मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने

जागु · · कलादालन
माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्‍यात कैद केले. १) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात. २)धामणीची फुले ३) सोनमोहर ४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात. ५) जवळून यम्मी. ६) झाडावरच फुटलेल्या चिंचा ७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते. ८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ? ९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे. १०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती. ११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला. १२) शिवणीची फळे १३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत ! १४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते. १५) अजुन एक फुल की फळ ? १६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता. १७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती. १८) बांडगुळाला धरलेली फुले. १९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती. २०) थोड जवळ जाउन बघा. २१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे २२) देवचाफाही जागोजागी दिसतो. २३) शिशिराची फुले २४) पेरूचे फुल २५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्‍यात कैद करायचे आहेत.
लेखनविषय:

वाचने 10070 वाचनखूण प्रतिक्रिया 30

प्रियाली Mon, 05/02/2011 - 17:27
मोहाचे झाड आहे की नाही ते कळलं नसेल तर त्या झाडाखाली जाऊन उभी रहा आणि फुलांचा वास वगैरे घे. लवकरच कळून येईल. ;) बाकी, भुताचे झाड मस्त. त्याला भुताचे झाड का म्हणतात?

मनिम्याऊ Mon, 05/02/2011 - 18:27
उत्तम फोटो जागु ताई, फोटो क्र. ५,६,७ या चिन्चा नाहीत. विदर्भात त्याला चिचबिलाई म्हणतात. आणि ८ नं. ची फुले 'मोहा' न्हवेत. मोहा फिकट पिवळसर असतो आणि पाकळ्या जाड, दडस एकेरी असतात

In reply to by मनिम्याऊ

चिगो Tue, 05/03/2011 - 11:19
आणि आम्ही पोट्टे-सोट्टे त्यांना "चिचबुल्या" म्हाणायचे.. काट्यांनी ओरबाडून घेत, त्या मिळवण्यासाठी केलेली सगळी ल्हानपणीची धडपड आठवली.. जबराट फोटोज..

In reply to by दीविरा

निवेदिता-ताई Mon, 05/02/2011 - 19:35
विलायती चिंचा आहेत या...खूप छान लागतात...आंबट नसतात. एकदा हातात घेतल्या की खातच रहाव्या ..अशा...तों. पा.सु. सर्वच फ़ोटो झक्कास...

In reply to by दीविरा

टारझन Tue, 05/03/2011 - 10:39
त्या चिंचा थोड्या गोड-तुरट लागतात ... जास्त खाता येत नाही कारण घसा चोक अप होतो :) पोपटांना ह्या चिंचा फार अवडतात असे माझे बालपणीचे जाणकार मन सांगते . बाकी फोटो सुरेखा पुणेकर आहेत . ;) -(कारभारी दमानं) टारझन

सुहास.. Mon, 05/02/2011 - 19:26
जागुताई, सकाळच्या सुमाराचा रम्य निसर्ग आम्हाला फोटोरुपी दाखल्याबद्दल धन्यवादस !! बाकी लकी आहेस की अश्या ठिकाणी कामाला जातेस ते ! ग्रेट !

लिखाळ Mon, 05/02/2011 - 19:50
फार मस्त.. मजा आली. कुड्याची फुले छान आहेत. आमच्या कॉलेजच्या पार्किंगमध्ये हे झाड आहे. कोणते आहे ते समजत नव्हते.. आज समजले. वास फारच छान असतो. पेरूचे फूल फार सुंदर. विलायती चिंचांची चव आठवली.. मस्त :)

प्राजु Mon, 05/02/2011 - 20:37
अशक्य आहेत सगळे फोटो, जागु! जबरदस्त!!! तुझं कौतुक अशासाठी की त्यातल्या बर्‍याचशा झाडांची नावेही तुला माहिती आहेत. अभिनंदन!

रामदास Mon, 05/02/2011 - 23:57
असे ज्यांचे असते त्यांच्याच हापीसाचे रस्ते असे असतात. या फोटोंचे कौतुक करताना राहून राहून हिमालय ड्रग्जच्या कॅलेंडरची आठवण होते आहे. त्या लालेलाल चीजबिलाया बघूनच घशात ठोठरा बसला आहे. पेरुचे न कुरतडलेले फूल पहील्यांदाच बघीतले .ती खाजकुयलीची फळे तर शाळा सोडल्यावर पहील्यांदाच बघीतली. छान चित्रमय प्रवास. कॅलेंडरच्या तारखा म्हणतात पुढे चला आणि चित्रं म्हणतात चला काही वर्षं मागे जाऊ या. धन्यवाद.

पाषाणभेद Tue, 05/03/2011 - 04:07
मस्त फोटो आहेत. 'शंकर मंदीर' हे ऐकायला अन बोलायला कसेतरीच वाटते अन तसे बोलतही नाही. सहसा शिवमंदिर किंवा महादेवाचे देवूळ / मंदिर असे बोलतात.

मस्त कलंदर Tue, 05/03/2011 - 11:47
सही आलेत फोटो. विलायती चिंचा तर खूप दिवसांनी पाहिल्या. लहानपणी या चिंचेच्या बीवरचे काळे टरफल व्यवस्थित कुरतडून फक्त आतले ब्राऊन रंगाचे आवरण राहिले, आणि अशी बी उशाखाली ठेवून झोपले तर सकाळी गोड खायला मिळते असं कुणीतरी सांगितलं होतं. त्यामुळे चिंचा खाल्ल्यानंतर आम्ही या बिया सोलत बसत असू. कितीही काळजी घेतली तरी चुकून कुठेतरी नख लागायचं आणि मग आतली पांढरी बी वाकुल्या दाखवायची.

In reply to by मस्त कलंदर

टारझन Tue, 05/03/2011 - 12:14
लहानपणी या चिंचेच्या बीवरचे काळे टरफल व्यवस्थित कुरतडून फक्त आतले ब्राऊन रंगाचे आवरण राहिले, आणि अशी बी उशाखाली ठेवून झोपले तर सकाळी गोड खायला मिळते असं कुणीतरी सांगितलं होतं.
आमच्या लहाणपणी त्याचे ५-१० पैसे व्हायचे .. :) डॉक्टर लोकं अशी व्यवस्थित सोललेली ब्राऊन बी घेत असे ऐकुन होतो . .:)