महिन्या-दिडमहिन्यापूर्विची गोष्ट आहे ही. लेकीचा दुसरा वाढदिवस २-३ दिवसांवर आला होता. सगळी तयारी जवळजवळ झाली होती. वाढदिवस विकडे ला होता. आणि बर्थडे पार्टी विकेन्डला ठेवली होती. त्यामुळे विकडेला मोठं सेलेब्रेशन करायचं नसलं तरी तिला नविन ड्रेस घालणं, औक्षण करणं, जवळच्या २-३ बच्चे कंपनीला बोलावून केक कापणं असं करण्याचा प्लॅन होता. मनात असं खूप होतं की तिच्या वाढदिवसाला निदान छोट्या सेलेब्रेशनला केक आपणचं करायचा.
पण इथं केक येतोय कुणाला. मग म्हटलं मॉलमधून केक मिक्स घेउन येऊ आणि करून टाकू केक. हा.का.ना.का. त्याप्रमाणं केक मिक्सचं पॅकेट आणलं. घरी आल्यावर त्यावरची केक रेसिपी वाचली तर त्यात एग घाला असं लिहिलं होतं :-( आता मूळात केकचं करायला येत नाही म्हंटल्यावर त्या केक मिक्सचा एग न घालता कसा केक बनवायचा, हे कसं जमावं. एग ऐवजी काय घालायचं कुणाला माहितं.
आता काय करावं बरं?
मग गुगलबाबाला पाचारणं केलं, म्हटलं, 'मिसळपाव + एगलेस केक' असं शोधं बरं जरा. मिसळपाव वर फक्त एक एगलेस रेसिपी ('स्वाती दिनेश' ताईंची) सापडली. ती ट्राय केली. मस्त झाला केक. मग थोडा उत्साह आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढला.
मग नेटावर नेटाने बरीच शोधाशोध सुरू केली एगलेस केक रेसिपीची. मला जनरली रेसिपी विडिओ आवडतात कारण एन्ड रिझल्ट लगेच पहायला मिळतो म्हणून :-) तशी १ छान रेसिपी मिळाली. लगोलग लिस्ट करून सर्व साहित्य आणण्यात आले आणि बर्थ-डे च्या दिवशी दुपारी केक करायला सुरूवात केली. रेसिपीची एक आणि एक स्टेप जशीच्या तशी फॉलो करण्यात आली. तरी मनात सारखं येत होतं, हे आपलं केक बॅटर काहीतरी वेगळंच दिसतयं :-/ आणि त्या केकवालीचं किती छान टेक्सचर आलयं केक बॅटरचं. का बरं असं दिसतयं हे, आपला पहिला केक तर छान झाला होता, त्याचं बॅटर असंच दिसत होतं ना त्या केकवालीसारखं. मग काय झालं आहे या वेळेला :-O कुणास ठाउक?
मग म्हंटलं काही प्रमाण चुकलं असेल का. मग मनानीचं थोडे पदार्थ कमी जास्त घालून थोडी डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला. मग म्हंटलं ठीक आहे. चला. ओव्हन्मध्ये ठेवू आता. केक तयार होऊन बाहेर येउन कुलिंग रॅक वर स्थानापन्न झाला. माझं परत कंपॅरिझन सुरू झालं तिचा केक, माझा केक. केक तसा छान झाला होता. चव पण वाइट नव्हती. पण माझा जरा जास्त कृष्णवर्णिय वाटतं होता. पण म्हंटलं होतं असं कधी कधी आपला या रेसिपीचा पहिलाचं प्रयोग आहे. मेंदीचा कोन करून त्यात बटर आयसिंग घालून केकवर नक्षी काढून झाली :-)
केक गोंडस दिसत होता. हा असा,
संध्याकाळी बच्चे कंपनी आली. बर्थडे गर्लच आणि बाकी मुलांचही औक्षण झालं. केक कापला. मुलांनी आणि त्यांच्या आयांनी (माझ्या मैत्रिणींनी) केक खाल्ला. मैत्रिणींनीही 'चांगला झाला आहे बरं का केक' असं म्हंटलं. (केक घरी केलाय हे सांगितल्यावर असं म्हणावचं लागत नां :-) ) आणि मुलांनी पण मागून मागून केक खाल्ला.
माझा उत्साह आणखी वाढला. आणि मनात आलं की विकेन्ड पार्टीला पण आपणच केक बनवायचा का. आता पार्टीला २/३ दिवस उरले होते. मी ठरवलं की मागचा केक काही फार ग्रेट झाला नाहीये. आता एखादी नवीन रेसिपी ट्राय करू. मग अजून एक रेसिपी शोधून काढली. आणि म्हंटलं आज ही करून पाहू. मग सामानाची जमवाजमव सुरू केली. रेसिपी करायच्या आधी मी टेबलवर/काउंटरवर सगळे घटक (इन्ग्रेडिअंट हो) काढून ठेवते. तेव्हा मैदा काढताना म्हंटलं परवाच केक केला आहे. सो मैद्याचे पॅक बाहेरच आहे. त्यातून मैदा काढताना सहज लक्ष गेलं माझं मैद्याच्या पॅककडं आणि युरेका युरेका... मला हसावं की रडावं कळेना. मग मी हसत सुटले आणि नवर्याला लगेच फोन करून ही गोष्ट सांगितली. तोही हसायला लागला.
त्या पॅकवर 'Rice Floor' असं लिहिलं होतं :-) इन शॉर्ट मी मागच्या वेळेस तांदळाचा बर्थडे केक केला होता :-D म्हणूनचं ते टेक्सचर वेगळं वगैरे वाटतं होत. आणि मी उगाच त्या केकावलीला आय मीन केकवालीला (मनातल्या मनात) नावं ठेवत होते. मग मनातल्या मनातचं केकवालीला (आणि तांदळाचा केक खाल्लेल्या माझ्या मैत्रिणींना, बच्चेकंपनीला) सॉरी म्हणून घेतलं.
आता नव्या उमेदिने कामाला लागले आणि हाती घेतलेली रेसिपी पूर्ण केली. बेसिक चॉकलेट केक तयार झाला. हा असा,
यावेळी केक छान जमून आला. नवर्यालाही आवडला. आणि मनात ठरवलं की बस्स! विकेन्ड पार्टीला आपणचं केक बनवायचा! पण आता नेक्स स्टेप.. आता माझा आवडता एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा. मॉन्जिनीजची खूप आठवण आली. मॉन्जिनीजला मिस करत होते ना :-( मग परत नेटवर शोधाशोध सुरू झाली. एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. पण ही पेस्ट्री काही मिळेना. पेस्ट्री म्हंटलं की स्नॅकचेच काहीबाही आयटम पेश व्हायला लागले :-/ मॉन्जिनीज केक/पेस्ट्री असं शोधून पण काही मिळेना. मग शेवटी 'एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक' चा शोध सुरू झाला. या विषयावर जोरदार R&D सुरू झाले. आणि बरीचं चांगली माहिती मिळत गेली.
नवर्याला काही अस्मादिक बर्थडे केक करणार असल्याचा बेत सांगितला नाही. कारण तो लगेच म्हणाला असता की नको नको तू काही करत नको बसू. आपण विकतच आणू केक. आपल्याला अजून पार्टीची तयारी करायची आहे वगैरे वगैरे. म्हणून मग ब्लॅकने (छुप्या पद्धतीने) ब्लॅक फॉरेस्टचे सर्व सामान घरी आणून ठेवले. आणि मग बर्थडेच्या दिवशी सकाळी प्लॅन जाहीर केला की मी (तुझ्या मदतीने - हे सायलेंट असतं ;-)) घरीचं केक करणार आहे. चांगला झाला तर संध्याकाळी हा केक कट करू. नाही झाला तर मग नवीन आणू.
मग खूप मेहेनत घेऊन, अहोंची (केक मिश्रण फेटायला) मदत घेऊन, त्याबदल्यात त्याला थोडे थोडे आयसिंग करायला देऊन ;-) एकदाचा केक सुफळ संपूर्ण झाला. आणि खरचं आमची मेहेनत फळाला आली आणि मस्त केक तयार झाला.
बा अदब, बा मुलाहिजा, होशिय्यार...... एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री (बरीचशी माँजिनीज सारखी) येत आहे...
आणि हा फ्रीज मध्ये ठेवलेला केक मीच लहान होऊन सारखा सारखा फ्रीज उघडून पहात होते :-) आणि जेव्हा आमच्या छोट्या परीला हा केक दाखवला तेव्हा तर तिचा आनंद गगनात मावेना. ती नुसती तेतू, तेतू (केकू उर्फ केक) करून नाचायला लागली. तिची खुललेली कळी, फुललेला चेहेरा आणि तिच्या चेहेर्यावरून ओसंडून चाललेला आनंद बघून केकपायी केलेल्या सर्व कष्टाच सार्थक झाल्यासारखं वाटलं :-) आणि वाटलं की... 'याचसाठी केला होता अट्टाहास' :-)
तर असे होते माझे केकचे प्रयोग...
... (की माझी केक गाथा की केक कथा का केक पुराण ;-)) .... जे काहि असेल ते असो.
तर अशी ही साठा उत्तराची केक कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
टीपः या वर दिलेल्या केकचा..
मेकिंग ऑफ 'एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक'
हा एपिसोड पा.कृ. मध्ये लवकरच पोस्ट करीन :-)
प्रतिक्रिया
25 Feb 2012 - 8:01 pm | जाई.
अरे वा
केकावली मस्तच जमलीय
25 Feb 2012 - 8:02 pm | निवेदिता-ताई
सुंदर ह.....चव पहायला हवी तुझ्या केकची....
26 Feb 2012 - 5:38 pm | Pearl
निवेदिता-ताई,
नक्की ये चव पहायला :-)
25 Feb 2012 - 8:46 pm | रेवती
अरे वा! अभिनंदन!
तुमच्या मुलीला उशिराने वाढदिवसाच्या शुभेच्छा.
25 Feb 2012 - 9:05 pm | प्रभाकर पेठकर
Pearl
विकडे बर्थडे पार्टी विकेन्डला विकडेला सेलेब्रेशन ड्रेस प्लॅन सेलेब्रेशनला मॉलमधून मिक्स मिक्सचं पॅकेट रेसिपी एग मिक्सचा एग एग एगलेस रेसिपी ट्राय कॉन्फिडन्स एगलेस रेसिपीची. जनरली रेसिपी विडिओ एन्ड रिझल्ट रेसिपी लिस्ट बर्थ-डे रेसिपीची स्टेप फॉलो बॅटर टेक्सचर ओव्हन्मध्ये कुलिंग रॅककंपॅरिझन रेसिपीचा बटर आयसिंग बर्थडे गर्ल विकेन्ड पार्टीला
ग्रेट रेसिपी ट्राय रेसिपी
रेसिपी काउंटरवर इन्ग्रेडिअंट पॅककडं पॅकवर 'Rice Floor' इन शॉर्ट बर्थडे सॉरी बेसिक विकेन्ड पार्टीला नेक्स स्टेप.. एगलेस ब्लॅक फॉरेस्ट मिस नेटवर एगलेस ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री. स्नॅकचेच आयटम पेश R&D बर्थडेपार्टीची ब्लॅकने ब्लॅक फॉरेस्टचे बर्थडेच्या प्लॅन सायलेंट कट आयसिंग फ्रीज
मेकिंग ऑफ 'एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक'
एपिसोड पोस्ट
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ.
26 Feb 2012 - 6:03 pm | Pearl
थंड गोळी घ्या काका ;-)
कृपया ह. घ्या :-)
काय झालं आहे ना बरेचसे आंग्ल शब्द दैनंदिन जिवनाचा भाग बनून गेले आहेत, त्यामुळे तोंडात पटकन तेच शब्द येतात. आणि काही ठिकाणी असं होतं की एखाद्या आंग्ल शब्दाला पर्यायी मराठी एकाक्षरी शब्द उपलब्ध नसतो, किंवा एखाद्या ठिकाणी आंग्ल शब्दच चपखल बसतो... म्हणून असं होतं :-(
तरीही पुढच्या वेळेपासून जास्त काळजी घेतली जाईल आणि शक्य तितके आंग्ल शब्द मराठी शब्दाने (आता रेप्लेस ला काय म्हणतात बरं अं...अं.........)
शक्य तितके आंग्ल शब्द टाळून तिथे मराठी शब्द लिहिले जातील.
आपल्या सूचनेबद्दल मंडळ आभारी आहे :-)
1 Mar 2012 - 5:19 pm | प्रभाकर पेठकर
भारतात येण्याच्या व्यस्ततेत मिसळपावासाठी वेळ काढता आला नाही. क्षमस्व.
आज तुमचा प्रतिसाद बघितला. असो.
-------------------------------------------------------------
थंड गोळी घ्या काका
हलकेच घेतले आहे. पण मग, काका म्हणायचे नाही. कारण लहानांनी मोठ्यांना सल्ला द्यायचा नसतो. असो. तरीपण, न मागता दिलेल्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.
काय झालं आहे ना बरेचसे आंग्ल शब्द दैनंदिन जिवनाचा भाग बनून गेले आहेत.
मातृभाषेचा आदर आणि प्रेम असेल तर विशेष अडचण येत नाही.
काही ठिकाणी असं होतं की एखाद्या आंग्ल शब्दाला पर्यायी मराठी एकाक्षरी शब्द उपलब्ध नसतो.
सहमत आहे. 'केक' वगैरे शब्दाला मराठी शब्दच वापरावा असा आग्रह नाही.
आपल्या सोयी साठी काही इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द किंवा शब्दसमुह सुचविले आहेत. ते सर्व बिनचुक आहेत असा माझा दावा नाही पण काही चुका आढळळ्यास जरूर कळवाव्यात. राग मानू नये.
Pearl = मोती (सदस्य नांव असल्या कारणाने 'पर्ल' सुद्धा चालू शकेल.)
विकडे=आठवड्यातील दिवस.
बर्थडे = वाढदिवस.
पार्टी = उत्सव, समारंभ.
विकेन्डला = सुट्टीचा दिवस, आठवड्याचा शेवट.
सेलेब्रेशन ड्रेस = ठेवणीतील पोशाख, समारंभ पोशाख.
प्लॅन = योजना.
मॉलमधून = बाजार संकुलातून.
मिक्स = मिश्रण.
मिक्सचं पॅकेट = मिश्रण पुडा.
रेसिपी = पाककृती.
एग = अंडं
एगलेस = अंडंविरहित.
ट्राय = प्रयत्न
कॉन्फिडन्स = आत्मविश्वास
एगलेस रेसिपीची = अंडंविरहित पाककृती.
जनरली = सर्वसाधारणतः, सर्वसामान्यपणे.
विडिओ = चित्रफित.
एन्ड रिझल्ट = अंतिम निकाल, अंतिम परिणाम.
लिस्ट = यादी.
स्टेप = पायरी
फॉलो = अनुनय करणे, सुचनेबरहुकुम वागणे.
बॅटर = घोळ
टेक्सचर = पोत
ओव्हन्मध्ये = भट्टीत
कुलिंग रॅक = थंड करायची जाळी.
कंपॅरिझन = तुलना.
बटर = लोणी
आयसिंग = साखर सजावट.
बर्थडे गर्ल = उत्सवमुर्ती
ग्रेट रेसिपी = अत्युच्य पाककृती
ट्राय = प्रयत्न
काउंटरवर = गल्ल्यावर
इन्ग्रेडिअंट = अंतर्भूत जिन्नस
पॅकवर = पुड्यावर.
'Rice Floor' तांदूळाचे पिठ. (ते 'Flour' असे असावे)
इन शॉर्ट = थोडक्यात.
सॉरी = माफ करा, क्षमस्व.
बेसिक = मुलभूत.
नेक्स स्टेप = पुढची पायरी.
मिस = चुकणे
नेटवर = आंतरजालावर.
स्नॅकचेच = मध्यल्यावेळचे खाणे.
आयटम = प्रकार
पेश = सादर
R&D = शोध, संशोधन
सायलेंट = मूक.
कट = कापणे.
फ्रीज = शीतकपाट
मेकिंग ऑफ 'एगलेस ब्लॅक फॉरेस्ट केक'= अंडंविरहित 'ब्लॅक फॉरेस्ट केक' बनविण्याची प्रक्रिया
एपिसोड = घटनाक्रम??
पोस्ट = नोंदणे
आपल्या सूचनेबद्दल मंडळ आभारी आहे
मंडळाच्या विशाल हृदय प्रदर्शनाने भाराऊन गेलो आहे.
आपल्या लेखात 'औक्षण' हा किती पवित्र, प्रेमाने ओथंबलेला, पक्का मराठी शब्द वाचावयास मिळाला! कदाचीत त्याला समानार्थी आंग्ल शब्द न मिळाल्याने वाचला बिचारा.
26 Feb 2012 - 6:11 pm | Pearl
प्र.का.टा.आ.
तरी हा प्रतिसाद वाया का घालवा ;-)
आभाराचा प्रतिसाद टंकणार होतेचं, तर या प्रतिसादात आभार मानून घेते :-)
माझा असा ललित (अं ललितचं म्हणतचं असावेत बहुधा अशा लेखांना) लेखनाचा पहिलाचं प्रयत्न होता.
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
25 Feb 2012 - 9:58 pm | सूड
प्रयोग आवडले.
26 Feb 2012 - 3:40 am | प्राजु
केक पुराण आवडलं.
26 Feb 2012 - 6:17 am | पिंगू
पर्लताई, तुझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. बाकी केकपुराण मस्त आहे.
- पिंगू
26 Feb 2012 - 9:34 am | नगरीनिरंजन
मस्त!
तुमचे (आणि गुगलबाबाचेही) अभिनंदन.
केक छान दिसताहेत सगळेच.
26 Feb 2012 - 11:02 am | डॉ.श्रीराम दिवटे
लेखनाला पूरक अशी चपखल चित्रे डकवण्यात आल्याने प्रयोग साक्षात्कारी झालेत. मेणबत्या तेवढ्या दिसल्या नाहीत