मजूर

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
23 Dec 2017 - 11:47 am

मजूर
....
'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.

मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........ त्या सगळ्यावर मात करण्यासाठी, दोन पैसे जादाचे कमावण्यासाठी तर इथवर आलो.

मित्राचा चुलता आला होता सुट्टीवर. म्हणाला, 'तिकडे चल. इथे शिकून कारकून होऊन, धापाच हजार कमावण्यापेक्षा, माझ्याबरोबर गल्फमध्ये चल. काम कर. चांगले पैशे मिळतील. शिक्षणाला कोण विचारतो? पैशे असले कि झालं ..... शिकला काय, न शिकला काय! माझ्याकडे बघ. लाखोत कमावतो. शिक्षण किती? तिसरी नापास. काय बिघडलं का?'

पटत नव्हतं, पण घरात गरिबी, उपासमार.... एक आहे, एक नाही. भांडणं , मारामारी, शिवीगाळ, व्यसन. बहिणी वयात येऊ घातलेल्या, वडील पूर्ण अंथरुणाला, आई मजुरीला.

माझं आपलं ठरलं होतं... आपण इथे कशासाठी आलो? कामासाठी. पैशासाठी. मी सगळ्यांच्याआधी तयार असायचो. सगळ्यांबरोबर साईटवर पोह्चायचो. वाळू सिमेंटने हातापायांना भेगा पडायला सुरुवात झाली. कोणकोणती तेलं, मलमं असायची कॅम्पमध्ये. सगळ्यांबरोबर मी पण लावायचो. घरची आठवण आली, तरी ती आता बरोब्बर मारून टाकायला शिकलोय ..... आणि तसंही..... घरच्या आठवणी काय सुखाच्या? आईचे काम करकरून राठ झालेले हात आठवतात... तेवढेच. त्या हातांना आराम मिळावा म्हणून तर इतक्या लांब आलो........

मित्राचा चुलता म्हणाला, पासपोर्ट काढून घे. कुठून कुठून कागदपत्रं गोळा केली. कर्ज काढले. खेटे घातले. शेवटी हातात पासपोर्ट आला. आईला वाटले, पासपोर्ट आला, म्हणजे आपला मुलगा गेलाच परदेशी! तिला काय माहित! Visa चे म्हणून , विमानाचे तिकिट म्हणून,काम देण्याचे म्हणून, तिथल्या-इथल्या दलालाला द्यायचे म्हणून..... एकूण पन्नासएक हजार त्या चुलत्याला दिले. गल्लीतल्या सावकाराची मदत झाली. व्याजाने तर व्याजाने. एकदा तिकडे जाऊन कमवू लागलो, कि असे दहा सावकार विकत घेऊ हा फाजिल विचार.... आजही व्याजच देता देता दमतोय मी ..... मुद्दल जशास तसे. काय हिशोब करून देश सोडला होता!

घरी पैसे पाठवतो. पाठ्वावेच लागतात. मी इथे आल्यापासून काहीतरी नवा खर्च निघालेला असतो. मध्यंतरी, इथल्या एका म्हाताऱ्याला प्लास्टिक गोळा करायला मदत करायचो. महिन्याला दहा वीस रियाल सुटायचे. पण सोबत्यांना बघवले नाही. कुणीतरी मुकादमाकडे तक्रार केली. मुकादम भडकला. म्हणाला..... मी तुला इथे आणला आणि तू ते काम करतोस!..... मग ते बंद झालं.

दर शुक्रवारी चिकन, मटन, माशे करतो सगळे मिळून. खायला पोटभर, निजायला चांगले अंथरून ..... तसं वाईट काही नाही. आधी चिंता वाटायची. घरची नड भागली पाहिजे, सावकाराचे कर्ज फिटले पाहिजे.......मग बाकीची मजुरी करणारी माणसं पाहिली. धाधा वीस वीस वर्षं इथं राबत आहेत. त्यांच्याकडे बघतो. ते म्हणतात, हे असंच चालत राहतं. आधी आईबापाचा संसार ओढायचा. मग आपला रेटायचा. काळजी करू नको. काम कर काम. होतेय, हळूहळू सवय होतेय...... ही बिल्डींग झाली, लगेच दुसऱ्या साईटवर काम निघाले. आता तिकडे काम करतोय.

इकडे सहज आधीच्या मित्राकडे आलो होतो. बराच वयस्कर आहे...... बांग्लादेशी आहे. बडबड करतो. त्याच्या बोलण्याला काय ताळतंत्र नसतो. मी आपला ऐकत राहतो. हुं हुं म्हणतो .... गेले वर्षभर मला त्याने चांगली जर्मन शेव्हिंग क्रीम आणि ब्लेड्स दिल्या. कुठून आणायचा माहित नाही. एकदा चांगले आदिदासचे शूज पण दिले. म्हणाला, माझ्या पायाला बसत नाहीत, तू घाल. मला झाले. अजून वापरतोय.

.... दोनतीन महिने थंडी असते. बाकीचे नऊदहा महिने ऊन मी मी मी म्हणते. तरी इथे कायदा चांगलाय. उन्हाळ्यात दुपारी बारा ते तीन बाहेरची कामं द्यायला बंदी आहे. तरी काय झालं .... बाराच्या आधी आणि तीनच्या नंतर ऊन काय तावायचं राहतंय का? ताप यायचा. डोळ्यासमोर अंधारी.पोट खपाटीला गेलं. गालफडं बसली. डोळे खोल गेले. जरुरी पुरती दवा घेऊन कामाला लागायचो. घर डोळ्यासमोर उभं रहायचं. घरी काय नाही सांगत. आई लगेच रडते. ये म्हणते निघून.

.... मुकादमाला विचारलंय. दोन वर्षं झाली, एकदा घरी जाऊन येऊ दे. तो आज उद्या सांगतो म्हणतोय. बघू. हो म्हणाला तर.... खरेदी करायची. पहिल्यांदा घरी चाललोय. सगळं इतकं महाग इथं. पण घेऊन तर जावच लागणार. आईला कधी बघतोय असं झालंय. मी इकडं यायला निघाल्यावर एकटीच अंधारात रडत बसली होती. तू मला एकुलता एक. इतक्या दूर पाठवायचं जीवावर येतंय, दोनचार वर्षांत परत ये म्हणाली. कमळीचं लगीन झालं असेल. कोण ठेवणार म्हणा! आवडायची..... पण हिंमत नाही झाली कधी. ना बोललो, ना कधी काही विचारले... जाऊ दे, नाही तेच बरंय. नाहीतर नसता जीव अडकला असता.

.... उद्या शुक्रवार. सुट्टी. हे बराय इथं. सुट्टी म्हणजे सुट्टी. शुक्रवारी आपण आपले राजे. सगळे मशिदीत गेले, कि मी पण आपला हनुमान चालीसा म्हणून घेतो. म्हणजे, रोज म्हणालो तरी कोण काय मला अडवणार नाही. पण मीच आपला शनवारचा मारुतीराया, शुक्रवारी करून घेतला.... सवड मिळते म्हणून.

एक खरंय ...... घरातूनच उठल्यासारखं वाटतंय अलीकडे. माझा दोन वर्षा पूर्वीचा फोटो बघतो; आणि आता आरशात बघतो. एकदम दहा वर्षांनी मोठा झाल्यासारखा दिसतोय. इथेच म्हातारा होईन का? .... कायपण वाटतं एकट्या जीवाला. चला.... निघावं. आज रात्रीचा भात उकडायची पाळी माझीय. तेवढ झालं कि अंथरुणाला पाठ टेकायला मोकळा. उद्या काय शुक्रवारच......’

@शिवकन्या

मांडणीवावरवाङ्मयकथामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानआरोग्यराहणीभूगोलदेशांतरप्रकटन

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

23 Dec 2017 - 2:19 pm | बबन ताम्बे

क्रमश : लिहायचे राहिलय का ?
छान वातावरण निर्मिती. वास्तव चित्रण .

ज्योति अळवणी's picture

24 Dec 2017 - 8:54 am | ज्योति अळवणी

अंगावर काटा आला.

पुंबा's picture

26 Dec 2017 - 6:58 pm | पुंबा

खरोखर अंगावर काटा आला..
वातावरणनिर्मिती सुंदर केलीत.

सस्नेह's picture

26 Dec 2017 - 7:24 pm | सस्नेह

भीषण... दारुण !! :(

शिव कन्या's picture

6 Jan 2018 - 2:21 pm | शिव कन्या

सर्व वाचकांचे आभार.

पद्मावति's picture

6 Jan 2018 - 6:33 pm | पद्मावति

मनाला भिडणारे लेखन. आवडले.

गामा पैलवान's picture

6 Jan 2018 - 8:35 pm | गामा पैलवान

तरीपण ब्राह्मणांना शिव्या द्यायची फ्याशन आहे ! :-(

-गा.पै.

शिव कन्या's picture

11 Jan 2018 - 9:41 pm | शिव कन्या

फ्याशन ती फ्याशन .... फार लक्ष देऊ नये.
:-)

मुक्त विहारि's picture

12 Jan 2018 - 12:15 am | मुक्त विहारि

लेख आवडला...