करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
4 Mar 2020 - 6:55 pm

करोना विषाणू
हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.

COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे.
यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात.

बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात.

१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.

गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो.

रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो.
यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे.
आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे.

अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.

बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे.

करोना विषाणू पासून आपला बचाव--
१) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे
२) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे
३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे

आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे.

हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे.

आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे.

चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात

अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल

सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती .
स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती
इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती
तर
करोना मध्ये हि १-२ % आहे

मग आज इतकी भीती का पसरली आहे ?
सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे.

भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते.

वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे.

हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे.
त्यात माझे कर्तृत्व काही नाही.

पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.

लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

4 Mar 2020 - 7:21 pm | माहितगार

विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.

हि मह्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात किमान उन्हाळ्यात प्रसार कमी राहील असे म्हणता येईल का पण
१) एकदा शरीरात आल्या नंतर बाह्य तापमानाचे नेमके काय + - परिणाम असतील,
२) वीषाणू बाधीत व्यक्तींचे रात्रीचे प्रवास (खासकरून विमान प्रवास) आणि त्यांनी रात्रीच्या प्रवासानंतर आजारी नातेवाईकांना भेटण्याचे टाळावे का ?
३) पावसाळा आणि हिवाळा या काळात महाराष्ट्रा सारख्या प्रदेशात अंशतः प्रसार होऊ शकत असावा असे दिसते.

* विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न हा एक शंका धागा मागच्या महिन्यात काढला होता त्यात आपल्या या लेखाचा दुवा जोडला आहे.

स्मिता.'s picture

4 Mar 2020 - 10:10 pm | स्मिता.

२) वीषाणू बाधीत व्यक्तींचे रात्रीचे प्रवास (खासकरून विमान प्रवास) आणि त्यांनी रात्रीच्या प्रवासानंतर आजारी नातेवाईकांना भेटण्याचे टाळावे का ?
-> नक्कीच! विषाणू बाधीत लोकांना self isolation करण्याचा म्हणजेच स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचा सल्ला सर्व आरोग्य तज्ञांकडून दिला जातोय.

फक्त तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रतेचा खूप परिणाम होतो. थंड आणि कोरड्या हवेत हा विषाणू जास्त काळ जिवंत राहू शकतो. पाश्चात्य देशात ऑक्टोबर ते मार्च (डिसेंबर आणि फेब्रुवारी महिने सर्वात जास्त) हा म्हणून फ्लू-सिझन समजला जातो. भारतासाठी पाऊस पडून गेल्यावर हवा थंड आणि कोरडी असू शकते, त्या वेळी या विषाणूचा प्रसार जास्त होऊ शकतो.

http://sitn.hms.harvard.edu/flash/2014/the-reason-for-the-season-why-flu...

शशिकांत ओक's picture

22 Mar 2020 - 11:49 am | शशिकांत ओक

आजच्या दिवसाचे महत्व जाणून मिपावरील जागृत शीर्षक पाहून आणि वाचून समाधान वाचले...

याच लेखाची कधीपासून वाट पहात होतो.
आता सगळ्या शंका दूर झाल्या.
धन्यवाद डॉ साहेब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2020 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभार...!!!

-दिलीप बिरुटे

उत्तम माहितीपूर्ण उपयोगी लेख. प्रसारित करण्यासारखा.

सध्याच्या वातावरणात योग्य लेख.
उत्तम माहिती.

उगा काहितरीच's picture

4 Mar 2020 - 8:41 pm | उगा काहितरीच

धन्यवाद !!!

यातील काही कारणे माहित होती, त्यामुळे थोडा निवांत होतो. आता काही assumptions ना पुष्टी मिळाली.

करोना व्हायरस्च्या भितीमुळे माझ्या काही मैत्रिणी पोहायचा क्लास बंद करायचा म्हणत आहेत. इनडोअर पुल आहे आणि तिथले तापमान कायम २५ डिग्री सेल्सियस च्या वरती ठेवतात. तर आपला सल्ला काय आहे?

सुबोध खरे's picture

4 Mar 2020 - 9:02 pm | सुबोध खरे

पोहायचे तलावात क्लोरीन असते त्यामुळे तेथे विषाणू वाढण्याची शक्यता फारशी नाहीच.

त्यातून आपल्या शहरात या रोगाचा एक तरी रुग्ण आढळला आहे का? तसे नसेल तर आपल्याला हा रोग होण्याची शक्यता किती?

शा वि कु's picture

4 Mar 2020 - 9:11 pm | शा वि कु

धन्यवाद.

चौकटराजा's picture

4 Mar 2020 - 9:26 pm | चौकटराजा

आज असे वाचनात आले की थुंकी जर काही कारणाने वाळली नाही तर हां विषाणु १७ दिवस पर्यंत घातक अवस्थेत राहू शकतो ! अर्थात अशी शक्यता उष्ण प्रदेशात ख़ास करून जिथे आता उन्हाळा येऊ घातला आहे तिथे अशक्यच आहे !

रीत सरकार केंद्र सरकार नी जाणकार लोकांची समिती बनवून त्या द्वारे व्हायरस विषयी खरी सत्य माहिती जनतेला दिली पाहिजे.
त्या मध्ये कशी काळजी घ्यावी,उपचार काय आहेत,कशा मुळे रोग पसरतो ही माहिती हवी .
ज्या देशात हा रोग पसरला आहे त्या देशातील (भारतीय किंवा विदेशी)नागरिकांना देशात सरळ प्रवेश देवू नये.
विमान सुविधा बंद करावी.
मीडिया उथळ माहिती देवून लोकांमध्ये गोंधळ उडवून देत आहे.
तेव्हा अशी माहिती प्रसारित करण्यास सक्त मनाई करावी.
फक्त सरकारी यंत्रणाच माहिती देईल .

उष्णतेचा करोना व्हायरसवर कसा परिणाम होतो हे अजून सिद्ध झालेला नसावे.

हा दुवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या School of Public Health चा आहे - https://ccdd.hsph.harvard.edu/will-covid-19-go-away-on-its-own-in-warmer...

हा Centers for Disease Control and Prevention वरुनः
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/faq.html
Will warm weather stop the outbreak of COVID-19?
- It is not yet known whether weather and temperature impact the spread of COVID-19. Some other viruses, like the common cold and flu, spread more during cold weather months but that does not mean it is impossible to become sick with these viruses during other months. At this time, it is not known whether the spread of COVID-19 will decrease when weather becomes warmer. There is much more to learn about the transmissibility, severity, and other features associated with COVID-19 and investigations are ongoing.

ह्याव्यतिरिक्त
https://time.com/5790880/coronavirus-warm-weather-summer/
https://www.snopes.com/fact-check/coronavirus-warm-weather/
https://www.npr.org/sections/goatsandsoda/2020/02/12/805256402/can-coron...

मला WHOच्या वेबसाईटवर याविषयि काही महिती मिळाली नाही. जर लिन्क असेल तर इथे देउ शकाल का?

कंजूस's picture

4 Mar 2020 - 10:13 pm | कंजूस

नेमकं.
आता चानेलवाले मुंबईत इथे आणि तिथे दुकानंत वायरससाठीचे (अटकवण्याचे) फडके ,मास्क मिळत नाहीत हे सांगतात म्हणजे काही लोक धडपड करून ते मिळवणारच.

जालिम लोशन's picture

4 Mar 2020 - 11:04 pm | जालिम लोशन

ऊत्तम माहिती.

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.>>>>

डॉ. खरे सर, माणसाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सियस असते तर हा विषाणू शरीराच्या आत प्रवेश केल्यावर जिवंत कसा राहतो?

सुबोध खरे's picture

5 Mar 2020 - 12:31 am | सुबोध खरे

थोडी चूक झाली.क्षमस्व
विषाणू शरीराच्या बाहेर फारसा टिकू शकत नाही असे हवे होते.
विषाणू शरीरात पेशींच्या आत राहतो आणि वाढतो
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

चामुंडराय's picture

5 Mar 2020 - 2:57 am | चामुंडराय

माहिती बद्दल धन्यवाद.
चूक दाखवण्याचा हेतू नव्हता मात्र शंका होती.

इराण मध्ये देखील हा व्हायरस पसरतोय. तिकडे तर तापमान जास्त असते, मग तिथे देखील हा व्हायरस कसा काय पसरतोय???

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Mar 2020 - 8:45 am | अनिरुद्ध.वैद्य

इराण थंडच असतो.

शा वि कु's picture

5 Mar 2020 - 9:35 am | शा वि कु

त्यामुळे इराण चे सरासरी तापमान 9 अंश सेल्सियस असते ही नवीन माहिती कळली.

बाप्पू's picture

5 Mar 2020 - 11:57 am | बाप्पू

मला हि नवीन माहिती कळली. .
आजपर्यंत इराण म्हणले कि वाळवंट आणि उन डोळ्यासमोर यायचे.

सुबोध खरे's picture

5 Mar 2020 - 12:40 am | सुबोध खरे

The report says that regular coronavirus which is one of the causes of common cold survives 30 times longer in places with temperature of 6 degree Celsius as compared to places with temperature of 20 degree Celsius and high humidity. Similarly, a report in the peer-reviewed medical publication Journal of Hospital Infection, points out that human coronavirus can remain potent on inanimate surfaces at room temperature for up to 9 days but if the temperature is more than 30 degree Celsius then the duration of its potency remains shorter.

चौकस२१२'s picture

5 Mar 2020 - 4:53 am | चौकस२१२

सर्वसाधारण इन्फ्लुएझा आणि याची लक्षणे जर सारखी असतील तर ओळखायचे कसे?

चौकटराजा's picture

9 Mar 2020 - 1:11 pm | चौकटराजा

असे सांगण्यात येते की कोणतीही अशी भयानक विषाणूजन्य आजाराची साथ असेल तर त्यात " ताप' हे लक्षण समान असते. सबब 98.4फॅ च्या पुढे तापमान गेले रे गेले की तीन दिवस क जीवनसत्व युक्त फळे व फळांचे रस ,तापवून गार केलेले भरपूर पाणी याचा आहर घेतला की विषाणू हवालदिल होतात. बाकी रूमालाचा वापर , हात धूणे ,तोंडात नाकात बोटे न घालणे हे सक्तीचे असतेच ! यात साथ असलेला आजार सामील असेल वा नसेल तरीही !

रागो's picture

5 Mar 2020 - 8:33 am | रागो

माहितीपूर्ण लेख. आभार !!

सर्व आधुनिक साधनं सामुग्री असताना.
आधुनिक विज्ञान सेवेला हजर असताना.
ब्रह्मांड कवेत घेण्याची ताकत असलेल्या माणसाला एका विषाणू समोर हतबल होताना बघून दुःख होत आहे.
परत मलेरिया, पटकी च्या साथीच्या रोगांनी माजवलेला हाहाकार डोळ्या समोर येतो.

चौकटराजा's picture

5 Mar 2020 - 9:44 am | चौकटराजा

मानवाला ज्ञान असले तरी मानवी शरीराची उत्क्रांत व क्रांत होण्याची ताकद फार कमी आहे. सबब मानवापेक्शा परिसरानुसार स्वत:त बदल जीवाणू व त्यापेक्शा ही विषाणू जास्त त्वरेने करू शकतात .मला वाटते जितकी रचना साधी तितकी क्रांत होण्याची ताकद जास्त . विषाणू हे फक्त एक साधे " जेनेटिक " युनिट " असल्याने असे होत असावे !

इन्फ्लुएंझा किंवा सर्दी सारखे असंख्य विषाणू पृथ्वीच्या वातावरणात जीवित आणि मृत यांच्या सीमारेषेवर आहेत. जसे माणसात आणि इतर प्राण्यात उत्परिवर्तन( mutation) होते तसे विषाणूमध्ये सुद्धा होते. असे हजारो (किंवा लाखो) विषाणू जे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाहीत असे पृथ्वीवर असतील. त्यांच्यामुळे आपल्याला साथीचे आजार होण्याची शक्यता कायम असेलच.
अशा साथी पसरल्या तरी त्यातून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी कमीत कमी असेल हे पाहण्याचा जागतिक तज्ज्ञांचा हेतू असतो.
१९१८ मध्ये जगभर पसरलेल्या इन्फ्लुएंझाच्या साथी मध्ये जगातील एक चतुर्थांशापेक्षा जास्त लोकसंख्येला (१८०-१९० कोटी) प्रादुर्भाव झाला होता. आणि यात दीड ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस कुपोषण, अनारोग्य, अस्वच्छता आणि अतिशय गर्दी या कारणांमुळे होणाऱ्या जिवाणूप्रादुर्भावाने लोकांचा मृत्यू झाला होता असे संशोधन दाखवते.
https://en.wikipedia.org/wiki/Spanish_flu
त्यामुळे आता हि सर्व करणे नाहीशी करून जीवितहानी आणि वित्तहानी कमी कशी होईल याकडे तज्ज्ञ लक्ष देत आहेत.
यासाठीच आरोग्याबद्दल जास्तीत जास्त माहितीचा जनतेत प्रसार करून हि हानी कमी कशी करता येईल याकडे सर्व सरकारांचा कल आहे.

श्वेता२४'s picture

5 Mar 2020 - 11:00 am | श्वेता२४

अत्यंत उपयुक्त धागा. धन्यवाद डॉक्टर

फुटूवाला's picture

5 Mar 2020 - 12:15 pm | फुटूवाला

माहितीसाठी धन्यवाद डॉक्टर!!

तुषार काळभोर's picture

5 Mar 2020 - 1:23 pm | तुषार काळभोर

सोशल मीडियावर "वायरल" करायला पाहिजे हा लेख!

मदनबाण's picture

5 Mar 2020 - 1:47 pm | मदनबाण

करोना मध्ये हि १-२ % आहे
WHO Says The Coronavirus Global Death Rate Is 3.4%, Higher Than Earlier Figures

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Bank unions announce strike on March 27 to oppose bank mergers

मराठी कथालेखक's picture

5 Mar 2020 - 4:46 pm | मराठी कथालेखक

१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.

आता मृत्यु दर काहीसा कमी झाला स्थिरावला आहे, पण तरी तो ३.४ % आहे असे WHO चे म्हणणे आहे.
शिवाय सुरवातीचे काही दिवस मृत्यु दर जास्त का होता ?
https://www.worldometers.info/coronavirus/coronavirus-cases/#case-outcome
या विषाणूचे नेमके सत्य काय आहे ? हा मानवनिर्मित आहे का ? हा पसरवणे एखाद्या कारस्थानाचा भाग असेल का ?

सुबोध खरे's picture

5 Mar 2020 - 7:20 pm | सुबोध खरे

होय,
सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्याच साईट वर हा मृत्यू दर कमी होता( १-२ %).
नंतर काल हाच दर ३.४% आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
जशी जास्त माहिती उपलब्ध होते तसे ते आपली साईट अपडेट करत राहतात. त्यामुळे हि आकडेवारी बदलत राहते.

https://www.reddit.com/r/China_Flu/comments/fbt49e/the_who_sent_25_inter...

वरील दुव्यातील महत्त्वाच्या गोष्टी (
When a cluster of several infected people occurred in China, it was most often (78-85%) caused by an infection within the family by droplets and other carriers of infection in close contact with an infected person.
यासाठी हात आणि चेहरा धुणे आणि खोकताना शिंकताना रूमालाने तोंड झाकणे आवश्यक आहे
Transmission by fine aerosols in the air over long distances is not one of the main causes of spread.
म्हणजेच केवळ गर्दीच्या ठिकाणी गेलात तर तेथील लोकांच्या उच्छवासामुळे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता फारच कमी आहे.
If you have direct personal contact with an infected person, the probability of infection is between 1% and 5%.
Pre-existing conditions: The fatality rate for those infected with pre-existing cardiovascular disease in China was 13.2%. It was 9.2% for those infected with high blood sugar levels (uncontrolled diabetes), 8.4% for high blood pressure, 8% for chronic respiratory diseases and 7.6% for cancer.
Infected persons without a relevant previous illness died in 1.4% of cases.
Age: The younger you are, the less likely you are to be infected and the less likely you are to fall seriously ill if you do get infected:
Age % of population % of infected Fatality
0-9 12.0% 0,9% 0 as of now
10-19 11.6% 1.2% 0.1%
20-29 13.5% 8.1% 0.2%
30-39 15.6% 17.0% 0.2%
40-49 15.6% 19.2% 0.4%
50-59 15.0% 22.4% 1.3%
60-69 10.4% 19.2% 3.6%
70-79 4.7% 8.8% 8.0%
80+ 1.8% 3.2% 14.8%
आपण निरोगी असाल आणि आपले वय ६० पेक्षा कमी असेल तर आपली मरण्याची शक्यता १ % पेक्षा कमी आहे.

पाषाणभेद's picture

6 Mar 2020 - 12:21 am | पाषाणभेद

माहितीपूर्ण धागा.

मित्रहो's picture

6 Mar 2020 - 2:13 pm | मित्रहो

फार महत्वाचा धागा.
हैदराबाद मधे एक केस पॉझिटिव्ह आल्यावर प्रचंड भितीचे वातावरण होते. दोन केस सुरवातीला जरी सारी लक्षणे तीच असली आणि इटलीच्या प्रवासाच संदर्भ असला तरी शेवटी निगेटिव्ह आली. ज्याने कुठेतरी विश्वास आला. तसेच राजस्थान मधे ज्या इटालियन जोडप्याच्या संपर्कात २४७ व्यक्ती आल्या होत्या त्यातल्या २३९ निगेटिव्ह आल्या, आठ केसचा रिपोर्ट यायचा आहे. कुठेतरी विश्वास वाटतो की आपल्या इथे तितका सहज पसरत नाही आहे. कुठेतरी गरम वातावरणाचा परिणाम होत आहे हे जाणवत आहे. असे असले तरी हैदराबादची केस दुबईच्या प्रवासाशी संबंधित होती. तिथे वातावरण तितके थंड नाही त्यामुळे भिती ही आहेच.
सध्यातरी या व्हायरसचा प्रसार अति थंड प्रदेशात जास्त आहे. काही डॉक्टरांचे मत आहे की भारतातल्या वाढत्या न्यूमोनियाच्या केसचा अभ्यास करायला हवा. त्याचा कुठे संबंध आहे का?

मास्क हे रोगापासून बचाव करण्यासाठी आहेत की रोगाचा प्रसार होवू नये म्हणून आहेत..
व्हायरस हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असल्यामुळे मास्क मधून श्वास द्वारे शरीरात जाण्यापासून मास्क प्रतिबंध करू शकतील हा ह्याची शंका आहे..
मास्क ची गाळणी व्हायरस वेगळा करू शकेल का?
मला वाटतं मास्क हे बाधित व्यक्ती साठी असावेत जेणेकरून व्हायरस चा प्रसार कमी प्रमाणात होईल.

उपयुक्त आणि आश्वासक धागा. धन्यवाद डॉक!

Jayant Naik's picture

6 Mar 2020 - 9:58 pm | Jayant Naik

या विषयावर असलेला गैरसमज घालवून यौग्य माहिती दिल्याबद्दल अतिशय आभार.

केंट's picture

7 Mar 2020 - 12:45 pm | केंट

सर , कोरोना वायरस सम्बन्धित बातमी बीबीसी वर वाचतान , काही मुद्दे अधोरेखित केलेत .

Coronavirus: Is India prepared for an outbreak?
https://www.bbc.com/news/world-asia-india-51747932

१. The quality of its public health system is vastly uneven. Existing hospitals can be easily overwhelmed by a sudden spike in admissions. It is not clear whether there are ample supplies of masks, gloves, gowns, drugs and ventilators. Virologist Jacob John says India will struggle to handle an outbreak.

२. There are also concerns about the country's scanty healthcare data: India has a shoddy record in even recording deaths and disease - only 77% of deaths are registered, and doctors are more likely to get the cause of death wrong than right, according to a study the Toronto-based Centre for Global Research. There's patchy data for flu-related deaths.

३. That means many people who test negative at air and seaports may be carrying the infection into India's teeming cities and villages. "Airport entry screening is good and should be continued, but that's not going to be sufficient now. We have to put in place other surveillance mechanisms through systems India already has," Soumya Swaminathan, chief scientist at the WHO, says.

मित्रहो's picture

7 Mar 2020 - 8:05 pm | मित्रहो

आज परत एक केस आली ज्यात ओमानला प्रवास होता. तिथे गरम वातावरण आहे. थायलंडची केस आहे. इथल्या गरम वातावरणात विषाणू टिकाव धरू शकतो तेव्हा आपण किती सुरक्षित आहोत

रघुनाथ.केरकर's picture

7 Mar 2020 - 8:12 pm | रघुनाथ.केरकर

धन्यवाद साहेब. बरिच भिति घलवलि...

अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे).
कोणताही साबण चालतो.
डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही.

बाहेरून घरी किंवा कार्यालयात आल्यावर आपण आपले हात आणि तोंड साबणाने स्वच्छ धुणे आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे या दोन साध्या गोष्टी आपण घरात आणि कार्यालयात लागू केल्या तर या साथीला आळा घालण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी होऊ.

सुबोध खरे's picture

8 Mar 2020 - 1:02 am | सुबोध खरे

advice-for-public/when-and-how-to-use-masks

If you are healthy, you only need to wear a mask if you are taking care of a person with suspected 2019-nCoV infection.
Wear a mask if you are coughing or sneezing.
Masks are effective only when used in combination with frequent hand-cleaning with alcohol-based hand rub or soap and water.
If you wear a mask, then you must know how to use it and dispose of it properly.

Before putting on a mask, clean hands with alcohol-based hand rub or soap and water.
Cover mouth and nose with mask and make sure there are no gaps between your face and the mask.
Avoid touching the mask while using it; if you do, clean your hands with alcohol-based hand rub or soap and water.
Replace the mask with a new one as soon as it is damp and do not re-use single-use masks.
To remove the mask: remove it from behind (do not touch the front of mask); discard immediately in a closed bin; clean hands with alcohol-based hand rub or soap and water.

https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-f...

सुबोध खरे's picture

8 Mar 2020 - 1:03 am | सुबोध खरे

Should I wear a mask to protect myself?
Only wear a mask if you are ill with COVID-19 symptoms (especially coughing) or looking after someone who may have COVID-19. Disposable face mask can only be used once. If you are not ill or looking after someone who is ill then you are wasting a mask. There is a world-wide shortage of masks, so WHO urges people to use masks wisely.

https://www.who.int/news-room/q-a-detail/q-a-coronaviruses

सुबोध खरे's picture

8 Mar 2020 - 1:04 am | सुबोध खरे

साधा सर्जिकल मुखवटा तोंडाला लावण्याचा मुखवटा आपल्याला कोरोना विषाणूपासून संरक्षण देणार नाही. हे मुखवटे सर्जनच्या नाकातोंडातील जंतू(जिवाणू) शल्यक्रिया करताना रुग्णापर्यंत पोहोचू नयेत म्हणून असतात.

हा मुखवटा ज्याला रोग झाला आहे त्याने वापरणे आवश्यक आहे कारण त्याच्या खोकण्या किंवा शिकण्यातून जे सूक्ष्म थेम्ब बाहेर टाकले जातात (ज्यातून या विषाणूचा प्रसार होतो) ते या मुखवट्यामुळे अडकून राहतील.

आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे N ९५ हे मुखवटे हे एक तर सूक्ष्म छिद्रांचे असतात याशिवाय ते आपल्या नाका तोंडाभोवती एकदम फिट बसतात. त्यामुळे त्याच्या बाजूने विषाणूंचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय हे आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या अतिशय जवळ काम करत असतात जेंव्हा तो रुग्ण खोकला किंवा शिंकला तर हे विषाणू त्याला संसर्ग करू शकतात.

परंतु N ९५हे मुखवटे वापरणे फार कटकटीचे आहे आणि त्यातून श्वास घेण्यास बऱ्यापैकी त्रास होतो. त्यामुळे ते केवळ आरोग्य कर्मचारी ज्यांना तो कसा वापरायचा हे प्रशिक्षण दिलेले आहे त्यांनी वापरावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

https://www.livescience.com/face-mask-new-coronavirus.html

मुक्त विहारि's picture

8 Mar 2020 - 8:09 am | मुक्त विहारि

धन्यवाद

तुर्रमखान's picture

8 Mar 2020 - 6:42 pm | तुर्रमखान

अगदी वेळेत विश्वसनीय माणसाकडून आलेली माहिती. _/\_

असंका's picture

8 Mar 2020 - 7:15 pm | असंका

डॉक्टर साहेब...धन्यवाद!

अधिक माहिति साठि वरिल लिन्क क्लिक करा

सुबोध खरे's picture

9 Mar 2020 - 12:07 pm | सुबोध खरे

Earlier in the outbreak, U.S. health officials said there was a hypothesis among mathematical modelers that the outbreak “could potentially be seasonal” and relent in warmer conditions.
“We hope it does. That would be a godsend,” said WHO’s Dr. Mike Ryan. “But we can’t make that assumption. And there is no evidence.”
Other viral respiratory diseases are seasonal, including influenza and therefore in many viral respiratory diseases we do see a decrease in disease in spring and summer,” Dr. Nancy Messonnier, director of the CDC’s National Center for Immunization and Respiratory Diseases, said on a Feb. 25 conference call. “And so we can certainly be optimistic that this disease will follow suit.”

https://www.msn.com/en-us/health/health-news/its-a-false-hope-coronaviru...

Angela Rasmussen, a virologist who serves on the faculty at the Center for Infection and Immunity at Columbia University’s school of public health.
https://www.rollingstone.com/politics/politics-news/containment-failed-c...

सुबोध खरे's picture

9 Mar 2020 - 12:08 pm | सुबोध खरे

जगात अब्जावधी विषाणू आहेत त्याना जगण्यासाठी दुसऱ्या जीवाची गरज पडते. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या पेशीमध्ये घुसून आपले पुनरुत्पादन करत असतात.
याला विरोध म्हणून ते सजीवसुद्धा आपल्या शरीरात प्रतिजैविके (antibodies) आणि इंटर फेरोन्स तयार करत असतात ज्यामुळे शरीरात शिरलेल्या विषाणूंना निष्प्रभ करता येते.
एकदा एका विष्णुविरुद्ध प्रतिजैविके तयार झाली की सहसा तो विषाणू परत त्या सजीवाच्या शरीरात घुसू शकत नाही.
हा चोर पोलिसांचा खेळ सजीवांच्या आयुष्यभर चालूच असतो. दरवेळेस आपल्याला नव्या विषाणूमुळे रोग होतो. जर आपली प्रतिकार शक्ती कोणत्याही कारणामुळे कमी झाली तर ही प्रतिजैविक तयार करण्याची प्रक्रिया मंद होते. उदा केमोथेरपी, एड्स, वार्धक्य, मधुमेह हृदयविकार यामुळे या लोकांना होणारे विषाणूजन्य रोग जास्त तीव्र असतात.
नैसर्गिक प्रक्रियेने विषाणूंच्या शरीरात उत्परिवर्तन(mutation) होते. हे उत्परीवर्तन मूळ विष्णुपासून वेगळे असेल तर पूर्वीच्या प्रतिजैविकांचा त्यावर परिणाम होत नाही आणि मग त्या सजीवाला त्या विषाणू मुळे रोग होतो. हे उत्परीवर्तन जर थोडेसेच असले तर तुला सजीवांमध्ये आंशिक(partial) प्रतिकारशक्ती असते त्यामुळे होणारा रोग हा तेवढा तीव्र नसतो.
तसेच त्या गटातील दुसऱ्या विषाणूमुळे रोग झाला असेल तर काही प्रमाणात प्रतिकारशक्ती असते(cross immunity).
ज्या माणसांचा पूर्वी कोरोना विषाणूशी संबंध आला असेल त्याच्या शरीरात अशी आंशिक प्रतिकारशक्ती तयार झालेली असू शकते त्यामुळे बहुसंख्य विषाणू तज्ज्ञांचे असे मत आहे की प्रत्येक माणसाला होणारा रोग हा तितकाच तीव्र नसतो.
काही विषाणू तज्ज्ञांचे मत असे आहे की 40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही.
जसे एखादा गट धबधब्यात भिजतो त्यापैकी 2-4 लोकांनाच सर्दी होते बाकीच्यांना होत नाही.
यामुळे त्या तज्ज्ञांचे मत असे आहे की जागतिक आरोग्य संघटना जो मृत्युदर सध्या सांगते आहे त्यापेक्षा तो बराच कमी असू शकतो.
जे रूग्ण शरीरात थोडीशी कणकण आहे किंवा थोडासा खोकला किंवा सर्दी आहे आणि आपोआप बरे झाले आहेत त्यांची तपासणी होणारच नाही.
ज्यांना रोग बरुयापैकी होतो तेवढ्यांचीच तपासणी होईल आणि त्यांचा मृत्युदर जास्त आढळेल.

चौकटराजा's picture

9 Mar 2020 - 12:56 pm | चौकटराजा

अ‍ॅन्टी बॉडी व अ‍ॅन्टी बायोटिक वेगळे विषय आहेत ना ? माझ्या महितीप्रमाणे अ‍ॅन्टी बॉडी ला प्रतिपिंड हा शब्द वापरतात !

सुबोध खरे's picture

11 Mar 2020 - 12:11 am | सुबोध खरे

आपले म्हणणे बरोबर आहे.
प्रतिपिंड हाच शब्द बरोबर आहे.
चुकीबद्दल क्षमस्व

चौकटराजा's picture

9 Mar 2020 - 1:01 pm | चौकटराजा

की 40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही.काही विषाणू तज्ज्ञांचे मत असे आहे मागे स्वाईन फ्लू ची साथ आली असताना ती गेल्यावर उत्सुकता म्हणून आमच्या डॉ नी स्वत: ची टेस्ट करून घेतली होती तेम्व्हा त्याना असे आढलून आले की त्याना होस्पिटल बॉर्न स्वाईन फ्लू लक्शणाशिवाय होउन गेला होता.

गोंधळी's picture

9 Mar 2020 - 1:27 pm | गोंधळी

40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही. हे ही एक कारण असावे हा रोग पसरण्यामागचे. या विषाणुंमध्ये दोन प्रकार आहेत व त्यातला एक प्रकार जास्त आक्रमक आहे अशी ही माहिती समोर आली आहे.

भीमराव's picture

11 Mar 2020 - 11:56 am | भीमराव

करोना चा आता पर्यंत कोणी healthy carrier सापडलाय का?
काविळ च्या healthy carrier बद्दल वाचलेलं इथंच. तसा करोना चा पण निघाला तर अवघड आहे. कारण आजारी पडेल तो दवाखाना गाठणार, पण जो विषाणू घेऊन निरोगी फिरत असेल तो सगळ्यांना आजारी पाडणार

हँड सॅनिटायझर च्या किमती अफाट वाढवून काळा बाजार होत असल्यास आपण कोणतेही स्वस्त आफ्टर शेव्ह लोशन वापरू शकता.

कोरोना विषाणूच्या बाहेर सूर्याच्या पृष्ठभागावर असतो तसा चरबीचा मुकुट असतो या मुळे त्याचे नाव कोरोना विषाणू असे ठेवले आहे.

साबण (आणि पाणी) किंवा अल्कोहोल वापरल्यामुळे हा बाहेरचा चरबीचा मुकुट विरघळतो आणि विषाणू हतप्रभ होतो आणि धुतला जातो.
यास्तव आपण जास्तीत जास्त वेळेस साबण आणि पाण्याने हात धुणे आवश्यक आहे.

याच कारणासाठी साबण अंगाचा नसेल तर कपड्याचा अगदी निरमा किंवा पतंजलीचा भांडी धुवायचा साबण सुद्धा इमर्जन्सी मध्ये चालेल.

मनो's picture

10 Mar 2020 - 11:49 am | मनो

एक चांगली बातमी -

ही उपाय-योजना COVID-१९ व्हायरसविरुद्ध आत्तापर्यंत तरी लागू पडताना दिसते आहे.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7029759/#!po=0.490196

Dr. Kruse is developing an extremely promising therapeutic, ACE2-fc, which will both neutralize the virus and treat the symptoms of the disease. It has been shown to work in vitro; variants have been tested in animals models; and its been through Phase II human trials for a different indication. A variant of the therapy, soluble ACE2, is being trialed in humans now in China.

या औषधाचे उत्पादन आणि चीनमध्ये काही रोग्यांवर trial सुरू आहे. ते रोगी जर बरे झाले तर या विषाणूविरुद्ध एक उपयोगी औषध सापडेल. आत्तापर्यंतचे निष्कर्ष चांगले आहेत.

अधिक ताजी माहिती इथे - https://mobile.twitter.com/RobertLKruse

दुसरी बातमी -
बिल गेट्स फाउंडेशनने १२५ मिलियन डॉलर प्रभावी औषधाच्या संशोधनासाठी देण्याचे जाहीर केले आहे.

https://www.gatesfoundation.org/TheOptimist/Articles/coronavirus-mark-su...

पिनाक's picture

11 Mar 2020 - 9:01 am | पिनाक

हे इथं तिथं थुंकणारा थुंकसंप्रदाय समाज आहे त्याचं काय?

दिपस्तंभ's picture

11 Mar 2020 - 2:38 pm | दिपस्तंभ

तुमचा हा लेख जवळ जवळ सर्व व्हाट्सएप ग्रुप वर येतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Mar 2020 - 3:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरांच्या नावाने ही माहिती मीही अनेकांना फॉरवर्ड केली आहे.

-दिलीप बिरुटे

लई भारी's picture

13 Mar 2020 - 1:53 pm | लई भारी

सोप्या भाषेत आणि भीती कमी करणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अर्थातच बऱ्याच ग्रुप मध्ये फॉरवर्ड होतोय. अशी नेमकी माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी.

मराठी कथालेखक's picture

15 Mar 2020 - 12:18 am | मराठी कथालेखक

एक whats app forward
---------------------------------------------------------
करोना व्हायरस यांव केल्याने मरेल आणि त्यांव केल्याने जगेल असे सर्वजण बोलत असतात. मात्र करोना व्हायरस किंवा कोणताही व्हायरस कशानेही मरू शकत नाही. कारण व्हायरस हा सजीव नसतोच. व्हायरस हा एक बायो पार्टीकल म्हणजे जैविक कण आहे. जसे शिंपल्यात एक वाळूचा कण गेल्यावर शिंपल्यातलेच मटेरीयल वापरून त्याचा मोती बनतो, तसेच कोणत्याही पेशीत हा व्हायरस नावाचा कण गेला की त्याच्या अनेक कॉपी तयार होतात. व्हॉट्सअप, फेसबुकवरच्या पोस्ट जशा खूप कॉपी पेस्ट होतात ना तसेच. व्हायरस स्वतः प्रजनन करत नाही तर ज्या पेशीत तो गेला आहे ती पेशीच त्याच्या खूप साऱ्या कॉपी तयार करते.
व्हायरस हा एक छोटासा डीएनए किंवा आरएनए असलेला एक कण असतो आणि त्यावर एक प्रोटीनचे संरक्षक आवरण असते. ते प्रोटीनचे आवरण किती मजबूत आहे किंवा व्हायरस ज्या पेशीत जाणार आहे त्या पेशीशी ते किती समर्पक किंवा मिळतेजुळते आहे त्यावरून तो व्हायरस त्या पेशीत संक्रमित होणार की नाही ते ठरते. आपल्या पेशी नेहमी आपल्या डीएनएच्या कॉपी बनवत असतात. तेच मेकॅनिजम वापरून पेशीत गेल्यावर व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए पेशीतील मटेरियल वापरून स्वतःच्या खूप कॉपी बनवतो. ही प्रत्येक कॉपी हा एक नवा व्हायरस कणच असतो. आणि मग पेशीतील मटेरियल संपले की पेशींची वॉल फोडून हे सर्व व्हायरस कण बाहेर येतात आणि शरीरातील इतर पेशींत घुसून त्यांनाही मारतात.
अशा प्रकारे मग अनेक पेशी बाधित झाल्या की मग होस्ट म्हणजे ज्याच्या शरीराच्या पेशींत व्हायरस संक्रमित झाला आहे तो प्राणी मग आजारी होतो. काही व्हायरसचा डीएनए हा होस्टच्या डीएनए सिक्वेन्स मध्ये घुसून त्या प्राण्यातच जेनेटिक चेंज आणू शकतो. हा जेनेटिक चेंज पुढच्या कित्येक पिढ्यांत ट्रान्स्फर होतो. किंबहुना एखादा व्हायरस नेमका कधी अस्तित्वात आला हे प्राण्यांच्या डीएनएतील या बदलावरूनच कळते.
[3/11, 1:02 PM] Nanaso: व्हायरस हा सजीवच नसल्याने मग त्याला कोणत्याही औषधाने वा गोमूत्र वा कापूर वा धुराने किंवा पेस्टीसाईडने मारता येऊ शकत नाही. जो जिंदा ही नही है उसे कैसे मारोगे? मात्र कशानेही त्याचे बाह्य प्रोटीन आवरण नष्ट झाले की व्हायरसही नष्ट होतो. हे हवेमुळे, पाण्यामुळे, साबणामुळे, तापमानामुळे, उन्हामुळे असे कशामुळेही होऊ शकते. होस्टच मिळाला नाही की एखादा व्हायरस जगातूनच नष्ट होऊ शकतो. व्हायरस सजीव नसल्याने तो मरूच शकत नाही. काहीही सांगतो काय रे? जर व्हायरस मरुच शकत नाही तर मग डॉक्टर लोक जी औषधे देतात, करोनाची लस शोधण्यासाठी जी पराकाष्ठा चालू आहे ती कशाला?
व्हायरस वर जी लस असते ती कशी काम करते त्या आधी व्हायरस कसा काम करतो ते पाहू. व्हायरस आधी शरीराच्या पेशींच्या वॉल वर रिसेप्टर्स असतात तिथे बॉण्ड बनवतो आणि तिथे चिकटून राहतो. त्या रिसेप्टर्स मधून मग तो हळूच पेशींच्या आत जातो. आत तो आपल्या डीएनएच्या स्ट्रेण्डचा प्रति डीएनए स्ट्रेण्ड (पट्टी) बनवतो. हे स्ट्रेण्ड मग सेपरेट होऊन अजून स्ट्रेण्ड बनवतात. हा प्रत्येक स्ट्रेण्ड मग एक नवा व्हायरस बनतो. मग या नव्या बनलेल्या व्हायरस कणांची भरपूर संख्या झाली की हे व्हायरस त्या पेशींची वॉल तोडून बाहेर येतात आणि बाजूच्या पेशींच्या रिसेप्टर्स वर जाऊन चिकटतात व त्यांना संक्रमित करतात. लस या सगळ्या स्टेप्स पैकी कोणत्याही एका स्टेपवर व्हायरसला ब्लॉक करते. हे ब्लॉकिंग रिसेप्टर्स वर असू शकते, ज्यात लसीत असे केमिकल्स असतात जे व्हायरसचे रिसेप्टर्सशी बॉंडींग होऊ देत नाहीत, किंवा काही लसी व्हायरसच्या डीएनएला केमिकल्सनी रोखून प्रति डीएनए स्ट्रेण्ड बनवू देत नाहीत, काही लसी व्हायरसला वॉल तोडून बाहेर येऊ देत नाहीत. काही लसी व्हायरसचा डीएनएच डॅमेज करून टाकतात आणि मग तो कॉपी होत नाही वगैरे.
आताचा करोना कोविड-19 हा नवा व्हायरस आहे, त्याचे नेमके प्रोटीन्स आणि रिसेप्टर्सचे बॉण्ड कसे असतात, तो नेमका कोणकोणत्या मेकॅनीजमने शरीरात जातो, किंवा नेमका तो कोणत्या केमिकल्सनी डीएनए रेप्लिकेट बनवतोय तेच अजून कळत नाहीय. ते कळल्यावर मग कोणते केमिकल्स त्याच्या कोणत्या स्टेपला रोखू शकतील हे शोधायलाही वेळ लागेल. म्हणून त्याची लस लवकर बनत नाहीय.

व्हायरस हे सहसा प्राण्यांतून माणसांत येतात. व्हायरस हे मुख्यत्वे होस्ट स्पेसिफिक असतात. त्यामुळे एका प्रजातीच्या प्राण्याला लागण झालेल्या व्हायरसची दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याला किंवा माणसाला लागण होईलच असे नाही. मात्र एका प्रजातीत असताना व्हायरसच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आणि हा बदल एखाद्या दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याच्या शरीराशी संलग्न होण्यास योग्य असेल तर मात्र हा व्हायरस दुसऱ्या प्राण्यात संक्रमित होऊ शकतो. आताच्या कोविड-19 चे साधर्म्य वटवाघळे आणि खवल्या मांजरात असणाऱ्या करोना व्हायरसशी आढळले आहे. व्हायरस तयार करण्याइतकी टेक्नॉलॉजी अद्याप विकसित झालेली नाही त्यामुळे चीनने हा व्हायरस तयार केला असेल हे खरे नाही. बाकी तो लॅब मधून चुकून बाहेर गेला असू शकतो परंतु तीही शक्यता कमी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा व्हायरस जेनेटिक बदल होऊन वटवाघूळांतून खवल्या मांजरांत गेला आणि खवल्या मांजरांतील व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होऊन तो माणसांत आला अशी जास्त शक्यता आहे.
मांस शिजवून खाल्ल्याने व्हायरस सहसा नष्ट होतात हे खरे, कच्च्या मांसालाही गरम पाण्यात टाकून मग धुवावे आणि मग शिजवून खावे. संक्रमित पृष्ठभागास स्पर्श केल्याने काही व्हायरसची लागण होऊ शकते. मात्र नव्या करोनाचे संक्रमण अशा प्रकारे होते का हे अद्याप आपल्याला नेमके माहीत नाही. उन्हाळ्यातील तापमानाने व्हायरसचे प्रोटीन नष्ट होऊन व्हायरस नष्ट होऊ शकतो, मात्र कोविड-19 करोना हा आताच आला असल्याने उन्हाळ्यात तो वाढतो की नष्ट होतो हे आपल्याला सांगता येऊ शकत नाही.
हात चांगल्या सॅनिटायजरने धुतल्याने व्हायरसचे प्रोटीन कवच नष्ट होऊन तो नष्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त कुठेही अनावश्यक स्पर्श न करणे, जो कुणी शिंकत वा खोकत असेल त्याच्यापासून 3 फुट दुर राहणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. करोना हवेतून पसरत नाही, शिंक किंवा खोकल्याच्या तुषारांतून पसरतो म्हणून 3 फूट दूर राहीले पाहीजे. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. आपण स्वतः आजारी असू किंवा आजारी माणसाची सेवा करत असू, वा आजारी माणसाजवळ जात असू तरच मास्क वापरावा असे WHO ने सांगितले आहे. अन्यथा उगीच मास्क वापरू नये. या उपायांनी आपण लागण होण्यापासून वाचू शकतो. करोनाचा mortality रेट हा 3.4% आहे. म्हणजे हा आजार 1000 माणसांना झाला तर त्यातील 34 माणसांचा मृत्यू होऊ शकतो. यातही म्हाताऱ्या माणसांना जास्त रिस्क आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारांत हा रेट 15% आहे. मात्र हा दर अजून कमी होईल असे WHO म्हणते.
SARS या आजाराचा मृत्युदर हा 10% तर MERS चा 34% इतका म्हणजे करोनाच्या दहापट जास्त होता. व्हायरसने होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा एक ढोबळ नियम असा आहे की जो आजार जास्त पसरतो त्याचा मृत्युदर कमी असतो, आणि जो कमी पसरतो त्याचा मृत्युदर जास्त असतो.
स्वच्छता राखणे, लक्षणे दिसणाऱ्या माणसांपासून दूर राहणे, खोकताना व शिंकताना नाक तोंड रुमालाने अथवा हाताच्या कोपराने झाकणे, संक्रमण झालेल्या शहरात न जाणे, संक्रमित माणसाच्या संपर्कात न येणे, जिवंत प्राण्यांस स्पर्श न करणे अशी काळजी घेतली की आपण करोनापासून वाचू शकतो.

चौकटराजा's picture

15 Mar 2020 - 9:46 am | चौकटराजा

वरील नावाच्या पुस्तकात डॉ जॉन डवायेर यांनी अशीच माहिती दिली आहे ! एकेका व्हायरसची एक " लाडकी " पेशी असते व एका पेशीचा एक लाडका पाहुणा एक विशिष्ट व्हायरस असतो .असे त्यांचे प्रतिपादन होते.

सुबोध खरे's picture

16 Mar 2020 - 10:49 am | सुबोध खरे

हे ढकलपत्र बरेचसे योग्य आहे.
परंतु विषाणू हा सजीव आणि निर्जीवतेच्या उंबरठ्यावर असलेला अर्धजीवीत जीव आहे. म्हणजे विषाणूचे स्फटिक बनून वर्षानुवर्षे तसेच राहू शकतात परंतु योग्य पेशींच्या संपर्कात आले तर हेच विषाणू / स्फटिक कार्यरत होऊ शकतात.

परिस्थिती( तापमान आर्द्रता इ) अनुकूल असेल तर विषाणू अशा पेशींच्या पृष्ठभागावर असलेल्या रिसेप्टरच्या मार्फत त्या पेशीच्या आत शिरून आपले पुनरुत्पादन सुरु करतात.

निर्जीवतेचे काही गुणधर्म असलेले पण स्वतः पुनरुत्पादन करू शकणे आणि उत्क्रांत होणे हे सजीवांचे अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म असलेले विषाणू हे निर्जीव नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामुळे विषाणू मारला जाऊ शकत नाही हेही चूक आहे.

covid -१९ विषाणू ५६ अंश तापमानाच्या वर विघटन पावतो आणि पुनरुत्पादन करू शकत नाही तसेच साबण किंवा अल्कोहोल मुळे त्याच्या शरीराच्या पृष्ठभागावर असलेला मुकुट विघटन पावतो, सोडियम हायपोक्लोराइट किंवा ब्लिचिंग पावडरने किंवा क्लोरीन /आयोडीनने त्याच्या मुकुटाचे ऑक्सिडेशन होते आणि विषाणू मृत्यू पावतो.

किल्लेदार's picture

20 Mar 2020 - 5:46 pm | किल्लेदार

फार डोकं खाजवल्यावर ढकलपत्र म्हणजे फॉर्वर्डेड मेसेज असा साक्षात्कार झाला. पण ढकलसंदेश जास्त योग्य वाटेल...
उगा टेन्शन वाढतेय म्हणून ही अवांतर पोस्ट... :D

बोका's picture

15 Mar 2020 - 9:32 am | बोका

घर / सोसायाटी च्या आवारातील दरवाजे / खिडक्यां चे हँडल , टेबल वगैरे स्वच्छ / निर्जंतुक करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईट वापरावे असे ऐकले. हे कसे मिळवावे आणी वापर कसा करावा ?

आजुबाजुच्या दुकानात साधारण तिनशे रु. पाच लिटर मिळते 80% concentration असते. ५% dilute करून वापरावे लागते, carcinogenic आहे, काळजीपुर्वक वापरावे.

सुबोध खरे's picture

16 Mar 2020 - 10:51 am | सुबोध खरे

सोडियम हायपोक्लोराइट मिळत नसेल तर ब्लिचिंग पावडर( हि कॅल्शियम हायपोक्लोराइट आहे) पाण्यात टाका. त्याचा गाळ खाली बसला कि वरचे पाणी घर / सोसायाटी च्या आवारातील दरवाजे / खिडक्यां चे हँडल , टेबल वगैरे स्वच्छ / निर्जंतुक करण्यासाठी वापरता येतील.

मनो's picture

18 Mar 2020 - 9:01 am | मनो

chloroquine आणि zinc या दोन गोष्टींचा चांगला परिणाम आत्तापर्यंत दिसला आहे.

https://youtu.be/U7F1cnWup9M

ऐकीव माहितीनुसार ताप येणे, घसा धरणे, सर्दी होणे, डोके दुखणे, इत्यादि दुखण्यांवर आयबूप्रोफेन ही गोळी टाळावी. करोना + आयबूप्रोफेन यामुळे घातक शारीरिक प्रतिक्रिया होऊ शकते.

या औषधाची भारतातली प्रचलित नावे : Brufen, Combiflam (https://en.wikipedia.org/wiki/Combiflam), Unafen.
या प्रचलित नावांसाठी संदर्भस्रोत : https://en.wikipedia.org/wiki/Ibuprofen_brand_names

इथे भारतातल्या नावांची आजूनेक यादी आहे : http://www.medlineindia.com/musculoskeletal/ibuprofen.htm

ही माहिती पूर्णपणे ऐकीव आहे.

-गा.पै.

आपल्याला होणाऱ्या सर्दी खोकला ताप अंग मोडून येणे अशा फ्ल्यू सारख्या लक्षणांसाठी( ना जाणो हा करोना मुळे असल्यास) आयबुप्रोफेन असलेली औषधे टाळा उदा कॉम्बीफ्लॅम ब्रुफेन इ.
सर्वात सुरक्षित म्हणजे पॅरासेटेमॉल किंवा क्रोसिन.
Avoid ibuprofen for coronavirus symptoms, WHO says
https://www.france24.com/en/20200318-avoid-ibuprofen-for-coronavirus-sym...

गामा पैलवान's picture

18 Mar 2020 - 8:04 pm | गामा पैलवान

सत्वर संदर्भ उपलब्ध करून शंकानिरसन केल्याबद्दल धन्यवाद, खरे डॉक्टर! :-)
आ.न.,
-गा.पै.

चौकटराजा's picture

18 Mar 2020 - 6:03 pm | चौकटराजा

2500 चीनी संक्रमितांची तपासणी केली असत्ता --
Most cases from blood group " A"
least cases from blood group " O" !!!

चौकटराजा's picture

19 Mar 2020 - 2:39 pm | चौकटराजा

काहीच वायरस काहीच पेशीमधे का जावू शकतात ? मानवी देहाचे शत्रु कोण ! सर्व इथे समजेल !

चौकटराजा's picture

19 Mar 2020 - 2:40 pm | चौकटराजा

.

चौकटराजा's picture

19 Mar 2020 - 2:42 pm | चौकटराजा

माहितगार's picture

19 Mar 2020 - 5:44 pm | माहितगार

साऊथ कोरीया पेक्षा इटलीत COVID19 मृतांची टक्केवारी अधिक का? या बद्दल सिएनएन वरील हा उत्तम विश्लेषण लेख जिज्ञासू आणि जाणकारांनी आवार्जून वाचावा.

इटली लोकसंख्येत वृद्धांची संख्या अधिक असणे कारण असू शकेल हे बरोबर मानले तर वृद्धांची टक्केवारी अधिक असलेल्या चीनच्या बाजूस असलेल्या जपानचे नाव मृत्यू टक्केवारीत पुढे का नाही किंवा मला माहित नाही हा प्रश्न मला लेख वाचताना पडला. इटलीती वृद्धांचा प्रवास संपर्क शेक हँड या गोष्टी अधिक आहेत का ? पण इटली विकसीत देश असेल तरी वृद्धांचा प्रवास आणि संपर्क सहसा कमी झालेला असतो मग इटलीती वृद्धांमधून अधिक प्रसार कशामुळे ह्याचे कोडे मला नीटसे उमगले नाही.

याच लेखात वीषाणू टेस्टींग सुविधांची साउथ कोरीयापेक्षा आमेरीकेतही कशी कमतरता आहे याची माहिती आहे. या वरुन आठवले की अशात एन डि टिव्हीवर प्रायव्हेट हॉस्पिटल आणि टेस्टींग चेन असलेल्यां प्रमुखंडळींना तुमच्याकडे (खासगी क्षेत्रात) या टेस्टींग सुविधा का नाहीत ह्या प्रश्नाला त्यांना नीटसे उत्तर देता आले नाही असे दिसले. पेशंट कडून प्रचंड पैसा उकळूनही स्वतःच्या स्वतंत्र टेस्टींग सुविधा खासगी क्षेत्राकडे का नसाव्यात म्हणजे सार्वानिक सेवेवरील ताण तेवढाच कमी राहून सामान्यांच्या टेस्टची संख्या वाढेल? असा एक सहाजिक प्रश्न मनात आला.

त्या सोबत त्याच लेखातील केवळ टेस्टींग नव्हे तर आजारी आणि वृद्ध व्यवस्थापन पद्धती अधिक प्रभावी असण्याची गरज या विश्लेषणाने दाखवून दिली संदर्भ आमेरीकेचा असला तरी मुद्दा भारतीयांनाही तेवढाच लागू पडावा किंवा कसे?

सुबोध खरे's picture

19 Mar 2020 - 7:23 pm | सुबोध खरे

बऱ्याच आयांना आपल्या लहान मुलांची फार काळजी वाटत असते कारण मुले कुठे हात लावतात काय तोंडात घालतात कोणाला जाऊन चिकटतात यावर २४ तास नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. त्यातून आता सुट्ट्या असल्यामुळे मुलं २४ तास घरीच असतात

अशा आयांसाठी खास

लहान बालके आणि करोना

As of today, there have been no known deaths reported in the 0-9-year-old age group and there have been lower hospitalization rates compared with adults. The disease seems to primarily impact older adults and those with underlying health problems
For reasons that nobody fully understands, COVID-19 does not appear to cause severe disease in children. “The first, and most likely scenario, is that children are contracting COVID-19 but are getting a milder version of the disease,” says Thomas Murray, MD, PhD, a Yale Medicine pediatric infectious disease specialist
Keep kids away from people who are sick, especially if they have respiratory symptoms. And if your kids are sick, keep them home. For COVID-19, one of the most important things for containment is to isolate https://medicine.yale.edu/news-article/22996/

एक लक्षात ठेवा मुलांची प्रतिकार शक्ती पहिले 5-6 महिने आईकडून आलेल्या प्रतिपिंडामुळे असते आणि साधारण 8 ते 9 महिने पर्यंत त्यांची स्वतः ची प्रतिकारशक्ती विकसित होते। या मधील कालावधी मध्ये मुलांना बारके बारके आजार जास्त होत असतात. 9 महिन्यानंतर मुलांची प्रतिकारशक्ती बऱ्यापैकी विकास पावलेली असते

त्यामुळे आपल्या मुलाला केवळ आजारी माणसे किंवा आजारी मुले यांच्या पासून लांब ठेवा आणि वारंवार हात धुवायची सवय लावा.

बाकी काळजी करण्याचे कारण अजिबात नाही.

लक्षात ठेवा विषाणूमुळे होणारे आजार बालकांमध्ये नेहमीच सौम्य असतात उदा गोवर कांजिण्या
तर हेच आजार प्रौढांमध्ये जास्त गंभीर असतात.
तेंव्हा आपल्या मुलाबरोबर स्वतःची सुद्धा काळजी घ्या

सुबोध खरे's picture

19 Mar 2020 - 7:26 pm | सुबोध खरे

करोना विषाणू विरुद्ध लस तयार होण्यात इतका उशीर का लागतो आहे?
आधुनिक तंत्रज्ञानाने काही महिन्यात लस का तयार होत नाही?

एखादी लस तयार केली तरी प्रथम तिच्या चाचण्या गिनिपिग, उंदीर, माकडे यांच्या वर कराव्या लागतात.

या प्राण्यांच्या शरीत प्रतिपिंडे(ANTIBODIES) तयार झाली कि ती प्रतिपिंडे खरोखरच रोगप्रतिबंध करतात हे पाहावे लागते.

( HIV / AIDS मध्ये हि प्रतिपिंडे काम करत नाहीत याचमुळे अजूनही HIV / AIDS वर लस निर्माण करण्यात यश मिळालेलं नाही)

मग त्या प्राण्यांना प्रत्यक्ष विषाणूंचा संसर्ग झाल्यावर त्याना रोग होत नाही हे पाहावे लागते.

अशी साखळी संपूर्ण झाली कि लस मानवी स्वयंसेवकांच्या शरीरात चाचणी करावी लागते. लस दिल्यावर त्या स्वयंसेवकांना प्रत्यक्ष विषाणूंच्या संपर्कात आणले जाते.

हे करताना अनेक कायदेशीर बाबी त्या कंपनीला पाळाव्या लागतात कारण चुकून कोणाचा त्या रोगाने मृत्यू झाला तर सदोष मनुष्यवधाचा खटला होऊ शकतो आणि कंपनीची कीर्ती रसातळाला जाऊ शकते.

एवढे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ती लस प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष औषधांच्या दुकानात पोहोचेपर्यंत त्याची परिणामकारकता(POTENCY) राहते कि नाही. किती काळापर्यंत हि लस प्रभावी राहते आणि किती काळानंतर त्याची परिणामकारकता वाजवी पेक्षा कमी होते हे पाहावे लागते.

यानंतर त्या लसीचा दूरगामी परिणाम (LONG TERM EFFECT) काय होतो हे पाहावे लागते.

यानंतर धंद्याचा भाग येतो.

तो म्हणजे यासाठी लागणारी भांडवली गुंतवणूक, त्या लसीचा प्रसार करण्यासाठी विपणनासाठी खर्च किती येतो
एवढे सगळे सोपस्कार केल्यावर त्यातून फायदा किती होणार आणि तोटा किती होणार.

हे सगळ त्रैराशिक जमलं तर लस बाजारात येते

आणि अशा करोना सारख्या इन्फ्लुएंझा गटातील विषाणू दर काही कालावधी मध्ये आपला बाह्य मुकुट बदलत असतात

त्यामुळे मागच्या वर्षीची लस यावर्षी उपयुक्त ठरेल असे नाही. ( H१N१ ची लस H२N१ किंवा H१N२ ला चालेल असे नाही)

तेंव्हा आपण कायम काळजी घेत राहणे( चांगल्या सवयी लावून घेणे) आणि आपली प्रतिकार शक्ती वाढवणे हाच एक खात्रीचा उपाय शिल्लक राहतो

सुबोध खरे's picture

19 Mar 2020 - 7:32 pm | सुबोध खरे

ISOLATION & QUARANTINE - म्हणजे वेगळे काढणे.

संसर्गजन्य रोगात ज्यांना रोग झाला आहे त्यांना याला ISOLATION म्हणतात आणि त्यांच्याशी संपर्क झाला आहे अशाना (QUARANTINE) निरोगी लोकांपासून त्यांचा आजार बरा होईपर्यंत वेगळे ठेवणे.

आपल्याला हा रोग झाला असेल तर सरकार आपल्याला रोग पूर्णपणे बरा होऊन त्याचा इतरांना संसर्ग होणार नाही या स्थितीत येईपर्यंत संपूर्णपणे वेगळे संसर्गजन्य रुग्णालयात ठेवते. याला ISOLATION म्हणतात.

परंतु आपल्याला रोग झालेला नाही परंतु आपण अशा भूभागातून आला असाल उदा( इटली इराण चीन) तर या रोगाचा (INCUBATION PERIOD) उबवणी कालावधी संसर्ग झाल्यापासून ते प्रत्यक्ष रोग होईल इतक्या कालावधी पर्यंत आपल्याला जनतेपासून वेगळे ठेवले जाते.

आपल्या चाचण्या व्यवस्थित येईपर्यंत आपल्याला सर्वांपासून वेगळे ठेवले जाते आणि मग घरी जाऊ दिले जाते.

जर आपल्या संपर्कातील व्यक्तीला कॉरोना विषाणूचा रोग झाला आहे असे कळले तर आपण आपल्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे आणि त्यांचा निकाल येईपर्यंत स्वतःला अलग (QUARANTINE) करणे. आवश्यक आहे.

आपला असा संपर्क कोणाशी येऊशकतो?

आपण कोणाच्या मागे(किंवा आपल्या मागे) दुचाकीवर बसला असेल. आपण कुणाचा (किंवा उलट) संगणक वापरला असेल किंवा कोणत्याही रांगेत(उदा रेल्वेच्या सिनेमाच्या तिकिटाच्या) आपल्यापुढे मागे उभा असून खोकत किंवा शिंकत असेल तर.आपल्या कॅन्टीन मध्ये शाळेत, कार्यालयात असलेली टेबल खुर्ची इ एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आली तर. कार्यालयात आपल्या यबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीला जर करोनाची लागण झाली असेल तर.

अशा स्थितीत आपण स्वतःला विलग करणे आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आपली चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

असा संपर्क आला असेल आणि आपल्याला घरी बसावे लागत असेल तर घ्यायची काळजी अशी आहे.

१) आपला रुमाल, जेवल्यानंतर हात पुसायला आणि स्नानानंतर अंग पुसायला घेतलेले नॅपकिन/ टॉवेल हे वेगळे ठेवणे आणि वेगळे धुणे आवश्यक आहेत. यासाठी आपण वापरात असलेला साबण पुरे आहे. डेटॉल/सॅवलोंन सारख्या औषधी साबणाची अजिबात गरज नाही.

संशोधनात डेटॉल/सॅवलोंन सारखे साबण हात धुण्यासाठी सुद्धा साध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक आहेत असा कोणताही पुरावा अजिबात मिळालेला नाही

येथे बहुसंख्य मध्यमवर्गात जेवल्यानंतर हात पुसायला एकच नॅपकिन/ टॉवेल वापरला जातो. CONJUNCTIVITIS किंवा डोळे येणे हा आजार एकाला झाल्यावर घरातल्या सर्वाना होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे

२) आपण मिरची चिरली आहे आणि यानंतर आपल्या डोळ्यात काहीतरी गेलंय असे असताना आपण जितक्या काळजीपूर्वक हात धुवू तितक्याच काळजीने साबण आणि भरपूर पाणी वापरून हात धुणे आवश्यक आहे.

३) नळ चालू केल्यावर आपण हात धुतो तेंव्हा सुरुवातीला नळावरही थोडा साबण आणी पाणी टाकुन पुसून घेतले तर नळ बंद करताना त्यावरील जंतू परत आपल्या हातावर येणार नाहीत. हि काळजी आपण सार्वजनिक शौचालय वापरताना सुद्धा घ्यावी.

४) घरातील किंवा कार्यालयातील शौचालयाच्या दाराचे हॅन्डल हे अस्वच्छ असते त्याला शक्यतो हात न लावताच उघडावे/ बंद करावे. घरच्या शौचालयाच्या दाराचे हॅन्डल सुद्धा वरीलप्रमाणे नळ स्वच्छ करतो तसे करावे आणि कार्यालयातील शौचालयाच्या दाराचे हॅन्डल ला हात न लावता टिशू पेपरने उघडावे आणि टिशू पेपर कचरापेटीत टाकून द्यावा.

५) आपल्या संपर्कातील गोष्टी ज्यात मोबाईल आणि चष्मा वापरणार्यांनी चष्मा हा वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे. मोबाईल आणि चष्मा हे अजिबात धुतले जात नाहीत त्यामुळे ते अनेक धोकादायक जंतूंचे आगर बनलेले असते असे अनेक संशोधनात आढळलेले आहे.
मोबाईल आणि चष्मा हॅन्ड सॅनिटायझर (ते नसल्यास आफ्टर शेव्ह लोशन) मध्ये भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने दिवसातून दोनदा विशेषतः बाहेरून आल्यावर हात धुतो त्याबरोबर स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा हात धुतले पण मोबाईल धुतला नाही तर त्याचा उपयोग नाही.

६) जिना चढता उतरताना लावलेल्या बारला हात लावणे टाळा तसेच लिफ्टचा दरवाजा स्वयंचलित नसेल तर टिशू पेपरने उघडा/ बंद करा आणि टिशू पेपर कचरापेटीत टाकून द्या.

७) जर आपला रुग्णाशी संपर्क आला असेल तर घरातील कुत्रा किंवा मांजरापासून दूर राहा. त्यांना या रोगाचा संसर्ग होत नाही पण त्यांच्या पासून घरच्यांना हा रोग पसरण्याची तुरळक असेल तरी थोडीशी शक्यता आहे.

८) आपला संगणक/ लॅपटॉप वेगळा ठेवा आणि घरच्यांना शक्यतो वापरू देऊ नका. जर वापरायला द्यायचा असेल तर लॅपटॉप सॅनिटायझर वेगळा मिळतो त्याने लॅपटॉप सॅनिटाईझ करून द्या/ घ्या. तो नसेल तर हॅन्ड सॅनिटायझर (ते नसल्यास आफ्टर शेव्ह लोशन) वापरू शकता.

९) बारसे डोहाळे जेवण लग्न मुंज ग्रहशांती इ. घरगुती/ सार्वजनिक ठिकाणी जाणे तर आवर्जून टाळा.

१०) सामाजिक दृष्ट्या विलग झाल्यावर लोकांमध्ये कंटाळा नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होणे यासारखी लक्षणे काही दिवसात दिसू लागतात. अर्थात आपल्याला वाचन करणे, संगीत ऐकणे, दूरदर्शन पाहणे, लोकांशी फोन वर संपर्क करणे/ गप्पा मारणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यांचा आपल्याला मोबाईल संगणक काळात विसर पडलेला आहे.

याशिवाय अशा वेळेस आपले आर्थिक व्यवस्थापन मार्गी लावणे हा एक असाच मागे टाकलेला परंतु अत्यावश्यक भाग आपण पूर्ण करून घेऊ शकता.

काळजी घ्या, सुरक्षित रहा, निरोगी आणि आंनदी जीवन जगा

आवडाबाई's picture

20 Mar 2020 - 9:05 pm | आवडाबाई

हे खूप छान, अनेक बाजूने विचार करून लिहिले आहे आणि सध्या सर्वात जास्त महत्त्वाचे सुद्धा आहे.
मूळ लेख अर्थात खूप माहितीपूर्वक आणि आश्वासक.
धन्यवाद डॉकसाब.