खरं तर जिजामाता उद्यानात जाण्याची आणि मिपा कट्ट्याला येण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यामुळे अनायासे एकाच तिकीटात दोन पक्षी मारायला मिळण्याची आयती संधी चालून आल्यावर ती मी सोडेन कशी?? ठरल्याप्रमाणे मिपा कट्टा सुरळीत पार पडला. त्याच्या वृत्तांताचा एक भाग मी, आणि दुसरा (माहितीपूर्ण) भाग सुंधाशूनूलकर यांनी फोटोंसकट मिपावर टाकायचा, असं ठरलंय!! कट्ट्यातले मी पाहिलेले आणि माझ्या लक्षात असलेले प्रसंग इथे सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. चू.भू.द्या.घ्या.
राणीच्या बागेत घरची माणसं फार फार वर्षांपूर्वी गेली होती. त्यांनी मला 'कॅमेरा घेऊन जा' असा सल्ला दिला. पण फोटो काढायचा पहिल्यापासूनच कंटाळा असल्याने 'लिव्हिंग द मुमेंट इज बेटर दॅन क्लिकींग द मुमेंट' हा नेहमीचा ड्वायलॉग मारून मी असाच कट्ट्याला यायला निघालो.
सकाळी ९.३० वाजता मी भायखळा स्टेशनवर उतरलो. मुविंकाकानी उद्यानाच्या तिकीटखिडकीजवळ भेटायची वेळ तीच ठरवली होती. साधारणतः माझा अनुभव असा आहे, की अमुक अमुक वाजता भेटायचं ठरलं, की भेटणारी मंडळी १० मिंटं, १५ मिंटं मागे-पुढे करतातच. त्यामुळे जेव्हा भायखळा स्टेशनवरून मी मुविकाकांना फोन लावला, तेव्हा कट्ट्याला येणारा मुविकाकांनंतर मी पहिलाच असेन, असा माझा अंदाज होता. मुविकाकांनी स्टेशनसमोरच्या उडिपी हॉटेलात बोलावलं आणि हॉटेलच्या बाहेर येऊन उभे राहिले. त्यांना एकटं बघून 'मीच पहिला' याबद्दल माझी खात्री झाली. ते मला आत घेऊन गेले, आणि मी सगळ्यात शेवटी हजेरी लावल्याचं माझ्या लक्षात आलं. एका टेबलावर मुविकाकांचे कुटुंब, आणि दुस-यावर कट्ट्याला आलेले मिपाकर न्याहारी करत बसले होते. ओळख परेड झाली. डॉ. सुबोध खरे, विलासराव, विनोद १८, भटक्या खेडवाला, सुधीर, निलापी, मुविकाका आणि मी असे सगळेजण होतो. मग निलापींनी थोडं आत सरकून मला बसायला थर्ड सीट दिली. विलासरावांनी त्यांच्याबद्दल थोडं सांगितलं, डॉ. खरेंनी काही गमतीशीर गोष्टी सांगितल्या. न्याहारी आटोपली. सगळ्यांनी चहा घेतला, आणि मग सगळेजण उद्यानाकडे निघालो.
उद्यानात पोचलो तेव्हा तिकीटखिडकीजवळ विश्वनाथ मेहेंदळे आणि सुंधाशुनूलकर आमची वाट पाहात तिथे उभे होते. तिथे मग पुन्हा सगळ्यांची ओळख परेड झाली. मुविकाकांच्या पत्नी आणि दोन मुलगे, विनोद१८ यांचा मुलगा आणि आम्ही सगळे असे मिळून एकूण १३-१४ जण आत शिरलो. पाण्याची बॉटल सुद्धा आत नेऊ देत नव्हते. पंचाईत होणार असं वाटलं. कारण सुंधांशूकाकांनी 'दोन-अडीच तास होतील' असा अंदाज सांगितला होता. आत गेल्यावर सुधांशू काकांनी आणि भटक्या खेडवाला यांनी विविध झाडांबद्दल मार्गदर्शन करायला सुरुवात केली. अधून मधून विनोद१८ आणि डॉ. खरे सुद्धा माहिती देत होते. विनोद१८ यांनी एक फूल(की फळ?) दाखवलं. त्याच्या पाकळ्या जाड होत्या. त्यात पाणी भरून दिवसभर ठेवून दिलं की गोंद तयार होतो असं ते म्हणाले. ते फूल/फळ थोडं पुढे गेल्यानंतरसुद्धा आम्हाला मिळालं. त्याच्या आकारावरून भटक्या खेडवाला यांनी मला आणि विमेंना बाजूला घेऊन एक विनोद सांगितला(जो मी इथे सांगू सांगत नाही. ;) )
सुधांशूकाकांनी काही पुस्तकं आणली होती. एक पक्ष्यांवर होतं, एक झाडांवर होतं. एखाद्या पझ्याविषयी संभ्रमात पडलो, की काका पुस्तकात त्याच्या चित्राखालचं नाव वाचून त्याविषयीची माहिती देत होते. सुरुवातीला त्यांना मी कोणत्यातरी पक्ष्याबद्दल काहितरी विचारल, कदाचित हळद्याबद्दल... तेव्हा त्यांनी पक्ष्यांवरचं पुस्तक काढून माझ्या हातात दिलं, आणि 'याच्यात शोध; अमूक अमूक मध्ये सापडेल' असं म्हणाले. त्या पक्ष्याला त्या पुस्तकात शोधण्यापेक्षा झाडावर शोधणं जास्त सोप्पं वाटलं मला. मी नुसतीच अनुक्रमणिका उघडून उभा राहिलो. तेव्हा त्यांनीच त्या पुस्तकातून एका फटक्यात त्यांना हव्या असलेल्या पक्ष्यांची चित्र शोधून काढली आणि सगळ्यांना माहिती देऊ लागले. मग त्यांनी अशोकाच्या झाडाबद्दलचा सर्वांचा गैरसमज दूर झाला. त्यामुळे सीता अशोकाच्या झाडाखाली विसाव्यासाठी कशी काय बसली असेल, याविषयीच्या शंकाकुशंका दूर झाल्या. उद्यानात कधी दिसला नसेल एवढा मोठ्ठा गुलमोहर दिसला. एरवी ठिकठिकाणी दिसणारी झाडंसुद्धा दिसली पण त्यांची नावं नव्याने कळली (आणि आता विस्मृतीतसुद्धा गेली). लोक ज्या फळाला रुद्राक्ष म्हणतात ते रुद्राक्ष नसून भद्राक्ष आहे हे नव्याने कळलं. रुद्राक्षाचं फळ थोडं चपटं असतं. भटक्या खेडवाला यांनी सुद्धा ब-याच झाडांविषयी माहिती पुरवली. निलापी मला वेगवेगळ्या झाडांविषयी सांगत होते. डॉ. खरे, मुविकाकांचा मुलगा, विनोद१८, निलापी, हे दणकून फोटो काढत होते. विमे अधून मधून प्रश्न विचारत होते. विनोद १८ आणि मुविकाकांची मुलं सुद्धा अधून मधून माहिती देत होते. मी उगाचच मला कुठे आगाऊपणा करायला मिळतो का, याची वाट बघत होतो, संधी शोधत होतो. पण जास्त जमलंच नाही :(
उद्यानात (नॅशनल पार्कच्या अनुभवामुळे) मला खूपच कमी प्राणी-पक्षी अपेक्षित होते. 'आता पूर्वीइतके प्राणी-पक्षी उरले नाहीत उद्यानात' असं ब-याच जणांकडून ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात (मलातरी) भरपूर पाहायला मिळाले. विशेषतः पक्षी. प्राण्यांमध्ये हिप्पो, नीलगाय, हरणं, माकडं(यांच्या पिंज-याजवळ आम्ही फिरकलो सुद्धा नाही. सगळी पिसाळलेली दिसत होती), हत्ती, सुसर, कासवं असे प्राणी दिसले. वेटोळं घालून बसलेला अजगरही दिसला. पक्ष्यांमध्ये पोपट बहुसंख्य होते. त्यातले काही मोकळे होते, काही पिंज-यात होते. आणि विविध रंगाचे, आकाराचे होते. पोपटांच्या पाठोपाठ(किंवा बरोबरीने?) बगळे बहुसंख्य होते. एका मोठ्ठ्या पिंज-यात एकाहून एक सुंदर बगळे वेगवेगळ्या 'पोजेस' देऊन बसले होते, उडत होते. त्यांच्या पिंज-यात काही कावळे आणि एक कबूतर सुद्धा अडकलेलं होतं. पण या सुंदर पक्ष्यांच्या सहवासात 'केल्याने पंडीतमैत्री' मिळणा-या सुखात असावेत ते सुद्धा.
थोडं पुढे गेल्यावर एका पिंज-यात दहा-बारा लव्हबर्ड्स दिसले. त्यांच्या शेजारी अजून काही पोपट होते. त्यांच्या शेजारी पांढरा कावळा, आणि त्याच्या शेजारी तीन-चार पहाडी मैनांचं बि-हाड होतं. या मैना खूपच सुंदर होत्या. दुस-या एका पिंज-यात मोराच्या जाती-प्रजाती दिसल्या(नेहमीचा मोर मात्र दिसला नाही). त्यातला पांढरा मोर तर मला स्वतःला भयंकर आवडला. पण हे सगळेच पक्षी अगदी कंटाळलेले आणि उदास वाटले. आता त्यांच्या त्या भावनाशून्य नजरेत त्यांचा उदास मूड मला कसा दिसला हा वेगळा मुद्दा झाला. पण तरी... केवळ आपल्या जातीचं जतन होणं गरजेचं आहे, आपली शिकार होता कामा नये, आपल्या सौंदर्याचा आस्वाद आपल्याला पाहायला येणा-या सगळ्यांना घेता यावा, एवढ्याशा कारणांसाठी कोणाला बंदिस्त व्हायला आवडेल? पिंज-यातून बाहेर पडल्यावर दिवसभरात मेलो तरी हरकत नाही, पण तोवर तरी काही क्षण मोकळ्या मनाने, स्वच्छंदपणे, संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेत मला जगता येऊ दे... अशीच काहीशी भावना असावी त्यांची. असो. विषयांतर नको उगाच.
इथे काही झाडांचा उल्लेख हात शिवशिवत असूनही मुद्दामून टाळतोय, याचं कारण म्हणजे त्यांच्याविषयी आम्हाला ज्यांच्याकडून कळलं, त्या भटक्या खेडवाला आणि सुधांशुनूलकर यांनीच इथेही त्या झाडांबद्दल सविस्तरपणे सांगणं उचित ठरेल.
आमची फेरी जवळजवळ संपत आली तेव्हा कस्तुरीताई(कस्तुरीच ना? चुकीचा आयडी सांगत असेन तर क्षमस्व) आल्या. त्यांची वाट पाहायला म्हणून एका ठिकाणी थांबलो तसे आम्ही सगळेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बाकांवर बसकण मारली. पण सुधांशुकाका आणि भ.खे.काका बसायला तयार नव्हते. 'काय तरूण मंडळी दमली एवढ्यात? अजून थोडं फिरायचं बाकी आहे' असं म्हणत ते उभेच राहिले. कस्तुरीताई आल्या. पुन्हा एकदा ओळखपरेड झाली. मग पुन्हा आम्ही आमची राहिलेली फेरी पूर्ण करायला निघालो.
उद्यान फिरून पोटभर माहिती गोळा केल्यानंतर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. उद्यानातून बाहेर पडलो तेव्हा विमेंनी, कस्तुरीताई, विलासराव, सुधीर यांनी निरोप घेतला. आम्ही ठरल्याप्रमाणे माटुंग्याला उडिपी श्रीकृष्ण बोर्डींग ह्या हॉटेल मध्ये फीस्ट वर ताव मारायला गेलो. पण तिथे ताव मारण्यासाठी आधीपासूनच लोकांनी भलीमोठी रांग लावली होती. दूपारचे १ वाजले होते. सडकून भूक लागली होती. रांगेत थांबायची कोणाचीही तयारी नव्हती. आम्ही तिथून तडक बाहेर पडलो. डॉ. खरेंनी मग आमचा निरोप घेतला. समोरच असलेल्या आर्यभवनात गेलो, तर तिथेही वेटिंग होतं. मग आम्ही थोडं पुढे जाऊन गुल्शन मध्ये जेवलो. तिथे पाच मांसाहारी आणि पाच शाकाहारी असे गट पडले. आम्ही बटर चिकन, चिकन मसाला, आणि चिकन कोल्हापुरीवर ताव मारला. शाकाहारी मंडळींनी पनीर आणि मला वाटतं वेज कोल्हापुरी मागवली. मग दोन्ही गटांनी भात मागवला. पोट तुडुंब भरलं. तृप्त झालो. जेवणाचा दर माणशी खर्च अपेक्षेहून कमी झाला. त्यामुळे अधिकच सुखावलो. उशीर होत असल्याने निलापींनी जेवण आटोपल्यावर आमचा निरोप घेतला. मग शेवटचं एकदा वृत्तांत कोणी कसा लिहायचा, सगळ्यांनी काढलेले फोटो कोणाला पाठवायचे, त्यातले निवडक मिपावर चढवायचे, पुढचा कट्टा कधी-कुठे वगैरे वगैरेवर चर्चा झाली, आणि मग सगळ्यांनी कट्ट्याच्या गंमतीजमती मनात साठवत आपआपल्या घराच्या दिशेनं प्रयाण केलं.
प्रतिक्रिया
26 Jan 2014 - 8:18 pm | पिलीयन रायडर
फोटू साठी उघडला होता!! निवांत वाचेन नंतर!!!
27 Jan 2014 - 11:23 am | दिपक.कुवेत
हेच बोल्तो. वाचण्यापेक्षा फोटोत अधीक रस.
26 Jan 2014 - 8:21 pm | रुस्तम
मी ९ वाजताच पोहोचलो होतो भायखळ्याला
26 Jan 2014 - 8:28 pm | रेवती
छान झालाय वृत्तांत!
26 Jan 2014 - 8:49 pm | मुक्त विहारि
छान जमला आहे व्रुत्तांत...
फोटो साठी
१. सुधांशू नुलकर , ह्यांना झाडांची जास्त माहिती असल्याने ते लिहीतील.
२. भटकंती झाल्याने खूप भूक लागली होती आणि ज्यांचा कट्टा हुकला, त्यांची अज्जून जळजळ होव्वु नये म्हणून खाद्य पदार्थांचे फोटो काढले नाहीत.
26 Jan 2014 - 8:50 pm | यशोधरा
वृ आवडला.
26 Jan 2014 - 9:20 pm | स्वाती दिनेश
कट्टा छान झालेला दिसतोय,
फोटोंच्या प्रतीक्षेत,
स्वाती
26 Jan 2014 - 9:25 pm | कंजूस
मला आवर्जून मुवि आणि विनोद यांचे या असे फोन आले होते पण मी येत नाही असे म्हणालो पण यायला हवे होते .
मोराचे मनोगत तंतोतंत खरे आहे ."काही प्राणी मुडमध्ये नसल्यासारखे वाटल्यामुळे पिंजऱ्यापाशी गेलो नाही " गेले वीसपंचवीस वर्षे असेच आहे आणि बागेबाहेरच्या "यहाँ दमा मिरगि कमजोरी"वर इलाज करणाऱ्या वैदूंचे औषध देऊनही उपयोग झालेला नाही .नाही म्हणायला एका चिडक्या गेंडयाच्या कुंडलीत म्हातारपणी लग्नयोग आल्याने मागच्या महिन्यात तो आनंदात किंगफिशरनाही दुसऱ्या विमानाने तडक असमला चि . सौ .कां ला भेटायला गेला आहे .लग्नानंतर आनंदी राहील अशी आशा आहे .
असो .
मी कटट्याला न येता घरीच झेंडा लावला .
26 Jan 2014 - 9:50 pm | भ ट क्या खे ड वा ला
ज्या दोन फुलांसाठी उद्यानाला भेट दिली ती सार्थकी लागली. नूलकर काकाना धन्यवाद.
dukesnose ला rappling ला जायचे सोडून इकडे आलो होतो
पगार पेक्षा बोनस जास्त अशी अवस्था सर्व वृक्ष प्रेमी मिपाकर भेटल्याने झाले.
वडापाव ने ताबडतोब वृत्तांत लिहून शब्द पाळला. छान लिहिला आहे वृत्तांत.
26 Jan 2014 - 9:51 pm | चित्रगुप्त
वृत्तांत झकास. आपण पुण्यात असतो, तर अश्या सोहळ्यात सहभागी होता आले असते, असे नेहमी वाटते.
अवांतरः राणीच्या बागेला अलिकडे (म्हणजे केंव्हापासून, कुणास ठाऊक) 'जिजामाता उद्यान' म्हणतात, हे प्रथमच समजले. पण या सरकारी ('शासकीय') नावापेक्षा 'राणीचा बाग' हे लहानपणी ऐकलेले नावच जास्त गंमतीदार आणि आपलेसे वाटते.
भाग्य, महात्मा उद्यान, नेहरू पार्क, वा राजीव उपवन वगैरे नाव नाही ठेवलेले.
आत पाणी नेऊ देत नाहीत याचे आश्चर्य वाटले. मग लहान मुलांनी तहान लागल्यावर कोक, फ्रूटी वगैरेच प्यायचे, असा दंडक आहे का? कोणत्यातरी उद्यानात हा प्रकार बघितलेला आहे. पाणी प्यायची सरकारने केलेली सोय शीतपेय विक्रेत्यांनी मुद्दाम तोडून फोडून टाकलेली असल्याने त्यांचेकडून चढ्या किंमतीत पेये घ्यावी लागतात. (स्वच्छ स्वच्छतागृहे आहेत का? ही आणखी एक जिज्ञासा).
26 Jan 2014 - 9:55 pm | मुक्त विहारि
आणि
पाणी प्यायची पण सोय केलेली आहे.
अद्याप सरकारला उद्यानात शीत पेयांचे स्टॉल ठेवावेत , असे समजले नाही, ही भाग्याची गोष्ट.
26 Jan 2014 - 10:09 pm | भ ट क्या खे ड वा ला
आत मध्ये एका ठिकाणी पिण्याचे पाणी दिसले.
पाणी बाटली चा उपयोग माणसे प्राण्यांना त्रास द्यायला करतात यास्तव हि अट योग्य वाटते.
स्वछता गृहे २/३ ठिकाणी आहेत. स्वच्छ नाहीत.
आत कोणत्याही प्रकारची दुकाने नाहीत.
अवांतर : कर्नाळा पक्षी अभयारण्यात एका अधिकार्याने त्याच्या कार्य काळात एक चांगली गोष्ट केली होती
आत जाताना किती प्लास्टिक आहे ते तपासले जात असे जर परत येताना तितके नसेल तर दंड आणि समोरील फलकावर नाव लहिले जात असे
27 Jan 2014 - 12:24 am | खेडूत
नामकरण बहुधा युती च्या काळात झालं असावं.
व्ही जे टी आय पण आता वीरमाता जिजाबाई टेक्नोलोजिकल इंस्तीटयुट आहे.
26 Jan 2014 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा
छान वृत्तां...त!
प.....ण फो.............................टूssss :-/
.
.
.
.
.
.
.
चा धागा लवकर टाका! =))
26 Jan 2014 - 10:20 pm | कंजूस
पाण्याच्या विकत घेतो त्या मिनरल वॉटरच्या बॉटल्स फेकून दिल्या जातात आणि बऱ्याचवेळा तंगडं वरती करून झोपलेल्या सिंहाला उठवण्यासाठी,माकडाला अथवा गेंड्याला डिवचण्यासाठी ' पब्लिक ' बॉटल फेकून मारते .या बॉटल नेऊ देत नाहीत .मुद्दाम पाणी ठेवण्यासाठी नेलेली पाण्याची चौकोनी रंगीत वगैरे बॉटल काढून घेत नाहीत .मुलांच्या गळयातल्याही नेता येतात .
त्रिवेँद्रमच्या बागेत हीच गोष्ट आहे .
26 Jan 2014 - 10:31 pm | सुधीर
वृत्तांत छान लिहिला आहेस! इतक्या वर्षात माझाही हा पहिलाच कट्टा. एक वेगळा कट्टा खूप आवडला. (अशाच प्रकारचा मागे झालेला काळाघोड्याचा कट्टा हुकला होता) सुंधाशुकाका आणि भटक्याखेडवाला तुम्हा दोघांमुळे भरपूर माहिती मिळाली. तशी विनोद१८, डॉक्टर आणि इतरांकडूनही बरीच माहिती मिळत होतीच. डॉक्टरांनी माडगूळकरांचं सांगितलेलं "माणसाने केलेल्या कामापेक्षा लावलेलं झाडं बरेच वर्ष राहतं" (असं काहीसं) वाक्य एकदम हृदयावर कोरलं गेलं.
"त्यात पाणी भरून दिवसभर ठेवून दिलं की गोंद तयार होतो असं ते म्हणाले."
पाणी भरून ठेवलं आहे, उस्तुकता आहे की गोंद कसा असेल. :)
26 Jan 2014 - 10:48 pm | विनोद१८
@ वडापाव,
छान लिहीलाय वृत्तांत सुरेख. नेहमी इथे भेटणार्या मिपामित्राना प्रत्यक्षात भेटुन बरे वाटले, मजा आली.
विनोद१८
26 Jan 2014 - 11:44 pm | यसवायजी
मि.वडापाव, मस्तच झालाय वृत्तांत.
फोटो आंदो..
आणी
@ जो मी इथे सांगू सांगत नाही >>
मग व्यनी प्लीज्य.. ;)
27 Jan 2014 - 10:18 am | जेपी
@ जो मी इथे सांगू सांगत नाही >>
आमालापण *mosking*मग व्यनी प्लीज्य..
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
27 Jan 2014 - 10:32 am | सुबोध खरे
आमची आई म्हणते माहेरचा कावळा सुद्धा गोरा असतो. येथे खरच गोरा कावळा होता. म्हणजे त्याची काव काव सुद्धा ताशीच होती त्यामुळे हा पक्ष बदललेला बागला नहीं अशी खात्री पटली
27 Jan 2014 - 10:33 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:36 am | सुबोध खरे
बाकी फुलोरा आणी वनस्पती नुलकर साहब वर्णनासह टाकतील
27 Jan 2014 - 10:37 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:38 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:39 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:41 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:41 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:43 am | सुबोध खरे
27 Jan 2014 - 10:14 pm | चित्रगुप्त
व्वा. मस्त आहेत फोटो.
27 Jan 2014 - 10:50 am | सूड
प्रतिसादात का होईना फोटो बघून बरं वाटलं.वृत्तांत 'बर्यापैकी बरा'.
27 Jan 2014 - 11:21 am | मुक्त विहारि
भर्रुन पावलो....
शुद्ध लेखन, व्याकरणाच्या चूका वगैरे न काढल्या बद्दल, मंडळ आभारी आहे.
सूड साहेब, जरा हलकेच घ्या.
पुढच्या तिन्ही कट्ट्याला तुमची गैर हजेरी मान्य करण्यात येणार नाही.
27 Jan 2014 - 2:53 pm | सूड
>>शुद्ध लेखन, व्याकरणाच्या चूका वगैरे न काढल्या बद्दल, मंडळ आभारी आहे.
खरंच वाचता वाचता सहज सापडाव्या अशा चूका दिसल्या नाहीत हो. आता चूका काढायच्याच असतील तर पुन्हा डोळ्याखालून घालावा लागेल वृत्तांत !! ;)
27 Jan 2014 - 2:59 pm | सूड
>>पुढच्या तिन्ही कट्ट्याला तुमची गैर हजेरी मान्य करण्यात येणार नाही.
पुढल्या कट्ट्यांना हजेरी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. बाकी तिन्ही कट्टे का म्हटलंत ते कळलं नाही, पुढले तीन कट्टे आताच ठरलेत का? ;)
27 Jan 2014 - 11:26 am | दिपक.कुवेत
"त्याच्या आकारावरून भटक्या खेडवाला यांनी मला आणि विमेंना बाजूला घेऊन एक विनोद सांगितला(जो मी इथे सांगू सांगत नाही." - आपली हरकत नसेल तर कॄपया व्यनी करावा.......आम्हिहि हसुन घेउ!
27 Jan 2014 - 11:40 am | सुधांशुनूलकर
फुलांचे आणि वृक्षांचे फोटो (थोड्या माहितीसह) एक-दोन दिवसात टाकतो. तोपर्यंत इतर काही फोटो---
(सर्व फोटो विनोद१८नी काढलेले, म्हणून ते स्वतः या फोटोंमध्ये नाहीत.)
कट्ट्याला सुरुवात होण्यापूर्वीची ओळखपरेड

डावीकडून - सुबोध, डॉ. खरे, तन्मय, निहार, विमे, विलासराव, सुधांशुनूलकर, वडापाव, भटक्या खेडवाला.
पुढे सौ. व श्री मुक्त विहारी.
डॉ.खरे, सुधांशुनूलकर, भटक्या खेडवाला यांना घडियालबद्दल सांगताना अनिरुद्ध (डावीकडचा)
विलासराव आणि निलापी यांची चर्चा
विमे काहीतरी सांगत आहेत, तेव्हा सगळे जण कुतूहलाने ऐकणारच!
तीन तास पायपीट करून कट्टा संपल्यावर न थकलेले, आनंदित मिपाकर
27 Jan 2014 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
नूलकर साहेब एक विनंती. फ्लिकरवरचे फोटो बर्याच जणांना दिसत नाहीत. गूगलफोटोवरून टाकू शकाल काय? तेथून सर्वांना दिसतात. धन्यवाद !
27 Jan 2014 - 7:34 pm | सुधीर
"डावीकडून - सुबोध, डॉ. खरे...." ऐवजी... "डावीकडून - सुधीर, डॉ. सुबोध खरे..." असे वाचावे :)
30 Jan 2014 - 11:21 am | सुधांशुनूलकर
सुधीरसाहेब, चुकीबद्दल क्षमस्व.
30 Jan 2014 - 11:41 am | सुधीर
काका का लाजवताय मला? :)
27 Jan 2014 - 11:55 am | पैसा
मस्त कट्टा आणि वृत्तांत! फोटोही मस्त आहेत. आता झाडांची माहिती वाचायला उत्सुक आहे. असेच कारणांनी कट्टे होऊ द्यात! तुमच्याबरोबर आम्हालाही तिथे भाग घेतल्यासारखं वाटतं.
27 Jan 2014 - 4:15 pm | सानिकास्वप्निल
मस्तं कट्टा.
वृत्तांत आवडला व फोटो ही सुरेख:)
27 Jan 2014 - 4:33 pm | भाते
वडापाव, पहिल्या वाक्यातच तुम्ही लिहिले आहे "मिपा कट्टयाला येण्याची ही माझी पहिलीच वेळ." म्हणजे कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याचीसुध्दा तुमची पहिलीच वेळ (अर्थातच!). छान लिहिला आहे वृत्तांत.
डॉ. सुबोध खरे आणि मुक्तविहारि, मुंबई कट्टयाचे आजीवन सदस्य. दोघांनाही धन्यवाद. आणि अर्थातच सुंधाशुनूलकर यांनासुद्धा. कट्टा अप्रतिम झाला आहे यात काही शंकाच नाही. वृत्तांत सविस्तर वाचला. सुंधाशुनूलकर यांच्या धाग्याची (फोटो आणि मुख्यत: माहिती) वाट पहात आहे.
मुक्तविहारि, >>>भटकंती झाल्याने खूप भूक लागली होती आणि ज्यांचा कट्टा हुकला, त्यांची अज्जून जळजळ होव्वु नये म्हणून खाद्य पदार्थांचे फोटो काढले नाहीत.
वृत्तांत वाचताना बटर चिकन, चिकन मसाला, चिकन कोल्हापुरी, पनीर आणि वेज कोल्हापुरी वाचुन थोडीशी जळजळ झालीच.
सुबोधजी, तरीही तो एक खादाडीचा फोटो टाकल्यापद्धल माझ्याकडुन निषेध! हा एक फोटो वगळता तुम्ही टाकलेले इतर फोटो छान आहेत.
विमेकाका फक्त एकाच फोटोत दिसत आहेत. त्यांना फोटो काढण्याचे काम दिले होते का? :)
भटक्या खेडवाला, तो विनोद मलासुध्दा व्यनि करावा हि नम्र विनंती.
27 Jan 2014 - 5:24 pm | आनंदराव
अजून एक कट्टा मिस केल्याची सल !
त्याच्या आकारावरून भटक्या खेडवाला यांनी मला आणि विमेंना बाजूला घेऊन एक विनोद सांगितला(जो मी इथे सांगू सांगत नाही. Wink )
याबद्दल तुमचा जाहीर निषेध !;)
फोटो बघून मजा आली
27 Jan 2014 - 6:23 pm | शिद
मस्त झाला कट्टा... आणि वृत्तांत देखील भारी.
27 Jan 2014 - 7:09 pm | मोक्षदा
मिपा करांचा उत्साह चांगलाच दिसतोय
झाडांचे वर्णन एकून आत्ता असे वाटते अरे अरे यायला हवे होते
27 Jan 2014 - 7:44 pm | मुक्त विहारि
अर्थातच...
तुम्ही पण आला असतात , तर उत्तम झाले असते..
पुढच्या कट्ट्याला नक्की या..
27 Jan 2014 - 7:09 pm | मोक्षदा
मिपा करांचा उत्साह चांगलाच दिसतोय
झाडांचे वर्णन एकून आत्ता असे वाटते अरे अरे यायला हवे होते
27 Jan 2014 - 7:38 pm | यशोधरा
मीही सुंधाशुनूलकर यांच्या धाग्याची (फोटो आणि मुख्यत: वृक्षांबद्द्लची माहिती) वाट पहात आहे.
27 Jan 2014 - 8:08 pm | स्वप्नांची राणी
ती अशोक वृक्षाची आणि सीतेची काय गोष्ट आहे म्हणे...?
27 Jan 2014 - 10:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
Ayala !!!!!
31 Jan 2014 - 10:49 am | भ ट क्या खे ड वा ला
अगदी भरपूर ठिकाणी दिसणारे "मास्ट ट्री" हे सर्रास अशोक या नावाने ओळखले जाते. या झाडाच्या पानांमध्ये आणि सीताअशोकाच्या पानामध्ये थोडे (अगदी थोडे ) साम्य आहे.सीता अशोक मात्र क्वचितच पहायला मिळतो.
गणपतीला ,हरतालीकेला लागतातच ? म्हणून कोणीतरी या मास्ट ट्री ची पाने अशोकाची म्हणून विकतात आणि विकत घेतात, आणि वाहतात.
मास्ट ट्री हे नावा प्रमाणे उंच सरळसोट वाढणारे झाड आहे याची उंची ,जमिनीकडे झुकलेल्या फांद्या ,टोकदार हिरवीगार पाने हि या झाडाची सौदर्य स्थळे . या सर्वांपुढे याची फुले बिचारी फिकट हिरव्या रंगांची पानाआड लपलेली, जणू स्वताला कुरूप समजून लपल्या सारखी वाटतात. (कित्येकांना याला फुले येतात हेच माहित नसते,कारण निरखून पाहिल्या शिवाय हि फुले दिसत नाहीत )
सरळसोट उभ्या झाडाची सावली ती काय पडणार? आणि त्यात सीता कशी बसणार ? वरून मारुती राया कसा काय फांदीवर बसणार? असे प्रश्न कट्याला आलेल्या एका मिपा कराला पडले होते.
सुदैवाने बागेत मास्ट ट्री आणि सीता अशोक (अशोकारिष्ट कण्यासाठी वापरतात ते झाड ) हे दोन्ही असल्यामुळे आणि बागेतला सीता अशोक पूर्ण विस्तारला आणि बहरला असल्याने या झाडा तला फरक नीट दाखवता आला , आणि मिपाकराच्या शंका दूर झाल्या. अशा अशोक वृक्षा खाली सीता बसू शकते आणि मारुती फांदीवर बसू शकतो अशी खात्री मिपाकराला पटली. या अशोकाची फुले तर सुंदर असतातच पण याची कोवळी पाने त्यांचा रंगामुळे आणि अति कोमल त्वचे मूळे फारच सुंदर दिसतात.
27 Jan 2014 - 10:56 pm | देव मासा
मला झाड , फळ , फुल पेक्षा श्रीकृष्ण बोर्डींग हॉटेला ल्या त। पंगतीच्या वृतान्ताचे वेध लागले होते
28 Jan 2014 - 11:45 am | सुहास झेले
वृतांत आवडला :) :)
अजून एक कट्टा हुकल्याची हुरहूर..... :-|
29 Jan 2014 - 10:23 am | प्रभाकर पेठकर
परदेशात राहून भारतातील अनेक सणवार, लग्नकार्य, खादाडी इ.इ. सोबतच मिपाचे कट्टेही हुकतात ह्याचं वाईट वाटतं. पण वृत्तांत वाचून प्रत्यक्ष कट्ट्याला हजर राहिल्याचं 'दुधाची तहान ताकावर'वालं समाधान लाभलं.
30 Jan 2014 - 10:31 am | खटपट्या
खरे साहब को देखके उनकी उम्र का पताही नही चलता.