सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Jan 2023 - 12:03 pm

✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)

२८ सप्टेंबरची पहाट! सायकल मोहीमेचा पाचवा दिवस. काल कोल्हारमध्ये चांगला आराम झाला आणि आता अगदी फ्रेश वाटतंय. प्रसन्न सकाळ- निरभ्र आणि आल्हाददायक हवा. उठून आवरायला लागत असतानाच ते प्रसिद्ध स्तोत्र कानांवर पडलं आणि अहा हा असं झालं! “कौसल्य सुप्रजा...” दक्षिण भारतातल्या पहाटेच्या प्रार्थना खूपच छान असतात! जानेवारी २००५ मध्ये (त्सुनामी मदत कार्याच्या वेळेस) थरंगमवाडीमध्ये ऐकलेलं पहाटेचं भजन अजून मनात ऐकता येतंय! दिवसाची सुरुवातच “कौसल्या सुप्रजा...” सोबत! आणि अशा गावामध्ये ते ऐकण्याचा अनुभव सुंदर! अहा हा! आणि माझी रिंगटोनही सध्या ह्याच स्तोत्राची इन्स्ट्रुमेंटल आहे!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/01/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)

आज मला १०० किलोमीटर राईड करायची आहे. आज विजयपूरा अर्थात् विजापूर लागेल. काल इथल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी शॉर्ट कट रस्त्याने न जाता हायवे घेतोय. पाचवा दिवस असल्यामुळे राईड आता अगदीच सोपी झाली आहे. फक्त अंतर जास्त असल्यामुळे थोडी ऊर्जा वाचवण्यासाठी मी एरोबिक पद्धतीने राईड करतोय. म्हणजे फक्त नाकाच्या श्वासावर. त्यामुळे गती किंचित कमी होते- मी ताशी २० किमीपेक्षा थोडं हळु चालवेन. पण त्यामुळे कम्फर्ट लेव्हल खूप वाढते व ऊर्जाही वाचते. मी हे सायकलिंगमध्ये ह्यापूर्वी केलं नाहीय, पण असे रन अनेकदा करतो. त्यामुळे हृदय गतीही कमी राहते. चला, निघूया! सकाळी ६.३० ला निघालो. मी रोज पूर्वेला व किंचित उत्तरेला जात असल्यामुळे ह्यावेळेपर्यंत व्यवस्थित प्रकाश आलेला असतो. आवरतानाच बिस्कीटं खाऊन घेतली. काय मस्त हायवे आहे हा! अगदी मोकळा आणि मोठा रस्ता! मला ही राईड करायची बुद्धी झाली ह्याबद्दल मनामध्ये परत परत धन्यवादाचा भाव येतोय! जीवनाने मला ही संधी दिली! किती आनंद! आसपास काही डोंगरही दिसत आहेत! आजची राईड तुफान रोमँटीक होणार तर!

विजयपूरा! अर्थात् इतिहासप्रसिद्ध विजापूर! रामदास स्वामींच्या त्या सांकेतिक ओळी आठवतात- वि जा पू र चा स र दा र नि घा ला आ हे! आणि त्यांचं "केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे" तर नेहमीच आठवतं! इथून महाराष्ट्र सीमाही जवळच आहे. अनेक वाहनं MH दिसत आहेत. साधारण ३० किलोमीटरवर ब्रेक घेतला- चहा- बिस्कीट आणि चिप्स. इथून पुढे रोडवर ह्याच गोष्टी घेईन आता. बिस्कीटस आणि चिप्स घेणं हे थोडं सायकलिंगच्या नियमाविरुद्ध जातं. पण थोड्या प्रमाणात मोडलेला नियम माझ्यासाठी फार उपयोगी पडतो. पुढेही मस्त डोंगर आहेत आणि आता तर मी पवनचक्क्यांच्या मधोमध राईड करतोय! त्यांचा तो मोठा आवाजही ऐकू येतोय! हायवेला लागूनच एक रेल्वे रूटही जातोय. नंतर हायवेने रेल्वे लाईन ओलांडली, तेव्हा रस्ता थोडा वेळ साधारण होता, पण हायवे झाला लगेचच. विजापूर! मी बायपास घेऊन वळालो. फार ट्रॅफिक न लागता विजापूर ओलांडलं. एकदोनदा रस्ता विचारावा लागला. तो विचारताना लोक विचारतात, कुठे जाणार? आणि मी सिंदगी सांगितल्यावर चकित होतात, कारण सिंदगी इथून अजून ५५ किलोमीटर तरी पुढे असेल. मी गोल घूमट लांबून दिसतो का बघितलं, पण बहुतेक तर नाही दिसला. माझ्या एका मित्रांनी तो बघायला सांगितलं होतं. आजचा टप्पा मोठा असल्यामुळे नाही बघितला व तसंच निघालो पुढे.

विजापूरनंतरचाही रस्ता चांगला आहे. काही गावं लागत आहेत व सपाट प्रदेशातून जातोय रस्ता. थोड्या अंतराने परत एकदा टेकड्या लागल्या. शॉर्ट कटचा रस्ताही आला इथे. काय दिवस आहे राईडसाठी! इतकं अंतर राईड करताना मानसिक तयारीही लागते. कधीकधी अंतर आणि आकडे त्रास देऊ शकतात. विशेषत: सतत १४००+ किलोमीटरचा किंवा १८ दिवसांचा विचार मनात येत असेल तर. परंतु सुदैवाने मला ह्या गोष्टी अजिबातच त्रास देत नाहीत. एका वेळी फक्त एका दिवसाचा विचार आणि राईड करताना तर फक्त पुढच्या २० किलोमीटरचा विचार! आणि मला माहितीय, ही क्षमता प्रत्येकाकडे आहे. त्यामुळे शंका घेण्यासाठी तर अजिबातच वाव नाहीय. ह्या सगळ्यांमुळे राईड खूप जास्त एंजॉय करता येतेय. आणि मला माहिती आहे की, ह्या रस्त्यावरचा प्रत्येक किलोमीटर- सगळा भाग मी कदाचित परत बघणार नाहीय. त्यामुळे ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. आरामात उरलेलं अंतर पूर्ण केलं. ९०% वेळेस फक्त नाकाने श्वास घेत होतो. सायकलिंगच्या सवयीमुळे कधी तोंडाने घेतला तरी परत सजगता ठेवून फक्त नाकाने घेत राहिलो. त्यामुळे राईड पूर्ण करताना सव्वापाच तासांमध्ये सिंदगीला पोहचलो तेव्हा मी फार थकलो नाहीय.

सिंदगीमध्ये फार भेटी झाल्या नाहीत. भारत विकास संगमच्या काही कार्यकर्त्यांनी माझं चौकात स्वागत केलं. त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती. पण ती एका कार्यालयात होती आणि वॉशरूम्स लांब म्हणजे दुस-या ठिकाणी होत्या. चांगल्या आरामाची गरज व पहाटे लवकर आवरण्याच्या गरजेमुळे मी शांतपणे त्यांना दुस-या ठिकाणची विनंती केली. ह्यात त्यांची काही चूक नव्हती, कारण अशा सायकलिंगमध्ये काय लागतं हे त्यांना माहिती नव्हतं. परंतु इथे भाषेची चांगलीच अडचण झाली. कारण एक कार्यकर्ता वकील असूनही त्याला इंग्लिश किंवा हिंदी येत नव्हतं. त्यामुळे माझी परिस्थिती समजावून सांगणं कठीण झालं. त्यामुळे मला कलबुर्गीच्या भारत विकास एकेडमीचे श्री. मार्तंड शास्त्री सर ह्यांची मदत घ्यावी लागली. इकडची सगळी व्यवस्था तेच करत आहेत. मग त्यांनी त्या लोकांना समजावलं व दुस-या ठिकाणी मी गेलो आणि तिथे मग आराम घेता आला.

भाषेचा अडथळा? हो आणि नाही. अशा किरकोळ गोष्टींसाठी हो, नक्कीच. पण ह्या मोहीमेतला भाव व संदेश सांगण्यासंदर्भात नक्कीच नाही. मोहीमेतला भाव आपोआप लोकांपर्यंत पोहचतो आहे. संध्याकाळी कार्यकर्ते व इतर लोकांसोबत थोडा संवाद झाला व सिंदगी गावामध्ये फिरता आलं. हा भाग कल्याण कर्नाटक म्हणून ओळखला जातो. कर्नाटकचा हा भाग पूर्वीच्या मुंबई इलाख्याशी (Bombay Province) जास्त जोडलेला होता. इथले अनेक जण तिकडे जायचे व महाराष्ट्रातलेही लोक इकडे व्यापाराला यायचे. त्यामुळे इथल्या कन्नडमध्ये अनेक मराठी शब्दही दिसले! इथल्या जेवणामध्ये सोलापूरी चटणीही मिळाली! पण एक गंमत आहे. हा दक्षिण भारत आहे, तरी अजूनही जेवणात भाताचं प्रमाण कमी आहे. चपातीच चालू आहे. कदाचित मी पुढे तेलंगणात जाईन तेव्हा हे बदलेल. बघूया! आज पाचवा दिवस पूर्ण झाला. आजचे १०१ किमी मिळून ५ दिवसांमध्ये ४३८ किलोमीटर झाले. उद्याचा दिवस मोठा असेल, कारण मी भारत विकास संगमच्या अनेक सदस्यांना कलबुर्गीत भेटेन. तसंच उद्या १/३ मोहीमही पूर्ण होईल.

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजजीवनमानलेखअनुभव