सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 May 2023 - 4:31 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)

✪ तेलंगणाच्या अंतरंगातली राईड
✪ खाणी व वनांचा परिसर
✪ नितांत सुंदर निसर्ग!
✪ भुपालपल्ली- महाराष्ट्र व छत्तीसगढ़ सीमा दूर नाही
✪ १२ दिवसांमध्ये ९८८ किमी पूर्ण
✪ मोहीमेतील सर्वांत रोमांचक पर्वाची सुरूवात

सर्वांना नमस्कार. मानसिक आरोग्य जागरूकतेसंदर्भात लोकांशी संवाद करण्यासाठीच्या सायकल प्रवासाचा १२ वा दिवस, ५ ऑक्टोबर २०२२. आज दसरा आणि धम्म चक्र प्रवर्तन दिवस आहे आणि मी भूपालपल्लीला म्हणजे तेलंगणातल्या शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचेन. हे महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगढ़च्या सीमेलगत असलेलं गांव आहे. ५ ऑक्टोबरच्या सकाळी मी ज्यांच्याकडे उतरलो होतो त्या श्री. सुधीरजींनी वारंगलच्या सीमेपर्यंत मला सायकलवर सोबत केली! ज्येष्ठ नागरिक असलेल्या सरांसोबत राईड करणं प्रेरणादायी वाटलं! वारंगलचे अजून एक सायकलिस्ट बंडी वेणूजी दुस-या बाजूला राईड करत असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांनी मला भेटायला दुस-या एका सायकलिस्टला सांगितलं होतं. त्यांच्यासोबतही थोडं अंतर राईड झाली. त्यांनी मला परकालच्या दिशेने जाणारा रस्ता सांगितला आणि मी पुढे निघालो. ऐतिहासिक वारंगल शहर मागे पडलं आणि मी एका अगदी आतल्या बाजूच्या पण कमालीच्या सुंदर व हिरवागार प्रदेशाकडे निघालो! हायवे अजूनही तसाच आहे! पण भूपालपल्ली जवळ येईल तेव्हा तो थोडा बदलेल असं वाटतंय. बघूया कसं होतं.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/04/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

खाणी आणि वन प्रदेश बाजूला असलेलं भूपालपल्ली हे एक छोटं गावच आहे. टीआरएसने तेलंगणामध्ये जिल्ह्यांची पुनर्रचना केल्यानंतर ते जिल्ह्याचं मुख्यालय बनलं. वाटेत दक्षिण भारतीय शैलीचे मंदिर लागत आहेत! पण रस्ता जसा सीमेकडे येतोय, तसा मला हिंदीचा प्रभावही वाढताना दिसतोय. अशा अज्ञात भागात सायकलिंगमध्ये केवढा थरार अनुभवता येतोय! आणि त्यासोबत अप्रतिम आल्हाददायक वातावरण. पाऊस पडत नाहीय, पण वातावरण पावसाचं आहे. अतिशय आरामदायक वातावरण. जणू मी एसीमध्येच सायकल चालवतोय!

परकालमध्ये उजवीकडे वळालो. तेलंगणातले अगदी छोटे गावं मला बघायला मिळत आहेत. माझ्या ठरलेल्या क्रमानुसार दोन छोटे ब्रेक्स घेतले. भूपालपल्ली! किती वेगळं ठिकाण! छोटंच गाव दिसतंय. जवळ काही कारखाने व खाणी दिसत आहेत. आणि इथून सुरू होणारं वनांचं साम्राज्य! मला सांगितलं होतं त्यानुसार थेट भूपालपल्लीच्या राम मंदिरात गेलो. तिथे श्री. पुनीत राव आणि इतरांनी माझं स्वागत केलं. त्यांनी माझी गावातून एक छोटी मिरवणूकच काढली (पण त्यामध्ये सायकलीवर मी एकटा होतो). नंतर मला संघाच्या कार्यालयामध्ये आराम करता आला. अशी मिरवणूक किंवा सेल्फी इ. मला आवडत नाहीत. पण जर त्यामुळे सायकलिंगचा प्रसार होणार असेल तर काय हरकत, असा विचार केला. संघ कार्यालयामध्ये चांगला आराम झाला. इथे अनेक कार्यकर्ते थांबत असतात. संध्याकाळी दस-याच्या कार्यक्रमाला व तिथल्या भोजनासाठी राम मंदिरात गेलो. एकदम हवामान बदललंय आणि वादळी पाऊस आला. माझी सायकल रस्त्यावर बाहेरच लावलेली आहे, त्यामुळे थोडी काळजी वाटली. पण तिला काहीही झालं नाही.


.

.

.

.

.

उद्यापासून रोमांचक टप्पा सुरू‌ होईल. खात्री तर जवळ जवळ कशाचीच नाहीय. रस्ते कसे असतील आणि तिथली स्थिती कशी‌ असेल काहीच माहिती नाही. पण एक नक्की की मी अगदी निसर्गरम्य प्रदेशामधून जात असेन! असे १२ दिवस पूर्ण झाले व ९८८ किमी झाले. फक्त ६ दिवस राहिले आहेत! आणि मला जाणवतंय की, माझ्या सायकलीचं कदाचित पंक्चर होणारही नाही! मी इतक्या अंतरात सगळ्या प्रकारचे रस्ते पार केले आहेत आणि सायकलीला काहीच झालं नाहीय. जर इतक्या अंतरामध्येही काही झालं नसेल, तर ते पुढेही होण्याची शक्यता कमी आहे! बघूया! बोटे गुंफलेली म्हणजे fingers crossed आहेत!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजलेखअनुभव