क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग १०

Primary tabs

कलम's picture
कलम in जनातलं, मनातलं
11 Dec 2018 - 2:13 pm

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग १०

दुसया दिवशी सबइन्स्पेक्टर राऊतांना घेऊन इंस्पक्टर पाटील सकाळी सकाळीच अमितच्या घरी पोचले. कुणा मयताच्या घरी दुसऱ्या दिवशीच जाऊन त्याच्या आप्तजनांना तपासाच्या नावाखाली त्रास देणं खरं तर इन्स्पेक्टर पाटलांना आवडायचं नाही, पण तरीही असे प्रसंग महिन्यातून एक दोनदा तरी येत. तीन वेळा बेल वाजवल्यावर कुणा एका स्त्रीनं दरवाजा उघडला. पोलिसांना एवढ्या सकाळीच दारात बघून तिला आश्चर्य वाटल्यासारखं दिसलं. इन्स्पेक्टर पाटील हॉल मध्ये इकडं तिकडं बघत सोफ्यावर जाऊन बसले. घरात बरीच माणसं होती, कदाचित अमितच्या आणि इशाच्या घरची माणसं असावीत. सगळ्यांच्या तोंडावर उतरती कळा स्पष्ट दिसत होती.

दहा एक मिनिटांनी मान खाली घालून इशा येताना त्यांना दिसली. अगदी फिक्या पोपटी रंगाचा कुर्ता, तारवटलेले आणि रडून सुजलेले डोळे, गळ्यात आणि हातात एकही दागिना नाही, कपाळावर टिकली नाही आणि विस्कटलेले केस अश्या अवतारातल्या ईशाला बघून त्यांना फार वाईट वाटलं.

"मिसेस इशा, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, अर्थात तुमची परिस्थिती बोलण्यासारखी असेल तरच."

"बोला इन्स्पेक्टर, नाहीतरी आज नाही तर उद्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावीच लागणार आहेत. उगाच माझ्यामुळं तुमच्या तपासात अडथळा नको. बोला तुम्ही." इशा शेजारच्याच खुर्चीत बसत म्हणाली.

"हम्म... खरं आहे तुमचं म्हणणं. पण काय करायचं, ही नोकरी अशीच आहे की नको असतानाही अश्या बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. तुमचा जास्त वेळ न घेता सरळ मुद्द्याचं बोलतोय. अमितच्या खुनाबाबतीत तुम्हाला कुणावर संशय आहे का"

"नाही, खरं तर अमित अगदी मनमोकळा असल्यानं त्याच्या नोकरीत आणि मित्र मैत्रिणींच्यात खूप प्रसिद्ध होता. सगळेच जण त्याच्या कडं मदत मागायला येत. बराच गोतावळा जमवला होता त्यानं. पण कधी त्याच्या तोंडून किंवा वागण्यातून असं कधीच वाटलं नाही कि कुणीतरी त्याच्या जीवावर उठेल. त्यामुळंच मला कुणावरही संशय नाही."

"हम्म... आणि अमित बद्दल तुमचं मत काय? म्हणजे माणूस म्हणून कसा होता तो?"

"त्यानं काय फरक पडतो इन्स्पेक्टर आता? त्या दिवशी रिसॉर्ट मध्ये आले होते तेव्हा कळलं कि त्याच्या खोलीत एका बाईची बॉडी मिळाली म्हणून. घराजवळून ३० किमी अंतरावर असलेल्या रिसॉर्ट मध्ये रूम बुक करायचं कारणच काय हे मला आधी कळलं नाही. तुमच्या टीम कडून नंतर कळलं कि अमितनं डबल रूम बुक केली होती आणि त्या दोघांमध्ये त्या रात्री..... मेलेल्या बद्दल वाईट बोलू नये म्हणतात. पण खरं सांगायचं तर, तुम्ही मला मगाशी विचारलंत ना कि कुणावर संशय आहे म्हणून. खरा संशय मला अमित वरच आहे. त्याचा असा संशयित स्थळी, संशयित बाईबरोबर झालेला मृत्यू बघून कधी कधी वाटतं कि मी खरंच अमितला ओळखत होते का? इन्स्पेक्टर, खूप विश्वास होता हो माझा त्याच्यावर. अनिशची किती काळजी घ्यायचा तो." असं म्हणून ईशा खाली मान घालून रडू लागली. लागलीच खोलीतून तिच्या आईच्या वयाची एक स्त्री आली आणि तिच्या डोक्यावर हलकेच थापटून तिचं सांत्वन करू लागली.

हम्म.. हे सगळं अश्या पद्धतीनं बाहेर येणं हे खरंच खूप धक्कादायक आहे हे मी समजू शकतो. अमित तुम्हाला आणि आम्हाला एकत्रच नव्यानं कळला. अमितच्या बाबतीत मिळालेली माहिती पण त्या दिवशी दिसलेल्या सत्यासारखीच विषारी आहे. त्या दिवशी रिसॉर्ट मध्ये मरून पडलेल्या बाईशिवाय अमितची बाकी अनेक बायकांबरोबर संबंध होते असं आत्तापर्यंच्या मिळालेल्या पुराव्यांवरून सिद्द्ध होतंय. ह्या बायका एका एस्कॉर्ट एजन्सी कडून त्याला मिळत असत.""

"क्काय? असं कस शक्य आहे इन्स्पेक्टर? त्याच्या साधेपणामागं असाही एक चेहरा होता हे ऐकून आणि बघून माझा स्वतःवरच विश्वास बसेना झालाय. आज इतकी वर्षं मी केलेला संसार एका खोटेपणाच्या पायावर उभा होता. आज जर अमित जिवंत असता तर त्याला विचारलं असतं कि मी कुठं कमी पडले म्हणून तुला हे सगळं करायची गरज पडली. इतके प्रश्न निर्माण करून एकाचंही उत्तर न देता असं निघून जाणं खूप त्रासदायक आहे इन्स्पेक्टर. आता जन्मभर मी त्या न मिळाल्या उत्तरांचे प्रश्न मनात घेऊन जगायचं आणि मरायचं. जिवंत असताना न कळलेलला मनुष्य मेल्यानंतर इतक्या वाईट पद्धतीनं कळतोय मला. आई, काय करू ग मी?" तिच्या शेजारी बसलेल्या बाईच्या खांद्यावर डोकं ठेवून इशा मुसमुसून रडू लागली. पाचेक मिनिटांनी तिने स्वतःला सावरलं आणि इंस्पेक्टरांकडं बघून ती म्हणाली. "इन्स्पेक्टर, माझा तुम्हाला या तपासा संदर्भात काही फायदा होईल असं वाटत नाही कारण मला हे सगळं नव्यानंच कळतंय. अजून काही सांगायचं असेल किंवा विचारायचं असेल तर ते पण सांगून टाका. कमीतकमी अमित गेल्यावर तरी मला सत्य समजलं असं वाटेल आणि माझ्या आयुष्याचा साथीदार गेल्याचं दुःख पण वाटणार नाही."

घसा खाकरत इन्स्पेक्टर पाटील बोलले "आता मगाशी मी तुम्हाला ज्या एस्कॉर्ट एजन्सी संदर्भात सांगितलं ना? तिथून पुरवल्या गेलेल्या स्त्रिया सोडून आणखी एक स्त्री अमितच्या आयुष्यात होती. तिच्या म्हणण्या नुसार तिचं आणि अमितचं एकमेकांवर प्रेम होत. पण एकूणच अमितचा इतिहास पाहता तो कुणावर प्रेम करू शकणार नाही असंच वाटतंय. अमितच्या दृष्टीनं ती स्त्री म्हणजे त्याच्या अनेक विरंगुळयांपैकी एक असू शकते."

"कोण आहे ती?"

"मिसेस शांभवी सरपोतदार."

खोलीत शांतता पसरली. ईशा साठी हा आणखी एक घाव होता.

"तुम्हाला कधी मिसेस शांभवी यांच्यावर संशय आला होता का? म्हणजे त्यांचं एकत्र बोलणं-वागणं ह्यातून तुम्हाला असं कधी वाटलं नाही का कि हे सगळं निखळ मैत्रीच्या पलीकडे पण असू शकतं."

"शांभवी अमितची खूप जवळची मैत्रीण होती, फक्त तीच नाही तर तिच्या कुटुंबाचे आमच्या कुटुंबाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. खरं सांगायचं तर मी कधीच मैत्रीच्या नात्याला वेगळ्या अर्थाने घेतलं नाही आणि बघितलंही नाही." आणि परत एकदा इशा शून्यात बघू लागली.

इन्स्पेक्टर पाटील आपल्या जागेवरून उठले आणि राऊतांना त्यांनी खूण केली. त्यासरशी तेही जागेवरून उठले. ईशाला आता काहीच विचारण्यात अर्थ नव्हता. त्यांच्या आईला पाटलांनी बाजूला बोलावून घेतलं आणि ते म्हणाले, "खाली माझी टीम सर्च वॉरंट घेऊन थांबलीय. ती आता पाचेक मिनिटात वर येईल. त्यांना सहकार्य करा. हवी असलेली सर्व माहिती सांगा आणि जागा दाखवा. जितक्या शांतपणे हे सगळं होईल तितकं ह्या केसच्या, तुमच्या आणि एकूणच आमच्या दृष्टीनं बरं आहे. ईशा मॅडम आता शॉक मध्ये आहेत. आम्ही उद्या परत एकदा येऊ."

सबइन्स्पेक्टर राऊतांनी फोने केला तशी त्यांची टीम सर्च वॉरंट घेऊन वर आली . त्यांना काही महत्वाच्या सूचना देऊन राऊतांना तिकडंच थांबायला सांगून इन्स्पेक्टर पाटील बाहेर पडले.

खाली पार्क केलेल्या जीपमध्ये बसता क्षणी त्यांचा मोबाईल वाजला. फोन कानाला लावता क्षणी तिकडून रागीट आवाज आला.

"इन्स्पेक्टर, अथर्व सरपोतदार धिस साईड. तुम्ही स्वतःला समजता काय? काल संध्याकाळी माझ्या घरी येऊन तुम्ही माझ्या बायकोची चौकशी केलीत असं मी ऐकलं. तिला असं काय बोललात तुम्ही कि ती अजूनही trauma मध्ये आहे. काहीच बोलत नाहीये, सांगत नाहीये. तुम्हाला माझ्या बद्दल माहित नाही, माझे संपर्क खूप वरपर्यंत आहेत हे तुम्ही विसरू नका. माझ्या बायकोला काहीही कारण नसताना त्रास दिलात तर बघा, मी काहीही करू शकतो."

इन्स्पेक्टर पाटलांना रोज असले शंभर एक फोन येत असल्यानं त्यांनी केव्हाच असल्या फोन ना उत्तर द्यायचं बंद केलेलं होत. " ठीक आहे मि. अथर्व सरपोतदार, तुम्ही एक काम करा. अर्ध्या तासात स्टेशन मध्ये पोहोचा. मला तुमच्या बरोबर काही गोष्टी बोलायच्या आहेत, तेवढ्या बोलून घेऊया आणि मग तुम्ही आत्ता विचारलेल्या आणि सांगितलेल्या गोष्टींवर विचार करूया. "

इन्स्पेक्टर पाटलांकडून मनासारखी प्रतिक्रिया न मिळाल्यानं क्षणभर अथर्वला काय बोलावं हेच कळेना. तितक्यात पलीकडून आवाज आला, "चालेल ना मि अथर्व सरपोतदार? ठीक आहे बोलूयात मग भेटल्यावर." आणि फोन कट झाला.

इशाकडून काहीच लीड मिळाली नव्हती. इन्स्पेक्टर पाटलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ईशाला नव्यानं कळल्यासारखी वाटत होती. तरीही गाफील राहून चालणार नव्हते. सध्या तरी दिसणारी प्रत्येक व्यक्ती संशयाच्या जाळ्यात होती. ईशाचे फोन रेकॉर्डस् आणि खुनाच्या वेळचा तिचा ठावठिकाणा नक्की कोठे होता हे हुडकण्यासाठी त्यांनी हवी ती सूत्रे हलवली होती. ईशाला मिळालेल्या धक्क्याप्रमाणे आणखी एक धक्का आता अथर्वला पण बसणार होता, निदान तो बसला आहे असे दर्शवले जाणार होते.

कोण असेल खुनी? इशा, अथर्व, शांभवी की आणि कुणी तरी. कौटुंबिक पातळीवर पाहता शांभवी, इशा आणि अथर्व ह्या तिघांकडं पण खून करण्याचे सबळ कारण होते. परंतु सगळेच जण ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असल्याचे दाखवत होते. मिळालेले पुरावे देखील मिश्र होते. फोन रेकॉर्डस् वरून शांभवी खुनाच्या जागी असावी हे सिद्ध होत असले तरीही डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे खुनी पुरुष असण्याची शक्यता जास्त होती. खुनी खूप जास्त हुशार होता.

जवळपास पाऊण तासानंतर इन्स्पेक्टर स्टेशन मध्ये पोचले तेव्हा अथर्व बाहेर उभा राहून त्यांची वाट बघत बसलेला त्यांना दिसला. उतरल्यानंतर त्यांनी सर्वात आधी हसून त्याला आपल्या केबिन मध्ये यायला सांगितलं.

"दोन चहा आण रे." इन्स्पेक्टर पाटलांनी बाहेरून चालत जाणाऱ्या असिस्टंट ला ओरडून सांगितलं.

इंस्पेक्टरांना भेटायला आलेल्या माणसासाठी जर इंस्पेक्टरांनी चहा मागवला तर प्रकरण खूप गंभीर आहे आणि अगदी जास्त महत्वाचं काम असल्याशिवाय आत जायचं नाही हा अलिखित नियमच होता.

"माझ्या बायकोला उगाचच त्रास द्यायचं काय कारण? काय ते लवकर बोला इन्स्पेक्टर पाटील, वेळ नाहीये माझ्याकडं. तुम्ही असाल पोलीस, पण उगाचच निष्पाप लोकांची अशी मानसिक छळवणूक तुम्ही करू शकत नाही. " थोड्या रागातच अथर्व बोलला तरी का कोण जाणे मघासारखा त्यात द्वेष नव्हता. कदाचित इन्स्पेक्टर पाटलांच्या बोलण्यावरून काहीतरी सिरिअस बाब आहे हे अथर्वला समजलं असावं.

"मि. अथर्व, आम्ही कुठल्याही नागरिकाला उगाच त्रास देत नाही. कुठलातरी सबळ पुरावा असल्याशिवाय मला तुमच्या घरी येण्याचं कारणच काय? अमितच्या खूनाप्रकरणी शांभवी मॅडम वर संशय आहे म्हणूनच तुमच्या घरी आलेलो होतो. काल माझ्या आणि मॅडम मध्ये झालेल्या गोष्टी तुमच्या समोरच घडाव्यात अशी मनापासून इच्छा होती माझी पण तुम्ही काल घरी दिसला नाहीत.."

"अं.... हो, मी काल मिटिंग साठी बाहेर गेलो होतो. रात्री घरी पोचलो तेव्हा कळलं कि शांभवी संध्याकाळपासून गप्पच आहे, तिनं काहीच खाल्लेलं नाही. तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तिनं स्वतःला खोलीत बंद करून घेतलंय. शेवंताकडून कळालं कि तुम्ही माझ्या घरी येऊन गेल्यापासनंच हे सगळं घडलंय. आणि तुम्ही काय म्हणालात? शांभवी आणि संशयित? आणि ते पण अमितच्या खुनात?"

"हो. बरं त्या बद्दल नंतर बोलूयात, तुम्ही आधी सांगा कि खुनाच्या रात्री तुम्ही कुठं होतात ?

"खुनाच्या आदल्या दिवशी शांभवीचा वाढदिवस होता. रात्री बारा पर्यंत त्याची पार्टी चालली. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास मी महत्वाच्या मीटिंग साठी बाहेर गेलो होतो. सगळं काम संपवून मी जवळपास पहाटे ५ च्या दरम्यान घरी पोचलो. बघितलं तर टेबलावर रात्रीचं जेवण तसंच पडलं होतं. वरच्या मजल्यावरच्या माझ्या मिनी बार मध्ये शांभवी झोपली होती. तिने बरीच दारू पिलेली आहे असं वाटत होतं. नक्की काय झालंय ह्याचा सोक्षमोक्ष दुसऱ्या दिवशी सकाळी लावावा असा विचार करत मी तिला उचलून बेडरूम मध्ये घेऊन गेलो आणि तीला झोपवून मी खाली स्टडी मध्ये येऊन बसलो. काहीतरी वाचत असतांनाच माझा डोळा लागला ते दुसऱ्या दिवशी तुम्ही घरी आलात तेव्हाच मी जागा झालो.

"मॅडमच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी बाहेर पडलात तेव्हा त्यांचा मूड कसा होता?"

थोडा विचार करून अथर्व बोलला "एवढा काही खास नव्हता, तिला बघून असं वाटत होत कि ती रात्रभर झोपली नाहीये. मी कारण विचारायचा प्रयत्न केला पण ती काहीच बोलली नाही. त्या दिवशी सकाळी तिनं माझ्यासोबत नाश्ता देखील केला नाही. मला तिला बरंच काही विचारायचं होत, पण मला देखील उशीर झाल्यानं मी निघालो. पण इन्स्पेक्टर तुम्ही मला हे सगळं कशासाठी विचारताय? अमितच्या खुनात माझा सहभाग आहे, असं वाटतंय कि काय तुम्हाला? हे पहा, अमित माझा आणि शांभवीचा खूप चांगला मित्र होता आणि त्यामुळं ह्या सगळ्यात मला किंवा माझ्या शांभवीला उगाच गुंतवू नका. आमच्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा खऱ्या खुन्याला हुडकून काढा."

"खुनाच्या रात्री शांभवी मॅडमचा फोन खुनाच्या ठिकाणी ऍक्टिव्ह होता हे रेकॉर्डस् वरून सिद्ध झालंय."

"असं कसं शक्य आहे?" अथर्व थोडा वेळ गोंधळला पण काही क्षणातच तो म्हणाला, "हे कुणीतरी जाणून बुजून केलं असेल, कुणी तरी शांभवीचा फोन रात्री मुद्दामहून तिकडं प्लांट केला असेल."

"खरं आहे, तसंही असू शकेल मि सरपोतदार. आता डिटेक्टिव्ह डोक्यानं तुम्ही एवढी थेअरी बनवलीच आहे तर तुम्हाला काय वाटत? कुणी शांभवीचाच फोन खुनाच्या जागी, खुनाच्या वेळी का घेऊन जाईल?"

"ते मला काय माहित, हे सगळं हुडकून काढणं तुमचं काम आहे."

"आणि ते आम्ही हुडकूनही काढलय मि. सरपोतदार, तुम्हाला हे सगळं ऐकवणार नाही आणि ते पण माझ्या तोंडातून नाहीच नाही. तरीही सांगतो, मिसेस शांभवी यांचे अमित केतकारांबरोबर अनैतिक संबंध होते आणि तेही गेल्या सहा महिन्यांपासून. बरंच इंटिमेट रिलेशन मध्ये होते दोघेही असं आम्हाला त्यांच्या रात्री अपरात्री, घरात आणि घराबाहेर एकत्र असणाऱ्या कॉल रेकॉर्डस् मध्ये दिसतंय. आणि कॉल रेकॉर्डस् हा सबळ पुरावा नाही हे म्हणण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो कि तुमच्या बायकोने त्यांचं हे प्रेम प्रकरण कबूल केलंय" असं म्हणत इंस्पेक्टरांनी अथर्वला आधी पासून सगळी हकीकत सांगितली. अमित चा बाईल वेडा स्वभाव, त्याच्या सवयी, त्यानं आणि शांभवीनं घालवलेला एकत्र वेळ हे सगळंच कॉल रेकॉर्डस् च्या फाईल मध्ये दाखवून दिल.

अथर्व डोके धरून समोर बसला होता. मघापासून फक्त इन्स्पेक्टर पाटीलच बोलत होते आणि अथर्व सुन्न झाल्यासारखा सगळं ऐकत होता. सगळं सांगून संपल्यावर इन्स्पेक्टर पाटील त्याला म्हणाले, "ह्या नवीन मिळालेल्या माहितीनुसार आता तुम्ही सगळेच जण माझ्या संशयाच्या गराड्यात आहात आणि त्यामुळं मी परत एकदा सांगतो कि शहराबाहेर परवानगीशिवाय जाऊ नका. आणि अमित आणि मिसेस सरपोतदारांमध्ये एवढं सगळं झालेलं असताना खूनाच्या ठिकाणी खूनाच्या वेळी त्यांचा फोन असणे हि साधीसुधी बाब नाही हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. "

मान खाली घालून अथर्व उठला. एक तासापूर्वी फोनवर ऐकू आलेला अरेरावी आवाज आता कुठंही ऐकू येत नव्हता. इन्स्पेक्टर पाटलांच्या डोळ्यात डोळे न घालता तो तसाच बाहेर निघून गेला.

शांभवी आणि अमितच्या चुकीच्या निर्णयामुळं, क्षणभंगुर सुखामुळं आज दोन कुटुंबांची राखरांगोळी होत असलेली इन्स्पेक्टर पाटलांनी पहिली. या जगात सगळ्यात जास्त दुःख आपली माणसंच देतात. कितीही नाही म्हटलं तरी नाती विश्वास आणि अपेक्षांच्या डोलाऱ्यावर उभारलेली असतात. त्यातील कुठल्याही एकाला तडा गेला तर नात्यातला ओलावा, माणसातलं प्रेम, आयुष्यातला रंग आणि श्वासातला प्राण.. सगळंच मरून जातं .

क्रमशः

(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)

लेखकथा

प्रतिक्रिया

थोडे भाग मोठे टाका आणि इतका मोठा गॅप टाकू नका लिंक लागायला वेळ लागतो पण बराच गुंता असणार आहे असं दिसतंय, लगे रहो

कलम's picture

11 Dec 2018 - 3:22 pm | कलम

ह्या पुढे मोठ्ठे भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न करेन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

विनिता००२'s picture

11 Dec 2018 - 3:32 pm | विनिता००२

"बोला इन्स्पेक्टर, नाहीतरी आज नाही तर उद्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावीच लागणार आहेत. उगाच माझ्यामुळं तुमच्या तपासात अडथळा नको. बोला तुम्ही." शांभवी शेजारच्याच खुर्चीत बसत म्हणाली. >> इथे इशा हवय

प्रगती आहे तपासात :) पुलेप्र

कलम's picture

11 Dec 2018 - 4:26 pm | कलम

धन्यवाद

या भागात खुनाचा तपास झालेला दाखवला नाही हे मान्य.

नात्यांचा गुंता, आणि त्यात अडकली किंवा ओढली जाणारी आपलीच माणसं हा या कथेचा गाभा आहे. झालेल्या चुका आणि त्यामुळं घडलेला एक खून हे दोन्ही गुन्हेच आहेत. क्राईम डायरी हे नाव हे फक्त झालेल्या खुनाशी संबंधित नाही तर पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यात झालेल्या घटनेशी हि संबंधित आहे आणि हेच डोक्यात ठेवून criminal stories मध्ये चालणारे एका ठराविक साच्यातील investigation आणि वैयक्तिक पातळीवर चाललेला पात्रांचा मानसिक संघर्ष ह्या दोन्ही गोष्टीना समान न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे.

माझ्या लिखाणशैलीत किंवा कथेच्या वेगात सुधारणा हव्या असल्यास नक्कीच सुचवा. सूचनांप्रमाणे बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

मराठी कथालेखक's picture

12 Dec 2018 - 2:38 pm | मराठी कथालेखक

कथेच्या वेगात सुधारणा

कथेचा वेग गेल्या ३-४ भागांपासून चांगला आहे. आता फक्त नवीन भाग येण्याचा वेग वाढवा म्हणजे झालं !!

पद्मावति's picture

11 Dec 2018 - 8:57 pm | पद्मावति

मस्तच. पु.भा.प्र.

शित्रेउमेश's picture

12 Dec 2018 - 8:56 am | शित्रेउमेश

हा ही भाग जमलाय....

पण, पुढचा भाग थोडा लवकर येवुदेत...

दुर्गविहारी's picture

12 Dec 2018 - 6:55 pm | दुर्गविहारी

छान! उत्सुकता वाढली. लवकर लवकर पुढचे भाग टाका.

महासंग्राम's picture

13 Dec 2018 - 3:14 pm | महासंग्राम

आधीच्या भागात म्हटलंय कि फक्त फोन लोकेशन हा अटक करण्यासाठी सबळ पुरावा होऊ शकत नाही, आणि या भागात शांभवी प्राथमिक संशयित आरोपी म्हणून अटक केलेली दाखवली आहे. पण तसा कोणता सबळ पुरावा सापडल्याचं तिच्या नवऱ्याला पण सांगितले नाही ?

हेच मी पुढच्या भागात विचारलं आहे.