सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
21 Nov 2022 - 7:09 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)

✪ चोरला घाट आणि अद्भुत सह्याद्री!
✪ नज़रों में हो गुजरता हुआ ख्वाबों का कोई काफ़ला...
✪ नदियाँ, पहाड़, झील, झरने, जंगल और वादी
✪ रेडबूलचा किस्सा
✪ लोकांची सोबत- आम्ही तुम्हांला काही न दिल्याशिवाय कसं जाऊ देऊ शकतो?

सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी ४ राज्यांमध्ये केलेल्या सोलो सायकलिंगमधला म्हणजे निसर्ग तीर्थयात्रेतला आनंद ह्या लेखाद्वारे आपल्यासोबत शेअर करत आहे. २५ सप्टेंबर! ह्या सायकल मोहीमेतला दुसरा दिवस. काल रात्री गोव्यात बिचोलीत लॉजवर चांगला आराम झाला. आज बेळगांव रोडला लागल्यावर लवकरच घाट लागेल. काल रस्त्यावर बरंच उशीरा धुकं होतं, त्यामुळे घाटातही धुकं असेलच. आवरून सगळं सामान भरलं, दोन्ही सॅक्स खाली आणल्या व सायकलवर बांधल्या. रोज सकाळी हे सामान बांधायला व नंतर दुपारी काढायला पाच मिनिट लागणार आता. लॉजवर रात्री सांगितलं होतं, त्यानुसार त्यांना उठवून गेट उघडलं आणि निघालो. पण पाच पेडल्स मारले नाहीत तर आठवलं की, हेलमेट राहिलंय! मग ते परत येऊन घेतलं.


.

.

आजचा दिवस ह्या मोहीमेतला राईडच्या दृष्टीने खूप मोठा आणि विशेष. एक तर आज १६ किलोमीटर लांबीचा व एकूण साधारण ७०० मीटर चढ असलेला चोरला घाट पार करायचा आहे. आणि जेव्हा मी घाट चढून बेळगांवला पोहचेन तेव्हा दोन गोष्टी झालेल्या असतील. एक तर तीव्र पावसाच्या कोंकणाच्या मी बाहेर असेन आणि पुढे थेट नागपूरपर्यंत मोठा असा घाट लागणार नाही. आणि किना-यापासून हळु हळु आत आल्यामुळे पावसाचीही शक्यता कमी कमी होईल. अर्थात् आज तर पाऊस लागणारच आहे. एका बाजूला किंचित शंका मनात होती कालपर्यंत की सिंगल गेअरवर हा घाट जमेल ना. पण कालचा तो तीव्र चढ सामानासह आरामात पार केला, त्यामुळे इतकी शंका आता नाहीय. बहुतेक तर पूर्ण सायकल चालवतच जमेल आणि कदाचित अगदी थोडा भाग पायी पायी जावा लागेल. त्यामुळे राईड सुरू करताना ही उत्सुकता आणि आनंद जास्त आहे. आणि त्याबरोबर आजच कोंकण मागे पडणार, ही हुरहुरसुद्धा आहे.


.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2022/11/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)

सकाळच्या वेळचं गोवा! तुरळक माणसं आहेत रस्त्यावर. थोडा रस्ता विचारून घेतला आणि निघालो. एका बाजूला पूर्ण विश्वास बसतही नाहीय की, मी खरंच इथे राईड करतोय आणि पुढे असा प्रवास करणार आहे. बुद्धीच्या पातळीवर माहितीय की, पुढे मला सलग १७- १८ दिवस राईड करायची आहे, इतकं इतकं अंतर ओलांडायचंय. पण भावनेच्या पातळीवर मी फक्त आजचाच विचार करतोय. आज फक्त आजच्याच अंतराचा विचार करतोय. आजचे ८८ किलोमीटर. आणि खरं तर तितकाही पुढचा विचार करत नाहीय. अगदी छोटे टप्पे डोळ्यांपुढे ठेवतोय- की अजून १२ किलोमीटरनंतर घाट सुरू होईल, मग १६ किलोमीटरचा घाट वगैरे. त्यामुळे मनावर इतक्या दिवसांच्या प्रवासाचा किंवा शेकडो किलोमीटर अंतराचा ताण अजिबात नाहीय. आणि प्रस्तावनेच्या भागात बोललो तसं मानवी क्षमता खूप मोठी असते, त्यामुळे ह्यात कठीण- खडतर असं काहीच असणार नाही आहे. त्यामुळे अगदी रिलॅक्स आणि निश्चिंत मनाने एंजॉय करतोय. वळणा वळणांचा रस्ता, मधून मधून छोटे ओहोळ आणि कौलारू घरं! छोटी छोटी गावं लागली. एका पूलानंतर युटर्न घेऊन रस्ता आता बेळगांव महामार्गाला लागला.

काय मस्त परिसर आहे! थोड्या अंतरावर नदी असावी असं वाटतंय, पण दिसत नाहीय. सुंदर रस्ता आहे. कावळ्याची काव काव किंवा ट्रकचे हॉर्न्स ऐकल्यावर आपोआप एखादं गाणं आठवतंय आणि मनात प्ले होतंय! आईए मेहेरबानसारखं गाणं मनात ऐकत मस्त पुढे जातोय! अधून मधून कोंकणी भाषेतल्या रस्त्यावरच्या सूचना! साधारण पाऊण तासाने वाटलं की, घाट लागण्याच्या आधी एकदा नाश्ता करून घ्यावा. वाटेमध्ये फार हॉटेल नाहीत, अशी माहिती मिळाली होती. एका गावामध्ये चहाचं हॉटेल सुरू आहे. पण तिथे बिस्कीट किंवा इतर स्नॅक्स काहीच नाहीत. तेव्हा पाव आणि चहा घेतला आणि निघालो. हॉटेलवाल्याने माझ्या प्रवासाची चौकशी केलीच. वाटेत दुकान दिसलं तर बिस्कीटचा पुडा घेईन. पुढे गेल्यावर झाडी वाढत चालली आणि आजूबाजूला डोंगरही आले. हळु हळु वस्ती कमी होतेय. डाव्या बाजूला महाराष्ट्राची सीमा फार लांब नाहीय, त्यामुळे दूरवर डावीकडे जे डोंगर दिसत आहेत, ते महाराष्ट्रातले असले पाहिजेत!

चोरला घाट आणि अद्भुत सह्याद्री!

एका जलाशयाला बाजूला ठेवून रस्ता पुढे गेल्यावर एका चेकपोस्टनंतर घाट सुरू झाला! चढ तसा तीव्र वाटला नाही. वळणाचा व वर चढणारा रस्ता सुरू झाला. आत्तापर्यंत पाऊस जवळजवळ लागलेला नाहीय. पण समोर पाऊस दिसतोय. अर्थात् पावसाची तयारी आहेच पूर्ण. पावसाचा त्रास एकच की फोटो नीट घेता येत नाहीत. वाहतुक अजूनही विरळ आहे. अधून मधून काही बस, प्रवासी गाड्या व ट्रक्स जात आहेत. धुकं दिसत नाहीय. मध्ये मध्ये तर ऊनही आहे. हळु हळु एक एक किलोमीटर मागे पडतोय. अगदी सहज मिळेल त्या गतीने सायकल चालवतोय, त्यामुळे ताण वाटत नाहीय़. आजूबाजूचा अफलातून निसर्ग! किती किती मी नशीबवान आहे! प्रत्येक किलोमीटरमधल्या नजा-यांचा पुरेपूर आनंद घेत जात राहिलो. हळु हळु अजून दूरवरचे डोंगर- द-या आणि नजारे दिसत आहेत. आणि आता तर घनदाट जंगलही सुरू झालंय! इतकं घनदाट की, कधीही वन्य प्राणी येतील असं वाटेल असं. आणि मध्ये मध्ये बोर्डही लागत आहेत की, वन्य प्राणी रस्ते क्रॉस करू शकतात, त्यांना जाऊ द्या वगैरे. सिंगल गेअरची सायकल असली तरी किती मस्त चढतेय चढावरही! ह्या घाटाचा पहिला पॅच इतका आरामात चढतोय तर पुढे नंतर अजून तीव्र भाग लागेल, तोही चढता येईल असं वाटतंय.

काही अंतरानंतर ह्या घाटातला उतार सुरू झाला. काही किलोमीटर रस्ता थोडा खाली उतरला. इथून दूरवरचे नजारे आता मस्त दिसत आहेत. पाऊसही थांबलाय. डोंगरातले ढग आता छान दिसत आहेत. आणि समोर काही काही भागामध्ये निळं आकाशही दिसतंय! म्हणजे बहुतेक तर मला पावसाने वाट दिलीय! पाऊस थांबल्यामुळे मस्त फोटो घेता आले. चोरला घाटामध्ये सह्याद्रीचं वैभव चोरलं आणि इथली अजूनही टिकलेली घनदाट वनश्री अक्षरश: लुटली! आणि मग घाटातला मुख्य चढ सुरू झाला. इथे मात्र वेग कमी होतोय. पण अगदी पायी जावं लागेल अशीही स्थिती नाहीय. संथ गतीने पेडल चालवत राहिलो. एक एक डोंगर मागे टाकून रस्ता वर चढतोय. ह्यावेळी असंच वाटतंय की, ही सायकल माझी मेरीडा सायकल आहे आणि हा घाट चोरला नाही तर स्पीतितला हिमालयाचा रस्ता आहे! काही‌ वेळेस तर ही गेअरचीच सायकल वाटतेय! आणि चोरला हाही खार्दुंगला, फोटूला, नमिकेला असा हिमालयातला ला वाटतोय! इतके ला आठवल्यावर तर ती ओळही आठवणारच- नज़रों में हो गुजरता हुआ ख्वाबों का कोई काफ़ला...

काही वेळाने मात्र ऊर्जा स्तर कमी होतोय अशी जाणीव झाली. सकाळी नाश्ता ठीक झालेला नव्हता. सोबत बिस्कीटाचा पुडाही ठेवायला विसरलो होतो आणि वाटेत दुकानही मिळालं नाही. त्यामुळे जरा थकवा वाटतोय. कुडाळच्या सायकल मित्रांनी दिलेला खाऊ उघडला आणि ड्राय फ्रूट व दोन चिक्क्या खाल्ल्या. दाट झाडीमुळे ऊन लागत नाहीय व तितकी तहान लागत नाहीय. त्यामुळे पाणी आहे पुरेसं. इथून पुढे घाट किती बाकी आहे हे नीटसं कळत नाहीय. मध्ये कोणचेच मैलाचे किंवा किलोमीटरचे दगडही लागत नाही आहेत. मोटरसायकलवर जाणारे काही जण माझी विचारपूस करत आहेत. काही काही‌ वेळेस इतर गाड्यांमध्येही लोक मागे वळून बघतात, हाताने शुभेच्छाही देतात. आता अगदी हळु सायकल चालवतोय. दूरवर बघण्याचा प्रयत्न करतोय की, डोंगर हटलेले दिसत आहेत का किंवा डोंगराची धार उतरताना दिसतेय का. आणि एका तीव्र चढाच्या वळणाच्या वेळी अखेर सायकलवरून उतरावं लागलं. तो पॅच पायी पायी पार केला. जरा कमी तीव्र चढ दिसला तेव्हा परत पेडलिंग सुरू केलं. आता समोर घाटमाथा आल्याचे चिन्ह दिसत आहेत. एका बाजूला दरी सुरू झालीय. नक्कीच रस्ता पुढे वळून मग उतार सुरू होईल. पण हळु हळु ऊर्जा स्तरही कमी होतोय. त्यामुळे परत एकदा पायी पायी सायकल चालवावी लागतेय. पण त्याचं वाईट असं वाटलं नाही. कारण डोंगरात जिद्द करायची नसते. सहजपणे जसं जमेल तसंच करायचं असतं.

नदियाँ, पहाड़, झील, झरने, जंगल और वादी

आणि आला, घाटाचा शेवट जवळ आला. समोर काही दुकानं दिसत आहेत. चला, आता इंधन भरता येईल! तिथे अगदी टपरीसारखं दुकान आहे. पण मला हवं ते सगळंच आहे- चहा, बिस्कीट, चिक्की आणि चिप्ससुद्धा! मस्तपैकी नाश्ता केला. पाणी भरून घेतलं. दुकानदारासोबत गप्पा मारल्या. इथेही मराठी चालतंय! दुकानाच्या बाजूला दरीच्या कठड्यावर माकडं बसली आहेत. त्यांनी येऊ नये म्हणून चक्क इथे जाळी लावलीय! आता सकाळचे १० वाजल्यामुळे ब-याच बस आणि गाड्या रस्त्यावर आहेत. दोन कप चहा, दोन बिस्कीट पुडे, काही चिक्क्या व थोडे चिप्स असा मस्त नाश्ता करून निघालो. दुकानदाराने सांगितलं की अजून दोन- तीन किलोमीटरपर्यंत घाट आहे, पण आता इतका चढ नाहीय. आणि चढ असला तरी आता मला थोडा आराम मिळालाय, इंधनही मिळालंय. त्यामुळे मजेत जाईन. पुढे थोडा चढ होता पण घाट संपतच असल्यामुळे आरामात पार केला. कर्नाटक सुरू झाला! अद्भुत असा चोरला! १६ किलोमीटरसाठी अडीच तास लागले, पण किती जबरस्त अनुभव देऊन गेला! ९०% घाट सायकलीवर चढता आला. बाय बाय गोवा, देव बरे करू!


.

.

.

.

घाटानंतर आसमंत बदलला! पुढे मोठा उतार नाही लागला, पण पठार सुरू झालं. आजूबाजूला दूरवर जंगल, झाडी आणि डोंगर दिसत आहेत! चोरला घाटाचा चढ नकाशात बघितला होता, तेव्हाच जाणवलं होतं की, हा घाट संपला तरी पुढेही काही चढ आहेत. आणि सगळ्यात उंच बिंदू तर पुढेच आहे. त्यामुळे पुढे काही सपाट रस्त्यानंतर परत चढ आलेच. हे चढ मोठे नाहीत, पण कर्नाटक सुरू झाल्यानंतर रस्त्याचा स्तर एकदमच घटला आहे. त्यामुळे हळु जावं लागतंय. थोडे थोडे उतारही आहेत. पण जंगल किती घनदाट आहे! इतकं दाट जंगल फार कमी वेळेस बघितलंय! घाट संपूनही ते तसंच पुढे सुरू राहिलंय. ब-याच वेळाने एकदाचा तो खरा माथा येऊन गेल्यानंतर मात्र हळु हळु उतार सुरू झाला. आता कुठे छोटी छोटी गावं येत आहेत. काही काही पॅचमध्ये रस्ता बरा आहे. बरेच लोक माझी विचारपूस करत आहेत. मोटरसायकलवालेही थोडे थांबतात, बोलतात आणि मग पुढे जातात.

रेडबूलचा किस्सा

एक कारवाला स्लो झाला व त्याने माझ्या टीशर्टवरचे वाक्य पाहून चौकशी केली. शुभेच्छा देऊन पुढे गेला. पुढे एका खड्ड्य़ाजवळ त्याची गाडी हळु जात होती, तेव्हा मी ओव्हरटेक करून पुढे गेलो. तेव्हा परत एकदा तो थांबला. त्याने विचारलं जेवण वगैरे केलंय का. मी बोललो की, नाश्ता केलाय, आता परत पुढे करेन. तेव्हा तो बोलला की, पुढे येणा-या जंबोटी गावात त्याचं गुरूप्रसाद हॉटेल आहे, तिथेच जेवण घे, तिथे मी बोलून ठेवतो. मी ठीक म्हणालो. इथे तसेही हॉटेल्स काही मिळत नव्हते तेव्हा म्हंटलं ठीक आहे. पाऊण तासाने जंबोटी गावात पोहचलो. हे जरा तरी मोठं गाव वाटतंय. त्याने सांगितलेलं गुरूप्रसाद हॉटेलही रोडवर दिसलं. मग तिथेच नाश्ता केला. त्याने लोकांना सांगितलं होतंच. इथेही चहा- बिस्कीट- चिक्की हाच नाश्ता घेतला. फक्त जेवणाची वेळ होती म्हणून तयार असलेली पाव भाजीही खाल्ली. निघेपर्यंत तो माणूस आलाच. साळुंखे त्याचं नाव होतं आणि मराठीच बोलत होता. परत एकदा कौतुक करून त्याने मला शुभेच्छा दिल्या. माझ्यासोबत हॉटेलच्या समोर सेल्फीही घेतला आणि मी निघणार, तेवढ्यात मला न विचारता माझ्या सायकलला लावलेल्या सामानात काही तरी ठेवलं. मला कळालंच नाही ते काय आहे. परफ्युमसारखी बाटली वाटली! विचारल्यावर तो बोलला की, रेडबूल आहे. इतक्या गरम ऊन्हात तुम्ही राईड करताय, तापला आहात, रात्री त्रास होईल, तेव्हा हे लागेल. मी मनात हसलो व त्याला विनम्रपणे ते परत केलं. त्याने परत परत विचारलं आणि मी ऐकत नाही म्हणून सोडून दिलं. मी मनात म्हणालो मला एकच रेडबूल माहितीय- रेडबूल ट्रान्स सैबेरियन अल्ट्रा सायकलिंग स्पर्धा!

बेळगांव २५ किमी पुढे आहे अजून, पण ह्या प्रसंगामुळे मला सारखं हसू येतंय! माझ्या एका जवळच्या मित्राची प्रतिक्रिया डोळ्यांपुढे येतेय आणि अजूनच हसू येतंय- "इतक्या प्रेमाने त्यांनी दिली होती, घ्यायची होती. शास्त्र असतं ते. मूर्ख आहेस तू, तुला काहीच कळत नाही!" ही गंमत व मित्राची आगामी प्रतिक्रिया अनुभवत हसत हसत पुढे जात राहिलो. रस्त्याचा दर्जा कमी असल्यामुळे पुढे बराच जास्त वेळ लागला. अजून एक चढ लागला आणि तो उतरल्यावर मग कुठे हळु हळु जंगल मागे पडून मळे- शेती सुरू झालेली दिसली. तिथून हळु हळु सपाट भाग जवळ येत गेला आणि मग कुठे बेळगांव जवळ आलं! सायकलने कमाल केली पण. काय घाट होता आणि काय नंतरचे खड्डे- दगडयुक्त रस्ते होते! घाटात १६ किलोमीटरला अडीच तास अपेक्षित होते तसं बेळगांवला पोहचेपर्यंत ३ वाजणंही अपेक्षित होतं. त्यातच वाटेत अनेक वेळेस लोक थांबवत आहेत आणि चौकशी करत आहेत. त्यामुळेही थोडा वेळ लागतोय.

आम्ही तुम्हांला काही न दिल्याशिवाय कसं जाऊ देऊ शकतो?

बेळगांवमध्ये पोहचल्या पोहचल्या एकाने अक्षरश: थांबवलंच. सगळं विचारल्यावर तो बोलला की, तुम्ही इतकी राईड करताय, हा सामाजिक उपक्रम करताय आणि आमच्या बेळगांवात आला आहात. आम्ही तुम्हांला असं जाऊ देऊ शकत नाही. काही तरी तुम्हांला आम्ही देऊ आणि तुम्हांला ते घ्यावंच लागेल. तो ऐकतच नाहीय बघून शेवटी बोललो की, मी चॉकलेट घेईन. मग त्याने मला एक नाही तर दोन चॉकलेट दिले. त्याचं बघून अजून एकाने दिले! ह्या पूर्ण मोहीमेत लोकांच्या जिव्हाळ्याचा व आपुलकीचा अनुभव असा सतत येत गेला!

सुरुवातीला बेळगांवमध्ये कोणतीच संस्था/ ग्रूप मिळत नव्हता. पण कुडाळ व गोव्यात रोटरी क्लब्ससोबत बोलणं झालं आणि बेळगांवही त्याच रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये येत असल्यामुळे त्यांच्याकडून बेळगांव रोटरियन्सशी संपर्क झाला. त्यांनी मला रिसीव्ह केलं, थोडा वेळ त्यांच्याशी भेट झाली. बेळगांव रोटरी क्लब अनेक सामाजिक कामांमध्ये सहभाग घेतो. वाटेत मला एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेल्या मदतीचा उल्लेखही दिसला होता. त्यांना भेटल्यावर त्यांनी व्यवस्था केलेल्या लॉजवर फ्रेश झालो. राईडमधले चढ बघितले! आज सुमारे ८८ किमी अंतर आणि त्यात १५९९ मीटर एकूण चढ होता! आजची राईड खूप मोठी होती, पण तितकं जास्त थकल्यासारखं वाटत नाहीय. आणि आज नेमका रविवार असल्यामुळे अन्य कोणता कार्यक्रम किंवा भेट ठेवता आली नाही. त्यामुळे संध्याकाळीही आराम झाला. रोटरीचेच एक सदस्य मला जेवणासाठी कंपनी द्यायला आले. त्यांच्यासोबत बोलता आलं. काय जबरदस्त दिवस गेला हाही!


.

.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

22 Nov 2022 - 12:59 pm | कर्नलतपस्वी

कारण डोंगरात जिद्द करायची नसते. सहजपणे जसं जमेल तसंच करायचं असतं.

एकदम सहमत, सायकलवर नाही पण कश्मीर मधे पायी खुप चाललो आहे.

पुढील प्रवासा साठी शुभेच्छा.

सौंदाळा's picture

22 Nov 2022 - 5:11 pm | सौंदाळा

चोरला घाट निसर्गरम्य आहे. मस्त झालेली दिसतेय सायकलसफर