सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने

जागु's picture
जागु in कलादालन
2 May 2011 - 4:52 pm

माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्‍यात कैद केले.

१) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात.

२)धामणीची फुले

३) सोनमोहर

४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात.

५) जवळून यम्मी.

६) झाडावरच फुटलेल्या चिंचा

७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते.

८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ?

९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे.

१०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती.

११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला.

१२) शिवणीची फळे

१३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत !

१४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते.

१५) अजुन एक फुल की फळ ?

१६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता.

१७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती.

१८) बांडगुळाला धरलेली फुले.

१९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती.

२०) थोड जवळ जाउन बघा.

२१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे

२२) देवचाफाही जागोजागी दिसतो.

२३) शिशिराची फुले

२४) पेरूचे फुल

२५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो

अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्‍यात कैद करायचे आहेत.

प्रवास

प्रतिक्रिया

खूपच छान
१५ नं. बहूतेक गजगा असावा....
२४,२५ अप्रतिम

क ह र

पार खपलोय फोटू पाहून ....
एकूण एक फोटू अव्वल

प्रियाली's picture

2 May 2011 - 5:27 pm | प्रियाली

मोहाचे झाड आहे की नाही ते कळलं नसेल तर त्या झाडाखाली जाऊन उभी रहा आणि फुलांचा वास वगैरे घे. लवकरच कळून येईल. ;)

बाकी, भुताचे झाड मस्त. त्याला भुताचे झाड का म्हणतात?

किसन शिंदे's picture

2 May 2011 - 5:27 pm | किसन शिंदे

ज ब र द स्त!!!

५ वा आणि २५ वा फोटो म्हणजे कहरच आहेत..एवढे भारी फोटू टाकून उगा आम्हाला जळवता का काय?

प्राजक्ता पवार's picture

2 May 2011 - 5:56 pm | प्राजक्ता पवार

सगळेच फोटो मस्तं आहेत गं , जागु :)

मनिम्याऊ's picture

2 May 2011 - 6:27 pm | मनिम्याऊ

उत्तम फोटो
जागु ताई, फोटो क्र. ५,६,७ या चिन्चा नाहीत. विदर्भात त्याला चिचबिलाई म्हणतात. आणि ८ नं. ची फुले 'मोहा' न्हवेत. मोहा फिकट पिवळसर असतो आणि पाकळ्या जाड, दडस एकेरी असतात

आमच्याकडे या चिंचांना विलायती चिंचा म्हणतात ...

चिगो's picture

3 May 2011 - 11:19 am | चिगो

आणि आम्ही पोट्टे-सोट्टे त्यांना "चिचबुल्या" म्हाणायचे.. काट्यांनी ओरबाडून घेत, त्या मिळवण्यासाठी केलेली सगळी ल्हानपणीची धडपड आठवली..

जबराट फोटोज..

गणेशा's picture

2 May 2011 - 6:41 pm | गणेशा

फ्रेश वाटले फोटो पाहुन ..
अतिशय सुंदर फोटो ...
अजुन फोटो पाहण्यास उत्सुक ...

मनिम्याऊ's picture

2 May 2011 - 6:41 pm | मनिम्याऊ

ही मोहाची फुले

मनिम्याऊ's picture

2 May 2011 - 7:21 pm | मनिम्याऊ

२.

दीविरा's picture

2 May 2011 - 7:23 pm | दीविरा

चिंचाचा फोटो झकास

कधी खाल्या नाहीत, कशा लागतात?

निवेदिता-ताई's picture

2 May 2011 - 7:35 pm | निवेदिता-ताई

विलायती चिंचा आहेत या...खूप छान लागतात...आंबट नसतात.
एकदा हातात घेतल्या की खातच रहाव्या ..अशा...तों. पा.सु.

सर्वच फ़ोटो झक्कास...

दीविरा's picture

2 May 2011 - 10:20 pm | दीविरा

धन्यवाद ताई

त्या चिंचा थोड्या गोड-तुरट लागतात ... जास्त खाता येत नाही कारण घसा चोक अप होतो :)
पोपटांना ह्या चिंचा फार अवडतात असे माझे बालपणीचे जाणकार मन सांगते .

बाकी फोटो सुरेखा पुणेकर आहेत . ;)

-(कारभारी दमानं) टारझन

सुहास..'s picture

2 May 2011 - 7:26 pm | सुहास..

जागुताई, सकाळच्या सुमाराचा रम्य निसर्ग आम्हाला फोटोरुपी दाखल्याबद्दल धन्यवादस !!

बाकी लकी आहेस की अश्या ठिकाणी कामाला जातेस ते ! ग्रेट !

फार मस्त.. मजा आली.
कुड्याची फुले छान आहेत. आमच्या कॉलेजच्या पार्किंगमध्ये हे झाड आहे. कोणते आहे ते समजत नव्हते.. आज समजले. वास फारच छान असतो.

पेरूचे फूल फार सुंदर.
विलायती चिंचांची चव आठवली.. मस्त :)

प्राजु's picture

2 May 2011 - 8:37 pm | प्राजु

अशक्य आहेत सगळे फोटो, जागु!
जबरदस्त!!!
तुझं कौतुक अशासाठी की त्यातल्या बर्‍याचशा झाडांची नावेही तुला माहिती आहेत. अभिनंदन!

असे ज्यांचे असते त्यांच्याच हापीसाचे रस्ते असे असतात. या फोटोंचे कौतुक करताना राहून राहून हिमालय ड्रग्जच्या कॅलेंडरची आठवण होते आहे. त्या लालेलाल चीजबिलाया बघूनच घशात ठोठरा बसला आहे. पेरुचे न कुरतडलेले फूल पहील्यांदाच बघीतले .ती खाजकुयलीची फळे तर शाळा सोडल्यावर पहील्यांदाच बघीतली. छान चित्रमय प्रवास. कॅलेंडरच्या तारखा म्हणतात पुढे चला आणि चित्रं म्हणतात चला काही वर्षं मागे जाऊ या.
धन्यवाद.

खरे आहे घशात ठोठरा बसतो विलायती चिंचांनी. :(

शुचि's picture

3 May 2011 - 1:23 am | शुचि

फोटो फारच अप्रतिम!!!

पाषाणभेद's picture

3 May 2011 - 4:07 am | पाषाणभेद

मस्त फोटो आहेत.
'शंकर मंदीर' हे ऐकायला अन बोलायला कसेतरीच वाटते अन तसे बोलतही नाही. सहसा शिवमंदिर किंवा महादेवाचे देवूळ / मंदिर असे बोलतात.

सहज's picture

3 May 2011 - 7:21 am | सहज

धन्यु!!

प्रचेतस's picture

3 May 2011 - 9:34 am | प्रचेतस

जागुतै, भाग्यवान आहात. कसल्या निसर्गरम्य परिसरात तुमचे ऑफीस आहे हो.

नरेशकुमार's picture

3 May 2011 - 11:01 am | नरेशकुमार

सहि.

मस्त कलंदर's picture

3 May 2011 - 11:47 am | मस्त कलंदर

सही आलेत फोटो. विलायती चिंचा तर खूप दिवसांनी पाहिल्या. लहानपणी या चिंचेच्या बीवरचे काळे टरफल व्यवस्थित कुरतडून फक्त आतले ब्राऊन रंगाचे आवरण राहिले, आणि अशी बी उशाखाली ठेवून झोपले तर सकाळी गोड खायला मिळते असं कुणीतरी सांगितलं होतं. त्यामुळे चिंचा खाल्ल्यानंतर आम्ही या बिया सोलत बसत असू. कितीही काळजी घेतली तरी चुकून कुठेतरी नख लागायचं आणि मग आतली पांढरी बी वाकुल्या दाखवायची.

लहानपणी या चिंचेच्या बीवरचे काळे टरफल व्यवस्थित कुरतडून फक्त आतले ब्राऊन रंगाचे आवरण राहिले, आणि अशी बी उशाखाली ठेवून झोपले तर सकाळी गोड खायला मिळते असं कुणीतरी सांगितलं होतं.

आमच्या लहाणपणी त्याचे ५-१० पैसे व्हायचे .. :) डॉक्टर लोकं अशी व्यवस्थित सोललेली ब्राऊन बी घेत असे ऐकुन होतो . .:)

जागुताई,

अप्रतिम फोटो, पेरूचे फुल खुपच छान.

पेरुचे फुल मी पहिल्यांदाच पाहिले आहे..
पेरुचे म्हणजे खायच्या पेरुच्या झाडाला येते काय हे फुल ..?

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार

ज ब र्‍या द स्त !!

__/\__

सगळेच फटू चाबूक. ह्यातली बरीच फले - फुले अध्ये मध्ये बघितली होती पण नावं सुद्धा माहिती नव्हती.