण आता वासुदेवबुवांचा त्यांच्यावर जीव जडला. त्यांनी एकच अट घातली ती म्हणजे ख्याल गायकीकरता आवाजाला विशिष्ट वळण यावं लागतं तेव्हा आपल्या बुवांनी टप्पे गायचे नाहीत. येथील वाचकाकरता, टप्पा गायकी ही पंजाबी ढंगाची गायकी आहे हे सांगावेसे वाटते. शेवटी बुवा व वासुदेवबुवा ग्वाल्हेरला जायला निघाले पण दोघांच्या भाड्याएवढे पैसे नव्हते. तेव्हा बुवांना मागे ठेऊन वासुदेवबुवा पुढे गेले. शेवटी कसे तरी करुन मजलदरमजल करीत बुवा ग्वाल्हेरला पोहोचले व बुवांच्या आयुष्याला एक वळण लागलं.

पुढे पहा..भाग -२

=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.

छायाचित्र : जालावरून साभार.

विशेष सुचना : मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व.

हे ठिकाणसद्भावनामाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

चकली's picture

20 Dec 2008 - 2:51 am | चकली

लोकप्रभा मध्ये अंजली किर्तने यांची अशाच स्वरूपाची मालिका येते. त्याची आठवण झाली. अजून वाचायला आवडेल.

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

20 Dec 2008 - 3:09 am | प्राजु

गावभागात बाळकृष्ण भवन आहे तिथे संगीताच्या मैफिली, सांस्कृतीक कार्यक्रम होतात.
इचल करंजीमध्ये होते तेव्हा बाळकृष्ण बुवांबद्दल खूप ऐकलं होतं माझ्या साने या गुरूंकडून.
आपल्या लेखातून बरिच माहिती मिळाली.
या सूर्याला माझा नमस्कार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/