कधी मध्यम,कधी पंचम...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Jul 2017 - 8:30 pm

कधी मध्यम कधी पंचम,सुरांचा साज अलबेला
किती समतोल आहे हा,तुझा अंदाज अलबेला!

मनाचा वेगही अाता अनावर वाढला आहे
मला हाकारतो आहे तुझा आवाज अलबेला!

असे भरतेस काजळ तू तुझ्या डोळ्यांत बंगाली
निशाणा बांधतो कोणी निशाणेबाज अलबेला!

फुलांचे अंग मोहरते,तुझ्या केसांत शिरताना
असावा स्पर्शही कोमल किती निर्व्याज अलबेला!

लिहावे वाटते तेंव्हा सतत दिसतेस तू मजला
कसा गझलेमध्ये बांधू सखीचा बाज अलबेला!

कुणी का पाहिला होता?गुलाबी रंग पुनवेचा!
मला तर वाटतो आहे खरा मी आज अलबेला!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

ऋतु हिरवा's picture

21 Jul 2017 - 9:55 pm | ऋतु हिरवा

गझल छान

सत्यजित...'s picture

22 Jul 2017 - 12:13 am | सत्यजित...

धन्यवाद...ऋतु हिरवा!

चौकटराजा's picture

23 Jul 2017 - 6:52 pm | चौकटराजा

मस्त अलबेली गजल आहे. तो निर्व्याज हा शब्द मात्र अस्थानी वाटतो. कारण फुलांना देखील मोहरावेसे वाटते असा स्पर्श निर्व्याज कसा असेल तो मादकच असणार !

सत्यजित...'s picture

24 Jul 2017 - 11:55 pm | सत्यजित...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद चौकटराजाजी!
'झाड/वेलीपासून अलग झालेली फुलेही,तुझ्या केसांत शिरताना
(ऋतुंच्या स्पर्शाने मोहरुन जावी,इतक्या नैसर्गीक अंदाजात!) मोहरुन जातात!' असे काहिसे...

चौकटराजा's picture

25 Jul 2017 - 8:59 am | चौकटराजा

असं हाय का ? आम्हाला वाटले तिच्या केसांचा " रेशमी" स्पर्श . असो.