मिपा संपादकीय - बलसागर भारत होवो!

संपादक's picture
संपादक in विशेष
17 Nov 2008 - 9:21 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

बलसागर भारत होवो!

गेल्या काही दिवसांत समस्त देशवासीयांची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी कामगिरी भारतीय शास्त्रज्ञांनी करुन दाखवली! स्वबळावर चांद्रयान मोहीम यशस्वी केली आणि चंद्रभूमीवर तिरंगा फडकला! किती अभिमानाची बाब! आजच्या युगात भारतीयांनी जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची छाप जगावर सोडली आहे म्हटल्यास ते वावगे ठरु नये. जागतिक घडामोडींत भारताची दखल घेतली जाते. स्वातंत्र्य मिळालेवेळी भारताची जी परावलंबी स्थिती होती, ती आता निश्चितच राहिलेली नाही. यशाची अनेक शिखरे भारताने, भारतीयांनी गाठलेली आहेत आणि त्याविषयी रास्त अभिमान बाळगणेही उचितच आहे. उद्यमशील भारतीय, विविध कंपन्यांचे नेतृत्व करत, जागतिक बाजारपेठा काबीज करत आहेत.

पण एकीकडे अशी वायुवेगात प्रगतीची घोडदौड सुरु असताना, ह्याच प्रगतीशील भारतात मूलभूत सोयी सुविधांविषयी प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावरची उदासिनता मात्र अस्वस्थ करणारी आहे. आंतरराष्ट्रीय वर्तुळात महासत्ता होण्याचे स्वप्न उरी बाळगून त्या स्वप्नाकडे उमेदीने वाटचाल करणार्‍या देशाची, देशाच्या प्रशासनाची आणि मुख्य म्हणजे देशवासियांचीही स्वतःला आणि इतर देशबांधवांना मिळणार्‍या मूलभूत सुविधांबाबतची बेपर्वाई, आपले हक्क आणि कर्तव्यांविषयीची दिसून येणारी बेफिकीरी, हे कोडे अर्तक्य आहे!

वानगीदाखल, आपल्या सामाजिक उदासिनतेबद्दल आणि बेपर्वाईबद्दल काही उदाहरणे द्यायचीच झाली तर...

आजही रस्त्यांवर कचरा इतस्ततः पडलेला आढळतो. तुमच्या आमच्यासारखे सुशिक्षित म्हणवणारे लोकही त्यात भर टाकतच असतात! अडाण्यांना समजत नाही म्हणावे तर सुशिक्षित व्यक्तीही बिनदिक्कतपणे रस्त्याने चालताना एखादा कागदाचा कपटा वा प्लॅस्टीकची पिशवी रस्त्यावर खुशाल फेकून देते! रस्त्यात थुंकणे तर आमचा राष्ट्रीय बाणा आहे जणू! अनेक शासकीय कार्यालयीन भिंतीही या रंगात रंगलेल्या असतात! परदेशांत जाऊन तिथल्या स्वच्छतेचे कौतुक करणारे आणि परक्या देशांत असताना तेथील मूळ रहिवाश्यांपेक्षाही अधिक जागरुकतेने त्या देशाचे सामाजिक नियम पाळणारे भारतीय भारतात परतताच मात्र ती शिस्त विसरुन जातात, याला काय म्हणावे?

पाण्याचा तुटवडा असल्याने, टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो अशीही काही गावांची स्थिती असते; पण जिथे पाणी मुबलक उपलब्ध असते, तेथे पाण्याच्या यथायोग्य वापराबद्दल पूर्ण उदासिनता आढळते. एवढेच काय, पाण्याने भरलेले टँकरही रस्त्यांतून जाताना, अर्धे अधिक पाणी गळताना आणि रस्त्यांवर सांडताना दिसते! काहीजण पाण्याच्या थेंबासाठी प्राण कंठाशी आणून वाट पाहतात, आणि दुसरीकडे अनिर्बंध पाणी वापरले जाते!

सद्ध्या वीजेचा पुरवठा आणि मागणी याचे प्रमाण जमत नसल्याने सामान्य माणसाला वीजटंचाईला सामोरे जावे लागत आहे, पण म्हणून आवश्यकतेएवढीच वीज वापरताना कोणीच दिसत नाही! वीजटंचाईला नावे ठेवताना, वीजेची उधळपट्टी सामान्य नागरिकापासून, सरकारी कचेर्‍यांपासून, खाजगी क्षेत्रात, मोठया मोठ्या मॉल्समधे कित्येक ठिकाणी आजही अव्याहत सुरुच असते! प्रत्येकालाच सामाजिक बांधिलकी ही नेहमीच दुसर्‍या कोणी मानावी आणि पाळावी, असे वाटत राहिले तर परिस्थिती सुधारणार कशी?

नेहमीच्या रहदारींच्या आणि इतरही लहानमोठयां रस्त्यांवर बारा महिने, तिन्ही त्रिकाळ सतत काही ना काही काम सुरु असते आणि रस्ते कायम उखडलेले असतात. रस्त्यांची कामचलाऊ डागडुजी फारशी टिकाऊ नसते! एकावेळी अनेक रस्त्यांची कामे काढल्यास त्यासाठी पुरेसे माणूसबळ, यंत्रणा, सिमेंट आदी सामग्री उपलब्ध असणार आहे का, याचे पूर्वनियोजन विचारात घेतले जात नाही. त्यामुळे कामे लांबतात. प्रशासनही कंत्राटदारांकडून थातूरमातूर काम करुन घेते, आणि ही व्यवस्था बदलवी यासाठी जनशक्तीचाही दवाब प्रशासनावर पडत नाही! वाईट अवस्थेतल्या रस्त्यांमुळे वाहनांच्या इंधनाचा अपव्यय, ध्वनीप्रदूषणात भर, वाहनांचे भाग खराब होणे, वेळप्रसंगी अपघात हे सारे प्रकार घडतच असतात! दुर्दैवाने जनमानसाला याची आता इतकी सवय झाली आहे की रोजच्या आयुष्याचा भाग असल्याप्रमाणे हे स्वीकारले गेले आहे. त्यात पुन्हा वाहतुकीचे कसलेही नियम न पाळता वाहने चालवणारे नागरिक स्वतःच्या आयुष्याबरोबर इतरांच्या आयुष्यांबरोबर कोणत्या अधिकारात खेळतात? वाहतूक पोलीसाने हटकले असता, त्याला लाच देऊन सुटायची क्लुप्ती जरी सोपी वाटत असली तरी, त्यातूनच भ्रष्टाचाराला उत्तेजन आपणच देत असतो!

आजही कित्येक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणातही ग्रामीण, शहरी, दुर्गम हा फरक आहे, शि़क्षणाच्या दर्जातही फरक आहे. खाजगी शाळा या केवळ ठराविक वर्गाला परवडू शकतात. शिक्षणाचे खाजगीकरण आणि बाजारीकरण हा एक आर्थिक सट्टा बनला आहे! आय. आय. टी सारख्या संस्था सोडल्यास शिक्षणाचा दर्जाही यथातथाच होत चालला आहे! शै़क्षणिक कुपोषण पुरेसे नाही म्हणून की काय, आर्थिक दृष्ट्या निम्न स्थितीमधील बालकांचे प्रत्यक्ष कुपोषणही सुरुच आहे. एकीकडे चंद्र सूर्यावर जायची आपली तयारी होते आहे पण पुढची येणारी बहुतांश पिढी सुदृढ असेलच ही खात्री आपण देऊ शकत नाही! आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असलेला वर्ग आणि काहीही नसलेला वर्ग यातील दरी दुरावतच आहे!

तीच कथा आहे आरोग्य सुविधांबद्दल. खाजगी इस्पितळांमधील सुविधांचा लाभ घेणे बहुतांश सामान्य जनांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. तरीही शासकीय रुग्णालये हा होता होईतो शेवटचा पर्याय असतो. तेथील मनोबल खच्ची करणारी यंत्रणाही याला कारणीभूत आहे.

हे सगळे सोडून द्या, सार्वजनिक प्रवासस्थळे, एसटी, रेल्वेची स्टेशने, शहर आणि गावांतील कित्येक वस्त्यांमधून, स्वच्छ आणि सुरक्षित अशी सार्वजनिक शौचालये अभावानेच दिसतात! आजच्या घडीला तरी ही गरज गावांतूनच काय पण शहरांमधूनही पूर्णपणे दुर्लक्षित आहे! नवीन एखादे बांधलेले सार्वजनिक शौचालय काही दिवसांतच बकाल आणि गलिच्छ दिसू लागते! या ठिकाणी स्वच्छता राखण्याची, अश्या स्थळांचा काही गैरवापर होत नाही ना हे पाहण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे - पण प्रशासन एकूणच याबाबतीत उदासीन वाटते! सामाजिक वेगवेगळ्या स्तरांवरुन प्रशासनावर दवाब आणला गेला पाहिजे, जे घडताना दिसत नाही!

हे सारं असं आपण एक समाज म्हणून चुपचाप का स्वीकारतो? आपापसात याविषयी बोलताना आपण संताप व्यक्त करतो, पण हाच संताप, एकसंधपणे, एक शक्ती बनून, राज्यकर्त्यांकडून प्रश्नांची तड लावून घेण्यात कुठे आणि का कमी पडतो? समाजाच्या लायकीप्रमाणे समाजाला राज्यकर्ते, प्रशासन मिळते असे म्हणतात. सरकारी यंत्रणेत बांधिलकी आणि उत्तरदायित्वाची भावना याचा अभाव तर जाणवतोच. कुठे तरी समाज म्हणून वावरताना आपण कमी पडतो का? एवढ्या अफाट पसरलेल्या भारतीय समाजमनाची शासकीय यंत्रणेला जरब का वाटत नाही? आज समाजातली काही माणसे सामाजिक बांधिलकीची कामे अंगावर घेत आहेतच, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची निकड किती जणांना वाटते? एकीकडे अफाट प्रगती करताना जर देशाची समाजव्यवस्था अशी आतून पोखरत राहणार असेल, तर प्रगतीचा डोलारा किती दिवस आणि कसा टिकावा?

सारे भारतीय माझे बांधव आणि त्यांच्या कल्याणात माझे कल्याण, ही प्रतिज्ञा केवळ शालेय पुस्तकांत वाचायची का? एक सामान्य नागरिक म्हणून स्वतःपुरती समाजिक शिस्त जरी प्रत्येकाने लावून घेतली, सामाजिक नियम स्वतः पाळले आणि शक्य असेल तिथे इतरांना पाळायला भाग पाडले, तरी शिस्तबद्ध समाजाची जरब प्रशासनावर पडायला सुरुवात व्हायला हरकत नाही. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार, लहान लहान गोष्टींपासून सुरुवात होऊन सामाजिक शिस्तीचे परिणाम संपूर्ण शासकीय यंत्रणेवर, राष्ट्रीय धोरणांवर जाणवल्याशिवाय राहणार नाहीत! कदाचित लगेच हे घडणार नाही, पण नजिकच्या भविष्यात घडेल हे नक्की! पण हे घडण्यासाठी त्याचा श्रीगणेशा आज व्हायला हवा!

आणि असा तुमचा माझा अंतर्बाह्य बलसागर भारत देश, विश्वात शोभून राहील यात माझ्या मनात तरी संदेह नाही!

पाहुण्या संपादिका : यशोधरा.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

17 Nov 2008 - 12:33 pm | पिवळा डांबिस

यशोधरा, हार्दिक अभिनंदन!!

मलाही हा प्रश्न नेहमीच पडतो. वैयक्तिक आयुष्यात आपण खूप स्वच्छता बाळगतो. मग सार्वजनिक ठिकाणीच असं काय होतं एकाएकी आपल्याला?
मला वाटतं आपल्या कामा-नोकरीबरोबर येणार्‍या जबाबदारीची, अभिमानाची जी जाणीव असते (वर्क एथिक) त्याचा अभाव हे एक कारण असू शकेल. मला वाटतं ते आपल्याला कधी शिकवलंच जात नाही. आणि हे वर्क एथिक फक्त उच्चस्तरावर असून चालत नाही तर ते समाजाच्या तळापर्यंत भिनावं लागतं.

अलिकडेच मला आलेला एक अनुभव.....
मी त्या दिवशी दुपारीच काही घरगुती कामानिमित्य ऑफिसमधून लवकर घरी निघालो होतो. माझ्या घराजवळ आल्यावर एक विचित्र दृश्य पाहिलं. माझं घर मूळ हमरस्त्यापासून बरंच आत आहे, तिथे फारसा ट्रॅफिक नसतो.....
पहातो तर एक रस्ता झाडणारा टृक माझ्यापुढे रस्ता झाडत हळूहळू चालला होता. मला आश्चर्य अशासाठी वाटलं की तो झाडत असलेला रस्ता मला तर स्वच्छच दिसत होता. मग हा काय करतोय तरी काय?
न राहवून मी त्याच्या थोडं पुढे आणून गाडी थांबवली आणि खाली उतरून त्याच्याकडे चालू लागलो...
मला येतांना पाहून तो ही थांबला...
"व्हॉट आर यू डूइंग?" मी आश्चर्याने त्याला विचारलं
"क्लीनींग द स्ट्रीट, सर!!" मला हा "येडा का खुळा" असं समजत तो म्हणाला.
मी रस्त्यावर मागे आणि पुढे नजर टाकली. माझ्या द्रूष्टीपथात येणारा सर्व रस्ता स्वच्छच होता. कचराच काय पण कागदाचा एक कपटाही पडलेला नव्हता रस्त्यावर! पानांचा पाचोळाही नव्हता!!! अगदी क्लीन काळाशार रस्ता!!
"आय डोन्ट सी एनी गारबेज ऑन द स्ट्रीट!" मी उदगारलो, "देन व्हॉट आर यू क्लीनिंग?"
"आय ऍम क्लीनिंग द ड्स्ट सर!"
"डस्ट?"
"येस सर, डिडंन्ट यू सी द वेदर रिपोर्ट? देअर इज गोईंग टूबी रेन टूनाईट. इफ आय डोन्ट रिमूव्ह द डस्ट, इट विल टर्न इन्टू मड टूमॉरो!! वुई डोन्ट वॉन्ट दॅट टू हॅपन, डू वुई?" तो समजुतीच्या स्वरात म्हणाला.
"रिअली?" माझ्या भारतीय मनाचं आश्चर्य अजून ओसरलेलं नव्हतं...
"येस, यू पे टॅक्सेस टू द सिटी कौंन्सिल (इथली म्युनिसिपालिटी). वुई वोन्ट लाईक इट इफ अवर टॅक्सपेयर्स हॅव टू ड्राईव्ह थ्रू मड इन द मॉर्निंग!!!!" तो सहजतेने उदगारला.
"थँक्यू सर!!" आता मी आदराने म्हणालो...

ही १००% सत्यघटना आहे. हिच्यावर आणखी काही टिप्पणी करायची मला तरी गरज भासत नाही....

मनिष's picture

17 Nov 2008 - 12:42 pm | मनिष

"येस, यू पे टॅक्सेस टू द सिटी कौंन्सिल (इथली म्युनिसिपालिटी). वुई वोन्ट लाईक इट इफ अवर टॅक्सपेयर्स हॅव टू ड्राईव्ह थ्रू मड इन द मॉर्निंग!!!!" तो सहजतेने उदगारला.
"थँक्यू सर!!" आता मी आदराने म्हणालो...

ही १००% सत्यघटना आहे. हिच्यावर आणखी काही टिप्पणी करायची मला तरी गरज भासत नाही....

खरच काहिही टिप्पणी गरज नाही! मी अजूनही बिस्कीट्/चॉकलेट्चे रॅपर खिशात ठेवतो तेव्हा लोकं येडा की खुळा असे पाहतात....
आपल्या इथे असे कधी पहायला मिळेल का?

यशोधरा, लेख आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2008 - 12:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी अजूनही बिस्कीट्/चॉकलेट्चे रॅपर खिशात ठेवतो तेव्हा लोकं येडा की खुळा असे पाहतात....

अगदी. आणि तेवढंच खरं हे पण आहे की जेव्हा मिळून असं काही काम करण्याची वेळ येते, उदा: कार्यालयात, तेव्हा फारच कमी लोकं पुढे होतात. किती वेळ लागतो एक इमेल लिहायला 'अमुक एक नळाचा वॉशर बदला पाणी फुकट जातंय' किंवा 'आमच्या ऑफिसच्या खोलीत खूप जास्त ट्यूब्ज आहेत ज्यांची गरज नाही', पण 'कशाला, माझ्या खिशातून थोडंच काही जातंय?' असा तद्दन चुकीचा विचार सरसकट होतो.

बाकी लेख खरंच चांगल्या विषयावर आणि उत्तम लिहिलेला आहे.

भाग्यश्री's picture

17 Nov 2008 - 11:35 pm | भाग्यश्री

यशो अग्रलेख आवडला! चांगला विषय आहे..
खरंतर ही सुरवात प्रत्येकाने आपल्यापासून केली पाहीजे.. अगदी टोकाची आग्रही भुमिका असली तरी चालेल..

खूप लहान असताना, मी चॉकलेट खाऊन चांदी खिडकीतून बाहेर टाकली.. माझा मोठा भाऊ शेजारीच होता.
त्याने ते पाहीले.. व प्रथम कानाखाली जोरदार आवाज काढला.. खाली जाऊन ती चांदी घेऊन यायला सांगितले, व घरच्या डस्टबिन मधे टाकायला लावली!..

त्यानंतर आजतागायत मी ( त्या थप्पडीच्या धाकाने, का होईना.. ) कधीही काहीही बाहेर फेकले नाही..
आणि तसेच, माझ्या आजुबाजुचे कोणी असे वागत असेल तर मीही त्यांना तो कचरा जपून ठेऊन, बिनमधे टाकायला लावते..

पिडाकाकांचे उदाहरणही बोलके.. इथे खूपदा लोकं पाहीली आहेत. सतत हातात झाडू घेऊन स्वच्छ करत असतात..
http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 11:56 pm | विसोबा खेचर

इथे खूपदा लोकं पाहीली आहेत. सतत हातात झाडू घेऊन स्वच्छ करत असतात..

अरे वा! या आधुनिक गाडगेबाबा मंड़ळींचं दर्शन घेतलंच पाहिजे बॉ एकवार! :)

तात्या.

--

"आणि हा संडास..!" कुलकर्णी म्हणाला.
"काय हो, इथेही ऍटोमॅटिक होतं की कुंथावं लागतं?" :)

(मी अणि माझा शत्रूपक्ष : पुलं)

भाग्यश्री's picture

18 Nov 2008 - 12:08 am | भाग्यश्री

तात्या खरंच एकदा या...आणि डोळसपणे फक्त पाहा.. एखाद्या गोष्टीबद्दलचा इतका पराकोटीचा तिरस्कार करणे, ते ही न पाहता,अनुभवता फार चुकीचे आहे.. इथे या.. रहा, इथली व्यवस्था पाहा.. आणि मग घाला हव्या तेव्हढ्या शिव्या! ते कराल तेव्हाच तुम्हाला एनआराय लोकांना, आणि परदेशाला शिव्या घालायचा जरातरी अधिकार प्राप्त होतो.. एरवी नाही..

सगळी चर्चा वाचली.. भारतात राहून पचाकन थुंकणार्‍या , आणि त्याचा अभिमान बाळगणार्‍या रेसिडंट भारतीयांपेक्षा समजुतदार एनआरआय केव्हाही बरे असं म्हणावसं वाटते..

(डोळस) भाग्यश्री..
http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 12:21 am | विसोबा खेचर

तात्या खरंच एकदा या...आणि डोळसपणे फक्त पाहा.. एखाद्या गोष्टीबद्दलचा इतका पराकोटीचा तिरस्कार करणे, ते ही न पाहता,अनुभवता फार चुकीचे आहे.. इथे या.. रहा, इथली व्यवस्था पाहा..

असं म्हणतेस? नक्की येईन एकदा!

अगदी काही नाही, तरी एखादा छानसा खुसखुशीत, टवाळखोर लेख लिहायला मालमसाला तर तिथे नक्कीच मिळेल! :)

चला, आता काही दिस तरी पान खाऊन पचाक कन थुंकण्याची सवय घालवायला हवी!
काय करणार बाब्बा! अमेरिकेला जायचंय ना..! ;)

तात्या.

आमचा आगामी संभाव्य लेख : तात्या निघाले अमेरिकेला! :)

रेवती's picture

18 Nov 2008 - 12:28 am | रेवती

थुंकले तरी बरं असं म्हणायची वेळ माझ्यावर आली होती,
जेंव्हा रस्त्यात एका मुलाने माझ्या अंगावर पान खाऊन पिंक टाकली आणि रागाने बघून काहीतरी बोलणार तेवढ्यात पुन्हा एकदा थुंकून पसार झाला लेकाचा.
जेंव्हा वयानं मोठे नागरीक असं करतात (त्याचं समर्थनही) तेंव्हा पुढच्या पिढीवरही तेच संस्कार होत असतात हे नेहमी लक्षात ठेवावं.
त्या सगळ्याची फळं पुढच्या अनेक पिढ्या उगाचच भोगत असतात.

रेवती

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 12:52 pm | विसोबा खेचर

वा!

नुस्ती ष्टोरी वाचूनच कसं अगदी छान छान, सुंदर सुंदर, स्वच्छ स्वच्छ वाटलं रे डांबिसा! ;)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2008 - 11:31 am | पिवळा डांबिस

नुस्ती ष्टोरी वाचूनच कसं अगदी छान छान, सुंदर सुंदर, स्वच्छ स्वच्छ वाटलं रे डांबिसा!
आपल्याला तसं वाटलं असेल तर आम्हाला आनंदच आहे.....

सर्किट's picture

19 Nov 2008 - 11:33 am | सर्किट (not verified)

साक्षात मालकाला आनंददायक असे कुणी सदस्य लिहितो, तेव्हा आम्हालाही अत्यानंद (देवकाका नाही) होतो..

परंतु वाचून आनंद झाल्यावर कुणी रस्त्यावर पचाक्कन थुंकत असेल तर मात्र आम्हाला दु:ख होते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 6:37 pm | आजानुकर्ण

येस सर, डिडंन्ट यू सी द वेदर रिपोर्ट? देअर इज गोईंग टूबी रेन टूनाईट. इफ आय डोन्ट रिमूव्ह द डस्ट, इट विल टर्न इन्टू मड टूमॉरो!! वुई डोन्ट वॉन्ट दॅट टू हॅपन, डू वुई?"

व्वा! किंबहुना दुसऱ्या दिवशी खरंच पाऊस झाला तेव्हा मी त्या कर्तव्यदक्ष माणसाला छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला पाणी देताना पाहिले. (आणि माझ्या डोळ्यातूनही पाणी आले.)

धन्य तो कर्तव्यदक्षपणा! मी तर निःशब्द झालो! ;)

आपला,
(कर्तव्यच्युत) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 11:14 pm | विसोबा खेचर

धन्य तो कर्तव्यदक्षपणा! मी तर निःशब्द झालो

मस्त! :)

मी पण नि:शब्दच झालो, नव्हे डांबिसाने सांगितलेली ष्टोरी ऐकून मला तर फिटच यायची बाकी होती! :)

च्यामारी, या अमेरिकनांची जळ्ळी कवतिकच फार! म्हणे रस्त्यात चिखल होऊ नये! छ्या..!

चामारी, आमच्याकडे पावसाळ्यात गोविंदात, गणपतीत रस्त्यावर मस्तपैकी चिखल वगैरे साचतो.. मजा येते तिच्यायला..:)

अहो रस्ता म्हटलं की धूळ, चिखल हा असायचाच! नाही, तस तो फार होऊ नये म्हणून रस्ता झाडला पाहिजे हे खरं आहे.. अहो पण त्याची कवतिकं किती?

छ्या..! आपण साला अमेरिकेत नाही गेलो तेच उत्तम! पहिल्या दिवशीच तिच्यायला पान खाऊन रस्त्यात पचाऽऽकन थुंकयचो आणि तो रांडेचा अमेरिकन फोलिस आम्हाला पकडायचा! ;)

तात्या.

--

आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी थांबली नाही, आणि आहे म्हणून कधी वेगानं पळाली नाही!
(अंतुबर्वा - पुलं)

आजानुकर्ण's picture

17 Nov 2008 - 11:40 pm | आजानुकर्ण

रांडेचा अमेरिकन फोलिस आम्हाला पकडायचा!

यावरून एक चावट जोक आठवला. वाचायची इच्छा असेल तर ठळक करा. संवेदनशील व्यक्तींनी वाचू नये हा इशारा.

आपला,
(चावट) आजानुकर्ण

इथून पुढे ठळक करा

एकदा एक अमेरिकन भारतात आला. त्याला इथे रस्त्यावर सूसू करायची इच्छा होती. ती काही अमेरिकेत पूर्ण होऊ शकत नव्हती. म्हणून त्याने निवांत वेळ पाहून एक कमी वर्दळीचा रस्ता शोधला.
एकाला त्याने करंगळी दाखवून विचारले, "कुठे करू?"
त्याने सांगितले, "समोर पिशाब करना मना हैं असे लिहिले आहे तिथे कर. "

मात्र अमेरिकन माणसाची कायद्याविषयीची भीती त्याला गप्प बसू देईना.
त्याने विचारले "पण इथे करायला गेलो तर कोणी पकडत नाही का?"

समोरचा माणूस अचंब्याने म्हणाला, 'नाय बा, ह्या बाबतीत कोणी हेल्प करू शकेल असं वाटत नाही. तुमचं तुम्हालाच पकडावं लागेल.'

आपला,
(विनोदी) आजानुकर्ण

इथपर्यंत

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 11:43 pm | विसोबा खेचर

हा विनोद आम्हाला ठाऊक होता, मस्तच आहे! :)

आम्ही हा विनोद सांगताना जपानी माणसाचे उदाहरण सांगायचो, आता यापुढे अमेरिकन माणसाचे सांगू.. ;)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Nov 2008 - 12:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा अवांतर प्रतिसादरुपी कचरा कोण साफ करणार?

(प्रश्नांकित) अदिती

घाटावरचे भट's picture

18 Nov 2008 - 12:43 pm | घाटावरचे भट

कोणास ठाऊक....कदाचित पिडांकाकांना भेटलेला तो ट्रकवाला करेल....
अर्थात मिपावर मूळ अमेरिकन नागरिकांना सदस्यत्व मिळेल की नाही ठाऊक नाही. सध्या एकूणच वातावरण अमेरिकाविरोधी आहे. :)

यशोधरा's picture

18 Nov 2008 - 2:46 pm | यशोधरा

>>हा अवांतर प्रतिसादरुपी कचरा कोण साफ करणार?

मुद्द्याचा प्रश्न आहे अदिती :)

भटबुवा, मी कोणाच्याच विरोधात नाही. अमेरिकेत वा इतर कोणत्याही देशात असे आहे, म्हणून भारतात असे हवे हा लिहिण्यामागचा उद्देश्य नक्कीच नाही. मुळात तुलना हा या लेखाचा उद्देश्य नाही. इतर देशांमध्ये काय आहे आणि काय नाही याची मल फारशी चिंता नाही, पण भारतामधल्या चुकीच्या गोष्टी, पद्धती, सामाजिक स्तरावरची उदासिनता याचे वाईट वाटते. ते चित्र बदलावे असे जरुर वाटते, आणि माझ्या परीने मी प्रयत्नही करते.

अवांतरः पानाच्या पिचकार्‍या मारण्यामधेच जर संस्कृतीचा अविष्कार दिसणार असेल, तर रस्त्यांवर रंगकाम करण्यापेक्षा स्वतःच्या घराच्या भिंती या अविष्कार रंगात जरुर रंगवाव्यात :)

संताजी धनाजी's picture

18 Nov 2008 - 4:51 pm | संताजी धनाजी

एकदम मान्य :) तुझ्याशी सहमत आहे.

- संताजी धनाजी

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 5:02 pm | विसोबा खेचर

हा अवांतर प्रतिसादरुपी कचरा कोण साफ करणार?

कुणीच नाही!

खास करून तू, बिपिन, राज जैन आणि यात्री बर्‍याचदा अवांतर प्रतिसादाचा कचरा करत असता असं माझ्या पाहण्यात आहे. यावेळेस तो थोडाबहुत मी केला आहे इतकंच!

तात्या.

आनंदयात्री's picture

18 Nov 2008 - 5:36 pm | आनंदयात्री

>>खास करून तू, बिपिन, राज जैन आणि यात्री बर्‍याचदा अवांतर प्रतिसादाचा कचरा करत असता असं माझ्या पाहण्यात आहे.यावेळेस तो थोडाबहुत मी केला आहे इतकंच!

आणी तुमच्याबरोबर इतरही आहेत की. तुम्ही मालक म्हणुन तुम्ही कुठेही काहिही लिहु शकता हे मी आणीबाणीच्या अस्तित्वामुळे मान्य करतो पण मग आम्हाला जशी "मिपावरच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा" घेउ नये असे सांगण्यात आले तसे इतरांनाही सांगितले गेले पाहिजे होते असे राहुन राहुन वाटते आहे.

माझ्यालेखी लेखनस्वातंत्र्य वापरुन जर कुणी,

१. सहेतुक एखाद्या आयडीला टारगेट करुन अश्लाघ्य, अर्वाच्य, दुखावणारे लेखन करत असेल
२. सहेतुक मनोगत किंवा इतर आंतरजालिय वादांना खतपाणी घालत असेल
३. सहेतुक राजकिय किंवा धार्मिक भावना भडकवणारे लिखाण करत असेल

तर त्याने मिपावरील आणिबाणीच्या काळात असलेल्या मर्यादित स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला असे होईल. आपले मत कळावे ही सादर विनंती.

आजानुकर्ण's picture

18 Nov 2008 - 10:41 pm | आजानुकर्ण

दोन किंवा अधिक व्यक्तींमधील जाहीर व अस्थानी गप्पाटप्पांनाही स्वातंत्र्याच्या गैरफायद्यामध्ये सामील करण्यात यावे असे वाटते.

आपला
(मिसळपावच्या संस्थापक संपादकांपैकी व घटनासमितीमधील माजी सदस्यांपैकी एक) डॉ. आजानुकर्ण आंबेडकर

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 11:54 pm | चतुरंग

फक्त खुद के साथ बातां असेल तर तो स्वातंत्र्याचा गैरफायदा नाही असेही घटनेत स्पष्ट्पणे नमूद व्हावे!

(बहुरंगी)
चतुरंग

आजानुकर्ण's picture

19 Nov 2008 - 12:13 am | आजानुकर्ण

दोन किंवा अधिक व्यक्ती असे मूळ कलमात नमूद केल्याने उपकलमाची गरज नसावी असे वाटते.

आपला,
(कायदेतज्ज्ञ) आजानुकर्ण जेठमलानी

छोटा डॉन's picture

19 Nov 2008 - 12:34 am | छोटा डॉन

दोन किंवा अधिक व्यक्ती असे मूळ कलमात नमूद केल्याने उपकलमाची गरज नसावी असे वाटते.

+१, सहमत ....

पण "बहुरुपांबद्दल (उर्फ एकाहुन जास्त आयडी )" काय मत आहे ?
बर्‍यात वेळा तात्पुरत्या फायद्यासाठी / समाधानासाठी / कुरघोडीसाठी याचा सढळ हस्ताने वापर होतो ....

याबद्दल योग्य ती भुमीका स्पष्ट करावी ....

( एकच आयडी असलेला ) छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

पिवळा डांबिस's picture

19 Nov 2008 - 11:46 am | पिवळा डांबिस

मी पण नि:शब्दच झालो, नव्हे डांबिसाने सांगितलेली ष्टोरी ऐकून मला तर फिटच यायची बाकी होती!
चालायचंच!!! असं होतं कधी कधी!!!!

च्यामारी, या अमेरिकनांची जळ्ळी कवतिकच फार! म्हणे रस्त्यात चिखल होऊ नये! छ्या..!
चामारी, आमच्याकडे पावसाळ्यात गोविंदात, गणपतीत रस्त्यावर मस्तपैकी चिखल वगैरे साचतो.. मजा येते तिच्यायला..
मस्तपैकी चिखल!! आणि मजा!!!!

अहो रस्ता म्हटलं की धूळ, चिखल हा असायचाच! नाही, तस तो फार होऊ नये म्हणून रस्ता झाडला पाहिजे हे खरं आहे.. अहो पण त्याची कवतिकं किती?
फार म्हणजे नक्की किती?

छ्या..! आपण साला अमेरिकेत नाही गेलो तेच उत्तम! पहिल्या दिवशीच तिच्यायला पान खाऊन रस्त्यात पचाऽऽकन थुंकयचो आणि तो रांडेचा अमेरिकन फोलिस आम्हाला पकडायचा!
तेच उत्तम!! इथे पान खाउन पाचकन् थुंकायच म्हणजे ३००-५०० डॉलर्स प्रत्येकवेळी दंडासाठी खिशात तयार ठेवायला हवे....
:)

आनंदयात्री's picture

17 Nov 2008 - 1:00 pm | आनंदयात्री

छान लिहलय. आवडला अग्रलेख.

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2008 - 1:12 pm | स्वाती दिनेश

यशो, अग्रलेख आवडला.
सार्वजनिक स्वच्छतेबाबतची आपली उदासिनता कधी जाईल ?
ये रेल जनताकी संपत्ती है! अशा बोर्डाखालच्या बाकड्यावर ब्लेडं मारुन त्याची शिवण उसवलेली दिसते. आपल्या खिशातून जात नाहीयेत ना पैसे.. ही वृत्ती तर दिसतेच दिसते .अदितीशी ह्या बाबतीत अगदी सहमत.
प्रगतीची घोडदौड आणि मूलभूत सोयींचा अभाव ह्या दोन्ही इतक्या टोकाच्या गोष्टी हातात हात घालून चालत आहेत आणि त्यामध्ये काही गैर वाटत नाहीये ..जपानसारखा राखेतून उभा राहिलेला देश पाहिला,दुसर्‍या महायुध्दातील पराभूत जर्मनीची प्रगती पाहिली, त्यासाठी पूर्ण पिढीनेच घेतलेले कष्ट पाहिले की तर हे जास्तच जाणवते.
हे चित्र बदलायला समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे असे वाटते.
स्वाती

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 1:34 pm | विसोबा खेचर

जपानसारखा राखेतून उभा राहिलेला देश पाहिला,दुसर्‍या महायुध्दातील पराभूत जर्मनीची प्रगती पाहिली, त्यासाठी पूर्ण पिढीनेच घेतलेले कष्ट पाहिले की तर हे जास्तच जाणवते.

हम्म! जपानमधल्या काही गोष्टी आपल्याकडे नाहीत आणि आपल्याकडील काही गोष्टी जपानकडे नाहीत!

चालायचंच..!

त्यांच्यासारखी स्वच्छता व टापटीप आणि मेहनत करण्याची वृत्ती हे गुण आपल्याकडे नाहीत, आणि पापी संसारने साजनभी मोरा छीन लिया.. ही भैरवीमधली जीव ओवाळून टाकावा अशी जागा जपान्यांकडे नाही!

चालायचंच..! :)

जय हिंद..!

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2008 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि पापी संसारने साजनभी मोरा छीन लिया.. ही भैरवीमधली जीव ओवाळून टाकावा अशी जागा जपान्यांकडे नाही!

किंवा आपल्याला माहित तरी नाही.
माझ्या खोलीतून भीमसेन जोशींचं गाणं कानावर पडलं तेव्हा "हा माणूस असा काय गातोय?" अशी चौकशी झाल्याचंही आठवतंय; (पक्षी त्यांच्याकडे थोर मानलं गेलेलं संगीत आपल्या भारतीय कानांना आवडेलच असं नाही! मला स्वतःलाच, हा प्रश्न विचारणार्‍याच्या दैवताचं संगीत आवडत नाही.)

पण त्यांच्यासारखी स्वच्छता व टापटीप आणि मेहनत करण्याची वृत्ती हे गुण आपल्याकडे नाहीत,
ती टापटीप आणि स्वच्छता मात्र बहुतेक सगळ्यांनाच आवडत असावी.

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 1:20 pm | विसोबा खेचर

कळकळीने व अगदी पोटतिडिकेने लिहिलेला अग्रलेख आवडला.. मुख्य म्हणजे इतर कुणा परक्या देशाशी तुलना न करता लिहिला आहे हे विशेष! :)

येस्स! आहेत काही दोष आपल्यात, हे मान्य करायला हवे..

परंतु,

आणि असा तुमचा माझा अंतर्बाह्य बलसागर भारत देश, विश्वात शोभून राहील यात माझ्या मनात तरी संदेह नाही!

तो तर आजही शोभतो आहे..!

आखिल विश्वात आगळंवेगळं ठरणारं आपलं संगीत, साध्या दडप्यापोह्यांपासून ते पानगीपर्यंत, तुपसाखरपोळीच्या छानश्या लाडवापासून ते साजूक तुपातल्या केशर घातलेल्या मोतीचूर लाडवापर्यंत, ओल्या जवळ्याच्या चटणीपासून ते शाही लखनवी बिर्याणीपर्यंत पसरलेली विविध राज्यातली आपली खाद्यसंस्कृती, भाषा, साहित्य, संतसाहित्य, लोककला, लोकनृत्य, सणवार..!

काय नाही आपल्याकडे? किती संपन्न आणि समृद्ध आहोत आपण..!

तसेच काही दोषही आहेत..! कोई बात नही, सुधारू हळूहळू...! :)

आपला,
(एका एकमेवाद्वितीय, सार्वभौम, समृद्ध व संपन्न देशाचा नागरीक!) तात्या.

सहज's picture

17 Nov 2008 - 1:37 pm | सहज

लेखातली तळमळ जाणवली.

आता सफाईबद्दल सरकारी व्यवस्थेला जाग व या क्षेत्रात व्यावसायीक गाडगे महाराज यायची दाट शक्यता आहे.

लोक कचरा टाकायची सवय एका रात्रीत सोडणार नाहीत त्यामुळे उलट युद्धपातळीवर सफाई कर्मचार्‍यांची व्यवस्था, याकरता जादा कर, सार्वजनीक स्वच्छतेबद्दल कडक नियम व अंमलबजावणी . जबरा आर्थीक दंड. स्वच्छतेचे निकष पुर्ण न करणार्‍या पालीका, पंचायती यांना सरकारी अनुदानात घट, वेतनवाढ थांबवणे.

मुक्तसुनीत's picture

17 Nov 2008 - 8:32 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. अग्रलेख आवडला !

रामदास's picture

17 Nov 2008 - 3:21 pm | रामदास

आपण सगळेजण एकत्र एकसारखा विचार करत आन्ही. आपण केला तर आपले लोकप्रतिनीधी एक विचार करत नाहीत. पोलीटीकल विल नाही. देशात सार्वजनीक शिस्त हा राष्टीय भावनेचा एक हिस्सा आहे आहे याची समज नाही.
तरी पण एव्हढे नक्की प्रवाही भाषेत लिहीलेला हा अग्रलेख पाठ्यपुस्तकात ठेवण्यासारखा आहे.

ललिता's picture

17 Nov 2008 - 3:54 pm | ललिता

बेशिस्त वागणं ही आपला राष्ट्रीय गुण आहे. "चलता है" = चालवून घ्या(यलाच पाहिजे), काय करायचं ते करा - आम्ही असे आहोत व असेच राहाणार.. अशी वृत्ती सर्रास आढळते मग कुणाला आणि कशा रितीने वळण लावणार... मोठा पश्नच आहे!

'सहज' म्हणतात तसं युध्दपातळीवर तेही सातत्याने अनेक वर्षें प्रयत्न करावे लागतील. मुख्यत्वे शिक्षण व त्याबरोबर स्वच्छतेचे व शिस्तीचे धडे हे तळगाळातील समाजापर्यंत पोचल्याशिवाय पर्याय नाही.

सुनील's picture

17 Nov 2008 - 4:32 pm | सुनील

अग्रलेख आवडला.

स्वतःपासून सुरुवात करावी आणि "जग तेव्हडेच सुंदर झाले" असे म्हणावे. दुसरे काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शितल's picture

17 Nov 2008 - 7:41 pm | शितल

यशोधरा,
सामाजिक जाणिवांची जाणिव करून देणारा अग्रलेख आवडला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2008 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग्रलेख आवडला.

अवलिया's picture

17 Nov 2008 - 7:52 pm | अवलिया

अग्रलेख आवडला.

नाना

रेवती's picture

17 Nov 2008 - 8:47 pm | रेवती

अभिनंदन!
आपण सुरूवात आपल्यापासून करूयात.:)

काहीजण पाण्याच्या थेंबासाठी प्राण कंठाशी आणून वाट पाहतात, आणि दुसरीकडे अनिर्बंध पाणी वापरले जाते!

हैद्राबादला असताना माझी घरकामाला येणारी बाई माझ्याकडे एके दिवशी पाणी नव्हतं म्हणून हसत होती.
तिच्या मते आपल्या मोठ्या घरांचा काय उपयोग जर पाणीही नसेल तर.
तिच्या झोपडपट्टीत मात्र नळ कायम सुटलेले असतात.
निवडणूका जवळ आल्या की मग त्यांची खरी दिवाळी असते म्हणाली.

रेवती

प्राजु's picture

17 Nov 2008 - 9:19 pm | प्राजु

खूप तळमळीने लिहिला आहेस यशो.

परदेशांत जाऊन तिथल्या स्वच्छतेचे कौतुक करणारे आणि परक्या देशांत असताना तेथील मूळ रहिवाश्यांपेक्षाही अधिक जागरुकतेने त्या देशाचे सामाजिक नियम पाळणारे भारतीय भारतात परतताच मात्र ती शिस्त विसरुन जातात, याला काय म्हणावे?

हे मात्र काहिसे नाही पटले. माझ्या बघण्यात तरी निदान परदेशातून आलेला कोणी भारतीय भारतात आल्यावर कचरा करतो हे पाहण्यात नाही आलं.
काही मुद्दे असे की, केंद्रसरकारने कुठे कुठे म्हणून पहायचं?? आपत्ती तर भारतावर सततच असते. मग ती नैसर्गिक असो वा, दहशतवादातून आलेली. पण आपत्ती ही येतच असते. त्यासाठी फक्त केंद्रसरकारने प्रयत्न करून काय साधणार?? आपणही तितक्याच पोट तिडकीने नको का मदत करायला? पूर आला, बॉम्बस्फोट झाले, दुष्काळ पडला, त्सुनामी आला... रेल्वे ऍक्सिडेंट... किती ठिकाणी केंद्रसरकार लक्ष घालणार. प्रत्येक व्यक्तीने ती आपली जबाबदारिच आहे असे समजून जर थोडाफार त्यातला वाटा उचलला तर सगळेच प्रश्न मिटतील.
याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे, स्टार इंडस्ट्रीज चे संजय घोडावत. संपूर्ण जयसिंगपूर जेव्हा पाण्याखाली होतं तेव्हा त्यांनी शिरोळ आणि आजूबाजूचा परिसर दत्तक घेतला. सगळ्या घरांच पुनर्वसन केलं.. सगळ्या लोकांना पूरस्थिती संपेपर्यंत अन्न, वस्त्र.. आणि रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवल्या. त्यांनी कोणत्याही सरकारची वाट नाही पाहिली. ज्या जयसिंगपूर आणि शिरोळ मध्ये आपला बिझनेस आहे.. त्या भागाचं ऋण समजून मी हे केलं असं त्यांनी सांगितलं...
स्वतःला जितकं जमेल तितकं करावं. पण एक नक्की की, दुसरा कोणी करेल म्हणून वाट पहात न बसता सुरूवात स्वतःपासूनच करावी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहमत...
केंद्रसरकारने फक्त करवसुली करावी, तेव्हढेच त्यांना जमते.
बाकी कामे बांधा-वापरा-हस्तांतर करा या सदरात टाकावीत. जमल्यास लोकसभा-राज्यसभा यांचेही आउट्सोर्सिंग करावे.

कपिल काळे's picture

17 Nov 2008 - 9:45 pm | कपिल काळे

बरेच वर्षांपूर्वी साप्ता.सकाळ मध्ये "ट्रॅफिक अमिताभ" अशी एक फॅन्टसी वाचली होती. त्या कथेत बेशिस्त ट्रॅफिक ला शिस्त लावण्यासाठी एक नागरिक कसे प्रयत्न करतो त्याचे वर्णन होते. अमिताभ जसे खलांच्या निर्दालनासाठे सिनेमात लढे देतो तसा ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठी एक नागरिक अमिताभ होतो अशी त्या कथेची मध्यवर्ती कल्पना होती.

असेच आताही स्वच्छता अमिताभ, भ्रष्टाचार निर्मूलन अमिताभ, परत ट्रॅफिक अमिताभ असे वेगवेगळे अमिताभ प्रत्यक्षात येण्याची गरज आहे.
हे संपादकिय वाचल्यावर हे सगळे आठवले.

पण ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या स्वतःपासून सुरुवात व्हायला हवी. मी काल- परवाच इतरत्र लिहिल्याप्रमाणेच भारतातही रस्त्यावर थुंकत नाही. काही खाल्ले तर वेष्टण घरी आणतो. हीच सवय मी माझ्या मुलीला लावली आहे.

प्रत्येक "मिपा करा"ने असे ठरवले तर प्रचंड फरक घडून येइल.

चॅरिटी बिगिन्स ऍट होम..

http://kalekapil.blogspot.com/

ह्या विषयावर पुष्कळ लिहून झाले असूनही सतत लिहीत रहायला हवे, कंटाळून चालणार नाही हे नक्की!
आपल्यापासून सुरुवात हे ह्यातल्या प्रत्येक गोष्टीचे मूळ आहे. आपल्या उदाहरणातून मुलांना चांगल्या सवयी लावणे आणि त्यातून हळूहळू सगळा समाज बदलेल असे डोळस स्वप्न पहाणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे (आमच्याकडे संगीताची मोठी परंपरा आहे आणि पान खाण्याची सुद्धा आहे, तशा परंपरा दुसरीकडे कुठेही नाहीत असे मानणे आणि म्हणून आम्ही रस्त्यावर थुंकत राहू असली भुक्कड समर्थने करणे, ह्या कामाला नख लावतात).

(दाढी करताना, दात घासताना थेट वाहत्या नळाऐवजी ग्लासमधे किंवा मगमधे घेऊन पाणी वापरल्याने ७०% पाण्याची बचत होते हे माहीत असल्याने कटाक्षाने पाणी तसेच वापराणारा आणि खोलीतून बाहेर पडताना गरज नसेल तर तेथले दिवे, पंखे बंद करुन बाहेर पडणारा.)
चतुरंग

ऋषिकेश's picture

17 Nov 2008 - 10:22 pm | ऋषिकेश

ह्या विषयावर पुष्कळ लिहून झाले असूनही सतत लिहीत रहायला हवे, कंटाळून चालणार नाही हे नक्की!

+१
तळमळीने लिहिलेला अग्रलेख आवडला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

भाग्यश्री's picture

17 Nov 2008 - 11:42 pm | भाग्यश्री

तुमच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत! दाढी सोडून अर्थात.. :)
चलता है, होता है करणार्‍या लोकांमुळेच हे सगळं होतं.. प्रत्येकाने स्वत:ला आणि जमेल तितकी दुसर्‍याला कडक शिस्त लावली की चांगला बदल हा होणारच..

(वीज,पाणी वाचवणारी, कचरा बाहेर न फेकणारी, ट्रॅफीक सिग्नल्स कटाक्षाने पाळणारी ) भाग्यश्री..

http://bhagyashreee.blogspot.com/

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:18 am | सर्किट (not verified)

दाढी केलीच नाही, तर पाण्याची शंभर टक्के बचत होते, हे विसरून चालणार नाही. आप्ल्या ऋषींना ह्याची पूर्ण जाणीव होती.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 1:32 am | चतुरंग

पण मी ऋषी नसल्याने तेवढी सवलत घेतो! :)
नाही म्हणायला मी मिशी ठेवतो त्यामुळे तेवढे पाणी वाचतेच! ;)

चतुरंग

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:39 am | सर्किट (not verified)

नाही म्हणायला मी मिशी ठेवतो त्यामुळे तेवढे पाणी वाचतेच!

अणि उच्छ्वासातून बाहेर पडणारा कर्बोदकवायू मिशीतच अडकून पडतो, वातावरणात जाऊन वैश्विक तापवृद्धीला हातभार लावत नाही, हे देखील मिशीचे महत्व !

मिशी न बाळगणार्‍यांना पर्यावरणवादी कसे म्हणावे ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मुक्तसुनीत's picture

18 Nov 2008 - 1:45 am | मुक्तसुनीत

कर्बोदकादि वायू जे "आतच" ठेवतात त्या सर्वाना पर्यावरणवादी म्हणावे काय ?
म्हणजे थोडक्यात गाडी पुन्हा एकदा इनोच्या खपावर आली. ;-)

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:48 am | सर्किट (not verified)

नक्कीच. हे मिथेनसारखे वायू बाहेर आल्याने दुहेरी प्रदूषण होते (ध्वनीप्रदूषण हेदेखील प्रदूषणच आहे.) त्यामुळे एकाच वेळी दोन दोन प्रदूषणे टाळणारे हे खरे पर्यावरणवादी.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

भास्कर केन्डे's picture

17 Nov 2008 - 10:32 pm | भास्कर केन्डे

हार्दिक अभिनंदन यशोधरा!

खूप चांगला अग्रलेख. वर प्रतिक्रिया आलेल्या आहेतच... त्यांच्याशी सहमत. असे लेखन समाजाच्या सर्व स्तरांवर कसे पोहचेल याचाही विचार समाजधुरिणांनी करायला हवा.

प्रशासनही कंत्राटदारांकडून थातूरमातूर काम करुन घेते
बरेच कंत्राटदार चांगल्या परियाचे असल्याने त्यांच्याकडून एक माहिती समजली की प्रशासनातल्या लोकांना त्यांचे खाणपाण चालू ठेवायचे असेल तर रस्त्याच्या डागडुगीसारखी कामे उत्तम समजली जातात. त्यामुळे ही कामे उदंड चालू ठेवण्याकडेच त्यांचा कल असतो... म्हणू मला जरा बदल सुचवावा वाटतो आहे...
प्रशासनही कंत्राटदारांकडून थातूरमातूर काम करुन घेते.

तरीही शासकीय रुग्णालये हा होता होईतो शेवटचा पर्याय असतो. तेथील मनोबल खच्ची करणारी यंत्रणाही याला कारणीभूत आहे.
मनोबल खच्ची करणारी यंत्रणा ही एवढी सक्षम आहे की लोक दुखने अंगावर काढायला तयार होतील पण त्या रुग्णालयांत जायला टाळतील. यावर एक स्वतंत्र लेखमाला/चर्चासत्र काढता येईल.

आपला,
(पंखा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

वेताळ's picture

18 Nov 2008 - 12:41 am | वेताळ

पण भारत व हे विकसित देश ह्यात खुप फरक आहे.आपली लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की अशा सेवाचा इथे बोजबारा उडतो.प्रथम इथल्या प्राथमिक सेवासुविधा सुधारल्या पाहिजेत व त्या बरोबर लोकाना त्या सेवांचा नीट उपयोग करुन घेण्यास शिक्षित करता येईल.आपल्या इथे रस्ता साफ करायला गाडी वापरणे शक्य नाही कारण इथेरस्त्यावर इतके खड्डे आहेत की ती गाडी कुचकामी ठरेल.माझ्या माहिती प्रमाणे तशा गाड्या मुंबई महानगरपालिकेकडे पण आहेत.पण त्याचा वापर प्रभावी पणे इथे करता येत नाही.
आपल्या इथले दरडोई उत्पन्न व विदेशातले दरडोई उत्पन्न ह्याची कुठेच तुलना होऊ शकत नाही. अजुनही भारतात ३०%/४०% लोक अर्धपोटी राहतात.त्याना नीट खायला मिळत नाही की त्याना घोटभर शुध्दपाणी प्यायला भेटत नाही. त्याना फक्त साफसफाईचे महत्व आता सांगण्यात काहीच अर्थ नाही.प्रथम पायाभुत सुविधा सगळ्याना मिळाल्या पाहिजेत. रोटी,कपडा,मकान व शिक्षण ह्या सुविधा सर्वाना व्यवस्थित जर मिळाल्या तर आपण बलशाली भारत नक्कीच बनवु शकतो.
उद्या जर भारतातील सगळे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळित झाले तर आपले तात्या पण रस्त्यातुन फिरताना पिकदानी घेऊन फिरतील.
अवातंरः
याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे, स्टार इंडस्ट्रीज चे संजय घोडावत. संपूर्ण जयसिंगपूर जेव्हा पाण्याखाली होतं तेव्हा त्यांनी शिरोळ आणि आजूबाजूचा परिसर दत्तक घेतला. सगळ्या घरांच पुनर्वसन केलं.. सगळ्या लोकांना पूरस्थिती संपेपर्यंत अन्न, वस्त्र.. आणि रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवल्या. त्यांनी कोणत्याही सरकारची वाट नाही पाहिली. ज्या जयसिंगपूर आणि शिरोळ मध्ये आपला बिझनेस आहे.. त्या भागाचं ऋण समजून मी हे केलं असं त्यांनी सांगितलं...

प्राजु ताई ह्याच घोडावतानी आपली प्रसिध्द उत्पादने स्टार गुटखा,चक दे गुटखा,लगान गुटखा व प्रिमिअर गुटखा ह्याची सवय सर्व महाराष्ट्रातील युवकाना लावली आहेत. सगळे लोक ह्याच्या गुटख्याच्या पुड्या खाऊन रस्ते,भिंती रंगवत फिरत असतात.आता त्यानी सगळा महाराष्ट्र दत्तक घ्यावा व रस्ते गुटखा व त्याच्या पुड्या ह्या पासुन मुक्त करावा.
वेताळ

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 12:47 am | विसोबा खेचर

ह्याच घोडावतानी आपली प्रसिध्द उत्पादने स्टार गुटखा,चक दे गुटखा,लगान गुटखा व प्रिमिअर गुटखा ह्याची सवय सर्व महाराष्ट्रातील युवकाना लावली आहेत.

आम्ही मात्र कधीच या गुटख्याच्या वाटेस गेलो नाही.. आम्ही नेहमी पारंपारिक सातारी काळा तंबाखू किंवा १२० जाफरानीच खातो..

आपला,
(महाराष्ट्रीय युवक!) तात्या.

उद्या जर भारतातील सगळे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळित झाले तर आपले तात्या पण रस्त्यातुन फिरताना पिकदानी घेऊन फिरतील.

क्या केहेने... अतिशय सुंदर वाक्य. आम्ही नक्कीच पिकदाणी वापरू..!
बाय द वे, या वाक्याला आमची पुन्हा एकवार, अगदी मनापासूनची दाद! :)

आपला,
(धर्मेंद्र) तात्या.

सर्किट's picture

18 Nov 2008 - 12:59 am | सर्किट (not verified)

आम्ही मात्र कधीच या गुटख्याच्या वाटेस गेलो नाही.. आम्ही नेहमी पारंपारिक सातारी काळा तंबाखू किंवा १२० जाफरानीच खातो..

उत्कृष्ट निर्णय !!

गुटक्यामुळे दाढेच्या बाजूच्या गालाला क्यान्सरमुळे भोक पडले तर पानाचा रस तोंडात तुंबणार नाही.

जाफरानीमुळे खालच्या ओठाला पडलेले भोक जिभेने बुजवता येऊ शकते.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

चतुरंग's picture

18 Nov 2008 - 1:05 am | चतुरंग

त्यामुळे भोक पडले तरी हरकत नाही

'रस गेला भोके राहिली' अशी एक नवीन म्हण निर्माण होईल इतकेच!!

चतुरंग

सर्किट's picture

18 Nov 2008 - 1:16 am | सर्किट (not verified)

पचाक्कन थुंकण्यासाठी आधी तोंडात भरभक्कम रस जमवणे आवश्यक आहे.

अन्यथा गालाला पडलेल्या भोकातून सगळा रस कॉलरवर उतरेल, आणि शर्ट खराब होईल.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

घोडावताच्या जोडीला शिरुरचे धारिवाल बी हैत.....

गुटखाच्या जोरावर पैसा कमवायचा आणि मग कॅन्सर पिडीतांसाठी दवाखाना उभारायचा ही यांची समाजसेवा (??) आहे.

मराठी_माणूस's picture

18 Nov 2008 - 2:59 pm | मराठी_माणूस

बरोबर आहे.
हे म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर असे झाले

अग्रलेख आवडला, यशोधरा.

>>> एक सामान्य नागरिक म्हणून स्वतःपुरती समाजिक शिस्त जरी प्रत्येकाने लावून घेतली, सामाजिक नियम स्वतः पाळले आणि शक्य असेल तिथे इतरांना पाळायला भाग पाडले, तरी शिस्तबद्ध समाजाची जरब प्रशासनावर पडायला सुरुवात व्हायला हरकत नाही.

- सहमत आहे. अग्रलेख वाचून हा व्हिडिओ आठवला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

18 Nov 2008 - 1:03 am | विसोबा खेचर

अग्रलेख वाचून हा व्हिडिओ आठवला.

फार सुंदर चित्रफित आहे रे नंदनसायबा..फितीतला तो लहानगा गोडच आहे..ते झाड बाजूला कर्ण्याकरता तो स्वत: पुढाकार घेतो याचे खूप बरे वाटले...

चित्रफित पाहून भारतातील पुढची पिढी गुणी असून चित्र आशादायी आहे असा विश्वास बाळगायला हरकत नाही! :)

आपला,
(आता निश्चिंत!) तात्या.

सुक्या's picture

18 Nov 2008 - 1:22 am | सुक्या

यशोधरा, अगदी अंतर्मुख करनारा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद!!

खरं पाहीलं तर भारतात अन् भारतीयांवर जगावर राज्य करण्याची कुवत आहे परंतु त्याचा वापर आम्ही योग्य तर्‍हेने करत नाहीत. भारतात मुलभुत सोयींचा वानवा आहे, भ्रष्ट्राचार आहे यावर कुनाचेही दुमत नाही परंतु यावर मात करण्यासाठी असलेले साहस आमच्या अंगी नाही. किंबहुना लोकलज्जा, तसे काम करण्यास वाटणारा कमीपणा, सर्वठिकाणी व्यवहार पहायची सवय आणी प्रत्येक गोष्टीचे खापर समाज्व्यवस्था किंवा सरकारवर फोडण्याची व्रुती हेच भारताच्या आजच्या परिस्थीतीला कारणीभुत आहेत.
ही गोष्ट सरकारने केली पाहीजे / ते सरकारचं काम आहे वगेरे बोलुन आपण आपली जबाबदारी झटकु शकत नाही. प्रत्येक ठिकानी लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. केवळ दंड करुन, कर वाढवुन ही समस्या सुटनार नाही.

इतर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे "सुरुवात आपल्यापासुन करु या. चांगल्या कामासाठी लाज सोडुया. हे चालायचचं असं बोलणं सोडुया". प्रत्येकाच्या स्वप्नांतला भारत प्रत्यक्षात यायला कितीसा वेळ लागतो.

(भ्रष्ट्राचार विरोधी ) सुक्या (बोंबील)
कामासाठी पैसे मागनार्‍या सरकारी कर्मचार्‍याला / कर्मचार्‍याच्या आम्ही फाट्यावर मारतो.

एकलव्य's picture

18 Nov 2008 - 10:00 am | एकलव्य

यशोधराताई - लिखाण आणि विचार आवडले, पटले.

महाथिर महम्मदने देशवासियांना गच्चीत कपडे वाळत टाकू नका म्हणून सांगितले... त्याची आठवण झाली. नाही म्हणायला गांधींनी किंवा सावरकरांनीही या अशाच छोट्याछोट्या गोष्टी भारतीयांना सांगितलेल्या असतील (नेमकी वाक्ये कधीतरी शोधायला हवीत.)

मला मनापासून रुचणारे एक वचन येथे मांडून निरोप घेतो whatever you can rightly say about India, the opposite is also true.

(महाभारतीय) एकलव्य

स्वप्निल..'s picture

19 Nov 2008 - 12:49 am | स्वप्निल..

यशोधरा,

अभिनंदन एवढया सुंदर लेखाबद्दल!

भारताच्या बरयाच समस्यांमागे लोकसंख्या हेच कारण असावे असे वाटते. तरीपन या सर्व गोष्टींची सुरुवात स्वतापासुनच करावी हेच महत्वाचे!

स्वप्निल

केदार's picture

19 Nov 2008 - 12:53 am | केदार

लिखान आवडले.

लिखाळ's picture

19 Nov 2008 - 7:26 pm | लिखाळ

छान ! अग्रलेख आवडला.
-- लिखाळ.