सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २० (अंतिम): कृतज्ञतेसह समारोप!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
29 Jun 2023 - 1:59 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १७: आष्टी- गडचिरोली (६९ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १८: गडचिरोली- नागभीड (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १९: नागभीड- नागपूर (१०३ किमी)

✪ “ह्यात व्यक्तिगत असं काही नाही. क्षमता सर्वांची आहे.”
✪ इतक्या कौतुकाचा अर्थ वेगळा होतो
✪ आणखी भेटी आणि मुलाखती
✪ सायकलीमुळे वाघ आणि सचिन तेंडुलकरसुद्धा भेटू शकतो
✪ डॉ. अमित समर्थ ह्यांच्यासोबत अविस्मरणीय भेट!!
✪ अविश्वसनीय आठवणी आणि इनक्रेडीबल इंडियासह समारोप
✪ सर्वांप्रती कृतज्ञता

सर्वांना नमस्कार. गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर २०२२ ला पूर्ण झालेल्या सायकल प्रवासाचा शेवटचा ब्लॉग लिहीतो आहे. हा प्रवास पूर्ण करताना मनात असलेली पहिली जाणीव आहे ती म्हणजे कृतज्ञता. ह्या प्रवासात वाटेत ज्या सगळ्या ग्रूप्सना, वेगवेगळ्या व्यक्तींना आणि संस्थांना भेटलो त्यांच्याबद्दल, सायकलीबद्दल, निसर्गाबद्दल कृतज्ञता मनात आहे. ह्या सर्वांनी मला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्याबरोबर भारत विकास संगम, ज्यांनी मला कर्नाटकातील अनेक ठिकाणांसाठी मदत केली होती. नागपूरमध्ये पोहचलो तेव्हा हा धन्यवादभाव मनात आहे. ही राईड काय थरारक झाली! अशी राईड करणं हा खूप मोठा आनंद सोहळा राहिला. हा हँग ओव्हर इतक्यात संपणार नाही....

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/06/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

११ ऑक्टोबरच्या संध्याकाळी नागपूरातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्या सीमाताई देशपांडेंनी काही विद्यार्थ्यांसोबत अनौपचारिक भेट ठेवली आहे. तिथे आकांक्षाताई देशपांडेही भेटल्या. त्यांह्यासाठीसुद्धा मी मानसिक आरोग्य हा विषय घेऊन इतका केलेला प्रवास हा वेगळा अनुभव आहे. विद्यार्थी व लोकांसोबत शेअर करण्यासाठी माझ्याकडे असं काही आहे, ह्याचा खूप आनंद होतोय. ह्या भेटीसाठीसुद्धा नागपूरमध्ये साधारण १५ किमी सायकल चालवली. ही एक रिकव्हरी राईड म्हणून उपयोगी पडतेय. जेव्हा एखादं यंत्र खूप जोराने काम करत असतं, तेव्हा ते अचानक बंद करता येत नाही. त्यामुळे मला इतक्या दिवसांचा मूमेंटम हळु हळु कमी करण्यासाठी पुढे काही दिवस छोट्या २०- ३० किमीच्या राईडस किंवा वॉक्स करायची गरज आहे.

माझ्या सगळ्या मित्र परिवाराला आनंद झाला आहे. त्यांच्यामुळे मला माझे अनुभव आणखी लोकांसोबत शेअर करण्याची संधी मिळते आहे. दुस-या दिवशी दीक्षाभूमीवरच आणखी एक मुलाखत झाली. ह्या सगळ्या लोकांची आपुलकी आणि जिव्हाळा मला मिळतोय आणि तो मी घेतोय. पण हे कौतुक मला घेता येत नाही. मला ते विचित्र वाटतं. कारण इतक्या अंतराचं सायकलिंग किंवा अशी कोणतीही गोष्ट अजिबातच व्यक्तिगत असू शकत नाही. मुळात ही गोष्ट सार्वत्रिक आहे- युनिव्हर्सल आहे. अचिव्हमेंटसारखं काहीही नाही त्यात. केवळ योग्य प्रक्रिया, योग्य पावलं, योग्य मदत आणि व्यवस्था झाली की जमतं ते. वाटेतही माझ्या सगळ्या संवादामध्ये मी हेच सांगत होतो की, मी जे करतोय ते फक्त उदाहरण आहे. प्रत्येकाला ह्या क्षमतेची देणगी मिळालेली आहे. परंतु तरीही लोक कौतुक करत राहिले. मला वाटतचं त्याचं कारण कदाचित हे असेल की, आपल्यापैकी अनेकांनी आपल्याला मिळालेल्या क्षमता तितक्या वापरल्या नसाव्यात. त्यामुळे अशी छोटी आणि सहज होणारी गोष्टसुद्धा प्रचंड अवघड वगैरे वाटते (मी जे काही केलं ते मला सहज जमणारंच होतं आणि सहज जमेल त्याच्यापलीकडे मी काहीही केलं नाही!). त्यामुळे इतक्या कौतुकामधून खरं तर आपल्या समाजाची स्थिती व आपल्या मानसिकताच जास्त जाणवते. असो.


.

.

.

.

१२ ऑक्टोबरची सकाळ कठीण गेली! कारण मोहीमेमध्ये आणि मोहीमेच्याही आधी काही दिवस रोज लवकर उठताना आता आवरून निघायचं आहे, असा भाव मनात असायचा. त्यामुळे एकदम उठल्यावर आज कुठेच मोठी राईड करायची नाहीय, ही जाणीव थोडी कठीण जातेय! एक प्रकारचं अक्लमटायझेशनच हे! बदल म्हणून दीक्षाभूमीपर्यंत वॉक केला आणि नागपूर बघितलं. तसंच माझी आई, बायको, बायकोची आई व माझी मुलगी अशा चौघी सकाळीच नागपूरला पोहचल्या. मी त्यांना रिसीव्ह केलं आणि मुलीला- अदूला घेऊन छोटी डबल सीट राईडही केली. २० दिवसांनंतर तिला भेटलो! माझे काळे पडलेले हात आणि काळवंडलेला चेहरा बघताना तिला मजा वाटतेय!

सायकलिंगमुळे इतरही काय काय गमती होऊ शकतात, हे बघायला मिळालं! सायकलीमुळे वाघसुद्धा भेटू शकतो! हो! कारण माझे कुटुंबीय माझ्या सायकलीमुळेच नागपूरला आले. आणि मग ते ताडोबाला गेले आणि तिथे त्यांना वाघ भेटला! मी त्यावेळी थोडा आराम आणि अक्लमटायजेशन केलं. मनमंदिर समूहाच्या नागपूरमधील मंडळींनीसुद्धा माझ्या अनुभव कथनाचा कार्यक्रम ठेवला आहे. इतका जिव्हाळा खरं तर निशब्द करतो आहे. तोही कार्यक्रम छान झाला. आणि मी मनात म्हणत राहिलो, काबे, तुला हे खरं तर वाटून रायलं नाय ना? मले का बरं हरभ-याच्या झाडावर चढवून रायाले!

त्याबरोबर सायकलीमुळे सचिन तेंडुलकरसुद्धा भेटू शकतो, हेही कळालं! नागपूरातल्या माझ्या काकू भारतातल्या सर्वोत्तम सायकलिस्टपैकी एक असलेल्या दिग्गज डॉ. अमित समर्थ ह्यांच्या परिचित आहेत- डॉ. समर्थ ज्यांनी रेस अक्रॉस अमेरिका पूर्ण केलीय आणि अति कठिण ट्रान्स सैबेरियन अल्ट्रा सायकलिंगमध्येही भाग घेतलाय. माझी भेट ह्या दिग्गज हस्तीशी व्हावी असं काकूंना वाटलं. मला तर अशा माणसाला भेटायची थोडी भितीच वाटत होती! पण काकूंनी त्यांना फोन केला, माझ्या मोहीमेबद्दल सांगितलं आणि भेट घडवून आणली! त्यामुळे मला सायकलिंगमधल्या सचिन तेंडुलकरलाही भेटता आलं. अविस्मरणीय भेट! ते पहाटेच्या वेळी त्यांच्या अथलीटसना प्रशिक्षण देत होते. थोडी मिनिटं त्यांनी मला दिली आणि मग त्यांच्या अथलीटसोबत माझी ओळखही करून दिली! जेव्हा मी त्यांना भेटताना दडपण वाटतंय म्हणालो, तेव्हा ते इतकंच म्हणाले की, आपण सगळे सायकलिस्टच आहोत! अशी मस्त भेट झाली.


.

.

.

गडचिरोलीतल्या पोलिस अधिका-यांनी सुचवल्याप्रमाणे मी नागपूरमधल्या एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांनाही भेटलो. अशा पदावरची व्यक्तीसुद्धा ध्यानामध्ये इतका रस घेते हे कळून छान वाटलं. ह्या सगळ्या मंडळींमुळे वृत्तपत्रांमध्येही बातम्या आल्या. नागपूरमध्ये अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळींसोबत भेटी झाल्या. अशा काही दिवसांनंतर आणि छोट्या राईडसनंतर मग हळु हळु शरीर आणि मन पूर्ववत स्थितीकडे येत चाललं. पण ह्या पूर्ण प्रवासातल्या आठवणी खूप मोठ्या आहेत. गोवा आणि बेळगावीमधला अजस्र चोरला घाट, सगळीकडे मला भेटलेले मस्त लोक, महाकाय नद्या आणि घनदाट वनश्री! आणि सगळे रस्ते! त्याबरोबर मी भेटत असताना विद्यार्थी व मुलांच्या चेह-यावरचे भाव! मला शोधता आलेला अविस्मरणीय इन्क्रेडीबल इंडिया! अशा अनेक रोमांचक व थरारक आठवणींसह ही मोहीम पूर्ण झाली. इतके मोठे अनुभव पचवायला कठीण गेले आणि त्यामुळेच जे मला मिळालं त्याला थोडा तरी न्याय देण्यासाठी इतकं सविस्तर लिहावं लागलं. पुन: एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आपण माझ्या ब्लॉगवर फोटोंचा आनंद घेऊ शकता आणि इंटरेस्ट वाटेल तसं वाचू शकता. आता ही ब्लॉग मालिका इथे समाप्त करत आहे. सर्वांना happy fitness! खूप खूप धन्यवाद.


.

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

प्रवासलेखअनुभव

प्रतिक्रिया

इपित्तर इतिहासकार's picture

1 Jul 2023 - 8:42 am | इपित्तर इतिहासकार

तुमच्या शैलीबद्दल खूप ऐकले (वेगवेगळ्या प्रतिसादांत वाचले) होते. आज प्रत्यय आला.

अगदी माबोकर आशुचॅम्प ह्यांनी पण "जम्मू ते पुणे सायकल मोहीम" ह्या मालिकेत तुमचे अन् तुमच्या लेखनशैलीचे वर्णन केले होते ते यथार्थ आहे.

तुमची ट्रीप तर आवडलीच पण त्यासोबत तुम्ही ती सिंगल गियर सायकलीवर केली त्याचे जास्त कौतुक आहे.

पुढील लेखनास शुभेच्छा आणि पुढील सफरींस सुद्धा शुभेच्छा.

- ई. ई.

मार्गी's picture

5 Jul 2023 - 11:10 am | मार्गी

ओहह!!!! मनःपूर्वक धन्यवाद इपित्तर इतिहासकार जी!

गवि's picture

5 Jul 2023 - 11:25 am | गवि

उत्तम लेखमाला. सर्वच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी.