Skip to main content

काटेकोरांटीची फुलं.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 07/11/2008 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी. वर्‍हाडात सावकाराला मालगुजार म्हणायचे.गिरीपेठेतल्या घरातून रस्त्यावर उभं राहीलं की चौबळांच्या घरापर्यंतचा रस्ता दिसायचा.पोरं आळीपाळीनी रस्त्यावर उभी रहायची. जीपडं येताना दिसलं की आनंदानी नाचायला सुरुवात. पाहुणे येणार म्हटल्यावर बहीणी मात्र मुक्या व्हायच्या. चार दिवसात कामानी पिट्ट्या पडायचा. बहीणी सगळ्या आमच्यापेक्षा मोठ्या.आईच्या मदतीला सैपाकघरात.दप्तरं गुंडाळून ठेवायची.शाळेला नाही गेलं तरी चालायचं. जीपड्यातून आजी पायउतार झाली की तिची पिशवी , गाठोडं घ्यायला आम्ही पुढे. संत्र्याची टोपली एकाच्या हातात , दुसर्‍याच्या हातात आत्याची पिशवी. मग आत्याचा नवरा. सगळ्यात शेवटी आत्या उतरायची.वडील आत्याच्या नवर्‍याचं स्वागत करायचे. बाहेरच्या खोलीत सतरंजीवर मोठी माणसं ऐसपैस पसरायची. आजी आणि आत्या मधल्या खोलीत .आम्ही पोरं आजीचं गाठोडं सोडवण्याच्या मागे. कापसाची बोंड, तुरीच्या शेंगा , गाजरं, मटाराच्या शेंगा, आंबट बोरं असा ऍसॉर्टेड माल बाहेर पडायचा.संत्र्याच्या टोपलीला हात लावायची डेरींग नसायची. मग आजीच मेहेरबान होऊन एकेक संत्रं आमच्या हातावर ठेवायची.थंडीनी ओठ उलून गेलेले असायचे. आंबट रसानी ओठ चुरचुरायचे.पण फोडी मोजण्यात आणि सालांचा रस एकमेकांच्या डोळ्यात उडवण्यात जास्त मजा यायची. चहाचं ताट बाहेरच्या खोलीत गेलं की आंघोळीची हाकाटी सुरु व्हायची. आत्या सैपाकघराच्या बाहेरच्या उंबरठ्यावर बसायची. हातात काळं मंजन घेऊन दात घासत बसायची. आई दादासाहेबांसाठी घंगाळात गरम पाणी काढायची.आंघोळीसाठी मोरी.बाथरूम असा काही प्रकार नसायचाच.दादासाहेब आंघोळीला बसले की बायका तात्पुरत्या बाहेर व्हायच्या. आत्या बहीणींच्या हातात धोतर देऊन म्हणायची निर्‍या काढा गं पोरींनो.असली कामं करायला मुली नाराज असायच्या.पण सांगणार कुणाला? मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची. काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा साबणासाठी पेटी उघडली की सुगंध दरवळायचा. मुली उत्सुकतेनी पुढं व्हायच्या पण आत्या पटकन पेटी बंद करायची. आता त्या वेळी टॉयलेटरीज आणि कॉस्मेटीक्स मध्ये आमच्या घरात असणार काय .दरबार गंधाची बाटली, रेमी ची पावडर आणि फूल,जाईचं काजळ.संपलं या पलीकडे काही नसणार .कुठल्याच घरात नसायचं.मुलींना उत्सुकता त्यातच असायची. पावलोपावली माहेरच्या गरीबीचा उद्धार व्हायचा.रात्री झोपायची प्रचंड गैरसोय व्हायची.बाहेरच्या खोलीत पुरुष मंडळी.दादा शहाण्यासारखा मित्राकडे निघून जायचा.मधल्या खोलीत आजी, आई आणि आत्या.स्वच्छ चादरी बाहेर वापरायचे.बाकी सगळ्या चादरी वारंवार शिवलेल्या तरी असायच्या नाहीतर मुताचा वास तरी यायचा.आत्या आजी आणि आईच्या रात्री गप्पा रंगायच्या.मुलींना जाम उत्सुकता असायची गप्पा ऐकण्याची.आत्या कसली ऐकतेय. " ए मुलींनो तुम्ही दूर झोपा बाई." " का ग आत्या "माझी धाकटी बहीण विचारायची. "बाई बाई केव्हढ्या उवा तुझ्या डोक्यात .उडून माझ्या डोक्यात येतील गं बाई . नको . तुम्ही दूरच बर्‍या." आई मधे पडायची. "नाही उवा वन्सं.गेल्या रविवारीच रॉकेल घालून डोकी धुतलीत पोरींची."आणि हा वाद रोज व्हायचा . मुली कंटाळून सैपाक घरात झोपायच्या. माझी धाकटी बहीण त्यातल्या त्यात तिखट. एकदा फणकार्‍यानं म्हणाली "एव्हढेसे तर केस तुझे आत्या आणि गंगावनात कशा गं उवा होतील." या डायलॉग नंतर इतकी शांतता पसरली की नखाखाली ऊ चेचली असती तरी टाळीसारखा आवाज वाटला असता. पाहुणे आले ,शाळा नाही.धाकटं भावंड आजारी पडलं शाळा नाही.पैसे कमी पडतातयंत कॉलेज बंद.कपातीची पहीली झळ मुलींना. शिस्तीची सगळी धार मुलींवर चालायची.ताईची पुस्तकं माई वापरायची.माईचे जुने युनीफॉर्मचे स्कर्ट आक्का वापरायची.निळ्या स्कर्टच्या प्लेटी उसवून दुसर्‍या टर्म पर्यंत वेळ काढायची. फिका पडलेला निळा स्कर्ट आणि डार्क निळ्या रंगाची किनार त्याला जाडीभरडी हातशिलाईची टिप. उंची वाढणं पण शापच. मुली मोठ्या झाल्या. (बसायला लागल्या)ते दिवस व्हिस्पर किंवा तयार सॅनीटरी नॅपकीनचे नव्हते.जुन्या कपड्यांच्या घड्या धुवून वापरायच्या.अंगणातल्या ओट्यावर जेवण. त्या चार दिवसात शिवाशिव पाळावी लागायची.अंगणात एका पत्र्याच्या शॅडमध्ये एक वेगळी बाथरूम. घराचा कोंडवाडा झाला.त्यांचं दुकानात जाणं बंद. गणेशोत्सवाचे कार्यक्रम बंद.गॅदरींगमध्ये स्टेजवर नाचायला जाणं बंद.भुलाबाई बंद.मैत्रीणीकडे जायचं ते भावाला बरोबर घेऊन. याच वेळीनेमकी एखादी बहीण शाळेतून सुटली की समोरच्या दरवाजानं न येता अंगणाला वळसा घालून मागच्या ओट्यावर बसायची. आईनी बघीतलं की आई डोक्याला हात लावायची. "आताच तुला पण गोंधळ घालायाचा होता का "असं म्हणत आंघोळीचं पाणी काढायची. आत्याच्या कपाळाला आठ्या पडायच्या. "असू द्या हो वन्सं . पोराबाळांचं घर आमचं."आईचं पालुपद सारखं चालू असायचं आत्या आंघोळीला जाताना पेटी उघडून पैसे मोजायची. रात्री झोपताना मोजायची. खर्च तर काही करायची नाही पण मोजताना मी आसपास दिसलो की डोळे मोठ्ठे करून विचारायची ए, गोम्या,(घरात मी एकटाच काळा म्हणून मला किलावरचा गोम्या म्हणायची) तू चोट्टा नाहीयेस ना . ? मनात जाम राग आलेला असायचा पण काढायचा कुठे? पण पाहुण्याला खिंडीत गाठायची रग होतीच.(म्हणून रगेल दोडका हे दुसरं नाव पण होतं) असेच एकदा दिवाळीला जावई आले होते.जावई आले की त्यांना भेटायला बरीच माणसं यायची.त्यांच्या चहापाण्याला दूध पुरायचं नाही.घरी ब्रिज खेळायला चिमोटे सावकार , गंगशेट्टीवार, इंगोलीकर , मुंगळे वगैरे सावकार मंडळी यायची. मग चार दिवस मुलांना दूध नाही.चहा प्यावा लागायचा. मुली मोठ्या म्हणून त्यांना चहा पण नाही. मी तसा सहासात वर्षाचा होतो. सकाळी दूध नाहीय्ये, संपलंय म्हटल्यावर जरा नाराजच होतो.आत्या मात्र दूध पित होती. "तिच्या पोटात बाळ आहे ना म्हणून ...." आमच्या ताईनी माझी समजूत काढली.जरासा फुगून मी घरासमोर मंगळूरकरांचा टालावर (जळाऊ लाकडाची वखार)गेलो. त्यांच्याकडे एक गाय पाळली होती.मंगळूरकर काकी गायीचा शेणगोठा साफ करत होत्या. "काकी, तुमच्याकडे दूध असेल ना?" मी विचारलं. "नाही रे बाळा. गाय गाभण आहे ना . पोटात बाळ आहे तिच्या." "आमच्याकडे पण दूध नाहीय्ये. आत्यानी पिऊन टाकलं .ती पण गाभण आहे ना....." काकी ठो ठो हसायला लागल्या. शब्दांचा सूक्ष्म अर्थ कळायचे दिवस नव्हते ते. पण दुपारपर्यंत हा विनोद घरापर्यंत पोहचला होता. साडेचार वाजता घरी आलो तेव्हा आत्या फुरंगटून बसली होती. वडील माझी येण्याची वाट बघत असावेत. हातात तूरकाठी होती.(तुरकाठी मुलांना मारायचं स्टँडर्ड इक्युपमेंट होतं). त्या दिवशी मरेस्तो मार खाल्ला. का मारतायंत हे कळेना . रात्रीचं जेवण बंद. बहीणी मुक्या मुक्या बघत होत्या. मग मोठीनी गळा काढला. मग धाकटीनी.... मार खाउन जो झोपलो तो अपरात्री जागा झालो परत भुकेनीच. मार आठवला . अंगावरचे वळ भुकेनी आणखीनच जळायला लागले, परत मुसमुसायला सुरुवात. ताई जागी झाली . "काय झालं रे "म्हणाली . माझं रडणं काही थांबेना..तिला कळलं मला भूक लागलीय पण जेवायला वाढायचं धैर्य तिच्यात पण नव्हतं. थोड्या वेळानं मोरीवर जायच्या निमीत्तानी उठली.परत आली. माझ्या अंगावर पांघरूण घातलं आणि हातात गुंडाळी केलेली पोळी दिली.एक संपली मग दुसरी दिली.पोळीला काय लावलं होतं ते आठवत नाही पण मिठाची काही कमी नव्हती. आज चाळीसएक वर्षं झाली या गोष्टीला पण दूध प्यायची इच्छा मेली ती मेलीच.आता दारु प्यालो तरी दुसर्‍या पेगनंतर दूधाची आठवण येते आणि दारूची नशा उतरते.दारू पोटात फिरायला लागते. लहान होतो तेव्हा दूध नाही, मोठेपणी दारु झेपत नाही.माणसानी दु:खाचे कोरडे घास गळ्याखाली ढकलावे तरी कसे? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ उपेक्षा ,कुचंबणा, गैरसोय, अपमान,आवडती नावडती,हाल अपेष्टा, हेळसांड या सगळ्यांना तोंड देत या मुली शिकल्या. मुली जितक्या शिकल्या तेव्हढच मुलं पण शिकली.पण मुलांचं कौतुक जितकं झालं तितकं मुलींचं काही नाही. मला नक्की कुठलं वर्षं ते आठवत नाही पण मी तेव्हा बराच लहान असणार. घरी वडलांचे मुंबईचे काका आणि त्यांचा मुलगा आला होता.हौशी माणसं .ते आग्रह कर करून आई आणि बाबांना आरजू नावाच्या सिनेमाला घेऊन गेले. ताई -दादा कॉलेजात. मला आणि धाकट्या भावाला सांभाळायला दोन्ही बहीणी घरी थांबल्या होत्या. त्यांना घरी राहण्यासाठी बाबांनी दोघींच्या हातावर पाच पाच पैसे ठेवले होते. हातात पैसे असणं हा तसा दुर्मीळ प्रसंग. दुपारी मी झोपल्यावर दोघींनी एक धाडस केलं .दोघीजणी पानाच्या ठेल्यावर गेल्या. पाच पैशात तेव्हा मिठा पान यायचं .दोघीजणी पान खाऊन घरी आल्या. आता खाल्लं तर खाल्लं निदान फ्रॉकवर सांडायचं तर नाही . बरं सांडलं तर सांडलं.धुवून पुरावा तरी नष्ट करायचा. बराच वेळ आरशासमोर उभ्या राहून दोघी जीभा किती लाल झाल्या ते बघत बसल्या. चार वाजता सिनेमाला गेलेली मंडळी घरी आली. आल्या आल्या आईनी विचारलं "अगं बायांनो फ्रॉकवर काय सांडलयत.?" खोटं बोलायला मुलगा व्हायला लागतं.या शेळीच्या शेपट्या.खोट्याची झाकपाक करायला एकदम नालायक. आईला जीभ काढून दाखवली. आईनी डोक्याला हात लावला आणि बाबांनी कानाखाली. दोन मिनीटात जीभेपेक्षा गाल जास्त रंगले.पण यांच्या डोळ्यात पाणी नाही. बिचार्‍या इतक्या निष्पाप की नंतर सात दिवस झाले तरी त्यांना कळेना की नक्की काय चुकलं. या मुली भराभर मोठ्या होतं गेल्या. शिकल्या .आपल्या पायावर उभ्या राहील्या. आईबाबांनी सांगीतलेल्या मुलांशी लग्न करून संसार थाटले. धाकट्या बहीणीच्या डोहाळजेवणाच्या वेळची गोष्ट. दुपारची जेवणं झाल्यावर बाबा खूषीत होते.पानपट्ट्या बाहेरून मागवल्या होत्या. बाबांनी एक पान जावयाच्या हातात दिलं .जावई रसीक .त्यानी सगळ्यांच्या समोर अर्धं पान बहीणीला भरवलं. बाबांना आणि बहीणीला एकाच वेळी जोरात ठसका लागला . पंधरा वर्षापूर्वीचे साठवून ठेवलेले आसू डोळ्यात उभे राहीले. बाबांना रडताना मी सुद्धा पहील्यांदाच पाहीलं. वर्षामागे वर्षं गेली आणि आईपेक्षा बाबा जास्त हळवे होत गेले.मुलींच्या आठवणीनी बेचैन व्हायला लागले. मुलींच्या फोनची वाट बघायचे. फोन आला नाहीतर आईच्या मागे लागून फोन करायला लावायचे. वय माणसाच्या मनाशी काय खेळ करेल काही सांगता येत नाही. माझ्या मुलीच्या पहील्या वाढदिवसाला ताई आली होती.मला म्हणाली "काय रे दोडक्या, तुझा रगेल पणा जरा कमी झालेला दिसतोय. सारखं घरात काय आहे रे तुझं.?" "हळवं व्हायला काय वय झालं का रे तुझं?"मी काहीच बोललो नाही. म्हातारपण कुणी पाह्यलंय. हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 147576
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

फारच मस्त, जिवन्त चित्रन उभे राह्ते समोर,!!

आपल्या पुर्वजांनी म्हणजे(आई,आजी,पणजी,काकी,मामी,आत्या ई. नी) कसे दिवस काढले असतील त्याची जाणीव झाली धन्यवाद.सुरेख लेख.

रामदास.... आत्ता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला व्यनि पाठवल्याप्रमाणे तुमचं लेखन वाचणं म्हणजे आनंद + ज्ञानार्जन असतं ! >> हळवं व्हायला वय व्हायला पाहीजे असंच काही नाही. काय मनातलं बोललात !!

कित्येक वर्षांत इतकी सुंदर कथा वाचली नव्हती. धन्यवाद.

रामदासजी,अप्रतिम लेखन !कित्येक वाक्ये त्या काळात घेऊन गेली.कांही वाक्यांनी अंतर्मुख व्हायला भाग पाडले.

वाह्...वाह.... वाह........ मी जितका काळ मिपावर वावरतेय....८-१० महिने.... रामदास यांचे लेख क्वचितच पाहिले.... बहुतेक सगळ्या प्रतिक्रियाच!!! हा लेख..... चतुरंग यांनी दुवा दिल्याने वाचला..... आता वेळ काढून.. रामदास यांचे सगळे लेखन वाचलेच पाहिजे!!!!

नेहमीप्रमाणे अप्रतिम..

लिहीलाय काका. अशी परिस्थिती जवळुन पाहिलेली आहे. त्यामूळे अंतर्मुख होउन वाचला. खुप खुप खुप खुप खुप आवडला आपला लेख.

खुप आवडले...... हे वाचायचे कसे राहुन गेले तेच कळत नाही.

हृदयस्पर्शी!डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.

रडवलं तुम्ही... नातेवाईक हा प्रकार किती तापदायक असतो, ह्याचा चांगलाच अनुभव आहे. तुमच्या प्रत्येक ओळीतून मी माझ्या बालपणातून फिरुन आलो... फक्त पैसा आहे म्हणून माज करणारा काका, मोठेपणा दाखवणारी आत्या वगैरे अनुभव भरपुर आहेत, आणि ह्यांच्याकडे साला वारा पाहुन तोंड फिरवण्याची, कामापुरता मामा करण्याची तसेच खाल्ल्या ताटात थुंकण्याची कॅपॅसिटीही जबरदस्त असते... अतिशय ताकदवान कथा.. मनःपुर्वक धन्यवाद... आणि खरंच, काटे झाडायला हरकत नाही, कारण ते आपल्यालाच टोचतात नाहीतर.. मध्यमवर्गीय कुटूंबाची काय व्यथा असते ती ही कथा जाणवून देते. आताच्या नवीन पिढीला काही संदर्भ कळणार नाही. पाभेकाका, पहील्या वाक्याशी शतशः सहमत. दुसर्‍याशी मात्र नाही.. ही गोष्ट सापेक्ष आहे. प्रत्येक पिढीत, प्रत्येक स्तरावर असले अनुभव येत असतात. टोचणी आणि परीणाम वेगळे असतील फार तर..

वरील सर्व प्रतिसाद +१ शिंपिणीचे घरटे व काटेकोरांटीची फुलं हे मिपावरील मास्टरपीस लेखांपैकी आहेत

पुस्तकावरुन कथेचं नाव कळलं आणि मागे जाऊन कथा शोधून वाचली. अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात. बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..

In reply to by गवि

कसलं लिहिलंय... सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिलेत. अप्रतिम! पुढे आणखी काय लिहावं सुचत नाहीये. प्रतिक्रिया देऊन हा लेख समोर आणल्याबद्दल गविंचे आभार.

In reply to by गवि

लिखाणाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता नाही! _/\_ ह्या आणि इतर काही प्रतिसादांमध्ये पुस्तकाचा उल्लेख आलाय. रामदास काकांचे पुस्तक आले आहे का? कोणी अधिक तपशील दिला तर बरे होईल. पुस्तकाचे नाव, कोणत्या नावाने लेखन केले आहे, कुठे मिळेल?

अप्रतिम. वाचनाचा अत्युच्च आनंद. तुम्ही ग्रेट आहात. बाकी काही लिहिण्याची माझी योग्यता नाही..
+१००

मस्त लिखान .. पुस्तक आवर्जुन विकत घेतले जाईनच.

अप्रतिम - गेल्या वर्ष भरात कमीत कमी १० वेळा वाचली असेल त्रिवार सलाम ! पुस्तक केव्हा आणि कुठे मिळेल ते नक्की कळवा !

अचानक वरती आलेला पाहून खूप छान वाटले. परत एकदा वाचला. परत डोळे भरुन आले. पुन्हा एकदा काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाहीये. मनातल्या मनात लेखाचा आनंद घोटाघोटाने पीत राहीन दिवसभर! -रंगा

मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची. काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा. सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही. सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या. सर असच माझं सुध्हा बालपण गेल. पण सर तुमच्या सारखे तुम्हीच ८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झली नाही. रघू सावंत

मोरीत साबण एकच. लाईफबॉय.आत्या फणफणायची. काय बाई खरजेचा साबण देता पाहुण्याला असं म्हणायची.आपली पेटी उघडून मोती साबण काढायची. आंघोळ झाल्यावर साबण परत पेटीत जायचा. सर खरच बालपणीचे दिवस आवठवले, जस्सेच्या तस्से , डोळ्यातुन पाणी कधी आले ते कळलेच नाही. सगळ्या गोश्टी लक्ख डोळ्या समोर उभ्या राहिल्या. सर असच माझं सुध्हा बालपण गेल. पण सर तुमच्या सारखे तुम्हीच ८ वर्षा पासुन आपण एक मेकांना ओळखतो पण हि खरी ओळख आत्ता झाली,अगोदर का झाली नाही. रघू सावंत

बर्‍याच जणांसारखं बालपण आठवलं.. हे मात्र खर की, प्रसंगी मुलांपेक्षा मुलींची कुचंबणा जास्त व्हायची /होते...आणि adjustment म्हणाल तर बहीणीच जास्त करायच्या... खरचं सुंदर लेखन.

धागा पुन्हा वर काढणार्‍या गौरी१२ यांचे आभार!

पुन्हा वाचून काढले.... प्रत्येक वेळेस मनात खोलवर काहीतरी हलते...

रामदासजी, आपल्या कथेने जुन्या काळात नेले आणि एकदा पुन्हा तो काळ अनुभवला असा प्रत्यय आला.धन्यवाद.

नतमस्तक !!! चतुरंग आणि मुक्तसुनित यांच्या प्रतिक्रियांशी शब्दशः सहमत....

>>या मुली आमच्या घराच्या काटेरी शिस्तीत कोरांटीच्या नाजूक फुलासारख्या वाढल्या. मुलं केवड्यासारखी वाढली. आमच्या अंगणातली ही कोरांटीची फुलं दुसर्‍याच्या घरात सोनचाफ्यासारखी फुलली. काटे विसरून गेली. पोरं मात्र केवड्याच्या उग्र दिमाखात काट्यासकट मोठी झाली. आता घरात मुलगी आलेय तर केवड्याला काटे झटकायला काय हरकत आहे?

वरती सगळ्यांनीच म्हटलय तेच पुन्हा म्हणतोय :- अप्रतिम. इतरांनाही वाचता यावा म्हणून धागा वर काढत आहे.

सुंदर मास्टरपीस... वाचता वाचता डोळ्यात पाणी कधी आलं कळालचं नाही.

जेव्हा जेव्हा हा लेख वर येतो तेव्हा तेव्हा अधाश्यासारखा वाचलेला आहे. दर वेळी काही तरी नवं उमजत रहातं. रमीच्या डावात एखादं मोक्याचं पान हाताशी मिळालं की आधीचे सेक्वेन्सेस भराभर बदलून भर्र्कन रमी लागावी तसं होतं. छोट्या छोट्या वाक्यांआड लपलेले अनेक अर्धविराम, पूर्णविराम, वळणं, वेलांट्या 'ये, आम्हांला शोध' म्हणून खुणावत रहातात. गेल्या सहासात वर्षांत यत्किंचितही शिळा न झालेला आणि कायम पुन:प्रत्यय देणारा एक अप्रतिम लेख.

:( :(

काळजाला हात घालणारं लिखाण ! अश्या महाभागांबद्दल नेहमीच असुया वाटत आली आहे ! आजकाल रामदासकाका का लिहीत नाहीत? कृपया कोणीतरी त्यांना परत लिहीते करा.

हा धागा ज्या कुणी वर काढला त्याला मनापासून धन्यवाद.

काटेकोरांटीची उदाहरणं बरीच बघितली. पण त्यात काहि चुकल्याची जाणिव, आणि ति चुक पुढे कंटिन्यु न करण्याची सजगता सहसा बघायला मिळत नाहि. बुवा, तुम्ही नक्की काय मटेरीयल आहात? सुख-दु:खाचे वणवे पचवणारे अनेक पाहिले. प्रचंड साहस, जीद्द, कर्तुत्व असणारी मंडळी देखील सभोवती अनुभवली. पण असं जींदगी वाचता येणं नाहि बघितलं. __/\__

कोरांटी चा सोनचाफा झाला पण केवडा तसाच, अशी काही कोरांटीची फुल सोनचाफा झालेली पाहिली पण इतकी चपखल उपमा कधी सुचली नाही क्या बात है|

अप्रतिम... रामदासकाका.......लहानपणीचं चित्रच समोर उभं केलत.....फार फार टची लिहीता तुम्ही. वाचताना डोळे कधी वाहायला लागले ते कळलेच नाही...

अप्रतिम. केवळ अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. माझ्या आईकडून तिच्या लहानपणचे जे काही वर्णन ऐकले आहे ते तंतोतंत इतकं सुंदर शब्दरूप केलंय. अगदी याक्षणी आईला कडकडून भेटावसं वाटतंय.

... !!

कदाचित लेखक जितक्या दारिद्र्याच्या वातावरणात वाढला आहे त्याच्या कैकपट गरीब वातावरणात मी वाढलो आहे. पण आमच्याच घरी येऊन असे वागणारा एकही पाहुणा पाहिल्याचे आठवत नाही. माझ्या आत्या, मावशीच्या आठवणी अत्यंत गोड आहेत. आजच्या पिढीला माहित नसलेला जुना काळ अतिशय वाईट रंगात रंगवायचा, प्रेक्षकांना/वाचकांना भावूक बनवायचं, आपण शहराच्या भाऊगर्दीत कसे सुखी आहोत असे वाटायला लावायचे ही एक वेगळी कलाइंडस्ट्री आहे. मला अशा कथा वाचून बोर झाले आहे.