नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ७

Primary tabs

कलम's picture
कलम in जनातलं, मनातलं
17 Nov 2018 - 10:54 am

"तुम्हीच मिसेस शांभवी सरपोतदार ना?" इन्स्पेक्टर पाटील ह्यांचा आवाज शांभवीच्या अवाढव्य बंगल्यात घुमला.

"अं...हो मीच शांभवी सरपोतदार." शांभवीनं अत्यंत खालच्या आवाजात उत्तर दिलं. 'अमितचा खून झालाय' हे अथर्वनं बोललेलं वाक्य अजूनही तिच्या डोक्यात फिरत होतं. कशीबशी सावरून जणू काही आपल्याला काही झालंच नाहोये हे अथर्वला भासवत ती जरी खाली हॉल मध्ये पोहोचलेली असली तरी तिचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं कि आता ते फुटून बाहेर पडतंय की काय असं तिला वाटत होतं.

"काय झालं मिसेस शांभवी सरपोतदार? म्ही फारच बिथरलेल्या दिसताय." इन्स्पेक्टर पाटील एक डोळा बारीक करत म्हणाले.

"नाही, असं काही नाही. आत्ताच अथर्वंनं सांगितलं कि अमित चा खून झालाय, हे ऐकून थोडं......"

"अच्छा म्हणजे मि. अमित केतकरांचा खून झालाय हे तुम्हाला माहीतच नव्हतं की काय?"

"मी....म ...मला कसं माहित असेल?" शांभवी म्हणाली. आधीच काल थोड्या जास्तच झालेल्या दारूमुळं डोकं प्रचंड दुखत होतं आणि त्यात इन्स्पेक्टर असे प्रश्न विचारत होता कि जणू काही तिनंच खून केलाय.

"इन्स्पेक्टर पाटील, तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ती सरळ करा, असे उलट सुलट प्रश्न कशाला विचारताय?" अथर्व थोडासा चिडूनच बोलला.

"त्याचं काय आहे ना सरपोतदार साहेब, खुनाची केसच उलट सुलट असताना सरळ प्रश्न विचारून कसं चालेल? खूनाची चौकशी करायला आलोय मी इथं, मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटायला थोडीच आलोय की हसत खेळत अणि चहा पाणी घेत चर्चा व्हावी. अरे हो चहावरून आठवलं, मिसेस सरपोतदारांना एक चहा सांगा म्हणजे त्यांना फ्रेश वाटेल, नाहीतर मग सरळ लिंबू पाणीच घ्या म्हणजे कालची व्यवस्थित उतरेल."

"Be in your limits Inspector Patil, तुम्ही कुणाच्या घरात आहात हे कळतंय ना तुम्हाला?" अथर्व त्याच्या खुर्चीतून उठत बोलला. त्याच्या मोठ्या आवाजानं एक क्षण शांभवी पण दचकली परंतु इन्स्पेक्टर पाटलांनी मात्र चेहऱ्यावरची एक सुरकुतीही न हलवता अगदी शांतपणे उत्तर दिले,

"मी कुठं आहे आणि कशासाठी आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे, तुमच्याकडून ते समजावून घेण्याची मला गरज वाटत नाही आणि जर यापुढे न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न केलात तर पोलीस चौकशीत अडवणूक केल्याप्रकरणी मला तुमच्यावरच गुन्हा दाखल करावा लागेल तेव्हा तुम्ही हवं तर शांतपणे इथं बसू शकता किंवा ते जमत नसल्यास इथून निघून जाऊ शकता." हे ऐकून अथर्व काहीतरी पुटपुटत शेजारच्या सोफ्यावर जाऊन बसला.

"तर मिसेस सरपोतदार, Hope you are feeling better now. तेव्हा सरळ मुद्द्याचं बोलूयात. आता मला एका वाक्यात सांगा, तुम्ही काल सकाळी अकरा वाजता, तुमच्या पोर्च मध्ये आत्ताही उभ्या असलेल्या MH02AE8225 नंबरच्या काळ्या ऑडी मधून मि. अमित केतकरांना भेटायला ग्रीन वाईल्ड रिसॉर्ट मध्ये कशाला गेला होतात?"

शांभवीला क्षणभर पायाखाली जमीन सरकल्याचा भास झाला. तिच्या कपाळावर घामाचे थेम्ब जमू लागले. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तिनं अथर्वकडं बघितलं तर तो तिच्या कडे अनिश्चितपणे आणि आश्चर्याने बघत होता. पण ही वेळ ह्या सगळ्याचा विचार करायची नव्हती. सगळा धीर एकवटून तिनं खंबीरपणे इन्स्पेक्टरांकडं बघितलं. इन्स्पेक्टर पाटील तिच्याकडं टक लावून बघत होते, जणू काही तिच्या बदलत जाणाऱ्या चेहऱ्याच्या आणि अविर्भावांच्या पलीकडे जाऊन काहीतरी हुडकायचा प्रयत्न करत होते.

"मी आणि अमित डिजिमॅक्स मध्ये एका प्रोजेक्ट वर एकत्र काम करत होतो. अमित ने परत एकदा एका पुढच्या प्रोजेक्टच्या संबंधातच चर्चेसाठी मला बोलावलं होत. त्यासाठीच मी दुपारी अकरा वाजता त्याला भेटायला गेले होते."

"रिसॉर्टमध्ये चर्चा??"

"हो, अमित त्यावेळी रेसोर्टमध्ये असल्यानं त्यानं मला तिकडंच बोलावलं होतं, आणि काय हो इन्स्पेक्टर पाटील, बिझिनेस ची चर्चा रिसॉर्ट मध्ये करू नये असा काही कायदा आहे का? नाही म्हणजे मी अमितला प्रोजेक्ट संदर्भात रेसोर्ट मध्ये भेटायला गेले म्हणून तुम्ही माझ्यावर पण गुन्हा दाखल करणार आहात कि काय?"

"मिसेस सरपोतदार, जेव्हा वेळ येईल तेव्हा गुन्हाच काय तर एकेकाला तुरुंगात डांबून त्याला तुडवून काढून सूतासारखं सरळ पण करतो आम्ही. त्याची तुम्हाला चिंता नको. तुम्ही सध्या मला इतकंच सांगा की जेव्हा काल तुम्ही मि. अमितना भेटलात तेव्हा त्यांचा मूड कसा होता? कारण ते जिवंत असताना त्यांना वैयक्तिकरीत्या भेटणाऱ्या तुम्हीच शेवटच्या व्यक्ति आहात, म्हणजे सध्या समोर दिसणाऱ्या पुराव्यांप्रमाणे तरी. रेसोर्ट च्या रजिस्टर वर तुमच्या गाडीचा क्रमांक आहे आणि तिथल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये हे स्पष्ट दिसत आहे की तुम्ही मि. अमितना भेटायला गेला होतात."

"हो, आणि मी तरी कुठं ह्या सगळ्याला नकार देतीय? मी पण हेच सांगत आहे की काल मी अमितला भेटायला गेले होते. जवळपास अर्धा तास आमची प्रोजेक्ट संदर्भात चर्चा झाली अणि साडे अकराच्या जवळपास मी रिसॉर्ट मधून बाहेर निघाले. तुम्ही ते पण CCTV मध्ये बघितलं असेलच. राहता राहिला अमितच्या मूडचा प्रश्न तर मला तरी तो नॉर्मल वाटला. कामाच्या बाबतीत अमित खूप सिरियस असतो अणि काल पण तो अगदी तसाच वाटला मला."

"आणि मिसेस केतकर? त्या कश्या दिसत होत्या? म्हणजे त्यांचा मूड पण ठीक होता का? की त्या दोघांत काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं तुम्हाला वाटलं?"

"क्काय ? इशा? ती कशाला असेल तिथं? नाही म्हणजे मी तिथं पोचले तेव्हा फक्त अमितच होता. पण तुम्ही असं का विचारताय?"

"कारण रेसोर्ट च्या रजिस्टर मध्ये डबल रूम बुक्ड आहे, मि. आणि मिसेस अमित केतकर यांच्या नावानं. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मि. अमितची बॉडी आम्हाला रेसोर्ट मध्ये असणाऱ्या तळ्याशेजारी मिळालीय आणि अमितच्या रूम मध्ये एका बाईची डेड बॉडी आहे."

थोडा वेळ खोलीत कमालीची शांतता पसरली. कुणीच काही बोलेना. शांभवी तर शॉक बसल्यासारखी कोपऱ्यातल्या संगमरवरी मूर्तिकडं टक लावून बघत होती. अथर्व खाली टाकलेल्या कार्पेट कडं बघत बसला होता.

"हम्म्म..." थोड़ा विचार करत इन्स्पेक्टर पाटील जागेवरून उठले आणि म्हणाले, "ठीक आहे मिसेस सरपोतदार, सध्या तरी बातमी कळून दोन चार तासच झाल्यानं मी कुठल्याच बाबतीत आडाखे मांडू शकत नाही. अजूनही बऱ्याच जणांची तपासणी करावी लागेल, मि. अमितच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या घरी, त्यांच्या मोबाईल मध्ये बरंच काही हुडकावं लागेल. तुमचं नाव आधी समोर आलं म्हणून सर्वात आधी इकडं तुम्हाला भेटायला आलो होतो. सध्या तरी बॉडी बघून मी हे सांगू शकतो कि खून रात्री तीन च्या आसपास झालेत. तुम्ही तपास संपेपर्यंत हे शहर किंवा देश सोडून कुठं हि जाऊ शकत नाही हे वेगळं सांगायलाच नको. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. जर गरज पडली तर परत भेटूच आपण." असं म्हणून इन्स्पेक्टर बाहेर पडायला मागं वळले इतक्यात मागून शांभवीनं विचारलं,

"इन्स्पेक्टर, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की इशाचा पण खून झालाय?"

"सांगणे अवघड आहे, कारण बॉडी अगदी वाईट अवस्थेत आहे. कपडे ठिकठिकाणी फाटलेत आणि पोटात सुरा खुपसून मारून टाकल्यांनंतर एका अवजड वस्तूने चेहऱ्यावर बरेच वार केलेत त्यामुळं चेहरा ओळखता येणं अवघड आहे. माझी टीम मि. अमितच्या घरी निघाली आहे. नक्की काय झालंय ते लवकरच कळेल."

इन्स्पेक्टर पाटील निघून गेले तसे शांभवी सोफ्यावर मटकन बसली आणि खाली मान घालून रडू लागली. अथर्व तिच्या शेजारी येऊन बसला आणि त्यानं शांभवीच्या खांद्यावर हात ठेवला.

"शांभवी, जे काही झालं ते खूप वाईट झालं. अमित एक खूप चांगला माणूस होता आणि इशा पण. हे असं सगळं अचानक झाल्यानं आणि अमित तुझा खूप जवळचा मित्र असल्यानं तुला खूप वाईट वाटतंय हे मी समजू शकतो, पण तू खंबीर रहा. आता रडू नकोस, चल मी तुझ्यासाठी चहा बनवून आणतो म्हणजे तुला बरं वाटेल."

अथर्व जागेवरून उठला आणि चहा बनवायला किचनकडं निघाला. किचनच्या दारात एक क्षण थांबून त्यानं माग वळून बघितलं आणि शांभवीला म्हणाला,

"शांभवी, घरापासून अमितचं ऑफिस एवढं जवळ असताना जवळ जवळ ४० किमी ड्राइव्ह करून तू ग्रीन वाईल्ड रेसोर्ट मध्ये का गेली होतीस?"

शांभवी काहीच बोलली नाही, ती बराच वेळ मान खाली घालून बसली.

लेखकथा

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

17 Nov 2018 - 11:17 am | विनिता००२

बरीच वाट पाहिली ह्या भागाची!!

पण फार छोटा झालाय हा भाग :(
पुलेशु

दिवाळीच्या तयारीमुळं आणि घरी बरेच पाहुणे आल्यानं लिहायला वेळ मिळाला नाही. यापुढं मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न करेन. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

विनिता००२'s picture

17 Nov 2018 - 4:44 pm | विनिता००२

दिवाळीमुळे सूट देत आहे :)

कलम's picture

17 Nov 2018 - 4:51 pm | कलम

thank uuu :)

श्वेता२४'s picture

17 Nov 2018 - 11:43 am | श्वेता२४

पुढील भाग कृपया मोठे टाका.

कलम's picture

17 Nov 2018 - 12:38 pm | कलम

>>पुढील भाग कृपया मोठे टाका.

नक्की

दुर्गविहारी's picture

17 Nov 2018 - 6:32 pm | दुर्गविहारी

हि कादंबरी वाचायची राहून गेली होती. आता वाचायला सुरुवात केली आहे. पु.ले.शु.

संजय पाटिल's picture

18 Nov 2018 - 4:29 pm | संजय पाटिल

बर्‍याच दिवसांनी भाग आला, त्यामुळे लिंक तुटली होती....
सहावा भाग परत वाचून मग हा भाग वाचला....
पुढील भाग लवकर टाका....