सँडविच!...
सॅंडविचमधल्या टोमॅटोला
काय वाटत असेल?
कांदा बीट भेटले म्हणून
स्वत:शीच हसेल
की ब्रेडमधे दबलो म्हणून
रडत कुढत बसेल?
काकडीच्या कोंडाळ्यात
लपून बसेल,
की हिरव्यागार ढब्बूच्या
मोहात फसेल?
चिकटलेले बटर
गुपचुप पुसेल,
की चटणी झोंबली
म्हणून एकटाच रुसेल?
... पण आपण कसं ओळखायचं?
सॅंडविचमधला टोमॅटो
आपल्याला कसा दिसेल??