स्थलांतर..

Primary tabs

Vivekraje's picture
Vivekraje in जे न देखे रवी...
1 Oct 2020 - 10:40 am

भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव..
शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव..

रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं..
मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं..

थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल..
माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल..

तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला..
उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला..

घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती..
आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती..

जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते..
स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हते..

प्रवास आता पायीच होता, सोबत एक गाठोडी होती..
गाठोडीत त्या जमापुंजी अन स्वप्नांची वजाबाकी होती..

चालणारे लाखो पाय आज एकच साक्ष देत होते..
बाहेरच्यांना विमान अन देशात दंडुके मिळत होते..

गुन्हा आमचा काय होता आम्हालाच कळत नव्हता..
विमानाने आलेल्यांचा मात्र पाहुणचार चोख होता..

घराची ओढ थांबत नव्हती, अन थकलेली पावलं उचलत नव्हती..
डोळ्यातील अश्रूंची धार मात्र मध्येच नजर चुकवत होती..

लहान मुलांना खाऊ काय, जेवायला ही मिळत नव्हते..
मध्येच कुठेतरी रस्त्यात, माणसातील देव भेटत होते..

गावची वेस आली तसं आमचं मन भरून आलं..
कसचं काय, या रोगामुळं आम्हाला गावांनही नाकारलं..

गावाच्याच बाहेर गावानं राहुट्या उभारल्या होत्या..
काही दिवस आमच्या चुली तिथेच पेटल्या होत्या..

लढाई आजाराशी की परिस्थितीशी हे ही कुणाला कळत नव्हतं..
भूत-भविष्याचं गणित मात्र अजूनही काही जुळत नव्हतं..

काय कमावलं काय गमावलं हा हिशेब नंतर होईल..
पण मजुराच्या स्थलांतराची साक्ष मात्र इतिहास नक्की देईल...

(ही कविता एका स्पर्धेसाठी लिहिली होती, स्पर्धेचा विषय कोव्हिड १९ शी संबंधित घडामोडी वर होता. लॉकडाऊन नंतर ऑफिसला जाताना जे दिसत होतं ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धेचा निकाल लागेपर्यंत दुसरीकडे प्रकाशित करता येणार नव्हती म्हणून आता प्रकाशित केली)

मांडणीवावरकवितामुक्तकविडंबनसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

1 Oct 2020 - 11:37 am | प्राची अश्विनी

आवडली. खरंच भयानक होतं ते.

बाजीगर's picture

2 Oct 2020 - 3:05 am | बाजीगर

चांगली लिहीलीय.
लिहीते रहा,अपेक्षा वाढलीय.

गोंधळी's picture

2 Oct 2020 - 10:44 am | गोंधळी

भीषण.

चांदणे संदीप's picture

2 Oct 2020 - 12:37 pm | चांदणे संदीप

कोरोनाच्या परिस्थितीचे चटके ज्यांना सर्वाधिक बसले ते मजूर, कामगार ह्यांच्या वेदना, आक्रोश असाच घुमत राहील वर्षानुवर्षे.

सं - दी - प

संजय क्षीरसागर's picture

2 Oct 2020 - 4:26 pm | संजय क्षीरसागर

जनतेनं डोक्यावर घेतलेल्या प्रधान सेवकांना पाठवा.

दादा कोंडके's picture

2 Oct 2020 - 6:12 pm | दादा कोंडके

कविता म्हणून छान.
पण त्यातले विचार ठिक-ठाक. बाहेरच्यांना विमान आणि देशात दंडुके म्हणजे कै च्या कै.

बरं मारले दंडूके तर मुळुमुळु रडत काय बसलात? पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असं वाटलं तर त्याच वेळी प्रतिकार का नै केला?
या असल्या पुळचट लोकांमुळेच मुठभर विंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं.

एक विशिष्ठ धर्मिय लोक्स डॉक्टर आणि पोलिसांवर कोविड योद्ध्यांवर धावून येताना, बाकीच्यांनी दंडुके सहन केले पण हुं की चुं केलं नै म्हणून पोष्टी फिरत होत्या.