बस करा वृद्धांचे फालतू लाड

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in जनातलं, मनातलं
16 Nov 2021 - 10:44 pm

वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय .

६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.

वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे.

आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही.

मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत.

अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील

आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे

बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"

काय वाटतंय
कसे हाताळायचे हे वृद्ध ??

समाजविचार

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

16 Nov 2021 - 11:24 pm | सुचिता१

खुप च संवेदनशील विषयाला हात घातला आहे. तुम्ही मांडलेली समस्या नक्की च गंभीर आहे, पण अगदी सरसकटीकरण नाही करता येणार. कधीकधी उलट परिस्थिती पण असते

वय झालयं, आणि वेळ जात नाही म्हणून घरच्यांना वेठीस धरणारे व्रुद्ध सहनशीलते ची परीक्षा बघतात.
बर्याच वेळा घरातल्या तरुण व्यक्ती ची खोटी बदनामी करत असतात.
खुप असहाय्य आगतीक वाटते.
समस्या सार्वत्रिक आहे एवढे च सांगते.

सौन्दर्य's picture

16 Nov 2021 - 11:52 pm | सौन्दर्य

कित्येक वेळा वृद्ध किंवा वयस्कर नागरिक, घरातल्या व्यक्तीच्या कागाळ्या बाहेरील व्यक्तीस करताना आढळतात. अशा वेळी जे सांगितले जाते ते सत्यच असावे असे गृहीत धरून घरातील व्यक्तीस दूषणे दिली जातात. जर ती व्यक्ती सून असेल तर मग विचारायलाच नको. मग अशी ऐकणारी व्यक्ती जवळची असेल तर ती घरी येऊन उगाचच चार उपदेश करून जाते.

माझ्या परिचयापैकी एका घरात एक वयस्कर वडील राहत होते, काही कारणाने सुनेशी त्यांचे पटत नव्हते. मग ते सुनेच्या कागाळ्या आपल्या मुलींना सांगायच्या व त्या मुली वेळी-अवेळी येऊन सुनेला ऐकवून जायच्या. स्व:ताच्या घरून वडिलांना जेवणाचे डबे पाठवायच्या. सून घरी सर्वासाठी जेवण बनवत असे त्यामुळे तिला हे फारच अपमानास्पद वाटत होते. शेवटी तिने त्या मुलींना, "एकतर डबे पाठवू नका नाहीतर वडिलांना स्व:ताच्या घरी न्या", असा अल्टिमेटम दिला. नंतर खूपच रामायण घडले.

तर्कवादी's picture

17 Nov 2021 - 12:27 am | तर्कवादी

प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव वेगेवेगळे असतील. त्यामुळेच

कसे हाताळायचे हे वृद्ध ??

या प्रश्नाला सरसकट एकच एक उत्तर देता येणार नाही .. पण तरीही एकंदरीतच कोणत्याही दुसर्‍या व्यक्तीला (वृध्दच नव्हे तर कोणीही) सहन करत जगण्याचे दिवस आता गेलेत. आता माणसांचं व्यक्तीकेंद्रित निर्णय घेणं रुढ होवू लागलंयं. त्यामुळे काही दुर्गुणांकडे दुर्लक्ष करत एखाद्याशी जुळवून घेणं ठीक पण एखाद्याला अगदीच दीर्घकाळ सहन करायची गरज नाही (खासकरुन त्या व्यक्तीकडून कोणताच आनंद मिळत नसेल तर) त्याच्याशी अंतर राखावे , त्याच्यापासून दूर व्हावे हे योग्य. यानंतर जर त्या व्यक्तीला आपल्या चुकीच्या वागण्याचा खरंच पश्चाताप झाला तर झालं गेलं विसरुन पुन्हा संधी द्यायला हरकत नाही अन्यथा दूर राहण्यातच भले.

कंजूस's picture

17 Nov 2021 - 5:28 am | कंजूस

जवळपास सर्वच मालिकेत उदाहरणे आहेत. न ओरडणारेही त्रास देतात. बँकेतही नकोसे असतात.

विश्वनिर्माता's picture

17 Nov 2021 - 8:45 am | विश्वनिर्माता

काही वेळेस वृद्धांचे हट्टी वागणे पाहून तरुण मुले कडकपणे वागू बोलू लागतात. त्यानंतर वृद्धांना आपल्या वागण्यात बदल करावा वाटतो आणि तसा ते प्रयत्न करतात, पण मुलांमधला नवजागृत कडकपणा काही जात नाही. When such a situation occurs it's a very pitiful sight.

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Nov 2021 - 9:08 am | ज्ञानोबाचे पैजार

वृध्दांनीही आत्मपरिक्षण केले पाहिजे हे पटते आहे, तरुण लोकांना होणार्‍या त्रासा बद्द्ल पूर्ण सहमत.

गेल्या काही वर्षात समाजरचनेत झपाट्याने झालेले बदल ही पिढी पचवू शकली नाही. सध्या हयात असलेली वृध्द मंडळी तीच आहेत ज्यांनी काहीही करुन आपल्या मुलांच्या आकांक्षांचे पंख बळकट केले. मोठमोठाल्या फीया भरुन आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर केले परदेशी धाडले.

ह्या पिढीतल्या बहुतांश आई बापाची मुले घराबाहेर पडली आहेत एकतर ती गाव सोडून शहरात आली आहेत किंवा युरोप अमेरिकेत गेलेली आहेत. विभक्त कुटुंब पध्दत याच पिढीत सुरु झाली. खरेतर आताच्या म्हातार्‍यांपैकी बहूतांशी लोकांनी आपल्या आई वडिलांपासुन दूर जाऊन संसार मांडायचा पायंडा सुरु केला. जो पुढे रुढ झाला आहे. आता कुटूंब म्हणजे नवरा बायको आणि एखादे मुल हे आजच्या तरुण पिढीच्या डोक्यात फिट बसले आहे.

या म्हातार्‍या पिढीतल्या लोकांना साधारण चार चार पाच पाच बहिण भाऊ होते त्यामुळे स्वत:च्या वृध्द आई वडिलांचे म्हातारपणी या लोकांना फारसे करावे लागले नाही. त्या अर्थाने हे लोक म्हातारपणाचा अनुभव पहिल्यांदाच घेत आहेत.

पण या लोकांना एक किंवा फार तर दोन मुले / मुली आहेत. ज्यांनी देखिल लहानपणापासून घरात वृध्द मंडळी पाहिलीच नाहियेत. त्यामुळे ते लोक सुध्दा आपल्या आईबापाच्याद्वारे म्हातारपणाचा अनुभव पहिल्यांदाच घेत आहेत.

मागच्या वर्षी कोविड आला तेव्हा आपली सगळ्यांची कशी अवस्था झाली होती? पण आता साधारण दिड दोन वर्षांच्या अनुभवानंतर परिस्थिती बदलते आहे. आपण जास्त धिराने आणि आत्मविश्वासाने कोविडला सामोरे जात आहोत. तशीच काहिशी अवस्था सर्वांची हे म्हातारपण सांभाळताना होत आहे.

याला पर्याय एकच आहे खुलेपणाने एकमेकांशी संवाद साधणे. पण सध्या जेवण सुध्दा टिव्ही समोर किंवा आपल्या खोलीत मोबाईल बघत करण्याच्या दिवसात संवादाची भयंकर कमतरता आहे. आपण फेसबुक व्हॉट्सप वर जेवढे मोकळे पणाने व्यक्त होतो तेवढा मोकळेपणा घरात मात्र जपू शकत नाही.

या संवादाच्या आभावाला फक्त तरुण पिढीच नाही तर वृध्द लोक सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.

या येणार्‍या अनुभवातुन आजच्या तरुण पिढीने थोडेसे सावध व्हावे व अशा तक्रारी करायची वेळ आपल्या म्हातारपणी आपल्या मुलांवर येणार नाही याची आधिच तजविज करुन ठेवावी. कारण येणारा काळ तर अजूनच झपाट्याने बदलण्याचा असणार आहे.

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

17 Nov 2021 - 2:48 pm | तुषार काळभोर

इथून पुढे बुवांशी मी बाडिस असेल - बाय डिफॉल्ट सहमत!

आपला मुलगा लग्न झाल्यावर आपला राहात नाही हे सत्य आयांनी समजून घेतले नाही की कटकटी होतात.
वृद्ध पुरुषांची मला विचारून का ठरवले नाही इथे गाडी अडते...

देशपांडे विनायक's picture

17 Nov 2021 - 12:42 pm | देशपांडे विनायक

हे वाचून साठ एक वर्षांपूर्वीच्या एका लेखाची आठवण झाली. बहुदा दीपावली मासिकाचा दिवाळी अंकात हा लेख होता. नाव होत ''जगण्याचे हेच खरे वय ''बालपणापासून ते वृध्दावस्थेपर्यंत कोणत्याही वयात आनंद कसा असतो यावर लेख होते. आज मी ८० व्या वर्षात वावरत आहे तेव्हा मला सर्व अवस्थांचा अनुभव आहे हे नाकारण्याचे सबळ कारण कुणाकडे असेल असे वाटत नाही. पण मी स्वतःच सांगतो कि या पुढील वर्षात मी कसा वागेन हे मला सांगता येत नाही. साधारण ७५ व्या वर्षानंतर असं लक्षात  येते की ७६ वर्षाच्या माणसात  आणि आपल्या वयात असणारे अंतर एका वर्षाचे नाही. २५ वर्षाचा माणूस २० ते ३० वर्षाच्या माणसात सहज मिसळू शकतो. पण वृद्धावस्थेत हे घडू शकत नाही . या वयात येणारे अनुभव तुमच्या विचारात आणि मतांमध्ये प्रचंड बदल घडवून आणतात. मृत्यूपत्रातील बदल यामुळेच होतात.
 आजचे जीवन पूर्णपणे संगणक ,मोबाईल , टीव्ही यावर अवलंबून आहे. आजचे वृद्ध या विषयात अज्ञानी , निरिक्षर आहेत. काहीही नवे शिकण्याची ईच्छा या वयात नकोशी वाटते. आकलन शक्ती कमी झाल्याचा हा परिणाम असतो. वयाने कमी असणाऱ्या व्यक्तीकडून शिकणे नेहमीच जड जात असते. भारतातील तरुण , ज्यांना हे ज्ञान आहे त्यांना नेहमीच stress आणि टेन्शन असण्याचे ढोल इतके वाजत आहेत कि त्यांना हे ज्ञान शिकवण्याची विनंती करणे मूर्खपणा वाटू लागतो. कुणी धाडस करून विनंती केलीच तर यू टयूब वर सगळे आहे याचे मार्गदर्शन केले जाते. संवाद साधण्यासाठी हे योग्य वातावरण नाही. 
 ''   ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये.''                 
लहान मूल आपले बालपण वसूल करतो.      तरुण माणसे तारूण्य वसूल करतात. फक्त वृद्धांनी वृद्धत्व वसूल करू नये हे खरे असले तरी त्यांच्यावर वसूल करण्याची वेळ येऊ नये अशी व्यवस्था असली पाहिजे.                
 करोनाच्या सुरवातीपासून वृद्धांनी घराबाहेर पडू नये असे सांगण्यात येत आहे. मला हे वाचण्याचा आणि ऐकण्याचा कंटाळा आला. आणि एक दिवशी आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा मेसेज आला ज्यात नेहमीप्रमाणे वृद्धांनी घराबाहेर पडू नये हि सूचना होतीच. मी त्या मेसेजला उत्तर पाठवले ते खालीलप्रमाणे.   
 '' आपला मेसेज वाचला. मी घराबाहेर पडत नाही आणि पडणारही नाही. परंतु ही सूचना करताना तुम्हाला माझी घराबाहेरील कामे करण्याची सोयसुद्धा करावी लागेल हे लक्षात  घ्या. '
'< " पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही."               
 माकडिणीची ती पिलाला खाली घालून स्वतःचा जीव वाचवणारी कथा या वयात समजू लागते जी पूर्वी माहित होती. माझ्या मित्राने मला सांगितले होते कि कोणत्याही आजारपणात नळ्या घालून मला जगावयाचे नाही. मित्र म्हणून तुला हि जबाबदारी घेतलीच पाहिजे. मी तेव्हा होकार दिला पण वेळ आली तेव्हा मनातल्या मनात त्याला सॉरी म्हणत उघडया डोळ्यांनी मूकपणे सगळं पहात बसलो. आपण जसे बोलतो तसेच आहोत हा आपला फार मोठा भ्रम वेळ  आली कि फुटतो याचा अनुभव वृद्धावस्थेत फार वेळा येतो मी कणखर आहे,माझं कुणावाचून अडत नाही ,मला नाही मरण्याची भीती वाटत वगैरे वगैरे सारे फक्त शब्द असतात हि जाणीव अति क्लेशकारक असते.
 <<< "  स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत.''
आजचे वृद्ध ज्या प्रकारे जगले त्यातील कोणत्या गोष्टी आजचे तरुण अवलंबताना दिसतात ? अतिशय शांतपणे या गोष्टी तरुणांनी मोडीत काढल्यात. आणि नातू मंडळी तर परग्रहावरून आलीत असे वाटते . 
  <<<  " बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"                   
   तरुण पिढीत आणि जेष्ठ पिढीत एकच फरक आहे असं नाही . पण वर सांगितलेला थम्ब रुलकडे दुर्लक्ष करून तरुण पिढी जगू शकते वृद्ध नाही.   

श्वेता व्यास's picture

17 Nov 2021 - 1:11 pm | श्वेता व्यास

युग कोणतेही असो, वेगळ्या पिढीला समजावून घेणे सगळ्यांसाठीच कठीण असते. पूर्वी हिंदू धर्मामध्ये असणारी वानप्रस्थाश्रम ही अतिशय योग्य प्रथा होती इतकंच नमूद करायचंय.

सर टोबी's picture

17 Nov 2021 - 1:42 pm | सर टोबी

काही प्रसंग

प्रसंग १: प्रथितयश कंपनीचे रिसेप्शन. मी तिथे कामाचा शेवटचा दिवस म्हणून लॅपटॉप परत करायला गेलो. सध्ध्या एकूणच लोकांशी संपर्क कमी असल्यामुळे लोकं एकमेकांशी वागण्याचे सौजन्य विसरत चालले आहेत कि काय अशी शंका यावी असा ऑफिस स्टाफचा वागण्याचा नूर. माझ्याकडून तुम्ही काय काय वस्तू परत करणार आहात आणि शेवटचा दिवस कोणता आहे अशी इमेल पाठवा असे सांगण्यात आले. मला हा प्रकार काही पचनी पडला नाही. लॅपटॉप परत घेताना काय काय परत मिळणे आवश्यक आहे याची माहिती कंपनीकडेच असणं आवश्यक आहे. तरी काही वाद न घालता इमेल पाठवली. परंतु तिथला इसम अतिशय उद्धटपणे तरातरा चालत येऊन माझ्यावर ओरडला कि तुम्ही सर्व माहिती पाठवली नाही. तुमचा शेवटचा कामाचा दिवस कोणता आहे ते कळवा. त्याची माफी मागून परत एक इमेल लिहिली.

प्रसंग २: सोसायटीत संध्याकाळच्या वेळेत जा ये करताना खेळणारी मुलं अज्जीबात वाहनाच्या समोरून हलायला तयार नसतात. त्याबद्दल व्हॅट्सऍप ग्रुपवर विचारणा केली असता उलट पालकच तुटून पडले. मुलांशी 'समजुतीने' बोललं तर ती ऐकतात वगैरे उपदेश केला. त्यानंतर ती मुलं अगदी उघडपणे बेदरकारपणे वागायला लागली.

वरील प्रसंग याकरता सांगितली आहेत कि येणाऱ्या काळात जितका प्रत्यक्ष संपर्क कमी होत जाईल तितका भावनिक बुध्द्यांक देखील कमी होत जाण्याचा धोका आहे.

आता वृदधांकडे वळूया. काही वर्षांपूर्वी पुणे-मुंबई प्रवास करताना हमखास कुणीतरी वृध्ध बरेच फॉर्म्स घेऊन रिझर्वेशनच्या रांगेत असायचा. बर मिळतो तो बर्थ घेऊन समाधानी होतील असे नाही. त्यातही त्यांचा चोखंदळपणा. ज्या गाडीसाठी आरक्षण करतायत तिचे आरक्षण मिळत नसेल तर अजूनच त्रास. सगळ्या रांगेचा खोळंबा करून यांचं हि गाडी नाही दुसऱ्या गाडीत बघा असा धोशा. आणि वर एकाच रांगेतल्या नंबरवर अर्धा डझनभर रिझर्वेशन्स. बँकेतही तसाच प्रकार. आपण शनिवारचा दिवस बघून बँकेच्या कामाला जावं तर तिथे हे मुलगी, जावई, मुलगा, सून, शेजारी या सर्वांची पासबुक भरायला आलेली असायची. ती भरून मिळाल्यानंतर तिथेच तपासून बघून अमकी एन्ट्री दिसत नाही म्हणून हुज्जत घालणार.

हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे प्रश्न केवळ एक तर्फीच नाहीयेत. त्यातल्या त्यात तरुणांना काही समजावून सांगता येईल. पण वृदधांकडून तोही आनंदच.

मुंबई छत्रपती टर्मिनसला प्रथम फॉर्म दाखवून टोकन देण्याची प्रथा आहे. त्यामध्ये जी खिडकी रिकामी होते तिकडे नंबर जातो आणि गाड्यांच्या चौकशा करणाऱ्यांपासून मुक्त होतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Nov 2021 - 3:58 pm | अमरेंद्र बाहुबली

मी पुण्यात आलो तेव्हा काही कामानीमीत्त एका लाॅज वर थांबलो. चांगले ८ दिवस होतो तिथे. तारीख २६ ते ४. रीसेप्शन ला एक वयोवृध्द आजोबा कूठूनतरी रीटायर्ड झालेले. सामान्यपणे किती दिवस थांबनार त्या नंतर किंवा अगोदर लाॅजवाले पैसे घेतात. हे आजोबा रोज संध्याकाळी माझ्याशी हुज्जत घालायचे पैसे दे म्हणून. बोलताना तुझ्यासारखे अनेक पाहीले वगैरे, मी ईथे नोकरी केली तिथे केली वगैरे. मी लाॅज मालकाला फोन लावला नी सांगीतलं की मी ह्या तारखेपर्यंत थांबनार आहे. पैसे त्या तारखेलाच दिले तर चालतील ना? मालकाने होकार दिला. पण हे आजोबा ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी आठ दिवसात दोन तीन दिवसांच्या अंतराने तीन वेळा बिल दिले. बिलात आजोबानी घोळ केला, २६ तारखेला जो महीना होता तोच महीना पुढील महीन्याच्या ४ तारखेला ही टाकला. माझं तेव्हा लक्ष नव्हतं. नंतर मी १५ दिवसानी येऊन सदर दुरूस्ती करून द्या म्हणून सांगीतलं पण आजोबा म्हणायला लागले ऊद्या सकाळी मालक दहा वाजता येतील ऊद्या दहा वाजता या. ( लोकांचे कामं अडवून ठेवायच्या कूठल्यातरी भागात असावेत आधी) मी पुन्हा मालकाला फोन केला, मालकाने त्याना नवीन बिल बनवून देण्यास सांगीतले. माझ्याकडे बिल नव्हते फक्त त्यांचे फोटो होते मोबाईल मध्ये घेतलेले. त्यांच्या कडे असलेल्या कार्बन काॅपीतही दिसत होता घोळ तरी मला ओरीजीनल बिल हवेत वगैरे हुज्जत सुरू केली आजोबानी. पुन्हा मालकाला फोन करायला लागलो तर आजोबा बनवून देतो पुन्हा मालकाला फोन करू नका वगैरे म्हणून विनंत्या करू लागले. त्या आठ दिवसात असंख्य वेळा त्या आजोबानी अपमान केला. (माझाच नाही ईतरही बरोबरीच्यांचा) पण वयस्कर म्हणून दुर्लक्ष केले.

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2021 - 3:59 pm | कर्नलतपस्वी

लेखकाचे अभिनंदन त्यांनी एक बाजू मांडताना दोन्ही पिढ्यांना एकमेकांना समोर उभे केले. प्रत्येक प्रतीसाद आपल्या ठिकाणी बरोबर आहे पण पूर्ण नाही.

मी स्वतः एक जेष्ठ नागरिक आहे. नाण्यांची एक बाजू बघीतली. आता दुसरी बाजू अनुभवत आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती.

"पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,"

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,
शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

आता विसाव्याच्या क्षणी एकच वाटते,

तू गेल्यावर फिके चांदणे
घरपरसू हि सुने सुके

तू गेल्यावर दोन दिसास्तव
जर हि माझी अशी स्तिथी
खरेच माझ्या आधी गेलीस
खरेच माझ्या आधी गेलीस
तर मग माझी कशी गती?

आणी आता एकच इच्छा,

सुखोत्सवें असा जीव अनावर,
पिंजऱ्यांचे दार उघडावे,

संधिप्रकाशांत अजून जो सोने,
तो माझी लोचने मिटो यावी…

असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवीं कासावीस झाल्याविना,

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची….

तूच ओढलेले त्यासवें दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें,"

सर्व काही बाकीबाब

दोन्ही पिढ्यांनी एकमेकाला समजून घेतले पाहिजे. टाळी एका हाताने वाजत नसते.

राघव's picture

17 Nov 2021 - 5:04 pm | राघव

समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2021 - 8:04 pm | चौथा कोनाडा


समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.


+१
शत प्रतिशत १००% सहमत

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

आणि माणसांना एका तराजूत तोलता येत नाही ...

त्यामुळे मुले कमवायला लागली की, आपापले टाळ घ्यायचे आणि आपापल्या मंदिरात कायमचे प्रस्थान करायचे

हे विश्र्वची माझे घर....

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2021 - 7:10 pm | कर्नलतपस्वी

संस्कार फार महत्त्वाचे, उचलली जीभ लावली टाळ्याला फार सोपं पण तीच परिस्थिती स्वतः वर आल्यावर मात्र काय वाटेल याचे भानही ठेवावे लागते. कुटुंब संस्थे मागे एक फार मोठा उद्दिष्ट आहे. आई वडीलानीं पण असेच ठरवले आणी मुलांना पण आपले टाळ उचलून बाहेर काढून टाकले तर काय? हा विषय एवढा साधा नाही. लेख लिहीण्या मागे सुद्धा काही कारण असेलच.

दुसर्या मुलाचे लग्न झाले की, आपण घराबाहेर .....

वृद्धाश्रम शोधून ठेवला आहे ....

लटकेश्र्वरांना वेळ मिळत नाही

त्यामुळे, आपणच बाहेर पडायचे

आग्या१९९०'s picture

17 Nov 2021 - 7:28 pm | आग्या१९९०

तुम्ही तिशी ते चाळिशीत असाल तर घरातील वृद्धांचे वागणे सहन करणे कठीण असते. परंतु तुम्ही पन्नाशी ते साठीत असाल आणि सुदैवाने असे वृद्ध आई वडील घरात असतील तर तुम्ही त्यांना सहन करू शकता. ते गेल्यावर घरात खूप मोठी पोकळी निर्माण होते. त्यांचे विक्षिप्त वागणे, त्यांच्या आजारात सेवा करणे ह्यातही आनंद घेता येतो. ते असे पर्यंतच आपले नातेवाईक त्यांना भेटायचे निमित्त करून घरी येतात. नंतर हळूहळू एक एक नातेवाईक आपली चौकशीही करायचे टाळतात. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2021 - 7:54 pm | कर्नलतपस्वी

वडील दहा वर्षाचा असताना गेले, घरी खाणारी तोंडं जास्त, आईने अक्षरशः हाडाची काडे करून मोठे केले.

आई वृद्धपकाळा मुळे एक्कयांशी वर्षात गेली. जाण्याची दिवशी आमच्या सौभाग्यवती ने त्यांच्या इच्छेनुसार गोड धोड खाऊ घातले. मध्य रात्री भुक लागली म्हणून दूध पिण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतः अर्धा कप दुध पाजले. तीला झोपेत देवाज्ञा झाली.
आईने जर वाऱ्यावर सोडले असते तर काय झाले असते?

एखादा अडीअडचणीला उपयोगी पडला म्हणून आपण किती उपकार मानतो मग ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या बदल एवढे सुद्धा आपण करू शकत नाही का?

त्याच बरोबर जेष्ठानीं सुद्धा बदलत्या काळानुसार वागले पाहिजे.

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 8:11 pm | मुक्त विहारि

आमच्या आजीला, 12 मुले, पण सगळेच लटकेश्र्वर, त्यामुळे, ऐनवेळी कुणीच न्हवते ...

आजी जळगांवला आणि सगळे लटकेश्र्वर किमान 300-400 किमी दूर

तशीच गोष्ट दुसर्या आजी बाबत झाली

ऐनवेळी मामाला परगावी जावे लागले

असो,

तुम्ही आणि तुमची आई भाग्यवान (आणि तुमची सौ. सर्वात जास्त भाग्यवान, सासूची सेवा करण्याचे पुण्य, फार कमी लोकांना मिळते.)

आमची दोन्ही मुले लटकेश्र्वर असल्याने, आमचा मार्ग वेगळा आहे.

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2021 - 9:45 pm | कर्नलतपस्वी

नमस्कार, म्हणता ते पण खरे आहे.

मुक्त विहारि's picture

18 Nov 2021 - 2:07 pm | मुक्त विहारि

माणसाला एकाच चौकटीत बांधू शकत नाही ...

माझ्या आधीच्या पिढीला, वृद्धाश्रम ही संकल्पना पटत न्हवती.

आमच्या पिढीतील, काही सुखवस्तू व्यक्ती, आर्थिक दृष्टीने योग्य असा वृद्धाश्रम निवडत आहेत ... किमान दहा हजार महिना ते पन्नास हजार महिना... हा सध्याचा भाव आहे ....

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2021 - 7:55 pm | कर्नलतपस्वी

वडील दहा वर्षाचा असताना गेले, घरी खाणारी तोंडं जास्त, आईने अक्षरशः हाडाची काडे करून मोठे केले.

आई वृद्धपकाळा मुळे एक्कयांशी वर्षात गेली. जाण्याची दिवशी आमच्या सौभाग्यवती ने त्यांच्या इच्छेनुसार गोड धोड खाऊ घातले. मध्य रात्री भुक लागली म्हणून दूध पिण्याची इच्छा व्यक्त केली. स्वतः अर्धा कप दुध पाजले. तीला झोपेत देवाज्ञा झाली.
आईने जर वाऱ्यावर सोडले असते तर काय झाले असते?

एखादा अडीअडचणीला उपयोगी पडला म्हणून आपण किती उपकार मानतो मग ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांच्या बदल एवढे सुद्धा आपण करू शकत नाही का?

त्याच बरोबर जेष्ठानीं सुद्धा बदलत्या काळानुसार वागले पाहिजे.

पुंबा's picture

17 Nov 2021 - 9:38 pm | पुंबा

+१११

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण ! शरीराचा एक एक भाग काम करणे कमी करतो. कधी डोळे कधी कान तर कधी इतर काही. तेव्हा त्यांना सांभाळुन घेणे हे महत्वाचे. इथे कोणी चिरतारुण्य उपभोगु शकत नाही, त्यामुळे उध्या आपण देखील त्याच अवस्थेत जाणार आहोत हे लक्षात ठेवुनच आजच्या वृद्ध लोकांशी व्यवहार करावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.

मुक्त विहारि's picture

17 Nov 2021 - 8:26 pm | मुक्त विहारि

थोडे वेगळे विचार मांडतो...

पुर्वीची 8 ते 5 ड्युटी गेली आणि आता 12-14 तासाची ड्युटी आली

आता नवरा आणि बायकोला, दोघांनाही नौकरी शिवाय पर्याय नाही

प्रेम असले तरी, वेळ कुठून काढणार?

माझ्या दोन्ही मुलांचा, मी वृद्धाश्रमात जाऊ नये, असाच हट्ट आहे...

पण, पुढे होणारी त्यांचीच कुतरओढ मला बघवणार नाही ...

काळ बदलत आहे, आपणही बदलायला हवे ...

तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहेही. पण इतकं रॅशनली बहुतेक जणांना नाही राहता येत.
कितीही म्हटलं तरी आपलं कुणी आपल्यासोबत आहे ही भावनाच खूप जणांना दिलासा देणारी असते.

दोन उदा:
१. एक म्हातारी, जन्मभर जॉब केला. तोवर तोंडाच्या पट्ट्यानं सगळ्या जवळच्यांना दुखवून ठेवलं. ज्या मुलानं तिची जबाबदारी घेतली तो नेमका लवकर गेला. बाकीच्या दोघांनी हात वर केले. अक्षरशः १ महिनासुद्धा कुणी ठेवून घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती. त्यातच ती गेली.
२. एक म्हातारी, विधुराशी लग्न केलं. जन्मभर जॉब केला. उभी हयात लोकं जोडण्यात गेलीत. प्रचंड भोग भोगलेत पण मनातले आणि तोंडातले मार्दव कधी कमी झाले नाही. आज एक सावत्र मुलगी आणि एक सख्खी मुलगी आहे असे लोकांना सांगीतले तरी खोटं वाटेल इतकं प्रेम आहे. दोन्ही मुली स्वतःहून आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी भांडतात. नातवंडांना आजीला बघीतलं की गगन ठेंगणं होतं. आनंद ओसंडून वाहणारं घर आहे.

पुन्हा म्हणतो, समजूतदारपणा नसलेल्या व्यक्तीचा सहवास, मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीतील असो, त्रासदायकच असतो.

तसेच होते ....

एकाच घरांत तीन वेगवेगळ्या पातळ्या राहू शकत नाहीत

मी टांगेवाला, मुलगा कारवाला आणि होणारी नातवंडे हेलिकाॅप्टर वाली...

देवानंद ते सलमान खान व्हाया धर्मेंद्र, अशीच जगरहाटी असते

(देवानंदने एकाच सिनेमात शर्ट काढला, धर्मेन्द्रने तीन चार सिनेमात तर सलमान साधारण पणे दर सिनेमांत... अशावेळी देवानंद सारखे रहायचे ...

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया...)

मुक्त विहारि, कर्नलतपस्वी वगळता बहुतेकांचे प्रतिसाद वृद्धांच्या विरोधात दिसतायत. वृद्ध आणि तरुण यांच्यामधील विसंवाद हा पूर्णपणे आजच्या काळातलाच आहे असं नाही सुमारे तीस चाळीस वर्षांपूर्वीही तो थोडाबहुत दिसत असे. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे तो अधिक प्रकर्षाने दृष्टीस येतो. आणि याचमुळे वृद्धांची बाजू प्रभावीपणे समोर येत नसावी. वृद्ध माणसे सर्व गुणसंपन्न असतात, त्यांचे काही चुकतच नाही असे म्हणणे नाही. अनेक वृद्ध एककल्ली, हेकेखोर असतातही पण तरुणही वृद्धांना समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत असू शकतील. वेगाने बदललेली जीवनशैली, व्यावसायिक ताणतणाव हे त्याचे कारण असू शकते.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 7:19 am | मुक्त विहारि

ह्या चार वेगवेगळ्या पातळ्या आहेत आणि प्रत्येकाचे जगण्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि प्रत्येकाची जगण्याची स्वप्ने किंवा ध्येये वेगवेगळी असतात आणि ती स्वप्ने साकारण्याचा साठी लागणारा वेळ देखील वेगवेगळा असतो

चला, आता परत एकदा, Incepetion बघावा लागणार... नोलानने हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगीतली आहे ...

वृद्ध तर काय, काही काळाचे सोबती आहेत. त्यांच्यापेक्षा हल्लीचे तरूण त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या लहान मुलांचे जे लाड पुरवत आहेत, ते पुढे वय वाढले की जास्त घातक सिद्ध होणारे आहेत.
उदाहरणार्थ हल्ली तरूण वयात लठ्ठपणा, रक्त शर्करा, रक्तदाब, मानसिक तणाव, पाठीचे रोग, थायरॉईड, निद्रानाश, अनावश्यक खरेदी, बाहेरचे खाणे, व्यर्थ करमणुकीत अहोरात्र गुंतणे, असहनशीलता, लहान वयातच (मोबाईल, टॅब, गेम्स, वगैरेंमुळे-) चष्मा लागणे, लहान मुलातील लठ्ठपणा, लहान मुलांकडून पालकांच्या अवाजवी अपेक्षा आणि त्यापायी त्यांचे कोमेजणारे बाल्य, आई-वडिलांची भांडणे आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम... एक ना दोन, अश्या अनेक गोष्टी घडून येत आहेत. वेळीच सावध व्हा, आत्मपरिक्षण करा स्वतःच्या वृत्ती ताब्यात ठेवायला शिका, असे सांगावेसे वाटते.

सुबोध खरे's picture

19 Nov 2021 - 10:16 am | सुबोध खरे

६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.

वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते हा वाक्प्रचार सत्य आहे पण "हल्ली" अत्यंत एककल्ली हट्टी हे सत्य नाही
कारण शतकानुशतके वृद्धच नव्हे तर तरुण सुद्धा आपल्या मताला ठाम असतात. पूर्वी एकत्र कुटुंबात तरुणांच्या मताला किंमत नव्हती आणि आता विभक्त कुटुंबे झाल्यामुळे दोन्ही कुटुंब प्रमुख आपल्या मतांवर ठाम असतात यातून संघर्ष निर्माण होतो. हा दोन पिढ्यातील संघर्ष आहे आणि हा कायमच राहणार आहे.

मी पाहत असलेले वृद्ध माणसांचे काही प्रश्न येथे मांडत आहे.

१) बहुसंख्य वरिष्ठ नागरिक हे जुन्या पिढीतील असल्याने त्यांचा सरकारी बँकांवर भरपूर विश्वास आहे. शिवाय शेअर बाजारावर विश्वास नसल्याने बँकेच्या मुदत ठेवीत बचत करणे हा स्थायीभाव आहे. त्यामुळे बहुसंख्य सरकारी बँकांमध्ये त्यांच्या मुदत ठेवी असतात आणि दर महा त्याचे व्याज जमा झाले का यासाठी तेथे रांग लावून उभे राहणे हा त्यांचा आवडता उद्योग आहे. वयपरत्वे तेथे जाणे झेपत नसले की हि कामगिरी त्यांच्या मुलांवर पडते आणि मुले त्याला वैतागतात कारण सरकारी बँकांत "सेवा" हि केवळ कागदोपत्रीच असते.

त्यातून पूर्वी बँकेच्या मुदत ठेवीना १ लाख रुपयांपर्यंतच विम्याचे संरक्षण होते आणि सहकारी बँकात १% व्याज जास्त मिळत असल्याने वेगवेगळ्या सहकारी बँकात एक एक लाख रुपयाच्या असंख्य मुदत ठेवी ठेवणे आणि दर महिन्याला कुठली ना कुठली मुदत ठेव मुदत पूर्ण झाल्याने त्याचे पुनरुज्जीवन करणे हा उद्योग अनेक वरिष्ठ नागरीक करत असतात.

अवयव गलित गात्र झाले (किंवा अशा माणसाचे निधन झाले) कि त्यांच्या मुलांना हे सगळे प्रकरण निस्तरणे कठीण होत जाते. त्यातून पुढच्या पिढीच्या मुलांचे कामाचे तास सकाळी ९ ते रात्री कितीही असल्याने ते स्वतः खाजगी बँकात इंटरनेट बँकिंग करत असल्याने त्यांना असे रांगेत उभा राहणे हा निव्वळ कालापव्यय वाटतो. माझ्या दवाखान्याच्या खालीच स्टेट बँक आहे जेथे अनेक वरिष्ठ नागरिकांची मध्यवयीन मुले पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी रांगेत उभे राहून वडिलांची पासबुक भरून घेणे किंवा मुदतठेव पुनरुज्जीवित करणे हा उद्योग करत असताना दिसतात.

हि खाती बंद करून एकाच खाजगी बँकेत गुंतवणूक करा आणि घर बसल्या पासबुक भरून घेणे किंवा मुदतठेव पुनरुज्जीवित करणे हा सल्ला कोणीही वरिष्ठ नागरिक मानताना मला दिसला नाही.

सध्याच्या वरिष्ठ नागरिकांनी संपूर्ण बंदिस्त अर्थव्यवस्था ते खुली अर्थव्यवस्था हामार्ग क्रमणाचा काळ पाहिलेला असला तरी बहुसंख्य वरिष्ठ नागरिक आजही नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यात कमी पडतात. त्यामुळे मोबाईल किंवा संगणकावर उपलब्ध असलेल्या असंख्य सेवाना ते वंचित राहतात.

यात त्यांना "जमत नाही पेक्षा मला जमणारच नाही" हा दुराग्रह हटकून दिसून येतो.

आमच्या वडिलांनी वयाच्या ८० वर्षानंतर संगणक शिकून महाराष्ट्र सेवा संघ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सारख्या संघटनांची घटना तयार करून टंकित केली
८५ व्या वर्षी त्यावर आपले आत्मचरित्र सदृश्य जीवनकथा लिहिली आणि वर्ड चे पीडीएफ करून त्याचे चार भाग करून आपले पुस्तक तयार करून घरीच छापून काढले. मोबाइलचा उपयोग करून ते व्हॉटस ऍप वापरत असत आपल्या संगणकावर यु ट्यूब वर आपले आवडते कार्यक्रम आणि नाट्यसंगीत पाहणे हा त्याचा आवडता छंद होता.

आपल्याला संगणकातीळ बर्याच गोष्टी येत नाहीत त्या नातवंडांकडून शिकून घेणे हा त्याचचं फावल्या वेळातील उद्योग होता.

२) नातवंडे किंवा त्यांच्या वयाच्या मुलांना फुकटचा सल्ला देणे आणि आमच्या वेळेस कसे चांगले होते आणि आजचा काळ किती वाईट आहे आणि तुमच्या पिढी ला शिस्त नाही कि वरिष्ठांबद्दल आदर नाही हे रडगाणे गाणे हे वरिष्ठ नागरिकांचा आवडता फावल्या वेळचा उद्योग असतो.

त्यामुळे हि मुले त्यांच्या वार्याला उभी राहत नाहीत. त्यामुळे आजकालच्या मुलांना आमच्या साठी वेळच नसतो हि सदा सर्वकाळ त्यांची तक्रार ऐकू येते.

क्रमशः

खरे साहेब, तुमचे प्रतिसाद नेहमी नेमके आणि सुस्पष्ट असतात. वरील प्रतिसादही तसाच आहे, आणि त्यात शेवटी 'क्रमशः' असल्याने पुढील भाग वाचण्याची उत्सुकता लागलेली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2021 - 1:08 pm | प्रसाद गोडबोले

सर्वप्रथम ह्या अवस्थेत , हया परिस्थीतीत आपण एकटेच नाहे , तुम्ही आणि तुमच्यासारखे अनेक जण आहेत हे पाहुन आमचे दु:ख बरेच हलके झाले ! =))))

सोप्पे गणीत आहे :
भारतात अ‍ॅव्हरेज लाईफ एक्स्पेक्टन्सी ७० आहे, महारष्ट्रात ७२.
त्यामुळे ०-२४ ब्रह्मचर्य , २४-४८ गृहस्थ, ४८-७२ वानप्रस्थ आणि ७२ नंतर संन्यास अशी आयुष्याची आम्ही विभागणी केलेली आहे. स्वतःसाठी आणि आसपासच्या सर्वच लोकांसाठी ! जो कोणी आपापला वयोगटाचा विचार करत नसेल त्याने खुषाल शिंगे मोडून वासरात शिरावे आमची काहीही हरकत नाही , पण ही असली चैन माझ्या जीवावर मी कोणालाही करु देणार नाही ! ज्याने त्याने आपापल्या जीवावर आपापले शौक करावेत , मला कशातही गृहीत धरौ नये असे स्पष्ट सांगुन झालेले आहे !

घरात एक डायबेटिस पेशंट सुध्दा आहे , सांगुन सांगुन थकलो पण ऐकतच नाही. दिवाळीत बेसन लाडू , कडाकण्या , करंज्या वगैरे सगळे झाले =)))) आपण काय बोलणार , जो तो आपापल्या कर्माचा धनी आहे , मी स्पष्ट सांगुन ठेवलं आहे , मी पैसे देईन त्यातले किती साखरेवर खर्च करायचे अन किती औषधांवर हे तुमचे तुम्ही ठरवा , आजीचे डायबेटीस मध्ये कळत असुन देखील साखर खल्ल्यने काय हाल झालेत आपण सगळ्यांनी पाहिलं आहे , तरीही तुम्हाला शहाणपण येत नसेल तर मीच काय देव सुध्दा तुम्हाला मदत करु शकत नाही , ह्यावेळी मी मनाला त्रास करुन घेणार नाहीये , मी फक्त अलिप्त राहुन मजा पाहणार आहे, =))))

आता होईल ते होईल !

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 5:21 pm | मुक्त विहारि

आमच्या घरी पण, सौ.ला, हेच सांगीतले आहे, आलीस तर उत्तम आणि नाही आलीस तरी चालेल...

मी बरा, माझी पुस्तके बरी, संध्याकाळची बियर बरी आणि
उत्तम इंग्रजी सिनेमे बरे....

असा एक वृद्धाश्रम शोधून ठेवला आहे, येणार,आहेस का?

इथे भांडू आणि रात्री बियर पिऊ...जगांतली बरीचशी भांडणे, बियर मध्ये विरघळून जातात ....

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2021 - 6:59 pm | प्रसाद गोडबोले

वृद्धाश्रम ह्या प्रकाराबाबत मी जरा शंकास्पदच आहे , कारण जे वृध्द स्वतःच्या घरात पोटच्या पोरांशी जमवुन घेत नसतील ते अन्य वृध्दांसोबत कसे वागतील देव जाणे !

त्यापेक्षा मुवी काका तुम्ह्ला एक व्हिडीओ पाठवतो: असे काही करायचा माझा प्लॅन आहे भविष्यात वानप्रस्थाश्रमात गेल्यावर लगेच सुरुवात करणार ! ह्याने वयाच्या ५१ व्या वर्षी सुरुवात केलेली !
अनोळखी अन कटकटी माणसांसोबत वृध्दापकाळाचे नो टेन्शन , नो रिस्क , नो अँबिशन्स , नो ड्राईव्ह जस्ट चिल्ल असे सुखाचे दिवस काढण्यापेक्षा आपलं आपण एकटं बियर पित पडुन रहाणे कधीही उत्तम !!

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 8:03 pm | मुक्त विहारि

माझे बियर बरोबर पण पटते आणि वाईन बरोबर देखील पटते. (मोठा मुलगा बियर शौकिन तर धाकटा वाईन शौकिन)

पण, दोघांनाही वेळ मिळत नाही.. मोठा हल्दियाला गेली 2 वर्षे आहे आणि धाकटा मुंबईत लटकेश्र्वर ...

आम्हाला आठवण आली की आम्ही येणारच, मुलांच्या ह्या अटीवर तह झाला आहे ...

धर्मराजमुटके's picture

19 Nov 2021 - 7:26 pm | धर्मराजमुटके

शीर्षक चुकले आहे काय ?
"बस करा वृद्धांचे फालतू लाड" याऐवजी "बस करा फालतू वृद्धांचे लाड" असे हवे होते काय ?
मुळात आपण लहानपणापासून कोणत्या प्रकारच्या माणसांत वावरतो त्याप्रमाणे आपल्या वागण्याच्या सवयी बनतात. लहान मुलांना जर वृद्ध माणसांसोबत काही वेळ घालवायला मिळाला तर ते नक्कीच सहनशील बनतील.
माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मी जसा कामाला लागलो तसा माझा वावर तरुणांपेक्षा वृद्धांमधे जास्त होता. जे वृद्ध इतरांना त्रासदायक वाटायचे त्यांच्याबरोबर मला सहज संवाद साधायला जमायचे. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून मला हे समजले की वृद्ध वर वर जर तापट दिसले तरी किंवा त्रासदायक वाटले तरी एकदा जवळीक वाढल्यावर ते तेवढे त्रासदायक वाटत नाहीत. उलट त्यांच्या अनुभवाचा झाला तर फायदाच होतो. तरुणांचा विश्वास कमाविणे आणि गमाविणे दोन्ही फार पटकन होते मात्र वृद्धांचा विश्वास कमावणे आणि गमावणे या दोन्हीला बराच वेळ लागतो.
घरातील वृद्ध आणि बाहेरील वृद्ध दोन्हींचा मला काहीच त्रास झाला नाही. कदाचित माझी केस थोडी वेगळी असावी. बाकी जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती असणे सहज शक्य आहे. मुळात लहान मुले आणि वृद्ध यांना दोघांनाही तरुणांकडून अपेक्षा असतात त्यामुळे आरडाओरडा करुन ते तो मिळविण्याचा प्रयत्न करतात.
मी वृद्ध झाल्यावर स्वतःच्या बाबतीत काही बंधने घालून घेण्याची तयारी ठेवली आहे. बघुया कसे जमते ते.

१. कोणाला सल्ला द्यायचा नाही.
२. ताटात जे मिळेल ते गपगुमान खायचे.
३. आर्थिक दृष्टीने मुलांवर अवलंबून राहायचे नाही.
४. वयोमानानुसार आजारपण येतात मात्र याबाबतीत वडिलांचा सल्ला मानायचे ठरवले आहे. (ते म्हणतात की मला हॉस्पीटल ला न्यायची वेळ आली तर जनरल वॉर्ड मधे होतील तिथपर्यंतचेच उपचार करायचे. ७०-८० वयाचा माणूस आय सी यु मधे गेला की तो आणि पैसा दोन्ही जाणार.) मी पण हेच धोरण अवलंबायचे ठरविले आहे. एका ठराविक वयानंतर आपले आपल्यालाच ओझे होते त्यापेक्षा हे केव्हाही बरे !

त्यामुळे वृद्धांचा राग करु नका. त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपण सगळेच कधी ना कधी वृद्ध होणार आहोत. रागावून वैतागून काही होत नाही.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2021 - 8:05 pm | मुक्त विहारि

Bull's Eye

आपण काही महिने/वर्षांनी या जगातून कायमचे प्रस्थान करणार आहोत, हे चिरकालीन सत्य ज्यावेळी जाणवते, त्यावेळी बऱ्याचदा स्वभावात फरक पडतो. हे माहीत तर सर्वानाच असते, पण अंगाशी येऊन भिडते त्यावेळची अवस्था कठीण असते. आयुष्यभर उपभोगलेले पुनः पुनः आता पुन्हा मिळणार नाही म्हणून उपभोगण्याची घाई होते. जे कधीच मिळालेले नसते, ते एकवार मिळावे म्हणून धडपड सुरू होते. आपण मागे काय ठेवणार, आपली स्मृतीदेखील कुणी फार दिवस ठेवणार नाही हे भीषण वास्तव बोचते. अश्या वेळी हा संघर्ष असतो तो वृद्ध आणि मृत्यूचा, त्यात तरुण आणि इतर केवळ कुंपणावरचे प्रेक्षक असतात. विजय मृत्यूचाच होणार हे ठरलेले असते. अश्या या पराभूत जगण्यात वृद्ध एकटा असतो, त्या जगण्यातील संघर्ष, विफलता, राग हा बाहेर पडत असतो, तोच तरुणांना नकोसा होतो.

सुबोध खरे's picture

20 Nov 2021 - 10:30 am | सुबोध खरे

२) आपल्या प्रकृतीच्या तक्रारी इत्यंम्भूत स्वरूपात सांगणे आणि त्याबद्दल चर्चा करणे आपल्या शल्यक्रियेचे विस्तृत वर्णन लोकांना ऐकवणे हा बहुसंख्य वृद्धांचा आवडता टाईमपास असतो. मग समोरच्या माणसाला त्यात रस असो किंवा नसो. यात आपली मुले तेथे हजर असतील तर हा विषय चघळत बसू नये हे तारतम्य त्यांना नसते.

त्यातून आमच्या सारखे डॉक्टर कुठे सापडले तर झालंच. आमच्या मित्रांचे आईवडील मी मित्रांच्या घरी गेलो तर तू आता आलाच आहेस तर हि माझी औषधे बघून घे (ती त्यानं दुसऱ्या डॉक्टरनेच दिलेली असतात) किंवा माझा अमुकतमुक आजार आहे त्या वर माझे हे औषध आणि ते पथ्य चालू आहे हि फटावळ लावतात.

नम्रपणा मुळे बरेचसे डॉक्टर ऐकून घेतात पण त्यामुळे आपल्या मुलांना कानकोंडे होत आहे हे त्यांच्या खिजगणतीतही नसते. अनेक वेळेस मग मुले चिडतात आणी त्यातून वाद होतात. आजकाल आमचे काही मित्र आम्हाला "घरी भेटायलाच नको बाहेरच भेटू" असे सांगत असतात.

घरी आलेल्या पाहुण्याने औपचारिकतेतून आपल्या प्रकृतीची चौकशी केली तर त्याला कंटाळा येईल इतके तपशील पुरवून बोअर करू नये हे तारतम्य बऱ्याच वृद्धांना नसते.

घरी आलेल्या मुलांच्या मित्र/ मैत्रिणींनी आपले प्रश्न आपल्या मुलाला सांगितले असता त्याला तुमच्या पिढीचे कसे चुकत असते हे सतत ऐकवणे हा पण एक स्थायीभाव आहे आणि आम्ही किती कष्ट काढले आणि तुमच्या पिढीला सगळे कसे ताटात वाढून मिळाले आहे हे सांगणे हा पण एक स्थायीभाव आहे.

यामुळे आपली मुले कानकोंडी होतात किंवा त्यांचे मित्र आपल्याला टाळतात हे त्यांच्या लक्षात येत नाही मग आजच्या पिढीचा एकमेकांशी संबंधच राहिलेला नाही.

आपल्या प्रकृतीच्या तक्रारीत कोणालाही रस नसतो हे बहुतेक वृद्धांना लक्षातच येत नाही.

या बाबतीत माझा मोठा मामा हा माझ्या पुढे आदर्श आहे. ९६ वर्षाचे दीर्घायुष्य लाभले असताना शेवटची पाच सहा वर्षे मधुमेहामुळे अंधत्व आले होते. परंतु कधीही कोणतीही तक्रार केली नाही.

८७ वयाला मामीच्या निधना नंतर त्याने आपले राहते घर आणि सर्व मालमत्ता विकून तिन्ही मुलींना देऊन टाकली तिन्ही मुली आपल्या सोयीप्रमाणे
त्याला पाळीपाळीने आपल्या घरी ठेवत असत त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही. उठसूट कुणाला फोन करत नसे. कुणी फोन केला तर गप्पा मारायला त्याला आवडत असे. आमच्या आईला किंवा इतर भावंडाना स्वतःहून फोन करून कधी चिडचिड करणे असे केले नाही. या गप्पात स्वतःच्या प्रकृतीचे रडगाणे कधीही ऐकले नाही. जे आहे त्यात समाधानी असणे हा एक फार चांगला गुण होता. एके काळी अफाट संपत्ती मिळवलेला कर्तृत्ववान माणूस गलितगात्र झाला तरी त्याच्या तोंडी कधीही निराशेचा शब्द ऐकला नाही.

दृष्टी साथ देत नसली तरी कानाशी रेडिओवर बातम्या आणि गाणी ऐकून तो जगाशी संपर्क ठेवत असे.

कधी भेटायला गेलो तर हसत खेळत छान गप्पा मारत असे. मी डॉक्टर असूनही माझ्याकडे कधीही प्रकृतीबद्दल सल्ला मागणे तक्रार करणे हे करत नसे.

शेवटपर्यंत आनंदी कसे राहावे याचा घालून दिलेला वस्तुपाठ होता तो.

जे ज्येष्ठ नागरिक सतत काहीतरी काम्/सोशलाईज होणे/ फिरणे इत्यादी करतात - ते फ्रेश असतात.
जे हे करणं बंद करतात/परिस्थितीमुळे करावं लागतं ते पटकन म्हातारे होतात.
म्हातारपणापेक्षा कंटाळवाणेपण/कटकटेपणा/कुरकुरेपणा/ हेकटपणा हा प्रॉब्लेम आहे.

मी ठरवलं आहे, म्हातारपणी मुलांच्या सोयीसाठी/मदतीसाठी एकवेळ त्यांच्या घराजवळ शिफ्ट होऊ, पण त्यांच्या घरात नाही. (जोपर्यंत फिजिकली शक्य असेल)

मुलांजवळ राहिलं तर समहाऊ आपली निर्णय क्षमता, कार्यक्षमता इम्पॅक्ट होते - आणि आपण लवकर म्हातारे होतो असे जाणवले आहे.

जे ज्येष्ठ नागरिक सतत काहीतरी काम्/सोशलाईज होणे/ फिरणे इत्यादी करतात - ते फ्रेश असतात.
जे हे करणं बंद करतात/परिस्थितीमुळे करावं लागतं ते पटकन म्हातारे होतात.
म्हातारपणापेक्षा कंटाळवाणेपण/कटकटेपणा/कुरकुरेपणा/ हेकटपणा हा प्रॉब्लेम आहे.

मी ठरवलं आहे, म्हातारपणी मुलांच्या सोयीसाठी/मदतीसाठी एकवेळ त्यांच्या घराजवळ शिफ्ट होऊ, पण त्यांच्या घरात नाही. (जोपर्यंत फिजिकली शक्य असेल)

मुलांजवळ राहिलं तर समहाऊ आपली निर्णय क्षमता, कार्यक्षमता इम्पॅक्ट होते - आणि आपण लवकर म्हातारे होतो असे जाणवले आहे.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2021 - 2:00 pm | मुक्त विहारि

म्हटले तर एकत्र आणि म्हटले तर दूर

This is the best WIN-WIN condition.

रविकिरण फडके's picture

24 Nov 2021 - 2:45 pm | रविकिरण फडके

मुद्दे बरोबर.
सगळ्यात बोअर काय ह्या म्हाताऱ्यांचं तर, आपल्याला जगातलं सगळं शहाणपण बहाल झालेलंच आहे अशा थाटात लोकांना lecture देत बसायचं. बँकेत ४० वर्षं कारकुनी करायची आणि माझा बँकिंगमधला ४० वर्षांमधला अनुभव, असल्या बाता मारायच्या.
बाकी नवीन पिढीबद्दल तक्रारी करीत राहणं हे आहेच.

-- संपादित. कृपया प्रतिसाद देताना संवेदनशीलता बाळगावी --

सुबोध खरे's picture

25 Nov 2021 - 10:47 am | सुबोध खरे

इतकं भंपक आणि बेजबाबदार विधान मी बऱ्याच दिवसात वाचलं नव्हतं.

आमच्या वडिलांनी निवृत्त झाल्यावर जवळ जवळ १५ वर्षे कामगार आणि निम्न माध्यम वर्गातील श्रमिकांना कायदेशीर मदत केली होती.

अनेक उद्योजकांना त्यांच्या कामात कायदेशीरपण आणण्यात मदत केली, आणि वयाच्या ७५ व्या वर्षानंतर पुढची १० वर्षे महाराष्ट्र सेवा संघ, वरिष्ठ नागरिक संघटना, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या घटना तयार करणे, त्यांच्या कामगारांच्या वेतनश्रेणी आणि फायदे यांचे स्वरूप ठरवून देणे आणि ते वार्षिक सर्व साधारण सभेत पास करवून घेणे सारखी कामे समाजसेवा म्हणून केली.

वयाच्या ८६ वर्षी त्यांचे निधन होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत ते संपूर्णपणे सक्रिय होते.

एखाद्या ४५ च्या मुदतपूर्व निवृत्त केलेल्या आणि त्यानंतर काहीही काम न करणाऱ्या माणसापेक्षा त्यांचे समाजाप्रति काम कितीतरी जास्त होते.

श्री सोली सोराबजी नानी पालखीवाला सारखे प्रथितयश कायदेतज्ज्ञ यांनी वरिष्ठ नागरिक झाल्यानंतर (६० नन्तर)भारतीय लोकशाहीची जी अतुलनीय सेवा केलेली आहे त्यांचे मोल फेडणे अशक्य आहे.

आमच्या वैद्यकीय क्षेत्रात तर माणूस "तयार" व्हायलाच चाळीशी येते. पुढच्या १५ २० वर्षात त्याला निवृत्त करणे हा राष्ट्राच्या साधन सामग्रीचा गुन्हेगारी वृत्तीचा (criminal waste of resource) अपव्यय आहे

तिमा's picture

24 Nov 2021 - 10:28 pm | तिमा

खरंच, आम्ही सर्व वृद्ध म्हणजे भुईला भार आहोत. आमचं सगळं खरं तर संपलं आहे. पण काय करणार ? या देशांत इच्छामरणाचा कायदा पास होत नाही. आत्महत्या केली तर भेकड म्हणून संभावना होईल. म्हणून तरुण पिढीला कमीतकमी त्रास होईल असं वागायचा प्रयत्न करत आहोत. बागेत फिरायला गेलो तर आजुबाजुची कपल्स काहीही करत असली तरी त्यांच्याकडे चुकूनही बघत नाही. उपदेश तर नाहीच. बसमध्ये चढलो तरी ज्येष्ठांची सीट हक्काने मागत नाही. रेल्वेत खालचा बर्थ मिळाला नाही तरी दुसर्‍याकडे बदलून मागत नाही. बँकेची आणि सगळेच पैशाचे व्यवहार ऑनलाईन कसे करायचे ते शिकून घेतले आहे. लग्नादि समारंभात गेलो तरी कोणालाही पाया पडू देत नाही. स्वतःहून कोणाची चौकशी करत नाही. आमच्या वेळचे वस्तुंचे भाव कोणाला ऐकवत नाही. कोणी अगदी 'कूल आजोबा' म्हटलं तरी लगेच चढून जात नाही.
असं जमेल तसं वागतोय. तरी काही चुका होत असल्या तर मोठ्या मनाने माफ करा. याहून काय सांगावे? आयुष्यांत स्वतःविषयी एवढं सुद्धा प्रथमच लिहिलं. तेही वाचण्याची कोणावर सक्ती नाही बरं का!

सहमत आहे ....

वृद्धांनी कसे वागायचे?

ह्या बद्दल आपली जीवनशैली आवडली

सुबोध खरे's picture

25 Nov 2021 - 11:46 am | सुबोध खरे

@ तिमा साहेब

आम्ही सर्व वृद्ध म्हणजे भुईला भार आहोत.

मुळात वृद्ध याची व्याख्या काय?

केवळ वय वाढले म्हणून माणूस वृद्ध होत नाही.

दुर्दैवाने माझा प्रतिसाद संपादित करण्याच्या ऐवजी काढून टाकला गेला.

त्यात वर श्री फडके यांच्या बेजबाबदार विधानाचा परामर्श घेतला होता त्यातील अनेक चांगले मुद्दे काढून टाकले गेले हे दुर्दैव.

मी असंख्य माणसे पाहत आलो आहे जी वयाच्या ४०-४५ पासून काहीच करत नाहीत. अशी माणसे खरोखर खायला काळ आणि भुईला भार असतात

याउलट कायदे आणि वैद्यकीय क्षेत्रात माणसे चाळिशीनंतरच "तयार" होतात. मी आज असंख्य डॉक्टर आणि कायदेतज्द्न्य पाहतो आहे जे वरिष्ठ नागरिक आहेत परंतु त्यांचा समाजाच्या उन्नतीसाठी असलेला सहभाग अतुलनीय आहे.

मी आमच्या वडिलांची गेल्या २५ वर्षात झालेली समाजसेवा पहात आलो आहे. ( त्यातले काही भाग मी संपादित झालेल्या प्रतिसादात लिहिले सुद्धा होते) आणि
ते काहीच करत नाहीत असे वाटावे असे असंख्य वरिष्ठ नागरिक सर्व क्षेत्रात काम करत आहेत.

काही माणसे केवळ तुमच्या नंतर काही वर्षांनी जन्माला आली म्हणून त्यांना वरिष्ठ नागरिकांना वाटेल ते बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो काय?

तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका. केवळ कळफलक बडवता येतो म्हणून बडवणारी माणसे कमी नाहीत.

चित्रगुप्त's picture

25 Nov 2021 - 8:37 pm | चित्रगुप्त

काही माणसे केवळ तुमच्या नंतर काही वर्षांनी जन्माला आली म्हणून त्यांना वरिष्ठ नागरिकांना वाटेल ते बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो काय? ..केवळ कळफलक बडवता येतो म्हणून बडवणारी माणसे कमी नाहीत....

तुम्ही उल्लेखिलेला फडके यांचा मूळ प्रतिसाद अतिशय असंवेदनशील, भंपक आणि शरम वाटावी असा होता.
यावर लिहावे तितके थोडेच आहे. आपल्यापैकी काही मंडळी असा विचार करतात यातून एकंदरित समाजातील वैचारिक घसरण आणि असंस्कृत बेजबाबदारपणा दिसून येतो. जरा डोळे उघडून बघितले तर साठीच्या पुढले अगणित स्त्रीपुरुष कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍या अतिशय तडफेने, डोळसपणे, उत्तम रीत्या पार पडत असल्याचे दिसून येते.
धागाकर्त्यानेही विचारले आहे: कसे हाताळायचे हे वृद्ध ??

सॅगी's picture

25 Nov 2021 - 9:16 pm | सॅगी

पण सुबोध "भावे" वेगळे आणि सुबोध "खरे" वेगळे.

ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.

चित्रगुप्त's picture

25 Nov 2021 - 9:30 pm | चित्रगुप्त

खरेच की. मला खरेतर खरेच लिहायचे होते. चूलआदिबध.

उपेक्षित's picture

25 Nov 2021 - 10:37 pm | उपेक्षित

आमचं म्हातारं 76 वर्षाचं आहे पण अजून गोवा to पुणे असा प्रवास दिवसभरात कार चालवत मारतंय. म्हातारी पण अजून सगळं साग्रसंगीत करत असती ते म्हणतात ना पुरणावरणा चा स्वयंपाक ते करत बसती.
काम नसलं की सैरभैर होतात म्हातारा म्हातारी.
पूर्वीची सगळी लोकं नुसती बसून राहिली की कामातून गेली समजा ( आपली पण तीच अवस्था होणारे)

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 7:53 am | जेम्स वांड

हे लै डिप्रेसिंग होऊ लागलं आहे, खासकरून आमचा जॉली ओल्ड मॅन समोर मजेत पेपर वाचत गवारीच्या शेंगा निवडत अन नातवंडाशी खेळत सुखात मल्टीटास्क करताना पाहत हे वाचणे फारच डिप्रेसिंग आहे, उगाच आपल्या देवतुल्य ७३ वर्षाच्या बापाला शिव्या घातल्यागत घाण गिल्ट फील आले हे वाचून,

काहीतरी सोक्षमोक्ष लावा पण धागा दाबा राव हा.

ध्याग्यावर चार शब्द बोलायचेच ही रीत सांभाळता

सगळीच म्हातारी सगळ्याच बाबतीत सदासर्वदा हेकट असतील ही लैच रेयर केस झाली हो, पण एकंदरीत म्हाताऱ्या कोताऱ्यांचे काही ट्रिगर पॉईंट्स असतात, उदाहरणार्थ आमचे तीर्थरूप एका नातलगाकडे राहून शिकले कारण माझे आजोबा वडिलांच्या बालपणीच वारले ज्यांच्याकडे होते त्यांची मुले चपला घालून आणि आमचे पिताजी (सापत्न वागणुकीपोटी) अनवाणी ते कुठंतरी खोल बसलं आहे त्यांच्या मनात, आजही अगदी घरच्या बागेत असलो तरी पायात चप्पल घाला म्हणून ओरडतात किंवा सरळ दणका घालतात बारकं पोरगं असलं तर पण बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे आम्ही ऍडजस्ट करतो.

वृद्धांना अडगळ समजणे चूक आहे, मला तरी चूक वाटते, त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल असतात, प्रसंगी त्यांचे घरात असणेच मदतगार असते. इत्यलम.

राघव's picture

26 Nov 2021 - 8:53 am | राघव

हे आवडले.

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 10:03 am | जेम्स वांड

तुमच्या दोन शब्दांचा पण चक्क आधार वाटला.

असो असतात म्हातारी हेकट म्हणून का इतका पिट्ट्या पाडून दुस्वास करावा का त्यांचा ?

अगदी दुर्लक्ष करण्याचे ठरवले तरी एकंदरीत धाग्याचे शीर्षक चक्क डोक्यात जाणारे आहे. वाटेल तसे लिहिले आहे त्यात, एखाद्याला वैयक्तिक त्रास होत असेल घरातल्या वृद्धांचा हे अगदी मान्य पण त्यासंबंधी पब्लिक फोरमवर इतकं तुसडं अन रागीट लिहिणं पटत नाही पटणार नाही

एकतर lack of communication दिसते, बरं असलाच प्रॉब्लेम तर खऱ्या आयुष्यातील मित्र सहकारी पत्नी सगळ्यांशी बोलता येते, हे पर्याय उपलब्ध नसल्यास आधी स्वतःचे सोशल नेटवर्किंग काय ते तपासावे, हे असे वैयक्तिक प्रश्न चक्क चव्हाट्यावर आणणे पटत अन मानवत नाही बुआ आपल्याला तरी.

आता ह्याबद्दल मला शिव्या घालायच्या असल्या तरी घाला पण ह्या धाग्यावर हीमाशेपो.

आमचं म्हातारं पाहून भडभडून आलं एकदम असलं काहीतरी वाचून, आता संध्याकाळी मस्त दोनचार बांगडे तळतो, चार चिल्ड बिअर आणतो अन म्हाताऱ्यासोबत बसून जरा हा मानसिक श्रमाचा परिहारच करून टाकतो कसा.

सॅगी's picture

26 Nov 2021 - 11:43 am | सॅगी

आता संध्याकाळी मस्त दोनचार बांगडे तळतो, चार चिल्ड बिअर आणतो अन म्हाताऱ्यासोबत बसून जरा हा मानसिक श्रमाचा परिहारच करून टाकतो कसा.

शुक्रवार साजरा करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा वांड दादा!!!

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 11:53 am | जेम्स वांड

&#127866 &#127866 &#127866

खरंय. काही लोकांस त्रास होतही असेल आणि ते त्यांच्या जागेवर कदाचित काही बाबतीत योग्यही असतील.. पण सरसकटीकरण करणं अजिबातच संयुक्तिक नव्हे.

फडके महाशयांचा प्रतिसाद वाचायच्या आधीच संपादित झाल्यामुळं नक्की काय वाईट लिहिलं ते समजलं नाही, पण ज्याअर्थी एकदम एवढे कडक प्रतिसाद आलेत म्हणजे नक्कीच असंवेदनशील असणारंय. काय बोलायचं. असो.

पुन्हा तेच वर लिहिलेलं उद्धृत करावंसं वाटतं.

असतात म्हातारी हेकट म्हणून का इतका पिट्ट्या पाडून दुस्वास करावा का त्यांचा ?

आणि म्हातारेच का, आपणही स्वतः कमी हेकट नसतो की. जे गुण दुसर्‍यात आपल्याला दिसतात, ते आपल्यात असतातच. त्यामुळे उगाच आपल्या म्हातार्‍यांना काही बोलायची गरजच नाहीये. अर्थात् मोठ्यांना समजावणं ही एक कठीण गोष्ट असते. बरेचदा ते लवकर ऐकत नाहीत. पण त्यात नुसता हेकटपणाच असतो असं नाही! :-)

गृहित धरलेलं कुणालाही आवडत नाही मग ती व्यक्ती म्हातारी नसो किंवा असो. त्यामुळे आपल्याशी कुणी कसं वागलेलं आवडेल असा विचार करून तसं आपण दुसर्‍याशी वागायचा प्रयत्न ठेवायचा, बर्‍याच गोष्टी निवळतात. खरंतर घरात कुणी मोठं नसतं ना, तेव्हा ती पोकळी फार त्रासदायक असते. मला तरी बुवा घर आपल्या माणसांनी भरलेलं आवडतं! :-)

सोय काय हॉटेलातही होते आणि हॉस्पिटलातही! मग घरात असं वेगळं काय असतं? आपलेपणाचा ओलावा. तो नसला की रूक्षता येते.
घरात प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वतःहून सहभाग असला ना, की त्या व्यक्तीला ते घर आपलं वाटायला लागतं. हा आपलेपणा घरात ओलावा आणतो. त्यात वर म्हणतोय तसं, समजूतदारपणा असला सगळ्या व्यक्तींमधे तर घरात आनंदाला पारावार उरत नाही.

बाकी प्रत्येकाची आवड, स्वभाव हे वेगळे असणारच आणि त्यामुळे थोडं इकडे-तिकडे चालणारच, पण लगेच त्यावर तलवारी उपसून सोल्यूशनिंग करण्याची गरज नसते. एकमेकांना सांभाळून घेणं म्हणजे अजून काय वेगळं असतं?

त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल असतात, प्रसंगी त्यांचे घरात असणेच मदतगार असते.

अगदी सहमत. केवळ "आहेत" हा देखील आधार असतो. ज्यांनी अल्प वयात छत्र गमावले आहे त्यांना तर अधिकच कळेल.

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 10:47 am | जेम्स वांड

ज्यांनी अल्प वयात छत्र गमावले आहे त्यांना तर अधिकच कळेल.

&#128577 &#128577

सुबोध खरे's picture

26 Nov 2021 - 11:25 am | सुबोध खरे

अल्प वयात कशाला हो?

नुकतेच माझ्या ५६ व्या वर्षी वडील गेले ( त्यांच्या ८६ व्या वर्षी) तरी आज पोरकं झाल्यासारखं वाटतंय.

कडक उन्हात चालताना डोक्यावरची छत्रीच काढून घेतल्यासारखं.

"भारतीय संघराज्य विरुद्ध सर्जन कमांडर सुबोध खरे" या सर्वोच्च न्यायालयाच्या लढ्यात माझ्या पाठीशी असणारे एकमेव माणूस होते ते.

खरंय. ती जाणीवही नको वाटते अगदी..
बाकी, आपले वरचे सर्व प्रतिसाद तीन-चार वेळा तरी वाचलेत. अतिशय अभिमानास्पद आहे सर्व. अशा व्यक्तीकडून शिकावं तेवढं कमीच. त्यांची ऊर्जाच सांसर्गिक असते म्हणा ना.

कुमार१'s picture

26 Nov 2021 - 10:21 am | कुमार१

वृद्धांना अडगळ समजणे चूक आहे

सहमत

सुरसंगम's picture

26 Nov 2021 - 12:08 pm | सुरसंगम

आधार नाही तर आधारवड हा शब्द जास्त योग्य.
त्यांचं नुसतं असणंच किती बळ देतो.

धागा लेखकाने स्वतःच वय जाहीर करावे म्हणजे आम्ही त्यांच्या वृद्धवयोमानागमनार्थ आपण काय उपयोजना कराल हे त्यावेळी विचारू.

जेम्स वांड's picture

26 Nov 2021 - 12:45 pm | जेम्स वांड

अल खराब होता हा प्रतिसाद

&#129315 &#129315 &#129315 &#129315

आम्ही आणि आमची नातवंडे. अश्या बर्‍याच गंमती-जंमती चालू असतात. नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात.
..

.
आता वयाच्या सत्तरीत आल्यावरही आपल्याला आपले आपले आजी-आजोबा कधी बघायलाही मिळाले नाहीत याचे वाईट वाटते. ते त्यांची मुले लहान असतानाच निवर्तले होते.

हे ब्येश्ट आहे. खूप आवडले! कधी बघायला मिळणार प्रत्यक्ष असं वाटून आलं. ;-)

अत्रन्गि पाउस's picture

26 Nov 2021 - 3:45 pm | अत्रन्गि पाउस

किती सुंदर वाटतंय !!

पिंड घडतात ते हे असे !!!

बहोत खूब !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2021 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पीलू लै ग्गोड. तुमचा तर काही प्रश्नच नै. लंबर एक. आपण फॅन आहोत तुमचे.
बाकी, मागील चित्रांचा पसाराही आवडला. विशेषतः असो. :)

-दिलीप बिरुटे
(चित्रगुप्त फॅन क्लब सदस्य) :)

अत्रन्गि पाउस's picture

26 Nov 2021 - 3:23 pm | अत्रन्गि पाउस

मूळ लेख आणि प्रतिक्रिया वाचल्यावर काही टोकाच्या भूमिका जाणवतात आणि ह्या भूमिका हि मूळ समस्या आहे ! वै म

  • मी माझा स्वतंत्र
  • माझा कुणावर भार नाही
  • (तरुण असेल तर ) मी सगळ्यांना फाट्यावर मारतो
  • (वृद्ध असेन तर) मी माझी सोय लावली आहे ...मुलांना काडीचं करावं लागणार नाही सरळ वेगळा संसार मांडायला सांगीन
  • कुटुंबाला माझी गरज असेल तर येतील झक मारत
  • वृद्धापकाळ म्हणजे फक्त त्यांना समजून घ्या त्यांना सहानुभूतीची गरज आहे, का ? तर तुम्ही पण एक दिवस वृद्ध व्हाल
  • तरुण आहात का ? मग तुम्ही बेदरकार असणे स्वाभाविक आहे आणि तसे असाल तर तुम्हालाच फाट्यावर मारले पाहिजे
  • तुम्ही समोरच्याचे ऐकून घेत आहात का ?? मग घ्या कि ऐकून झाला त्रास तुम्हाला तर करा सहन कारण समोरच्याचा स्वभाव आहे तो ..तो बदलणार नाही कारण बदल तुम्ही स्वतः मध्ये घडवायचा असतो !!!

पण मुळात एका घरात २ किंवा जास्त पिढ्या ज्या पूर्वी राहत असत त्या हल्ली का राहू शकत नाहीत ?

एक निरीक्षण असे कि गुजराती, मारवाडी शीख मुसलमान समाजांमध्ये घरात २ ३ पिढ्या संयुक्त कुटुंबे वगैरे सहज नांदतात ...आपल्या कडे काय प्रॉब्लेम येतो ??


डॉ खरेंचे प्रतिसाद मननीय !

रविकिरण फडके's picture

26 Nov 2021 - 3:42 pm | रविकिरण फडके

खूप लोकांना माझ्या comments वाचून त्रास झाला (हे मला आज एका मित्राचा WA message आला तेव्हा समजलं), त्याबद्दल मी मनःपूर्वक दिलगीर आहे. मी मिसळपाव नियमित पाहात नाही म्हणून मला पत्ताच नव्हता आजपर्यंत.
हे माझ्या हलगर्जीपणामुळे झाले.
आत्ता बघितले तर माझे शेवटचे वाक्य 'बाकी नवीन पिढीबद्दल तक्रारी करीत राहणं हे आहेच', मग पुढचा भाग edit केला आहे. खरे तर त्यानंतर मी २-३ वाक्ये काहीशी - काहीशीच, कारण माझ्याकडे आता तो मजकूर नाही - खालीलप्रमाणे लिहिली होती.
'पण काय करावे, सांभाळून घ्यायलाच हवे, बरे वाईट, कमी अधिक असतेच. आपल्याकडे काही हिटलरचे राज्य नाही, काहीतरी जालीम उपाय करायला (नशीब!). तो म्हणाला असता... ' असे काहीतरी. मग पुढे ५-६ वाक्ये असावीत.
गोची अशी आहे, की काय राहिले होते, काय उडाले, आणि काय edit झाले हे आता मला सांगता येणार नाही. त्या पोस्टमार्टेमला काही अर्थही नाही म्हणा.

झाले असे, की मी तो मजकूर इकडून तिकडून टाईप करून (म्हणजे अर्धा मेलमध्ये, अर्धा नोट्स, इ. मराठीत टाईप करणे हा माझ्यासाठी त्रासदायक प्रकार आहे अजून) कॉपी-पेस्ट केला, आणि कधी नव्हे ते review न करता प्रकाशित करून टाकला. त्या भानगडीत ही वाक्ये गायब झाली. आणखीही काही गेली, शेवटची.
But that cannot be an excuse. Self review cannot under any circumstance be bypassed.

BTW, I am sixty nine, so I cannot be accused of carrying a chip on my shoulder against old people

कोंबडी प्रेमी's picture

26 Nov 2021 - 3:57 pm | कोंबडी प्रेमी

सरसकटीकरण टाळलं जायलाच हवंय पण सगळीकडून ...

मी लिहिलंय ते अलीकडे ऐकलेल्या पाहिलेल्या वाचलेल्या उदाहरणांवरून !

ह्यात कुणाला सत्यांश नाहीच असे म्हणायचे असेल तर अलाहिदा

माझी मूळ चिंता पुन्हा मांडतो

अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील

बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2021 - 12:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटी ?

-दिलीप बिरुटे
(वृद्ध ) :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Nov 2021 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'बस करा वृद्धांचे फालतू लाड' हे शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, संपादन करुन त्याची तीव्रता कमी करायला हवी. जसे काही शासकीय नियम आणि कायद्यांमुळे प्रचंड लाड सुरु आहेत आणि त्याचा अतिरेक झालाय अशा स्वरुपाचे वाटते.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

28 Nov 2021 - 3:29 pm | Bhakti

खुपचं असंवेदनशील शीर्षक आहे.माझ्यापेक्षा माझ्या ६ वर्षाच्या मुलीच्या जेवणाच्या सवयी तिच्या आजीलाच माहिती आहे.
लहानपणी आपल्या आईवडिलांना जर "बस करतो ह्या पोटच्या पोरांचे फालतू लाड "असे म्हटले असते तर..उगाच वाटले.

चौकस२१२'s picture

29 Nov 2021 - 5:22 am | चौकस२१२

"शीर्षक लैच भडक आणि डोक्यात जाणारे आहे, " या पहिल्या भागाशी सहमत ... , ,पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Nov 2021 - 7:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>पण यात शासन आणायची काहीच जरुरी नवहती !

का बरं ? तुम्हाला कोणा फेकाफेकी करणा-या आणि इच्छा नसतांना 'हम करे सो कायदा' अशा पद्धतीने बेजवाबदार वागणा-या प्रवृत्तीची आठवण झाली काय ? तसे वाटत असेल तर, तसा समज करून घेऊ नये, माझा तसा कोणताही उद्देश नव्हता. खुलासा संपला.

-दिलीप बिरुटे

उन्मेष दिक्षीत's picture

29 Nov 2021 - 12:20 am | उन्मेष दिक्षीत

द फंक्शन अँड नॉट द रिलेशन हे उपयोगी होईल. त्यांची एखादी गोष्ट पटत नसेल तर नाही म्हणून सांगता आले पाहीजे.

आणि तुम्ही वृद्ध झाल्यावर तसंच करु नका आणि त्यांच्याशी ते वृद्ध असल्याप्रमाणे वागू नका :P

माझी आज्जी तिच्या सगळ्या मुलांपेक्षा आणि नातवांपेक्षा ही शार्प आहे , ९३ वय.

एकुलता एक डॉन's picture

15 Nov 2023 - 4:48 pm | एकुलता एक डॉन

वर आणतोय

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2023 - 6:09 pm | कर्नलतपस्वी