चालु घडामोडी- ऑक्टोबर/ नोव्हेंबर -२५

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Oct 2025 - 11:11 am

नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.

आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.

१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )

२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५

३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!

संस्कृतीधर्मविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

याबाबत अतृप्त आत्मा नावाचे मिपाकर काय म्हणतात हे विचारले पाहिजे.

आमच्याकडे प्रामाणिकपणाची वानवा आहे. शिवाय कुणाला, कोणत्या संस्थेला मुख्य म्हणायचं. शिवाजी महाराजांनाही राज्याभिषेकांत अनंत अडचणी आल्या. ज्ञानेश्वर आणि बंधुंनाही त्रास झाला. सारस्वत ब्राह्मणांनीही चिडून शेवटी आपले पुरोहित तयार केले. पंचांगांत ही वाद झाला आणि आहेच. राष्ट्रीय पंचांग थोपलेच. ज्याचा काहीही उपयोग नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2025 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कर्नाटकमधील विधानसभा २०२३च्या निवडणुकीदरम्यान अळंद या मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाला होता आणि यशस्वीरित्या हटविलेल्या प्रत्येक मतासाठी ८० रुपये दिले जात होते, असे कथित मतचोरीप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

25 Oct 2025 - 7:14 pm | अभ्या..

भारतीय उद्योगपती आणि एचसीएल चे संस्थापक शिव नाडर यांच्या पत्नी किरण नाडर (ज्या किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट च्या संस्थापक आणि चित्र संग्राहक आहेत) यांनी भारतीय वंशाचे (अमिरातीचे नागरिक) प्रसिध्द चित्रकार मकबूल फिदा हुसेन ह्यांचे 'ग्रामयात्रा' नामक अनटायटल्ड चित्र (चित्रसमूह) तब्बल ११८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हा लिलाव मार्च महिन्यातच ख्रिस्टीज न्यूयॉर्क ने केलेला होता पण खरेदीदार म्हणून नाडर ह्यांचे नाव आता प्रसिध्द झाले आहे. त्यांचे एक म्युझियम दोहा, कतार येथेही सुरु होणार आहे.
भारतीय वंशाच्या चित्रकारांना त्यांच्या चित्रासाठी मिळालेली ही आत्तापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2025 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण गोबरयुगात अनेक धक्कादायक गोष्टी ऐकत असतो आता त्याचं नवलही वाटत नाही. एखादा देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर, काय करायला पाहिजे तर, त्याचं साधं उत्तर असतं की, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, आणि रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, भ्रष्टाचार कमी करणे आणि देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देणे वगैरे. आपल्याकडे आपल्या देशाच्या सरकारचे धोरण पाहिले की, आता लाज वाटायला लागते. तरुणांना आपण कुठे घेऊन जात आहोत.

बिहारच्या निवडणूकीत आपले लाडके पंतप्रधान म्हणाले ' इंटरनेट डेटा सस्ता कर दिया जिस वजह बिहार के नौजवान रील बना कर कमाई कर रहा है'' रील्समुळे रोजगार मिळतो अशी येडपट कल्पना कोणाला सुचू शकते. युवकांनी शिक्षण घेतले पाहिजे, आपल्या शिक्षणाला अनुरुप असा रोजगार मिळाला पाहिजे. पण, पंतप्रधान म्हणतात, एक चहाच्या कपाच्या किमतीत एक जीबी डेटा मिळतो, आणि त्यावर रील्स बनवतो. कमाई करतो. रील्स आणि इन्ष्टाग्राम हे रोजगाराचे साधन असू शकते ? म्हणजे युवकांनी शिक्षण घेऊन, वडे तळणे, रील्स करणे, हा शिक्षणाचा हेतू असू शकतो ?.

आपणास अजून एक माहिती असेल की, डिजीटल इंडियाच्या जाहिरातीसाठी सरकारने ''रील्सची स्पर्धा'' आयोजित केली होती. आणि सरकार त्यास वेगवेगळी बक्षीसं देणार होती. अर्थात, वाढत्या मोबाईल व्यसनाने युवापिढी बरबाद होत चालली आहे, अशा वेळी गोबरयुगात अशा मूर्खपणाच्या गोष्टी येतच राहतील.

१. रील्सचं सविस्तर वृत्तांकन २. रील्सस्पर्धा (डीजीटल इंडिया )

-दिलीप बिरुटे

स्वधर्म's picture

26 Oct 2025 - 5:11 pm | स्वधर्म

सर, आपण सध्याच्या नेतृत्वाबाबत व्हीजन नसलेलं नेतृत्व असे म्हटले आहे पण त्यांचा व्हिजन अगदी स्पष्ट दिसतो:
- संपूर्ण सुशिक्षित मध्यमवर्गीयांची विचार करण्याची शक्ती संपुष्टात आणून त्यांच्या धर्मश्रध्देचा वापर करून आपले शोषण करणार्‍यांप्रतीच पूर्ण भक्तीभाव निर्माण करणे.
- सर्व लोकांची प्रश्न विचारण्याची क्षमता संपवणे.
- अशा प्रकारे निरूपद्रवीकरण झालेल्या जनतेस किरकोळ रोख पैसे व रेशन देऊन देशाची बहुमूल्य साधनसंपत्ती काही विशिष्ट लोकांकडे जमा करणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2025 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव्या व्हीजनशी सहमती आहेच.

बाकी ते, एल आय सी ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला. संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या धोरणांनुसार आणि पुरेशा विचारमंथनानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली.

कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. =))

-दिलीप बिरुटे

"बाकी ते, एल आय सी ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला. संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या धोरणांनुसार आणि पुरेशा विचारमंथनानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली."

अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे आपल्याला मान्य आहे तर... हे ही नसे थोडके 😀

आता एक(च) प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीत राहिलाय त्याचेही उत्तर आपल्याकडून मिळाले तर माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन...

एल.आय.सी. ने स्वतंत्रपणे घेतलेल्या ह्या निर्णयाचा तिच्या (ULIP पॉलिसीज मध्ये) गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी धारकांच्या गुंतवणूकीवर सकारात्मक परिणाम झाला की नकारात्मक परिणाम झाला?
म्हणजे त्यांनी निवडलेल्या फंडांच्या NAV (Net Asset Value) मध्ये वृद्धी झाली की घट झाली?

जर वृद्धी झाली असेल तर हा निर्णय योग्य होता आणि जर घट झाली असेल तर हा निर्णय चुकीचा होता असे मानण्यास आपलीही काही हरकत नसावी अशी भाबडी अपेक्षा आहे 😀

काय आहे की माझ्या (मंद)बुद्धीच्या आकलना पलीकडचे हे विषय असल्याने बुद्धिमंतांकडूनच अशा गहन प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगावी लागते! वो कहते हैं ना..."नाईलाज को क्या इलाज?" 😂

(चोख) उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला
टर्मीनेटर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2025 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आकलनावर मला शंका घ्यायची नाही. पॉलिसीधारकांचा फायदा झाला किंवा झाला नाही हा प्रश्न नाही. सध्या जी राळ उडालेली ती अशी आहे की,

अमेरिकी सरकारी संस्थांकडून लाचखोरी आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गेल्या वर्षी अदानी उद्योग समूहाला अनेक प्रमुख अमेरिकी आणि युरोपीय बँका कर्ज देण्यास उत्सुक नव्हत्या. या परिस्थितीत या समूहामध्ये केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) निधी गुंतवणुकीच्या माध्यमातून वळवण्यात आला, असे वृत्त 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने प्रसिद्ध केले.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), तसेच निती आयोगाने याविषयी एलआयसीला गुंतवणुकीचा आग्रही सल्ला दिला, असेही या वृत्तात नमूद केले होत. अदानीच्या कर्जफेडीसाठी ही गुंतवणूक करायला लावली, असा मुख्य आरोप आहे.

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट )

विवेकपटाईत's picture

2 Nov 2025 - 12:40 pm | विवेकपटाईत

ज्या काळात विज्ञान सहित सर्व क्षेत्रात प्रगति होत आहे. त्याला गोबर युग म्हणणे कितपत योग्य आहे. बाकी गेल्या वर्षी 300 कोटींचे गोबर ही आपण विकले.

धर्मराजमुटके's picture

27 Oct 2025 - 10:35 am | धर्मराजमुटके

२०१४ पासून गोबरयुग चालू झाले मात्र साधारण ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी काहिंना अजून त्याची सवय झालेली नाही. ५०-६० वर्षे शेतात उगवलेले काँग्रेस गवत पोटात गेल्याचा हा परीणाम असावा.
काँग्रेस गवत खा नाहीतर शेण खा, आपल्या संसाराचा गाडा आपल्यालाच ओढायचा असतो हे ज्या दिवशी समजेल तो सुदिन.

टर्मीनेटर's picture

27 Oct 2025 - 12:51 pm | टर्मीनेटर

You said it...
😂 😂 😂

धर्मराजमुटके's picture

31 Oct 2025 - 11:26 am | धर्मराजमुटके

काल गुरुवार होता. काल रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने पवई, मुंबई येथे १७ मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांच्या कारवाईत तो मारला गेला. महाराष्ट्र शिक्षण खात्यात त्याने काही संकल्पना राबविल्या होत्या त्याचा मोबदला त्याला मिळत नव्हता म्हणून त्याने हे पाऊल उचलले असे त्याने प्रसारित केलेल्या चित्रफितीत म्हटले होते.

त्याच घटनेसारखा "ए थर्सडॅ' हा यामी गौतम चा चित्रपट हॉटस्टार वर उपलब्ध आहे. यात ती आपल्या शाळेत १६ मुलांना ओलीस ठेवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2025 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टांझानियात निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निकालांनंतर देशात हिंसाचार उफाळला सत्ताधाऱ्यांना तब्बल 98% मतं; निवडणुकीत घोळ झाल्याचे आरोप; देश पेटला, गोळीबारात 700 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी.

बातमी.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2025 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयादरम्यान 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला तुडुंब गर्दी दिसत होती. सदोष मतदारयाद्यांवर आक्षेप घेऊन, दुबार मतदारांची नावे वगळुन मगच निवडणूक घ्या अशी आग्रही मागणी विरोधीपक्षाकडून अर्थात राकॉ (शप) शिवसेना (उबाठा ) मनसे, काँग्रेस आणि इतर महाआघाडीतील पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी होते.

निवडणुकांसाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि कोणत्याही मतदाराने दुबार मतदान करु नये, अशा अद्ययावत मतदान यादी व्हायला हवी ही कोणत्याही निवडणूकीसाठी योग्य मागणी आहे. बोगस मतदार यादी, बोगस मतदान, हे आता टाळता यायला हवे, निवडणूक आयोगाने आपल्या कारभारात सुधारणा करायला पाहिजे.

अशा वेळी, अशीच मागणी करण्याऐवजी भाजपने शनिवारी गिरगाव चौपाटी येथे मूक मोर्चा काढला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाच्या भितीने हा मोर्चा आणि कट आखला असा आरोप या पक्षाच्या वतीने करण्यात आला. निवडणुका म्हटलं की असं चालायचंच. :)

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

2 Nov 2025 - 9:14 pm | कंजूस

दुबार मतदान कसे होते?

>>कोणत्याही मतदाराने दुबार मतदान करु नये, अ>>
म्हणजे तो मतदार एके ठिकाणी मतदान करून आल्यावर बोटावरची शाई पुसून पुन्हा दुसरे एक ओळखपत्र घेऊन दुसरीकडे मतदान करून जातो?

अभ्या..'s picture

2 Nov 2025 - 10:00 pm | अभ्या..

दुबार मतदान कसे होते?

सिंपल एकदम. कंट्रोल्+टॅब.
ह्या ठिकाणी जे केले तेच दुसर्‍या ठिकाणी वेगळ्या नावाने जाऊन करायचे.
.
आता प्रोसेस म्हणले तर काहीजण पक्षासाठी करतात, काही पैशासाठी तर काही फक्त किडा म्हणून करतात म्हणे.
तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे?

कंजूस's picture

2 Nov 2025 - 11:26 pm | कंजूस

म्हणजे ..

१. शाई सहज पुसता येते,
२. दोन वेगवेगळ्या नावाची ओळखपत्रे त्यांच्याकडे असतात,
३. वय आणि पुरुष/ स्त्री जमते. फोटोही जमतो.

आग्या१९९०'s picture

3 Nov 2025 - 12:15 am | आग्या१९९०

दुबार मतदान कसे होते हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. त्यामुळे मतदानाचे बूथ लेव्हलवरील व्हिडिओ फुटेज देत नाहीत.
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात. दुबार मतदान दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्यामुळे बोटावरील शाईचा प्रश्नच उद्भवत नाही.

कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.
कै च्या कै ...