आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली तिथपासुनचा प्रवास २०१२ ला लंडन पर्यंत येऊन ठेपला आहे. आत्तापर्यंतच्या सर्व ऑलिंपिक स्पर्धेत एकुण भारताच्या वाट्याला नऊ सुवर्ण पदकं आली आहेत. हॉकीत आठ आणि मागील वर्षी अभिनव बिंद्राला मिळालेले एक पदक अशी आपली वाटचाल आहे. आता २०१२ च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारत पुन्हा एकदा दमदारपणे उतरला आहे.
भारतासहित विविध देशाचे स्पर्धक विविध खेळांमधे आपले कसब दाखवणार आहेत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा सानिका स्वप्नील यांनी अविस्मरणीय अनुभवातून दाखवलं आणि तो सोहळा अनेकांनी अनुभवला. ऑलिंपिक २०१२ च्या उद्घाटनाची आणखी काही छायाचित्र आपल्याला इथे ही पाहता येतील.
भारत या स्पर्धेत किती पदकं मिळवेल ? कोणत्या स्पर्धेत कोणत्या स्पर्धकाकडुन पदकांची अपेक्षा आहे ? कोणत्या सांघिक क्रिडा प्रकारात यश मिळु शकते ? विजयी स्पर्धकांच्या अभिनंदनाबरोबर देश-विदेशातील विविध खेळांच्या आणि खेळाडुंच्या वैशिष्ट्यांसह आपण अधिक माहिती इथे टाकाल अशी अपेक्षा.
हॉकीतलं आपलं आव्हान संपल्यातच जमा आहे. सुशीलकुमारकडुन कुस्ती , कश्यप तसेच सायना नेहवाल कडुन बॅडमिंटन, बॉक्सींगमधे देवोंद्रो कडुन पदकांची अपेक्षा आहे. आपलं काय मत आहे ?
प्रतिक्रिया
1 Aug 2012 - 11:35 pm | पैसा
गगन नारंगने सुरुवात छान केली. सायना ची मॅच चालू आहे. बघा!
1 Aug 2012 - 11:45 pm | ऑलिंपिक २०१२
सायनानं पहिला सेट जिंकला आहे मात्र दुसर्या सेट मधे सायना मागे पडत आहे.
1 Aug 2012 - 11:50 pm | अप्रतिम
लाईव्ह पहाण्यासाठी लिन्क देउ शकता का?
1 Aug 2012 - 11:57 pm | ऑलिंपिक २०१२
http://www.newtvworld.com/India-Live-Tv-Channels/dd-sports-live-streamin...
1 Aug 2012 - 11:59 pm | अप्रतिम
धन्यवाद!!!!
1 Aug 2012 - 11:52 pm | अन्या दातार
लढतीत चुरस असणार आहे. सायनाचा खेळ तसा वेगवान आहे. खेळावरचे नियंत्रणजायला नकोय
1 Aug 2012 - 11:36 pm | ऑलिंपिक २०१२
१० मिटर एयर रायफल मधे कास्य पदक. अभिनंदन...!
1 Aug 2012 - 11:46 pm | अन्या दातार
आत्ता सायना नेहवालची प्री क्वार्टर फायनल मॅच चालू आहे. पहिला सेट जिंकला आहे.
दुसरा सेट सद्यस्थिती: ६-६
2 Aug 2012 - 12:00 am | प्रचेतस
saina wins. :)
2 Aug 2012 - 12:33 am | खेडूत
साईना चं अभिनंदन!
मागच्या रविवारी फुटबॉल म्याच ला गेलो होतो, त्याच्या काही आठवणी..

तिकीट
लवकर पोहचलो तेव्हाचे स्टेडियम
मेक्सिको चे समर्थक

मेक्सिको - ग्याबन सामन्यापूर्वी थोडा सराव.

कोरिया आणि स्वित्झर्लंड सामना..

दोन्ही सामने निकाली झाल्यामुळे मजा आली!
2 Aug 2012 - 4:48 pm | ऑलिंपिक २०१२
आभार. फुटबॉलच्या सामन्याची क्षणचित्र टाकल्याबद्दल आभार.
लंडनमधे आहात तर स्पर्धेचा आखोदेखे हालहवाल लिहिल्यास आनंद दुप्पट होईल.
2 Aug 2012 - 12:53 am | अन्या दातार
आजच्या २ बॅडमिंटन मॅचेसबद्दल थोडेसे:
मॅच १:
पारुपल्ली कश्यप (भारत) वि. वि. निलुका करुणारत्ने (श्रीलंका)
२१-१४, १५-२१, २१-९
पहिला सेट बघायला मिळाला नाही, दुसर्या सेटच्या जवळपास मध्यापासून पुढे सामना पहायला सुरुवात केली. दुसर्या सेटमध्ये कश्यप अत्यंत बचावात्मक खेळत होता. पहिला सेट जिंकल्यामुळे मानसिक दबाव खरंतर निलुकावर होता. निलुकाने त्वेषाने खेळ करत कश्यपच्या नाकी नऊ आणले. तुफानी वेगात खाली येणार्या फटक्यांचा (शॉट्स) मारा करत कश्यपला पॉईंट्स मिळवणे अवघड केले. सेट पॉईंटपाशी जेंव्हा निलुका पोचला तेंव्हा स्कोअर होता २०-८! निलुका पुढच्या काही मिनिटात हा सेट मिळवणार असेच चित्र जणू होते. पण कश्यपने उत्तम खेळ करत पुढचे ७ पॉईंट्स मिळवले. मोठ्या फरकाने जर हार झाली असता येणारा मानसिक दबाव त्याने इथे झुगारुन दिला.
तिसर्या सेटपर्यंत निलुकाचे weak points हेरुन आपली रणनिती बदलली. अंतिम सेटमध्ये निलुकाला शब्दशः डोके वर काढण्यास वाव ठेवला नाही. स्वतःच्या मिडकोर्ट ते बेसलाईन पासून निलुकाच्या नेटपाशी कश्यपने टाकलेले ड्रॉप्स वाचवण्यासाठी निलुकाला वाकण्याशिवाय पर्याय नसायचा. उचललेला ड्रॉप मध्यम उंचीवर आल्यानंतर मारलेले क्रॉसकोर्ट शॉट्स निव्वळ डोळ्याचे पारणे फेडणारे. चकवे देत टाकलेले ड्रॉप्सनीही कश्यपला बरेच पॉईंट्स मिळवून दिले. अखेर नेटपाशी अनेक चुका करायला लावत कश्यपने १२ पॉईंट्सच्या फरकाने तिसरा सेट व लढत जिंकली आणि आता क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
----------------------------------------------------------------------------
मॅच २:
सायना नेहवाल (भारत) वि. वि. जी याओ (नेदरलँड)
२१-१४, २१-१६
सरळ सेटमध्ये झालेली ही मॅच वर म्हणल्याप्रमाणे चुरशीची ठरली. २२ वर्षीय सायनापुढे आव्हान होते ३३ वर्षीय जी याओचे. स्टॅमिना, चपळाई या गुणांच्या जोरावर सायना सरस ठरणार का याओचा अनुभव? असे सामन्याचे स्वरुप होते.
दोन्ही सेटमध्ये पॉईंट मिळवण्यासाठी दोघीही आटापिटा करत होत्या. पहिला सेट सायनाने फार तीव्र आक्रमण न करता जिंकला. १५-७ अशी स्थिती होती. आता मात्र अनुभव वरचढ ठरु पाहत होता. अफलातून क्रॉसकोर्ट फटके मारत जी याओने ५ गुण मिळवले. या आक्रमणाला चकव्यांनी उत्तर देत सायनाने स्थिती २०-१२ अशी केली. अखेर सायनाने विजयी गुण मिळवला, पण दरम्यान जी याओने २ गुण मिळवत १४ गुणांची कमाई केली.
दुसर्या सेटमध्ये सायनाने अपेक्षेपेक्षा जास्त चुका केल्या. फटक्यांवर नियंत्रणाचा अभाव स्पष्ट दिसत होता. सीमारेषेबाहेर फटके मारुन याओचे गुण वाढवले. ११-१३ असे २ गुणांनी पिछाडीवर आल्यावर मात्र पूर्ण ताकतीने आक्रमणास सुरुवात केली. चकवे, क्रॉसकोर्ट फटके यांचा उत्तम मेळ साधत १० गुण कमावताना प्रतिस्पर्ध्यास फक्त ३ गुण वाढवण्याची संधी दिली. अखेरीस २१-१६ अशी मात दिली.
-----------------------------------------------------------------
दोघेही भारतीय खेळाडू पी. गोपीचंद यांचे शिष्य आहेत. त्यामुळे अर्थातच खेळी, डावपेच यात समानता दिसते. उत्तम फिटनेस, चपळाई, वेगवान हालचाली, कोर्ट कव्हरेज, क्रॉसकोर्ट शॉट्स ही यांची बलस्थाने दिसली.
2 Aug 2012 - 3:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे
विश्लेषण आवडले. पुढील खेळांचे पण असेच वाचायला मज्जा येईल.
रंगाकाकांनी केले होते तसे लाईव्ह केले तरी चालेल रे :-)
2 Aug 2012 - 4:44 pm | ऑलिंपिक २०१२
विश्लेषण आवडले. पुढील खेळांचे पण असेच वाचायला मज्जा येईल.
2 Aug 2012 - 4:36 pm | प्रचेतस
ऑलिंपिक - २०१२ चे ऑफिशियल लाईव्ह फीड इकडे पाहता येईल.
http://www.youtube.com/user/olympic
2 Aug 2012 - 4:44 pm | ऑलिंपिक २०१२
दुव्याबद्दल आभार.
2 Aug 2012 - 6:18 pm | पैसा
चीन १७ तर अमेरिका १३ सुवर्णपदके मिळवून १ आणि २ नंबरला आहेत. आज सायना ६.३२ ला क्वार्टर फायनल खेळणार आहे. जय भगवान आणि विजेन्द्र हे बॉक्सर्स आणि टेनिस मिक्स्ड डबल्समधे सानिया मिर्झा आणि लिअॅन्डर पेस खेळतील. सर्वांना शुभेच्छा!
2 Aug 2012 - 8:32 pm | ऑलिंपिक २०१२
अतिशय रंगतदार झालेल्या सामन्यात सायना नेहवालनं बाजी मारली. आपल्यापेक्षा वयानं अकरा वर्ष मोठी असलेल्या डेन्मार्कच्या टीन बॉन ला २१/१५ ,२२/२० अशा फरकानं हरवलं. आता उपांत्य फेरीचा सामना जिंकल्यास एक पदक तर निश्चितच झालं आहे. आणि सायना नक्कीच जिंकेल.
2 Aug 2012 - 8:29 pm | स्वानन्द
सायना सेमी मध्ये गेली!!!!! दुसरा सेट जब्बरा झाला. :)
टिने बाउन चे शॉट्स एकदम चकवा देणारे होते. नेटजवळ भर्पूर खेळवलं. पण शेवटी सायना पुरून उरली.
2 Aug 2012 - 8:30 pm | पैसा
२१-१५, २२-२० आणि सायना सेमी फायनलमधे!
2 Aug 2012 - 9:20 pm | अप्रतिम
सेमी फायनल मध्ये साईना सोडून इतर तीनही स्पर्धक चिनी आहेत...ड्रॅगनचे आव्हान ती नक्की परतावून लावेल...तिचे आणि मेरी कोमचे पदक जवळपास निश्चित आहे...
2 Aug 2012 - 10:07 pm | ऑलिंपिक २०१२
बॅडमिंटन पी. कश्यपने पहिला सेट गमावला. दुसरा सेट सुरु आहे. मिश्र टेनीस सानिया-पेस जोडी चांगली खेळत आहे.
2 Aug 2012 - 10:21 pm | अमितसांगली
पी. कश्यप १९-१० ने पिछाडीवर....पुनरागमन फारच अवघड...
2 Aug 2012 - 11:02 pm | अन्या दातार
ली चाँग वी (मलेशिया) वि. वि. पी. कश्यप (भारत)
२१-१९, २१-११
आजचे आव्हान मुळातच इतके अवघड होते की (निदान मलातरी) कश्यप किती पॉईंट्स मिळवतो याकडेच होते; कारण समोर होता जगातला द्वितीय क्रमांकाचा मलेशियन खेळाडू ली चाँग वी! बॅडमिंटनमध्ये आजवर चिनी व मलेशियन खेळाडूंचा दबदबा राहिलेला आहे. याच मलेशियन मांदियाळीतला ली! वेगवान खेळ व अचूक फटके ही यांची (एकंदरीतच मलेशियन खेळाडूंची) बलस्थाने.
ली ने आजच्या सामन्याकडे एक आव्हान म्हणूनच बघत असल्याचे पहिल्या सेटमधील लढतीत दाखवले. दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांना जोखत होते. दुखरी नस शोधायचा प्रयत्न करत होते. क्रॉसकोर्ट स्मॅशेस, ड्रॉप्स व चकवे यांचा वापर करत दोन्ही बाजूंनी आक्रमणे चालू होती. कश्यप कोणत्या खेळीत कमजोर रिटर्न करतो याचा पूर्ण अंदाज या लढतीत लीने घेतला. १८-१८ असा कट टू कट होत चाललेला सामना लीने वेगवान खेळ करत २१-१९ असा जिंकला.
दुसरा सेट बर्यापैकी एकतर्फी झाला. पहिला सेटमध्ये झालेल्या चुका टाळत लीने आपला वेग व अचूकता आणखीनच वाढवली. अत्यंत Deep येणारे स्मॅशेस मारत त्याने बरेच पॉईंट्स खिशात टाकले. ११-३ अशी स्थिती असताना कश्यप १० पॉईंट्स तरी मिळवेल का ही शंकाच होती. इतक्या दबावाखाली असतानाही कश्यपने काही फटके चांगले मारले. नेटपाशी ड्रिबलिंग करताना झालेल्या चुका मात्र पटल्या नाहीत. कारण नेट ड्रिबलिंग ही कश्यपची जमेची बाजू! ज्याची चुणुक मागच्या सामन्यात मिळाली होतीच. पण मानसिक दबावाचा परिणाम असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यावर कडी म्हणजे फटक्यांवरचे गेलेले नियंत्रण. स्ट्रॅटेजी उत्तम असताना फटक्यांवर नियंत्रण न राहिलेलेने काही संधी हातच्या गेल्या. दमणूक हा अजुन एक फॅक्टर इथे प्रभावी ठरला. स्टॅमिनाच्या बाबतीत भारतीय खेळाडू मलेशियन/चिनी खेळाडूंच्या तुलनेत अजूनही मागेच पडतात. दुसर्या सेटमध्ये कश्यप खूपच दमलेला दिसत होता. चाकूच्या जोरावर बंदूकीशी लढा असेच जणू या सामन्याचे स्वरुप होते. अपेक्षेप्रमाणे दुसरा सेट लीने २१-११ असा जिंकला व सुवर्णपदकाकडे आपली घोडदौड कायम राखली.
-----------------------
या धाग्यावर विमेंनी लाईव्ह विश्लेषणाची सूचना केली होती. पण बॅडमिंटन हा खेळ अत्यंत वेगवान असल्याने लिखित समालोचन शक्य नाही. सामना झाल्यावर लिहून काढणे हे उत्तम. आज दुर्दैवाने सायनाची मॅच बघू शकलो नाही. उद्या पुनःप्रसारण बघायची संधी मिळाली तर उद्या लिहिन. :)
2 Aug 2012 - 11:32 pm | पैसा
स्टॅमिनाच्या बाबतीत तू लिहिलंस ते बॅडमिंटनमधे खूपच जाणवतं. गेल्या ऑलिंपिकमधली सायना आठवली. तेव्हा अगदी लुकडी दिसणारी सायना एखदा सेट होताच दमलेली दिसायची. पण आता मात्र तिने मेहनत घेऊन थोडं वजन कमावलेलं दिसतंय.
पेस आणि सानिया यांनी त्यांची मॅच आरामात घेतली. दुसरीकडे रॉजर फेडरर त्याच्या देशासाठी खेळताना पाहून बरं वाटलं आणि एशियाडमधे खेळायला नकार देणारे आपले क्रिकेटपटू आठवले.
विजेन्द्रचं कय झालं ते कधी कळेल?
3 Aug 2012 - 12:45 pm | अन्या दातार
एकंदर सर्वच खेळांमध्ये स्टॅमिना महत्वाचा असतो; तरीही बॅडमिंटन व टेनिसमध्ये याचे महत्व जास्तच आहे. कारण इथे बदली खेळाडू मैदानात उतरु शकत नाही. फुटबॉल, हॉकी, अगदी बास्केटबॉलमध्ये बदली खेळाडू मैदानात येऊ शकतो. एकदा का खेळाडू कोर्टवर उतरला की कमीत कमी २ (जास्तीत जास्त ३) सेट खेळावेच लागतात. प्रत्येक सेटमधले २१ या हिशेबाने कमीत कमी ४२ पाँईट्ससाठी लढणे भाग असते. (प्रतिस्पर्धी किती पॉईंट मिळवतो ते वेगळेच) एकेका पॉईंटचे रॅली ३० सेकंदापासून २ मिनिटापर्यंत चालते. शटलचा वेग बघता फारफार तर २ सेकंदात मध्यभागी येऊन पुन्हा नव्या जागी पळणे भाग असते.
जर तुम्ही पहिला सेट बघाल तर पहिल्या ५ पॉईंट्समध्येच खेळाडू घामेजतात. शिवाय मानसिक दबाव असतोच. या स्थितीत शारिरीक हालचाली मंदावल्या तर त्यात नवल वाटू नये.
यावर उपाय एकच, कठोर मेहनत. मानसिक व शारिरीक मेहनतीनेच स्टॅमिना वाढवणे व टिकवणे शक्य आहे. :)
2 Aug 2012 - 11:36 pm | टुकुल
सुंदर वृतांत
--टुकुल
3 Aug 2012 - 2:00 am | मोदक
+१ हेच बोल्तो...
3 Aug 2012 - 10:15 am | लीलाधर
मित्र प्रास थाळी फेक आणि गोळाफेकमध्ये महाविद्यालयात असतांना नंबर १ वर असायचे नेहमी :) याचीच दखल घेतलीय यंदा ऑलिंम्पिक २०१२ मध्ये
3 Aug 2012 - 10:48 am | ५० फक्त
मा. श्री. लिलाधर यांचेकडुन साभार, आज गुगलने ऑलिंपिक साठी जे होमपेज बनवले आहे त्यातील गोळाफेक करणारी व्यक्ती ही आपले लाडके कट्टा संयोजक श्री. प्रास हे आहेत. गुगलसाठी मॉडेलिंग बद्दल अभिनंदन श्री. प्रास.
3 Aug 2012 - 10:54 am | अन्या दातार
आत्ता कळलं; ३ दिवस प्रासभौ कुठे गायबले होते ते ;)
3 Aug 2012 - 1:38 pm | अन्या दातार
सेमि फायनल चालू. ६-४ ने सायना पिछाडीवर
3 Aug 2012 - 2:32 pm | घाशीराम कोतवाल १.२
सायना हा सामना 13-21, 13-21 ने हरली आहे आता बघु सुवर्ण नाही निदान ब्रॉझ पदक तरी मिळतय का ते...
3 Aug 2012 - 2:30 pm | परिकथेतील राजकुमार
फुलराणी हारली की हो.
3 Aug 2012 - 2:43 pm | ऑलिंपिक २०१२
सायनाला लढायला वेळच मिळाला नाही. सायनात ना उत्साह दिसला ना आक्रमकपणा. लाइनवर पडणा-या फुलाच्या जजमेंटचा अभाव आणि लाइनच्या बाहेर जाणारे स्मॅशेस. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्याच दर्जाची चीनची खेळाडु खेळली आणि भारताच्या वाट्याला पराभव आला. आता कास्य पदक तरी मिळेल या आशेवर :(
3 Aug 2012 - 3:16 pm | अन्या दातार
यिहान वँग (चीन) वि.वि. सायना नेहवाल (भारत)
२१-१३, २१-१३
जागतिक क्रमवारीतील ५ वी खेळाडू विरुद्ध जागतिक क्रमवारीतील १ ली खेळाडू हा सामना डेविड-गोलिएथ असा नक्कीच नव्हता. सायना वँगला धक्का देणार का वँग तिची घोडदौड कायम राखणार याची उत्सुकता सर्वच क्रिडारसिकांना होती. गेल्या ५ सामन्यात वँगने सायनाचा पराभव केला आहे. ती मालिका आज खंडीत होणार का असा सवालही होताच.
नाणेफेक जिंकून सायनाने सर्विस करण्याचा निर्णय घेतला. जागतिक दर्जाच्या सामन्यात दिसावी अशी सर्व ती स्किल्स या सामन्यात दिसत होती. क्रॉसकोर्ट स्मॅशेस व चकवे याचा पुरेपुर वापर करत वँगने पहिल्यापासूनच मजबूत पकड घेतली. भरीस भर म्हणून सायनाचे अनेक फटके बाहेर जात होते. आपल्या उंचीचा वापर करुन घेत वँगने उत्कृष्ट स्मॅशेस लगावले. नेटला समांतर खेळ करत सायनाची दुखरी नस तिने शोधून काढली. ही दुखरी नस म्हणजे अंगावर येणारा स्मॅश! उत्तम योद्धा ज्याप्रमाणे एकच नीती प्रत्येक वे़ळेस वापरत नाही, त्याचप्रमाणे दर ५-६ पॉईंट्सनंतर वँग तिची रणनिती बदलत गेली. सायनाने नेट ड्रिबलिंगचा वापर करत काही गुण कमावले खरे; पण मॅचवर पकड काही मिळवू शकली नाही. अनेक ठिकाणी जजमेंट न जमल्याने कोर्टाच्या आतली शटल्सही सोडली आणि वँगला पॉईंट मिळवून दिले.
दुसर्या सेटच्या पूर्वार्धास सायनाने पकड मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सायनाने आता वँगच्या अंगावर स्मॅशेस मारुन तिला जेरीस आणले. नेटपाशी चकवे देत ड्रिबलिंग करुन अजुन काही पॉईंट्स घेतले. पण वँग उगीचच नंबर वन नाही. लाँग रॅलीज करुन सायनाला दमवत बेसावधक्षणी चकवे देत मॅचचे पारडे फिरवले. नंतर मात्र सायनाने अत्यंत नियंत्रणमुक्त फटके लगावत वँगला आयते पॉईंट मिळवून देत वँगचा सुवर्णपदकाकडचा प्रवास अबाधित राखला.
3 Aug 2012 - 8:22 pm | पैसा
२५ मीटर्स रॅपिड फायर पिस्तुल मधे रौप्यपदक मिळवले! अभिनंदन!
3 Aug 2012 - 8:41 pm | ऑलिंपिक २०१२
(चित्र जालावरुन)
गगन नारंग ५० मिटर एयर रायफल स्पर्धेतुन बाहेर पडला. सायनाला पदक मिळावं अशी अपेक्षा आहे, पण त्यासाठी उत्साहानं आणि आक्रमकपणे चीनच्याच खेळाडुला झुंज द्यावी लागेल. सुवर्णपदकाची अपेक्षा कोणाकडुन पूर्ण होईल काहीच अंदाज बांधता येईना.
3 Aug 2012 - 9:37 pm | पैसा
अगग! काय मॅच झाली! मला वाटलं की फेडरर आणि पोट्रो जगाच्या अंतापर्यंत खेळतच बसणार आहेत! संपली एकदाची.
तशीच भारताची हॉकीची मॅच संपली एकदाची. सुटलो आम्ही.
विजेन्द्र उप उपांत्य फेरीत पोचला आहे, तर पेस सानिया आज परत खेळणार आहेत. बॉक्सर विकास कृष्णन सुद्धा लढणार आहे.
3 Aug 2012 - 9:56 pm | शिल्पा ब
भारताला एक रौप्य अन एक ब्राँझ मिळालं आतापर्यंत..सायना अजुन एक मिळवेल ही आशा.
ऑलिंपिक्स मधे पहील्यांदाच भारताला २-३ पदकं मिळताहेत का?
5 Aug 2012 - 5:44 pm | ऑलिंपिक २०१२
ऑलिंपिक मधे भारताला बीजींग येथे २००८ मधे सर्वात जास्त तीन पदकं मिळाली होती. लंडन २०१२ मधे तीन पदकं झाली आहेत. अधिक माहितीसाठी अद्यावत विकि दुवा.
3 Aug 2012 - 10:16 pm | उपटसुंभ
मागच्या वेळी अभिनव, विजेंदर आणि सुशील कुमार अशा तिघांनी पदकं मिळवली होती.
4 Aug 2012 - 10:28 am | श्रीरंग
कांस्यपदक मिळणवणार्या गगनवर यथोचित कौतुकाचा वर्षाव करणारर्या पंतप्रधान, मंत्री - संत्री, इत्यादींनी विजय कुमारबद्दल कौतुकाचा चकार शब्दही उच्चारल्याचे कुठेही वाचले नाही. अंमळ आश्चर्य वाटत आहे.
4 Aug 2012 - 6:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायनाचा बॅडमिंटनचा कास्यपदकासाठीचा सामना चालु आहे, पहिल्या सेटमधे पिछाडीवर १२/१७ आहे, पण झेप घेईल अशी अपेक्षा. सायनाला शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2012 - 6:25 pm | अप्रतिम
वॅंग झिंग ला दुखापत,,,सायनाला चान्स आहे.. :)
4 Aug 2012 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिला सेट गमावला. १८/२१ पण सायना चांगली खेळली. मला वाटतंय दुसरा सेट सायना जिंकेल.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2012 - 6:32 pm | अप्रतिम
बाय मिळेल असे वाटते...सायना जिंकली...हुर्रे..
4 Aug 2012 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायनाला विजयी घोषित करण्यात आलं. तत्तड तत्तड तत्तड.
4 Aug 2012 - 6:44 pm | ऑलिंपिक २०१२
(चित्र जालावरुन साभार)
चीनची खेळाडु वँग झिंग ने जोरदार स्मॅश मारतांना तिच्या गुडघ्यात लचक भरल्यामुळे आणि पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ घेतल्यामुळे पंचांनी सायना नेहवालला विजयी घोषित केले.
भारताच्या खात्यावर एक रौप्य आणि दोन कास्यपदक अशी नोंद झाली आहे.
4 Aug 2012 - 6:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला, देवेंद्रसिंग चा बॉक्सिंगचा सामना सुरु होतोय.
शुभेच्छा. (माझ्या शुभेच्छा कामाला येतीलच)
-दिलीप बिरुटे
4 Aug 2012 - 7:04 pm | पैसा
विरोधी बॉक्सरचा निदान पाय तरी मोडू दे अशा शुभेच्छा द्या. कारण विकास कृष्णन अमेरिकन बॉक्सरबरोबर जिंकला आणि ५ तासांनी काहीतरी खुसपट काढून प्रतिस्पर्ध्याला ४ अंक बहाल करण्यात आले. परिणामी विकास जिंकूनही हरला.
4 Aug 2012 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> विरोधी बॉक्सरचा निदान पाय तरी मोडू दे अशा शुभेच्छा द्या.
हाहाहा. अहो, अशानं आपल्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होतील. बाकी, देवेंद्र जिंकला.
उप उपात्य फेरीत पोहचला. बाकी, त्या विकासला विजयी घोषित करुनही नंतर पराभूत घोषित केलं.
मला तर कै कळलं नै.
अजुन आहे का कोणाचा म्याच आज. आज माझ्या शुभेच्छांनी सुवर्णपदकी मिळु शकतं.
आज लै फॉर्मात आहोत आम्ही. :)
-दिलीप बिरुटे
4 Aug 2012 - 7:16 pm | पैसा
विकास १३-११ असा जिंकला होता. अमेरिकन्सनी काहीतरी कारणं सांगत तक्रार केली. मग निर्णय लावणार्यानी एकमताने प्रतिस्पर्ध्याला आणखी ४ पॉइंट्स दिले आणि विकास १५-१३ असा हरल्याचं घोषित केलं. हाकानाका!
4 Aug 2012 - 8:43 pm | श्रीरंग
विकासने मार खाता खाता जाणीवपूर्वक तोंडातील गार्ड बाहेर थुंकून पंचांना काही क्षण सामना थांबवायला लावला. त्याबद्दल त्याला काही गुणांचा दंड व्हायला हवा होता जो झाला नाही. म्हणून अमेरिकन संघाने हरकत नोंदवल्यावर ते गुण अमेरिकन बॉक्सरला देण्यात आले, आणी सामन्याचा निकाल फिरला. आपल्या मीडीयाने कितीही बोंब मारली, तरी नंतर फिरवलेला निर्णय योग्यच होता असं मला वाटतं. कदाचित सामना पाहणार्या सर्वांना असंच वाटेल.
4 Aug 2012 - 11:13 pm | पैसा
आपले लोक नको ते बरे लवकर शिकतात!
4 Aug 2012 - 7:55 pm | इरसाल
केल्यावर व्हिडिओ पुन्हा पाहिले तर त्यात ९ फाउल आढळुन आल्याने दुसर्याला विजयी ठरवला.
4 Aug 2012 - 8:55 pm | श्रीरंग
जलतरणात भारताला एकच वाईल्ड कार्ड स्पर्धक पाठवण्याची मुभा असताना, पात्रता निकष पूर्ण करणार्या ४ गुणवान जलतरणपटूंना डावलून वशिल्याचा तट्टू पाठवण्याच्या SFI (स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया) च्या निर्णयामुळे नाचक्की होणार हे तर निश्चितच होतं.
पण गगन उल्ललमठ या भारतीय स्पर्धकाने अपेक्षेपेक्षा खूपच लाजिरवाणी कामगिरी करून भारताची मान खाली घालवली. १५०० मीटर फ्रीस्टाईल मध्ये गगन ३२ पैकी ३२वा आलाच, पण ३१व्या स्पर्धकापेक्षा तब्बल १०० मीटर (२ फेर्या) मागे राहण्याचा पराक्रम दाखवून पुरतं हसं करून घेतलं.
वीरधवल खाडे, सौरभ सांगवेकर (ज्याची १५०० ची सर्वोत्तम वेळ गगन पेक्षा दीड मिनिटापेक्षा सरस आहे), अॅरॉन डिसूझा, संदीप शेजवळ, यांना स्पर्धेसाठी पात्र असूनही टीव्हीवर गगनला पहावं लागलं. यापुढे कोणतेही पदक जिंकण्याच्या जिद्दीने / उमेदीने ते सराव करतील असं वाटत नाही. त्यांनी करूही नये.
4 Aug 2012 - 11:28 pm | पैसा
फक्त २० वर्षांचा देवेन्द्रो सिन्ग १६-११ असा जिंकून क्वार्टर फायनलमधे पोचला. बिरुटेसर अभिनंदन! ;)
5 Aug 2012 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> बिरुटेसर अभिनंदन!
:) धन्यवाद धन्यवाद.
बाय द वे, मेरी कोम ही महिला बॉक्सर आज झुंजणार होती तिचा म्याच कधी आहे, कोणास ठाऊक ?
तिलाही शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
5 Aug 2012 - 8:02 pm | विलासराव
मेरी कोम जिंकली.
5 Aug 2012 - 6:24 pm | पैसा
एका सेरेना विल्यम्सने दोन सुवर्णपदकं जिंकली. आणि अख्ख्या भारत देशाला मिळून किती पदकं असा हिशेब लावत बसलोय आम्ही!
5 Aug 2012 - 6:34 pm | कुंदन
मायकेल फेल्प्सने आतापर्यंत तीन ऑलिम्पिकमध्ये २२ पदकांचा स्वीकार केला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=242...
5 Aug 2012 - 6:40 pm | पैसा
त्याला सोडूनच दे रे! तो या जगातला नव्हेच!
5 Aug 2012 - 6:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि अख्ख्या भारत देशाला मिळून किती पदकं असा हिशेब लावत बसलोय आम्ही!
चालायचंच, भारतामागं काय एक काम आहे, म्हणुन पदकांसाठी मेहनत करतील. आज पेप्रात वाचलं ऑलिंपिक तयारीसाठी भारतीय हॉकी संघावर १८ कोटी ९० लाख रुपये खर्च झाले. (इति. दै. लोकमत) डोळे पांढरेफटक पडायची वेळ आली. बाकी, हॉकीचा परफॉर्मन्स आपण सर्वांनी याचि देहि याचि डोळा पाहिलाच आहे. :)
-दिलीप बिरुटे
5 Aug 2012 - 10:36 pm | प्रचेतस
विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर झालेल्या टेनिसच्या अंतिम सामन्यात अँडी मरेने रॉजर फेडररचा ६-२, ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून ब्रिटनसाठी सुवर्णपदक जिंकलं त्याचबरोबर मागच्या महिन्यात ह्याच कोर्टवर झालेल्या पराभवाची परतफेडही.
मरेच्या जोरदार खेळापुढे फेडररचा अजिबात टिकाव लागला नाही. ताकदवान फोरहँड वापरून मरेने मारलेले तिरकस फटके फेडररला चुका करण्यास भाग पाडत होते. फेडरला नेटजवळ यायची फारशी संधीच मिळाली नाही. त्यातच कदाचित एकाग्रतेच्या अभावामुळेही मिळालेल्या ब्रेकपाँट्सचे विजयी गुणांत रूपांतर करण्यात फेडरर अपयशी ठरला परिणामतः त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
अर्जेटीनाच्या जुआन मार्टीन डेल पोर्ट्रोने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा ७-५, ६-४ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले.
5 Aug 2012 - 10:48 pm | पैसा
आज दुसरं सुवर्णपदक जिंकणार अशी चिन्हं दिसतायत! फारच पेटलाय तो. फेडरर ची पहिली सर्व्हिस नीट पडत नव्हती सुरुवातीला, शिवाय ब्रेक पॉइंट्स घेता आले नाहीत. ते भारी पडलं. अमेरिकेच्या विल्यम्स भगिनींनी गेल्या वर्षातल्या दुखापती आणि आजारपणांवर मात करून दोन सुवर्णपदकं घेतली त्यांच्या जिद्दीला सलाम!
मेरी कोमने पोलंडच्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवला. तिची आगेकूच अशीच चालू राहू दे. तिच्या नावावर ५ जागतिक विजेतेपदं आहेत. तिच्याकडून एका पदकाची अपेक्षा आहेच!
6 Aug 2012 - 6:44 pm | ऑलिंपिक २०१२
मेरी कोमचा सामना चालु आहे. तीस-या फेरीत मेरीने चांगले पंच दिले आहे.
बघुया, पंचांना हे पंच किती मान्य होताते ते
6 Aug 2012 - 6:53 pm | ऑलिंपिक २०१२
मेरी कोम उपांत्य फेरीत पोहचली. ट्युनिशियाच्या मॅरो रहालीला १५/६ असे सहज पराभूत केले.
मेरीचे अभिनंदन.
6 Aug 2012 - 7:07 pm | प्रचेतस
१५-६ म्हणजे तसा एकतर्फीच विजय म्हणायचा.
मेरी कोमचे अभिनंदन.
6 Aug 2012 - 9:07 pm | पैसा
ती जागतिक विजेती आहे बाबा! आणि दोन मुलांची आई आहे हे सगळीकडे परत परत सांगत होते. असल्या खेळात खेळत राहण्याची जिद्द भारीच म्हणायची!
7 Aug 2012 - 8:43 pm | प्रचेतस
खरंच.
कौतुक करावे तितके कमीच आहे.
शिवाय ५ वेळा जगज्जेतेपद म्हणजे साधी गोष्ट नाहीच.
6 Aug 2012 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर
मेरी कॉम विजयी. सेमीफायनल मध्ये दाखल.
6 Aug 2012 - 9:13 pm | अप्रतिम
मेरी कोम सेमीफायनल मध्ये जाऊनही १ पदक निश्चित केले असे म्हणतात....हा फंडा कोणी समजावून सांगेल काय?
6 Aug 2012 - 9:15 pm | पैसा
बॉक्सिंगमधे हरणार्या दोन्ही सेमी फायनलिस्टना ब्राँझ पदक देतात.
6 Aug 2012 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सेम टु सेम प्रश्न मलाही पडला होता. वाहिन्यांवर महिला बॉक्सिंगचे पदक निश्चित, बॉक्सिंगचे पदक निश्चित, असं सांगत होते. अजून सेमी फायनल व्हायची आहे, आणि हे पदक निश्चित कसे म्हणत आहेत, कै भानगडच कळेना. असो, धन्स टू पैसा. च्यायला, अजबच नियम आहेत बॉक्सिंगचे.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2012 - 6:16 pm | ऑलिंपिक २०१२
मेरी कोमचा उपांत्यफेरीचा सामना सुरु होत आहे.
8 Aug 2012 - 6:27 pm | ऑलिंपिक २०१२
ब्रिटीश बॉक्सर निकोलोचे ठोसे बसल्यामुळे मेरी कोम तिसर्या फेरीअखेर मागे आहे. शेवटच्या फेरीत मेरी कोमचे ठोसे निकॉलसला बसले तरच सुवर्णपदकाचे स्वप्न पाहता येईल.
8 Aug 2012 - 6:35 pm | ऑलिंपिक २०१२
६/११ असा मेरीचा कोमचा पराभव. मेरी कोमपेक्षा ब्रिटनच्या निकोला अॅडम्सचे ठोसे अगदी अचुक होते.
तुलनेत मेरीकोम निकोलाला डोक्याच्या मागील बाजुस ठोसे मारतांना दिसत होती. महिला बॉक्सिंगमधे एकुणच कास्य पदक का होईना भारता मिळणार आहे. धन्यवाद.
8 Aug 2012 - 7:08 pm | अप्रतिम
यंदा सुवर्णपदक काही भारताच्या नशिबी दिसत नाही :(
12 Aug 2012 - 12:08 am | खेडूत
भारताचा चॅम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्तने लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक प्राप्त केले आहे. लंडन ऑलिम्पिकचे भारताचे हे पाचवे पदक आहे.
12 Aug 2012 - 12:43 am | प्रभाकर पेठकर
माहितीबद्दल धन्यवाद.
12 Aug 2012 - 1:25 pm | ऑलिंपिक २०१२
सुशीलकुमारचा कुस्तीचा सामना सुरु आहे. पहिली फेरीत सुशीलकुमार मागे आहे.
http://www.newtvworld.com/India-Live-Tv-Channels/dd-sports-live-streamin...
(दुव्यावरील जाहीराती क्लोज कराव्यात)
12 Aug 2012 - 1:34 pm | ऑलिंपिक २०१२
तुर्कीच्या पहिलवानाला पराभूत करुन सुशीलकुमार उपउपात्यं फेरीत पोहचला.
२/१ अशा फरकाने तुर्कीच्या मागील ऑलिंपिक विजेत्या पहिलवानास पराभूत केले. अतिशय रोमहर्षक ही लढत झाली.
आजच बाकीच्या लढती होणार आहेत.
12 Aug 2012 - 2:47 pm | ऑलिंपिक २०१२
आत्ता आज दुसर्या सामन्यात सुशीलकुमार उपांत्य फेरीत पोहचला.
उझबेकिस्तानच्या नवरुझॉव्हला त्याने उपउपांत्य सामन्यात धुळ चारली.
सुशीलकुमारचा प्रवास सुवर्णपदकाच्या दिशेने सुरु झाला आहे.
आत्तापर्यंत एकुण पाच पदकं भारताच्या वाट्याला आली आहेत.
आपण दोनहजारवीसला पंचवीस पदकं आणु अशी तयारी सुरु झाली . [बातमी]
12 Aug 2012 - 3:22 pm | मोदक
फायनल मध्ये पोहोचला.....
:-)
12 Aug 2012 - 3:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कझाकिस्तानच्या पहिलवानास हरवल्यानंतर आता उत्सुकता आहे, सुवर्णपदकाची.
अर्थात, जापानी पहिलवानाशी सुशीलकुमारची लढत सोपी असणार नाही. रौप्य पदक तर नक्कीच झाले आहे. आता सुवर्णपदकाची अपेक्षा फक्त सुशीलकुमारकडुनच आहे. सुशीलकुमारला सुवर्णपदकासाठी शुभेच्छा.
भारतीय प्रमाण वेळेला आज रविवार सायंकाळी ६:३० वाजता अंतिम सामना होणार आहे.
-दिलीप बिरुटे
12 Aug 2012 - 5:53 pm | राघव
सुशीलकुमार चांगलाच खेळला..कझाकच्या तांतारोवला उचलून सरळ पछाड घातली..उपांत्य ल्ढतीत असे करणे म्हणजे खरेच जबरा..पण या लढतीत त्यानं एक फाऊलही केलेला दिसतोय. तांतारोवच्या उजव्या कानाला तो चावलाय.. असो.
आपल्या ध्वजधारकाला सुवर्णासाठी शुभेच्छा!
राघव
12 Aug 2012 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जापानी पहिलवानानं सुशील कुमारला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही.
चपळ अशा जापानी पहिलवानानं सुशीलकुमार आणि आस लावून बसलेल्या भारतीयांच्या सुवर्णपदकाचं स्वप्नं मोडलं.
रौप्य पदक मिळाल्याचा आनंद आहेच. सुशीलकुमारचं अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
12 Aug 2012 - 7:26 pm | मोदक
आवडत्या Quotes पैकी एक Quote आणखी एकदा पटला.. :-(
You Never WIN Silver... You LOSE Gold....!!!!
12 Aug 2012 - 10:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेव्हा जापानी पहिलवानानं दुसर्या फेरीत सुशीलकुमारला उचलुन टाकल तेव्हाच सालं सुशीलकुमारचं अवसान गेलं. आणि म्याच न लढता आपण हरलो. असो, एकाच दिवशी उप उपांत्य, उपांत्य, आणि अंतिम फेरीत खेळायचं ही जरा आपल्या सुशीलकुमारच्या मानसिक आणि शारिरिक अशा परिस्थितीची परिक्षाच होती. आणि जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही. असो, सालं आपलं नशीबच फुटकं आहे, दोष तरी कोणाल द्यायचा. असो, चालायचंच.
-दिलीप बिरुटे
(नर्व्हस)
12 Aug 2012 - 11:39 pm | मोदक
>>>जापानी पहिलवानाचा उजवा खेळ ही गोष्ट ही तशी नाकारता येत नाही.
हो राव... आपलं मिडीया सुशीलकुमारच्या '३ उलट्या' ग्लोरीफाय करत बसलंय. :-D
15 Aug 2012 - 11:04 am | ऑलिंपिक २०१२
चार कास्य आणि दोन रौप्य पदकं ही आपली आत्तापर्यंतच्या ऑलिंपिक स्पर्धेतील ऑलिंपिक २०१२ लंडन येथील उत्तम कामगिरी. ब्राझील येथे होणार्या स्पर्धेत भारतातील खेळाडु अदिक दैदिप्यमान कामगिरी करतील अशी अपेक्षा. मिपावरील सदस्यांनी आणि वाचकांनी स्पर्धेच्या निमित्ताने ऑलिंपिक २०१२ मधे सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद लुटला. आपापली मतं मांडली , आपले सर्वांचे आभार.
स्पर्धेतील समारोपाची काही क्षणचित्र.
ऑलिंपिक २०१२
[मिपा टीम]