परोपकारी गणू

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
4 Sep 2015 - 8:57 pm

आज गावचा आठवडे बाजार. त्यामुळे सकाळची शाळा आणि दुपारी बारा वाजता सुट्टी. गणूला हा दिवस खूप आवडे. नेहमीप्रमाणे तो शाळेतून बारा वाजता घरी आला. घराला कुलुप होते.आई शेतावर मजूरीसाठी गेली होती आणि अजून तायडी पण शाळेतून आली नव्ह्ती. म्हणून तो घराच्या ओटयावर बसून राहीला. एव्हढयात त्याला शेजारच्या बिन्नूचा रडण्याचा आवाज आला. बिन्नू हा दुसरीत शिकत होता. त्याची आई सहसा कुठे बाहेर जात नव्हती पण आज ती घराला कुलुप लावून बाहेर गेली होती. घर बंद पाहून बिन्नू मोठमोठयाने रडत होता. गणूचा ह्या टिल्लूवर भारी जीव. त्याच्याशी खेळायला त्याला खूप आवडे. आज त्याला रडताना पाहून गणूची कालवाकालव झाली. तो बिन्नूच्या जवळ गेला आणि त्याचे डोळे पुसत आई लवकर येईल अशी समजूत घालू लागला. बिन्नू अजून ओक्साबोक्शी रडायला लागला आणि म्हणू लागला ,"गणूदादा, मला खूप भूक लागलीय ऊं ऊं ऊं..."
गणूला खूप दया आली. त्याला काय करावे सुचेना. तेव्हढयात त्याला आठवले की त्याने एकदा बिन्नूच्या आईला मागचे दार कडीच्या ऐवजी दोरीने बांधून बंद केलेले बघितलेय. मागच्या दाराची क॑डी बरेच दिवस झाले तुटली होती, पण बिन्नूचा बाप एक नंबरचा चिक्कू. पैसे खर्च होतील म्हणून दाराची कडी दुरुस्त करायचे लांबणीवर टाकत होता. त्यामुळे बिन्नूची आई बिचारी दोरी बांधून दार बंद करायची.

गणूने बिन्नूला समजावले, "मी देतो तुला जेवायला. चल माझ्या बरोबर." बिन्नूच्या घराशेजारून बोळ जात होता. गणू बिन्नूला घेऊन त्या बोळातून बिन्नूच्या घराच्या मागच्या बाजूला गेला आणि ताकद लावून दार ढकलू लागला. बराच वेळ दार ढकलल्यानंतर दाराला बांधलेली दोरी तुटली आणि दार उघडले. गणू आणि बिन्नू घरात घुसले. बिन्नूची आई स्वैपाक करून गेलेली दिसत होती. कालवणाचे पातेले चुलीवर होते आणि भाकरीची टोपली पण चुलीजवळच ठेवली होती. गणूने ताट घेतले आणि बिन्नूला जेवायला वाढले. ते पिटुकलं भूक लागल्यामुळे मटामटा जेवायला लागलं. गणू हनुवटीवर हात ठेवून बिन्नूकडे कौतुकाने पहात होता आणि आतून त्यालाही चांगले काम केल्याचे समाधान वाटत होते.

तेव्हढयात पुढच्या दाराचे कुलुप काढल्याचा आवाज झाला आणि बिन्नूची आई दार उघडून घरात आली. मागचे दार उघडे पाहून तिला धक्काच बसला. आत येऊन पहाते तर बिन्नू जेवत होता आणि गणू त्याच्या समोर बसला होता. बिन्नूच्या आईने काही विचारण्याच्या आत गणूने खुलासा केला. " काकू, बिन्नूला खूप भूक लागली होती म्हणून रडत होता. मी त्याला जेवायला वाढले". गणूला वाटले आता बिन्नूची आई खूप कौतुक करेल .
"अरे पण तुम्ही घरात कसे काय घुसलात ?" बिन्नूच्या आईने गणूला विचारले.
"काकू, मला माहीत होते तुम्ही मागच्या दाराला दोरी बांधत होता ते. मी दार ढकलले आणि दार उघडले ",गणू म्हणाला.
"अरे देवा" असे म्हणत बिन्नूची आई मटकन खाली बसली आणि बिन्नूच्या पाठीत धपाटे घालायला लागली. "मुडद्या, तुला एव्हढी कळ काढंना व्हय. मी येणारच होते लगेच. पार खाण्यावाचून जीव चालला होता काय तुझा?"

तिने आता गळा काढायला सुरुवात केली,"अरे देवा, आता एखादया चोरा चिलटाला कळलं तर काय व्हईल. परवा माझं डोरलं तुटलं त्याच्या वाटया डब्यात ठेवल्यात. आता त्या गेल्या तर काय करू? हा माणूस बी असा. दुनियेत असा चिंगूस माणूस पाह्यला नाही. एक कडी त्याच्याच्यानी नीट करता येईना इतक्या दिवस". तिने बिन्नूच्या बापाला चिकटपणाबद्द्ल खूप शिव्या दिल्या. "गण्या, थांब, तुझ्या आईलाच सांगते तू काय उद्देग केला ते." ती गणूला रागाने म्हणाली.नंतर घाईघाईने डबे उचकायला लागली.गणू पार गांगरून गेला आणि तशीच त्याने धूम ठोकली.

संध्याकाळी गणुची आई शेतावरून आल्यानंतर बिन्नूची आई तरातरा आली आणि गणूच्या आईला दुपारची घटना तिखटमीठ लावून सांगितली."गणूची आई,सांगा मी काय करावं बरं? एखाद्या चोरा चिलटाला कळलं तर? आत्ता परवाच डोरल्याच्या वाटया तुटल्या त्या घरात ठेवल्यात..." आणि असं बरंच काय काय बोलली.

गणूची आई शेतावर दिवसभर राबून दमून आली होती. तिचा पारा चढला. बिन्नूची आई गेल्यावर तिने गणूला धपाटे दयायला सुरवात केली. "मुडदया, कुणी सांगितले हे नसते उदयोग?"
"अगं आई पण बिन्नूला खूप भूक लागली होती! का मारतीस मला? " गणू रडतरडत बोलत होता.

कथालेख

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 9:32 pm | मांत्रिक

मस्त ओ बबनराव!!!

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2015 - 10:19 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुरेख निरागस "गणुकथा" !
छानच लिहिलिय.

तुमचा निरागस गणु अन तुमची साधी सरळ निर्लेप लेखन शैली दिवसेंदिवस जास्तच आवडायला लागलीय !

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 10:21 pm | मांत्रिक

हं खरंच! निरागस गणू! आपण असंच होतो नं गावाकडं राहताना! निरागस! निष्पाप!! निष्कपटी!!!

उगा काहितरीच's picture

5 Sep 2015 - 1:18 am | उगा काहितरीच

होतो
यातच सगळं कळालं

बहुगुणी's picture

5 Sep 2015 - 1:46 am | बहुगुणी

कथा आवडली, पण आतापर्यंतच्या तिन्ही कथांमध्ये गणू निरागसच असला तरी जगही त्याच्याशी दुष्टपणे नव्हतं वागत. या कथेतल्या गणूला एकदम मोठ्या माणसांच्या क्रौर्याची करून दिलेली ओळख अनपेक्षित होती, त्याचा निरागसपणा, बालपण फार लवकर संपेल अशी भीती वाटली.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2015 - 11:09 pm | चौथा कोनाडा

अगदी क्रौर्य वैगरे म्हणण्यापेक्षा घरी लपवलेल्या डोरल्यासाठी हवालदिल झालेल्या बिन्नुच्या आईची बोलणी खाउन वर स्वत:च्या आईच्या हातचे धपाटे खावे लागले बिचारया गणुला !

आपल्या जीवनातला निरागसपणाsसंपत आला असला तरीही गणु मधला संपणार नाही याची काळजी धागालेखक घेतीलच!

आई कितीही प्रेमळ असली तरी रागाच्या भरात तीही मुलांवर हात उगारतेच. गणूने चांगल्या हेतूने ते काम केले हे तिलाही कळले पण शेजारणीने आपल्या मुलाची तक्रार करावी हे तिला आवडले नाही.

एस's picture

6 Sep 2015 - 12:23 pm | एस

फारच छान कथा!

प्यारे१'s picture

6 Sep 2015 - 1:46 pm | प्यारे१

बिचारा गणू...!

पद्मावति's picture

6 Sep 2015 - 4:17 pm | पद्मावति

आवडली कथा.

खटपट्या's picture

6 Sep 2015 - 4:26 pm | खटपट्या

आवडली...

परोपकारी गणुची कथा आठवली ...
बिचारा .. इतकं चांगलं काम करून देखिल त्याच्या नशिबी मारच .

नाखु's picture

7 Sep 2015 - 10:34 am | नाखु

पण अश्यान गणू लवकर "मोठा (?)" आणि झेंटलमन हुईल याचीच भीती वाटते.

गणूकथा आस्वादक नाखु

गणू निरागस आहे आणि निरागसच रहाणार आहे.
लवकरच पुढच्या कथेत गणू पुन्हा भेटीस येईल.
ज्यांनी गणूचे आधीचे भाग वाचले नसतील त्यांच्यासाठी लिंक.

बिल्ला

गणू नाटयस्पर्धा गाजवतो

gogglya's picture

7 Sep 2015 - 4:59 pm | gogglya

बाकी निरागस मुलांना आपल्या वागण्यात नक्की काय चुकले याची कल्पना नाही आली तर खुप गोंधळ होत असेल ना? आणी नक्की कसे वागले की आपण 'मोठ्ठे' होउ हे कोडे सोडवता सोडवता मुळचा निरागसपणा लुप्त होऊन आपल्या पालक / Role Model ला आवडेल असेच वागणे अंगीकारले जात असेल. हुजुरेगिरी चे मूळ ह्या अश्या घटनांमध्ये तर नसेल ना?

बबन ताम्बे's picture

7 Sep 2015 - 5:28 pm | बबन ताम्बे

आपण पण कधी मुलांना आता तू मोठा झालास, एव्ह्ढे पण कळत नाही असे कधी म्हणतो तर कधी गप्प बस, अजून तू लहान आहेस, तुला कळणार नाही असे म्हणतो. ती बिच्चारी गोंधळून जातात.