कु..कू..कू..डीजेवर गाणं दणाणून वाजत होती.इकडे १० वर्षांची लेक काय बीट्स म्हणत कू..कू..कू..म्हणू लागली.मी म्हटलं,"अगं गप्प बस,नको म्हणू हे गाणं, हे चांगलं गाणं नाही." आधीच लेक एकपाठी आहे.थांबवल नसतं तर गाणं पाठ करून,घर दारी हेच गाणं गात बसली असती
"चांगलं नाही.काय वाईट आहे यात?" तिला ह्याच गाण्याचा द्वयार्थ ,गाण्यावरची बंदी सांगितले.ती म्हणाली " गाणं लिहिणाऱ्याला हे कळत नव्हतं का?त्याने असं का गाणं लिहिलं."
मनात म्हटलं,बाई बरं झालं तुमची पिढी मराठी जुने गाणं ऐकत नाही.नाहीतर दादा कोंडकेंची द्वयीअर्थी गाणी समजायला लागली तेव्हा लाजाने कससं व्हायचं.रविवारी दादा कोंडकेंचा सिनेमा असेल तर तो बंद करून खेळायला जात असं सांगितलं जायचं.
पण या उत्सवांच्या नावावर डीजे नावाचा बिभत्सपणा कानाच्या पडद्यापासून मनाच्या अस्तरावर ओरखडे ओढत असतो.विविध जयंती, विविध धार्मिक उत्सवात डीजे अविभाज्य भाग केला गेला आहे.इतर डीजे यात्रा तास दोन तास सहन करावी लागते.गणेशोत्सवाचा बीजे मात्र १०-११ दिवस सहनशक्तीचा अंत पाहतो.आम्ही आमच्या मुलांना कलियुगात ज्या गोष्टींपासून दूर ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतो.तेच वातावरण आमच्या घरात न मागता कर्कश आवाजात पोहचवले जात आहे.
यामागची राजकीय, आर्थिक गणित इतकी गुंतागुंतीची झाली आहेत की सामान्यांसाठी हे उत्सव वाहतूक, सुरक्षितता,शांतता , स्वच्छता इ.अनेक सोयींची वाट लावत आहे.बरं चांगले शिकले सवरलेलेही याला धार्मिक, सामाजिक विरोध समजून या अनिष्टाला कुरवाळणारेही आढळतात.
माझ्या लहानपणी घरात गणपती बसवला जात नसे.त्यामुळे सार्वजनिक गणपतीच्याच आठवणी या माझ्या गणेशोत्सवाच्या आठवणी आहेत.झांज आणि लेझीमचा नाद, वकृत्व-निबंध-चित्रकला स्पर्धेंची रेलचेल असायची."कशी चिक मोत्यांची माळ" या गाण्यावर नृत्य स्पर्धेत भाग ठरलेला असायचा.तर झाशीची राणी होतं वेशभूषेत भाग घेतला जायचा.नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते.पण स्वतः वर विश्वासही आहे तेव्हा वाटतं
'मला माझा गणराय परत द्या असंच म्हणावं वाटतं.'
मग परत वातावरण ऐकण्यासाठी योग्य झालंय तर तिला १८ वर्षांच्या मुलीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पाळी थांबवण्यासाठी हॉर्मोन्स गोळ्या ३ दिवस घेतल्या.पण त्यात गुंतागुंत होऊन ती डीप थ्रॉंबोसिस होऊन ती वारली.हे सर्व एका पुजेसाठी तिला सामील होता यावं म्हणून केलं.सुनिता विल्यम्स अंतराळात पोहचली पण तिच्याच वंशातल्या मुली पाळीला विटाळ समजतात??जीवाचे मोल अनिष्टता पाळण्यासाठी दिले गेले.
लेक म्हणाली "छे आई ,पिरियडर वाईट नसतात.देवाला त्याचा प्रॉब्लेम नसतोच."
म्हटलं "हो राणी ,पण आजही बाईचे पिरियडर आणि प्रथेची गुंतागुंत अनेक खेडोपाड्यात रूजलेली आहे."
उत्सव हे आयुष्यात वाटेतल्या पथदिव्यांसारखे असतात.उगाच अंधारल्या सारख्या भासमान प्रसंगात पुढे चालायचे बळ देतात.आजकाल ते अंधाराचे कोश फेकत राहतात.अशावेळी आपण आपल्या घरातल्या चिमण्यांना सांभाळून ठेवावं लागतं .
-भक्ती
प्रतिक्रिया
29 Aug 2025 - 5:49 am | नचिकेत जवखेडकर
खरं बोललात. कदाचित वेगळा विषय वाटू शकेल पण माझी मुलगी ज्या पाळणाघरात जायची, तिकडे एक पुस्तक होतं(खास लहान मुलांकरता तयार केलेलं) ज्यात मूल कसं होतं ती सगळी प्रक्रिया चित्रांसकट दिली होती. नेमकं एकदा मुलीनी ते उचललं आणि छान वाचून काढलं. त्यात तिला काहीही वावगं वाटलं नाही. उलट घरी येऊन मला सांगितलं काय काय लिहिलं होतं त्या पुस्तकामध्ये ! त्या पुस्तकातही असंच दिलेलं होतं की, आधी लग्नं होतं, नंतर आईबाबा होतात :) त्यामुळे जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी सांगायची वेळ येईल तेव्हा ते पुस्तक विकत घेऊन चांगलं समजावता येईल असं वाटतंय.
29 Aug 2025 - 10:33 am | Bhakti
तेच तर या पिढीत सहजता वाटते.मी ठरवलं होतं,मी मुलीच्या बाबतीत असं करेन तसं करेन! But all plan fails ;) (चांगल्या अर्थाने) इतक्या लहान वयात मुलींचे मत किती स्वच्छ आणि प्रामाणिक,ठाम आहेत याचं आश्चर्य वाटते.
29 Aug 2025 - 6:51 am | कंजूस
देव जेव्हा पैसेवाल्यांचा होतो.
29 Aug 2025 - 10:33 am | Bhakti
+१
29 Aug 2025 - 7:18 am | कर्नलतपस्वी
असेल व मन मोकळे संवाद असतील तर बदलाची प्रक्रिया सहज पार होते. यात आईची भुमिका महत्वाची तर वडलांनी कुठलेही आश्चर्य न दाखवता मर्यादित सहज संवाद साधला पाहिजे. तसेही मुले आईवडिलांचे वेगवेगळे क्षेत्र व नाते समजतात. आणी त्या प्रमाणेच संवाद साधतात.
29 Aug 2025 - 10:35 am | Bhakti
हो मोकळीक महत्त्वाची आहे.
29 Aug 2025 - 11:47 am | कंजूस
यावरून आठवलं की मिपाचे महिलांसाठी फक्त असे एक सदर होते.
फक्त महिलांसाठीच धागे असायचे आणि ते फक्त महिला सभासदांनाच दिसायचे. ते सदर ( नाव विसरलो त्याचे) बंद झाले. चालू करवून घ्या.
29 Aug 2025 - 3:46 pm | Bhakti
का ओ काका वेगळे दालन कशाला? प्रत्येकाच्या घरी मुली, बहिणी आहेतच.
29 Aug 2025 - 7:54 pm | कंजूस
वेगळे दालन होते. हेच सांगायचं आहे.
31 Aug 2025 - 3:02 pm | श्वेता२४
नक्की मी सध्या चुकीच्या वेळी जगतेय किंवा चुकीच्या ठिकाणी आहे की चुकीच्या मानसिकतेमध्ये आहे असं काहीतरी मनात तराळते
सध्याचे पालकत्व खूप आव्हानात्मक आहे. मुलांना कोणत्या गोष्टी,कधी , किती आणि कशा सांगाव्यात हे खर तर खूप मोठं आव्हान आहे.
2 Sep 2025 - 7:16 pm | सुबोध खरे
पालकत्व पूर्वी सुद्धा आव्हानात्मकच होतं पण तेंव्हा मुलांना गप्प बसायला "शिकवत".
यातून मुलं आपल्या मोठ्या भावंडांकडून जे आणि जसा मिळेल तसं शिकत असत. बऱ्याच वेळेस ते चुकीचं सुद्धा असे.
तेंव्हा पालक दोन वेळेच्या जेवणाचीच भ्रांत असल्यामुळे असल्या "क्षुल्लक" गोष्टींकडे लक्ष देत नसत
आता बापच नव्हे तर आया सुद्धा सुशिक्षित झाल्या आणि कमवायला लागल्या त्यामुळे त्यांना आपल्याला काय गोष्टी मिळाल्या नाहीत याची जाणीव जास्त प्रकर्षाने होऊ लागली. यामुळे आता आईबाप मुलांकडे जास्त जागरूकपणे पाहू लागले आहेत.
पण त्याच वेळेस जालावरून इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा धबधबा घरात येऊ लागला कि मुलांना त्यातील चांगला आणि वाईट काय आणि कसं समजवावं हा एक यक्ष प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे.
यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आई वडिलांनी मुलांना जास्त वेळ देणें आवश्यक झाले आहे. दुर्दैवाने बऱ्याच वेळेस आईबाप सुद्धा फार वेळ भ्रमणध्वनीला चिकटलेले दिसतात. मागच्या वर्षी श्रावणात नाशिक ला गेलो होतो तेंव्हा संध्याकाळी एका हॉटेलात जेवायला गेलो होतो
तिथे दोन बहिणी आपल्या तीन शाळकरी मुलांना घेऊन जेवायला आल्या होत्या. ती तिन मुले आपसात गप्पा मार्ट होतोय आणि दोन्ही आया जेवण येईपर्यंत भ्रमणध्वनी मध्ये डोकं खुपसून बसलेल्या होत्या. मी आणि पत्नी हतबुद्ध होऊन पाहत राहिलो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांशी संवाद असणे आवश्यक झाले आहे.
3 Sep 2025 - 8:25 pm | Bhakti
+१
या सुखाची तुलना जगात कशाचीच होऊ शकत नाही.आमची बडबडी बाहुली खुप एक्स्प्रेस आहे,तिला थांब म्हणावं लागत ;)
गप्पांमधून हवा तो संवाद साधते.
3 Sep 2025 - 11:27 am | श्वेता व्यास
खरंच मुलांना कसं कधी काय समजावून सांगायचं हे आव्हानच आहे, फक्त श्राव्य नाही तर द्रुक माध्यमातही हा प्रश्न आहेच, लहान मुले सुद्धा बघत असताना टीव्हीवर कधी काय जाहिराती लागतील याचा नेम नसतो आणि घरातील ज्येष्ठांना टीव्ही बंद करून बसायला सांगू शकत नाही. सगळी माध्यमे इतकी त्यांच्या आवाक्यात आहेत की कुठे आणि किती सांभाळणार या चिमण्यांना याची काळजीच लागून राहते.
4 Sep 2025 - 8:42 am | सौन्दर्य
काही दिवसांपूर्वी अटलांटाला सहकुटुंब जाण्याचा योग्य आला. बरोबर मेहुणी, तिचा नवरा व त्यांची दहा वर्षांची मुलगी होती. आम्ही एक दिवस तेथील प्राणी संग्रहालय बघायला गेलो होतो. तेथे एका एनक्लोजर मध्ये आठ दहा कासवे होती. त्यातील एक नर - मादी मेटींग करत होती. बरोबर दहा वर्षांची मुलगी होती, म्हणून आम्ही तेथून काढता पाय घेण्याच्या तयारीत होतो, तेव्हढ्यात ती मुलगी म्हणाली, "मम्मी लूक दे आर मेटींग".
आम्ही काही क्षण तेथे थांबलो व गुपचूप निघून दुसऱ्या पिंजऱ्याजवळ गेलो.
5 Sep 2025 - 11:34 am | कपिलमुनी
मुले ८-१० वर्षाची आहे तोवर काय पहायचे काय नाही यावर पालकांचा कंट्रोल असतो .. नंतर अवघड टास्क आहे .
वयापेक्षा मोठ्या असलेल्या मित्रांकडे असलेले फोन , अभ्यासा साठी घेतलेले लॅप्टॉप , २४ तास उपलब्ध वाय फाय यातून लैंगिकतेचा भडीमार होतो .. मुलांच्या मनात वेग वेगळ्या कल्पना निर्माण होतात .त्यांना योग्य दिशा दाखवायला खुला संवाद फार गरजेचा आहे.