काटेकोरांटीची फुलं.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
7 Nov 2008 - 8:58 pm

जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी. वर्‍हाडात सावकाराला मालगुजार म्हणायचे.गिरीपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चौबळांच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा.पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
पाहुणे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.
बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या.आईच्या मदतीला सैपाकघरात.दप्तरं गुंडाळून ठेवायची.शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. संत्र्याची टोपली एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात आत्याची पिशवी. मग आत्याचा नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची.वडील आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.
आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. कापसाची बोंड, तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड माल बाहेर पडायचा.संत्र्याच्या टोपलीला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक संत्रं आमच्या हातावर ठेवायची.थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबट रसानी ओठ चुरचुरायचे.पण फोडी मोजण्यात आणि सालांचा रस एकमेकांच्या डोळ्यात उडवण्यात जास्त मजा यायची.
चहाचं ताट बाहेरच्या खोलीत गेलं की आंघोळीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर बसायची. हातात काळं मंजन घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी घंगाळात गरम पाणी काढायची.आंघोळीसाठी मोरी.बाथरूम असा काही प्रकार नसायचाच.दादासाहेब आंघोळीला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर व्हायच्या.
आत्या बहीणींच्या हातात धोतर देऊन म्हणायची निर्‍या काढा गं पोरींनो.असली कामं करायला मुली नाराज असायच्या.पण सांगणार कुणाला?
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा
साबणासाठी पेटी उघडली की सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन पेटी बंद करायची.
आता त्या वेळी टॉयलेटरीज आणि कॉस्मेटीक्स मध्ये आमच्या घरात असणार काय .दरबार गंधाची बाटली, रेमी ची पावडर आणि फूल,जाईचं काजळ.संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.
पावलोपावली माहेरच्या गरीबीचा उद्धार व्हायचा.रात्री झोपायची प्रचंड गैरसोय व्हायची.बाहेरच्या खोलीत पुरुष मंडळी.दादा शहाण्यासारखा मित्राकडे निघून जायचा.मधल्या खोलीत आजी, आई आणि आत्या.स्वच्छ चादरी बाहेर वापरायचे.बाकी सगळ्या चादरी वारंवार शिवलेल्या तरी असायच्या नाहीतर मुताचा वास तरी यायचा.आत्या आजी आणि आईच्या रात्री गप्पा रंगायच्या.मुलींना जाम उत्सुकता असायची गप्पा ऐकण्याची.आत्या कसली ऐकतेय.
" ए मुलींनो तुम्ही दूर झोपा बाई."
" का ग आत्या "माझी धाकटी बहीण विचारायची.
"बाई बाई केव्हढ्या उवा तुझ्या डोक्यात .उडून माझ्या डोक्यात येतील गं बाई . नको . तुम्ही दूरच बर्‍या."
आई मधे पडायची. "नाही उवा वन्सं.गेल्या रविवारीच रॉकेल घालून डोकी धुतलीत पोरींची."आणि हा वाद रोज व्हायचा .
मुली कंटाळून सैपाक घरात झोपायच्या.
माझी धाकटी बहीण त्यातल्या त्यात तिखट. एकदा फणकार्‍यानं म्हणाली "एव्हढेसे तर केस तुझे आत्या आणि गंगावनात कशा गं उवा होतील."
या डायलॉग नंतर इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.

पाहुणे आले ,शाळा नाही.धाकटं भावंड आजारी पडलं शाळा नाही.पैसे कमी पडतातयंत कॉलेज बंद.कपातीची पहीली झळ मुलींना. शिस्तीची सगळी धार मुलींवर चालायची.ताईची पुस्तकं माई वापरायची.माईचे जुने युनीफॉर्मचे स्कर्ट आक्का वापरायची.निळ्या स्कर्टच्या प्लेटी उसवून दुसर्‍या टर्म पर्यंत वेळ काढायची. फिका पडलेला निळा स्कर्ट आणि डार्क निळ्या रंगाची किनार त्याला जाडीभरडी हातशिलाईची टिप. उंची वाढणं पण शापच.
मुली मोठ्या झाल्या. (बसायला लागल्या)ते दिवस व्हिस्पर किंवा तयार सॅनीटरी नॅपकीनचे नव्हते.जुन्या कपड्यांच्या घड्या धुवून वापरायच्या.अंगणातल्या ओट्यावर जेवण. त्या चार दिवसात शिवाशिव पाळावी लागायची.अंगणात एका पत्र्याच्या शॅडमध्ये एक वेगळी बाथरूम.
घराचा कोंडवाडा झाला.त्यांचं दुकानात जाणं बंद. गणेशोत्सवाचे कार्यक्रम बंद.गॅदरींगमध्ये स्टेजवर नाचायला जाणं बंद.भुलाबाई बंद.मैत्रीणीकडे जायचं ते भावाला बरोबर घेऊन.
याच वेळीनेमकी एखादी बहीण शाळेतून सुटली की समोरच्या दरवाजानं न येता अंगणाला वळसा घालून मागच्या ओट्यावर बसायची. आईनी बघीतलं की आई डोक्याला हात लावायची.
"आताच तुला पण गोंधळ घालायाचा होता का "असं म्हणत आंघोळीचं पाणी काढायची.
आत्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या.
"असू द्या हो वन्सं . पोराबाळांचं घर आमचं."आईचं पालुपद सारखं चालू असायचं

आत्या आंघोळीला जाताना पेटी उघडून पैसे मोजायची. रात्री झोपताना मोजायची. खर्च तर काही करायची नाही पण मोजताना मी आसपास दिसलो की डोळे मोठ्ठे करून विचारायची
ए, गोम्या,(घरात मी एकटाच काळा म्हणून मला किलावरचा गोम्या म्हणायची) तू चोट्टा नाहीयेस ना . ?
मनात जाम राग आलेला असायचा पण काढायचा कुठे? पण पाहुण्याला खिंडीत गाठायची रग होतीच.(म्हणून रगेल दोडका हे दुसरं नाव पण होतं)

असेच एकदा दिवाळीला जावई आले होते.जावई आले की त्यांना भेटायला बरीच माणसं यायची.त्यांच्या चहापाण्याला दूध पुरायचं नाही.घरी ब्रिज खेळायला चिमोटे सावकार , गंगशेट्टीवार, इंगोलीकर , मुंगळे वगैरे सावकार मंडळी यायची.
मग चार दिवस मुलांना दूध नाही.चहा प्यावा लागायचा.
मुली मोठ्या म्हणून त्यांना चहा पण नाही.
मी तसा सहासात वर्षाचा होतो. सकाळी दूध नाहीय्ये, संपलंय म्हटल्यावर जरा नाराजच होतो.आत्या मात्र दूध पित होती.
"तिच्या पोटात बाळ आहे ना म्हणून ...."
आमच्या ताईनी माझी समजूत काढली.जरासा फुगून मी घरासमोर मंगळूरकरांचा टालावर (जळाऊ लाकडाची वखार)गेलो. त्यांच्याकडे एक गाय पाळली होती.मंगळूरकर काकी गायीचा शेणगोठा साफ करत होत्या.
"काकी, तुमच्याकडे दूध असेल ना?" मी विचारलं.
"नाही रे बाळा. गाय गाभण आहे ना . पोटात बाळ आहे तिच्या."
"आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
काकी ठो ठो हसायला लागल्या.
शब्दांचा सूक्ष्म अर्थ कळायचे दिवस नव्हते ते. पण दुपारपर्यंत हा विनोद घरापर्यंत पोहचला होता.
साडेचार वाजता घरी आलो तेव्हा आत्या फुरंगटून बसली होती.
वडील माझी येण्याची वाट बघत असावेत. हातात तूरकाठी होती.(तुरकाठी मुलांना मारायचं स्टँडर्ड इक्युपमेंट होतं).
त्या दिवशी मरेस्तो मार खाल्ला. का मारतायंत हे कळेना . रात्रीचं जेवण बंद.
बहीणी मुक्या मुक्या बघत होत्या. मग मोठीनी गळा काढला. मग धाकटीनी....
मार खाउन जो झोपलो तो अपरात्री जागा झालो परत भुकेनीच.
मार आठवला . अंगावरचे वळ भुकेनी आणखीनच जळायला लागले, परत मुसमुसायला सुरुवात.
ताई जागी झाली .
"काय झालं रे "म्हणाली .
माझं रडणं काही थांबेना..तिला कळलं मला भूक लागलीय पण जेवायला वाढायचं धैर्य तिच्यात पण नव्हतं.
थोड्या वेळानं मोरीवर जायच्या निमीत्तानी उठली.परत आली.
माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आज चाळीसएक वर्षं झाली या गोष्टीला पण दूध प्यायची इच्छा मेली ती मेलीच.आता दारु प्यालो तरी दुसर्‍या पेगनंतर दूधाची आठवण येते आणि दारूची नशा उतरते.दारू पोटात फिरायला लागते.
लहान होतो तेव्हा दूध नाही, मोठेपणी दारु झेपत नाही.माणसानी दु:खाचे कोरडे घास गळ्याखाली ढकलावे तरी कसे?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपेक्षा ,कुचंबणा, गैरसोय, अपमान,आवडती नावडती,हाल अपेष्टा, हेळसांड या सगळ्यांना तोंड देत या मुली शिकल्या. मुली जितक्या शिकल्या तेव्हढच मुलं पण शिकली.पण मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही नाही.
मला नक्की कुठलं वर्षं ते आठवत नाही पण मी तेव्हा बराच लहान असणार. घरी वडलांचे मुंबईचे काका आणि त्यांचा मुलगा आला होता.हौशी माणसं .ते आग्रह कर करून आई आणि बाबांना आरजू नावाच्या सिनेमाला घेऊन गेले. ताई -दादा कॉलेजात. मला आणि धाकट्या भावाला सांभाळायला दोन्ही बहीणी घरी थांबल्या होत्या.
त्यांना घरी राहण्यासाठी बाबांनी दोघींच्या हातावर पाच पाच पैसे ठेवले होते.
हातात पैसे असणं हा तसा दुर्मीळ प्रसंग. दुपारी मी झोपल्यावर दोघींनी एक धाडस केलं .दोघीजणी पानाच्या ठेल्यावर गेल्या. पाच पैशात तेव्हा मिठा पान यायचं .दोघीजणी पान खाऊन घरी आल्या. आता खाल्लं तर खाल्लं निदान फ्रॉकवर सांडायचं तर नाही .
बरं सांडलं तर सांडलं.धुवून पुरावा तरी नष्ट करायचा.
बराच वेळ आरशासमोर उभ्या राहून दोघी जीभा किती लाल झाल्या ते बघत बसल्या.
चार वाजता सिनेमाला गेलेली मंडळी घरी आली.
आल्या आल्या आईनी विचारलं "अगं बायांनो फ्रॉकवर काय सांडलयत.?"
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
आईला जीभ काढून दाखवली. आईनी डोक्याला हात लावला आणि बाबांनी कानाखाली.
दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.
बिचार्‍या इतक्या निष्पाप की नंतर सात दिवस झाले तरी त्यांना कळेना की नक्की काय चुकलं.

या मुली भराभर मोठ्या होतं गेल्या. शिकल्या .आपल्या पायावर उभ्या राहील्या. आईबाबांनी सांगीतलेल्या मुलांशी लग्न करून संसार थाटले.
धाकट्या बहीणीच्या डोहाळजेवणाच्या वेळची गोष्ट. दुपारची जेवणं झाल्यावर बाबा खूषीत होते.पानपट्ट्या बाहेरून मागवल्या होत्या.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.

वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.

माझ्या मुलीच्या पहील्या वाढदिवसाला ताई आली होती.मला म्हणाली "काय रे दोडक्या, तुझा रगेल पणा जरा कमी झालेला दिसतोय. सारखं घरात काय आहे रे तुझं.?"
"हळवं व्हायला काय वय झालं का रे तुझं?"मी काहीच बोललो नाही.

म्हातारपण कुणी पाह्यलंय. हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

कथावाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

सुक्या's picture

16 Nov 2010 - 4:37 am | सुक्या

अप्रतिम !! दुसरा शब्द्च नाही.
केवळ अप्रतिम !!

खरोखर अप्रतिम..आवंढा गिळून अभिप्राय लिहितेय...

मधु बन's picture

16 Nov 2010 - 3:04 pm | मधु बन

केवळ अप्रतिम !!

गवि's picture

24 May 2011 - 11:25 am | गवि

पुस्तकावरुन कथेचं नाव कळलं आणि मागे जाऊन कथा शोधून वाचली.

अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात.

बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..

स्मिता.'s picture

25 May 2011 - 9:42 pm | स्मिता.

कसलं लिहिलंय... सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिलेत.
अप्रतिम! पुढे आणखी काय लिहावं सुचत नाहीये.

प्रतिक्रिया देऊन हा लेख समोर आणल्याबद्दल गविंचे आभार.

गोगोल's picture

28 May 2011 - 7:06 am | गोगोल

गेला होता.
धन्यवाद गवि.

लई भारी's picture

5 Jun 2015 - 5:22 pm | लई भारी

लिखाणाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता नाही!
_/\_

ह्या आणि इतर काही प्रतिसादांमध्ये पुस्तकाचा उल्लेख आलाय.
रामदास काकांचे पुस्तक आले आहे का? कोणी अधिक तपशील दिला तर बरे होईल.
पुस्तकाचे नाव, कोणत्या नावाने लेखन केले आहे, कुठे मिळेल?

मुलूखावेगळी's picture

24 May 2011 - 1:40 pm | मुलूखावेगळी

अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात.
बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..

+१००

गणेशा's picture

24 May 2011 - 4:23 pm | गणेशा

मस्त लिखान ..
पुस्तक आवर्जुन विकत घेतले जाईनच.

माझीही शॅम्पेन's picture

25 May 2011 - 9:12 pm | माझीही शॅम्पेन

अप्रतिम - गेल्या वर्ष भरात कमीत कमी १० वेळा वाचली असेल

त्रिवार सलाम !

पुस्तक केव्हा आणि कुठे मिळेल ते नक्की कळवा !

फार क्वचितच लेख डोळ्यात पाणी आणणारे असतात .....त्या पैकी हा एक !!
धन्यवाद या लेखा साठी !!

किचेन's picture

28 Jan 2012 - 2:44 pm | किचेन

वाचता वाचताच रडायला आल.
सुरेख.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2012 - 3:14 pm | निनाद मुक्काम प...

खूप दिवसांनी मिपावर आलो व ही कथा वाचून त्याचे सार्थक झाले.

चांगले धागेही शंभरी गाठतात हे पाहुन अत्यानंद झाला. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2012 - 8:28 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी हेच बोलतो. असे धागे नेहमीच वर राहिले / नेहमी नेहमी वर आले तरी छानच वाटतं.

चतुरंग's picture

28 Jan 2012 - 9:32 pm | चतुरंग

अचानक वरती आलेला पाहून खूप छान वाटले. परत एकदा वाचला. परत डोळे भरुन आले.
पुन्हा एकदा काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाहीये. मनातल्या मनात लेखाचा आनंद घोटाघोटाने पीत राहीन दिवसभर!

-रंगा

रघु सावंत's picture

28 Jan 2012 - 9:39 pm | रघु सावंत

मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा.

सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही.
सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या.
सर असच माझं सुध्हा बालपण गेल.

पण सर तुमच्या सारखे तुम्हीच

८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झली नाही.

रघू सावंत

रघु सावंत's picture

28 Jan 2012 - 9:40 pm | रघु सावंत

मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा.

सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही.
सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या.
सर असच माझं सुध्हा बालपण गेल.

पण सर तुमच्या सारखे तुम्हीच

८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झाली नाही.

रघू सावंत

शरभ's picture

29 Jan 2012 - 2:08 am | शरभ

बर्‍याच जणांसारखं बालपण आठवलं..
हे मात्र खर की, प्रसंगी मुलांपेक्षा मुलींची कुचंबणा जास्त व्हायची /होते...आणि adjustment म्हणाल तर बहीणीच जास्त करायच्या...
खरचं सुंदर लेखन.

सुनील's picture

29 Jan 2012 - 2:20 am | सुनील

धागा पुन्हा वर काढणार्‍या गौरी१२ यांचे आभार!

आता पर्यंत ३-४ वेळा हा लेख वाचुन झाला, आणी परत कधी वर आला तर परत वाचेन नक्की.

--टुकुल.

कवितानागेश's picture

29 Jan 2012 - 11:43 pm | कवितानागेश

पुन्हा वाचून काढले....
प्रत्येक वेळेस मनात खोलवर काहीतरी हलते...

ज्योत्स्ना's picture

6 Feb 2012 - 4:03 pm | ज्योत्स्ना

रामदासजी, आपल्या कथेने जुन्या काळात नेले आणि एकदा पुन्हा तो काळ अनुभवला असा प्रत्यय आला.धन्यवाद.

प्यारे१'s picture

6 Feb 2012 - 4:16 pm | प्यारे१

____/\____

नतमस्तक.

सुहास झेले's picture

6 Feb 2012 - 4:42 pm | सुहास झेले

नतमस्तक !!!

चतुरंग आणि मुक्तसुनित यांच्या प्रतिक्रियांशी शब्दशः सहमत....

मनराव's picture

6 Feb 2012 - 5:09 pm | मनराव

>>या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?<<

इरसाल's picture

6 Feb 2012 - 6:30 pm | इरसाल

अतिशय उत्तम लेख.......अजुन काय बोलणार

मानस्'s picture

2 Mar 2012 - 11:38 am | मानस्

आताची पिढी किति भाग्यवान आहे,त्याना अशा गरिबीचे चटके इतके नाही सहन करावे लागत.

मन१'s picture

1 Jun 2012 - 7:02 pm | मन१

वरती सगळ्यांनीच म्हटलय तेच पुन्हा म्हणतोय :-
अप्रतिम.
इतरांनाही वाचता यावा म्हणून धागा वर काढत आहे.

कपिलमुनी's picture

11 Oct 2013 - 9:13 am | कपिलमुनी

हळवं करणारं लेखन !!!

दर वेळी हे वाचते आणि दर वेळी डोळ्यांत पाणी उभंराहिल्याशिबवाय रहात नाही!

पिशी अबोली's picture

11 Oct 2013 - 10:47 am | पिशी अबोली

आई गं...

कुसुमावती's picture

16 Jan 2014 - 3:56 pm | कुसुमावती

सुंदर मास्टरपीस... वाचता वाचता डोळ्यात पाणी कधी आलं कळालचं नाही.

राही's picture

16 Jan 2014 - 5:44 pm | राही

जेव्हा जेव्हा हा लेख वर येतो तेव्हा तेव्हा अधाश्यासारखा वाचलेला आहे. दर वेळी काही तरी नवं उमजत रहातं. रमीच्या डावात एखादं मोक्याचं पान हाताशी मिळालं की आधीचे सेक्वेन्सेस भराभर बदलून भर्र्कन रमी लागावी तसं होतं. छोट्या छोट्या वाक्यांआड लपलेले अनेक अर्धविराम, पूर्णविराम, वळणं, वेलांट्या 'ये, आम्हांला शोध' म्हणून खुणावत रहातात.
गेल्या सहासात वर्षांत यत्किंचितही शिळा न झालेला आणि कायम पुन:प्रत्यय देणारा एक अप्रतिम लेख.

रुस्तम's picture

22 Oct 2015 - 2:59 pm | रुस्तम

सहमत ..

प्यारे१'s picture

22 Oct 2015 - 3:28 pm | प्यारे१

+१
कालातीत होऊ घातलेलं लेखन.

मारकुटे's picture

16 Jan 2014 - 5:45 pm | मारकुटे

हा धागा कसा काय वर आला?

ही कथा कितव्यांदा वाचली असेल माहीत नाही पण दरवेळी डोळ्यात पाणी येतच!

आनन्दिता's picture

16 Jan 2014 - 9:12 pm | आनन्दिता

:( :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2014 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळजाला हात घालणारं लिखाण ! अश्या महाभागांबद्दल नेहमीच असुया वाटत आली आहे !

आजकाल रामदासकाका का लिहीत नाहीत? कृपया कोणीतरी त्यांना परत लिहीते करा.

रामपुरी's picture

17 Jan 2014 - 12:11 am | रामपुरी

हा धागा ज्या कुणी वर काढला त्याला मनापासून धन्यवाद.

अर्धवटराव's picture

17 Jan 2014 - 4:43 am | अर्धवटराव

काटेकोरांटीची उदाहरणं बरीच बघितली. पण त्यात काहि चुकल्याची जाणिव, आणि ति चुक पुढे कंटिन्यु न करण्याची सजगता सहसा बघायला मिळत नाहि.

बुवा, तुम्ही नक्की काय मटेरीयल आहात? सुख-दु:खाचे वणवे पचवणारे अनेक पाहिले. प्रचंड साहस, जीद्द, कर्तुत्व असणारी मंडळी देखील सभोवती अनुभवली. पण असं जींदगी वाचता येणं नाहि बघितलं.
__/\__

चतुरंग's picture

17 Jan 2014 - 11:24 am | चतुरंग

डोळा पाणी आले! __/\__
(नतमस्तक) रंगा

आतिवास's picture

17 Jan 2014 - 11:46 am | आतिवास

अप्रतिम!

भ ट क्या खे ड वा ला's picture

17 Jan 2014 - 6:36 pm | भ ट क्या खे ड वा ला

कोरांटी चा सोनचाफा झाला पण केवडा तसाच,
अशी काही कोरांटीची फुल सोनचाफा झालेली पाहिली
पण इतकी चपखल उपमा कधी सुचली नाही
क्या बात है|

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 Jan 2014 - 12:52 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अप्रतिम...
रामदासकाका.......लहानपणीचं चित्रच समोर उभं केलत.....फार फार टची लिहीता तुम्ही. वाचताना डोळे कधी वाहायला लागले ते कळलेच नाही...

मधुरा देशपांडे's picture

20 Jan 2014 - 7:18 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम. केवळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. माझ्या आईकडून तिच्या लहानपणचे जे काही वर्णन ऐकले आहे ते तंतोतंत इतकं सुंदर शब्दरूप केलंय. अगदी याक्षणी आईला कडकडून भेटावसं वाटतंय.

सुहास झेले's picture

28 Jan 2014 - 12:52 pm | सुहास झेले

... !!

arunjoshi123's picture

28 Jan 2014 - 2:40 pm | arunjoshi123

कदाचित लेखक जितक्या दारिद्र्याच्या वातावरणात वाढला आहे त्याच्या कैकपट गरीब वातावरणात मी वाढलो आहे. पण आमच्याच घरी येऊन असे वागणारा एकही पाहुणा पाहिल्याचे आठवत नाही. माझ्या आत्या, मावशीच्या आठवणी अत्यंत गोड आहेत.
आजच्या पिढीला माहित नसलेला जुना काळ अतिशय वाईट रंगात रंगवायचा, प्रेक्षकांना/वाचकांना भावूक बनवायचं, आपण शहराच्या भाऊगर्दीत कसे सुखी आहोत असे वाटायला लावायचे ही एक वेगळी कलाइंडस्ट्री आहे.
मला अशा कथा वाचून बोर झाले आहे.

प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती सारखी कशी असेल ना... जितक्या व्यक्ती तितक्या प्रव्रुत्ती

राहुलजी, या लेखात व्यक्तिचे चित्रण झालेले आहे, करायचा मानस आहे तोवर ठिक आहे. पण यात जमान्याचे चित्रण झाले आहे ते मला व्यक्तिशः खटकले. स्लमडॉग मिलिएनेरवर अमिताभने जसे ओब्जेक्शन घेतले होते तेच मी घेतोय, फरक इतकाच आहे कि स्लमडॉगवाल्यांनी 'काही' भारतीय मूले स्लमडॉग असतात असे दाखवले, इथे मात्र त्या काळात सुखी मुले नसतच असेच दाखवायचा प्रयत्न वाटला.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 4:50 pm | प्यारे१

@ जोशीबुवा,

गुड. लेखाला तीट लावलीत.

आदूबाळ's picture

28 Jan 2014 - 5:03 pm | आदूबाळ

अरूणभाव

ललित लेखनाच्या मूल्यमापनाचा नियम "बुद्धीला पटणे" कधीपासून झाला? लेखनशैली, कथा/पात्रं/घटना रंगवण्याची हातोटी ऐसा भी कुछ होता हय ना...

हे म्हणजे "जादूबिदू असलं काही नसतं - त्यामुळे हॅरी पॉटर बोर आहे" असं म्हणण्यासारखं आहे!

हे म्हणजे "जादूबिदू असलं काही नसतं - त्यामुळे हॅरी पॉटर बोर आहे" असं म्हणण्यासारखं आहे!

हा युक्तिवाद मान्य आहे. अर्थातच वाचकांना प्रभावित होण्याचे स्वातंत्र्य आहे. लेखकाला प्रभावित करण्याचे स्वातंत्र्य आहे.

पण मी अलिकडे एक फिनॉमेनन पाहतो आहे. नवी पिढी जुना जमाना नीट जाणत नाही. आजी आजोबा जवळ नाहीत. असलेच तर तेही शहरी असण्याची शक्यता. मग ही पिढी कधीतरी मदर इंडीया पाहते, जब्बार पटेलांचे कोणते नाटक, इ पाहते आणि त्यांना पटून जाते कि आपल्या २-३ पिढ्यांपूर्वी परिस्थिती किती दयनीय होती. अख्ख्या त्या जमान्याशी सहानुभूती. स्त्रीयांवर आणि दलितांवर तर अजूनच. ...

पिलीयन रायडर's picture

28 Jan 2014 - 6:30 pm | पिलीयन रायडर

पण ते कल्पो कल्पित तर नाहीये ना?
जे सत्य आहे ते इतक्या हळुवार पणे लिहीलय.. हा काही " बायकांच्या ऑडियन्सला रडवायचा" टाईप प्रकार निश्चित नाही..
हा लेख तुम्हाला "बोर" वाटावा.. रादर कुणालाही बोर वाटावा.. ह्याच सखेद आश्चर्य वाटलं..

सरल मान's picture

24 Dec 2014 - 4:40 pm | सरल मान

हा लेख तुम्हाला "बोर" वाटावा.. रादर कुणालाही बोर वाटावा.. ह्याच सखेद आश्चर्य वाटलं....मला पण..

आदूबाळ's picture

28 Jan 2014 - 6:57 pm | आदूबाळ

आणि त्यांना पटून जाते

तुम्हीच म्हटलंय त्याप्रमाणे "प्रभावित होण्याचं स्वातंत्र्य" त्यांना आहेच. विचार करण्याची सक्ती - अर्थातच - नाही.

चतुरंग's picture

18 Oct 2015 - 1:37 am | चतुरंग

'बोर' वाटली असे तुम्ही म्हणता. तुम्ही लेखकापेक्षा अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत वाढले आहात असेही तुमचे म्हणणे आहे. माझ्या मते दोन प्रमुख शक्यता असतात. तुम्ही जेव्हा गरीब परिस्थितीतून वरती येता तेव्हा एकतर तुमच्यात कमालीचा कडवटपणा भरुन राहतो ज्यामुळे तुम्हाला संवेदनशील मनाचा भाग मारुन जगावे लागते परिणामतः स्वभावात एकप्रकारची शुष्कता येऊ शकते. किंवा तुम्ही अतिशय संवेदनशील बनता आणि जगण्यातल्या प्रत्येक अनुभवाची असोशीने ओळख करुन घेता आणि तुमच्यात असलेल्या प्रतिभेने त्या अनुभवांचा पट उलगडता.
तुमच्या आठवणी गोड आहेत तर तुम्ही तसे लेखन करा ना, आवडले तर त्यालाही लोक दाद देतीलच.
वाचकांनी या कथेकडे कसे बघावे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे किंबहुना तसे कोणत्याही बाबतीत असतेच. परंतु 'स्लमडॉग' सारख्या सिनेमांची या कथेशी तुलना आणि मारुन मुटकून भावूक बनवण्याची कलाइंडस्ट्री म्हणणे - बात कुछ हजम नहीं हुई!
तसे तर हल्ली बर्‍याच चांगल्या कलाकृतींना हटकून नावे ठेवणे आणि आम्ही कसे इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवणे यातही चढाओढ असते असे ऐकून आहे! :)

अरुण जोशी यांच्या प्रतिसादाची तारीख बघा ओ मालक.

चतुरंग's picture

18 Oct 2015 - 7:50 am | चतुरंग

जुना प्रतिसाद असला तरी मी आत्ताच वाचला आणि तो मला फारसा न पटल्याने मी मत नोंदवले. काही ऑब्जेक्शन?

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 8:43 am | प्यारे१

नो ऑब्जेक्शन सायर!

विटेकर's picture

28 Jan 2014 - 5:05 pm | विटेकर

अप्रतिम !
शब्द संपले..

किसन शिंदे's picture

29 Jan 2014 - 1:06 am | किसन शिंदे

कुणी काहीही म्हणोत. रामदास काकांचं लेखन कितीही वेळा वाचा, प्रत्येक वेळी मनाला निखळ आनंद देत नवं काहीतरी शिकवत राहतं. मग ते शिंपीणीचं घरटं असो वा काटेकोरांटीची फुलं असो वा टिचला बिलोरी आयना!! :)

दिपाली पाटिल's picture

29 Jan 2014 - 4:35 am | दिपाली पाटिल

+१०००

तनुजा महाजन's picture

29 Jan 2014 - 12:08 pm | तनुजा महाजन

ख्ररच अप्रतिम लेख आहे

मुक्त विहारि's picture

24 Dec 2014 - 5:42 am | मुक्त विहारि

म्हणून परत एकदा लेख वाचला....

आमची बायको पण काटे-कोरांटीच आहे.

आता आम्हाला केवडा व्हायचा हुरुप आला.

माधुरी विनायक's picture

24 Dec 2014 - 11:54 am | माधुरी विनायक

मनापासून भावलं. धागा वर काढल्याबद्दल शतश: आभार. आता मिसळपाव वर आणखी काही वर्षं मागे जाऊन अशा खजिन्याचा शोध घ्यावा असं मनापासून वाटू लागलंय...

सरल मान's picture

24 Dec 2014 - 4:29 pm | सरल मान

गावी बालपणी जे पाहिले तेच चित्र परत डोळ्यासमोर उभे राहिले आणि तसाच चटकापण लागला. अप्रतिम लेख( कि लेक)

पिंपातला उंदीर's picture

24 Dec 2014 - 4:45 pm | पिंपातला उंदीर

माजघराची पण एक Sociology असते असे दळवींच्या पुस्तकात वाचल होत . तेंव्हा अर्थ कळला नव्हता . आता कळतोय . निव्वळ अप्रतिम

शलभ's picture

24 Dec 2014 - 5:22 pm | शलभ

अप्रतिम..
कितीवेळा वाचलीय ह्याची गणतीच नाही.

भुमन्यु's picture

24 Dec 2014 - 6:47 pm | भुमन्यु

+१११११

दुर्दैवाने मी यावेळी मिपाचा सदस्य नव्हतो. किंवा हे वाचायचे राहून गेले. रामदासकाकांच्या लेखनाचा मोठा खजिनाच सापडला !!

मोहनराव's picture

27 Mar 2015 - 7:15 pm | मोहनराव

चांगले लेखसुध्दा १०० गाठु शकतात याचे अप्रतिम उदाहरण!!
ह्रदयाला भिडणारे लेखन!

सुबोध खरे's picture

27 Mar 2015 - 7:39 pm | सुबोध खरे

किती प्रतिसाद मिळतात यावर मोजता येत नाही.
नाहीतर एखाद्या शास्त्रज्ञाच्या भाषणाला सन्नीबाई लीयोनच्या नाचण्याच्या कार्यक्रमापेक्षा जास्त गर्दी झाली नसती का?

मृत्युन्जय's picture

27 Mar 2015 - 7:44 pm | मृत्युन्जय

दर वर्षी कोणीतरी नविन वाचक या लेखाल वर काढतो यातच या लेखाचे यश सामावले आहे.

सूड's picture

27 Mar 2015 - 7:49 pm | सूड

+१

इशा१२३'s picture

1 Apr 2015 - 12:45 pm | इशा१२३

अप्रतिम!!

हे लेखन अनेकदा वाचले तरी गोडी कमी होत नाही. प्रत्येक शब्द अगदी मनःस्पर्शी. साधारणपणे याच कालखंडात बालपण गेल्याने किरकोळ तपशीलांचा फरक सोडला तर असे जगणे आणि वाढणे पाहिले / अनुभवले आहे. तेव्हा तसे जगणे हे टोचणारे तरीही न बदलता येणारे वास्तव होते. या काळाची पुनर्भेट आणि त्या पार्श्वभुमीवरची आता सुधारलेली व आधिकाधिक सुधारू पहाणारी परिस्थिती दोन्ही आवडले.

उत्खनक's picture

29 May 2015 - 9:18 pm | उत्खनक

मनाला सहज पण आवेगानं भिडणारं लेखन.
एका परिपूर्ण अनुभवाबद्दल मनापासून धन्यवाद!
मनांतः बाबांना हे वाचायला लावलं पाहिजे...

नूतन सावंत's picture

4 Jun 2015 - 6:23 pm | नूतन सावंत

रामदासकाका २००९ पासून मिपाशी वाचक म्हणून नाते जडले.तेव्हापासून बऱ्याच वेळा हा लेख वाचलाय,पण सदस्य नसल्यामुळे तेव्हापासून करायची एक गोष्ट राहून गेली होती.ती आता करते_/\_ _/\__/\_.

gogglya's picture

5 Jun 2015 - 10:43 am | gogglya

पाणी आणले...

दीपा माने's picture

17 Oct 2015 - 8:03 pm | दीपा माने

रामदास तुम्ही सिध्दहस्त लेखक आहात त्यातून स्वत: अनुभवलेले थेट काळजाच्या कुपीतून आल्याने अती उत्कटतेने उचंबळून बाहेर आले आहे.
मला खात्री आहे की निश्चितपणे ह्य लिखाणानंतर तुम्हाला मनातला निचरा निघाल्याचे थोडेफार समाधान वाटले असेल.
वर दिलेल्या मुक्तसुनित आणि चतुरंग यांच्या प्रतिक्रियांशी पुर्ण सहमत आहे. लिहीत रहा असे मनापासून सांगावेसे वाटते. भावी लिखाणास अनेक शुभेच्छा.

बाबा योगिराज's picture

17 Oct 2015 - 8:17 pm | बाबा योगिराज

खरच काय सुंदर लिहितात हो तुम्ही.
मस्त लाजवाब.

जेपी's picture

18 Oct 2015 - 9:33 am | जेपी

_/\_/\_

शेखरमोघे's picture

18 Oct 2015 - 10:15 am | शेखरमोघे

सुन्दर शैली! आपले मोजक्याच शब्दात केलेले वर्णन आवडले. घडणारे सगळे प्रसन्ग हुबेहूब डोळ्यापुढे साकारतात.

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 12:48 pm | बोका-ए-आझम

सिंपली ब्रिलियंट! _/\_

जव्हेरगंज's picture

3 Nov 2015 - 9:02 pm | जव्हेरगंज

शीर्षकाचा अर्थ कळल्यावर गहिवरुन आलं.

केवळ अप्रतिम लिखाण!

नीलमोहर's picture

29 Feb 2016 - 11:27 am | नीलमोहर

'फार क्वचितच लेख डोळ्यात पाणी आणणारे असतात .....त्या पैकी हा एक !!'
- १००% सहमत.

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 9:12 am | एक एकटा एकटाच

निव्वळ
अप्रतिम

अभिजीत अवलिया's picture

9 Mar 2016 - 10:07 pm | अभिजीत अवलिया

बऱ्याच वेळा हा लेख वाचला आहे. वाचताना पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणी थोडे अस्वस्थ पण वाटते. रामदास काका आता मिपा वर का लिहीत नाहीत हे कुणाला महित आहे का?