काटेकोरांटीची फुलं.

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
7 Nov 2008 - 8:58 pm

जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी. वर्‍हाडात सावकाराला मालगुजार म्हणायचे.गिरीपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चौबळांच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा.पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात.
पाहुणे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा.
बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या.आईच्या मदतीला सैपाकघरात.दप्तरं गुंडाळून ठेवायची.शाळेला नाही गेलं तरी चालायचं.
जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. संत्र्याची टोपली एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात आत्याची पिशवी. मग आत्याचा नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची.वडील आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची.
आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. कापसाची बोंड, तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड माल बाहेर पडायचा.संत्र्याच्या टोपलीला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक संत्रं आमच्या हातावर ठेवायची.थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबट रसानी ओठ चुरचुरायचे.पण फोडी मोजण्यात आणि सालांचा रस एकमेकांच्या डोळ्यात उडवण्यात जास्त मजा यायची.
चहाचं ताट बाहेरच्या खोलीत गेलं की आंघोळीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर बसायची. हातात काळं मंजन घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी घंगाळात गरम पाणी काढायची.आंघोळीसाठी मोरी.बाथरूम असा काही प्रकार नसायचाच.दादासाहेब आंघोळीला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर व्हायच्या.
आत्या बहीणींच्या हातात धोतर देऊन म्हणायची निर्‍या काढा गं पोरींनो.असली कामं करायला मुली नाराज असायच्या.पण सांगणार कुणाला?
मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची.
काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा
साबणासाठी पेटी उघडली की सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन पेटी बंद करायची.
आता त्या वेळी टॉयलेटरीज आणि कॉस्मेटीक्स मध्ये आमच्या घरात असणार काय .दरबार गंधाची बाटली, रेमी ची पावडर आणि फूल,जाईचं काजळ.संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची.
पावलोपावली माहेरच्या गरीबीचा उद्धार व्हायचा.रात्री झोपायची प्रचंड गैरसोय व्हायची.बाहेरच्या खोलीत पुरुष मंडळी.दादा शहाण्यासारखा मित्राकडे निघून जायचा.मधल्या खोलीत आजी, आई आणि आत्या.स्वच्छ चादरी बाहेर वापरायचे.बाकी सगळ्या चादरी वारंवार शिवलेल्या तरी असायच्या नाहीतर मुताचा वास तरी यायचा.आत्या आजी आणि आईच्या रात्री गप्पा रंगायच्या.मुलींना जाम उत्सुकता असायची गप्पा ऐकण्याची.आत्या कसली ऐकतेय.
" ए मुलींनो तुम्ही दूर झोपा बाई."
" का ग आत्या "माझी धाकटी बहीण विचारायची.
"बाई बाई केव्हढ्या उवा तुझ्या डोक्यात .उडून माझ्या डोक्यात येतील गं बाई . नको . तुम्ही दूरच बर्‍या."
आई मधे पडायची. "नाही उवा वन्सं.गेल्या रविवारीच रॉकेल घालून डोकी धुतलीत पोरींची."आणि हा वाद रोज व्हायचा .
मुली कंटाळून सैपाक घरात झोपायच्या.
माझी धाकटी बहीण त्यातल्या त्यात तिखट. एकदा फणकार्‍यानं म्हणाली "एव्हढेसे तर केस तुझे आत्या आणि गंगावनात कशा गं उवा होतील."
या डायलॉग नंतर इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.

पाहुणे आले ,शाळा नाही.धाकटं भावंड आजारी पडलं शाळा नाही.पैसे कमी पडतातयंत कॉलेज बंद.कपातीची पहीली झळ मुलींना. शिस्तीची सगळी धार मुलींवर चालायची.ताईची पुस्तकं माई वापरायची.माईचे जुने युनीफॉर्मचे स्कर्ट आक्का वापरायची.निळ्या स्कर्टच्या प्लेटी उसवून दुसर्‍या टर्म पर्यंत वेळ काढायची. फिका पडलेला निळा स्कर्ट आणि डार्क निळ्या रंगाची किनार त्याला जाडीभरडी हातशिलाईची टिप. उंची वाढणं पण शापच.
मुली मोठ्या झाल्या. (बसायला लागल्या)ते दिवस व्हिस्पर किंवा तयार सॅनीटरी नॅपकीनचे नव्हते.जुन्या कपड्यांच्या घड्या धुवून वापरायच्या.अंगणातल्या ओट्यावर जेवण. त्या चार दिवसात शिवाशिव पाळावी लागायची.अंगणात एका पत्र्याच्या शॅडमध्ये एक वेगळी बाथरूम.
घराचा कोंडवाडा झाला.त्यांचं दुकानात जाणं बंद. गणेशोत्सवाचे कार्यक्रम बंद.गॅदरींगमध्ये स्टेजवर नाचायला जाणं बंद.भुलाबाई बंद.मैत्रीणीकडे जायचं ते भावाला बरोबर घेऊन.
याच वेळीनेमकी एखादी बहीण शाळेतून सुटली की समोरच्या दरवाजानं न येता अंगणाला वळसा घालून मागच्या ओट्यावर बसायची. आईनी बघीतलं की आई डोक्याला हात लावायची.
"आताच तुला पण गोंधळ घालायाचा होता का "असं म्हणत आंघोळीचं पाणी काढायची.
आत्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या.
"असू द्या हो वन्सं . पोराबाळांचं घर आमचं."आईचं पालुपद सारखं चालू असायचं

आत्या आंघोळीला जाताना पेटी उघडून पैसे मोजायची. रात्री झोपताना मोजायची. खर्च तर काही करायची नाही पण मोजताना मी आसपास दिसलो की डोळे मोठ्ठे करून विचारायची
ए, गोम्या,(घरात मी एकटाच काळा म्हणून मला किलावरचा गोम्या म्हणायची) तू चोट्टा नाहीयेस ना . ?
मनात जाम राग आलेला असायचा पण काढायचा कुठे? पण पाहुण्याला खिंडीत गाठायची रग होतीच.(म्हणून रगेल दोडका हे दुसरं नाव पण होतं)

असेच एकदा दिवाळीला जावई आले होते.जावई आले की त्यांना भेटायला बरीच माणसं यायची.त्यांच्या चहापाण्याला दूध पुरायचं नाही.घरी ब्रिज खेळायला चिमोटे सावकार , गंगशेट्टीवार, इंगोलीकर , मुंगळे वगैरे सावकार मंडळी यायची.
मग चार दिवस मुलांना दूध नाही.चहा प्यावा लागायचा.
मुली मोठ्या म्हणून त्यांना चहा पण नाही.
मी तसा सहासात वर्षाचा होतो. सकाळी दूध नाहीय्ये, संपलंय म्हटल्यावर जरा नाराजच होतो.आत्या मात्र दूध पित होती.
"तिच्या पोटात बाळ आहे ना म्हणून ...."
आमच्या ताईनी माझी समजूत काढली.जरासा फुगून मी घरासमोर मंगळूरकरांचा टालावर (जळाऊ लाकडाची वखार)गेलो. त्यांच्याकडे एक गाय पाळली होती.मंगळूरकर काकी गायीचा शेणगोठा साफ करत होत्या.
"काकी, तुमच्याकडे दूध असेल ना?" मी विचारलं.
"नाही रे बाळा. गाय गाभण आहे ना . पोटात बाळ आहे तिच्या."
"आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
काकी ठो ठो हसायला लागल्या.
शब्दांचा सूक्ष्म अर्थ कळायचे दिवस नव्हते ते. पण दुपारपर्यंत हा विनोद घरापर्यंत पोहचला होता.
साडेचार वाजता घरी आलो तेव्हा आत्या फुरंगटून बसली होती.
वडील माझी येण्याची वाट बघत असावेत. हातात तूरकाठी होती.(तुरकाठी मुलांना मारायचं स्टँडर्ड इक्युपमेंट होतं).
त्या दिवशी मरेस्तो मार खाल्ला. का मारतायंत हे कळेना . रात्रीचं जेवण बंद.
बहीणी मुक्या मुक्या बघत होत्या. मग मोठीनी गळा काढला. मग धाकटीनी....
मार खाउन जो झोपलो तो अपरात्री जागा झालो परत भुकेनीच.
मार आठवला . अंगावरचे वळ भुकेनी आणखीनच जळायला लागले, परत मुसमुसायला सुरुवात.
ताई जागी झाली .
"काय झालं रे "म्हणाली .
माझं रडणं काही थांबेना..तिला कळलं मला भूक लागलीय पण जेवायला वाढायचं धैर्य तिच्यात पण नव्हतं.
थोड्या वेळानं मोरीवर जायच्या निमीत्तानी उठली.परत आली.
माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आज चाळीसएक वर्षं झाली या गोष्टीला पण दूध प्यायची इच्छा मेली ती मेलीच.आता दारु प्यालो तरी दुसर्‍या पेगनंतर दूधाची आठवण येते आणि दारूची नशा उतरते.दारू पोटात फिरायला लागते.
लहान होतो तेव्हा दूध नाही, मोठेपणी दारु झेपत नाही.माणसानी दु:खाचे कोरडे घास गळ्याखाली ढकलावे तरी कसे?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
उपेक्षा ,कुचंबणा, गैरसोय, अपमान,आवडती नावडती,हाल अपेष्टा, हेळसांड या सगळ्यांना तोंड देत या मुली शिकल्या. मुली जितक्या शिकल्या तेव्हढच मुलं पण शिकली.पण मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही नाही.
मला नक्की कुठलं वर्षं ते आठवत नाही पण मी तेव्हा बराच लहान असणार. घरी वडलांचे मुंबईचे काका आणि त्यांचा मुलगा आला होता.हौशी माणसं .ते आग्रह कर करून आई आणि बाबांना आरजू नावाच्या सिनेमाला घेऊन गेले. ताई -दादा कॉलेजात. मला आणि धाकट्या भावाला सांभाळायला दोन्ही बहीणी घरी थांबल्या होत्या.
त्यांना घरी राहण्यासाठी बाबांनी दोघींच्या हातावर पाच पाच पैसे ठेवले होते.
हातात पैसे असणं हा तसा दुर्मीळ प्रसंग. दुपारी मी झोपल्यावर दोघींनी एक धाडस केलं .दोघीजणी पानाच्या ठेल्यावर गेल्या. पाच पैशात तेव्हा मिठा पान यायचं .दोघीजणी पान खाऊन घरी आल्या. आता खाल्लं तर खाल्लं निदान फ्रॉकवर सांडायचं तर नाही .
बरं सांडलं तर सांडलं.धुवून पुरावा तरी नष्ट करायचा.
बराच वेळ आरशासमोर उभ्या राहून दोघी जीभा किती लाल झाल्या ते बघत बसल्या.
चार वाजता सिनेमाला गेलेली मंडळी घरी आली.
आल्या आल्या आईनी विचारलं "अगं बायांनो फ्रॉकवर काय सांडलयत.?"
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
आईला जीभ काढून दाखवली. आईनी डोक्याला हात लावला आणि बाबांनी कानाखाली.
दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.
बिचार्‍या इतक्या निष्पाप की नंतर सात दिवस झाले तरी त्यांना कळेना की नक्की काय चुकलं.

या मुली भराभर मोठ्या होतं गेल्या. शिकल्या .आपल्या पायावर उभ्या राहील्या. आईबाबांनी सांगीतलेल्या मुलांशी लग्न करून संसार थाटले.
धाकट्या बहीणीच्या डोहाळजेवणाच्या वेळची गोष्ट. दुपारची जेवणं झाल्यावर बाबा खूषीत होते.पानपट्ट्या बाहेरून मागवल्या होत्या.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.

वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे.
वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.

माझ्या मुलीच्या पहील्या वाढदिवसाला ताई आली होती.मला म्हणाली "काय रे दोडक्या, तुझा रगेल पणा जरा कमी झालेला दिसतोय. सारखं घरात काय आहे रे तुझं.?"
"हळवं व्हायला काय वय झालं का रे तुझं?"मी काहीच बोललो नाही.

म्हातारपण कुणी पाह्यलंय. हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

कथावाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

बांवरे's picture

10 Mar 2016 - 7:16 am | बांवरे

काय सुंदर आहे हे !!!!

रामदास काका ...

राजाभाउ's picture

10 Mar 2016 - 10:02 am | राजाभाउ

___/\___
पुन्हा एकदा वाचला आणि पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आले.

@नीलमोहर -- धागा वर काढल्या बद्दल धन्यवाद.

नेत्रेश's picture

18 Apr 2016 - 1:56 am | नेत्रेश

कितव्यांदा वाचला? त्याला गणतीच नाही.

लई भारी's picture

9 Jan 2017 - 4:23 pm | लई भारी

खरं पाहता हे लेखन उडवून टाकलं पाहिजे. :)
दर काही दिवसांनी हे वाचायची इच्छा होते आणि भरून येत.

यावेळी वाचताना तर मी जुळ्या मुलींचा बाप आहे त्यामुळे शेवटी शेवटी डोळ्यात पाणी कधी आलं कळलंच नाही.

रामदास काकांना परत एकदा साष्टांग दंडवत!

मराठी कथालेखक's picture

9 Jan 2017 - 5:55 pm | मराठी कथालेखक

छान कथा.

आपली कुटुंब व्यवस्था उत्तमपणे मंडळी आहे. लिखाणाला तोड नाही. घरातील विविध जणांचे स्वभाव-वैशिष्ट्ये ... छानच

*मंडळी ऐवजी मांडली आहे असे कृपया वाचावे

गम्मत-जम्मत's picture

21 Sep 2017 - 2:02 pm | गम्मत-जम्मत

आमची पिढी खूप भाग्यवान आहे असं वाटतं.. आई आजी यांनी कसे दिवस काढले असतील गरीबी आणि टोकाच्या असमानतेमधे!! आत्ता पण बायका ़ ची परिस्थिती फारशी उत्तम नाही,‌ तरी तुलनेने ठीक च म्हणावी लागेल.

एक मी's picture

21 Mar 2019 - 3:01 pm | एक मी

परत एकदा धागा वर काढते. अप्रतिम लेखन.

यशोधरा's picture

21 Mar 2019 - 4:24 pm | यशोधरा

काढलं का वर!
हे वाचलं की खूप त्रास होतो पण वाचायचं काही सोडवत नाही. :(

मिसळपाव's picture

21 Mar 2019 - 4:37 pm | मिसळपाव

अगदी खरंय. बाय द वे, गविची ही सह्यांची मोहीम पाहीलीस? पण थांब आज नको लगेच तुझी सही करूस. उद्या कर - आणि अजून कोणालातरी सांगून ठेव पुढची सही दुसर्‍या दिवशी करायला! असं रोज करून धागा तरता ठेउया :-)

कलकू, कलकू. पक्का. वादा वगैरे.

नरेश माने's picture

22 Mar 2019 - 1:24 pm | नरेश माने

अप्रतिम कथा!!!

लई भारी's picture

11 Nov 2019 - 12:19 pm | लई भारी

छापील दिवाळी अंकात ही कथा बघून आनंद झाला.

जॉनविक्क's picture

11 Nov 2019 - 12:27 pm | जॉनविक्क

कोण आहेत हे लेखक ? नवीन लिखाण केलेले दिसत नाही ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Nov 2019 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हे रामदास काका, यांच लिखाण जेव्हढ वाचाल तेव्हढ कमी आहे.
कधीतरीच लिहितात, पण जेव्हा लिहितात तेव्हा असच नि:शब्द करतात.
यांच्या कविताही फार सुंदर आहेत.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Nov 2019 - 3:42 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एकदा वेळ काढून हे पण वाचा.

जॉनविक्क's picture

13 Nov 2019 - 12:07 am | जॉनविक्क

निव्वळ हौशीपणा न्हवे तर अत्यन्त प्रोफेशनल दर्जाचे लिखाण आहे. हे tiktok नाही तर Netflix आहे.

हा लेख खूपच आवडला, आता पर्यंत १० ते १५ वेळा तर नक्कीच वाचला असेल. प्रत्येक वेळी डोळे पाणवतात .

गुल्लू दादा's picture

12 Nov 2019 - 12:33 pm | गुल्लू दादा

अभ्यास करत असताना वाचण्यात आला. अश्रूंमुळे वहीवरील अक्षरे कधी पांगली कळले सुद्धा नाही. खूप खूप आवडला.

जितक्या वेळा ही कथा वरती येते तितक्या वेळा नव्याने वाचतो..
प्रत्येकवेळी काहीतरी नवीन सापडते..
शेवटी येणार आवंढा काही चुकत नाही पण..

माझीही शॅम्पेन's picture

20 Nov 2019 - 4:02 pm | माझीही शॅम्पेन

जितक्या वेळा ही कथा वरती येते तितक्या वेळा नव्याने वाचतो..
प्रत्येकवेळी काहीतरी नवीन सापडते..
शेवटी येणार आवंढा काही चुकत नाही पण..

+१

पद्मावति's picture

12 Nov 2019 - 1:02 pm | पद्मावति

अफाट सुंदर आहे हे __/\__

आंबट गोड's picture

13 Nov 2019 - 12:41 pm | आंबट गोड

अगदी भावपूर्ण!
पण एक अवांतर : मी असं पाहिलं आहे की आधी जरी मुलींना दुजाभाव मिळत असला तरी समहाऊ लग्नानंतर त्या माहेरी आल्या की अगदी वारेमाप कौतुक त्यांच्या वाटेला येत असे. तसेच त्यांची मुलं मोठी होईपर्यंत 'मामा' ला जबाबदारी सांभाळावी लागे. त्यांची दुखणी खुपणी, शिक्षणं, मानपान........!!
कदाचित आधीच्या दुजाभावाची थोडी भरपाई व्हावी म्हणून विशेषतः आया, आपल्या मुलाकडून जबरदस्तीने करवून घेत.....
त्यात मग जावयांचे अती लाड कौतुक, बहिणीचा मानभावीपणा, ती कशी जाचात आहे व इथे भावजयीला कसे आम्ही सुखात ठेवतो ही तुलना....... हे येई!
वरील गोष्टीचाच हा उत्तरार्ध म्हणायचा....!

मराठी कथालेखक's picture

13 Nov 2019 - 4:40 pm | मराठी कथालेखक

मिपावर काही निवडक कथा आहेत ज्या मिपाकरांकडून पुन्हा पुन्हा वाचल्या जातात त्यात रामदास यांच्या किमान दोन तरी आहेत (ही आणि शिंपीणीचे घरटे)

Cuty's picture

18 Nov 2019 - 3:46 pm | Cuty

फक्त पूर्वीच नाही तर आजही गरीब कुटुंबाला येणारे अनुभव आहेत हे. यातील कित्येक प्रसंग स्वतः अनुभवले आहेत. आपल्या हालअपेष्टांची कुणालातरी जाण असावी, कुणीतरी मायेने थोडे कौतुक करावे असे लहानपणी खूप वाटायचे.शाळेत गणित बरोबर आल्यावर गुरूजींनी दिलेली शाबासकी म्हणजे जणूकाही आभाळ मिळाल्याचा आनंद व्हायचा. हुरूप येऊन खूप अभ्यास करायचे. एकेक आठवण म्हणजे अनुभवच आहे.

स्वलिखित's picture

18 Nov 2019 - 6:12 pm | स्वलिखित

निशब्द
कथा मनापासुन आवडली,,

प्रणित's picture

20 Nov 2019 - 2:12 pm | प्रणित

अप्रतिम,

चित्रदर्शी लिहिलेय हो. आवडले पण मन हळवे झाले.

काही वाक्ये तर अगदीच न विसरता येण्यासारखी आहेत :-

मुली काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली.

इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता.

"असू द्या हो वन्सं. पोराबाळांचं घर आमचं."


आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना..

आता दारु प्यालो तरी दुसर्‍या पेगनंतर दूधाची आठवण येते

दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही.

वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही.

श्वेता२४'s picture

29 Nov 2019 - 4:52 pm | श्वेता२४

आज चौथ्यांदा ही कथा वाचली आणि मन भरुन आलं. प्रत्येकवेळी हे असं होतं हेच या कथेचं यश.

राघव's picture

28 Nov 2019 - 2:32 pm | राघव

नि:शब्द. दंडवत.

तुमचा हा लेख आजवर किमान तीसेक वेळा वाचला आहे पण तरीही पुन्हा वाचावासा वाटतो इतके सुंदर लेखन आहे तुमचे. लेखातील तुमचा मार खाल्ल्यामुळे दूध सोडण्याचा प्रसंग, तुमच्या धाकट्या बहिणीचा डोहाळ जेवणातील पान खाण्याचा प्रसंग तर प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणतात. मलाही जुळ्या लहान मुली आहेत त्यामुळे असेल कदाचित पण तुमच्या बाबांचे मुलींप्रति प्रेम पाहून खुप हळवे व्हायला होते.

गणेशा's picture

16 Jun 2020 - 7:57 am | गणेशा

+1

पुन्हा पुन्हा वाचावा असाच लेख.. मी पण बऱ्याचदा वाचला आहे

बोलघेवडा's picture

14 Jun 2020 - 1:21 pm | बोलघेवडा

आज खूप दिवसांनी हा लेख परत वर आला. अप्रतिम लेख. कितीही वेळा वाचला तरी तेव्हढाच उत्कट.
आपण भारतीय कुटुंब किती दुटप्पी आहोत आणि एखाद्याची किती फरफट करतो. एकत्र कुटुंब व्यवस्थेचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांना हा लेख वाचायला दिलं पाहिजे.

रागो's picture

16 Jun 2020 - 7:26 am | रागो

पुन्हा एकदा वाचला

ही कथा कितीतरी वेळा वाचली आहे.
प्ण प्रत्येक वेळेस वाचताना डोळे भिजतात

सुबोध खरे's picture

1 Feb 2022 - 9:45 am | सुबोध खरे

बाडीस

माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती.
आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....."
खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक.
बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं.
बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले.
बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं.

श्रीगणेशा's picture

1 Feb 2022 - 3:24 am | श्रीगणेशा

निशब्द _/\_

Bhakti's picture

1 Feb 2022 - 8:34 am | Bhakti

खुपचं भावस्पर्शी!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Feb 2022 - 10:15 am | ॲबसेंट माइंडेड ...

सहमत.

काटेकोरांटीची फुलं वाचल्यावर लगेच काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी...... हा अँटीडोट घ्यायचा :=)

विजुभाऊ's picture

1 Feb 2022 - 12:18 pm | विजुभाऊ

मूळ कथा जितकी सुंदर आहेत तितकाच तो अँटीडोट भंकस आहे.

तर्कवादी's picture

5 Feb 2022 - 11:26 pm | तर्कवादी

हृदयस्पर्शी कथा

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Mar 2022 - 9:06 pm | अमरेंद्र बाहुबली

जबरजस्त लेख.