कर्मयोगी! (भाग पाचवा)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
21 Jul 2009 - 7:15 am

कर्मयोगी! (भाग पहिला)
कर्मयोगी! (भाग दुसरा)
कर्मयोगी! (भाग तिसरा)
कर्मयोगी! (भाग चौथा)

पूर्वसूत्र : 'शिल्पी'तला काळ हा माझ्या आयुष्यातला अतीशय चांगला असा काळ गेला. मला बरेच शिकायला मिळाले, मोठ्या लोकांशी ओळखी झाल्या आणी माझ्या कामाचे चीज झाले अशी भावना माझ्या मनात आहे. तिथल्या सगळ्या लोकांचा मी ऋणी आहे!
------------------------------------------------------------------------
शिल्पीत असतानाच मी बाहेरची कामेही घेत असे ह्याचा उल्लेख आधी केलाच आहे. अशाच एका कामात श्री. केशवराव थरवळ ह्यांची ओळख झाली. हे स्वतः उत्तम चित्रकार होते आणी पेंटिंग्ज करीत असत. कमर्शिअयल आर्टची कामेही करीत असत. त्यांच्या ओळखीतून एका पंजाबी माणसाचे काम मिळाले, ते अशा बोलीवर की त्या बदल्यात मी थरवळांना शिल्पीत रुजवात करुन द्यायची. त्या पंजाबी माणसाला मी केलेले काम इतके कमालीचे पसंत पडले की फ्लोरा फाऊंटनला युसुफ बिल्डींगमध्ये, जिथे अकबरअलीज, गोदरेज शोरूम इ. दुकाने आहेत, त्याची एक जागा होती; ती त्याने मला भाड्याने देऊ केली आणी अशा रीतीने 'नंदकुमार स्टुडिओची' मुहूर्तमेढ झाली!

शिल्पीतल्या कामाने माझे थोडेबहुत नाव झाले होते. हळूहळू मी स्वतंत्र काम सुरु केले आहे हे कमर्शियल आर्टिस्टना समजत गेले तशी कामे येऊ लागली. एनलार्जमेंट्सची कामे भरपूर असत. कॉपीरायटिंगमध्ये एखाद्या अक्षराचा टाईपसेट मिळाला नाही की फाँटवरुन विशिष्ठ आकाराचा टाईप तयार करु द्यावा लागे, ह्याला 'ब्रोमाईड'चे काम असे म्हणतात. हे काम अतिशय किचकट आणी कौशल्याचे असे. ह्यात माझा हातखंडा होता. एका अक्षराला एक रुपया अशा रेटने १९७० मधे मी कामे केलेली आहेत. फ्लोराफाउंटनलाच 'सद्गुरु फ्रेममेकर्स' हे दुकान आहे. देवदेवतांची चित्रे काढून, त्यांचे फोटोग्राफ्स बनवून, ते फ्रेम करुन विकणे हे त्यांचे मुख्य काम. ह्यांचेही एनलार्जमेंट्सचे मोठे काम मला मिळू लागले. महाराष्ट्र शासनाची बरीच कामे करून देणारा 'किबे आर्टस' हा मोठा स्टुडिओ ग्रँटरोडला होता. त्यांच्याकडची कामे मला मिळू लागली. वर्षाभरातच कामाचा लोड इतका वाढला की एक असिस्टंट, जो अकाऊंट्स बघणे, कामे नेणे-आणणे, बँकांची कामे अशी सर्व मदत करे आणि दुसरा डार्करूम असिस्टंट असे दोघे मी नोकरीला ठेवले. कॅलेंडर्ससाठी सुद्धा काही कामे मी केली. 'टेबलटॉप फोटोग्राफी' हा माझा आणखी एक कौशल्याचा भाग होता. एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी त्या उत्पादनाची जास्तितजास्त वैशिष्ठ्ये नजरेत भरतील असा फोटो घेणे. उदा.चॉकोलेटची जाहिरात असेल तर तो फोटो असा दिसायला हवा की चॉकोलेट उचलून घ्यावे! ह्यासाठी छायाप्रकाशाचा, वस्तूच्या उंचसखलपणाचा, वैशिष्ठ्यांचा अचूक अंदाज असणे गरजेचे असते. ती एक नजरच लागते. अशा प्रकारचीही कामे मी बरीच केली.

१९७२ मध्ये मंदिरांच्या छायाचित्रांचे एक मोठे प्रदर्शन दिल्लीत भरणार होते. किबे आर्ट्स बरोबर मी गोव्याच्या मंदिरांचे फोटो काढण्यासाठी दौरा करायचे ठरवले. गोव्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री कै.दयानंद बांदोडकर ह्यांच्यासमवेत त्यांच्याच गाडीतून आम्ही सर्व गोव्याची मंदिरे फिरून फोटो घेऊन आलो. ते सगळे कलर फोटोग्राफ्स आम्ही दिल्लीला नेले. तिथली रहाण्याची आणि काम करण्याची सर्व सोय किब्यांनीच केली होती. रोज रात्री काम करुन एनलार्जमेंट्स मी देत असे आणी दुसर्‍या दिवशी त्या प्रदर्शनात लावल्या जात. अशा प्रकारे पंधरा दिवस आम्ही काम केले. त्या सर्व काळात सौ. सरलाने आमचा स्टुडिओ सांभाळला.

"कॅलेंडर्सच्या कामाच्या उल्लेखावरुन शिल्पी सोडण्याच्या सुमाराची एक आठवण आली. मोठी रंजक आहे ती, मधेच सांगतो." असं म्हणून आजोबा सांगू लागले. "मी बाहेरची कामे घेतो हे शिल्पीत कळू देत नसे. एकदा किर्लोस्कर न्यूमॅटिक्स, हडपसर ह्यांचे न्यूमॅटिक ड्रिलचे (जॅकहॅमर) प्रत्यक्ष कामाच्या साईटवरचे फोटो काढण्याचे काम मिळाले. त्यासाठी मला विशाखापट्टणमला जायचे होते. तिथे रेल्वेच्या साईटवर काम सुरु होते. माझ्या पत्नीच्या आत्तेभावाचा, श्री. माधवराव रानडे ह्यांचा, एक जानी दोस्त श्री.गुप्ते म्हणून तिथे विशाखापट्टणमलाच होता, त्याच्याकडे मी उतरावे असे ठरले. ठरल्याप्रमाणे मी श्री.गुप्त्यांकडे पोचलो. तिथे सामान ठेवून मी कामाच्या जागी गेलो तो समजले की तिथले काम संपवून सगळी टीम पुढच्या कामाला अकूर ह्या डोंगरावरच्या दुसर्‍या स्टेशनला गेली आहे. लगोलग एस्.टी. पकडून तिथे गेलो खरा पण पोहोचेतो संध्याकाळ झाली. आजूबाजूचा सगळा परिसर अतिशय विरळ वस्तीचा, प्रदेश अनोळखी, आसपास जंगलाचा भाग, काय करावे असे विचार मनात येत होते. थोडी भीतीही वाटू लागली. गाडीतून उतरुन समोर पाहू लागलो तर एक व्यक्ती हात हलवीत माझ्याकडेच येताना दिसली. जवळ आल्यावर त्याने विचारले "अरेच्या, सावरकर आपण इकडे कुठे?" मी आश्चर्याने थक्क होऊन बघत राहिलो आणि प्रतिप्रश्न केला "अहो, मीच तुम्हाला विचारतो की तुम्ही इथे कसे?" त्यावर त्यांनी सांगितले की नुकतीच त्यांची तिथे बदली झाली होती. हे गृहस्थ होते श्री. राजे, त्यांच्या लग्नाचे फोटो मी नुकतेच, म्हणजे दोन-तीन महिन्याखालीच, गिरगावात काढले होते! कुठून कुठे गाठी पडतात, मी त्यांना म्हणालो "अहो देवासारखेच धावून आलात." माझ्या कामाचे स्वरुप त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले "ती टीम अकूरचे काम संपवून डोंगराखालच्या दुसर्‍या स्टेशनकडे रवाना झाली आहे. पण तुम्ही काळजी करु नका. आजची रात्र माझ्याकडेच रहा उद्या मी तुम्हाला माझ्या जीपने साईटला सोडतो." दुसर्‍या दिवशी सकाळी कामाच्या जागी पोचलो. दिवसभर काम झाले. संध्याकाळ्च्या सुमारास एक गृहस्थ जवळ आले आणि म्हणाले "तुम्ही सावरकर ना? मी तुमच्या मिसेसचा नातलग आहे, रानडे. आज माझ्याकडे राहून तुम्ही उद्या जाल का?" मलाही कुठेतरी मुक्काम करणे भाग होते त्याप्रमाणे मी राहिलो. अडचणी समोर याव्यात आणी लगोलग त्याचे उत्तरही मिळावे असे चालले होते. सकाळी बाडबिस्तरा आवरुन घराबाहेर निघालो तो एस्.टी.चा संप असल्याचे समजले. आता खरी पंचाईत. रस्त्यात मधे उभा राहून एक जीप थांबवली. सामानाने खचाखच भरलेली ती जीप चालवणार्‍या दांडगेल्याशा ड्रायवरला विचारले की बाबा एस्.टी. मिळेल अशा जवळच्या कोणत्याही गावाला घेऊन चल, मला विशाखापट्टणमला जायचे आहे. तसाच त्याच्या सामानाच्या ढिगात घुसून बसलो. त्याने एस्.टीच्या ठिकाणी पोचवेपर्यंत रात्र झाली. पुन्हा एका साधारण हॉटेलात कशीबशी रात्र काढून पहाटेच एस.टी पकडून विशाखापट्टणमला आलो. एका दिवसाचे काम जे वाटले त्याला तीन दिवस लागले होते. गुप्त्यांकडचे सामान घेऊन मी स्टेशनवर गेलो. कलकत्ता-मुंबई पुरी एक्सप्रेस विशाखापट्टणमहून जाते तीत बसलो. फर्स्टक्लासचे तिकिट काढले होते. आयत्यावेळी जागा मिळण्याची शक्यताच नव्हती पण आश्चर्य म्हणजे जागा मिळाली! दुसर्‍या दिवशी पुण्याला पोचलो. दोन दिवसात प्रवास करुन कपदे बदलायलाही नीट वेळ झाला नव्हता. पुण्यात श्री. माधवराव रानड्यांचे एक काका असतात त्यांचेकडे गेलो. लगोलग आवरुन मग मी तडक हडपसरला किर्लोस्कर न्यूमॅटिक्स गाठले. त्यांनी कामासाठी दुसर्‍या दिवसाची अपाँईंटमेंट दिली. दुसर्‍या दिवशी जाऊन तिथले फोटोसेशन उरकले. तिथून पुढचे काम किर्लोस्कर आणी स्त्री मासिकाचे श्री. मुकुंदराव किर्लोस्कर आणी कै.शांताबाई किर्लोस्कर ह्यांचेकडे होते. तिकडे जाऊन स्त्री मासिकासाठी मॉडेल फोटोग्राफी केली आणी रात्रीच मुंबईला परतलो. दुसर्‍या दिवशी कलर डेवलपिंग करुन संध्याकाळच्या कुरियरने फोटो पुण्याला गेले देखील होते! सातत्याने आणी झटपट काम करीत रहाणे हा माझा स्वभावच आहे. 'शिल्पीत' माझी तब्बल आठ दिवसांची रजा झाली होती पण त्याला इलाज नव्हता. असो.

"आठवणी सांगताना आता मी पुन्हा मागे जातो आहे, पण आत्ता आठवते आहे तर सांगावे म्हणतो, चालेल का?" आजोबांनी विचारले. "अहो आजोबा चालेल हो. तुमच्या आठव्णी इतक्या रंजक आहेत की थोडे मागे पुढे झाले तर काही बिघडणार नाही, तुम्ही अवश्य सांगा." असे मी म्हणाताच ते सांगू लागले. "दहिसरला घरी एक उंदीर येत असे. एके रात्री एक वाजता गोदरेजच्या कपाटाखाली मांजर उंदराला पकडतीये असा फोटो मी काढला होता. लोकांना तो फोटो फार आवडला. त्या फोटोच्या निगेटिव एका प्रसिद्ध अ‍ॅड एजन्सीने विकत घेतल्या. पुढे झाले असे माझा मित्र एक छायाचित्र प्रदर्शन बघायला गेलेला असताना त्याला तोच उंदीर-मांजराचा फोटो एका पारशी बाबाच्या नावावर प्रसिद्ध झालेला दिसला. त्याने तो फोटो ओळखला आणी लगोलग मला तो सांगायला आला. त्यावर थोडी चौकशी केली असता त्या अ‍ॅड एजन्सीत काम करणार्‍या पारशी बाबाने आपल्या नावाने फोटो खपवल्याचे समजले. त्याचा पाठपुरावा करण्याइतकी उसंत मला नव्हती. पुढे तो बाबा वारला आणी सगळे विस्मरणात गेले.

अशी कामे सुरु असतानाच एके दिवशी नाटकांचे प्रसिद्ध नेपथ्यकार श्री. रघुवीर तळाशीकर यांचे एक मोठे काम आले. एका औद्योगिक प्रदर्शनासाठी यंत्रांच्या बॅकग्राऊंडचे काम होते. अडचण एकच होती की कामाचा आकार होता १२ फूट x २७ फूट इतका अजस्त्र! आता एवढी एनलार्जमेंट कशी करणार? हा एक मोठा प्रयोगच होता. त्यांनी विचारले की तुम्ही करु शकाल का? माझ्याकडची डार्करुम इतकी मोठी नव्हती, तरीही मी बेधडक हो म्हणू सांगितले! गिरगावात तांबे रेस्टॉरंटजवळ एक लग्नाचा हॉल आहे. त्याचे मालक थोडे परिचयाचे होते. त्यांच्याकडे रात्रीपुरता हॉल मागितला. दुसर्‍या दिवशी सकाळी लग्न असल्याने ते तयार नव्हते. कसेबसे बाबापुता करुन त्याला राजी केले. मी, माझी पत्नी आणि एक सहकारी ह्यांनी आतून संपूर्ण हॉलच्या खिडक्या दारांना काळे कागद लावून अख्ख्या हॉलची डार्करूम केली. अनेक पीसेस मधे एनलार्जमेंट्स काढावे लागणार होते. शिवाय एकच मोठे चित्र असल्याने कुठेही जोड, तुटकपणा दिसता उपयोगी नव्हता. मोठ्या कौशल्याने एकेका एनलार्जमेंट्च्या कडा थोड्याथोड्या ओवरलॅप होतील अशा बेताने एक्सपोजर्स घेतली. रजिस्ट्रेशन संभाळून किचकट काम करत होतो. निम्म्याच एनलार्जमेंट्स डेवलप झाल्या आणी उजाडले. आता हॉल लग्नासाठी मोकळा करुन देणे भागच होते. त्याही रात्री पुन्हा एकदा मालकांना विनंती करुन त्यांच्या कृपेने हॉल मिळवला. मग मात्र संपूर्ण काम फत्ते करुनच तिथून बाहेर पडलो. प्रत्यक्ष प्रदर्शनात ह्या १२' x२७' प्रिंटिंगची खूपच स्तुती झाली. त्या फोटोच्या पार्श्वभूमीवर मशीन्स ठेवलेली होती. श्री. तळाशीकरांनाही काम फारच आवडले. त्यांनी खूप कौतुक केले. ह्यात खूप पैसे जरी मिळाले नसले तरी अमूल्य अनुभव मिळाला.
पुढे बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या 'राजा शिवछत्रपती' ह्या प्रदर्शनाचे काम श्री. तळाशीकर ह्यांचेकडे आले. त्यांनी मला ते काम दिले. त्यात ऐतिहासिक व्यक्तींचे पोशाख करुन त्यांचे फोटो काढण्याचे काम होते. मी 'औरंगजेबाचे' फोटो काढलेले अठवतात. आणखीही काही काम मी केले. नंतर त्या प्रोजेक्टमध्ये श्री. मोहन वाघांनी प्रवेश केला. मग मी त्या कामातून अंग काढून घेतले! प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर ह्यांच्याशी माझी पत्रकारितेपासून ओळख. त्यांच्याकडूनच श्री. मोहन वाघांशी ओळख झाली. त्यांचा उमेदवारीचा काळ माझ्यासमोरच घडलाय.

"हे सर्व सुरु असताना एकीकडे आमच्या संसारात आम्ही दोघेच होतो. आम्हाला अजून मूलबाळ झाले नव्हते. आमच्या आईची पंधरा बाळंतपणे झालेली होती. त्यामुळे ज्या त्रासातून आणी अपरंपार कष्टातून ती गेली होती त्याचे फलित म्हणून की काय ती मला नेहेमी म्हणे "नंदू, तुला मूल झाले नाही तरी चालेल. नवस वगैरे करु नकोस. मला काहीही वाटणार नाही." त्यासंबंधीची संपूर्ण हकिगतच सांगायला हवी. आजोबा भरभरुन बोलत होते, मी मानेनेच त्यांना सहमती दिली. "चमत्कारांवर माझा विश्वास नाही. परंतु हा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो काय आहे हे ज्याचे त्याने ठरवावे असे मला वाटते. अनुभव अतिशय विलक्षण आहे आणी संपूर्ण सत्य आहे हे मात्र मी सांगून शकतो. माझे माझ्या वडिलांशी फारसे कधीच पटले नाही. माझ्या इतर भावंडांशी त्यांचे जमे पण माझ्याशी नाही. कधी गुहागरला गेलो असलो तर इतर सर्वजण त्यांना नमस्कार करीत ते आशीर्वाद देत पण मी नमस्कार करायला वाकलो की चटकन पाय मागे घेत. मी विचारे "असे का?" तर म्हणत, "वेळ आली की सांगेन." मग मीही दुखावत गेलो. माझे त्यांच्यावर प्रेम होते पण जवळीक साधता आली नाही. त्यांच्या शेवटच्या आजारात त्यांनी पत्र पाठवून मला बोलावून घेतले. मी गुहागरला गेलो. त्यांच्या जवळ बसलेलो असताना ते म्हणाले "नंदू, अरे तुला मी आशीर्वाद का दिला नाही ते सांगतो. तुझा जन्म झाला तेव्हा मी अतीशय आजारी पडलो, इतका की आता मी मरणारच असे झाले. तेव्हा तो तुझा पायगुण अशी माझ्या मनाची धारणा झाली. त्यामुळे तुला कधीच आशीर्वाद द्यायचा नाही असे मनाने घेतले पण आता मला वाईट वाटते आहे की त्यामुळे तुला मुले झाली नाहीत." मी म्हणालो "बाबा, आशीर्वादाने मुले होत नसतात. ती होणार असती तर एव्हाना झाली असती." त्यावर ते मोठ्या निश्चयाने रोखून बघत म्हणाले "नाही, असे नाही. मी तुझ्याकडे येणार आहे!" मी म्हणालो, "आता ते शक्य नाही, बराच उशीर झालाय." त्यानंतर काही दिवसातच ते गेले. ही घटना साधारण १९६९-७० च्या सुमाराची असेल. मग आम्ही पुढे ते विसरूनही गेलो. इथे आणखी एक गोष्ट मला सांगायला हवी. आमच्या आजोबांनी जे पार्थिवाचे व्रत २४ वर्षे केले होते त्यानंतर देवाचे नाव कोण घेणार असा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी माझे वडील त्यांना म्हणाले "मी घेईन." आणी खरोखर ते "नारायण, नारायण" असे नामस्मरण आयुष्यभर सतत करीत असत.

असो. तर सांगत असे होतो की, पुढे १९७३ मध्ये एकेरात्री अचानक मला स्वप्न पडले त्यात बाबांचा आवाज ऐकू आला "नंदू, मी तुझ्याकडे येणार आहे" आणी स्वप्नात एक रांगणारे बाळ दिसले. एकदा नव्हे तर तीन चार वेळा काही दिवसांच्या अंतराने हे स्वप्न पडताच मी बेचैन झालो. सौ. सरलाशी बोललो की "असे स्वप्न मला पडले आहे आणी मला असे वाटते आहे की आपण एक मूल दत्तक घ्यावे. तुझा काय विचार आहे?" तिने मला काय सांगावे, ती म्हणाली "अहो, दत्तकाचा विचार बराच आधी माझ्याही मनात आला होता पण तुम्हाला कसे सांगायचे असे वाटल्याने जीभ रेटत नव्हती पण तुम्ही म्हणत असाल तर मी तयार आहे!" ह्यासुमारास माझे वय होते ४८ वर्षांचे. सौ.सरलाचे मामा माटुंग्याचे पेंटर श्री.चितळे हे होते त्यांचा गणपतीचा कारखाना होता. त्यांच्या पत्नीची म्हणजे सौ. मामींची दत्तक मुले देणार्‍या संस्थेत ओळख होती. तिथे आमची ओळख त्यांनी करुन दिली. आधी आम्ही मुलगी घ्यायची ठरवले होते कारण मला मुली फार आवडतात. परंतु हिचे आत्तेभाऊ श्री माधवराव रानडे म्हणाले "अहो तुमचं वय जवळजवळ पन्नाशीच्या घरात. मुलगी मोठी होऊन लग्न होऊन गेली की वयाच्या सत्तरीत पुन्हा दोघेच रहाणार. तुमचे आयुष्य अवघड होईल असे वाटते. पहा, विचार करा. शेवटी निर्णय तुमचाच आहे." मग आम्ही विचार बदलला आणी मुलगा घेण्याचे ठरवले. संस्थेत आम्ही सांगितले की आमच्या दोनच अटी आहेत, एक म्हणजे बाळाची आई ब्राम्हण हवी आणी दुसरे त्या बाळाचे वय चार महिन्याच्या आतले हवे. आमच्या अटीत बसणारे मूल तिथे नव्हते. त्यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही तसे मूल आले तर कळवू.

एका आठवड्यातच त्यांचे पत्र आले की तुम्हाला हवी तशी दोन मुले आली आहेत ताबडतोब या! आम्ही उभयता लगोलग गेलो. पहिले मूल गोरे होते पण अशक्त होते आणी दुसरे काळेसावळे व सुदृढ. पत्नी म्हणाली "अहो, आपण दोघेही सावळेच, मूल आपल्याला शोभेसे हवे, आपण सावळेच घेऊयात." मीही चटकन त्या सावळ्याकडे बोट करुन म्हणालो "मला हेच मूल हवे." हे म्हणता क्षणीच तो मुलगा माझ्याकडे बघून सुंदर हसला!
मुलाशीओळख वाढावी ह्या हेतूने मग आम्ही दोघे आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळी एकेक तास मुलाजवळ बसत असू. त्याच्या आम्हाला लळा लागला. दोन महिन्यांनी त्याला घरी घेऊन जाण्याची वेळ आली. आमच्या बरोबर माझा मोठा भाऊ, आमची बहीण, श्री. व सौ.चितळे मामा-मामी, आमचे सासरे असे सर्वजण संस्थेत पोचलो. कागदपत्रे, पैसे वगैरे सर्व सोपस्कार पार पडले. मुलगा फार आजारी होता. त्याला ट्रिपलचा डोस दिला होता आणी त्यात कांजिण्या झाल्या होत्या. कांजिण्या इतक्या तीव्र होत्या की पाठीवर जखम होऊन तिचे चकदंड झाले होते (जखम चिघळली होती). मुलाला आता न्यावे की नाही असा संभ्रम पडला पण माझा निश्चय पक्का होता. अंगात तीन ताप असलेल्या मुलाला सौ. चितळे मामींनी हिच्या पदरात टाकले. मुलाचे नाव संस्थेत 'तिमिर' असे ठेवले होते. काय योग आहे पहा "जगापासून अंधारात जन्मला म्हणून नाव 'तिमिर'!" पण आम्ही उभयतांनी तिथे त्याचे नाव 'अभिजित' असे ठेवले.
आम्ही घरी आलो. कांजिण्यांच्या जखमांनी तो कळवळून रडे. आमच्या शेजारच्या एक बाई घोडगाळकर म्हणून होत्या त्यांनी सांगितले की त्याच्या जखमांना कोलोन वॉटर लावा. तीन-चार बाटल्या कोलोन वॉटर आणून त्याने त्याच्या जखमा आणी अंग पुसल्यावर त्याचा ताप उतरला आणि थोड्याच दिवसात जखमा भरून येऊन तो पूर्ववत झाला. अभिजितच्या आगमनाने आमच्या संसाराचे एक नवीन चैतन्यमय पर्व सुरु झाले होते!

चतुरंग

समाजजीवनमानराहणीविचारलेखअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

21 Jul 2009 - 10:56 am | निखिल देशपांडे

आजोबांचा आठवणी वाचतोय....
पुढचा भाग येवु द्या लवकर
निखिल
================================
काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. :)

नंदन's picture

21 Jul 2009 - 1:52 pm | नंदन

असेच म्हणतो, आठवणी वाचतोय. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

21 Jul 2009 - 11:13 am | स्वाती दिनेश

आजोबांच्या गोष्टीतली वळणे तर एकदम कुठल्याकुठे नेत आहेत, उंदरामांजराच्या फोटोपासून, तिमिर पासून ते अभिजित!
पुढे काय काय झाले? त्याची उत्सुकता आहेच.
स्वाती

शाल्मली's picture

21 Jul 2009 - 2:02 pm | शाल्मली

आजोबांच्या गोष्टीतली वळणे तर एकदम कुठल्याकुठे नेत आहेत, उंदरामांजराच्या फोटोपासून, तिमिर पासून ते अभिजित!
पुढे काय काय झाले? त्याची उत्सुकता आहेच.

असेच म्हणते.. :)

--शाल्मली.

पक्या's picture

21 Jul 2009 - 12:45 pm | पक्या

काय एकेक अनुभव आहेत.
आजोबांच्या एकसे बढकर एक अनुभवांमुळे लेख वाचनीय झाला आहे.

ऋषिकेश's picture

21 Jul 2009 - 2:26 pm | ऋषिकेश

अतिशय हृदयस्पर्शी प्रवास आणि अतिशय चित्रदर्शी वर्णन!!
येऊ दे अजून

लेखमालेच्या शेवटी जमल्यास आजोबांनी काढलेले फोटु तसेच/किंवा त्यांचा सपत्नीक फोटु दिल्यास अनुभवशृंखला परिपूर्ण होईलसे वाटते...

(दहिसरकर :) )ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

स्वाती२'s picture

21 Jul 2009 - 7:58 pm | स्वाती२

>>अतिशय हृदयस्पर्शी प्रवास आणि अतिशय चित्रदर्शी वर्णन!!
असेच म्हणते.

सुनील's picture

21 Jul 2009 - 2:36 pm | सुनील

भागागणिक अधिकाधिक रोचक होत चालली आहे कथा.

अवांतर - दत्तक घेण्याचा प्रसंग (नात्यात घडलेल्या गोष्टीमुळे) फारसा पटला नाही. अर्थात ७० च्या दशकात दत्तक घेणे ही गोष्ट अधिक सोपी असण्याची शक्यता आहेच.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

असे तुम्ही म्हणता आहात. आजोबांचाही चमत्कारावर विश्वास नाही. त्यामुळेच तर आयुष्यभर ते इतके प्रॅ़क्टिकल राहिले. त्याकाळी (३६ वर्षांपूर्वी) मूल दत्तक मिळणे हे तसे सोपे होते. कायदेशीर बाबी, कागदपत्रे हे बरेच ढोबळ मानाने असे. परंतु समाजाकडून ते मूल आणी आई-वडील ह्यांच्याकडे बघण्याचा दॄष्टिकोन हा तितकासा सहज सोपा नसे. मानसिक पातळीवर ही एक मोठी लढाई असावी असे वाटते. आजोबांच्या आयुष्यात ही घटना जशी घडली तशीच त्यांनी सांगितली. हा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे पटणे - न पटणे ह्याला महत्व नाही.

चतुरंग

प्राजु's picture

21 Jul 2009 - 9:10 pm | प्राजु

मनांत कोरते जाताहेत त्यांचे एकेक अनुभव!!
मस्त!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

21 Jul 2009 - 11:43 pm | भाग्यश्री

वाह.. फार सही चाललीय ही मालिका!
तुम्ही खूप ताटकळत नाही ठेवत आहात क्रमश:ने , ही अजुन एक चांगली गोष्ट!! :)
आजी-आजोबा लोकं सही असतात ना! त्यांचे किस्से,गमती जमती ऐकायला काय छान वाटते! :)

http://www.bhagyashree.co.cc/

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2009 - 12:08 am | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह छान. रंगाशेठ. आजोबांचे अनुभव आवडले.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

धनंजय's picture

22 Jul 2009 - 12:56 am | धनंजय

वाचतो आहे.