सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
6 Mar 2023 - 8:17 pm

✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा
✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते
✪ भीमा आणि गाणगापूर
✪ अशी राईड = अपूर्व आनंद
✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट
✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट
✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)

२९ सप्टेंबरची सकाळ, मोहीमेतला सहावा दिवस. आणि एक महत्त्वाचा टप्पा, कारण आज मी भारत विकास संगमचे प्रमुख श्री. बसवराज जी, श्री. शास्त्रीजी व इतरांना कलबुर्गीमध्ये भेटेन. त्यांच्या मदतीशिवाय ही मोहीम करता आली नसती. त्यामुळे आजच्या राईडची सुरुवात करताना ह्या मंडळींना भेटण्याची उत्सुकता आहे. काल सिंदगीमध्ये दत्तूजींनी मला चांगली सोबत केली. पहाटेही ते मी निघताना भेटायला आले. वाटेत मोहीमेतल्या प्रत्येक दिवशी भेटणा-या अशा सर्वांबद्दल मनामध्ये केवळ कृतज्ञतेचा भाव आहे. सगळ्यांच्या मदतीने होणारी ही मोहीम सोलो मोहीम नाही, तर एक सामुहिक प्रयत्नच आहे.

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/03/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

.

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर निघालो. पाऊस आणि ढग मला मदत करत आहेत, त्यामुळे सकाळी स्वच्छ हवा आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून उजवीकडे वळालो आणि हायवेला आलो. पुढे ३० किलोमीटरनंतर मला जेरातागीपासून डावीकडे गाणगापूरच्य दिशेला वळायचं आहे. आज परत विसरलो तर बागलकोटसारखा फेरा पडेल. त्यामुळे ह्यावेळी जास्त काळजी घेतली. पण अशी राईड करणे हा काय आनंद आहे! अवर्णनीय पर्वणी! आणि आता हे इतकं सहज सोपं वाटतंय की बस्स. ऑटो पायलटवर आहे सायकल. त्यामुळे मला फक्त आनंद घ्यायचा आहे, त्यात डुंबायचं आहे. हा खरच निसर्गासोबतचा खूप मोठा सोहळा होतोय आणि त्याबरोबर स्वत:सोबतही वेगळी भेट घडतेय. अशा वेगळ्या प्रवासात आपली स्वत:सोबत खरी भेट होते. पेडलिंग करताना मनात येणारे विचार व भाव मी बघतोय. कधीकधी अगदीच विचित्र आणि गमतीदर विचार मनात येतात, त्याचाही आनंद घेतोय. मनात उत्स्फूर्तपणे येणा-या गाण्यांचाही आनंद घेतोय.

दररोज नवीन ठिकाणांहून जात असल्यामुळे नवीन लोक मला बघतात आणि विचारपूस करतात. पण प्रश्न आणि चौकशी रोजचीच असते! तरीही, सायकलमुळे लोकांसोबत कनेक्ट होण्याची जी जादू होतेय, ती मात्र वेगळीच आहे. माझ्या गरजेनुसार ब्रेक्स घेतले. चांगल्या आरामानंतर पोट आता व्यवस्थित आहे. मी रस्त्यावर मात्र ठरलेले मोजकेच पदार्थ घेतोय. जेरातगीनंतर डावीकडे वळालो. हा रस्ता थोडा छोटा आणि लहान गावांमधून जाणारा आहे. छोटी गावं, शेतं आणि हिरवागार निसर्ग! परिसर अगदी महाराष्ट्रातल्यासारखा. इथून महाराष्ट्राची सीमाही तशी लांब नाहीच आहे. लवकरच गाणगापूरला पोहचलो. गंमत म्हणजे आज गुरुवार आहे. आधी उत्साहाने फुरफुरून वाहणारी ओघवती भीमा भेटली! काय तो प्रवाह आणि वेग! अहा हा! गाणगापूरातल्या मंदिराच्या पुढे जाऊन छोटा ब्रेक घेतला. हॉटेलवाल्याने चौकशी केली आणि मग मराठीत बोलणं सुरू केलं!

आजही मी शक्य होईल आणि जितकं लक्षात राहील तितका फक्त नाकानेच श्वास घेतोय. त्यामुळे नंतर ऊन्हातही कमी थकायला झालं. पुढचाही टप्पा सोपा झाला आणि कलबुर्गीला दुपारी सव्वापर्यंत पोहचलो. इथे मात्र माझं फारच भव्य स्वागत झालं. भारत विकास संगमचे कार्यकर्ते आणि रोटरी क्लबचे सदस्य कलबुर्गीतल्या राम मंदीर चौकाजवळ थांबले होते. त्यांनी इतक्या उत्साहाने स्वागत केलं की, तिथे चौकात जवळ जवळ ट्रॅफीक जामच झाला. मंदिरातही स्वागत झालं आणि स्थानिक चॅनलनी मुलाखतही घेतली. विकास एकेडमीचे श्री मार्तंड शास्त्रीजी व त्यांचे इतर लोकही भेटले. खूप आपुलकीने त्यांनी स्वागत केलं. इतकं अंतर मला पूर्ण करता आलं, ह्याचा आनंद त्यांनाही झाला आहे. ह्या प्रक्रियेत तेही सहभागी आहेत आणि अनेक ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था व लोकांसोबतच्या भेटीसाठी त्यांनी मदत केली आहे. शास्त्रीजींना भेटून खूप छान वाटलं.

संध्याकाळी राज्यसभा सांसद आणि मोठे नेते श्री. बसवराज जी सेडाम ह्यांच्याशी भेट झाली. ते आता सामाजिक रचनात्मक कार्याकडे वळलेले आहेत. इतके मोठे नेते असूनही ते साधे आणि डाउन टू अर्थ वाटले. ‘holier than thou’ असा भाव त्यांच्याकडे दिसला नाही. त्यांनी उत्सुकतेने माझ्या सायकल प्रवासाची चौकशी केली आणि प्रतिक्रियाही दिल्या. भारत विकास संगम हे विकासाच्या सर्व पैलूंवर काम करणा-या अनेक संस्था व संघटनांचं नेटवर्क आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम करणा-या भारतातील अनेक संस्थांचं हे नेटवर्क आहे. संध्याकाळी पाऊस पडत असल्यामुळे ह्या भेटीसाठी सायकल नेता आली नाही आणि संवादाचाही कार्यक्रम तसा छोटा झाला. परंतु अनौपचारिक प्रकारे अनेकांसोबत पुढेही बोलत राहिलो. शास्त्रीजी नंतरही सोबत होते आणि पुढच्या दिवसाच्या तयारीसाठीही त्यांनी मदत केली. कलबुर्गीतला दिवस असा गेला.

अतिशय स्वप्नवत हा प्रवास होतोय. सहावा दिवस पूर्ण झाला, एक तृतीयांश मोहीम पूर्ण झाली. मला आतून कळतंय की, सुरुवातीला एक एक दिवस अगदी हळु जातो. पण नंतर नंतर असा वेग येतो की मोहीम लवकर संपूनही जाते (हे लेखन मात्र त्या वेगाने होत नाहीय)! त्यामुळेच मी मोहीमेतल्या प्रत्येक दिवसाचा व क्षणाचा आनंद घेतोय. ६ दिवसांमध्ये ५२८ किमी पूर्ण झाले. उद्या कर्नाटकातला शेवटचा मुक्काम असेल. हे स्वप्नच आहे असं वाटतंय, खरं असणं शक्य वाटत नाहीय. मला ही मोहीम करण्याची बुद्धी दिल्याबद्दल आणि पुढची सगळी व्यवस्थाही करून दिल्याबद्दल जीवनाला धन्यवाद कसे देऊ?

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजजीवनमानलेखअनुभव