अळवावरचे पाणी (नागपूर डायरी)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
12 May 2016 - 8:43 am

आधी अरिझोना, नंतर पूर्व अमेरिका आणि कॅनडामध्ये थंडीत दोन महिने कुडकुडलो. मग एकदम पलटी खाऊन नागपूर नावाच्या धगधगत्या भट्टीत दाखल झालो. नुसतेच दाखल व्हायला नाही, तर चक्क काही महिने मुक्काम ठोकायला! नागपूर! माझे जन्मगाव! लहानपणी खेळताना गुढगे खरचटल्यानंतर इथल्याच धुळीचे त्यावर लेप चढले होते. इथल्याच उन्हाच्या पोळणाऱ्या झळांनी मला घडविले असेल!

आज पंचेचाळीस वर्षांनंतर देखील काही फारसे बदलेले नाही! लहानपणी विनयकाका नेहमी “नागपूर म्हणजे एक मोठे खेडे आहे” असे म्हणत. ह्या खेडेगावच्या मानसिकतेला कंटाळून ते नागपूर सोडून मुम्बईला गेले होते. आता खूप बदलले आहे सगळे. मोठाले मॉल आहेत. पॉश रेस्तरॉं आहेत. होंडा आणि टोयोटोच्या सुरक्षीत कवचांमध्ये स्वत:ला बंद करून माणसे धावत आहेत. बटबटीत शहरी ठिगळांचे कपडे पांघरून नागपूर दौडते आहे. ही दौड आणखी वेगाने होणार असे सांगणारी मेट्रोची शिटी ऐकू येत आहे.

लांबवर शिटी वाजवणारी मेट्रो अजून दूर आहे. सध्या माझ्याकडे अकरा नंबरची बस हा एक पर्याय आहे. जवळपास जाण्यासाठी ही अकरा नंबरची बस बरी आपल्या हक्काची! सीन नेहमीचाच! रस्त्यावर दाबलेली आणि डांबर घासूनघासून उडाल्यामुळे उघडी पडलेली खडी. त्यावरून अविरत धडधडत जाणाऱ्या गाड्यांनी कोरलेले खड्डे. खड्ड्यांमध्ये उरलेला खडीदार रस्ता शोधीत, कर्कश हॉर्न वाजवीत आपल्याला खेटून जाणाऱ्या पिसाट गाड्या. त्यांनी उडविलेल्या धुळीने माखलेली उदास झाडे झुडपे. जणू ह्या सगळ्यांनी वैतागून पचापचा इथेतिथे थुंकणारे लोक... जाउदे! रस्ता जसा आपला आहे, तसा त्यांचा देखील! सगळी पब्लिक प्रॉपर्टी!

नागपूरच्या ४५ डिग्रीमध्ये पाच दहा दिवस तावून सुलाखून निघाल्यानंतर नेहमीचे रुटीन म्हणजे सकाळचा फास्ट वॉक सुरु करावे म्हटले. आमच्या घरासमोरच एक रोलर स्केटिंग मैदान आहे. पहाटे रिकामेच असते. दहा पंधरा चकरा मारायला अगदी योग्य. पण काही दिवस तिथे घाण्यातल्या बैलाप्रमाणे चकरा मारून कंटाळा आला. म्हटले, पहाटे रस्ते वाहनांच्या दंडेलीपासून मुक्तच असतात. चला, आज रस्त्यावरूनच फिरू. दोन्ही बाजूने बंगलेवजा घरे व मध्ये रुंद रस्ता. बहुतेक सगळी फाटके, दारे बंदच. क्वचित कुठे एखादे आजोबा फुलाझाडांना नळीने पाणी देत आहेत. तर कुठे कोणाची चाहूल नाही असे पाहून दुसरे एखादे आजोबा रस्त्यावरून काठीने ओढून देवपूजेसाठी फुले जमा करीत आहेत. ते पाहून चित्रा नेहमी म्हणते ते आठवले. “देवाला चोरलेली फुले वाहिलेली चालतात वाटते!” पण असो. तो विषय वेगळा.

नागपूरात सगळी वाहने, भलेही रहदारीचे नियम पाळो, न पाळो एक अलिखित नियम न चुकता पाळतात. कोठेही रस्ता क्रॉसिंग दिसले, की तिथे येण्याआधी हॉर्नवर पंजा दाबून धरायचा आणि हॉर्नचा पडदा किंवा समोरच्याचे कान फाटेपर्यंत किंचाळायचे. कोणीहि पायी चालणारा माणूस, किंवा दुसरे वाहन वाटेत दिसले कि तसाच भूभूत्कार! मला वाटते सलामी देण्याची इथली ही पद्धत आहे कि काय!

वाहनांची वर्दळ नव्हती तरीही मी आपला शहाण्यासारखा एका कडेने चालत होतो. तर एक चकाचक कार सुसाट वेगाने समोरून आली. माझ्यात आणि तिच्यात बाजूला चांगले मिटर दीड मिटर सुरक्षित अंतर होते. अर्थात नागपूरच्या वाहनांचा दंडक तिने पाळलाच. कर्णकर्कश आवाजात माझ्यावर भुंकत ती माझ्या जवळ आली. पहाटेची शांत, थंड वेळ. दुपारच्या भट्टीची धग आणि कुलरचा घरघराट सुरु होण्याआधीचा माझा हक्काचा नीरव गारवा. त्या शांततेचा भंग करणारा आक्रस्ताळेपणा मला डिवचून गेला. आणि कधी नव्हे ते मी समोरून येणाऱ्या बोंबलदांडग्याकडे पाहून अगदी तोंड पूर्ण उघडून मोठ्याने ओरडलो “कशाला भुंकून राहिला बे!” कार जरा हळू होऊन माझ्या मागे गेली.

पण आता माझी फिरण्याची इच्छा मेली होती. म्हणून मी देखील दोन पाउले पुढे जाऊन मागे फिरलो. पाहिले तर पुढे थोड्या अंतरावर ती कार थांबली होती, आणि त्यातली दोन माणसे कोणाची तरी वाट पहात असावी अशी माझ्या दिशेने पहात बाहेर उभी! त्यांच्या माझ्याकडे टक लावून पहाण्यामुळे माझ्या मनात पाल चुकचुकली, की हे दाणगट बहुदा माझ्याच स्वागतासाठी उभे आहेत. माझी सटपटली! बाजूच्याच आडव्या गल्लीमध्ये मी घुसलो, आणि आधी कधीही चाललो नव्हतो इतक्या जलद चालीने मागे फिरलो. नंतर एकामागून दुसरी अशा तीनचार गल्ल्या झटापट पार करीत कुठेतरी पोहोचलो.

ही सगळी धावपळ मात्र फळास आली! कारण मी जिथे पोहोचलो, तो एक सुंदर पार्क होता! अतिशय विस्तीर्ण मैदान. मैदानाच्या चारी बाजूने चालायला सिमेंटचा मार्ग. मध्ये मुलाना खेळायला मोठी जागा. एका बाजूला मऊ लुसलुशीत हिरवळीचे गालिचे. त्याच्या बाजूने हिरवी गार फुलझाडे, कुंपणाची झाडे... अतिशय सुंदर. बा नागपुरा... seems that you have arrived…..!

(क्रमश:)

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

सुयोग पुणे's picture

12 May 2016 - 9:37 am | सुयोग पुणे

लइ भारी..येऊ द्या अजुन..

अन्या दातार's picture

12 May 2016 - 12:04 pm | अन्या दातार

मस्त

पद्मावति's picture

12 May 2016 - 2:07 pm | पद्मावति

मस्तं! पु.भा.प्र.

मंजूताई's picture

12 May 2016 - 2:36 pm | मंजूताई

लेख आवडला! सही वर्णन ...
लक्ष्मीनगरवासी अनिवासीनागपूरकर

विवेकपटाईत's picture

12 May 2016 - 9:50 pm | विवेकपटाईत

उन्हाळा सोडला तर नागपूर माझे आवडते शहर आहे. मोठी मोठी घरे, घरात पेरूचे, लिंबाचे झाडे तर हमखास असतातच. वेळेची पर्वा कुणालाच नसते. सकाळी ९चा टाईम कुणी दिला तर समजा ११ वाजता जायचे आहे. लोक आतिथ्यशील आहे, पुण्या मुंबई सारखे कंजूष नसतात. मुंबईककर नातलागांकडे जेवायला जाताना दोनदा विचार करावा लागतो.

विवेकपटाईत's picture

12 May 2016 - 9:50 pm | विवेकपटाईत

उन्हाळा सोडला तर नागपूर माझे आवडते शहर आहे. मोठी मोठी घरे, घरात पेरूचे, लिंबाचे झाडे तर हमखास असतातच. वेळेची पर्वा कुणालाच नसते. सकाळी ९चा टाईम कुणी दिला तर समजा ११ वाजता जायचे आहे. लोक आतिथ्यशील आहे, पुण्या मुंबई सारखे कंजूष नसतात. मुंबईककर नातलागांकडे जेवायला जाताना दोनदा विचार करावा लागतो.

रेवती's picture

12 May 2016 - 10:28 pm | रेवती

लेखन आवडले. वाचत राहीन.
मुंबईककर नातलागांकडे जेवायला जाताना दोनदा विचार करावा लागतो.
तुम्हाला पुणेकर म्हणायचय का? काही विचारू नका, अजिबात दोन घास थालीमध्ये पडायचे नाहीत.
पुण्यामुंबैत सब्जी महाग झाल्याचा असर पाहुणचारावर पडलाय की काय?

यशोधरा's picture

12 May 2016 - 10:31 pm | यशोधरा

आवडले.

पुर्वी नागपूरला दरवर्षी जाणे-येणे असायचे.

पोहणे शिकायचा पहिला अयशस्वी प्रयत्न पण नागपूरलाच केला.

माझ्या सौ.आईचे शिक्षण पण नागपूरलाच झाले.

सायकल-रिक्षात बसण्याचा पहिला अनुभव पण नागपूरलाच घेतला.

माझ्या भावाचे डिप्लोमा आणि डिग्रीचे शिक्षण पण नागपूरचेच.

आता मात्र नागपूर पण खूप बदलले आहे, पुण्या-मुंबई सारखेच ते शहर पण अमेरिकेच्या शहरांसारखेच उत्तूंग इमारतींच्या मागे लागलेले दिसते.

असो,

अफाट लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध नसणार्‍या नौकर्‍यांचा शाप, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बूलढाणा आणि अमरावतीला बर्‍याच मोठ्या प्रमाणात भोगायला लागत आहे.असे माझे मत.

अरुण मनोहर's picture

13 May 2016 - 10:32 am | अरुण मनोहर

धन्यवाद.
नागपूर हे राजेशाही वृत्ती असलेल्या लोकांचे शहर (पूर्वी तरी) ओळखले जाते. (आरामशीर , टेन्शन न घेता, घड्याळामागे न धावता जगणे)
समस्या हीच आहे की, अजूनही नागपूर कडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही.
खरा नागपूरकर नागपूर कसेही असले तरी त्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असतो.

असे काही नाही...

"बुटी-बोरी"चा बट्ट्या-बोळ झाल्याने, उद्योगपती तिथे यायला तयार होणार नाहीत.

नागपूरच्या ह्या "राजेशाही" वृत्तीनेच सामान्य माणसांची उन्नती थांबली आणि आज पण तसेच आहे.

दर्डा किंवा अजित बेकरी किंवा आनंदभुवन ह्यांची गोष्ट वेगळी.

वसंत साठे केंद्रीय मंत्री (माझ्या अंदाजाने उद्योग मंत्री) होते आणि त्यांचे जबरदस्त वजन असून देखील, जांबूवंतराव धोटे आणि खोब्रागडे, ह्यांना सांभाळण्यातच त्यांची राजकीय आणि सामाजिक शक्ती खर्च होत होती.

आज पण, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नागपूरचा असूनही, विदर्भाला वेगळा न्याय (अर्थात सुयोग्य...इतर प्रदेशांवर अन्याय होवू न देता) मिळालेला नाही.

खरे तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा न आणता देखील प्रगती करता येईल.

जावू दे,

जोपर्यंत, बडनेरा ते नागपूर, दर २ तासांनी एक्सप्रेस गाड्या आणि पुलगांव ते नागपूर दर एक तासाने लोकल गाड्या सुरु होत नाहीत, तोपर्यंत विदर्भाची उन्नती होणे कठीणच आहे.

शिवाय कसारा-नागपूर ह्या मार्गाने पण दर ४ तासांनी गाड्या सोडल्या तर खानदेश आणि विदर्भाला, सोन्याचे दिवस नक्कीच येतील.

दळणवळणाचे महत्व ह्या देशातील पुढार्‍यांना अद्यापही समजले नाही.हेच खरे.

पैसा's picture

13 May 2016 - 12:11 pm | पैसा

सुंदर लिहिताय! पुढचा भाग कधी?

नगरीनिरंजन's picture

13 May 2016 - 3:00 pm | नगरीनिरंजन

छान सुरुवात. पुलेशु.
(अळवावरचे पाणी हे शीर्षक का दिले त्याची उत्सुकता (माझ्या ब्लॉगचेही नाव हेच आहे))

अरुण मनोहर's picture

13 May 2016 - 3:39 pm | अरुण मनोहर

निरंजन, मी वाटच पहात होतो, कोणी हा प्रश्न विचारेल म्हणून .
माझा नागपूरचा मुक्काम हा अळवावरचे पाणी असे मी मानतोय. स्थिर नाही.
प्रत्येक थेंब (अनुभव) हा आकर्षक, निराळा, पण
स्वतंत्र अस्तित्व जपणारा.
पानाच्या (नागपूरच्या) पाठीवर पसरून, चिकटून राहायचे त्या थेंबांची "फ़ितरत" नाही!

सिरुसेरि's picture

13 May 2016 - 4:40 pm | सिरुसेरि

छान माहिती . नागपुरात होंडा आणि टोयोटोच्या गाड्यांमध्ये वाळ्याचे पडदे लावलेले असतात असे ऐकले आहे .

मित्रहो's picture

13 May 2016 - 5:20 pm | मित्रहो

देशाच्या मध्यभागी असल्याने नागपुरात केंद्र सरकारची जवळ जवळ सारी कार्यालये आहेत. रिझर्व बँक सुद्धा आहे. कदाचित या सरकारी कार्यालयांमुळे नागपूर म्हणजे आराम वगेरे असे झाले असेल. बुटीबोरीत काम करनारा वेळेतच जातो. आता बुटीबोरी फार वाढली का नाही. तो भाग निराळा.
यावेळेस नागपुरला गेलो तेंव्हा एकटाच होतो आणि सामान फार नाही. दहाची ट्रेन असूनही सहा वाजताच स्टेशनला पोहचलो. वेळ घालवायला चालत निघालो. पूल झाल्याने हल्ली स्टेशनच्या बाहेर पूर्वीसारखी गर्दी नव्हती. टेकडीच्या गणपतीला गेलो. ही जागा खरच सुंदर आहे. बर्डीवर चालत असताना पकोडेवालाच्या गल्लीत बघितले तर एके काळी छोट्या टपरीसारखे असनारे दुकान बरेच मोठे झाले होते. बऱ्याच वर्षानंतर नैवेद्यम थाळी खायला गेलो पण संध्याकाळी फक्त डीलक्स थाळीच होती. हा प्रकार फारसा आवडला नाही. पंजाबी जेवण थाळी पद्धतीने असेच काहीसे होते.