बादलीयुद्ध ७

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
15 Aug 2016 - 2:12 am

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा
-------------------------------------------------------------------------------

तुफान वारे वाहते आहे. अंधारातल्या वाड्यावस्त्या धुळीने भरुन गेलेल्या. एखादं कुत्रं मागं लागण्याची बरीच शक्यता होती. बसस्टँडपर्यंत चालत गेलो खरा, पण माझे पाय फारच दुखायला लागले. मी गोरखला म्हटलं,
"ये आरं जरा थांब की, मलाबी तुज्यासंगं येवूदी"
कधी कधी माझ्याही नकळत मी मूळ गावठी उच्चारात बोलतो. तसा गोरखंही गावठीच. मग आम्ही विनाकारण का एवढे शुद्ध बोलतो तेच कळत नाही.
गोरख म्हणाला, "कुठं दारं धराला चाल्लंस काय? लैच भंगार गावठी बोलतंस तू"
मी म्हटलं, जरा हळूहळू चाल, लय पाय दुखायलेत.
मग मी त्याला गाठोस्तोर गोरख तिथेच थांबला. मग आम्ही चालू लागलो. चौकात आम्हाला मसाला दुधाचा गाडा दिसला. पण आम्ही अजिबात दुध वगैरे पिलो नाही. या चौकातूनच एक नॅशनल हायवे गेलाय. जवळच त्याला लागून सप्तगिरी नावाचं परमिट रुम बियर बार आहे. गोरख मला म्हणाला, "परवा सप्तगिरीवर फुल राडा झाला. मालक पळून गेलाय कुठंतरी."
येवढ्या जवळच्या हॉटेलात राडा झाला आणि मला माहीतंच नाही.
मी म्हटलं, काय झालंय नक्की.
"अरे पोलिस आलते मर्दा, दंगल ऊसळली होती. सगळ्या काचाबिचा फोडल्यात सोड"
गोरखला अशा गोष्टी कुठून कळतात काय माहीत.
तो म्हणाला, कुठल्यातरी पारध्याच्या माणसाला वेटरनी धुतलाय. बिलावरुन वादावादी झाली. डोक्यात बियरची बाटली घातल्यावर तो माणूस मेलाच.
मग पोलिस वगैरे आले. पण त्या माणसाच्या समाजबांधवांनी बॉडी ताब्यात घ्यायला नकार दिला. दिवसभर बॉडी हॉटेलसमोरच पडून होती म्हणे.
हे आसंलं पण त्या परिसरात घडत होतं. म्हटलं एखादा पोलिस वगैरे येऊन आपल्याला धरंल की काय. गोरख 'पोलिस टाईम्स'चा चाहता आहे. त्याच्यामुळे मलाही तसले पेपर वाचायची सवय लागली होती. मला वाटलं ही बातमी पण पोलिस टाइम्सला नक्की छापून येणार.
तो म्हणाला, पाळण्यात बसणारेस काय?
मी म्हटलं, च्यायला अजिबात नाय. मला चक्कर येते.
इथेही पाळणे येतात तर!
गावाच्या पलिकडेच एक मोकळं मैदान आहे. तिथे म्हणे दरवर्षी जत्रा भरते. कोणत्या देवीची माहीत नाही. आमच्या गावाकडची आणि इथली जत्रा, नक्की काय फरक आहे म्हणून मी आणि गोरख जत्रेला आलो होतो.
जेव्हा पोहोचलो. तेव्हा शेम टू शेम आमच्याच गावाकडची जत्रा वाटायला लागली. तीच आगगाडी, तोच आकाशी पाळणा, तेच फुगे, तसलेच पिपाण्यांचे आवाज, तशीच मंदिराबाहेरची फुलांची दुकानं. म्हटलं आमच्या गावाकडचा चुरमुरेवाला इथेच कुठे भेटतोय की काय.
खरंतर आम्ही जेवण वगैरे करुन बऱ्याच उशिरा आल्याने जत्रेत तशी सामसूमच दिसत होती. मंदिराशेजारच्या एका कोपऱ्यात बरीच लोकं गर्दी करुन बसली होती. आम्ही दोघांनी दोन मोठे मोठे भोपू विकत घेतले आणि तेच मोठमोठ्याने वाजवत गर्दिच्या ठिकाणी आलो.
समोर स्टेज होते. आणि आर्केस्ट्राच्या नावाने सुरु झालेला तो तमाशा.
फुल आमच्या गावातल्यातसारखा. इथली लोकंपण भलतीच रसिक. टोप्या घातलेले बरेच गावठी वीर त्यांच्यात दिसत होते.
सुरुवातीला एक अगदीच कमनीय मुलगी स्टेजवर आली. लोकांनी मापात शिट्ट्या वगैरे मारल्या. मग तिच्यामागून एक जाडीभरडी बाई. अन तिच्यामागून पुन्हा दोन तिन पोरी.
कै च्या कै "कजरा रे..."वरच सुरु झाल्या.
गोरख म्हणाला, अरे ती मधली हिप्पी कटवाली कसली काय आयटम दिसते यार.
मग तो हळवा होत गंभीरच झाला.
मी म्हटलं, निदान तमाशावालीला तरी सोड रे.
मग तो म्हणाला, अरे होच की, तमाश्यावाली आहे म्हटल्यावर तिला किती जणांनी......

पहिलं गाणं संपल्यावर ती जाडीभरडी बाई एकटीच स्टेजवर नाचायला लागली. शिट्ट्यांचा वगैरे ओघ बराच कमी झाला. तिच्या 'इश्काची इंगळी' कुणाला डसलीच नाही.

मग ती गेली आणि तिच्यापेक्षा बथ्थड बाई स्टेजवर आली. हिचे प्रताप बघितल्यावर वाटायला लागले की जुनीच बरी होती.
"कारभारी दमानं..."वर हिनं अदाकारीच्या नावाने नुसता धिंगाणा घातला. तेही परवडलं असतं, पण जेव्हा तिनं फारंच बिभत्स हावभाव वगैरे सुरु केले तेव्हा बऱ्याच जणांना आपण कोणत्या जन्माची फळं वगैरे भोगतोय असं वाटून गेलं. ते ठुमके वगैरे तिच्या स्थूल शरीराला सूटच होत नव्हते.
अतिशय कंटाळवाण्या अश्या त्या तमाशात, जेव्हा ती कमनीय मुलगी पुन्हा आली तेव्हा भयानक शिट्ट्यांनी मैदान दणाणून गेलं. बऱ्याच जणांनी बसल्या बसल्या हात वर करुन नाचायला सुरु केलं. आम्ही पण भरपूर भोपू वगैरे वाजवून घेतला.
त्या मुलीचं 'सोळावं वरीस धोक्यात' जाईपर्यंत लोकांची ब्रम्हानंदी टाळी ही लागलीच होती.

नंतर ती बथ्थड बाई पुन्हा आली. आणि अदाकारीच्या नावाला काळे फासून गेली.
हिच्यानंतर ती पहिली जुनी जाडीभरडी बाई आली. आणि तिनं सरळ 'रात टाकायला' सुरु केलं.
पहिल्या रांगेतली लोकं उठली आणि आम्हाला ही नकोच म्हणून तिच्या नावानं बोंबलायला लागली. गाणं अर्ध्यावरंच बंद पडलं.
बाहेर गोंधळ माजलाय म्हणून ती बथ्थड बाई हातात माईक घेऊन स्टेजवर आली. आणि तिनं सुरु केलं,
"मायबाप रसिकांनो,....
आम्ही कलेचे उपासक....
गावोगावी फिरुन आमची कला दाखवतो.... खूप लांबून आलोय..... आम्ही तमाशावाले नाही...... हात जोडून तुम्हाला विनंती..... कलेचा अपमान करु नका.... " वगैरे.

हिनं आज बोअर करुन लोकांना मारायचंच ठरवलं असावं. कलेचे उपासक जत्रेच्या सुपाऱ्या कधीपासून घ्यायला लागले?
मग पुन्हा महाप्रचंड कंटाळवाण्या, महाप्रचंड बोअरींग दोन बथ्थड बायका तथाकथित अदाकारी दाखवत बसल्या. चुणचुणीत पोरी बाहेर आल्याच नाहीत. लोकं त्यादिवशी मेली कशी नाहित याचाच प्रश्न आहे.

रात्री बऱ्याच ऊशिरा एक मिशावाला माणूस स्टेजवर आला.
हातात माईक घेऊन तो म्हणाला, समोर जे हॉटेल दिसतंय ना, तिथे एक पिंजरा आहे. आणि त्याच्यात एक पोपट आहे. तुम्हाला माहीतीच असेल.
सगळी "हो.." म्हणून ओरडली.
मी मागे वळून बघितलं, तर खरंच तिथे एक पिंजरा होता. खरंच त्याच्यात एक पोपट होता.
मग तो म्हणाला, संध्याकाळी मी मिसळ खायला गेलो तेव्हा मालकाला म्हणलं, तुमचा हा पोपट केवढ्याला देणार.
मग पोपट पिंजऱ्यातून ओरडला, " गपरे आयघाल्या"
डिट्टो त्याने पोपटाचा आवाज काढला. मला वाटलं खरंच पोपट असाच बोलला असणार. जाताना म्हटलं आपणपण पोपटाची कायतरी कळ काढावी. खरंच पोपट बोलतात का हे मलाही बघायंच होतं.
त्या माणसाने पुढे सांगितलं की,
तो मालक त्याला म्हणाला, या पोपटाचा एक पाय ओढला की तो मराठीमधून बोलतो, दुसरा ओढला की इंग्लिशमधून.
मग माणूस त्याला म्हणाली की, दोन्ही पाय ओढल्यास काय होईल?
पिंजऱ्यातून पोपट ओरडला, "पडेन की मी आयघाल्या"

आधीच ऐकलेला हा विनोद फारंच पकाऊ निघाला.

गोरख म्हणाला, हा तमाशा नव्हंच.चल आता जावूया.
मी म्हटलं, आता होस्टेलवर जाऊन कुठे तंगड्या तोडून घ्यायच्या. झोपूया हितंच कुठेतरी.
तो म्हणाला, रात्री झोपेत कुणी आपला मर्डर बिर्डर केला तर काय घ्या.

मग आम्ही होस्टेलवर आलो.

दुसऱ्या दिवशी आम्हांला 'सकाळ'मध्ये ती बातमी दिसली. फ्रंट पेजवरंच छापून आली होती. बिलाच्या वादातून खून वगैरे असं बरंच काही होतं. म्हणजे गोरख सांगत होता ते खरंच होतं.

संध्याकाळी आम्ही पुन्हा जत्रेला जायचं ठरवलं. मी त्याला म्हटलं, आपल्याला चालणं काय व्हायचं नाय गड्या.
मग तो म्हणाला, आपण सायकलवर जावू.
अमित नावाच्या मुलाकडे सायकल होती. मी अमितला म्हटलं, आस्सा गेलो आणि आस्सा आलो, दहाच मिनिटात.
मग त्याने चावी दिली. त्याची सायकल उगाच घेतली वाटायला लागलं. ऊठसूट कोणी लुनाला बुलेट म्हटलं तर कसं चालेल. तशीच त्याची सायकल होती. खूपंच जूनी.
गोरख म्हणाला, आता हेच करायंच राहिलं होतं. तुला जरा चांगली सायकल बघता येत नव्हती.

त्यादिवशी सायकल करकर करकर आवाज करत अंधारातून पळत होती. डबलशीट सायकल मारणे म्हणजे फारंच मेहनतीचे काम. अर्ध्या वाटेतंच माझी दमछाक झाली. मांडीला गोळे वगैरे आले की काय असं वाटायला लागलं.
गोरखला म्हटलं, आपल्याला हे काय जमणार नाही. भले मी इथून चालतंच येतो.
मग गोरखनं रेड्याचं बळ लावून सायकल चालवली.
मला भिती होती, ही पंक्चर झाली, कुत्रं सटाकलं, चाक आऊट झालं तर तो एक फुकटचा भुर्दंड असणार होता.

सायकल लावायची कुठे या साध्याश्या प्रश्नाने आम्हाला बरेच छळले. शेवटी स्टेशनरी दुकानापुढे लावून आम्ही जत्रेला गेलो. आज काय आर्क्रेस्टा वगैरे काहीच नव्हता. रांग लावून गोरखने मला दर्शन मात्र घ्यायलाच लावले. पायऱ्यावरंच बसलेला एक म्हातारा दिसला. गोरखंने मग त्याला विचारलं, "मामा, कुठल्या देवीची यात्रा म्हणायची ही?"
मग तो मामा फुल गावरान मध्ये सुरु झाला, "तुकोबाच्या काळापस्नं हितं जत्रा भरती. जागृत देवस्थान हाये, नवसाला पावती देवी, हितं लय कोंबड्या कापायची लोकं, आता काय सुदा नाय"
त्या म्हाताऱ्यानं आम्हाला गावातंच नेऊन पोचवलं. अशीच बोलतात गावाकडची लोकं.
म्हातारं म्हणालं, "कुस्त्या बघितल्या का पोरावो, इदूळचं संपल्या आसत्याला"
इथं कुस्त्यासुद्धा भरतात!
मग गोरखनं आणि मी जत्रेला पुर्ण राऊंड मारला. कॉलेजमधलं कोण दिसतंय का वगैरे बघितलं. पण बरेच जण येऊन आठच्या आधीच परत गेलेले. काही फटाकड्या पोरी मात्र दिसल्या. पण भलती रिस्क घेण्यासारखे येडे आम्हीपण नव्हतो.
म्हटलं, जत्रा संपत आलीये, आता इथं विशेष काही नाही. निघूया.
मग आम्ही स्टेशनरी दुकानापुढे आलो. तर सायकल तिथं दिसलीच नाही. मग आम्ही जरा लांब ऊभा राहून सायकल नक्की कोठे लावली याचा विचार करु लागलो. पुर्ण लाईन चाळली. पुन्हा स्टेशनरी दुकानापुढे आलो तर आमच्या सायकलचं तुटलेलं कुलूप आढळलं.
गोरख म्हणला, आता बसा बोंबलत. सायकल तर चोरीला गेली.
मला भयानक टेन्शन आलं. आता किमान हजार बाराशेचा बांबू मला बसणार होता. एवढी रक्कम आणायची तरी कुठून. घरी काय सांगणार?
बराच वेळ आम्ही उगाचच निर्रथक सायकलीचा शोध घेतला.
गोरख म्हणाला, आपण पोलिसात जाऊ.
मी जरा विचार केला. एक प्लॅन केला आणि गोरखला सांगितला.
तो म्हणाला, "म्हणजे काय? तू आणि चक्क चोरी?"
मी म्हटलं, तू फक्त तिथं वळणावर माझी वाट बघत ऊभा राहा. मी आलोच.
मग गोरख गेला. मी धडधडत्या छातीनं पुन्हा सायकलींच्या लायनीवर आलो. बऱ्याच सायकली बघितल्या. शेवटी एक बिना कुलपाची दिसलीच. हिच ती वेळ. हाच तो क्षण. मी अलगद तिला बाहेर काढली. आणि जशी काय माझीच आहे म्हणून तिच्यावर टांग टाकली.
खरंतर घाम वगैरे भरपूर फुटला. गोरखंला कॅरेजवर घेऊन सुसाट आम्ही चौक ओलांडून टेकडी येईस्तोर दमच नाही घेतला.
टेकडीवर मात्र थांबलो. गोरख म्हणाला, ही लय मोठी रिस्क घेतलीस तू. कुणाला समजलं तर काय खरं नाय.
मी म्हटलं, काय करणार. अमितला हजार बाराशे कुठून देऊ?
तो म्हणाला, अरे पण त्या सायकलवाल्याची काय चूक रे.
मी म्हटलं, आता तोही कुणाचीतरी चोरुन घेऊन जाईल की. आणि तुला त्याची कसली पडलीय. हितं माझी सायकलपण चोरीलाच गेलीय की.
त्याला म्हटलं, अजिबात कुणाला सांगायचं नाही. नाहीतर बघ.
रात्री ती सायकल स्टँडला लावली आणि झोपलो.
सकाळी जाग आली तेव्हा अमित बोंबलतंच माझ्या रुमवर आला. म्हणाला, "माझी सायकल कुठे लावलीय. दिसत नाही कुठं ते?"
मी त्याला विश्वासात घेतलं. रात्री जे काय घडलं सगळं त्याला खरं सांगून टाकलं. मग आम्ही खाली सायकल बघायला गेलो.
म्हटलं, ही बघ. तुझ्या सायकलीपेक्षा चांगलीय. दणकट आहे एकदम.
तो म्हणाला, हिला कुलूप टाकावं लागेल. मटगार्डपण गंजलंय. मुठापण बदलाव्या लागतील.
मी म्हटलं, टोटल खर्च सांग. आणि हे आपल्यातच ठेव. उगाच इज्जतीचा फालूदा नको.

-----------------------

इथं मला दोनशेचा भुर्दंड बसला. गोरखला म्हटलं, साल्या तू पन्नास तरी दे. एवढा बसून आलतास.
तो म्हणाला, असं कसं , असं कसं. आपण 50-50 करायचं. मी शंभर देणार.
हे भारीच आहे. मी म्हटलं, या 50-50 ची आठवण मी कायम ठेवीन. विसरणार नाही. लिहून घे.

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रेमप्रकरण आवडलंय.. झकास!!

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2016 - 5:16 am | ज्योति अळवणी

छान

संजय पाटिल's picture

15 Aug 2016 - 6:54 am | संजय पाटिल

छानच चाललय...

लालगरूड's picture

15 Aug 2016 - 7:27 am | लालगरूड

तिला पण चाॅकलेटची कथा सांगितली का o_O o_O :)) :)) :-D :-D

विजय नरवडे's picture

15 Aug 2016 - 8:33 am | विजय नरवडे

आवडलं. पुढचा भाग कधी ?

अजया's picture

15 Aug 2016 - 10:31 am | अजया

:)
पुभाप्र

अमितदादा's picture

15 Aug 2016 - 10:45 am | अमितदादा

मस्तच...हे वाक्य तर लय भारी "मी पण जीव देईन. तुझ्या बडबडीला कंटाळूनच जीव देईन. पाहिजे तर आत्ताच देतो."

आनन्दिता's picture

15 Aug 2016 - 12:39 pm | आनन्दिता

आवडलं!

ते ऑर्केस्ट्राचे वर्णन ऐकुन खुप हसु आलं. मस्त!!

ही गोष्ट कोणत्या दिशेने चालली आहे याची लैच उत्सुकता आहे.

अवांतरः जव्हेरभाऊंचं पुस्तक झालंच पाहिजे.

उडन खटोला's picture

15 Aug 2016 - 2:53 pm | उडन खटोला

पुस्तक झालंच पाहिजे याला अनुमोदन.
पण लेखकराव म्हणून कुणाचा फोटो लावायचा???

आनन्दा's picture

15 Aug 2016 - 3:43 pm | आनन्दा

पुभाप्र

स्वीट टॉकर's picture

15 Aug 2016 - 8:47 pm | स्वीट टॉकर

पुढच्या लेखाची वाट बघणं अवघड होतं. छान चालली आहे कथा.

हा भाग परत परत संपादित का होतोय.... कोणी सांगेल काय

जव्हेरगंज's picture

16 Aug 2016 - 11:44 am | जव्हेरगंज

या भागात काही चुका झाल्या होत्या. म्हणून मीच यातला काही भाग वगळायला सान्गीतला होता.

तो भाग नंतर येईलच!

बाकी तुमच्या चुका सुद्धा उत्सुकता वाढवून गेल्या. असो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..