सेकंड लाईफ - भाग ३

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
18 May 2013 - 9:54 pm

सेकंड लाईफ

सेकंड लाईफ - भाग २

---------------------------------------------------------------
मेकींग ऑफ "भाऊसाहेब दत्तू पाटील"
आय.टी. मध्ये असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टयाच असायच्या. भाऊसाहेब दत्तू पाटील बनायचे तर ह्या मोकळ्या कालावधीचा उपयोग करावा लागणार होता. दर शनिवार-रविवार घराबाहेर राहायचे तर बायकोला काही ना काही पटणारे कारण सांगणे भाग होते. दरम्यान मला नुकताच रु. ३० हजार इन्सेन्टीव्ह मिळाला होता जे मी अजून बायकोला सांगीतले नव्हते. आता ती वेळ आली होती. एका शुक्रवारी संध्याकाळी आम्ही घरातले सर्वजण फिरायला गेलो, आईला आणी बायकोला एक एक साडी घेऊन दिली. छोटूला खेळणी आणि बाबांना वॉकमन घेऊन दिला. हॉटेलात जेवण केले. रात्री उशीरा परतलो. छोटू येता येताच झोपी गेला होता. आज बायकोचा मुड एकदम चांगला होता. साहजीकच होते कारण आज किती दिवसांनी आम्ही बाहेर पडलो होतो. नाहीतर रोजची कामे आवरता आवरता ती थकून जात असे. ती रात्र आम्ही चांगलीच साजरी केली.

आता माझा कार्यभाग उरकायचा होता. एकीकडे आपल्याच माणसांना फसवायचे म्हणून मनाची तगमग चालली होती तर दुसरीकडे ही वेळ पुन्हा नाही, पुन्हा नाही असे माझे मन मला बजावत होते. शेवटी सत्यावर मोहाचा विजय झाला. आम्ही एकमेकांच्या मिठीत पहुडलो असतांना मी हळूच तीला म्हणालो, "अगं तृप्ती, मला तुला काही सांगायचयं. आमच्या कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रात येणार आहे. त्यासाठी आम्ही ऑफीसमधील दोन तीन जण काही शनिवार रविवार वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी जाऊन सर्वे करणार आहोत. आता निदान तीन-चार महिने तर सुट्टी मिळणार नाही. तृप्तीचा देह जरी तृप्त झाला असला, ती सैलावली असली तरी तिचा मेंदू मात्र टक्क जागा होता. "अहो, तुम्ही तर आय.टी. वाले. मग तुमचा काय संबंध ह्या सगळ्याशी ?" मी क्षणभर सटपटलोच. मात्र पुढच्याच क्षणाला म्हणालो "तुझं बरोबर आहे राणी. पण आजकाल सर्व व्यवसाय चालवायचा तर आय.टी. वर फारच जबाबदारी असते. आम्ही जिल्ह्याची किंवा तालुक्याची ठिकाणं निवडणार आहोत तेथे इंटरनेट कनेक्टिव्हीटी घेता येऊ शकेल की नाही, त्या भागात हार्डवेअर व इतर सुविधा देणारे कोणी आहे की नाही हे आम्हाला तातडीने चेक करावे लागेल. इन फॅक्ट इंटरनेट नसेल तर आम्ही तेथे ऑफीस उघडूच शकणार नाही.

"मगं शनिवार-रविवार का ? मधल्या अधल्या दिवशी का नाही ? रविवारी काय कंपन्या चालू असतात काय ? "

" अगं, शनिवार-रविवार मुंबई, पुण्यासारख्या शहरांत सुट्टी. महाराष्ट्रात इतर ठिकाणी वीजेच्या भारनियमनामुळे सोमवार ते शुक्रवार यातील कोणत्याही एका दिवशी सुट्टी असते. आणि तुला माहितेयं, या कामाचे मला जादा पैसेदेखील मिळतील"
"काही नको मला ते पैसे. शनिवार-रविवार सुट्टी असली तरी तुझा एक दिवस जातो बाहेरची कामे करण्यात. जेमतेम रविवार मिळतो आपल्याला एकत्र राहायला. नाहितर इतर दिवशी तु आपला पेईंग गेस्ट सारखा येतो रात्री झोपायला घरी". तृप्ती करवादली.

"प्लीज राणी, फक्त तीन चार महिन्यांचा तर प्रश्न आहे. नंतर हव तर मी आठ दिवस सुट्टी घेतो मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. ओक्के".

तृप्ती परत काहि बोलणार एवढयातचं मी तिच्या हातात हात गुंफले आणि गुलाबपाकळ्या मिटून गेल्या.

आज पाच हजार खर्च झाला होता पण तो खर्च नव्हता. एक गुंतवणू़क होती माझ्या प्रोजे़क्टवर. ज्याचे रिटर्न्स मिळणार होते फक्त माझे स्वप्न साकार होऊन किंवा असेही झाले असते की मी आयुष्यातूनच उठून गेलो असतो.

असो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून मी वडगांव चे ग्रामपंचायत कार्यालय गाठले. आता कुठले वडगांव ते विचारु नका. वडगांव, पिंपळगाव ही नावे तुम्हाला घाटावर ढिगाने आढळतील. ह्या गावचा तसा मी अगोदरच अभ्यास करुन ठेवला होता. ह्या गावात पुर्वी पाटलांची घर आठ-दहा घरे होती. मात्र साधारण २५-३० वर्षांपूर्वी एक एक करत पाटील मंडळी पुण्या-मुंबईला नशीब काढायला निघून गेली होती. ग्रामपंचायत कार्यालयात दोन चार रिकामी टाळकी गप्पा मारत बसली होती. मी त्यातल्या एकाला रामराम केला. "रामराम. मी भाऊसाहेब पाटील" तुमच्याकडे जरा काम होतं. मला इथल्या ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना भेटायचं आहे.

"मीच हायं सरपंच हितला. आण्णासाब जादव म्हणत्यात मला. काय काम व्हतं ?" दरवाजातून एक भारदस्त आवाज आला. डोक्यावर भगवा फेटा, कपाळी अष्टगंध लावलेले सावळं, साधारण पंचावन्न-साठ वयाचं भारदस्त व्यक्तीमत्व आतं आलं तसं कार्यालयातील मंडळी सावरुन बसली. "बसा. काय काम व्हतं ? आनी तुम्ही कोण गावचं ?"

" राम राम साहेब. मी हयाच गावचा. भाऊसो| पाटील माझं नाव. मी ह्या गावी पहिल्यांदाच येतोय. माझ्या माझे वडील फार लहानपणीच वारले आणी आईला पण माझ्या वयाच्या १०-११ व्या वर्षीच गेली. पण ती नेहमी सांगायची की हे वडगांव हेच आपलं मुळ गांव आहे आणि तेथील खंडोबा हेच आपलं कुळदैवत आहे". आईला खुप दिवस गावाला भेट द्यायची इच्छा होती पण शेवटी शेवटी आजारपणामुळं तिला हिंडणं-फिरणं बंद झालं होतं. शेवटच्या दिवसांत तिला खंडोबाच्या दर्शनाची खूपच आस लागली होती."

"पोट्टेहो, तुम्ही जितके शिकले तितके हुकले बगा. आरं पोरा नाव आणि आडनाव सांगीतलं म्हजी गावाकडं कोण वळकत्यात व्हयं ? आरं, आई-बापाचं नाव आणि तुह्या आज्जाचं नाव सांग की !" आण्णासाब म्हणाले.

"अं. हो. मी भाऊसो| दत्तू पाटील. माझ्या वडीलांचे नांव दत्तू पंढरी पाटील आणी आईचं नाव लक्ष्मी" मी उत्तरलो तशी मंडळी आपापसात चर्चा करण्यात दंग झाली.

" आरं महाद्या, आरं दत्तू पंढरी म्हजी तो जना पाटलाचा धाकला भाऊ तर न्हवं ? आर तो न्हाय का कोल्लापूरला पळून गेल्ता. तालमीचं लयं याड व्हत बग त्याला." न्हाई न्हाई, आरं मला वाटातं दत्तू म्हणजे चिमाअप्पाचा थोरला चुलता आसलं बगं. तो आणि आपला गण्या जादवांचा मारत्या संगच नव्हतं का गेलतं ममईला.
असा साधारण १०-१५ मिनिटे वादविवाद चालला पण त्यातून मी कोण किंवा माझा आज्जा किंवा माझा बाप कोण याचा उलगडा झाला नाही. शेवटी आण्णासाहेब वैतागून म्हणाले, "हे बगा, आता पाटलांची घर उठून २५-३० वर्ष जाली. आता या गावात आवशिदाला सुदीक पाटील उरला न्हाई. गावचा पाटील म्हणान तर सुबानराव जादव हायेत ते पण फकस्त नावापुरतं पाटील. त्यांचा न तुमचा काईसुद्दीक संबंद नायी. तरी पण गावात कायी जुनी खोंड हायेत त्यांच्याकडं चवकशी करा न्हायतर ग्रामपंचायतीचं रेकाड तपासाव लागलं. फायजे तर तसा अर्ज लिवून द्या मग चवकशी करुन कळवू तुम्हाला. आता आलाय तसं च्यापाणी करा. ये महाद्या, आरं समोर कमळीकडं चार-सा चा सांग जरा" आण्णासाहेबांनी चर्चेला अपूर्णविराम दिला.

"बाकी काय काम काडलं या आडगावात ? काय जिमिनी-बिमिनीच मॅटर नाय ना ?" बाजूचाच एक माणूस म्हणाला.

"नाही नाही. तसलं काही नाही. देवाच्या दयेन भरपूर आहे मला आणि गावात जमीन असली तरी एवढ्या लांब कोण येणार तीला बघायला ? आणि असलीच दोन चार गुंठे तरी मी इथल्या देवस्थानाला दान करायला तयार आहे. माझ्या आईची फार श्रद्धा होती इथल्या खंडोबावर आणि तीची शेवटची इच्छा होती म्हणून मी गेले सहा महिने बरीच वडगांवं पालथी घातलीत. आई फक्त वडगांव, वडगांव म्हणायची पण कोणत्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा तिने कधी उल्लेख केला नाहि. कदाचित एखाद्या वेळेस बोलली ही असेल पण मी फार लहान होतो त्यावेळेस त्यामुळे फारसं आठवत नाही"
तितक्यात चहा आला.

" आण्णासाहेब, मी पार मुंबईहून आलोय इथं. मला जरा इथलं खंडोबाचं देवस्थान पाहता येईल काय ?
" ईल की. चला च्या पिऊन आपणच जाऊन यीऊ तिथोर."

चहा पिऊन आण्णासाहेब, मी आणी अजून एक-दोन मंडळी देवळाकडे निघालो. देऊळ लहानसेच होते पण स्वच्छ आणि सुंदर होते. मी मनोभावे दर्शन घेतले आणि दानपेटीत ५०० ची नोट आणी १ रुपया टाकला.
"आवो, आवो, यवडे पैसे काह्याला टाकले पेटीत ? त्यापेक्षा आपण पावती फाडली आसती की देवस्थानाची. " एकजण मागून म्हणाला.
" त्याने काय फरक पडतो ? पैसे तर देवालाच अर्पण केले ना ?" मी.
" आवं तस न्हायी. गावातली उंडगी कार्टी कंदी मंदी पैसे उडवत्यात त्यापरीस ते हाफीसात शेफ राहत्यात. आणि यात्रा बी आली नव्ह का आता पुषी पुनवला?"
" आरं गप राव्हा. पाहुणे हाय ते. त्यांना गावचं तंत्र कसं म्हायीत आसलं ?" आण्णासाब गरजले तशी बाकीची मंडळी गप्प झाली.
"भाऊसाहेब, बाकी तुमाला लईच म्हयमा दिसतोय खंडेरायाचा. यकदम ५०१ रुपया म्हजी काय ?" एकजण परत म्हणाला.
"हो ते तर आहेच. माझी आई ज्या दैवताचा जप करायची त्याचा मला महिमा असणारचं! आण्णासाहेब, कधी आहे ही यात्रा ? मी येऊ शकतो काय ?"
"आवो, म्होरच्या शनवारलाच हाय की यात्रा. आणि यीवू शकतो का म्हजी काय ? तुमचा बी देव हाय की तो? "

मी सगळ्यांना धन्यवाद दिले आणि परत जायला निघालो तसे आण्णासाहेब म्हणाले की एवढया लांबून आले आहात तर जेवण करुनच जा. शेवटी त्यांच्या आग्रहाला मान देऊन त्यांच्या घरी जाऊन जेवण केले. जेवण साधेच होते पण अतिशय रुचकर. निघतांना अण्णासाहेबांच्या नातवाच्या हातावर १०० रु. ची नोट ठेवली व आठवण करुन मुंबईहून आणलेला माहिमचा हलवा व मिक्स मिठाई त्याच्या हातात दिली तेव्हा अण्णासाहेब थोडे नाराज झाले. ते ओळखून मी म्हणालो,
"खरतर मला या गावात पाटलांच एखाद घर सापडेल, जुनी वंशवेल, नातीगोती सापडतील असा विचार केला होता पण तसं काही झालं नाही. पण तुम्ही मला अगदी घरच्यासारखं वागवलं, पाहुणचार केला, मला माझ्या आईचा खंडोबा सापडला. जरी काही पुरावा मिळाला नाही तरी माझं मन मला सांगतय की हेच माझं गांव असणार". मी पुढे होऊन आण्णासाहेबांच्या पायाला स्पर्श केला तसे अण्णासाहेब गहिवरले.
"आवो, आता गावात हे रितीरिवाज कुणी पाळत न्हायी पण तुम्ही शेराकडची माणसं अजून जुन्या चाली पाळता. मला लै कवतिक वाटतं बगा."
"आण्णासाहेब, चालायचचं. खेडी आता शहरांच्या पायावर पाय टाकून प्रगती करु पाहताहेत पण आम्ही खेडयाला दुरावलेली माणसं जुन्या रितीभाती जपून खेडयातले होऊ पाहतोय. येतो मी. मी यात्रेला येईन तेव्हा जरा जुन्या माणसांकडून किंवा
जुन्या रेकॉर्डमधून काही माहिती मिळते का बघा जरा"

संध्याकाळी निरोप घेऊन मी मुंबईला परत आलो तेव्हाच मला कळाले होते की मी भाऊसाहेब दत्तू पाटील च आहे आणि वडगाव हेच माझं गाव आहे.

क्रमश :

कथा

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 May 2013 - 10:17 pm | पैसा

फार इंटरेस्टिंग वाटतंय!

चाणक्य's picture

18 May 2013 - 10:17 pm | चाणक्य

मजा येतीये वाचायला.

संजय क्षीरसागर's picture

18 May 2013 - 11:35 pm | संजय क्षीरसागर

लिहीत राहा.

प्यारे१'s picture

19 May 2013 - 12:20 am | प्यारे१

पु भा प्रतिक्षेत.

लाल टोपी's picture

19 May 2013 - 1:36 am | लाल टोपी

कथानक चांगले आहे कथेला वेगही चांगला आहे.

चित्रगुप्त's picture

19 May 2013 - 7:23 am | चित्रगुप्त

छान वाटत आहे. पुढे काय घडते, याची उत्सुकता.
असे काही खरोखर प्रत्यक्षात करून बघितले पाहिजे.

बापु देवकर's picture

19 May 2013 - 12:13 pm | बापु देवकर

चांगला वेग पकडल आहे..पुढचा भाग लवकर येउ देत.

सुधीर's picture

19 May 2013 - 12:19 pm | सुधीर

विंटरेस्टींग हाय पर फसवणूक नसंल तरच बरं वाटेल. अन्यथा :(
"करवादली" हा शब्द मला वाटयचं फक्त मालवणी बोलीतलाच आहे.

आदूबाळ's picture

19 May 2013 - 12:49 pm | आदूबाळ

मस्तच! पुभाप्र!

नक्की काय करणार आहात भाऊसाहेब पाटिल तुम्ही?
आता तरी नुसता पैसा खर्चताना दिसतोय.

नक्कीच पुण्याच्या आसपासचं वडगाव नाही, गावाबाहेरचा माणुस बिनकार्पिओचा असेल तर उद घालुन सुद्धा कुणी विचारत नाहीत निथं.

बाकी मजेशीर वाटतंय, येउ द्या अजुन.

आतिवास's picture

20 May 2013 - 12:19 pm | आतिवास

भाऊसाहेबांचा बेत काय आहे पुढचा? :-)

लेखन रोचक आहे. विषयही थोडा वेगळा वाटतो आहे - अजून तरी.