आईच्या गावात ...... चांगले बोल

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
22 Jan 2024 - 1:28 pm

हा आठवडा मराठी चित्रपटासाठी सुखद धक्का होता . एकाच आठवड्यात तीन नवीन चित्रपट भेटीस येणार होते . श्यामच्या आईच्या धक्क्यातून अजून सावरलो नसल्याने डोक्याची मंडई न करणारा चित्रपट पाहायचा असे ठरवले होते. पण यावेळेस त्रिधा मनस्थिती झाली होती. 'पंचक' , 'ओले आले' आणि 'आईच्या गावात मराठी बोल' असे तिन्ही विनोदी धाटणीचे पण वेगळ्या अंगाचे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले. (महत्प्रयत्नाने release चा मराठी शब्द गुगल न करता आठवला. काय दिवस आलेत मराठीतले शब्द सुद्धा गूगलवर शोधतोय !!) पंचक माधुरी दीक्षितचा चित्रपट असला , तरी ती यात नव्हती. 'सायली'पेक्षा 'संस्कृती' महत्वाची (I mean पसंतीस उतरल्याने ) ठरल्याने "आईच्या गावात..." ला जाणे नक्की झाले. सध्या मुक्काम श. ना . नगरीत असल्याने खिश्यास जादा चाट न पडता कुटुंबासह बाल्कनीचे तिकिट काढले.
आईच्या गावात ... मराठी बोल ह्या चित्रपटाची सुरुवात होते अमेरिका स्थित आई ( सुप्रिया साबळे ) व मुलाच्या ( ओमी वैद्य ) संवादातून… परित्यक्त्या मातेस तिच्या नवऱ्याच्या निधनाची दुःखद वार्ता कळते व इच्छापत्र विषयी कळते. इच्छापत्राचे ऐकून समर रेगे (ओमी वैद्य) ह्या कामधंदा नसलेल्या पुत्रास बेगडी पिताप्रेमा उफाळून येत , तो पुण्यात येण्याचे ठरवतो. इच्छापत्रात संपत्ती वाटपाआधी काही अटी असतात यातील मुख्य अट कि ३० दिवसाच्या आत मराठी मुलीशी लग्न केल्यास संपत्तीचा वाटा मिळणार असतो. इच्छापत्र वाचनसमयी सावत्र भावाशी गाठ होते त्याचेही नाव 'समर'च असते. आता हि अट पूर्ण करण्यासाठी घातलेला घाट ह्यावर सारे कथानक बेतलेले आहे. ह्यासाठी त्यास कॅब ड्राइवर 'पार्थ भालेराव ) कशाप्रकारे मदत करतो. या सगळ्या घडामोडीत त्याला अवंती पेडणेकर ( संस्कृती बालगुडे) भेटते. अवंती पेडणेकर हि मोठ्या मराठी उद्योजकांची पुत्री आहे. ह्या मराठी उद्योजकाचे पात्र उदय टिकेकर यांनी चांगले वठवले आहे . किशोरी शहाणे यांची छोटेखानी भूमिका आहे . समरचे आजी आजोबांचे पात्र विद्याधर जोशी नि आला भाटे यांनी रंगवले आहे . दोघांनी भूमिकेस उत्तम न्याय दिला आहे . पार्थ चा हि अभिनय उत्तम . संस्कृती ने अविवाहित तरुणीची भूमिका चांगली वठवली आहे . अपवाद फक्त ओमी वैद्यचा !!! याच पठडीतील अभिनय ३ इडिअट्समधल्या चतुर च्या भूमिकेत पाहिला असल्याने नावीन्य वाटत नाही . या चित्रपटात फक्त हिंदी ऐवजी तो मराठी भाषेवर अत्याचार करतो. मुलगी पाहतानाचे वा मराठी भाषा शिकतांनाचे अनेक प्रसंग उत्तम विनोदी झाले आहेत . कडबोळी ओळ्खतानाचा प्रसंग व विवाह मंडळातील अनेक प्रसंग चांगले चित्रित झाले आहे .
कथेत जोर नसला तरी लांबी कमी आसल्याकारणाने चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. संपादन उत्तम . गाणी ठीकठाक, नृत्यास विशेष वाव नाही . चित्रपट हा मुख्य भूमिका असलेल्या अभिनेत्यामुळे नव्हे तर सहाय्यक अभिनेत्यांनी तरुन नेला आहे . शेवटी सत्यमेव जयते , पैश्यापेक्षा नाती महत्त्वाची हा संदेश देऊन चित्रपट संपतो.
चित्रपट गृहात जातांना माफक अपेक्षा नि बाहेर पडताना डोक्याची मंडई झाली नसेल , तर चित्रपट बरा असतो. डोक्याला ताण न देता निखळ मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे .

मानांकन - बरा

कलाप्रकटनसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Jan 2024 - 3:24 pm | विजुभाऊ

नव्या बाटलीत जुनी दारू हे माहीत होते.
पण हे वरचे सगळॅ वाचून जुन्या बाटलीत जुनीत दारू असे वाटायला लागले.
जुनी अगदी शम्मी कपूरच्या काळातली कथा. कित्येक चित्रपटातून आलेली आहे. ( मूळ कथा मार्क ट्वेन ची असावी )
बरे झाले तुम्ही परिचय दिलात ते. म्हणजे आता हा सिनेमा चुकून पहाण्यात यायची शक्यता ही सम्पली

मुक्त विहारि's picture

22 Jan 2024 - 3:46 pm | मुक्त विहारि

धन्यवाद