दीपशिखा-५. विज्ञानसुता डॉ. कमला सोहोनी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
5 Oct 2016 - 4:42 am

ह्याआधी- दीपशिखा
दीपशिखा-१. अग्निपुत्री डॉ. टेसी थॉमस
दीपशिखा-२. गिरीकन्या अरुणिमा सिन्हा
दीपशिखा-३. फ्राऊ अँगेला मेर्केल- दि कान्सलेरिन
दीपशिखा-४. फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

.

एप्रिल १९१२ मध्ये जन्मलेल्या कमला भागवतांचे घर बडोद्यातले एक सुसंस्कृत घर. वडिल नारायणराव भागवत केमिस्ट आणि सायंटिस्ट, तेलापासून तूप बनवण्याचा क्रांतीकारी शोध त्यांच्या नावावर आहे. मोठी बहिण विदुषी पद्मश्री दुर्गाबाई भागवत. लहानपणापासूनच विज्ञानाचे संस्कार कळत नकळत होत गेले. कमलाने तेव्हाच्या बाँबे युनिवर्सिटीतून फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये बी. एस्सी ची पदवी उच्चतम गुणांनी घेतली आणि पुढच्या शिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे अप्लाय केले. त्यावेळचे डायरेक्टर होते सर सी. व्ही. रामन. बायकांनी संशोधन क्ष्रेत्रात येण्याच्या ते अगदीच विरुध्द होते. तसेही सायन्स आणि टेक्नोलॉजी ही पुरुषांची मक्तेदारी समजली जात असल्याने कमलाचा अर्ज फेटाळून लावला गेला. त्या चक्क त्यांच्या ऑफिसबाहेर सत्याग्रहालाच बसल्या. त्यांचा हा हट्ट, ध्यास पाहून रामन यांनी एक वर्षाच्या प्रोबेशनवर त्यांना परवानगी दिली. वर्षभर त्यांनी काम करायचे पण जर त्यांचे काम डायरेक्टरांच्या पसंतीस उतरले नाही तर पुढची दारे बंद! कमला खूप अपसेट झाल्या. रामन ह्यांच्या कार्याविषयी पूर्ण आदर राखून त्या म्हणतात जर नोबेल पारिषिक विजेते रामन बायकांविषयी असा सनातन दॄष्टिकोन ठेवतात तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करायची?

खूप पाठपुरावा करून, सी व्ही रामन ह्यांच्या सर्व अटी मान्य करून त्यांनी आय आय एस मध्ये प्रवेश मिळवला होता. आता स्वतःला सिध्द करायचे होते. श्रीनिवासाय्या ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले. पुढे त्यांचे काम पाहून संतुष्ट झालेल्या रामन यांनी त्यांना पुढचे संशोधन करण्यास परवानगी दिली. बायोकेमिस्ट्रीमधील रेग्युलर रिसर्चसाठीची परवानगी म्हणजे एक मोठा टप्पा होता. त्याहूनही मोठा टप्पा म्हणजे बायका संशोधन क्षेत्रात काही करू शकतात असा विश्वास रामन ह्यांच्या मनात निर्माण करण्याची किमया त्यांनी केली आणि मुलींना तेथली दारे उघडली. पुढच्या वर्षीपासून केवळ स्त्री म्हणून प्रवेश नाकारणे बंद होऊन मुलींची गुणवत्ता पाहून त्यांना प्रवेश दिला जाऊ लागला. कमलाबाईंनी पदव्युत्तर शिक्षण संशोधनाच्यावेळी दूध, डाळींमधील प्रथिनं ह्यावर अभ्यास सुरू केला. डाळीमधील प्रथिनांवर काम करणार्‍या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. ह्या थिसिसवर त्यांना मुंबई विद्यापीठाची (तेव्हाची बाँबे युनिव्हर्सिटी) एम एस्सी ची पदवी मिळाली. पुढच्या उच्च शिक्षणासाठी त्या केंब्रिज युनिवर्सिटीत गेल्या. डॉ. डेरिक रिट्चर ह्यांच्या हाताखाली प्रयोगशाळेत काम सुरू झाले. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांच्याकरता वेगळे टेबल देण्यात आले. नंतर त्यांनी डॉ. रॉबिन हिल ह्यांच्या हाताखाली बटाट्यांवर काम सुरू केले. प्रत्येक वनस्पतीच्या उतींंमध्ये 'सायटोक्रोम सी' हा ज्वलनाला (ऑक्सिडेशन) मदत करणारा घटक असतो, ह्या सगळ्याच वनस्पतीजगताला लागू असलेल्या ह्या अगदी स्वतंत्र आणि क्रांतीकारक संशोधनासाठी त्यांना केंबिज युनिवर्सिटीकडून पि. एच डी मिळाली. शिवाय दोन स्कॉलरशिप्सही. अवघ्या १४ महिन्यातच त्यांचा हा ४० पानांचा थिसिस पूर्ण झाला. कमी वेळ आणि कमी शब्दात त्यांनी महत्त्वपूर्ण संकल्पना मांडल्या होत्या त्याबद्दलही त्यांचे कौतुक झाले. पि एच डी नंतर त्यांनी नोबेल पारितोषिक प्राप्तकर्ते डॉ. हॉप्किन्स ह्यांच्याबरोबर जैविक क्षपण आणि ज्वलन ह्यांच्यावर काम केले. ह्याच दरम्यान त्यांच्या युरोपातील अनेक शास्त्रज्ञांशी भेटीगाठी झाल्या.

पि एच डी आणि हॉप्किन्स यांच्याबरोबरचे काम संपवून त्या मायदेशी परतल्या. भारतात त्यांनी वेगवेगळ्या शहरातून बायोकेमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या संस्थांमधून जबाबदारीच्या पदांवर काम केले. त्यांनी दिल्लीच्या नवीन उघडलेल्या बायोकेमिस्ट्री विभागात प्राध्यापक म्हणून आणि विभागप्रमुख म्हणूनही काम पाहिले. कुन्नुरच्या न्यूट्रिशन रिसर्च लॅबच्या त्या डायरेक्टर होत्या. ४७ साली एम व्ही. सोहोनींशी लग्न करून त्या मुंबईत आल्या आणि मुंबई मध्ये नव्यानेच सुरू झालेल्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये प्राध्यापकी केली. त्यांच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन गावखेड्यातली गरीब, आदिवासी जनता वर्षोनुवर्षे खात असलेली अन्नधान्ये, त्यातले घटक, त्यांतील पोषण मूल्ये ह्यावर त्यांनी काम केले. गरीबातल्या गरीब माणसाच्या अन्नघटकातल्या पोषणमूल्यांबाबतचे त्यांचे संशोधन भारतीय सामाजिक संदर्भाच्या दॄष्टीने फार महत्त्वाचे ठरते. त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद ह्यांनी कमलाताईंना नीरेतील पोषणमूल्यांवर संशोधन करण्याची सूचना केली. आपल्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन त्यांनी नीरेवर अनेक वर्ष संशोधन केले. किशोरवयीन मुले आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरेचा समावेश केल्यास त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधार होतो असे निदर्शनास आणून दिले. ह्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. त्यांना 'वुमन ऑफ सायन्स' असे म्हटले गेले.

भारतीय कन्झ्युमर गायडन्स सोसायटीच्या त्या आघाडीच्या सक्रिय सभासद होत्या. 'कीमत' ह्या मासिकामध्ये ग्राहक सुरक्षेबद्दल त्यांनी अनेक लेख लिहिले. १९८२-८३ मध्ये त्या सोसायटीच्या अध्यक्षा बनल्या. संशोधनाचे कार्य तर चालू होतेच. एवढे संशोधन, एवढे कार्य आणि एवढे पुरस्कार मिळूनही केवळ महिला म्हणून बाँबे सायन्स इन्स्टिट्यूट च्या डायरेक्टरपदापासून चार वर्षे त्यांना दूर ठेवले गेले. शेवटी त्यांना त्यांचे ते हक्काचे पद मिळाले आणि त्या पदाचाच सन्मान झाला. त्यांचे गुरू डॉ. रिट्चर ह्यांना फार आनंद झाला. एवढ्या मोठ्या संस्थेने एका स्त्रीला डायरेक्टर पदी बसवून इतिहास निर्मिला आहे आणि ती स्त्री माझी विद्यार्थिनी आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे असा संदेश त्यांनी पाठवला.
इंडियन कॉन्सील ऑफ मेडिकल रिसर्च च्या १९८८ च्या दिल्लीमधील सोहळ्यात सन्मानित झाल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि भारतातल्या स्त्री संशोधकांची ही प्रेरक ज्योत मालवली. पण त्यांनी चाललेल्या पायवाटेचा आता राजरस्ता झाला आहे आणि अनेकानेक स्त्रिया सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करत आहेत.

समाजजीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

सुरेख लिहिलं आहेस स्वातीताई.

अजया's picture

5 Oct 2016 - 8:21 am | अजया

सर्व दीपशिखांना आणि त्यांच्यावर मालिक लिहिण्यासाठी कष्ट घेणार्या स्वातीताईला _/\_

चाणक्य's picture

5 Oct 2016 - 10:47 pm | चाणक्य

अतिशय सुंदर लेखमाला.

त्यांनी चाललेल्या पायवाटेचा आता राजरस्ता झाला आहे आणि अनेकानेक स्त्रिया सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करत आहेत

सलाम!

रातराणी's picture

5 Oct 2016 - 10:57 am | रातराणी

हा लेखदेखील आवडला!

जबरदस्त! यांचं चरित्र उपलब्ध आहे का?

स्वाती दिनेश's picture

5 Oct 2016 - 3:14 pm | स्वाती दिनेश

त्यांचे चरित्र उपलब्ध आहे का ह्याबाबत कल्पना नाही पण त्यांनी लिहिलेले 'आहार गाथा' हे पुस्तक मात्र फार सुंदर आहे.
आपला आहार हा केवळ आपल्या शरीरप्रकृतीशी संबंधित नसतो, तर तो आपल्या एकूण जीवनाशी, आपल्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत असतो, हे सांगताना लेखांमधल्या शात्रीय माहितीचा पाठपुरावा करणार्‍या काही पाककृतीही त्यांनी या पुस्तकात सुचविल्या आहेत.
स्वाती

पैसा's picture

5 Oct 2016 - 3:20 pm | पैसा

सहमत

यशोधरा's picture

5 Oct 2016 - 5:11 pm | यशोधरा

हो, सुरेख आहे हे पुस्तक.

उल्का's picture

5 Oct 2016 - 12:36 pm | उल्का

आत्ताच सर्व लेख वाचले.
खूप छान लिहिलं आहेस स्वातीताई.

सिरुसेरि's picture

5 Oct 2016 - 12:46 pm | सिरुसेरि

या लेखमालिकेतील सर्वच लेख खुप माहितीपुर्ण आहेत .

पद्मावति's picture

5 Oct 2016 - 1:06 pm | पद्मावति

वाह, हाही लेख अप्रतिम आहे स्वाती. खूप माहीतीपूर्ण आणि प्रेरणादायी.

पिशी अबोली's picture

5 Oct 2016 - 1:27 pm | पिशी अबोली

फारच प्रेरणादायक लेख आहेत या लेखमालिकेतले सगळेच. जबरदस्त!

तेजस्वी व्यक्तिमत्वांची ओळख करून देणारी माहितीपूर्ण मालिका आवडली.

सखी's picture

7 Oct 2016 - 7:13 am | सखी

हेच म्हणते.

इशा१२३'s picture

5 Oct 2016 - 2:10 pm | इशा१२३

छान ओळख स्वातीताई _/\_

पैसा's picture

5 Oct 2016 - 3:25 pm | पैसा

ज्या काळात सगळ्या बायका शाळेपर्यंत सुद्धा पोचत नव्हत्या, त्या काळात एवढे काम!

गिरिजा देशपांडे's picture

5 Oct 2016 - 5:02 pm | गिरिजा देशपांडे

ग्रेट!!!!!!! _/\_

दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा आवडला. आहार गाथा पुस्तक वाचायला आवडेल.

मारवा's picture

5 Oct 2016 - 6:11 pm | मारवा

छान लेख आवडला.

छान लिहले आहेस ताई. लेख आवडला. सगळे लेख वाचुन काढले एकत्र.

काय महान कामगिरी आहे यांची! जबरदस्त!

मी-सौरभ's picture

13 Oct 2016 - 7:08 pm | मी-सौरभ

हेच म्हणतो

या सगळ्याच लेखांचं काही अजून स्त्री व्यक्तिमत्वांबद्दल लेख त्यात सामील करून एक पुस्तक तयार करता येईल का?
खरतरं मिसळपाव ची एखादी प्रकाशन संस्था असती तर किती बरं झाल असत. आपल्या इथ किती छान छान लेखमालिका येत असतात, त्या सगळ्या पुस्तकरूपी प्रकाशित झाल्या तर जे आंतरजालावर वाचत नाहीत फारसे त्यांना पण हे लिखाण वाचता येईल.

नाखु's picture

14 Oct 2016 - 12:54 pm | नाखु

जिद्दी आणि प्रेरणादायक