अळवावरचे पाणी (नागपूर डायरी)
आधी अरिझोना, नंतर पूर्व अमेरिका आणि कॅनडामध्ये थंडीत दोन महिने कुडकुडलो. मग एकदम पलटी खाऊन नागपूर नावाच्या धगधगत्या भट्टीत दाखल झालो. नुसतेच दाखल व्हायला नाही, तर चक्क काही महिने मुक्काम ठोकायला! नागपूर! माझे जन्मगाव! लहानपणी खेळताना गुढगे खरचटल्यानंतर इथल्याच धुळीचे त्यावर लेप चढले होते. इथल्याच उन्हाच्या पोळणाऱ्या झळांनी मला घडविले असेल!
आज पंचेचाळीस वर्षांनंतर देखील काही फारसे बदलेले नाही! लहानपणी विनयकाका नेहमी “नागपूर म्हणजे एक मोठे खेडे आहे” असे म्हणत. ह्या खेडेगावच्या मानसिकतेला कंटाळून ते नागपूर सोडून मुम्बईला गेले होते. आता खूप बदलले आहे सगळे. मोठाले मॉल आहेत. पॉश रेस्तरॉं आहेत. होंडा आणि टोयोटोच्या सुरक्षीत कवचांमध्ये स्वत:ला बंद करून माणसे धावत आहेत. बटबटीत शहरी ठिगळांचे कपडे पांघरून नागपूर दौडते आहे. ही दौड आणखी वेगाने होणार असे सांगणारी मेट्रोची शिटी ऐकू येत आहे.
लांबवर शिटी वाजवणारी मेट्रो अजून दूर आहे. सध्या माझ्याकडे अकरा नंबरची बस हा एक पर्याय आहे. जवळपास जाण्यासाठी ही अकरा नंबरची बस बरी आपल्या हक्काची! सीन नेहमीचाच! रस्त्यावर दाबलेली आणि डांबर घासूनघासून उडाल्यामुळे उघडी पडलेली खडी. त्यावरून अविरत धडधडत जाणाऱ्या गाड्यांनी कोरलेले खड्डे. खड्ड्यांमध्ये उरलेला खडीदार रस्ता शोधीत, कर्कश हॉर्न वाजवीत आपल्याला खेटून जाणाऱ्या पिसाट गाड्या. त्यांनी उडविलेल्या धुळीने माखलेली उदास झाडे झुडपे. जणू ह्या सगळ्यांनी वैतागून पचापचा इथेतिथे थुंकणारे लोक... जाउदे! रस्ता जसा आपला आहे, तसा त्यांचा देखील! सगळी पब्लिक प्रॉपर्टी!
नागपूरच्या ४५ डिग्रीमध्ये पाच दहा दिवस तावून सुलाखून निघाल्यानंतर नेहमीचे रुटीन म्हणजे सकाळचा फास्ट वॉक सुरु करावे म्हटले. आमच्या घरासमोरच एक रोलर स्केटिंग मैदान आहे. पहाटे रिकामेच असते. दहा पंधरा चकरा मारायला अगदी योग्य. पण काही दिवस तिथे घाण्यातल्या बैलाप्रमाणे चकरा मारून कंटाळा आला. म्हटले, पहाटे रस्ते वाहनांच्या दंडेलीपासून मुक्तच असतात. चला, आज रस्त्यावरूनच फिरू. दोन्ही बाजूने बंगलेवजा घरे व मध्ये रुंद रस्ता. बहुतेक सगळी फाटके, दारे बंदच. क्वचित कुठे एखादे आजोबा फुलाझाडांना नळीने पाणी देत आहेत. तर कुठे कोणाची चाहूल नाही असे पाहून दुसरे एखादे आजोबा रस्त्यावरून काठीने ओढून देवपूजेसाठी फुले जमा करीत आहेत. ते पाहून चित्रा नेहमी म्हणते ते आठवले. “देवाला चोरलेली फुले वाहिलेली चालतात वाटते!” पण असो. तो विषय वेगळा.
नागपूरात सगळी वाहने, भलेही रहदारीचे नियम पाळो, न पाळो एक अलिखित नियम न चुकता पाळतात. कोठेही रस्ता क्रॉसिंग दिसले, की तिथे येण्याआधी हॉर्नवर पंजा दाबून धरायचा आणि हॉर्नचा पडदा किंवा समोरच्याचे कान फाटेपर्यंत किंचाळायचे. कोणीहि पायी चालणारा माणूस, किंवा दुसरे वाहन वाटेत दिसले कि तसाच भूभूत्कार! मला वाटते सलामी देण्याची इथली ही पद्धत आहे कि काय!
वाहनांची वर्दळ नव्हती तरीही मी आपला शहाण्यासारखा एका कडेने चालत होतो. तर एक चकाचक कार सुसाट वेगाने समोरून आली. माझ्यात आणि तिच्यात बाजूला चांगले मिटर दीड मिटर सुरक्षित अंतर होते. अर्थात नागपूरच्या वाहनांचा दंडक तिने पाळलाच. कर्णकर्कश आवाजात माझ्यावर भुंकत ती माझ्या जवळ आली. पहाटेची शांत, थंड वेळ. दुपारच्या भट्टीची धग आणि कुलरचा घरघराट सुरु होण्याआधीचा माझा हक्काचा नीरव गारवा. त्या शांततेचा भंग करणारा आक्रस्ताळेपणा मला डिवचून गेला. आणि कधी नव्हे ते मी समोरून येणाऱ्या बोंबलदांडग्याकडे पाहून अगदी तोंड पूर्ण उघडून मोठ्याने ओरडलो “कशाला भुंकून राहिला बे!” कार जरा हळू होऊन माझ्या मागे गेली.
पण आता माझी फिरण्याची इच्छा मेली होती. म्हणून मी देखील दोन पाउले पुढे जाऊन मागे फिरलो. पाहिले तर पुढे थोड्या अंतरावर ती कार थांबली होती, आणि त्यातली दोन माणसे कोणाची तरी वाट पहात असावी अशी माझ्या दिशेने पहात बाहेर उभी! त्यांच्या माझ्याकडे टक लावून पहाण्यामुळे माझ्या मनात पाल चुकचुकली, की हे दाणगट बहुदा माझ्याच स्वागतासाठी उभे आहेत. माझी सटपटली! बाजूच्याच आडव्या गल्लीमध्ये मी घुसलो, आणि आधी कधीही चाललो नव्हतो इतक्या जलद चालीने मागे फिरलो. नंतर एकामागून दुसरी अशा तीनचार गल्ल्या झटापट पार करीत कुठेतरी पोहोचलो.
ही सगळी धावपळ मात्र फळास आली! कारण मी जिथे पोहोचलो, तो एक सुंदर पार्क होता! अतिशय विस्तीर्ण मैदान. मैदानाच्या चारी बाजूने चालायला सिमेंटचा मार्ग. मध्ये मुलाना खेळायला मोठी जागा. एका बाजूला मऊ लुसलुशीत हिरवळीचे गालिचे. त्याच्या बाजूने हिरवी गार फुलझाडे, कुंपणाची झाडे... अतिशय सुंदर. बा नागपुरा... seems that you have arrived…..!
(क्रमश:)
Book traversal links for अळवावरचे पाणी (नागपूर डायरी)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लइ भारी..येऊ द्या अजुन..
मस्त
मस्तं! पु.भा.प्र.
मस्त
उन्हाळा सोडला तर नागपूर
उन्हाळा सोडला तर नागपूर
लेखन आवडले. वाचत राहीन
आवडले.
विदर्भात आणि त्यातही, नागपूरला बरेच नातेवाईक असल्याने...
धन्यवाद.
नागपूर कडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही.
वा!
छान सुरुवात. पुलेशु.
अळवावरचे पाणी
छान माहिती .
चांगला लेख