भ्रमणगाथा -९ लवणखाणी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
12 Dec 2008 - 12:35 am

याआधी : भ्रमणगाथा -८

ड्यूर्नबर्ग,आल्प्सच्या डोंगरमाळेतला एक प्राचीन डोंगर, मीठाच्या सगळ्यात जुन्या खाणींपैकी एक असून त्या खाणी पाहणं हा एक अनुभव आहे.प्राचीन काळात मीठामुळेच साल्झबुर्गला संपन्नता आली ,ह्या मीठाच्या खाणी सापडल्या हलाइनच्या ड्यूर्नबर्ग डोंगरात आणि म्हणून 'हलाइनचे श्वेतसोने ' असे नाव मीठाला पडले.ह्या खाणींचा मालक प्रिन्स आर्च बिशप,वोल्फ डिटरिश! दरवर्षी ३६,००००टन मीठ ह्या खाणीतून काढले जात असे.ह्या खाणी पहायला हलाइन या टुमदार गावातून आपल्याला ड्यूर्नबर्गकडे जावे लागते. तेथे पोहोचल्यावर आम्हा सर्वांना विशिष्ट एप्रन चढवायला सांगितले आणि एका सरकत्या जिन्याने खाली नेले. तेथे रेलट्रॅक दिसला.

एक साधारण पन्नाशीची मावशी तिथल्या पारंपरिक वेशात तेथे उभी होती. आत्ता मायनर ट्रेन (पिट रेल्वे)येईल,त्यात बसून आपल्याला खाणींकडे जायचे आहे.तिने माहिती पुरवली. थोड्याच वेळात ती झुकझुकगाडी आली की.. एक इंजिन आणि ३५,४० जण बसतील असे लांबच लांब बाकडे.. एवढीच गाडी. टप नाही की काही नाही.ज्ञानेश्वरांची चालणारी भिंत उगाचच काहीही संदर्भ नसताना आठवली. तर त्या बाकड्यांवर एकामागोमाग एक सगळे सलहान मुले गाडीगाडी करत खेळताना जसे बसतील तसे बसले आणि गाडी सुरु झाली. साधारण ५/७ मिनिटे गाडी बोगद्याबोगद्यातून चालली होती आणि एके ठिकाणी मावशींनी आम्हा सर्वांना उतरायला सांगितले. पलिकडच्या बाजूला आधीच्या ट्रीपमध्ये खाणी पाहिलेले लोकं परत जाण्यासाठी नंबर लावून उभे होतेच.

आम्ही मग पुढे जाऊ लागलो. एका ठिकाणी थांबून मावशींनी जुने लहान बुटके मार्ग आणि नविन मार्ग दाखवले. हे बोगदे बांधताना लाकूड,स्टील आणि काँक्रिटचा वापर केलेला असून आपण आत्ता जमिनीखाली ८० मीटर आहोत अशी माहिती पुरवत मावशींनी सगळ्यांना एका ओळीत चालायला सांगितले. शाळेच्या सहलीला आल्यासारखे बाईंच्या सूचनेने वाटले खरे पण त्या बोगद्यात इतकी कमी जागा आहे की एकावेळी एकच जण जाऊ शकेल. येथल्या दगडांनाही खारट चव आहे हे ती सांगत असतानाच सगळ्यांनाच लग्गेच चव पहायचा मोह आवरला नाही. पुढेपुढे चालत आम्ही सगळे एका दालनात आलो. इथे चित्रफित सुरु झाली.खाणीतून मीठ कसे काढले जात असे पासून बाजारपेठेत कसे पोहोचत असे इथपर्यतचा सारा प्रवास ह्या चित्रफितीतून गोष्टीरुपाने दाखवला आहे.ड्यूर्नबर्गचा प्रिन्स आर्चबिशप, वोल्फ डिटरिश आपल्याला ह्या चित्रफितीतून भेटतो आणि त्याचे बोट धरुन आपणही त्याच्याबरोबर त्या काळात पोहोचतो.विशेष म्हणजे ही फित सलग न दाखवता खाणीच्या चार टप्प्यात ती दाखवतात.

येथून आता लाकडी स्लाइडने खाली जायचे होते. २८ मीटर लांबीची ती घसरगुंडी,एकावेळी दोघातिघांनी बसायचे,एकमेकाला धरुन ठेवायचे , पाय जमिनीला न घासतील असे तरंगते ठेवायचे आणि घसरायचे, मावशी सूचना देत होत्या.घसरगुंडीवर किती वर्षांनी बसलोत असे म्हणत सगळे खाली आले. इथे एका पाइपातून पाणी ठिबकत होते आणि खाली मीठाचे स्फटिकही दिसत होते.सगळ्यांनीच ते खारट पाणी चाखले. जागोजागी लावलेले फलक,पुतळे आणि चित्रांतून खाणीची माहिती सांगितलेली दिसत होती. चालता चालता एक पाटी दिसते. आपण ऑस्ट्रीयातून जर्मनीत येतो. जमिनीच्या पोटात ऑस्ट्रीया-जर्मनी सीमा आहे, जमिनीच्या पोटातल्या सीमेवर सुरक्षा नाही की चेकपोस्ट नाही हे अनुभवताना वेगळेच वाटले.

पुढे एका दालनात आलो. प्रिन्स मीठाची गोष्ट सांगत होता.हजारो वर्षांपूर्वी समुद्रातल्या खार्‍या पाण्यातले सॉल्ट डिपॉझिटस खडकांवर झाले,त्यापुढे हजारो वर्षांनी आल्पची निर्मिती झाली,आणि आल्प्सच्या काही डोंगरांच्या पोटात हे खडक लपून बसले.मग त्याने ड्यूर्नबर्गच्या पोटात लपलेले हे खडक आणि मीठ लोकांसमोर आणण्यासाठी खाणी खोदवून घेतल्या. आता आम्ही पुढे खरं म्हणजे अजून खाली जाण्यासाठी अजून एका ४२ मीटरच्या घसरगुंडीवरुन मघासारखेच खाली घसरुन आलो. प्रिन्स बिशप आमच्याआधीच इथे स्वागताला येऊन पोहोचलेला होता."पारंपरिक पध्दतीनेकाढले जाणारे मीठ पुरेसे नव्हते. मग मी तज्ज्ञांच्या एका गटाला पाचारण केले. मीठाचा पाण्यात विरघळण्याचा गुणधर्म लक्षात घेऊन त्यांनी एक योजना मांडली.'सोल्युशन माइनिंग' !" प्रिन्स गोष्ट सांगू लागला.

एक साधारण ३० मीटरच्या शाफ्टच्या सहाय्याने डोंगराच्या पोटात मोठ्ठा खड्डा खोदला. हा खड्डा पाण्याने काठोकाठ भरला.तेथल्या आजूबाजूच्या खडकातले मीठ ह्या पाण्यात विरघळत गेले आणि बाकीचा भाग पाण्याच्या तळाशी बसला. हा खड्डा हळूहळू मोठा होत गेला. पाच सहा आठवड्यांनी हे खारट झालेले पाणी,ज्यात साधारण २७% मीठ होते,पुढच्या प्रक्रियेसाठी बाहेर काढले गेले. ह्या पाण्याचे बाष्पीभवन करून खाली उरलेले मीठ दाबाखाली वाळवले जात असे. पुढची १०-१५ वर्षे हे अव्याहत चालू होते,आता खड्ड्याचे चांगल्या मोठ्ठ्या सॉल्ट लेक मध्ये रुपांतर झालेले होते.

गोष्ट ऐकून जरा भारावूनच एका तराफ्यातून त्या तळ्याच्या पलिकडे गेलो. "आपण आता जमिनीच्या खाली १८० मीटर आहोत." मावशींनी बोलायला सुरुवात केली. एवढा वेळ आम्ही जमिनीच्या पोटात होतो. अरुंद बोगद्यातून चालत होतो. कुठेही एकदासुध्दा आम्हाला गुदमरायला झाले नाही की उकाडा जाणवला नाही. "खाणी बांधल्या तेव्हापासूनच येथे १० अंश से तपमान वर्षभर कायम ठेवले जाते आणि शुध्द हवा खेळवलेली असल्याने तुम्हाला खाणीत,जमिनीच्या पोटात असलात तरी फ्रेश एअर मिळते." जुनी , ऐतिहासिक लाकडी पाइपलाइन दाखवत मावशींनी तत्परतेने प्रश्नाचे उत्तर दिले.आता मात्र ही पाइपलाइन न वापरता नवीन तंत्रज्ञान वापरले जाते हे सुध्दा आवर्जून सांगितले. थोडे पुढे आल्यावर आमचे लक्ष दोन मानवी सांगाड्यांनी वेधले. खाणीचे बांधकाम जेव्हा चालू होते तेव्हा १५७७ मध्ये एक आणि १६१६ मध्ये दुसरा असे दोन मानवी सांगाडे मिळाले. शेकडो वर्षांपूर्वी दरडी कोसळून त्यात गाडले गेलेले हे लोकं आहेत. २००० वर्षे वयाचे हे सांगाडे तेथल्या मीठामुळे सुरक्षित राहिले.ते पाहताना अंगावर काटा आला.

जमिनीच्या पोटात दडलेले ते आश्चर्य पाहून सरकत्या जिन्याने वर आलो आणि मघाचच्या झुकझुकगाडीची वाट पाहू लागलो. आता सगळ्यांचे लक्ष घड्याळाकडे गेले. १ वाजून गेला होता. दिडपर्यंत परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर साडेपाच पावणेसहापर्यंत फ्रांकफुर्टात पोहोचू असा विचार मनात आला. खाणीतून बाहेर आल्यावर अक्षरशः पळत आमच्या गाडीकडे गेलो. तहानभूक बाजूला ठेवून,कोठेही न थांबता शक्य तितके लवकर फ्राफुला पोहोचून लिखाळ मंडळी आणि इरफानची ट्रेन गाठायची हे लक्ष्य होते. १३०,१४०/तास च्या वेगाने जात होतो पण तणावाने कोणालाच काही सुचत नव्हते. एखाद्या ठिकाणी कॉफी ब्रेकमध्ये पाच,दहा मिनिटे घालवून वेळेचा अपव्यय नको असेच सगळ्यांचे मत पडले आणि .. चालत्या गाडीला खीळ लागली. पुढे दिसणारा गाड्यांची मोठ्ठाच्या मोठ्ठी रांग पाहिल्यावर अवसान गळाले. त्यात १०,१५ मिनिटे अडकून पुन्हा वेग पकडला आणि परत एकदा स्टाऊ! असे तीन चारदा झाले. घड्याळात आता चार वाजून गेले होते, अजून आम्ही न्यूर्नबर्गच्याच आसपास होतो. दीडपावणेदोन तासात फ्रांकफुर्ट गाठणे अशक्य आहे ,लिखाळची गाडी चुकली हे तर स्पष्ट झाले.इरफानला तरी गाडी मिळेल ह्या आशेने नेटाने,वेगाने पुढे जात राहिलो पण परत एकदा जवळजवळ २० मिनिटे स्टाऊत अडकलो. आता इरफानचीही गाडी मिळणे अशक्य होते.

एकदा गाड्या चुकल्याच आहेत म्हटल्यावर आता त्रास करुन घेण्यात काय अर्थ आहे? असे वाटले आणि सकाळी नाश्त्यानंतर काहीही न खाल्ल्ल्याची जाणीवही झाली. मग मात्र एका ठिकाणी थांबून पेटपूजा केली,कॉफी पिऊन जरा ताजेतवाने झालो आणि पुढचा प्रवास तणावरहित गप्पा करत केला. मानहाइमच्या अलिकडे पुन्हा स्टाऊ ! हे म्हणजे आता अगदी पोचतोच आहोत ठाण्यात असे वाटावे आणि पनवेलात ट्रॅफिकने हैराण करावे असे झाले. शेवटी १०च्या सुमाराला फ्रांकफुर्टात पोहोचलो. विपिनचे ओपन तिकिट असल्याने कोणतीही गाडी चालणार होती. आता ह्या तिघांच्या तिकिटांचे आणि गाड्या कधी आहेत ते पहायचे होते.तिकिटखिडकीवर जाऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेला प्रकार कथन केला आणि काही पैसे भरुन ती तिकिटे पुढच्या गाडीसाठी व्हॅलिड करुन घेतली. एवढे होईपर्यंत डॉन्याची ट्राम आणि केसुंची डार्मस्टाटची गाडी लागलेली दिसल्यावर त्यांना जायला सांगितले. डॉर्टमुंडला जाणारी गाडीही तेवढ्यात १६ नं ला लागलीच. मग विपिनचा निरोप घेतला. अगदी इमर्जन्सीला हवीच म्हणून ठेवलेली थोडी सफरचंदे आणि पाणी विपिन, इरफान, लिखाळ, शाल्मली ह्या सर्वांना आता ह्या पुढच्या प्रवासाला उपयोगी पडत होते. लिखाळ द्वय आणि इरफानच्या गाडीला अजून पाऊण तास होता.इरफानला पहाटे ४ च्या सुमाराला एसन येथे गाडी बदलून गेल्सनकिर्शला जावे लागणार होते पण तरी थेट गाडी उपलब्धच नसल्याने इलाज नव्हता.
एव्हाना ११ वाजायला आले होते. सकाळपासून धावपळ चालू होती. आता गाडीची सोय झाल्यावर सगळ्यांची पोटं बोलू लागली होती. जवळपास २२ तास चालू असणार्‍या बर्गरकिंगमुळे ती सोय झाली. सर्वांनी आता मात्र खाऊन घेतले आणि नंतर ह्या तिघांना म्युनस्टरच्या गाडीत बसवले . आता सुटकेचा खरा नि:श्वास टाकून आम्हीही घरी जायला निघालो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

12 Dec 2008 - 12:44 am | लिखाळ

अरे वा वा वा :)
वर्णन छान.. आणि फोटो टाकायची पद्धत झकासच !!
-- लिखाळ.

रेवती's picture

12 Dec 2008 - 12:55 am | रेवती

हा भाग फारच माहितीपूर्ण व धावपळीचा होता.
लवणखाणींची माहिती मस्तच.
सगळेजण घरी पोहोचल्यावर मीही सुटकेचा निश्वास टाकला.
पहिल्या भागापसून ते ह्या शेवटच्या भागापर्यंत सगळी भ्रमणगाथा आवडली.

रेवती

नंदन's picture

12 Dec 2008 - 12:15 pm | नंदन

असेच म्हणतो. शीर्षकही मोठे कल्पक निवडले आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

12 Dec 2008 - 12:28 pm | ऋषिकेश

असेच म्हणतो .
चित्रांचे कोलाज आवडले

-(गोंधळलेला) ऋषिकेश

छोटा डॉन's picture

12 Dec 2008 - 7:21 am | छोटा डॉन

स्वातीताई, खरे आहे तुझे, शेवटचा दिवस भारीच झाला होता.
ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास.
सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ...

आयला हे फॉटु कसे कय टाकले एवढे भारी ?
णविणच स्टाईल आहे बॉ, मस्त आहे एकदम ...

अवांतर : मला सॉल्ट माईन्स मध्ये नमुन्यासाठीची भेट म्हणुन मिळालेली "मिठाची बाटली / डबी / कुपी " पॅकिंगमध्ये हरवुन गेली.

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

शाल्मली's picture

12 Dec 2008 - 3:50 pm | शाल्मली

ते मनोसोक्त पाहिलेला धबधबा , उरका आता च्या गतीत पाहिलेली सॉल्ट माईन , "पळवा पळावा नाहीतर गाडी निघुन जाईल" च्या तालावर झालेला सुरवातीचा परतीचा प्रवास व शेवटी "जाऊ दे आता ,गाडी निघुन गेली आहेच तर जाऊयात निवांत " च्या बोलावरचा निवांत उरलेला परतीचा प्रवास.
सर्व काही जसेच्या तसे उतरले आहे ...

अगदी बरोबर ! बापरे काय धावपळ झाली होती.. आणि अश्या रितीने आपली सहल अतिशय मजेत झाली... मस्त वर्णन. परत एकदा सहल अनुभवायला मजा आली. :)

--शाल्मली.

झकासराव's picture

12 Dec 2008 - 7:46 am | झकासराव

मस्त वर्णन आणि फोटु. :)
जमिनीच्या खाली ८० ते १८० मीटर हे आकडे ऐकुन जरा भितीच वाटली. किती खोल आहेत ह्या खाणी.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मनस्वी's picture

12 Dec 2008 - 12:26 pm | मनस्वी

मस्तच! मीठाच्या खाणीचे आणि भ्रमणगाथेच्या शेवटच्या दिवशीचे धावते-पळते वर्णन आवडले.
फोटो एकदम छोटे छोटे का टाकलेत?

सुनील's picture

12 Dec 2008 - 2:09 pm | सुनील

धावपळीचे वर्णन आवडले. फोटोमात्र नेहेमीसारखे टाकले नाहीत. का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक's picture

12 Dec 2008 - 4:09 pm | श्रावण मोडक

धावते वर्णन छान झाले.
(फोटोंविषयी बराच खुलासा करावा लागणार असे दिसते)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Dec 2008 - 6:20 pm | बिपिन कार्यकर्ते

वर्णन छान. फोटो छान. कोलाज पध्दतीने टाकलेत ना? तुमच्या झुकझुकगाडीचा फोटो बघून मज्जा वाटली.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

12 Dec 2008 - 6:23 pm | यशोधरा

लावण्यपूर्ण लवणखाणी :)

सहज's picture

15 Dec 2008 - 2:26 pm | सहज

खाणीचे वर्णन अतिशय आवडले.

पांढर्‍या एप्रन मधले मिपाकरांचे फोटो मस्तच.

:-)

बैलोबा's picture

15 Dec 2008 - 2:33 pm | बैलोबा

छान आहे वर्णन !

भडकमकर मास्तर's picture

15 Dec 2008 - 4:35 pm | भडकमकर मास्तर

छान वर्णन..
आणि गाडीवर एप्रन घालून बसलेले मिपाकर एकदम झकास...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2008 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खाणीचे वर्णन, एप्रन मधील मिपामंडळी आणि कोलाज केवळ सुंदर !!!

-दिलीप बिरुटे