"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!"
आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे. शेवटी आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींनीचतर आपण बनतो.
ताहिर शाह म्हणतो "“Stories are a communal currency of humanity.” खरोखरंच गोष्टी म्हणजे मानवतेचं चलन आहे. आणि हे जर खरं असेल तर आज खर्या अर्थाने क्रिकेटने आपला इसाप गमावला.
"आमचा सुनील", "आपला सचिन", "आणि सेहवाग म्हणजे तर काय...", "स्मिथसारखा चिवट बॅट्समन".. "अरे ते हॉल-ग्रिफिथ म्हणजे राक्षस होते रे" वगैरे वाचताना संझगिरींचे कौतुकाने लुकलुकणारे डोळे त्यांच्या शब्दांत दिसायचे. किती पॅशनेट असावं एखाद्याने? किती जीव लावावा एखाद्या खेळाला? आणि खेळाडूंना सुद्धा! एखाद्यावर टीका करतानासुद्धा त्यांचा सूर म्हणजे "असं का करतोस राजा.. किती अपेक्षा आहेत आमच्या तुझ्याकडून" असाच असायचा. किती वर्षं झाली संझगिरी वाचतोय... पण त्यांचं लिखाण कधीच एकसुरी वाटलं नाही कारण त्या लिखाणामागचं त्यांचं निर्भेळ, निर्मळ प्रेम! त्यांची क्रिकेट आणि सिनेमाविषयक कित्येक पुस्तकं आपण वाचली असतील. पण त्यांच्यातला सेलेब्रिटींपलिकडे सामान्यातल्या सामान्य माणसातलं सौंदर्य, मोठेपणा आणि प्रेरणा बघणारा, स्वच्छ, संवेदनशील माणूस दिसतो तो "वेदनेचं गाणं" मध्ये. अहो लताबाई, आशाताई, गावसकर, सचिन यांच्यात देवत्व सगळेच पाहतात. पण द्वारकानाथ संझगिरींनी आम्हाला पोस्टमॉर्टेम करणार्याचं, गटारं साफ करणार्याचंं, कोव्हिडच्या वेळी पायी आपल्या गावी निघालेल्या परप्रांतीयांचं देवत्व दाखवलं!
त्यांच्यातल्या साध्या, निरागस, कलासक्त रसिकाने आम्हाला जास्त संवेदनशील बनवलं. आमच्या जाणीवा समृद्ध केल्या. लहानपणी इसापनीतीच्या गोष्टींनी जे संस्कार केले ते मोठेपणी द्वारकानाथ संझगिरींच्या लेखनाने केले. डब्ल्यू जी ग्रेसपासून ते यशस्वी जयस्वाल पर्यंत, संगीतकार जयदेवपासून ते इरफान खान पर्यंत, मुकुंद आचार्यांपासून ते बाळासाहेब ठाकर्यांपर्यंत, आमच्या मनातलं असं एकही व्यक्तिचित्र नाही ज्यात द्वारकानाथ संझगिरींनी रंग भरले नसतील.
आज लताबाईंना जाऊन तीन वर्षं झाली आणि आजच संझगिरी गेले! त्या माउलीने स्वरांमधून गोष्टी ऐकवल्या आणि ह्यांनी शब्दांमधून. "लुत्फ" कसा घ्यावा हे सांगणाराच गेला! क्रिकेटचाच नाही, तर सिनेमा, संगीत आणि आयुष्याच्याच सुरस आणि बोधपर गोष्टी सांगणारा इसाप हरपला! पण जाताना आयुष्यभर पुरून उरेल इतकं देऊन गेला.
जोपर्यंत आमचे श्वास चालू आहेत तोपर्यंत संझगिरी असतीलच. कारण ते आमच्या जगण्याचा भाग आहेत आणि राहतील.
जे.पी.मॉर्गन
६ फेब्रुवारी २०२५
प्रतिक्रिया
6 Feb 2025 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला.
दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी.
कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.
-दिलीप बिरुटे
6 Feb 2025 - 8:55 pm | जुइ
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत.
९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.
9 Feb 2025 - 11:00 pm | राघव
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी!
भावपूर्ण श्रद्धांजली!!
10 Feb 2025 - 1:11 pm | सौंदाळा
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर.
एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता.
देवळातील पुजार्यांच्या कर्मठपणावर ते पुजार्यांसमोरच कठोर टीका करत होते.
काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्यावर आले होते.
त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो.
त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही.
नेहमीप्रमाणेच समायोचित लेख.
द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली
18 Feb 2025 - 5:27 am | MipaPremiYogesh
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख..
साधारणतः 2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले.
असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..
18 Feb 2025 - 11:31 am | अमरेंद्र बाहुबली
क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!
18 Feb 2025 - 11:51 am | सुबोध खरे
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद.
केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार
18 Feb 2025 - 12:34 pm | श्रीगुरुजी
खांब किंवा पत्रपेटी दिसली की तंगडी आपोआप वर होतेच.
18 Feb 2025 - 1:20 pm | अमरेंद्र बाहुबली
का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?
20 Feb 2025 - 4:12 am | मुक्त विहारि
लोचट माणसाचा मनोरंजक प्रतिसाद...
18 Feb 2025 - 1:03 pm | कपिलमुनी
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे .
काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे.
ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.