नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ५

Primary tabs

कलम's picture
कलम in जनातलं, मनातलं
29 Oct 2018 - 2:50 pm

रेड लाईट मध्ये रात्री उभ्या असलेल्या बायका जी गोष्ट पैश्यासाठी करतात, लग्न होऊन नवऱ्याबरोबर सुखी असलेल्या बायका जे प्रेमापायी करतात तर सुखी नसलेल्या जबाबदारी म्हणून करतात, लग्न न झालेली एक नवथर तरुणी जी गोष्ट प्रेमात आकंठ बुडाली असल्याने किंवा कमीत कमी प्रेमाचा आभास निर्माण झाल्यानं एखाद्या अनाहूत क्षणी करते; ती गोष्ट आपण काय म्हणून केली असावी? खरं तर ह्या सगळ्याची 'गरज' तरी आपल्याला नाही, पैश्यासाठी हे सगळं करायचा तर संबंधच नाही, अमित बरोबर हे सगळं करण्याची कुठलीही जबरदस्ती किंवा जबाबदारीही नाही, राहता राहिला प्रश्न प्रेमाचा तर अमित एक चांगला मित्र आहे, चांगला माणूस आहे, कधी तरी तो त्याच्या कुटुंबाला देत असलेला वेळ बघून आपल्याला त्याच्याबद्दल ईर्ष्या पण वाटलेली आहे. पण तरीही आपण खरंच एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो की थोड्या मिनिटांच्या भौतिक सुखासाठी हे सगळं करू शकतो?

विश्वास आहे अथर्वचा माझ्यावर. त्याला वाटतं कि माझ्या आणि अमित मध्ये एक पवित्र मैत्रीचं नातं आहे, आणि खरंच होतं ते कालपर्यंत. पण आज? आज कुठं आहे मी नक्की? काय मिळवलं मी? अथर्वने दिलेल्या स्वातंत्र्याचं स्वैराचारात परिवर्तन झालंय. त्याला आपण एवढं गृहीत धरलंय की त्याचा विचारच करत नाही आपण कधी कधी. आज स्वतःला स्वतःची लाज वाटावी असं काहीतरी करून आलोय आपण आणि हे सगळं मागं परत जाऊन बदलता पण येत नाहीये. चांगल्या चालणाऱ्या आयुष्यात एका ग्रहणाप्रमाणं डाग लागलाय. काय करून हे सगळं आधीसारखं करता येईल?

विचार करून करून शांभवीचं डोकं फुटून जायची वेळ आलेली होती. काल रात्री अमितच्या घरी झालेल्या प्रसंगानंतर ती पहाटेच तिथून निघून स्वतःच्या घरी पोचली होती. घरी आल्यापासून रिक्लाईनर चेअर वर बसून सतत विचार करत असलेल्या शांभवीला बघून इंदू तिच्या खोलीत आली.

"मॅडम, कॉफी करून आणू का तुमच्यासाठी? पहाटे पाच वाजल्यापासनं इथंच बसलाय तुम्ही. चेहरा पण किती ओढल्यासारखा वाटतोय. खूप थकल्यासारख्या वाटताय तुम्ही. थोडा वेळ झोपून घ्या हवं तर, पाय चेपून देऊ का?"

"इंदू मला आजच्या दिवस डिस्टर्ब करू नको अजिबात आणि सान्वी ला पण खोलीत पाठवू नको प्लिज."

"ठीक आहे मॅडम." म्हणत इंदू निघून गेली.

"खरंच काय कमी आहे आपल्याला म्हणून हे असं काही करायची बुद्धी सुचली? एवढा प्रेमळ नवरा आहे, गोड पोरगी आहे, सगळी सुखं पायाशी आहेत. देवानं जगातलं जे सर्व चांगलं असेल ते पदरात टाकलंय आणि आपण मात्र कशाचाही काही संबंध नसताना रात्री कुणाच्या तरी घरी त्याच्या बेड वर...... श्शी. नुसत्या विचारांनीच तीला किळस आली. खरंच आपण विरोध करू शकत नव्हतो का? विरोध कशाला, नुसतं सरळ सरळ सांगितलं असतं तरी बास होतं. अमित काही जबरदस्ती करत नव्हता आपल्यावर. त्या क्षणी त्याच्याजवळ थांबून तो जे काही मागत होता त्याला होकार किंवा नकार देणं हे पूर्णतः आपल्याचं हातात होतं. कालच्या रात्रीचा होणारा शेवट आणि त्यात असलेला प्रयेक क्षण आपल्याच हातात होता आणि आपण काय केलं? तर त्या सगळ्याला मूक होकार दिला. का? प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतंच... असायलाच हवं. माणसं आधी कारण शोधतात आणि मग सरासार विचार करून कृती करतात आणि आपण मात्र सगळं नको ते करून सावरून आता इथं बसून कारणं शोधतोय. कारण मिळतंय का, तर ते पण नाही. आपल्याला अमित एक माणूस म्हणून किंवा एक मित्र म्हणून आवडतो, पटतो पण म्हणून काय झालं? अशी कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि म्हणून काय आपण सगळ्यांबरोबर ह्या पातळीला जातो का? कुणीतरी फक्त खूप जवळचा मित्र आहे म्हणून त्याच्या प्रत्येक इच्छेला हो म्हणतो का? मग अमितच्या बरोबरच हे सगळं का घडावं? कि खरंच आपल्याला प्रेम वगैरे झालंय ? काल त्याच्या मिठीत असताना आपल्याला एका क्षणासाठी पण अपराधी वाटलं नाही. कितीही किळसवाणं वाटतं असलं तरी हे सत्य आहे कि काल त्याच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आपल्याला त्याच्याकडं आणखीन आकर्षित करत होता. चांगलं - वाईट, चूक - बरोबर, कायदेशीर - बेकायदेशीर, अधिकृत - अनाधिकृत ह्या सगळ्या संज्ञा क्षणभर बाजूला ठेवल्या तर आपण कालचा प्रत्येक क्षण अक्षरशः उपभोगलाय. आज मला स्वतःचा राग नक्की का येतोय? मी जे केलं ते चुकीचं होत हे माहित असूनही ते केलं म्हणून की ती चूकीची गोष्ट मनाच्या एका कोपऱ्यात त्या क्षणाकरता तरी आपल्याला कशी काय बरोबर वाटू शकते म्हणून?"

आज काही झालं तरी विचार शांभवीचा पिच्छा सोडत नव्हते. परत परत क्रम बदलून आलटून पालटून येणारे असंख्य विचार आणि त्यात बुडालेली शांभवी. तो दिवस आणि पाठोपाठ रात्र तशीच निघून गेली. त्यानंतरच्या दिवशी मात्र शांभवीन स्वतःला सावरलं आणि स्वतःसाठी नाही तर किमान सान्वी साठी तरी ती नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागली. अथर्व रोज फोन करायचा पण शांभवी त्याच्याशी पण जुजबी बोलायची, त्याच्याशी जास्त वेळ बोललं किंवा त्यानं फोन वर दाखवलेल्या प्रेमानं आणि काळजीनं पण शांभवीला आता गुदमरायला व्हायला लागलं. कामाचं कारण पुढं करून ती फोन ठेवून टाकायची. ह्या सगळ्या गोष्टीला आज एक आठवडा होत आलेला होता आणि न चुकता अमित चे रोज येत असलेले किमान शंभर मिस्ड कॉल्स आणि कितीतरी मेसेजेस ती निकराने दुर्लक्षीत करत होती. कुठंतरी मनात वाटायचं कि अमितला भेटावं आणि विचारावं की '' मला तरी उत्तरं नाही मिळाली पण किमान तू हे सगळं का केलंस, काय विचार करून केलंस. जसा मला त्या क्षणी अथर्वचा विचार आला नाही तसा तुही इशाला विसरला होतास का? '.

अश्याच एका दुपारी घराची बेल वाजली. शेवंतानं दरवाजा उघडला आणि खालूनच "म्याडम, अमित साहेब आलेत बगा" असं ओरडून सांगितलं. शांभवीनं कितीदा तरी शेवंताला सांगितलं होतं कि कुणी आलं तर वर खोलीत येऊन सांगत जा. सगळेच काही हवे असलेले पाहुणे नसतात. पण ऐकेल ती शेवंता कसली? आता या बाबतीत शेवंताची चूक पण म्हणता येणार नाही कारण आज जरी अमित आपल्याला नको असलेला पाहुणा वाटत असला तरी आठवड्यापूर्वी आपण याच अमितची वेड्यासारखी वाट बघायचो. अमित आला तर त्याला 'कोण हवंय , कशाला हवंय' असले प्रश्न विचारायचे नाहीत हे आपणच मागं एकदा शेवंताला सांगितलं होत. त्या बिचारीला तरी काय माहित म्हणा कि हव्या असलेल्या आणि नको असलेल्या व्यक्ती मध्ये फक्त एका क्षणाचा फरक असतो.

खाली जावं कि नको असा विचार करत असतानाच दरवाज्यावर नॉक ऐकू आला.

"आत येऊ का शांभवी?" अमितनं खालच्या आवाजात शांभवीला विचारलं.

"कशाला आला आहेस अमित? मी तुझे कॉल्स घेत नाहीये, मेसेजेस ना उत्तर देत नाहीये. ह्याचा अर्थ कळतो ना तुला?"

"हो आणि हे सगळं तू कशासाठी करत आहेस हे समजून घ्यायलाच आलोय मी इकडं" आत येत अमित म्हणाला.

"त्या रात्री झालेलं सगळं माहित असतानाही तुला अजून काही समजून घ्यायचं आहे?"

"कम ऑन शांभवी. ग्रो अप. आपण काही लहान नाही आहोत. त्या रात्री जे काही घडलं त्या बद्दल आपण नक्कीच बोलू शकतो, त्यावर एकत्र बसून विचार करू शकतो आणि नंतर एक निर्णय घेऊ शकतो. हे बघ, तुला दुखवायचं नाही आहे मला पण त्या दिवशी जे काही घडलं ते आपल्या दोघांच्या सहमतीनेच घडलं आणि असं असताना तू एकटीच माझ्याशी न बोलण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतेस? जे काही झालं त्या नंतर मी पळून नाही गेलेलो. त्या सगळ्याची जबाबदारी घेतोय आणि एका सगळ्यात जवळच्या मैत्रिणीशी त्या संबंधात बोलायला आलोय. तुला आवडो किंवा न आवडो पण तिला माझ्या मनातली गोष्ट सांगणं आणि गढूळ झालेलं नातं परत एकदा स्वच्छ करणं हे माझं कर्तव्य आहे."

"का करतोयस हे सगळं अमित? नकोय मला कसलही स्पष्टीकरण. झालेल्या चुकीला आणि त्याबरोबर गढूळ झालेल्या आपल्या नात्याला आता विसरून जाणंच ठीक आहे अमित."

"सगळ्यात आधी शांभवी, झालेली गोष्ट 'चूक' आहे कि नाही हे तू कोण ठरवणार आणि जरी ती चुकीची असेल तरी नात्यात झालेल्या एका चुकीचं प्रायश्चित्त किंवा त्या चुकीची किंमत ते नातंच असावं हा तुझा हट्ट का?"

"कारण मी असं जगू शकत नाहीये अमित. घुसमट होतीय माझी आणि जे काही झालं त्याचं विश्लेषण करायचंच नाहीये मला अमित. सगळं मागं टाकून फक्त पुढं जायचं आहे मला. बस्स.."

"एक आठवडा झाला. सगळं मागं टाकू शकलीस? सगळं जाऊ दे पण झालं त्यातलं एक टक्का तरी विसरू शकलीस ? नाही ना? समस्येपासून पळून जाऊन काही मिळत नाही शांभवी, उलट तू जेवढी लांब जाऊ बघशील ना, त्यापेक्षा लांब तुझी समस्या तुझा पाठलाग करेल आणि परत तुला ती तुझ्या समोर तशीच उभी राहिलेली दिसेल. अगं काय अवस्था करून घेतली आहेस एका आठवड्यात शांभवी? खरंच स्वतःच्याआयुष्याची वाट लावावी एवढं काही झालंय का?"

"अच्छा? म्हणजे काहीच झालं नाही आहे का?" शांभवी उपरोधाने म्हणाली.

"तू परत एकदा चुकीचा विचार करतेयस शांभवी. आपण बसून बोलूया तरी. मगच उत्तरं मिळतील ना आपल्याला? एकदा ऐक माझं.. प्लीज"

"तुझं "एकदा" ऐकूनच ही अवस्था झालीय माझी." शांभवीनं परत टोमणा मारला.

"म्हणजे, सगळी चूक फक्त माझीच आहे का? मी सांगितलं आणि तू ऐकलंस? का? तुला बांधून ठेवलेलं होतं का मी? की जबरदस्ती केली होती तुझ्यावर? जाऊ दे शांभवी. तुला समजावून सांगायला आणि झालं तर तुला होत असलेला त्रास कमी करायला आलो होतो मी. जर तुला हे असंच बोलायचं असेल तर निघतो मी." अमित रागानं बोलला आणि उठून दरवाज्याकडे निघाला.

"थांब अमित. सॉरी. माफ कर मला. थोडं जास्तच टोकाचं बोलले मी. काय करू रे, आज आठवडा झाला आणि विचार करून वेड लागायची वेळ आलीय. मी काय करतेय ते माझं मलाच कळत नाही आणि झालेली घटना पण अशी आहे कि कुणाला सांगू शकत नाही आणि एकटी सहन पण करू शकत नाही."

"मला सांग शांभवी, बोल माझ्याशी. सगळं.. अगदी तुला जे काही वाटतंय ते. माझ्यावर राग येत असेल तर तो पण बाहेर काढ, रागाव मला, चीड माझ्यावर पण असं बोलणं सोडू नको. तुझा अबोला नाही सहन करू शकत मी."

"अरे अमित, मी तुझ्यावर काय चिडणार, काय राग काढणार? माझी पण तेवढीच चूक आहे ह्या सगळ्यात. सुरुवात तू केली असलीस तरी ते कस संपवावं हे माझ्या हातातच होतं, आणि ते मी अश्या पध्द्तीने का संपवलं हेच कळत नाहीये मला. गेल्या आठवड्या भरात त्या 'का' चंच कारण शोधतीये पण ते सापडत नाहीये. तुझ्याकडं उत्तर आहे का रे आपण केलेल्या ह्या सगळ्याचं? उद्या कुणी विचारलं कि का केलंस हे सगळं, तर चार शब्दात देता येईल आणि समोरच्याला पटेल असं उत्तर आहे का तुझ्याकडं?"

"इथंच चुकत आहेस शांभवी. झालेल्या प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना पटेल असं उत्तर हुडकण्याचा अट्टाहासच का करावा आपण? तुला आणि फक्त तुला पटेल असं एक उत्तर मिळालं तर बास आहे ना? होऊन गेलेल्या क्षणाचं प्रमाणापेक्षा जास्त विश्लेषण करून आपण त्यातली मजाच घालवतो नाही? एखादा क्षण जसा समोर आला आणि जसा आपल्याला घालवावासा वाटला तसा तो का साजरा करू नये? आणि तरीही तुला माझ्याकडून 'माझं' असं कारण ऐकायचं असेल तर शांभवी, मला तू खूप आवडतेस, एका मैत्रिणीपेक्षा फार जास्त आवडतेस. तुझा सहवास आवडतो मला. तुला झालेला आनंद मला पण हसवून जातो, तुला झालेला त्रास माझ्या डोळ्यात पाणी घेऊन येतो. त्या दिवशी न ठरवताही अचानक झालेल्या घटना, मला बरं नसताना तुझं माझ्याजवळ एकटं असणं, तू माझी घेतलेली काळजी आणि त्या रात्री अंगावर येणारा एकांत या सगळ्या जोडल्या गेलेल्या प्रसंगातून जन्मलेली माझी एक प्रतिक्रिया आणि अर्थातच त्या कमकुवत क्षणी तेवढाच कमकुवत असलेला तुझा विरोध... यापलीकडे काहीच विचार मी तरी केलेला नाही. आणि तू पण तो करू नयेस असं मला वाटतं. मला फक्त एका गोष्टीचं खरं खरं उत्तर दे."

"काय?" शांभवीनं शांतपणे विचारलं.

"त्या दिवशी माझ्या जवळ असताना तुला दुसऱ्या कुणाची आठवण आली का? तू आत्ता एवढा आटापिटा करून विचार करत असलेलं एक तरी कर्तव्य तुला माझ्या मिठीत आठवलं का?"

"नाही म्हणजे....नाही आठवलं मला दुसरं काही... का कोण जाणे पण खरंच नाही "

"नाहीच आठवणार तुला, कारण त्या दिवशी तू स्वतःचीच होतीस आणि उरलेली माझी होतीस. ह्या न बदलणाऱ्या सत्यासारखी आणखी एक गोष्ट पण बदलणार नाही आणि ती म्हणजे मला तू खूप आवडतेस, माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. बाकी काहीही करायला सांग, मी नक्की करेन पण हे नातं मात्र तोडू नको."

"काय बोलतोयस अमित? अरे काही कळतंय का तुला? तुझ्या आयुष्यात इशा, अनिश ह्यांना काहीच महत्व नाही का? त्यांच्याशी असलेल्या एका विश्वासाच्या नात्याला किंमत नाही?"

"सगळं मिसळू नको शांभवी, परत गफलत करतेयस तू. मी कुठं म्हणालो कि माझं इशावर प्रेम नाही किंवा मी अनिशचा विचार करत नाही. माणूस म्हणजे नक्की काय गं .. बाहेर असलेल्या अनेक प्राण्यांसारखा एक प्राणी.. बहुधर्मचारी. एकापेक्षा जास्त पार्टनर्स बरोबर माणूस फक्त संबंधच ठेवू शकत नाही तर प्रेमही करू शकतो. पण त्याच्या स्वैराचाराला संस्कृतीच्या भिंती बांधून त्यावर कायद्याचं कुंपण घालून आपण त्याला अश्यासाठी जायबंदी केलं आहे कि ज्यामुळं सामाजिक व्यवस्था आणि शांतता टिकून राहील. पण तरीही प्रत्येकजण ह्यावर एकदा तरी कुरघोडी करतोच. हि कुरघोडी शारीरिकच असावी असं नाही, मानसिकरीत्या आपल्यातला प्रत्येक जण आयुष्यात एकदा तरी व्यभिचार करतोच की. आज मी जेव्हा तुझ्यावर प्रेम करतोय म्हणजे कुणावर तरी अन्याय झालाच पाहिजे असं समीकरण का? तू मला आवडतेस, तुझं असणं , तुझा सहवास आणि स्पर्श मला हवाहवासा वाटणं म्हणजे 'चूक' हे कायदा म्हणत असला माझ्यातला 'माणूस" नावाचा प्राणी तसं म्हणत नाही. ह्या चूक-बरोबर च्या पलीकडं जाऊन स्वतःला काय हवंय, हे मिळणाऱ्या एका आयुष्यात करणं हा खरंच एवढा गुन्हा आहे का? आज कदाचित त्या रात्री घडलेल्या प्रसंगामागचं मला मिळालेलं उत्तर हे कुठंतरी तुझं पण उत्तर असू शकेल. फक्त एकदा दृष्टिकोन बदलून बघ. तू काय करावंस आणि करू नयेस हा आजही तुझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तुझ्या कुठल्याही निर्णयावर मी एका अक्षराने प्रश्न करणार नाही किंवा तू तुझा निर्णय बदलावास अशी जबरदस्ती पण करणार नाही. फक्त एक सांगेन शांभवी, सगळी सरमिसळ करून गुंता करून त्यात अडकण्यापेक्षा कधीतरी सगळी बंधनं झुगारून फक्त तुला काय वाटतं आणि तुला काय हवंय ह्याचा विचार कर आणि तुझ्या त्या उत्तराची मी प्रतीक्षा आणि आदर दोन्ही करेन. इट्स अ प्रॉमिस. चल निघतो."

निघून जात असलेल्या पाठमोऱ्या अमितकडं बघून शांभवी ओठाच्या कोपऱ्यातून हसली. आभाळ निरभ्र झाल्याचा तिला क्षणभर भास झाला.

लेखkathaa

प्रतिक्रिया

कलम's picture

29 Oct 2018 - 2:53 pm | कलम

क्रमशः
(अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)

देशपांडेमामा's picture

30 Oct 2018 - 3:17 pm | देशपांडेमामा

अपेक्षित वळण घेतेय कथा. बघूया पुढे काय होतंय

पुभाप्र

देश

कलम's picture

30 Oct 2018 - 4:08 pm | कलम

अजून दोन भागांनंतर अनपेक्षित वळण घेईल बहुदा.

कलम's picture

30 Oct 2018 - 4:09 pm | कलम

अजून दोन भागांनंतर अनपेक्षित वळण घेईल बहुदा.

पद्मावति's picture

30 Oct 2018 - 3:24 pm | पद्मावति

पु.भा.प्र.

संजय पाटिल's picture

30 Oct 2018 - 5:25 pm | संजय पाटिल

पु. भा. प्र.

मराठी कथालेखक's picture

1 Nov 2018 - 5:23 pm | मराठी कथालेखक

कथा बरीच आटोपशीर होवू शकली असती असं वाटतं.
असो ..

बापु देवकर's picture

2 Nov 2018 - 10:22 am | बापु देवकर

छान .. शांभवीची मनातली सल अजून खुलवता आली असती.. अमित खूपच sorted वाटला.

मागील सर्व भागांबरोबर हा भाग पण छान लिहीला आहे. अमितच्या सडेतोड उत्तराला, संवाद कौशल्याला की तुमच्या लेखनशैली दाददेईऊ हेच कळत नाही आहे. दोन भागांमध्ये वेळ लावल्याने वाचकांची उत्कंठा वाढते पण त्याच बरोबर जास्त उशीर केल्यास कथेतील गुंतणूक पण कमी होते तेव्हा लवकर पुढील भाग येऊ देत. पु. ले. शु.